करोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का?

करोनाव्हायरस - टेस्टिंग करून घ्यावे का?
डॉ. अनंत फडके

Photo By: Spc. Miguel Pena
Photo By: Spc. Miguel Pena छायाचित्र प्रातिनिधिक; आंतरजालावरून साभार

ब्लड टेस्ट आणि स्वॅब टेस्ट यांत फरक काय?
कोव्हिड-आजार आहे अशी ज्या रुग्णाबाबत शंका आहे त्यांना स्वॅब टेस्टसाठी पाठवले जाते. ती पॉझिटिव्ह आली तर खात्रीने म्हणता येते की कोव्हिड-आजार आहे. या स्वॅब टेस्ट साठी घशातील स्रावाचा नमुना घेतला जाऊन तो विशिष्ट लॅबमध्ये पाठवला जातो. सरकारने अशा काही खास सक्षम लॅबनाच त्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांना सँपल पाठवून त्यांच्याकडून रिपोर्ट हातात पडायला (विशेषत: लहान शहरांमध्ये) वेळ लागतो. शिवाय सँपल घेण्यात काही कमतरता राहिली तर ती व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी रिपोर्ट निगेटिव्ह येतो. सरकारने खाजगी लॅबसाठी सध्या तिचा दर २२५० रु. ठरवून दिला आहे.

काही दिवसांपासून कोव्हिडसाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट अशी नवी स्वॅब टेस्ट आली आहे. तिला फक्त ५०० रु.च लागतात. तिचा रिपोर्ट फक्त १५ मिनिटांत, स्थानिक लॅब देऊ शकते. ती पॉझिटिव्ह आली तर कोव्हिड-लागण आहे असे खात्रीने सांगता येते. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आला तर कोव्हिड-लागण नाहीच असे खात्रीने म्हणता येत नाही. त्यामुळे अशा लोकांबाबत RT-PCR नावाची स्वॅब टेस्ट करावी लागते. म्हणून ‘आयसीएमआर’ने असे शास्त्रीय धोरण घेतले आहे – रुग्णाचा इतिहास, (कोणा रुग्णाशी घनिष्ट संपर्क आला होता का?), त्याची / तिची लक्षणे बघून डॉक्टरला शंका आली की या व्यक्तीची ही चाचणी केली पाहिजे, म्हणजे ज्यांना कोव्हिड-आजार असण्याची जास्त शक्यता आहे अशांचीच ही चाचणी केली पाहिजे. तसेच ज्या सोसायटी, वस्तींमध्ये अनेक रुग्ण आहेत त्या वस्त्यांमध्ये संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी ही चाचणी केली पाहिजे.

रक्ताच्या चाचणीतून कोव्हिड-१९च्या विषाणूंच्या विरोधी IgM, IgG या ‘अँटिबॉडीज’ आहेत का हे तपासले जाते. त्याची माहिती खाली दिली आहे.

जर परवडत असेल तर खाजगी लॅबमधून करोनाचे टेस्टिंग करून घ्यावे का? रॅपिड अँटिबॉडी टेस्टिंग आता काही ठिकाणी महापालिका उपलब्ध करून देत आहे. ती करून आपल्याला करोना होऊन गेल्याचे कळेल का? मग आपण पुन्हा संसर्ग होण्यापासून सुरक्षित राहू का?
अँटिबॉडी टेस्टिंगमधील IgM ही टेस्ट लक्षणे दिसू लागल्यापासून ५ ते १५ दिवस या काळात पॉझिटिव्ह येते. तर त्यातील IgG ही टेस्ट लक्षणे दिसू लागल्यापासून आठवड्याभरात ते अनेक आठवड्यापर्यंत पॉझिटिव्ह येते. पण कोव्हिडबाबत या टेस्टच्या अचूकतेबद्दल, भरवशाचा रिपोर्ट येण्याबाबत काही प्रश्न आहेत. म्हणूनच त्यात अजून सुधारणा झाल्याशिवाय ही टेस्ट रुग्ण-निदानासाठी साठी वापरू नये अशी संबंधित तज्ञांची शिफारस आहे. सध्या सर्व्हे करण्यापुरताच तिचा उपयोग करणे योग्य आहे. त्यामुळे “आपल्याला करोना होऊन गेला का?, प्रतिकारशक्ती आली का?” या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी सध्या तरी तिचा वापर करू नये. संशोधनातून कोव्हिड-लागणीचे समाजातील प्रमाण शोधण्यापुरताच सध्या तिचा उपयोग केला जात आहे.

पुन्हा संसर्ग होण्यापासून सुरक्षितता कोणत्याही चाचणीद्वारे मिळत नाही.

*************
डॉ. अनंत फडके गेली अनेक वर्षे सार्वजनिक आरोग्यसेवेतील प्रश्नांवर काम करत आहेत. ते पुण्यातील 'जन आरोग्य अभियाना'चे सहसंस्थापक आहेत. 'ऐसी अक्षरे'च्या विनंतीवरून त्यांनी जनप्रबोधनासाठी सामान्य माणसांच्या करोनाविषयक शंकांना उत्तर देण्याचे मान्य केले आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet