करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ कैलास गौड

(मुंबईतली धारावी. इथे एखादी घटना घडली की, तिची दखल सगळं जग घेतं. मग ती १९९२-९३ची दंगल असो किंवा सध्या चालू असलेली कोरोनाची महामारी. मुंबईत आल्यावर हक्काने आपलं घर करून रहावं, आपला उद्योग चालवावा, असं हे ठिकाण. चार रेल्वे स्टेशन्स (माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला) आणि दोन द्रुतगती मार्ग (पूर्व आणि पश्चिम) यांना लागून असलेली धारावी. अडीच किलोमीटर परिघात वसलेली. लोकसंख्या आठ ते दहा लाख. एवढी दाटीवाटी असलेली वस्ती कुठेच नसेल. कोरोनाची महामारी आटोक्यात आणल्याबद्दल आत्ता धारावीची चर्चा आहे. धारावीत गेली ३५ वर्षं वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि आत्ता धारावीने आरोग्यासाठी दिलेल्या लढ्यातले एक भागीदार डॉ कैलास गौड सांगताहेत, धारावीची गोष्ट.)

धारावी ० किमी

गरीब मजूर ही इथली एकच जात

दीडशे वर्षांचा इतिहास असलेली धारावी. या उद्योगनगरीने कोरोनासारख्या कृत्रिम आणि नैसर्गिक अशा बऱ्याच संकटांचा सामना केलेला आहे. शतकापूर्वीच प्लेगचं संकटही या धारावीने अनुभवलं आहे. एके काळी नको असणार्‍या या भूखंडाचा उपयोग गुन्हेगार लपून राहण्यासाठी करत असत. चार रेल्वे स्टेशन्स (माहीम, माटुंगा, शीव, कुर्ला) आणी दोन द्रुतगती मार्ग (पूर्व आणि पश्चिम) यांना लागून असलेली ही धारावी.

मच्छी

इथे मूळ कोळी समाजाचा कोळीवाडा अस्तित्वात होता. माहीमच्या खाडीतून मच्छीमारी करणारा समाज इथे राहत होता. मुंबईत आल्यावर हक्काने आपलं घर करून रहावं, आपला उद्योग चालवावा, असं हे ठिकाण. दुर्गंधी असणाऱ्या कामासाठी आपल्या या कक्कया आणि रोहिदास समाजबांधवांनी निवडलेली ही जागा. इथेच कुंभारवाडाही आहे. मातीच्या वस्तू बनवायला, भाजणीची भट्टी लावायला निवडलेली जागा. धारावीच्या दक्षिणेकडे माटुंगा लेबर कॅम्प आहे., मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मनपाने बांधलेली ही वस्ती. चामडी कमावण्यासाठीचा कारखाना आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारा कॅटगट धागा बनवणारा जॉन्सन कारखाना धारावीत आहे. यासाठी लागणारा मजूर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून, परप्रांतातून येऊन धारावीत हक्काने राहतो. पिढ्यानपिढ्या सर्व जाती-धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. गरीब मजूर ही एकच जात इथे होती, आहे. अशा या मजूर वस्तीमध्ये मी गेली पस्तीस वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे.
या सर्व काळात मला बदलत्या धारावीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. इथे काही न काही रोगसाथी सुरू असायच्याच. १९८५-८८साली पंतप्रधान अनुदान प्रकल्प झोपडपट्टी सुधारणा झाल्यावर, लगोलग झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) प्रकल्पात सुधारणा झाल्या. आरोग्याचे बरेच प्रश्न कमी झाले. झोपु योजनेत लोकसंख्या वाढली. अडीच किलोमीटर परिघात धारावी वसली आहे. तेथील लोकसंख्या आठ ते दहा लाख. एवढी दाटीवाटी असलेली वस्ती कुठेच नसेल.

कुंभारवाडा

इथे एखादी घटना घडली की, तिची दखल सर्व जग घेतं. मग ती १९९२-९३ची दंगल असो किंवा सध्या चालू असलेली कोरोनाची महामारी असो. जातीय दंगल सुरू झाली तेव्हा अतोनात नुकसान आणि जीवितहानी झाली. त्यावेळी पोलीस आणि प्रशासन यांच्यासोबत स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेऊन शांतता समित्या स्थापन केल्या. भिवंडी-पॅटर्न राबवण्यात आला. त्यामुळे इतकी झपाट्याने दंगल शमली की, नवा धारावी पॅटर्न निर्माण झाला. आजही त्या शांतता समित्या कार्यरत आहेत. पोलीस प्रत्येक सणाला समित्यांच्या बैठका घेतात. सामाजिक सलोखा पाळला जातो. धारावीचा नागरिक मुळी जागरूक आहे. त्याला ही उद्योगनगरी नष्ट होऊ द्यायची नाही. धारावी विकासप्रकल्प सुद्धा सुरू झाला तर नागरिक त्याला पाठिंबा देऊन नक्कीच यशस्वी करतील.
अशा या धारावीतली कोरोना महामारी कशी आटोक्यात आली?

पहिला कोरोनारुग्ण सापडला आणि...
मार्च महिन्याचा तिसरा आठवडा. धारावीतला पहिला कोरोनाचा रुग्ण डॉ. बालिगानगर या आठ इमारती असलेल्या वसाहतीत आढळला. त्याला दिल्ली प्रवासाचा इतिहास होता. तो ज्या कुटुंबासोबत राहिला होता, त्या कुटुंबाला कोरोनाची लागण झालेली होती. मुंबईत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत होती, तशीच धारावीतही रुग्णसंख्या वाढायला लागली होती. रोज पन्नासेक रुग्ण वाढू लागले. मुंबई मनपाने तातडीने त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरू केलं. धारावीजवळच्या मनपाच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात जागा अपुऱ्या पडू लागल्या. १७ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू झालं. धारावीतही लोकांची हालचाल रोखण्यात आली. पण रुग्णवाढीचा वेग कमी होत नव्हता. २२ मार्चला शेवटी देशभर लॉकडाऊन सुरू झालं. अत्यंत दाटीवाटी असलेल्या धारावीत शारीरिक अंतर पाळणं कसं शक्य होणार?

धारावीत दहा बाय दहाच्या एकेका घरात दहा-वीस मजूर राहतात. हे मजूर शिफ्ट ड्युटी करत असल्यामुळे दहा लोक रात्रपाळी करून दिवसा घरात झोपत आणि उरलेले दहा लोक दिवसपाळी करून रात्री त्याच घरात झोपत असत. कोरोना काळात शिफ्ट बंद झाल्यामुळे सर्वच लोक त्या एकाच घरात रहाणं शक्य नव्हतं. म्हणून लोक बाहेर पडत. मनपाकडून खिचडी वाटप होत असे तेव्हा लोकांची गर्दी होत असे. शारिरीक अंतराचा फज्जा उडाला होता. लोक बाहेर आले की, पोलीस लाठीहल्ला करीत होते. कोणतेही नियम पाळणं शक्यच नाही अशी स्थिती झाली होती. रोज रुग्णांचा आकडा वाढत होता.

एक दिवस, मनपा आणि राज्यशासन यांच्याबरोबर आमच्या स्थानिक डॉक्टरांच्या संघटनेच्या (माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) पदाधिकाऱ्यांनी मनपा सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. या आणीबाणीच्या स्थितीत खाजगी डॉक्टर्स काय मदत करू शकतात, ते आम्ही सहाय्यक आयुक्तांना विचारलं. त्यानंतर आम्ही आमच्या सत्तावीस तरुण डॉक्टरांचा गट तयार केला. एक किंवा दोन डॉक्टरांसोबत मनपाचे कर्मचारी आणि आशा वर्कर यांना घेऊन आमच्या डॉक्टरांनी धारावीतला एकेक विभाग पिंजून काढायला सुरुवात केली. सर्व डॉक्टरांना मनपाकडून PPE किट्स रोज दिले जात होते. ट्रॅव्हल हिस्टरी, ताप, खोकला, न्युमोनियासदृश लक्षणं दिसली की त्यांना स्वॅब तपासणीसाठी पाठवायचं. इतरांना रोगाविषयी माहिती देऊन धीर द्यायचा, अशी कामं आमचा गट करत होता. दहा-बारा दिवसात चाळीस ते बेचाळीस हजार लोकांची तपासणी झाली. पुढील काळात साडेतीन लाख लोकांचं स्कॅनिंग करण्यात आलं. आठ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली गेली. लोकांमध्ये विश्वास वाढला. मनपाने तातडीने क्वारंटाइन सेंटर्स वाढवली. १४ हजारांचं संस्थात्मक क्वारंटाइन केलं गेलं. धारावीत ५२ बेड्सचं साई हॉस्पिटल ताब्यात घेऊन फक्त कोवीडचे उपचार सुरू झाले. या सगळ्या तपासणीमुळे आमच्या गटातले पाच डॉक्टर्स कोवीड पॉजिटीव्ह निघाले. मात्र, डॉ वाघमारे यांच्या उपचारामुळे धारावीतल्या त्याच साई हॉस्पिटलमधून हे डॉक्टर्स पूर्ण बरे होऊन पुन्हा स्वतःचे दवाखाने चालवू लागले. ज्यांनी कोरोनासंसर्ग नियंत्रणात मनपाबरोबर भाग घेतला होता त्या डॉक्टर्सना अजूनही मनपा PPE किट देत आहे.

तपासणी

पोलिसांवर ताण वाढत होता. शहरातली वाहतूक थांबलेली. खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी धारावीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व दवाखाने बंद होते. वयस्कर डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. धारावीतील तीनशे डॉक्टरांपैकी जेमतेम चार-पाच डॉक्टर्स दवाखाने उघडे ठेवत होते, त्यांपैकी मी एक होतो.

अशा या धारावीतली कोरोना महामारी कशी आटोक्यात आली?

परिस्थिती सुधरू लागली

पोलिसांवर ताण वाढत होता. शहरातली वाहतूक थांबलेली. खाजगी डॉक्टर्स, हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि कर्मचारी धारावीत येऊ शकत नव्हते. त्यामुळे सर्व दवाखाने बंद होते. वयस्कर डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवले. धारावीतील तीनशे डॉक्टरांपैकी जेमतेम चार-पाच डॉक्टर्स दवाखाने उघडे ठेवत होते, त्यांपैकी मी एक होतो.

मीही दवाखान्यात जाऊ नये, असा दबाव माझ्या मित्रमंडळींकडून आणि घरून येत होता. पण मी या धारावीत गेली पस्तीस वर्षे काम करीत असल्यामुळे इथला नागरिक माझ्या जगण्याचा एक भाग झाला आहे. त्याच्या अडचणीच्या वेळी डॉक्टर म्हणून माझा सहभाग असणं आवश्यक आहे, असं मला वाटलं. मीच घरी बसलो तर माझे पेशंट, धारावीतील नागरिक आणखी घाबरून जातील, असाही विचार मी केला. धारावीच्या आरोग्यासाठीचा हा लढा आहे आणि म्हणून मला दवाखान्यात गेलंच पाहिजे, ही खूणगाठ मनाशी बांधून मी एकही दिवस खंड न पाडता रुग्णसेवा करीत होतो.

कोरोनाच्या लक्षणांबाबत मी रोज तपासत असलेल्या पेशंटना काय औषधं वापरावीत, रोगनिदान कसं करावं, पेशंटना धीर कसा द्यावा या संदर्भात आम्ही डॉक्टर्स मंडळी रोज व्हाट्सअपवर चर्चा करत असू. रक्तचाचणी प्रयोगशाळा, क्ष-किरण तपासणी केंद्रं बंद होती. वाहतूक बंद असल्याने औषधांचा पुरवठा होत नव्हता. मनपाने सर्वच रुग्णालयं ताब्यात घेऊन कोवीड रुग्णालयं म्हणून जाहीर केली होती. खाजगी दवाखाने बंद असल्यामुळे आमच्याकडे भरपूर पेशंट भेदरलेल्या अवस्थेत येत होते. आम्हालाही हा रोग नवीन असल्यामुळे फार काही साहित्य उपलब्ध नव्हते. रोज इंटरनेटवरून अपडेट्स वाचणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून मी पेशंटना तपासत होतो. शक्य तेवढे उपचार करत होतो. संशयित रुग्ण मनपा रुग्णालयात पाठवीत होतो. औषधांपेक्षा त्यांना व्याधी काय आहे हे समजावून सांगणं, आपली रोग प्रतिकारकशक्ती कशी वाढवायची, त्यासाठी आहार-विहार कसा घ्यायचा हे सांगणं जास्त महत्त्वाचं होतं. मी तर माझ्या दवाखान्याजवळ असलेल्या रिकाम्या जागेत प्रथम पाच-सहा लोकांना घेऊन या आजाराविषयी माहिती द्यायचो. मग कुणाला औषध पाहिजे असेल तर एकेका रुग्णाची सविस्तर माहिती घेऊन औषधे दिली जात होती. प्रतेक डॉक्टर दिवसभरात शंभरेक पेशंट्सना तपासत होता. माझंही तेच, तसंच सुरू होतं.
एप्रिलमध्ये दुसरे लॉकडाऊन सुरू झालं. त्यावेळी धारावीतलेच नव्हे तर मुंबईतील सर्वच परप्रांतीय मजूर, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मजूर आपापल्या गावाकडे जायला अधीर झाले होते. मिळेल त्या मार्गाने त्यांनी आपापल्या गावाकडे कूच केलं. मे महिन्यात तर ट्रेन्स सुरू झाल्या. मजुरांनी आपापल्या गावाकडे मुक्काम हलवला. धारावीतले दीड लाख लोक गावी निघून गेले. आरोग्ययंत्रणेवरचा ताण काहीसा हलका झाला. हळूहळू खाजगी डॉक्टर्सही आपापल्या दवाखान्यात परतू लागले. मे महिन्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू लागली.

धारावीकर सक्रीय होतेच. त्यांनी सार्वजनिक शौचालयं स्वच्छ कशी ठेवता येतील ते पाहिलं. हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वछतापालनासाठी काही कायदेही केले. जे अडीच हजार रुग्ण सापडले ते पूर्ण बरे होऊन गेले. सत्तर टक्के पेशंट बरे झाले. बाकी पेशंट्सना बीएमसी शाळा, मनोहर जोशी विद्यालय, आणि क्रीडासंकुल येथे क्वारंटाइन केलं गेलं. गेल्या महिन्याभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. १५ जुलै रोजी धारावीत फक्त ८६ कोरोनाबाधित ॲक्टिव्ह रुग्ण होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून ते वेगाने बरे होत आहेत. चौकशी केली असता असं कळलं की, धारावीसाठी बांधलेली दोन क्वारंटाइन सेंटर्स बंद करण्यात आलीत. आणि ती आता दादरला हलवली गेली आहेत. धारावीतल्या नागरिकांमधलं भीतीचं वातावरण आता गेलं आहे. आता सर्वांच्या हे लक्षात आलं आहे की, एकूण बाधित रुग्णांपैकी फक्त ५ % रुग्णांना इतर काही आजार असल्यास आणि आत्मविश्वास गमावला तर औषधोपचाराची गरज असते. ९५% बाधित रुग्ण संतुलित आणि पोषक आहार-विहार केल्यास बरे होतात. त्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचाराचा यांचाही अवलंब करायला हवा. तीन-साडेतीन महिन्यात हेही लक्षात आलं की, फक्त औषधांचा उपयोग किंवा त्यावर अवलंबून न राहता नीट आहार-विहार ठेवला पाहिजे. कोवीड-१९च्या साथीमध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट अशी की, धारावीकरांनी आपणहून स्वतःची काळजी घेतली.

हे श्रेय प्रत्येकाचं आणि सगळ्यांचंच..

गेला आठवडा रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. तरीही, कोरोना धारावीतून गेला, असं म्हणता येणार नाही. पण, तो नक्कीच जाईल. आपण नियम पाळले तरच.
एवढ्या मोठया प्रमाणात वाढत असलेला कोरोना धारावीत रोखला गेला. मग हे यश कुणाचं, असा प्रश्न नेहमी विचारला जातो.

उत्तर सोपं आहे. मुंबई महानगपालिकेने स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने कामाला सुरूवात केली. मोठ्या प्रमाणात रुग्ण शोधले, जनजागृती केली, स्थानिक कमिट्या, सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी नियमपालन, स्वछतापालन केलं. हे यश कुणा एकट्याचं नसून सांघिक आहे. श्रेय प्रत्येकाचं आहे आणि सगळ्यांचं आहे.
"धारावी पॅटर्न" असं नाव देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हा कुणा एकाच्याच डोक्यातून निघालेला पॅटर्न नाही. आणीबाणीची वेळ आल्यावर लोकांनी स्वत:हून जबाबदारी घेतली. फक्त सरकार किंवा मनपावर लोक विसंबून राहिले नाहीत. सर्व यंत्रणांच्या सहकार्याने धारावीतील लोकांनी, स्थानिक डॉक्टरांनी व आरोग्यसेवकांनी महामारीशी दिलेला हा लढा आहे.

इथे जे घडलं, ते इतर ठिकाणी राबवता येईल का? हो. हा धडा इतरत्र नक्कीच गिरवता येईल. तशी सुरुवातदेखील झाली आहे. गरजेप्रमाणे बदल करून हा धडा आणखी प्रभावीसुद्धा करता येईल.

या पुढची धारावी कशी असेल?

धारावी ही उद्योगनगरी होती, आहे आणि राहणार. लॉकडाऊन शिथिल होतंय, तसतशी धारावी पूर्वपदावर यायचा प्रयत्न करतेय. पण लगेच किती यश मिळेल, याविषयी शंका आहे.

परप्रातांतील मजूर पुन्हा परत येतील का?
लॉकडाउनच्या काळात व्यवसाय बंद राहिले. त्या काळातलं दुकानांचं भाडं, कारखान्यांचं भाडं मालक सोडतील का? व्यवसाय पुन्हा सुरू झाले तर ग्राहक येईल का? व्यवसायासाठी, कारखान्यासाठी घेतलेलं बँकेचे कर्ज, सावकाराकडून घेतलेलं कर्ज कसं फेडणार? कोण फेडणार?
या प्रश्नांची उत्तरं अजून सापडलेली नाहीत.

लॉकडाऊन वाढत गेल्यामुळे धारावीचंही अर्थशास्त्र बिघडलंय. धारावीचा पुनर्विकास गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित आहे. तो तत्काळ सुरू व्हायला हवा. मग वेगळी धारावी नावारूपाला येईल. मोडून पडणं, थांबणं हा धारावीचा स्वभाव नाही. म्हणूनच, आम्हाला खात्री वाटतेय की, धारावी पुन्हा पूर्वपदावर नक्कीच येईल.

- डॉ कैलास गौड

हा लेख 'नवी उमेद'च्या फेसबुक पानावर जुलै महिन्यात क्रमशः प्रकाशित झाला होता. 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल 'नवी उमेद'च्या मेधा कुळकर्णी आणि स्नेहल बनसोडे शेलुदकर यांचे आभार.

पुढील भाग

field_vote: 
0
No votes yet

लेख आवडला. मुंबईचाच असल्याने मी या भागाशी परिचित आहे. सुरवातीला तिथे कोरोना पसरतो आहे हे कळल्यावर धस्स झालं होतं! पण आता खात्री वाटते की धारावी भाग जर कोरोनामुक्त होऊ शकतो तर बाकीची मुंबईही नक्कीच कोरोनामुक्त होईल आणि तीही लवकरच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका डॉक्टर वर विश्वास ठेवता येणार नाही.
दिशाभूल करणारा लेख आहे.
धारावी मध्ये परप्रांतीय आहेत ,डॉक्टर पण परप्रांतीय.
मुंबई च काही ही झाले तरी चालेल.
धारावी मधील इडली, चामडे विकले गेले पाहिजे.
गंभीर पने घेण्यात काही अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सरकारी आकडे ध्या आताचे धारावी चे
किती बाधित आहेत
किती सीरियस आहेत.
ह्याचे नंतर विनोदी शेरा ध्या .
अर्थवट ज्ञान,arthvat माहिती आणि arthvat लोक समाजाला धोकादायक असतात.
धारावी ची लोकसंख्या त्या मधील किती लोकांची टेस्ट केली आहे सर्व आकडे ध्या .
नंतर हा लेख दिशाभूल करत आहे की नाही ते ठरवलं जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

डॉक्टरांचा विनय आणि संकटाची तीव्रता मांडणं "गेला आठवडा रुग्णवाढीचा वेग मंदावलाय. तरीही, कोरोना धारावीतून गेला, असं म्हणता येणार नाही." फार महत्त्वाचे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.