करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके

करोना आणि धारावीची गोष्ट
डॉ. अवनी वाळके

धारावीतल्या स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी आणि धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर अवनी वाळके यांचा अनुभव.

आम्ही डॉक्टर्सनी आशा वर्कर्सबरोबर धारावी पिंजून काढली

आज, धारावीत कोविड होऊन बरे झालेले कितीतरी लोक आवर्जून भेटायला येतात. माझ्या तपासणीमुळे, समुपदेशनामुळे जिवंत असल्याचं सांगतात, तेव्हा मला विलक्षण समाधान वाटतं. धारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला. मुंबई महानगरपालिकेनं धारावीतला एक-एक माणूस तपासता यावा याकरता ‘स्क्रिनिंग टीम्स’ (तपास गट) बनवायचं ठरवलं. या स्क्रिनिंग टीममध्ये धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांनाही सहभागी करण्यात आलं. कारण डॉक्टरांचा स्थानिक लोकांशी असणारा परिचय, परिसराची माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल असणारा विश्वास. या टीममध्ये स्वेच्छेनं सहभागी होण्याकरता पंचावन्न वर्षांपेक्षा कमी वय आणि मधुमेह, बीपीचा विकार नसलेल्या डॉक्टरांना विचारण्यात आलं. सत्तावीस डॉक्टर्स या स्क्रिनिंग टीममध्ये सामील झाले. त्यात मीही होते.

सुरुवातीला धारावीत कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यावर धारावीतल्या बऱ्याचशा डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले. त्यातच लॉकडाऊनही सुरू झालं. कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर सायन हॉस्पीटलमध्येही जागाच उपलब्ध नव्हत्या. “या परिस्थितीत लहानसहान काही झालं तरी माझे नेहमीचे रुग्ण कुठे जाणार”? हा विचार माझ्या मनात आला. आणि मी मुकुंदनगर आणि ९० फूट रोड या दोन्ही ठिकाणचे माझे दवाखाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. दवाखान्याच्या बाहेर दोन फुटाचं अंतर राखून मी रुग्णांना तपासायला सुरू केलं. रुग्णांना होणारा त्रास आणि लक्षणं याची माहिती घेऊन, त्याप्रमाणे औषधं देणं सुरू ठेवलं होतं. याच दरम्यान, स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी होणार का असं महापालिकेनं विचारल्यावर मी लगेचच तयार झाले.

मुंबई महापालिकेनं प्राथमिक काम केल्यानं काही माहिती हाती आली होती. त्यानुसार मुकुंदनगर, सोशलनगर, कल्याणीनगर, मदिनानगर आणि मोहसीननगर हे पाच भाग रडारवर होते. या भागात कोरोना रुग्णांशी संपर्क, प्रवासाची पार्श्वभूमी या गोष्टी जास्त प्रमाणात होत्या. या पाच भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं. माझ्या टीमसोबत आणि आणखी तीन टीम्स धारावीच्या अतिशय आतल्या भागांमध्ये स्क्रिनिंगसाठी सज्ज झाल्या. प्रत्येक टीममध्ये एक डॉक्टर, २ आशा वर्कर्स आणि महापालिकेचा कर्मचारी असायचे. आशा वर्कर्सना त्यांना नेमून दिलेल्या विभागातली प्रत्येक गल्ली, त्या गल्लीतलं प्रत्येक घर, त्या घरातील टीबीचा पेशंट, मुलांचं लसीकरण किंवा कोणताही आजार असणारी-नसणारी व्यक्ती असं सर्वच काही अगदी सविस्तर माहीत असतं. आशा वर्कर्सचा त्यांच्या विभागातल्या लोकांशी रोजचा संपर्क असतो. त्यामुळं आशा वर्कर्सचा या टीममध्ये महत्त्वाचा सहभाग होता. त्या बऱ्याचदा डॉक्टर्सना संशयित रुग्ण कुठं असू शकतो याबद्दल सांगायच्या. आम्ही डॉक्टर्स आणि आशा वर्कर्सची टीम सकाळी नऊ वाजता गल्ल्यांमध्ये शिरायचे. एप्रिलच्या उन्हात संपूर्ण पीपीई किट घालून तपासणी साहित्य, रेकॉर्डस्, नोंदवह्या असं सर्व सामान सोबत घेऊन दुपारी तीनपर्यंत आम्ही लोकांना तपासत असू.. इथल्या अंधाऱ्या गल्ल्या, झोपडपट्ट्यांच्या आतल्या बोळांमध्ये एका वेळी एकच माणूस जाईल इतपतच जागा. इतक्या दाटीवाटीत पीपीई किटमध्ये हा परिसर पिंजून काढणं जिकिरीचं होतं. तरीही या परिसरातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तपासणं भाग होतं. ते आमच्या टीम्सनी केलं.

तपासणी

लोकांची आमच्याशी कित्येक वर्षांची ओळख असल्याचा एक फायदा झाला की, लोकं आमच्यापासून काही लपवत नव्हते. आम्हाला सगळी माहिती सांगत होते. लोकांचं तापमान तपासून, पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासायची. लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय का, थकल्यासारखं वाटतंय का? याची चौकशी करायची. लक्षण आहेत का, गेल्या काही दिवसात त्यांचा कोणत्या कोविड रुग्णाशी संपर्क आला आहे का? शहराच्या बाहेर गेले होते का? प्रवास अशी सविस्तर माहिती आमच्या टीम्स प्रत्येक व्यक्तीला विचारत होत्या. या सर्वाची नोंद करत होत्या. ज्या लोकांबद्दल डॉक्टरांच्या टीमला संशय यायचा; त्या व्यक्तीच्या लक्षणांची संपूर्ण माहिती, तापमान, रक्तातली ऑक्सिजनची पातळी, त्याचा पत्ता आणि फोन नंबर लगेचच महापालिकेला दिली जात असे. महापालिकेची स्वॅब नमुना घेणारी टीम प्रत्येक भागात बसलेली असायची. तिथं या संशयित व्यक्तिंना स्वॅब तपासणीकरता पाठवलं जायचं. या व्यक्तींना क्वारंटाईन करायचं की हॉस्पीटलमध्ये दाखल करायचं, हे त्यांच्या लक्षणांच्या तीव्रतेवर अवलंबून असायचं. आम्ही फक्त माहिती नोंदवून घ्यायचं काम करत नव्हतो. लोकांचं समुपदेशनही करत होतो. कोविडचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छतेची काय काळजी घ्यायला हवी, यासोबतच त्यांचा आहार कसा असावा ही माहिती लोकांना सांगितली जायची. प्रत्येक झोपडपट्ट्यांकरता सार्वजनिक प्रसाधनगृह ठरलेली आहेत. या प्रसाधनगृहामध्ये संशयित रुग्णांकरता प्रसाधनगृह राखीव ठेवण्याचा निर्णय स्थानिक लोकांनी घेतला. यामुळं इतर व्यक्तींना असणारा संसर्गाचा धोका नियंत्रित करता येणं शक्य झालं.

आम्ही खंबीर आणि पेशंट्स धीराचे

संशयित रुग्ण महापालिकेच्या पथकाकडे स्वॅब तपासणीकरता जायला कधी कधी घाबरायचे. कारण चौदा दिवसांचं विलगीकरण किंवा सायन हॉस्पीटलमध्ये भरती झालं की मृतावस्थेतच बाहेर येणार हा लोकांचा गैरसमज असायचा. या लोकांना ‘तुमची चाचणी आणि उपचार मोफत होणार आहेत. तुम्हांला हॉस्पीटलमध्ये व्यवस्थित उपचार मिळतील आणि तुम्ही बरे होणार’ हा विश्वास आम्ही डॉक्टर्सनी दिला. मग लोकं धिराने स्वॅब तपासणीला तयार होऊ लागले. अशा वेळी व्यक्तिंना भावनात्मक साद घालत मी सांगत असे की, “तुम्ही मोठे आहात तुम्हांला ताकद आहे. पण तुमच्या मुलांना एवढी ताकद नाही. त्यांना खूप त्रास होईल. मुलांना जपलं पाहिजे. तुम्हांला काही झालं तर घरच्यांचं कसं होईल”? हलकी लक्षणं असलेल्या संशयितांना रिपोर्टस् मिळेपर्यंत घरातल्यांपासून अंतर राखायलाच पाहिजे हे पटवून सांगत असू आम्ही. अशा बोलण्याने बरचसं काम होऊ लागलं. “जितक्या लवकर आपल्याला या आजाराबद्दल समजेल तितक्या लवकर उपचार करणं सोपं होईल. तुम्ही खंबीर आहात” असं सारखं बोलून लोकांची हिंमत आणि विश्वास आम्ही वाढवला. यामुळे तपासण्या करायला लोक पुढे येऊ लागले.

पण काही केसेसमध्ये महापालिकेकडून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा फोन यायचा, तेव्हा रुग्णांकडून विशिष्ट हॉस्पीटलचाच हट्ट असायचा. पण हॉस्पीटलमध्ये जागा उपलब्ध नसायची. त्रास होत नसल्यामुळं आपण ठणठणीत आहोत असा समज असायचा. महापालिका आणि डॉक्टरांची टीम या पेशंटचं मन वळवण्याचं आटोकाट प्रयत्न करायची. पण यात उपचार मिळण्यात उशीर व्हायचा. अशा काही केसेसचं हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यावर एक-दोन दिवसांत निधन झालं. एक व्यावसायिक लोकांना सतत मदत मिळावी म्हणून रात्रंदिवस खूप धावाधाव करत होते. दोनशे जणांना त्यांनी स्वतः कस्तुरबामध्ये दाखल केलं. यादरम्यान त्यांनी डॉक्टर्सच्या टीमने सांगूनही त्यांच्या सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांचं निधन झालं. अशा प्रसंगांमुळं सर्व टीमला प्रचंड निराशा यायची. रोजचा दिवस आम्हा सर्वांसाठी प्रचंड आव्हानांचा असायचा.

काही कोरोना रुग्णांमध्ये ‘हॅपी हायपोक्सिया’ आढळला. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तिच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी नव्वदपर्यंत खाली येते. (सामान्य प्रमाण ९६-९५पर्यंत) पण त्या व्यक्तीला श्वसनाचा काहीच त्रास होत नसतो. त्यामुळे आपण ठणठणीत आहोत असंच वाटतं. पण प्रत्यक्षात ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळं त्या व्यक्तिच्या फुप्फुस, ह्रदय, यकृत, मूत्रपिंड, मेंदू या महत्त्वाच्या अवयवांवर प्रचंड ताण आलेला असतो. वेळेत उपचार न मिळाल्यास एक-दोन दिवसातच हा ताण वाढून एक-एक अवयव निकामी होऊ लागतो आणि मृत्यू येतो. त्यामुळं ताप, श्वास घ्यायला त्रास, रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं, डोकेदुखी यातलं काहीही लक्षण आढळलं तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधलाच पाहिजे.

टिममधलं स्क्रिनिंगचं काम झाल्यावर मी माझ्या दवाखान्यात जात असे. तेव्हापासून या संपूर्ण काळात अजूनही एकही दिवस रजा न घेता काम केलंय. घरातून छान आधार असल्याने हे जमलं, जमतंय. घरी नवरा, मुलगी आणि मुलगा. सगळेजण खूप समजून घेत आहेत. मी घरी यायच्या वेळी घरात आंघोळीच पाणी, कपडे तयार ठेवलेलं असतं. त्यांची घरकामातही मदत असते. मानसिक आधार असतो. माझा धाकटा भाऊ युकेमध्ये गायनॅक आहे. तोही फोनवर सतत बोलत असायचा. त्यामुळे मी खंबीर राहू शकले.

डॉ. अवनी वाळके

धारावीच्या आतल्या भागात आठ दिवसात 47 हजार पाचशे लोकांचं स्क्रिनिंग आम्ही डॉक्टर्स आणि आशा वर्कर्सनी मिळून केलं. एवढ्या व्यक्तींचं स्क्रिनिंग केल्यामुळं, एखाद्या व्यक्तीला पाहूनही ती कोविड रुग्ण असण्याचा अंदाज आमच्या टीम्सना आता बांधता येतो. त्याला पुढच्या तपासणीला पाठवून अंदाजाची खातरजमा होतेच.

---
शब्दांकन : साधना तिप्पनाकजे


हा लेख 'नवी उमेद'च्या फेसबुक पानावर जुलै महिन्यात क्रमशः प्रकाशित झाला होता. 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल 'नवी उमेद'च्या मेधा कुळकर्णी आणि स्नेहल बनसोडे शेलुदकर यांचे आभार.

मागील भाग
पुढील भाग

field_vote: 
0
No votes yet