म्हणींच्या गोष्टी ... (६)

आधीच्या म्हणी : - (१), (२), (३), (४), (५).
किंवा इथे ही वाचता येतील.

मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात? त्यांच्या मागे काय कथा असतील? तर काही म्हणींच्या या गोष्टी ...मराठीतील म्हणी या अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. एखाद्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्द आणि वाक्ये खर्ची पडतात. पण तेच काम म्हणींच्या प्रयोगाने काही शब्दातच आणि अधिक नेटकेपणाने करणे शक्य होते. आता ही एक सर्वपरिचित अशी म्हण आहे..

"चोराच्या हाती जमादारखान्याची किल्ली"


ह्या म्हणीमध्ये कुठलाही छुपा, सांकेतिक अर्थ वगैरे नाही. तुम्ही जे वाचले आहे, तोच त्याचा अर्थ आहे. जमादारखाना म्हणजे खजिना ठेवण्याची जागा. खजिना म्हणजे मूल्यवान वस्तूंचा साठा, उदा. पैसा-अडका, मूल्यवान धातु, हिरे, मोती इ. हा खजिन्याचा एक अर्थ झाला. परंतु या व्यतिरिक्त ज्ञान, माहिती हा सुद्धा खजिनाच आहे. आजकाल तर माहिती आणि ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्तं झाले आहे. प्रत्येकाला स्वत:ची माहिती इतरांपासून सुरक्षित ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. काही लोकं हा खजिना देखिल लुटण्याचा प्रयत्न करीत असतात.

तर एकंदरीत खजिना म्हणजे काहीतरी मूल्यवान वस्तू अथवा माहिती, अथवा ज्ञान. या खजिन्याला कडेकोट बंदोबस्तात तर ठेवले. अनेक कड्या कुलपे लावून सुरक्षित केले, त्याची माहिती, किल्ली कुणा एका विश्वासू व्यक्तीकडे सोपवून तुम्ही निर्धास्त झालात, परंतु ती व्यक्तीच पुरेशी विश्वासू नसेल तर? चोर असेल तर? 
तर काय? तुमचा खजिना लुटला जाण्याची शक्यता १००% आहे.


म्हणूनच बुद्धीमान, अनुभवी, ज्ञानी माणसे नेहमी सांगतात, "डोळे मिटून आणि कान झाकून कुणावरही विश्वास ठेवू नये".

याचा अर्थ प्रत्येकाकडे संशयाने पाहिले पाहिजे असे नाही. परंतु अनोळखी लोकांबरोबर बोलताना, वावरताना सावध राहायला हवे. स्वत:कडे असलेली गोपनीय, महत्त्वाची माहिती उगीच सगळीकडे सांगत जाऊ नये, चारचौघात बोलू नये. असे नाही की संपर्कातील प्रत्येक व्यक्ती लबाड किंवा चोर असेलच, परंतु जर जरूर नसेल तर त्यांच्यासमोर बोलू नये. याला लपवाछ्पवी म्हणत नाहीत, तर सावधगिरी बाळगणे असे म्हणतात.

अनेकदा अशा बातम्या वाचनात येतात, की कुणा माहितगार व्यक्तीनेच किंवा माहितगार व्यक्तीच्या मदतीनेच घरफोडी होते. किंवा विश्वासू व्यक्तीनेच काही महत्त्वाची माहिती, भलत्याच कुणाला सांगून नुकसान केले. अशावेळी या म्हणीची नक्कीच आठवण येते.
या म्हणीची मूळकथा काय असेल माहिती नाही. परंतु म्हणीची सत्यता पटवणाऱ्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातील एक ऐकलेली कथा इथे सांगते. ही कथा जरी लहान मुलांसाठी लिहिलेली असली तरी त्यातून मोठ्या व्यक्तींनी देखिल बोध घेण्यास हरकत नाही.

(ऐकलेली कथा)


कथा आहे बादशहा अकबर आणि चतुर बिरबल यांची.


शहेनशहा अकबर हे मुघल बादशहा होते. राजधानी दिल्ली येथून ते हिंदुस्थानावर सत्ता चालवीत असत. सर्वांनाच माहिती आहे की एक मुस्लिम राज्यकर्ता असूनही, बादशहा अकबर हे हिंदुद्वेष्टे नव्हते. ते गुणग्राही म्हणून प्रसिद्ध होते. अकबर बादशहाचा दरबार "नवरत्नांचा दरबार" म्हणून ओळखला जाई. ही नऊ रत्ने म्हणजे त्यांनी पारखून, वेचून दरबारात मानाचे स्थान देऊ केलेले त्यांचे नऊ गुणवंत मंत्री. त्या नऊ रत्नांपैकी एक म्हणजे महाचतुर आणि हजरजबाबी मंत्री बिरबल.

बिरबलवर बादशहाची विशेष मर्जी होती. त्याला कारणही तसेच होते. बिरबल त्यांच्या बुद्धीमत्ते साठी सर्वांच्याच आदरास पात्रं होते. त्याच बरोबर त्यांच्या चतुराईचे किस्से देखिल प्रसिद्ध होते. मंत्री बिरबल ने अनेक अवघड पेचप्रसंगातून बादशहाची सुटका केलेली होती. बादशहाला काही अप्रिय बातमी अथवा घटना कथन करायची असल्यास सर्वजण बिरबल कडे धाव घेत. काही वेळा बादशहाची बेगम सुद्धा बादशहासमोर जे बोलू शकणार नाही, अशा गोष्टी, बिरबल बिनदिक्कत बोलू शकत असे. तर अशा बिरबल च्या चतुराईची ही कथा.

***

शहेनशहा अकबराचा दरबार भरला होता. सारे दरबारी, मानकरी त्यांच्या श्रेणी नुसार ठरवून दिलेल्या जागेवर उभे होते. बादशहांचा चेहरा चिंतीत वाटत होता. त्यांच्यासमोर त्यांचे प्रधानजी दोन्ही हात एकमेकात गुंफुन, मान खाली घालून उभे होते. त्यांच्या शेजारी आणखी एक दरबारी उभा होता. त्याचा चेहरा चांगलाच भयग्रस्त दिसत होता.

"-- पण मी म्हणतो अशी गल्लत झालीच कशी प्रधानजी? आम्ही तर मोठ्या विश्वासाने तुमच्यावर ही जबाबदार सोपविली होती."
अकबर बादशहा नेहमीपेक्षा जरा उंच स्वरात बोलत होते. घडत असलेल्या घटनाक्रमामुळे ते चांगलेच नाराज झालेले दिसत होते.
प्रधानजी काही न बोलता शांतपणे उभे होते. ते म्हणाले,

"शहेनशहा माफी असावी परंतु आमच्या व्यतिरिक्त हे कासीमभाई देखिल खजिन्याच्या निगराणीचे काम करतात. त्यांच्याकडे काही चौकशी केल्यास बरे होईल असे आम्हांस वाटते."

प्रधानजींचे हे शब्द ऐकताच शेजारीच उभे असलेले कासीम खॉ भयातिरेकाने बोलले,
"माफी असावी खाविंद, बंदा बेकसूर आहे. मला काहीच माहिती नाही. अल्ला कसम जहॉपन्हॉ."

बादशहा अकबराने विचारपूर्वक कासीम खॉ कडे पाहिले. कासीम खॉ त्यांचा जुना आणि विश्वासू सेवक होता. म्हणून तर इतकी महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती. पण मग कोण? प्रधानजींवर त्यांचा विश्वास होता. प्रधानजी त्यांच्या लाडक्या बेगम साहिबांचे रिश्तेदार होते. त्यांच्यावर संशय घ्यायचा म्हणजे आफतच आली असती. मग संशय घेण्याजोगी तिसरी व्यक्ती म्हणजे खुद्द बादशहाच होते. हे एक कोडेच पडले होते.
जरा वेळाने बादशहाने काही एक निश्चय केला. कासीम खॉ कडे बघत ते म्हणाले,
"खॉ साहेब मला हे बोलणे नको वाटते पण परिस्थिती गुन्हेगार म्हणून तुमच्याकडे अंगुली निर्देश करते आहे. काही असेल तर कबुली जबाब द्यावा आम्ही माफीचा विचार करू."

"नाही शहेनशहा नाही. आम्ही हे पाप बिलकूल केलेले नाही. अल्ला कसम .."

असे म्हणून दोन्ही हाताच्या ओंजळीत चेहरा घेऊन कासीम खॉ एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले.
बादशहाने सिंहासनाच्या डाव्या बाजूच्या रांगेत उभे असलेल्या रक्षक दलाच्या प्रमुखांना इशारा केला. तातडीने रक्षक प्रमुख दोन रक्षकांसह पुढे सरसावले. कासीमखॉच्या हातात लोखंडी बेड्या अडकवल्या, आणि त्यांना जरासे खेचतच तिथून घेऊन गेले. जाताना देखिल कासीम खॉ " हुजुर मै बेकसूर हू " असे पुन्हा पुन्हा म्हणत होता.
सारे दरबारी चकीत होऊन तो तमाशा बघत होते.

***

मंत्री बिरबल त्यांच्या घराच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या बैठकीच्या जागी बसलेले होते. सकाळी दरबारात घडलेल्या प्रसंगाची मनोमन उजळणी होत होती. राहून राहून त्यांना वाटत होते, यात काहीतरी गफलत होते आहे. जे दिसते आहे, किंवा दाखविले जात आहे ते सत्य नाही. पण ते सिद्धं करण्याकरता काही माहिती हवी, पुरावे हवेत. ते शोधणार कसे?

बिरबल अशाच विचारात गर्क असतानाच, त्यांचा सेवक सांगत आला की एक गरीब बाई प्रवेशद्वारापाशी थांबली आहे. भेटायचे म्हणते आहे. तिला काही गाऱ्हाणे घालायचे आहे, पण ते खुद्द बिरबल समोरच ...

बिरबल जरी मंत्रिपदावर विराजमान होते, तरी ते गोरगरीबांची गाऱ्हाणी नेहमीच ऐकून घेत. शक्य होईल ती मदत करीत. त्यांच्या दारातून गरजू कधी विन्मुख जात नसे.

"येऊ द्या त्यांना.." बिरबलने सेवकाला सांगितले आणि ते जरासे सावरून बसले.

एक गरीब बाई तेथे आली. खालमानेने सलाम करीत बाजूला उभी राहीली. तिच्या चेहऱ्यावर ओढणी होती परंतु ती रडत असावी. कारण ओढणीच्या टोकाने परत परत डोळे पुसत होती.

"बोला बाई.. काय झाले आहे? कसले संकट आले आहे. सविस्तर सांगा. मी तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करीम. पण जे असेल ते सत्यं सांगा..." बिरबलने त्या बाईंना धीर देत सांगितले.

"हुजुर मी कासीमखॉ ची बिबी आहे. माझे पती निर्दोष आहेत. तुम्हीच न्याय द्या." इतके बोलून कासीम खॉ ची बिबी ओढणीने डोळे पुसू लागली.

"रडू नका बाई. मी माझ्याकडून होईल ते सारे करतो." बिरबलने तिला आश्वासन दिले.

***

"यावे यावे गिरीधारी दासजी!" बिरबलने हात जोडीत स्वागताचे शब्द उच्चारले.

पांढऱ्या शुभ्र अंगरख्यावर जरीकाठी उपरणे घेतलेली एक गोरीपान व्यक्ती पायऱ्या चढत होती. ते होते दिल्ली सराफा बाजारातील प्रसिद्ध सुवर्णकार शेठ गिरीधारी दास.

"क्षमा असावी तसदी दिली, काही खरेदी करायची होती. लेक माहेरी आली आहे. तिला सासरी परत पाठवताना रिकाम्या हाताने कशी पाठवु?" बिरबलने निमंत्रणाचे कारण सांगितले.

"अगदी बरोबर मंत्रीजी. लेकीची सासरी पाठवणी सालंकृतच करायला पाहिजे, तरच तिला तिच्या सासरी मान मिळेल. आमच्या घरीपण लेकी सुना आहेतच ना. आम्ही सारे जाणतो." गिरीधारी दासजींनी बिरबलाच्या बोलण्याला दुजोरा दिला.

तिथे मांडलेल्या एका बैठकीवर ते जरा विसावले. एक सेवक कापडी झालरीचा पंखा घेऊन पुढे आला. आतल्या बाजूने दुसरा सेवक, एका तबकात सरबताचा पेला घेऊन आला. शेठजींनी तबकातील नक्षीदार पेला घेतला. उन्हातून आल्याने त्यांची गोरीपान मुद्रा लालसर दिसत होते. त्यांच्याकडील मलमलीच्या कापडाने ते कपाळावरचा घाम टिपत होते.

जरा स्थिरावल्यावर शेठजींनी त्यांच्याकडील नक्षीदार लाकडी संदूक उघडली. आतमध्ये झळाळती रत्ने,माणके होती, टपोऱ्या पाणीदार मोत्यांचे सर होते. सोन्याचांदीचे काही अलंकार होते. एकेक दागिना हाती घेऊन शेठजी त्याचे वर्णन करीत होते.

"महाशय तुम्ही रत्नांची निवड करावी. माझे कारागीर त्यांना सोन्या चांदीच्या तारेत गुंफून दागिने घडवतील. किंवा शक्य असल्यास आमच्या पेढीवर यावे. तिथे आणखी काही नमुने पेश करता येतील. तुमची लेक खूश होऊन जाईल." शेठजी म्हणाले.

संदुकीकडे बराच वेळ पाहिल्यावर बिरबल म्हणाले, "शेठजी हे तर सर्व नेहमीचेच दिसते आहे. अलग काही असेल तर दाखवा की."
बिरबलचे शब्द ऐकताच शेठजींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

"महाराज एक चीज आहे."

असे म्हणत त्यांनी संदूकीच्या कोपऱ्यातील मखमलीचे आवरण किंचित उचलले. आतून एक वस्तू काढली. बिरबलच्या समोर हाताची मूठ उघडली. त्याच्या तळहातावर झगमगणारा, हिरवाकंच पाचू विसावलेला होता. बिरबलचे डोळे विस्फारले होते.

"शेठजी कुठे मिळाली ही वस्तू. कुठल्या राणी अथवा बेगमेच्या संग्रहात शोभेल.."

बिरबलचे बोलणे ऐकून शेठजींनी हलक्या आवाजात सांगितले,

"एक जण अधून मधून असे काही मूल्यवान आणून देतो, अगदी माफक किंमतीत."

"अस्सं? "

बिरबलची विचारचक्रे फिरत होती. "ठीक तर मग याचाच एक कंठहार करून द्या." बिरबलने सांगितले. नंतर परत ते दोघेजण शेठजींच्या लाकडी संदूकीतील हिरे, माणके पाहत होते. बिरबलने आणखी थोडीफार खरेदी केली.

शेठजी तिथून जाताच बिरबलने तातडीने एका सेवकास राजवाड्याकडे धाडले, बादशहांना वर्दी देण्यासाठी आणि स्वत: सराफा बाजाराकडे प्रस्थान केले.

***

बिरबलने दालनात प्रवेश केला तेव्हा माध्यान्हीचा सूर्य पश्चिमेकडे झुकला होता. उन्हाच्या झळा शीतल होऊ लागल्या होत्या. तिथल्याच एका बैठकीवर, मखमली लोडाला टेकून, दिल्लीपती विराजमान झालेले होते.

"यावे बिरबल यावे, तुमच्या सेवकाने वर्दी दिली, की काही तातडीच्या कारणामुळे तुम्ही दरबारी उपस्थित राहू शकणार नाही . अशी काय जरूरीची कामगिरी होती? " बादशहांनी चौकशी केली.

"हुजुर, काही महत्त्वाची माहिती मिळाली. तिची सत्यता पडताळण्याकरता काही लोकांच्या भेटीगाठी घेणे आवश्यक होते."

इतके बोलून बिरबलने सभोवताली पाहिले. तिथे नेहमीचे रक्षक उभे होते. एक सेवक, मोठा कापडी पंखा घेऊन वारा घालत होता. बाजूलाच मुनीमजी, काही खलिते आणि एक चोपडी घेऊन आदबीने उभे होते. बादशहांनी हाताने इशारा केला. पंखा घेतलेला सेवक आतल्या दालनाकडे निघून गेला. तिथले रक्षक दाराबाहेर जाऊन उभे राहिले. मग मुनीमजींकडे बघत बादशहा म्हणाले,

"मुनीमजी बाकीचे हिशेब उद्या पाहुयात. या आपण आता."

घाईघाईने कुर्निसात करून मुनीमजी निघून गेले.

त्यानंतर बिरबलकडे बघत बादशहाने विचारले, "बोला आता मंत्री बिरबल. कसली माहिती घेऊन आलात?"

मग बिरबलने हलक्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली. बिरबलचे बोलणे ऐकताना बादशहाच्या चेहऱ्यावरील भाव झरझर पालटत होते. बिरबलचे बोलणे पूर्ण झाल्यावर बादशहा उद्गारले,

"असं आहे तर सारे? अशी फसवणूक? इतकी लबाडी?"

"खरं आहे खाविंद आणि या सर्व कारस्थानात स्वत:ची कातडी वाचविण्याकरता एका निष्पाप माणसाला बळी दिले जाते आहे. एक संसार उद्ध्वस्त होतो आहे. आणि हे थांबवणं आपल्याच हाती आहे."

बिरबल तळमळीने बादशहासमोर त्यांचे म्हणणे मांडीत होते. ओढणीच्या टोकाने वारंवार डोळे पुसणारी कासीमखॉची बिबी त्यांना आठवत होती.

बादशहा विचारमग्नं झाले होते. ते म्हणाले,

"कासीम खॉ ला तर आपण शिक्षेतून मुक्तं करू, पण मग गुन्हेगाराला पकडणार कसे? कारण त्याच्यावर आरोप करायचा तर पुरावा पाहिजे."

या समस्येवर बिरबलकडे उपाययोजना तयारच होती. मग बराच काळ त्या दोघांमधे काही खलबते चालू होती. सेवक येऊन दालनातील चिरागदाने उजळवू लागला, तरी त्यांचे बोलणे संपले नव्हते.

***

आता वाचकांना प्रश्न पडेल हे सगळं चललंय काय? समस्या काय आहे? कशाचा न्याय-निवाडा करायचा आहे?
त्याचे असे झाले होते की, बादशहाचे प्रधानजी, बेगमसाहिबांचे रिश्तेदार, आणि म्हणून विश्वासातले. इतके मोठे पद देखिल त्यांनी या नात्याचा हवाला देऊनच मिळविले. नाहीतर खान बहादूर या पदासाठी काबील दावेदार होते. प्रधानजीं कडे राज्यकारभारा व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली होती, ती म्हणजे शहेनशहांच्या खजिन्याची राखणदारी. खजिन्यातून एखादा दागिना घ्यायचा असला तर खुद्द बेगमसाहिबांना देखिल प्रधानजींची परवानगी घेणे अनिवार्य होते.

आणि अशा कडेकोट बंदोबस्तात ठेवलेल्या खजिन्यातून काही मूल्यवान वस्तू गहाळ होऊ लागल्या. सुरुवातीला हे कुणाच्याच लक्षात आले नव्हते. कारण इतका प्रचंड खजिना, अनेक भव्य दालने व्यापून राहीलेला... त्याची मोजदाद रोज रोज कोण करणार? त्या खजिन्यात काय नव्हत? सुवर्ण नाणी आणि शिक्क्यांनी भरलेल्या संदूका, उंची गालीचे, रेशीम, देशोदेशींच्या राज्यकर्त्यांनी दिलेले किंमती नजराणे, सोन्या चांदीच्या सुरया, तबके, तसेच हिरे, मोती आणि अनेक मूल्यवान रत्ने जडवलेले सोन्या चांदीचे अलंकार असे बरेच काही होते तिथे. आणि या सगळ्याची जबाबदारी प्रधानजींकडे सोपविलेली होती. त्यांच्या मदतीला कासीमखॉ ची नेमणूक केलेली होती. खजिन्याच्या दालनाची सफाई, मांडणी अशी कामे त्यांना करावी लागत. प्रधानजी स्वत: जातीने तिथे हजर राहून सारे करवून घेत असत. बाहेर जाताना सर्व दरवाजे, गवाक्षे, झरोके बंद केली जात. खजिन्याच्या मुख्य दरवाज्याला भक्कम लोखंडी कडी कोयंडा होता. त्याला कुलूप लावून किल्ल्यांचा जुडगा प्रधानजी स्वत:बरोबर घेऊन जात असत.

आणि या सर्व सुरक्षा व्यवस्थेला भेदण्यात कुणी एक चोर यशस्वी झालेला होता. याची खबर सुद्धा अगदी योगायोगाने लागली होती.

त्याचे असे झाले की, बेगमसाहिबांना काही समारंभाला जाण्याकरता दागिने हवे होते. प्रधानजीसोबत त्या स्वत: खजिन्याच्या दालनात त्यांचे अलंकार निवडून घेण्याकरता आल्या होत्या. त्यांनी काही विविक्षित संदुका उघडण्यास सांगितले, तर काय आश्चर्य? त्या संदूका रिकाम्या होत्या. बराच काळ शोध घेऊन देखिल ते अलंकार मिळाले नाहीत. बेगमसाहिबांनी हे सारे बादशहांच्या कानी घातले. लगोलग चक्रे फिरली. शहेनशहांनी त्यांचे सारे मुन्शी बोलावले. दालनाबाहेर रक्षकांची फौजच खडी केली. आणि खजिन्याची मोजदाद सुरू झाली. आधीच्या याद्या तपासल्या. आवक-जावक च्या नोंदवह्या तपासल्या. आणि असलेल्या खजिन्याची नवी यादी तयार झाली. नव्या आणि जुन्या यादीत बरीच तफावत दिसत होती. सार काही काळजीपूर्वक तपासल्यावर लक्षात आले, खजिन्यामध्ये चोरी झाली आहे. अनेक किंमती वस्तू, अलंकार गहाळ झालेले होते. सुवर्ण नाण्यांचा हिशेब देखिल जुळत नव्हता. तातडीचे आदेश निघाले आणि आरोपी म्हणून कासीमखॉ ला कैदखान्यात बंदी करून ठेवले गेले.

***

दरबार नेहमी प्रमाणे भरलेला होता. शहेनशहा अकबर तक्तनशीन होते. सरदार, दरबारी, मानकरी बादशहा समोर मान झुकवून उभे होते. दरबारातील नवरत्नापैकी एक सोडून बाकी सर्व हजर होते.

प्रधानजींच्या नावाचा पुकारा करण्यात आला. ते स्वत:चे स्थान सोडून तक्ताच्या समोरच, अगदी खालच्या पायरीवर उभे राहीले.

"प्रधानजी खजिन्याची महत्त्वाची आणि तितकीच नाजूक जबाबदारी आम्ही मोठ्या विश्वासाने तुमच्यावर सोपविली होती." बादशहाचे बोलणे ऐकताना प्रधानजींच्या काळजाचे पाणी होत होते. बादशहा आता काय बोलतात ते ऐकण्यासाठी ते इतर दरबाऱ्यांप्रमाणेच उत्सुक होते.

"आम्हास खुशी आहे, की तुम्ही आमचा विश्वास खोटा ठरविला नाही. इमाने इतबारे तुम्ही खजिन्याची राखणदारी केली. आणि त्यात होत असलेली चोरी वेळीच पकडली गेली. त्या बद्दल तुमचा सत्कार करायचा आहे."

असे बोलून बादशहांनी बाजूला पाहिले. तिथे एक सेवक रेशमी, जरीकाठी कापडाने झाकलेले तबक घेऊन उभा होता. बादशहांनी खूण करताच तो सेवक पायऱ्या उतरून प्रधानजीं जवळ गेला आणि त्यांच्या समोर तबक घेऊन उभा राहिला.

तबकाला स्पर्श करून प्रधानजींनी अत्यानंदाने बादशहांना तीन वेळा कुर्निसात केला आणि म्हणाले,

"हुजुर दयावान आहेत, शुक्रिया !"

बादशहांच्या चेहऱ्यावर स्मितरेखा उमटली. ते म्हणाले,

"तुम्हाला एक नवीन मदतनीस नेमला आहे. उद्या तो तुमच्या कचेरीमधे येऊन भेटेल. त्याला सारे काम समजवून सांगा. तो आमच्या रिश्तेदाराच्या ओळखीचा आहे, विश्वासू आहे."

प्रधानजींच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. त्यांना वाटत होते की कासीमखॉ कारावासात आहे. आता ते त्यांच्या विश्वासातला कुणी तिथे नेमू शकतील, म्हणजे त्यांचे काम अजून सोपे होईल. परंतु बादशहांनी नेमणूक केली होती. त्याला विरोध करणे शक्यच नव्हते.

***

दूसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे नेमलेला नवा नोकर कचेरीत आला. त्याने त्याचे नाव वीरदास असे सांगितले. प्रधानजींनी त्याला सर्व काम समजवून सांगितले. पण त्यांना फार अस्वस्थ वाटत होते. हा नवा नोकर सामान्य वाटत नव्हता. चेहऱ्यावरून तर चांगलाच तेज तर्रार वाटत होता. प्रधानजी समोर तो अगदी मोजकेच बोलला आणि मान झुकवून उभा राहिला होता. प्रधानजी त्यांच्या बुद्धीला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होते, परंतु त्या नोकराला त्यांनी कुठे आणि कुठल्या संदर्भात पाहिले होते हे त्यांना कळेना. शेवटी त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला.

वीरदास फार कामसू होता. त्याला काही सांगायची गरजच लागत नसे. सारी कामे तो सफाईने पार पाडत असे आणि तेही एकही शब्द न बोलता. प्रधानजींनी काही विचारले, तर त्याचे अगदी थोडक्यात उत्तर देऊन तो गप्प राही. प्रधानजी हैराण झाले होते. या नव्या नोकराला आपले काम सांगावे की नाही या संभ्रमात ते होते. वीरदास बादशहांच्या मर्जीतला होता त्यामुळेच तो धोकादायक वाटत होता.

***

त्या दिवशीचे काम संपले होते. वीरदास ने खिडक्यांची तावदाने, झरोके इ. बंद करण्यास सुरुवात केली होती. त्या आधी त्याने सर्व दालनात फिरून पेट्या, संदूका इ बंद आहेत ना हे नीट पाहिले होते. सारे काम उरकल्यावर तो मुख्य दरवाज्याजवळ येऊन थांबला. प्रधानजी काही कारणाने आतल्या दालनात थांबले होते. बराच वेळ झाला म्हणून वीरदास हलक्या पावलाने त्या दालनाच्या दरवाज्याजवळ गेला. आत डोकावून पाहिले, तर प्रधानजी एका संदूकीतून काही तरी निवडून घेत होते. त्यांच्या जवळ असलेल्या लहानशा रेशमी थैलीमध्ये ठेवत होते. वीरदास परत मुख्य दरवाज्याजवळ येऊन थांबला. प्रधानजी बाहेर आले. त्यांनी कडीकोयंडा लावून, दरवाज्याला भक्कम कुलूप लावले आणि किल्ल्यांचा जुडगा कमरबंधामधे ठेवत तेथून प्रयाण केले. वीरदास देखिल तिथून निघाला, परंतु स्वगृहीचा रस्ता सोडून, तो सरळ शहेनशहांच्या निवासस्थानाकडे चालला होता.

***

बादशहा जणू त्याची वाटच पाहत होते. वीरदासला पाहताच म्हणाले,

"बोला, काय खबरबात? एक पूर्ण मास उलटला आणि अजून काहीच घडले नाही. म्हणजे तुमचा संशय चुकीचा आहे बिरबल."

होय ... वीरदास म्हणजेच महाचतुर मंत्री बिरबल होते. शेठ गिरीधारीदासजींनी त्यांना ते अमूल्य रत्नं दाखविले. त्यानंतर बिरबलनी स्वत: सराफ बाजार मध्ये चौकशी चालवली होती. काही सेवकांना ग्राहक म्हणून विविध दुकानांमधे पाठविले होते. पण अगदी त्रोटक, अपुरी माहिती हाती लागली. कारण व्यापारी देखिल हुषार.. आपली गुपिते अशी सहजासहजी थोडीच उघड करणार?

परंतु जी माहिती मिळाली त्यावरून संशयाची सुई प्रधानजींकडेच जात होती. पण प्रधानजी म्हणजे बडं प्रस्थं. प्रत्यक्ष बेगमसाहिबांचे रिश्तेदार. त्यांच्यावर पुराव्याविना आरोप करणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण. म्हणून त्यांनी एक नाटक रचले. बादशहा देखिल त्यात सामील झाले. आणि वेषांतर करून त्यांनी वीरदासचा अवतार धारण केला होता.

बिरबलने नम्रपणे बादशहांना कुर्निसात केला, आणि ते हलक्या आवाजात बोलले,

"आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिले हुजुर. प्रधानजी चोर आहेत. आजपासून त्यांच्यावर पाळत ठेवा. ते नक्कीच चोरलेल्या वस्तू विकायचा प्रयत्न करतील. किंवा त्यांच्या खाजगीतील कुणा स्त्रीला नजराणा म्हणून देतील. आपले हेर सर्वत्र असू देत. चोर जाळ्यात स्वत:हूनच चालत येईल."

बिरबल चे बोलणे लक्षपूर्वक ऐकणारे बादशहा अकबर चकीत झाले होते. खुद्द हिंदुस्थानच्या बादशहाच्या खजिन्यातून चोरी? आणि ती देखिल त्यांच्याच विश्वासू खजीनदाराकडून? बादशहांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. मनोमन ते स्वत:लाच दूषणे देत होते. काही क्षणा नंतर बिरबल कडे पाहत ते म्हणाले,

"बिरबल आम्हांस अभिमान होता की मनुष्य स्वभाव आणि गुण यांची आम्हाला अचूक पारख आहे. पण आता लक्षात येतंय, काहीवेळा आमच्याकडून देखिल चूक होऊ शकते. काही वेळा जो साव वाटतो, तोच चोर निघतो. पण तुमच्याकडे पाहून दिलासा मिळतो आहे, की आमचे सगळेच निर्णय चुकीचे नाहीत."

बिरबलला काय बोलावे कळेना. त्यांनी त्यांची कामगिरी फत्ते केली होती. परंतु बादशहांचे दु:ख ते समजू शकत होते. बेगुन्हा कासीमखॉ ची बाइज्जत सुटका झाल्याचे समाधान मात्र होते.

***

बादशहा अकबरांनी त्यांचे अनुभवी आणि कुशल गुप्तहेर प्रधानजींच्या मागे पाठविले. काही दिवसातच त्यांना रंगेहाथ पकडण्यात ते यशस्वी झाले. कारागृहातील मुख्याधिकाऱ्यांनी जरा धाक दाखविताच त्यांनी सारे कबूल केले. त्यांच्या या कुकर्मात सामील होऊन चोरीच्या वस्तू विकत घेणारे, आणि नंतर ते चोरबाजारात विकणारे, असे सगळेजण अलगद जाळ्यात अडकले होते.

बेगमसाहिबांच्या कानावर साऱ्या वार्ता येत होत्याच. त्यांची मान शरमेने झुकली होती. बादशहां समोर बोलण्यासाठी त्यांच्यापाशी शब्दच शिल्लक राहिले नव्हते, कारण प्रधानजींच्या नेमणुकीसाठी त्यांनीच बादशहाकडे शिफारस केलेली होती. त्यांची चांगलीच फसगत झाली होती.

***

अजून नीट उजाडले नव्हते. गार वारा वाहत होता. आकाश नुकते कुठे उजळत होते. निळ्या नभावर लालस आभा विखुरली होती. यमुनेच्या तीरावर अजूनही कुणाची चाहूल नव्हती. एखादा ब्राम्हण यमुनेच्या पात्रात उभा राहून सूर्याला अर्द्यदान देत होता. मंद वाहणाऱ्या वाऱ्यामूळे, यमुनेच्या संथ प्रवाहामध्ये नाजूकश्या लाटा तयार होत होत्या. उसळणाऱ्या लाटांवर सूर्याचे सोनेरी, केशरी किरण नर्तन करीत होते. नदीचे पात्र शोभायमान झालेले होते. अशा शांत, सुखद वातावरणात, मनावरील सारा ताण हलके हलके विरून जात होता. तो खुबसूरत नजारा नजरेमध्ये सामावून घेत खुद्द शहेनशहा अकबर आणि मंत्री बिरबल नदीकाठाने सैर करीत होते. चालता चालता क्षणभर थांबून, खांद्यावरची रेशमी शाल सावरत बादशहा बिरबल ला म्हणाले,

"बिरबलजी .. पण तुम्हाला प्रधानजींचा संशय कसा आला?"

बोलावे की न बोलावे या संभ्रमात काही क्षण काढल्यावर बिरबलने उत्तर दिले,

"माफी असावी हुजुर, मी स्पष्टं बोलतो, मला प्रधानजींची वर्तणूक नेहमीच लबाडीचीच वाटत होती. त्यांची चालचलवणूक, त्यांच्या अवती भवती असलेली, आणि ज्यांत त्यांची नेहमी ऊठबस असे ती माणसे, मला विश्वास ठेवण्याजोगी वाटत नव्हती. माझ्यापरीने मी काही माहिती जमा केली. पण ते बेगमसाहिबांचे रिश्तेदार. त्यामुळे आमच्या बोलण्यावर बंधन आले होते. तरीही मी आपल्याला सावध करायचा प्रयत्न केला होता ..."

"हो हो आम्हांस याद आहे ते. पण त्यावेळी आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले... मोठीच गलती होती ती."
बादशहा खजील होत म्हणाले.

"कासीमखॉ अनेक सालापासून आपल्या चाकरीत आहे खाविंद. इथे मीच नाही तर जवळपास सारे दरबारी त्यांच्या इमानदारीची ग्वाही देतील. परंतु तरीही काहीवेळा मनुष्य चुकतो, परिस्थितीला शरण जाऊन गुन्हा करू शकतो. त्यामुळे दरबारात मी निश्चितपणे काहीच बोलू शकलो नाही. पण ते गुन्हेगार असतील अशी खात्री देखिल वाटत नव्हती. म्हणून मी शेठ गिरीधारीदासजींना खरेदीच्या बहाण्याने बोलावणे पाठविले."

बिरबल त्यांच्या यशस्वी कारस्थानाचे एक एक पैलू उलगडत होते.

"आणि मग तुमच्या चतुर कामगिरीस सुरुवात झाली. बरोबर ना?" बादशहांनी हसत हसत विचारले.

"पण आम्हांस देखिल काही गुण तुम्ही द्यायला हवेत. आम्हीसुद्धा तुमच्या नाटकातील किरदार वठवला ना?"
बादशहा म्हणाले.

"यात काय शंका हुजुर? तुम्ही माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच तर रहस्याचा उलगडा करणे. शक्य झाले" बिरबल उत्तरला. बिरबल कडे कौतुकादराने बघत बादशहा म्हणाले,

"बिरबल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुमच्यामुळे राज्याच्या खजिन्याची होत असलेली लूट थांबली. नाहीतर आम्ही खजिन्याच्या किल्ल्या चक्कं चोराच्याच हातात दिल्या होत्या."

दोघांच्या मुद्रेवर प्रसन्न स्मित झळकत होत. प्रफुल्लित मनाने ते परतीची वाट चालू लागले.

***

उपकथा

किती वेळ झाला काहीच कळत नव्हते. मैथिली हॉस्पिटल मधील कॉरिडॉर मध्ये ठेवलेल्या एका सोफ्यावर सुन्नपणे बसली होती. तिच्या उजव्या बाजूला, कॉरिडॉरच्या अगदी शेवटी आयसीयू वॉर्ड होता. काचेच्या बंद दररवाजा पलीकडे तिचा पती श्रीधर, मृत्युबरोबर झुंज देत होता. आणि आयुष्यभर त्याला सावलीसारखी साथ देणारी मैथिली, लांबून बघण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. संकटकाळी देवाचा धावा करतात, पण तिला तेही सूचत नव्हते.

कुणाचीतरी चाहूल लागली म्हणून तिने पाहिले, पांढऱ्याशुभ्र गणवेशातील एक नर्स येत होती. तिला काही विचारावे म्हणून मैथिली उठून जरा पुढे गेली, पण त्या नर्स ने हातानेच तिला काही न बोलण्याची खूण केली, आणि काचेचा दरवाजा उघडून तिने आत प्रवेश केला. मैथिलीला आता राग येऊ लागला होता. ती परकी नर्स जाऊ शकते, पण सात जन्माची साथ निभावण्याची शपथ जिने घेतलेली आहे, त्या त्याच्या पत्नीला मात्र तिथे जायला बंदी असावी ना?

असाच काही काळ लोटला. काचेचा दरवाजा पुन्हा किलकिला झाला, आणि नर्सबाई बाहेर आल्या आणि मैथिलीला धीर देत म्हणाल्या,

"काळजी करू नका बाई. सारे काही ठीक आहे. औषधांचा परिणाम जरा कमी झाला की ते जागे होतील. मग तुम्ही त्यांना भेटू शकाल. पण नुकतंच ऑपरेशन झालेले आहे, म्हणून जास्त वेळ नाही."

मैथिलीच्या चेहऱ्यावरील ताण कमी झाला. सुन्न झालेली तिची बुद्धी भानावर आली होती. तिने घाईघाईने विचारायला सुरुवात केली,
"पण मग त्यांची औषधे , पथ्यं... "
तिला मधेच थांबवीत नर्सबाई बोलल्या, "डॉक्टर तुम्हाला सारे सविस्तर सांगतील." असे म्हणत त्या निघून गेल्या होत्या.
मैथिलीने पर्समधला मोबाईल फोन हातात घेतला. दोन- तीन ग्रुप्सना मेसेज पाठविला. मग तिने तिच्या आई, बाबांना फोन केला.
"सगळं ठीक आहे आई.. चिनू कशी आहे? तिला सांग बाबा लवकर घरी येणार आहेत. आणि शुभम आला का शाळेतून?"
मैथिलीची विचारपूस चालली होती.

***

आदल्या दिवशी श्रीधर जरा लवकरच घरी आला, आणि म्हणू लागला त्याला जरा त्रास होतो आहे. मैथिलीला ते लक्षण चांगले वाटले नाही. तिने लगेच ड्रायव्हरला गाडी आणायला सांगितले आणि श्रीधरला घेऊन ती त्यांच्या नेहमीच्या गोखले डॉक्टरांकडे आली. त्यांनी त्याला तपासले आणि तातडीने तिला धन्वंतरी हॉस्पिटल मध्ये जाण्यास सांगितले. तिथल्या डॉक्टरांना फोन वरून श्रीधरच्या तपासणीचा अहवाल देखिल दिला होता. हॉस्पिटल मध्ये जाताच डॉक्टरांनी जरूरीच्या तपासण्या केल्या, आणि लगोलग अँन्जिओप्लास्टी करायचा निर्णय घेतला होता. सारे काही अनपेक्षित होते. परंतु मैथिली मोठी धीराची, तिने सारे निर्णय घेतले, आणि ऑपरेशन यशस्वी पार पडले होते. चिन्मयी आणि शुभम साठी तिचे आई बाबा तिच्या घरी येऊन थांबले होते. श्रीधर चे माई आणि आप्पा सांगली मध्ये राहत असत. त्यांना तिने सर्व परिस्थिती कळवली. ऐकल्यावर ते तातडीने कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले होते.

***

श्रीधर वेलणकर हे कोल्हापूर शहरातील एक यशस्वी व्यावसायिक होते. शुभम दुग्धालय आणि मिठाई केंद्राचे मालक म्हणून लोक त्यांना नावाजत. त्यांचा दुग्ध व्यवसाय चांगलाच भरभराटीस आला होता. रोजच्या रोज हजारो ग्राहकांच्या घरी शुभम दुग्धालयातील दूध पोहोचते होत असे. दुधाबरोबरच दही, ताक, लोणी, चक्का इत्यादी उत्पादनांची विक्री देखील केली जात असे. दूध वापरून तयार होणारी मिठाई देखील ते विकत असत. त्यांचा व्यवसाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरलेला होता.

व्यवसायाची सुरुवात श्रीधरच्या वडिलांनी म्हणजे आप्प्पा वेलणकरांनी केली होती. सांगली शहरात त्यांचे दुग्धालय होते. पशुपालनाचा व्यवसाय होता. पण त्याचा आवाका फारच थोडा होता. श्रीधर शिक्षण पूर्ण करून सांगलीमध्ये परतला तेव्हा तो त्यांच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला. दुसरी कुठली चांगली नोकरी मिळेपर्यंत तिथे काम करायचे त्याने ठरवले होते. परंतु जसजशी त्याची व्यवसायातली गुंतवणूक वाढू लागली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की या व्यवसायात देखील भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार करता येईल. त्यानंतर त्याने नोकरी न करता पूर्णवेळ व्यवसाय सांभाळायचे नक्की केले होते. आप्पासाहेबांना खूपच आनंद झाला. त्यांची देखील तशीच इच्छा होती. परंतु त्यांना वाटे, उच्चं शिक्षण घेऊन आलेल्या मुलाला या व्यवसायात काही रस नसणार. परंतु श्रीधरने तयारी दाखविताच व्यवसायाची सूत्रे हळू हळू श्रीधरकडे सोपविण्यास सुरुवात केली.

श्रीधरने व्यवसायाचा विस्तार तर केलाच, त्या बरोबरच लोणी, चक्का, मिठाई इत्यादी उत्पादने विकण्यास सुरुवात केली. सहकारी पतपेढीतून कर्ज घेतले आणि दुधावर प्रक्रिया करून त्याची साठवणूक करणे, प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्याचे वितरण करणे इत्यादी कार्ये देखील करण्यास प्रारंभ केला. व्यवसाय पूर्णपणे स्वावलंबी व्हावा यासाठी त्याचा प्रयत्न होता. व्यवसायाचे केंद्र त्याने कोल्हापूर शहरात ठेवण्याचे ठरवले होते. या सर्व काळात मैथिलीने देखील त्याला साथ दिली होती. त्यामुळेच वयाची पन्नास वर्षे होईपर्यंत त्याचा व्यवसाय चांगलाच स्थिरावला होता. मात्र या सर्व धावपळीत आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले होते, आणि त्याच्या परिणामांना सामोरे जाणे आता भाग होते. श्रीधर आप्पा वेलणकरांचा एकुलता एका मुलगा होता. तशा त्याला तीन बहिणी होत्या. तिघीजणी विवाहानंतर त्यांच्या सासरी राहत होत्या. आप्प्पा आणि माई वयोमानामुळे परावलंबी झालेले. त्यामुळे व्यवसायात मैथिली व्यतिरिक्त जबाबदारी सोपविण्याकरता कुणी नव्हते.

आता परिस्थिती खरंच अवघड झालेली होती. घर आणि दोन मुलांना सांभाळून मैथिलीने व्यवसायात पुन्हा एकदा लक्ष घालण्यास सुरुवात केली. श्रीधर देखील आजारातून पूर्ण सावरला होता. परंतु आता पहिल्या इतके कष्ट त्याला झेपेनात. त्याचे व्यवस्थापक प्रामाणिक होते. तरीही त्याला आणखी कुणाची मदत घेण्याची गरज भासत होती. व्यवसायाची जबाबदारी नि:शंकपणे सोपवावी अशा विश्वासू व्यक्तीच्या शोधात तो होता. आणि योगायोगाने त्याच वेळी कृष्णा कसल्याशा समारंभा निमित्ताने कोल्हापुरला आली होती.

कृष्णा श्रीधरची मावस बहीण होती. अहमदनगर शहरात तिचे वास्तव्य होते. नगर मध्ये पेंढारकरांचे कुटुंब चांगलेच नावाजलेले होते. सासू, सासरे, दीर, जावा असे सारे एकत्र राहत असत. कुटुंबाचा मोट्ठा चौसोपी वाडा होता. घरचा कापड व्यवसाय होता. सारे काही सुरळीत होते.

कृष्णा आणि केशव श्रीधरच्या घरीच मुक्कामासाठी आले होते. श्रीधर आणि मैथिलीने त्यांचे यथासांग आदरातिथ्य केले. एक दिवस असेच काही बोलताना ती श्रीधरला म्हणाली,

“दादा ह्यांना काही नोकरी चाकरी असती तर बरे झाले असते. सामायिकीतले घर आहे म्हणून बरे, पण त्यात मला सुख नाही.”

“असं का म्हणतेस कृष्णा? तुमच्या दुकानाचे काम बघतात ना जावईबापू ?” श्रीधर आपुलकीने तिला समजावीत म्हणाला.

“दुकानाचे कसले आलेय काम? सगळी सूत्रे अजूनही नानांच्याच हाती आहेत. आणि त्यांचा विश्वास जास्त करून दादा आणि अण्णा यांच्यावर आहे. मध्ये दुकानात काहीतरी झाले तर सगळे ह्यांनाच बोल लावतात. त्यामुळे मला देखील घरात मान नाही. जिणे नकोसे झाले आहे बघ.” कृष्णाने बोलता बोलता डोळ्यांना पदर लावला.

श्रीधरला फारच वाईट वाटले. तसा त्याचा स्वभाव भोळा, तो कुणाच्याही सांगण्यावर सहसा अविश्वास दाखवीत नसे. मैथिलीचे अडाखे मात्र काही वेगळे होते. तिचे कृष्णा आणि केशव बद्दल मत फारसे बरे नव्हते. परंतु ती तसे बोलू शकत नव्हती. श्रीधरला असे बोललेले अजिबात आवडायचे नाही. म्हणून ती जरा दुरस्थपणेच सारे ऐकत होती.

श्रीधरने काही वेळ विचार केला आणि म्हणाला,

“तुला कोल्हापुरमध्ये राहायला आवडेल का कृष्णां? केशवराव मला मदत करतील व्यवसायात. मलादेखील विश्वासाचे असे कुणी मदतीला हवेच आहे.”

“मी विचारते त्यांना, ते तयार असतील तर मला चालेलच की. इथे स्वतंत्रपणे मानाने जगता येईल.” कृष्णा उत्साहाने म्हणाली. मैथिलीला मात्र हे फारसे मान्य नव्हते, परंतु श्रीधरने निर्णय घेतला होता.

***

कृष्णा आणि केशव कोल्हापूर मध्ये राहायला आले. सुरुवातीला काही काळ ते श्रीधरच्या घरी राहत, नंतर जवळच एक घर वर्षभराच्या भाडे करारावर घेतले. अनामत रक्कम श्रीधरनेच दिली होती. मैथिलीने सुरुवातीला काही जुजबी सामान त्यांना वापरण्यास दिले होते. अपेक्षा अशी होती, की स्वतः:चे नवीन सामान आणले की ते मैथिलीने दिलेले सामान परत देतील. परंतु तसे काही घडले नाही. मैथिलीने श्रीधरला सांगायचा प्रयत्न केला, पण श्रीधर म्हणाला, “आपल्या घरात काय कमी आहे? घेऊ देत तिने थोडे घेतले तर. बहीण आहे माझी ती.”

आता यावर काय बोलणार? प्रश्न परत न मिळालेल्या सामानाचा आणि त्या पायी झालेल्या आर्थिक नुकसानीचा नव्हता … पण काळ सोकावत होता.

केशवने शुभम च्या कार्यालयात येण्यास सुरुवात केली. सर्व कार्यपद्धती आत्मसात करून घेतली. श्रीधर आता आश्वस्त झाला होता. व्यवसायातील प्रत्येक लहानमोठ्या बाबी कडे लक्ष पुरविण्याची त्याला आता गरज नव्हती. मैथिलीवरचा कामाचा ताण देखील कमी झाला होता.

पण घरातली सुख शांती मात्र नाहीशी होऊ लागली होती. वरकरणी सारे काही ठीक होते. परंतु अंतर्गत कलहाच्या ठिणग्या धुमसत होत्या. मैथिलीचा नेहमीचा हसतमुख चेहरा त्रासिक दिसू लागला होता. त्याला कारण होते अर्थातच पेंढारकर पती पत्नी.
कृष्णा श्रीधर दादाच्या घरी हक्काने वावरू लागली होती. बऱ्याच वेळा तिच्या दोघी मुली सुरभी आणि सृष्टी मैथिलीकडेच असत. त्यासाठी कारणांची काही कमी नव्हती. कधी तिला देवीच्या दर्शनाला जायचे असायचे तर कधी ब्युटी पार्लर मध्ये. कधी खरेदीला तर कधी घरी काही काम काढले आहे म्हणून. केशवच्या ओळखीचे लोक कामानिमित्त कोल्हापुरमध्ये आले की त्यांना राहायला हक्काचे घर मिळाले होते. त्याचे व्यापारी मित्र एका दोन दिवसांकरता येत. कृष्णा त्यांची व्यवस्था श्रीधरच्या घरी करून देई. त्यांच्या घरचे नातेवाईक देखील आले, की मुक्कामाला श्रीधर च्या घरीच असत. कारण त्यांचे घर मोठे होते, साऱ्या सुविधांनी युक्त होते. घरी ये जा करणाऱ्याची वर्दळ खूपच वाढली होती. त्यात घराचे घरपण पार हरवूनच गेले होते. घराला अगदी लॉजिंग-बोर्डिंगची कळा आली होती. शुभम आणि चिन्मयी देखील या बदलाने भांबावून गेले होते.

मैथिली अधूनमधून श्रीधरला घरातील परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत असे. पण श्रीधरचा समज होता की, बायकांना सासरच्या माणसांबद्दल काही ना काही तक्रारी असतातच. त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. एकंदरीत धरी अशांतता होती. श्रीधर दुर्लक्ष करतो हे लक्षात आल्यावर मैथिलीने बोलणे कमीच केले. तिच्या बोलण्यात वारंवार कडवटपणा येऊ लागला होता.

अशातच नवरात्रीच्या उत्सवाला आरंभ झाला होता. सणावाराचे दिवस म्हणजे शुभम साठी सुगीचा काळ. श्रीधर आणि मैथिलीने स्वतः:च्या देखरेखीखाली अनेक उत्तम मिठाया बनवून घेतल्या. त्या सुबक कागदी पेटयांमध्ये भरून त्यावर आकर्षक वेष्टने चढविली. नवरात्री करता शुभम ची पुरेपूर तयारी होती. दसऱ्याला भरपूर चक्का विकला गेला. काहींनी मोठ्या प्रमाणात चक्क्यासाठी मागणी नोंदवलेली होती. तिच्या पूर्ततेसाठी शुभमचे सर्व कर्मचारी श्रमत होते.

दसरा पार पडला. श्रीधरने सर्व कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचे ठरविले. त्या सोबत, सोन्याचे आपट्याचे पान पण द्यायचे त्याच्या मनात होते. त्याने हिशेब तपासायला सुरुवात केली. जमा, खर्चाचा ताळमेळ चुकत होता. सर्व आढावा घेतल्यावर लक्षात आले, अपेक्षा जितकी होती तितका नफा काही जमा झालेला नव्हता. श्रीधरला नवल वाटले. आजपर्यंत त्याचा अंदाज इतका कधी चुकला नव्हता. मग सोन्याचे पान देण्याचा विचार रद्द करून फक्तं बोनस तेव्हढा दिला. तो बोनस देखील नफ्याच्या मानाने जास्तच होता. केशवने त्याला परत परत विनविले, की बोनस ची रक्कम कमी करा. परंतु श्रीधरला ते मान्य नव्हते. तो नेहमीच म्हणे, “माझे कर्मचारी हेच माझ्या व्यवसायाचे आधारस्तंभ आहेत. ते प्रामाणिकपणे कष्ट करतात, म्हणून मी यशस्वी व्यावसायिक म्हणून वावरू शकतो.” त्यामुळे त्यांना कमी हिस्सा देऊन जास्तीचा नफा स्वतःकडे ठेवणे त्याला पटत नव्हते. त्याने सर्व कर्मचाऱ्यांना, त्याने ठरवलेली रक्कम देऊ केली.

आजवरच्या वाटचालीत त्याचे अडाखे इतके कधी चुकले नव्हते. शुभम मधील सारे कर्मचारी अनेक वर्षांपासून तिथे कार्यरत होते. त्यांच्यावर श्रीधरचा पूर्ण विश्वास होता. त्यांच्याकडून काही कसूर झाली असेल, ही शक्यता देखील त्याच्या मनात आली नव्हती. आणि तसेही त्या संपूर्ण काळात, तो स्वतः, मैथिली आणि केशव देखील त्या सर्वाबरोबर उपस्थित होतेच की. मिठाई, चक्का इ. बनविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीवर केलेला खर्च, तयार झालेली मिठाई. विक्री झालेली मिठाई, या सगळ्याचा एकत्रित विचार करून, होऊ शकणारा नफा आणि प्रत्यक्षात हाती आलेला नफा यात तफावत दिसून येत होती. श्रीधर फारच नाराज झाला होता, परंतु या समस्येचे मूळ कारण त्याच्या लक्षात येत नव्हते.

***

नेहमीप्रमाणे त्याचे सनदी लेखपाल, कुलकर्णी त्यांच्या दोन कनिष्ठ सहाय्यकांसह आलेले होते. त्यांना सारी कागदपत्रे सोपवून तो घरी आला. संध्याकाळी त्याच्या फोनवर कुलकर्ण्यांचा निरोप आला, “सारे हिशेब तपासून पूर्ण झाले आहे, त्याबद्दल थोडे बोलायचे आहे.”

दुसऱ्या दिवशी तो कुलकर्ण्यांच्या कचेरी मध्ये गेला होता. त्यांनी जे सांगितले ते अविश्वसनीय होते. कुलकर्णींनी एकेक तपशील त्याला समजावून सांगितला होता. त्याचा मतितार्थ असा होता की हिशोबांमध्ये घोटाळा होता.

श्रीधर परत परत त्याच्या हातातील फाइल बघत होता. त्यातील प्रत्येक तपशील परत परत काळजीपूर्वक वाचत होता. चेहऱ्यावर काळजीच्या रेघा उमटल्या होत्या. काही वेळानंतर डोळ्यावरचा चष्मा काढून त्याने टेबलावर ठेवला आणि खुर्चीच्या पाठीवर मस्तक विसावून विचारात गढून गेला होता. इतकी वर्षे निगुतीने जोपासलेला त्याच्या व्यवसायाला जणू ग्रहण लागले होते. असे का व्हावे हे त्याला समजत नव्हते.

***

मैथिली खोलीत आली तेव्हा चांगलेच अंधारलेले होते . ती काळजीने म्हणाली,

"आहो, असे अंधारात का बसला आहात? किती वेळ झाला? तब्येत ठीक आहे ना? औषधे घेतलीत का? "

अगं हो जरा श्वास घे .. किती प्रश्न विचारशील?" श्रीधर हसत म्हणाला.

"मी अगदी ठीक आहे. औषधे घेतली आहेत. आणखी काही ?"

मैथिली काही न बोलता दाराकडे निघाली. श्रीधरला काही समजेना. आता हिला काय झाले नाराज व्हायला? तो जरा उंच आवाजात म्हणाला,

"आज अबोल्याचा वार आहे की काय? तुझी दसऱ्याची साडी खरेदी राहिली आहे हे लक्षात आहे माझ्या. त्या करता इतकं रागवायचं कारण नाही"

त्याचे बोलणे ऐकून मैथिली परत मागे वळली आणि जरा रागातच म्हणाली,

"काहीतरीच काय? आजवर मी कधी काही मागितलंय का तुम्हाला? आणि माझ्याकडे आहेत पुष्कळ साड्या. आजच तुमच्या बहिणाबाई आल्या होत्या… " उगीचच अप्रिय विषयाची सुरुवात नको करायला या विचाराने बोलता बोलता ती थांबली.
जरा पुढे जाऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसत तिने विचारले,
"काय झाले आहे? काही समस्या उद्भवली आहे का?"

श्रीधरने नुसतीच नकारार्थी मान हालविली. त्यालाच जे समजत नव्हते, ते तो तिला कसे सांगणार?

मग मैथिलीच पुढे म्हणाली, "तुम्ही जास्त ताण नका घेऊ. व्यवसाय म्हणाला की चढ उतार यायचेच, हे काही मी सांगायला नको तुम्हाला. या वेळेस मनाप्रमाणे लाभ नाही झाला म्हणून काळजीत आहात का? आता दिवाळी आलीच आहे उंबरठ्यावर. सगळी कसर भरून निघेल बघा."

"ती काळजी नाहीये मला. पण आज कुलकर्णींकडे गेलो होतो मी. त्यांनी जे सांगितलं ते अविश्वसनीय आहे. .. " तो जरा थांबला मग म्हणाला "मगाशी काय सांगत होतीस? कृष्णा आली होती का?"

"तसं काही विशेष नाही, मी गौरीच्या हळदीकुंकवाला नेसले होते ना, ती पैठणी तिला हवी होती. तिला कुठल्याशा समारंभाला जायचंय म्हणे.. " मैथिलीने सांगितले.

"मग दिलीस का?" श्रीधरने कपाळावर आठी चढवत विचारले.

"हो ! दिली ना. माझ्या कपाटातल्या साड्या पाहून हरखूनच गेली होती. मग पैठणीबरोबर ती निळ्या रंगाची पटोला पण… " मिथिलाचे साडीपुराण संपत नव्हते. तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता ना? पण तिला अडवीत श्रीधर म्हणाला, " पुरे, कळलं .. तू परीक्षे मध्ये 'एका वाक्यात उत्तरे द्या' या प्रश्नाला पण पानभर उत्तर लिहीत असणार, नक्कीच "
मैथिली रागाने तिथून जाण्यासाठी निघाली, तिला थांबावीत श्रीधर म्हणाला,

" जरा थांब, महत्त्वाचे काही सांगायचंय."

त्याचा गंभीर चेहरा पाहून तिला जरा भीतीच वाटली. मग श्रीधरने हलक्या आवाजात जे घडले आहे ते सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. त्याचे बोलणे ऐकताना मैथिलीच्या मनात अनेक विचार येत होते. हे असं काही होणार अशी तिला अटकळ होतीच, का ते तिला सांगता आले नसते. तिने श्रीधरला सावध करण्याचा प्रयत्न केला होता. पण अशा पद्धतीने सारे सामोरं यावे याचे तिला वाईट वाटत होते. ती काही बोलत नाही हे पाहून श्रीधरच पुढे म्हणाला,

"आता दिवाळी येते आहे. आजच सावंतांना मी सांगितले आहे काय आणि कसं करायचे त्याची यादी करायला. उद्या तू पण ये ऑफिस मध्ये.. तो नवीन अकौंटंट आहे ना, काय बरं नाव त्याचे?"

"दिवेकर.. " मैथिलीने तप्तरतेने माहिती पुरविली.

"हा बरोबर , त्याला पण यायला सांगू या, जोगळेकर रजेवर आहेत ना? पण प्रत्येक व्यवहार करताना तू किंवा मी तिथे असायला हवे" श्रीधरने सांगितले.

"तुझी जरा ओढताण होणार आहे, मी आप्पा आणि माईला कोल्हापुरला या असे कळवितो. …. " असे म्हणत जरा थांबला आणि म्हणाला, "चालेल ना तुला?"

"आहो न चालायला काय झाले? उलट बरेच होईल."

पुढचे तिला जे बोलायचे होते, ते तिने मनातच ठेवले. उघडपणे म्हणाली,

"तो दिवेकर केशवरावांच्या ओळखीतला आहे ना?"

श्रीधर ने चमकून तिच्याकडे पाहिले, काहीतरी लक्षात येऊन तो म्हणाला,

"खरंच की !"

***

श्रीधर सीताकुंज मध्ये पोहोचला तेव्हा सकाळचे जेमतेम नऊ वाजले होते. नामदेव आणि हरी नुकतेच आले होते. दरवाजा, खिडक्या उघडून त्यांनी नेहमीप्रमाणे साफसफाई करण्यास सुरुवात केली होती.

सीताकुंज म्हणजे शुभम चे मुख्य कार्यालय होते. त्याच्याच बाजूला उत्पादन केंद्र होते. मिठाई बनविण्याचे काम तिथे केले जाई. सीता कुंज पासून थोड्या अंतरावर शुभमचे दूध प्रक्रिया, साठवणूक आणि पॅकेजिंग केंद्र होते. तिथून कोल्हापूर शहरात आणि पंचक्रोशीतील इतर जिल्ह्यांमध्ये दुधाचे वितरण होत असे. व्यवसायाची व्याप्ती खूपच वाढलेली होती. परंतु श्रीधरच्या शिस्तशीर आणि योजनाबद्ध कार्यपद्धतीमुळे सारे काही सुरळीत चालले होते. सहसा कुठे अडचण उद्भवत नसे. त्याचा कर्मचारी वर्ग देखील जुना आणि जाणता होता. त्यामुळे अनेक लहान मोठ्या जबाबदाऱ्या श्रीधरने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपविलेल्या होत्या.

चहाचा ट्रे घेऊन नामदेव तिथे आला. श्रीधर ने त्याला विचारले,

"अरे पेंढारकर साहेब आले की त्यांना मी बोलावले आहे म्हणून सांग."

नामदेव म्हणाला, "ते इतक्यात यायचे न्हाईत. दुपारहून कधीतरी येतील."

श्रीधर ला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, "म्हणजे काल तसे काही सांगितले आहे का त्यांनी?"

"न्हाई, ह्ये रोजचंच हाये. सक्काळला इथं कोन बी नसतंय. सावंत साह्येब आनी जोशी साह्येब सारं पाहत्यात. पेंढारकर साह्येब दुपारला कधीतरी इथे चक्कर टाकत्यात." नामदेवने इमानदारीत माहिती पुरवली.

श्रीधरला हे सारे माहिती नव्हते. आज बऱ्याच काळानंतर तो सीताकुंज मध्ये आला होता. आजकाल तो शहरातील महालक्ष्मी मंदिराजवळच्या त्यांच्या शुभम मिठाई केंद्रात असे. बाकी सर्व जबाबदारी त्याने केशववर सोपविलेली होती. त्यासाठी तो त्याला भरपूर पगार तर देत होताच. त्या व्यतिरिक्त इतरही सोयी, सवलती त्याला दिलेल्या होत्या. असे असताना केशव कर्तव्यात कसूर करत होता.
श्रीधर ला केशवची अनुपस्थिती सोयीचीच वाटली. त्याने सर्वप्रथम कार्यायालयातील नोंदणी वही तपासायला सुरुवात केली. आधीच्या काही दिवसातील व्यवहाराच्या फाइल्स त्याने वेगळ्या केल्या, घरी नेण्यासाठी. सर्व नीट, शांतपणे बघायला हवे होते. दुपार पर्यंत श्रीधर फायलींमध्ये डोके घालून बसला होता. केशव अजूनही आलेला नव्हताच. दुपारी जेवणाचा डबा घेऊन मैथिली आली. घरी स्वयंपाकीण काकू होत्या, त्यांना मदतीसाठी म्हणून आणि वरकामासाठी सरोज होती. तरीही मैथिली श्रीधर साठी पथ्याचा स्वयंपाक स्वतःच करीत असे.

मैथिली आल्यावर त्याने तिला मिठाई केंद्राची आवक जावक नोंदवही तपासण्यास सांगितले. तसेच मिठाईकरता मोठी मागणी नोंदवलेल्या ग्राहकांच्या खात्याचा तपशीलवार आढावा घेण्यास सांगितले.

दुपारची उन्हे जरा कलल्यासारखी झाली होती. माध्यान्हीची लाही लाही शांत होऊ लागली होती. दुपारचे चार वाजत आले होते. श्रीधर ने हातातील फाइल बंद केली. मैथिलीला म्हणाला बाकीच्या वह्या घरी घेऊन जाऊ या, कारण सगळे काम एकदिवसात संपण्यासारखे नाहीये.
मैथिलीने तिचा चष्मा पर्स मध्ये ठेवत विचारले,
"तुमचा काय करायचा विचार आहे? एव्हढी सगळी तपासणी करून काय सापडेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला?"
"आधी हिशोबांमध्ये काय चूक आहे हे शोधायचे आहे. कारण ती चूक तशीच सोडून दिली तर नंतर ऑडिट च्या वेळेस त्रास होईल. आणि ती चूक कशी आणि कुणी केली हे सुद्धा बघायचे आहे. चूक कुणाकडूनही होऊ शकते, परंतु वेळीच लक्षात आली तर परत होऊ ना देण्याची दक्षता घेता येईल" श्रीधर म्हणाला. त्याच्या मनातले इतक्यातच त्याला उघडपणे बोलायचे नव्हते, सावधगिरी म्हणून.

नामदेवने चहाचा ट्रे आणला. त्याच वेळी केशवदेखील आला होता. दोघांना तिथे बघून त्याला आश्चर्य वाटत होते.

"दादा, वहिनी दोघेही आज इथे? अलभ्य लाभ !!" तो जरा नाटकीपणे म्हणाला.

"मला आधी माहिती असते तर …. " असे म्हणून जरा थांबला मग पुढे म्हणाला,

"आज कोल्हापूरच्या सांस्कृतिक मंडळाची मीटिंग होती. मी आणि कृष्णाने त्या मंडळाचे सभासदत्व घेतले आहे नुकतेच. तिथे स्नेहभोजन होते, म्हणून इकडे यायला इतका उशीर झाला."

केशव सांगत होता पण का कोण जाणे श्रीधरला ते खरे वाटत नव्हते. केशवच्या बोलण्यावर त्याने कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मैथिलीच बोलली,

"हो बरोबर, कृष्णा म्हणाली होती मला. ती आणि सुरभी, सृष्टी घरी आहेत का आता? ती देखील इकडे आली असती तर भेट झाली असती अनायासे."

वातावरणातील ताण हलका करण्याचा मैथिली प्रयत्न करीत होती. पण तिला फारसे यश आले नव्हते.
मग श्रीधर केशवला म्हणाला,

"केशवराव आता दिवाळीच्या तयारीला सुरुवात करायची आहे. आपल्या विक्री प्रतिनिधींना उद्या इकडे बोलावून घ्या सकाळी. आणि नंतर चित्रलेखाच्या पावसकरांना सांगा. वेष्टने, आणि मिठाईच्या पेटयांसाठीचे डिझाइन फायनल करून टाकूयात. पत्रके आणि जाहिरातींचे काम देखील त्यांनाच द्यायचे आहे."

श्रीधरचे बोलणे ऐकताना केशव मधेच म्हणाला,

"दादा जाहिराती आणि डिझाइनचे काम कला आर्ट वर्क ला द्यायचे का? तिथला अभिजित माझ्या ओळखीतला आहे, खरं म्हणजे दूरचे नातेच आहे आमचे. चांगला कलाकार आहे. नवीनच सुरुवात आहे त्याची तशी, पण काम चांगले करेल."
केशव अजिजीने म्हणाला.

"नवरात्रीचे काम त्यानेच केले होते का?" श्रीधरने विचारले.

"हो हो तोच तो" केशव पुढे काही बोलणार इतक्यात श्रीधरच म्हणाला,

बऱ्याच चुका होत्या त्यात, प्रूफं कोणी तपासली होती? आणि पैसेपण खूप जास्तं लावलेले दिसतायत."

"मीच तपासली होती प्रूफं. पण नवरात्रीची इतकी कामे होती, काहीतरी राहून गेले असेल." केशव खजील होत बोलला. "पण यावेळी नीट काळजीपूर्वक सारे होईल, मी स्वतः …"

त्याचे बोलणे तोडत श्रीधर म्हणाला, "नको चित्रलेखा ठीक आहे. पावसकर माझ्या चांगले माहितीतले आहेत, आणि इतकी वर्षे तेच करतायत आपले काम. त्यांनाच बोलावून घ्या."

बोलत बोलत श्रीधर जागेवरून उठला आणि म्हणाला,

"उद्या मी सकाळी १० वाजता इथे येतो. चालेल ना तुम्हाला?"

केशवला काय बोलावे ते सुचत नव्हते, त्याने फक्त होकारार्थी मान डोलवली.

***

संध्याकाळी केशव घरी आला. आल्यापासून त्याची रागवारागवी चालली होती. कृष्णाला कळेना याला झालय तरी काय? सकाळी घरातून निघताना तर ठीक होता. तिने विचारले,

"काय झालंय? अशी चिडचिड का करता आहात? मगाशी सुरभीला उगीचच रागावलात."

कृष्णाचे बोलणे ऐकून केशवच्या रागाचा पारा अजूनच चढला होता. जरा मोठ्या आवाजात म्हणाला,

"कृष्णा आपण नगर ला परत जाऊयात. इथे काम करायची मला इच्छा नाही."

कृष्णाला नवल वाटले. ती म्हणाली,

"म्हणजे परत अण्णा, दादा आणि नानांच्या हाताखाली काम करणार का? आणि ते देखील विनामोबदला."

"विनामोबदला कसं? माझा देखील हिस्सा आहे. दुकानात माझा मालकी हक्क आहे. पण इथे काय? तुझ्या श्रीधर दादांचा मी नोकरच ना शेवटी?"

केशव म्हणाला. कृष्णाची प्रतिक्रिया काय होते आहे हे अजमावत राहिला.

"म्हणजे तुम्हाला तसं कुणी बोललं का? दादा तर नाही बोलायचा. वहिनी काही सीताकुंजवर येत नाही. मग ?"

कृष्णा ने विचारले. तिला अहमदनगरच्या घरी परत जायची अजिबात इच्छा नव्हती. तिथे सासू आणि जावांच्या बरोबर राहणे तिला मानवणारे नव्हते. कोल्हापुरला स्वातंत्र्य होते. अडीअडचणीला तिचे हक्काचे दादा, वहिनी होते. हे सुख सोडून परत जायची कल्पना तिला असह्य झाली.

"आज आले होते दादा वहिनी, दिवाळीच्या सर्व कामकाजाची सूत्रे दोघेही त्यांच्याकडे घेणार. म्हणजे मी फक्त मदतनीस. आता गरज संपली ना त्यांची. प्रकृती सुधारली आहे. गरज होती तेव्हा सारी जबाबदारी माझ्याकडे सोपविली. आणि आता.. "

केशवच्या मनातला जळफळाट बाहेर येत होता. श्रीधरने सूत्रे हाती घेतल्यावर त्याच्यावर बंधने येणार होती. वरकमाईची संधी मिळणार नव्हती. केशवची चिडचिड चालूच होती. हेतू हा होता की कृष्णाने श्रीधरला सांगावे. कदाचित बहिणीसाठी म्हणून तो केशवला काही सवलती देऊ करेल. त्याला माहिती होते की कृष्णाला अहमदनगर ला परत जायचे नव्हते. त्यामुळे ते टाळण्यासाठी ती श्रीधरकडे, केशवसाठी शब्द टाकेल. बराच वेळ त्याचे नाटक चालले होते. कृष्णा काळजीत पडली होती. पण ती नक्की काय करू शकेल हे तिच्या लक्षात येईना. मग तिने केशवलाच विचारले,

"आहो मग मी काय करू? परत नगरला जायचे का आपण?"

केशव घाईघाईने म्हणाला, "नाही नाही, परत कशाला जायचे? तू श्रीधरदादांना सांगशील का? की मला स्वतंत्र जबाबदारी हवी आहे म्हणून?"

केशवने तिला विचारले. कृष्णाला पुढे करून त्याला त्याचा हेतू साध्य करायचा होता. स्वतंत्र जबाबदारी म्हणजे त्याला त्याच्या व्यवहारांवर कुणी लक्ष ठेवणारे नको होते. गेले वर्ष, दीड वर्ष त्याने सारे काही बिनबोभाट निभावले होते, पण आता त्याला चाप बसणार होता. म्हणून त्याची सारी फणफण चालू होती.

"मी विचारते दादाला, पण मला असं विचारणं काही बरं वाटत नाहीये." कृष्णा म्हणाली.
केशवने तिला समजावले की त्यात कसली चूक नाहीये. त्याला आजवर सारे स्वतंत्रपणे करण्याची सवय आहे. नगरला असताना तर तो दुकानाचा मालकच होता. त्याला व्यवसायाचा अनुभव देखील आहे. इत्यादी इत्यादी. अखेर कृष्णा श्रीधरला विचारण्यास तयार झाली.

कृष्णाने श्रीधरला केशवचे म्हणणे सांगितले, पण श्रीधरने काही ते मनावर घेतले नाही. वरकरणी समजुतीच्या स्वरात तो म्हणाला,

"अगं व्यवसाय म्हणजे काही घरगुती काम नव्हे. ती एक जबाबदारी आहे. एकट्यादुकट्याचे काम नाही ते. त्या साठी संपूर्ण संघटना लागते. मी देखील त्या सर्व यंत्रणेचा एक भाग आहे केवळ. शुभम चे सर्व कर्मचारी, म्हणजे केशवरावसुद्धा या संघटनेचे घटक आहेत. त्यांना सांग, की ते देखील व्यवसायाचा एक महत्त्वाचे भागीदार आहेत."

कृष्णाला तर ते पटले, परंतु केशवला काही ते मानवत नव्हते. पण आता निरुपाय होता. मग तो श्रीधरच्या नेतृत्वाखाली दिवाळीच्या कामात मग्न झाला. वाजतगाजत दिवाळी आली आणि पार देखील पडली. नफा तोट्याची आकडेमोड सुरू झाली. यावेळी नफा चांगला मिळाला पण तरीही नेहमी इतका नाहीच. श्रीधरला सर्व कर्मचारी वर्गाला बोनस बरोबर भेटवस्तूही देता आली होती. त्याला त्याचे समाधान होते.

***

श्रीधरने जोगळेकरांना शुभम मिठाई केंद्रावर बोलावून घेतले होते. जोगळेकर शुभमचे जुने, जाणते अकौंटन्ट होते. अतिशय प्रामाणिक आणि कामाप्रती निष्ठा बाळगणारे जोगळेकर, श्रीधरच्या विश्वासातील होते. त्यांच्या मदतीला म्हणून आधी पानसरे नावाचा हुशार मुलगा होता. अकौंटस, बुककीपिंगची चांगली माहिती होती त्याला. संगणकाचे उत्तम ज्ञान होते. पण त्याला गेल्या वर्षी एका सहकारी बँकेमध्ये नोकरी लागली, त्यामुळे त्याच्या जागी केशवच्या ओळखीने दिवेकर ची नेमणूक केलेली होती. त्या दिवेकर समोर बोलायला नको, म्हणून श्रीधरने जोगळेकरांना दुकानावर बोलावून घेतले होते. जोगळेकर येताना त्यांचा संगणक आणि काही नोंद वह्या घेऊनच आले होते. बराचवेळ त्यांचे काम चालले होते. जोगळेकरांचे काम अगदी नीट नेटके. इतक्या वर्षांच्या अनुभवाने अगदी जरुरीची आणि नेमकी माहिती ते पुरवीत होते. नोंदवहीची तपासणी करताना संशयास्पद नोंदीभोवती लालवर्तुळे काढत होते.
सर्व वह्या तपासल्यावर श्रीधर म्हणाला,

"जोगळेकर तुम्ही खूप चांगलें काम केलं आहे. आता आपण वेगळ्या केलेल्या नोंदीची तपासणी तुम्ही करायची आहेत. दिवेकराची मदत नका घेऊ. म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले ना तुमच्या?"

"हो साहेब, आलंय सारं ध्यानात. खरं म्हणजे मी आधीच बोलणार होतो, पण तुमची प्रकृती आणि पेंढारकर साहेब … " जोगळेकर बोलले.

"पण आता ते काही मनात आणू नका. आता फक्त व्यवसायाचा विचार करा. तुमच्यासारखे प्रामाणिक कर्मचारी आहेत, म्हणून मी निर्धास्त आहे." श्रीधर मनापासून बोलला.

***

जोगळेकरांनी कामगिरी अगदी चोख बजावली होती. साऱ्या तपासणीचा तपशीलवार अहवाल त्यांनी श्रीधरकडे पाठवून दिला होता. सारे चित्र स्पष्ट झाले होते. आता यावर काय कार्यवाही करावी या विचारात श्रीधर होता.

स्वयंपाक घरातील आवराआवर उरकून मैथिली दिवाणखान्यात आली, तेव्हा श्रीधर त्याच्या हातातील फायलीची पाने परत परत वाचत होता.

"कसली फाइल आहे ती ? " तिने विचारले. श्रीधरच्या मनात काय चालले असावे याचा ती अंदाज घेत होती.

"तूच बघ की .." तिच्या हातात फाइल देत श्रीधर म्हणाला.
तिथल्या टेबलच्या ड्रॉवरमधला चष्मा डोळ्यांवर चढवीत तिने फाइल उघडली. त्यातील सारी पाने काळजीपूर्वक वाचली. मग फाइल बंद करून चष्मा हातात घेत तिने विचारले,

"आता काय करायचा विचार आहे तुमचा?"

"मला तर पोलीस मध्ये तक्रार द्यावी असे वाटते आहे. तुरुंगात खडी फोडायला लागली की चांगली समज येईल. इतक्या विश्वासाने आपण त्यांना सर्व जबाबदारी दिली आणि … केव्हढा विश्वासघात? माझी फसगत झाली. इतके जवळचे नाते आपले. त्यांना घरच्यांसारखेच मानले आपण, आणि त्यांनी अशी लबाडी करावी? गरज होती तर मागायचे ना पैसे? मी नाही म्हणले नसतेच."

श्रीधरला राग अनावर झाला होता. कपाळाच्या शिरा उठून दिसत होत्या. डोळे लालसर झाले होते. मैथिलीला वाटले परत दुखणे उद्भवते की काय? ती म्हणाली,

"आधी शांत व्हा, त्यांनी जे केले त्याचा त्रास तुम्ही करून घेऊ नका. मला आधीपासूनच शंका होती. त्या दोघांना मी काही आज ओळखत नाही. पण पोलिसांकडे नको जायला."

श्रीधरने तिच्याकडे बघत रागारागात म्हणले,

"मग हे सारे असेच चालू देऊ का? इतक्या कष्टाने नावारूपाला आणलेला माझा व्यवसाय आहे, आणि हा लबाड मनुष्य पोखरून काढतो आहे. त्याला शिक्षा व्हायलाच हवी. मी अशी लबाडी सहन करू शकत नाही."

मैथिली काही काळ स्वस्थ बसली. तिला देखील गेल्या दोन वर्षातील अनेक घडामोडी आठवत होत्या. तिच्या घराचे बिघडलेले स्वास्थ्य ती अनुभवत होती. तिला देखील या सर्व प्रकाराचा तिटकारा आला होता. तिने श्रीधरला सांगायचा प्रयत्न देखील केला होता. पण त्यावेळी त्याच्या दृष्टीवर मायेचा पडदा पडला होता. तिने मनाशी काही विचार केला, शब्दांची जुळवाजुळव केली आणि मग ती बोलली,

"मला काय वाटते.. की हे प्रकरण घराबाहेर जाऊ देऊ नये. घरातल्या गोष्टी चव्हाठ्यावर गेल्या, की पूर्ण घराचीच अब्रू धुळीला मिळते. तुम्ही केशवरावांना शिक्षा द्यायला जाल, पण ती शिक्षा कृष्णाला देखील भोगायला लागेल. तुमच्या मावशींना आणि माईंना मनस्ताप होईल. आणि असे झाल्यावर तुम्ही आणि मी सुखी राहू शकणार नाही."

श्रीधर आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. आजवरच्या वैवाहिक आयुष्यात त्याने मैथिलीला अनेक रूपात पाहिले होते. पण हे रूप अनोखे होते. तो म्हणाला,

"तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण हे असच चालू देणे पण बरोबर नाही. म्हणजे आपल्या मन:स्वास्थ्यासाठी आणि व्यवसायाच्या दृष्टीने देखील."

"नाही असच चालू नाही द्यायचे. अनायासे माई आणि आप्पा इथे आलेले आहेत. तुम्ही तुमच्या मावशी आणि काकांना बोलावून घ्या. त्यांच्यासमोर आपण हे सारे ठेवूयात. आणि केशवरावांना आणि कृष्णाला अहमदनगरला परत जायला सांगूयात. माई आणि मावशीच्या साक्षीने सारे केले, की त्या दोघांना आपल्याबद्दल खोटेनाटे बोलता येणार नाही." मैथिलीने सांगितले.

"त्याबद्दल काही खात्री देता येत नाही. बोलणाऱ्याचे तोंड काही धरता येत नाही. पण आपण ती चिंता करायची नाही. चालेल असेच करूयात. एकदा सोक्षमोक्ष लागला की मला जरा स्वस्थता मिळेल… आणि तुलाही." श्रीधर म्हणाला.

***

श्रीधरने टेबलवर ठेवलेली कार ची किल्ली घेतली. संपत घराच्या व्हरांड्यामध्ये येऊन थांबलेला होताच. त्याच्याकडे किल्ल्यांचा जुडगा देत गॅरेजमधली कार आणण्यास सांगितले. मग त्याने त्याच्या कातडी बॅगेची चेन उघडून आतील कागदपत्रे तपासली. आज त्याला कुलकर्णींकडे जायचे होते. जोगळेकरांनी दिलेल्या अहवालाची प्रत त्याने परत एकदा चाळली. त्याच्याकडून त्याने सर्व तयारी केली होती. कुलकर्णींना यावेळी तरी तपासणीत काही अफरातफर सापडणार नाही अशी त्याला आशा होती. संपत कार घेऊन आला. मैथिलीला सांगण्याकरता म्हणून त्याने स्वयंपाकघरात डोकावले. तिथे फक्त सरोज भांडी विसळत होती. श्रीधरने मग तिलाच सांगितले,

"सरोज, वहिनींना सांग मी जातो आहे म्हणून.."

असे म्हणत तो दरवाज्याकडे वळला. इतक्यात जिना उतरून मैथिली खाली येत होती. त्याला बघताच म्हणाली,

"आहो थांबा, मी पण येते आहे."

तिच्या जामानिम्याकडे बघत श्रीधर म्हणाला,

"तुला कुठे जायचे आहे? मी दुकानात नाही, कुलकर्णींकडे जाणार आहे आधी. बाजारात जायचे असेल तर रिक्शेने जा."

"नाही बाजारात नाही, सीताकुंज मध्ये जायचे आहे मला. मला तिथे सोडून तुम्ही पुढे जा मग." मैथिली तिची शाल सावरत बोलली.

श्रीधर आश्चर्याने म्हणाला, "म्हणजे तू परत शुभमची जबाबदारी घेणार आहेस की काय?"

त्याच्याकडे बघत मैथिली बोलली, "हो, विचार तरी तसाच आहे. तुमची हरकत नाही ना?"

"हरकत कशाला असेल? चांगलच आहे की. .. आता परत काही दिवसांनी गुढी पाडव्यासाठी तयारी सुरू करायची आहेच. तू तिथे असशील, तर मग मला चिंता करायचे कारणच नाही." श्रीधर हसत म्हणाला.

आज बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर घरातले वातावरण आनंदी आणि तणाव विरहित झालेले होते.

***

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काय आहे, बिरबल म्हटले की छोटीशी कथा ऐकायची सवय झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-- पण कथेची लांबीच तेव्हढी होती. याहून शॉर्ट करणे शक्यं नव्हते...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बालु की भित, पवन का खंबा |
देवल देख भया अचंबा ||
भोला मन जाने - अमर मेरी काया ||