म्हणींच्या गोष्टी ... (४)

मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात? त्यांच्या मागे काय कथा असतील? तर काही म्हणींच्या या गोष्टी ...

मराठीतील म्हणी या अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. एखाद्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्द आणि वाक्ये खर्ची पडतात. पण तेच काम म्हणींच्या प्रयोगाने काही शब्दातच आणि अधिक नेटकेपणाने करणे शक्य होते. आता ही एक सर्वपरिचित अशी म्हण आहे ..

"भटाला दिली ओसरी - आणि भट हात पाय पसरी"

म्हणीचा अर्थ : एखाद्या गरजूला विसावा घेण्यासाठी काही काळ घराच्या ओसरीवर जागा दिली, तर तो गरजवंत तिथेच ठाण मांडतो. काही काळा नंतर तर त्याच्या उपकारकर्त्याचे सारे घरच व्यापून बसतो. कुणाला चांगुलपणाने मदत करायला जावी, तर मदत घेणारा त्याचा गैरफायदाच घेतो. या म्हणीचा वापर करण्याची वेळ अनेकांना कधी ना कधी तरी येतेच.

अडचणीत असलेल्यांना, गरजूंना यथाशक्ती मदत करणे हे पुण्यकर्मच आहे यात शंका नाही. सर्वसामान्यांना आयुष्यात अनेकदा अडचणींचा सामना करण्याची वेळ येते. त्यातून मार्ग काढण्याकरिता अथवा समस्यांचे निराकरण करण्याकरता कुणाची मदत लाभली, तर जीवन सुकर होते. मदत करताना, ती करणाऱ्याने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की उद्या कदाचित अशीच वेळ माझ्यावर येऊ शकते. आज मी मदतकर्ता आहे, उद्या मी याचक असेन. म्हणून मदत करताना कधीही उपकारांची भावना मनात आणू नये असे सांगितले जाते.
हे सर्व जरी खरे असले तरी काही वेळा हेच पुण्यकर्म अंगलट येते, आणि मदत करणारा पश्चाताप करू लागतो. असे होण्याचे कारण असते मदत घेणाऱ्याची वृत्ती. आपली कठीण परिस्थिती सुधारण्यापुरते दुसऱ्याचे सहाय्य जरूर घ्यावे. परंतु ते घेताना सहाय्यकर्ता आपल्यामुळे अडचणीत तर येत नाही ना ते सुद्धा बघावे. परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडून आल्यावर मदत घेणे आपणहून थांबवावे, आणि मदत करणाऱ्याबद्दल आजन्म कृतज्ञता बाळगावी असे आपली शास्त्रे, पुराणे सांगतात. परंतु काहीजण हे विसरून जातात. दुसऱ्याची गैरसोय होते आहे हे बघून देखिल, स्वतःच्या सोयीसाठी ते दुसऱ्यावर अवलंबून राहणे सोडत नाहीत. शास्त्री, पंडित सांगतात, की दान हे सत्पात्री असावे, तरच पुण्य लाभते अन्यथा पश्चाताप नशिबी येतो. म्हणूनच कुणाला सहाय्य करायचे असल्यास, जो स्वतःला गरजवंत म्हणवतो आहे त्यास नीट पारखावे. तो खरोखरीच परिस्थितीने गांजलेला आहे, का विनासायास सोयी, सुविधा मिळविण्याची इच्छा बाळगणारा आहे हे जरूर तपासावे.

(ऐकलेली) कथा :

एका गावात एक म्हातारी बाई राहत असे. नाव तिचे होते काशीबाई, परंतु सारेजण तिला माई म्हणत. गावात तिचे घर होते. चांगल्या प्रशस्त ओवऱ्या आणि पडव्या असलेले. पूर्वी कधी काळी ते चांगले नांदते जागते असे गोकूळ होते. परंतु मुले मोठी होऊन दूर शिक्षणासाठी गेली. कालांतराने तिथेच चांगल्या नोकऱ्या मिळून स्थायिक झाली. मुली विवाहापश्चात सासरी गेल्या. माईंचे यजमान देवाघरी गेले आणि माई एकट्याच राहिल्या.

मुले आग्रह करीत माई आमच्याकडे येऊन राहा म्हणून. पण माईंचा जीव गावातील घरात अडकलेला. थोडीफार शेती होती. ती खंडाने कसायला दिलेली. घराच्या अंगणात गाई म्हशींचा गोठा होता, कोंबड्यांचे खुराडे होते. तेच माईंचे सखे सोबती झाले होते. माईंनी परसदारी फुलझाडे लावली होती आणि घरासमोर तुळशी वृंदावन. या साऱ्यांची ठेवरेव करण्यात सारा दिवस निघून जायचा. तिन्हीसांजेला त्या गावात असलेल्या रामाच्या देवळात जात. देवासमोर थोडे तांदुळाचे दाणे, एखादी चवली किंवा अधेली ठेवून मनोभावे हात जोडीत. डोळे मिटून देवाला साकडे घालीत. मुलेबाळे, नातवंडे, लेकी, सुना यांच्यासाठी उदंड आयुष्याची कामना करीत. नंतर गाभाऱ्यासमोरच्या मंडपात, दगडी खांबाला टेकून जरा विसावा घेत असत. त्यांच्या सारख्याच, त्यांच्या वयाच्या चौघी पाच जणी देखिल तेथे असत. मग त्यांच्या गुजगोष्टी चालू होत. जरा इकडचे-तिकडचे बोले बोले पर्यंत अंधार दाटू लागे. मग सर्वजणी आपापल्या घराच्या दिशेने पांगत. कधी कुणी कथेकरी बुवा आलेले असत, कधी कीर्तनकार. त्यांच्याकडून पुराणातील, देव देवतांच्या कथा ऐकून मनाला शांतता लाभत असे. कधी बुवांच्या समवेत टाळ वाजवीत 'रामकृष्ण हरी .. ' चा जयघोष होई. असे माईंचे आयुष्य संथ, शांत आणि समाधानी होते.

एकदिवस त्या मंदिराकडे जाण्यासाठी निघणारच होत्या तर पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. मग माई घरीच थांबल्या. देवापुढे निरांजन लावून नामजप करीत होत्या. आता पावसाने चांगला जोर धरला होता. तितक्यात कुणीतरी आवाज दिला,
"आहे का कुणी घरात? "
माई सावध होऊन बाहेरची चाहूल घेऊ लागल्या. परत कुणीतरी मोठ्या आवाजात बोलले..
" कुणी आहे का इथे? मला रात्रीपुरता आसरा मिळेल का?"
आता माई लगबगीने उठल्या. पदर सावरीत एका हाती कंदील आणि दुसऱ्या हातात काठी घेऊन त्या दारापाशी आल्या.
"कोण ते? कोण हवंय तुम्हाला? "
त्यांनी कंदील जरा उंच धरला. पाहतात तर एक कृश व्यक्ती तुळशीवृंदावना जवळ उभी असलेली दिसली. माईंना पाहताच त्याने हात जोडले,
"पावसात अडकलो आहे माई. रात्रीपुरता आसरा मिळेल का?"
माईंनी त्यांना ओसरीवर यायची खूण केली. एक मध्यमवयीन ब्राम्हण गृहस्थ डोक्यावरील इरले हातात घेत पायऱ्या चढून वर आला.
"कोण तुम्ही? आणि असे अवेळी कसे आलात? " माईंनी विचारले. अजून त्या उंबरठ्याच्या आतच थांबलेल्या होत्या.
त्या गृहस्थाने परत हात जोडले.
"एक गरीब ब्राम्हण आहे मी माई. चार घरच्या पुजा, एकादष्ण्या, सत्यनारायण करून चरितार्थ चालवितो. पंचांगातून मुहूर्त काढून देताना कधी जन्मपत्रिकासुद्धा करतो. थोडेफार भविष्य जाणतो आणि ... "
भटजींची कथा काही थांबे ना. म्हणून त्यांना अडवीत माई बोलल्या,
"ते सगळे ठीक आहे हो. पण असे अवेळी तुम्ही इकडे कसे आलात? या गावचे तर दिसत नाहीत तुम्ही, कारण मी सर्वांना ओळखते. "
"नाही नाही, मी इथला नाही. डोंगरापल्याडच्या शिवपुरचा आहे मी. या गावच्या सावकाराच्या नातवाची पत्रिका करायची होती, म्हणून इथे आलो होतो. परतताना पाऊस लागला म्हणून थांबलो. रात्रीपुरती पाठ टेकायला जागा द्या. उद्या उजाडता निघून जाईन मी. मोठे उपकार होतील. " भटजी अजिजीने बोलला.
माई संभ्रमात पडल्या. पाऊस खरंच मुसळधार कोसळत होता. अशा वेळी अडलेल्या वाटसरूला आसरा नाकारणे त्यांना बरे वाटले नाही. मग त्या म्हणाल्या,
"बरं राहा इथे ओसरीवर. मी तुम्हाला गोधडी, घोंगडी देते. मात्र उद्या सूर्योदयाला तुम्ही तुमच्या वाटेला लागायचे. आहे कबूल? "
मान डोलावीत भटजी बोलला, " हो हो चालेल की. "

दूसऱ्यादिवशी माईना नेहमी प्रमाणे पहाटेच जाग आली. अंथरूण, पांघरूण आवरताना त्यांना त्या वाटसरूची आठवण आली. दारातून बाहेर डोकावून पाहिले तर तो गाढ झोपलेला.
"झोपू दे बिचारा, काल पावसात भिजला आहे. जाईल जरा वेळाने उठून", माईंनी विचार केला.
मग त्या त्यांच्या नित्यकर्मामध्ये मग्नं झाल्या. उन्हे वर येऊ लागली तशी त्यांनी चुलीमध्ये चार काटक्या सारून जाळ केला. तेव्हढ्यात कानावर हाक आली म्हणून वळून पाहिले तर तो कालचाच वाटसरू दारात उभा. माईंना वाटले निरोप घ्यायला आला असावा. म्हणून त्या म्हणाल्या ,
"जा बाबा तुझ्या घरी सुखाने." असे म्हणत त्या परत चुलीपाशी गुंतल्या.
"माई निघतोच आहे, पण लांबचा पल्ला आहे आणि रात्री उपास घडला आहे .. "
माई एकदम म्हणाल्या, "हे बघ मी म्हातारी बाई, मी काही तुझा पाहुणचार करणार नाही. मी तुला कालच सांगितले होते. दुसऱ्या घरी बघ काही मिळते का? माझ्यापाशी काही नाही. "
तो वाटसरू घाईने म्हणाला, " नाही तू नको काही देऊ. मी इथे खिचडी शिजवून खाईन मग जाईन. तेव्हढी परवानगी विचारायला आलो. "
"बर बर कर काय ते, आणि लवकर जा, " माई चांगल्याच वैतागल्या होत्या.
तसा माईंचा स्वभाव काही माणूसघाणा नव्हता. परंतु एकटी बाई राहणार तर तिच्या मुलांनी, लेकींनी बजावले होते, की कुणा अनोळख्याला घरात घेऊ नकोस म्हणून.
"माई खिचडी शिजवायला पातेले नाही माझ्याकडे, देतेस का एखादे? "
मग त्याने माईंकडून पातेले, डाव घेतला. तीन दगडांची चूल मांडली, त्यात पेटवण्यासाठी लाकडे माईंकडूनच मागून घेतली. पातेल्यामध्ये पाणी घालून सावकारीण बाईंनी दिलेल्या शिध्यातले डाळ तांदूळ त्यात घातले आणि चुलीपाशी बसून राहिला.
जरा वेळाने माई बाहेर डोकावल्या, तर वाटसरू तिथेच.
"अरे तुझी खिचडी शिजली नाही का अजून? " माईंनी विचारले.
"शिजतच आली आहे, पण त्यात जरा मीठ, मिरची आणि इवलासा मसाला असता तर बरे झाले असते. देतेस का थोडे? " वाटसरू उत्तरला.
माईने त्याला सर्व साहित्य दिले. खिचडीचा खमंग दरवळ पसरला होता. मग वाटसरूने माईकडे ताटली मागितली आणि म्हणाला,
"जरासे तूप पण दे की माई, कोरडी खिचडी घशाखाली उतरत नाही बघ. तुझ्या गोठ्यात चांगल्या दुभत्या गोमाता दिसतायत. तुझ्यापाशी उदंड असणार . " मग माईने त्याला चांगले कणीदार साजूक तूप दिले. इतके सारे होईपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता. ऊन तापू लागले होते. वाटसरूने खिचडी खाऊन पातेले, ताटली घासून पालथी घालून ठेवली आणि मग माईंना म्हणाला,
"अन्नं ग्रहणानंतर लगोलग घराबाहेर जाणे चांगले नाही. आणि ते सुद्धा अशा उन्हात. उन्हे उतरली की जाईन मी. आत्ता इथेच जरा विश्रांती घेतो."
असे म्हणत माईंनी दिलेली घोंगडी अंथरून तो झोपी गेलासुद्धा. माईंना कळेना काय करावे?

संध्याकाळी माई देवळामध्ये जाण्यासाठी निघाल्या. बघतात तर वाटसरूने चूल पेटवलेली. म्हणाला,
"तू ये जाऊन, मी आहे इथे. काही काळजी नको करूस. "
"अरे तू तुझ्या गावी कधी जाणार आहेस? " माईंनी हैराण होत विचारले.
"जाईन म्हणतो सावकाश. मला इथे दोन घरी पूजेला बोलावणे आहे तेव्हढे उरकतो. मग जाईन. "
"तुझ्या घरचे काळजी करतील ना? तू निघ आत्ताच. मी आमच्या दामू भटजींना देईन निरोप, ते करतील पुजा. " माई बोलल्या. हा भटजी काही सजासहजी घर सोडत नाही असे त्यांना वाटले.
"काही नको, माझ्या घरी कुणीच नाही. माझी पत्नी दोघा लेकरांना घेऊन तिसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. सध्या मी एकटाच आहे, तर जरा इथे चार पैशांची कमाई करतो, मग जाईन." असे बोलून तो चुलीतले जळते लाकूड सारखे करू लागला.
हताश होत माई देवळाकडे वळल्या. माईंचे चित्त आज बोलण्यात नाही हे त्यांच्या चाणाक्ष मैतरणींनी जाणले. पण असेल काही म्हणून त्या गप्प राहिल्या.

वाटसरूने आता ओसरीत मुक्कामच ठोकला होता. माईंकडून सारे सामानसुमान मागून घेतले आणि तेथे आरामात राहू लागला. हळू हळू त्याचा वावर ओसरीतून माजघरापर्यंत आला. अंगणातील फुलझाडे काढून त्याने कसल्या औषधी वनस्पती पेरल्या. दिवसभर त्याच्याकडे कुणी ना कुणी येत असे. कुणी मुहूर्त काढायला, तर कुणी पत्रिका करायला. कुणी सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण देई तर कुणाकडे वास्तुशांती करायला भटजी यायला हवे असत. भटजींचा चांगला जम बसू लागला. दिवस, आठवडे आणि महिने संपले, पण भटजी जाण्याचे नाव घेईनात. माईंच्या घरातली आणि आयुष्यातली शांती हरवली. कुणाला सांगायला जावे तर तो म्हणे , "ओसरीवरच तर राहतोय ना? राहू दे की. नाहीतरी एव्हढ्या मोठ्या घरात एकटीच राहतेस ना? तसा माणूस गरीब असला तरी भला आहे. गरिबाला मदत करणे पुण्याचे काम आहे."

माई अगदी निराश झाल्या होत्या. नेहमीच्या शांत, समाधानी चेहऱ्यावर आठ्यांचे जाळे दिसू लागले होते. पण माई तशा मोठ्या धीराच्या, अशी हार मानणार नव्हत्या. एक दिवस भटजींना म्हणाल्या,
"अरे भटा आज जरा मदत कर बाबा मला. आपला हरबा गेलाय गावाला आणि माझ्या जीवाला आज बरे वाटत नाही, जरा गोठ्याचे काम बघ बाळा. "
भटजींचा नाईलाज झाला. गोठ्यातले काम आटपून दुधाची कासंडी घेऊन तो आला. माई कण्हत कण्हत म्हणाल्या,
"कसा देवासारखा आलास पोरा, नाही तर मी एकटीने काय केले असते? जा आता ते दूध मी सांगते त्या घरी नेऊन दे "
भटजी दुधाची कासंडी घेऊन निघाले. गावभर फिरून माईने सांगितलेल्या घरांमध्ये दूध देऊन आले. इतक्या श्रमाची त्यांना अजिबातच सवय नव्हती. घरी आले तर माई पांघरूण घेऊन बसलेली.
"जरा थंडीताप भरलाय बघ. मी वैद्यबुवांचा काढा घेतलाय. तू थोडी खिचडी दे करून मला, तुझ्यासाठी करशील ना?"
भटजी काही न बोलता चूल पेटविण्याच्या उद्योगाला लागले. मनातल्या मनात नुसती चरफड चालली होती.
"जरा सुखाने राहीन म्हणालो तर म्हातारी आजारी झाली. आता करा तिची सेवा. "
सारे काम आटपून भटजी ओसरीवर आले. शेजारचा खंडोजी आला होता. त्याचे शेत चांगले पिकले होते, जरा बरा दिवस बघून कापणीला सुरवात करायची होती त्याला. म्हणाला,
"भटजी बुवा चांगला दिस पाहून सांगा की.. "
परंतु भटजीबुवांचे चित्त काही थाऱ्यावर नव्हते. दिवसभराच्या श्रमांनी ते अगदी थकून गेले होते. खांद्यावरच्या पंचाने वारा घेत ते म्हणाले,
"उद्या सांगतो. आज नाही जमायचे."
खंडोजी बिचारा जागेवरून उठला, आणि हात जोडून निघून गेला.
आता भटजींच्या हातात पचांगा ऐवजी दुधाची कासंडी दिसू लागली. गोठ्यातले काम, आणि कोंबड्यांच्या खुराड्याची देखरेख यात त्यांचा दिवस संपून जाऊ लागला. झाडांना पाणी देणे अंगण झाडून ते सारवणे इत्यादी कामांनी त्यांचा जीव नुसता उबून गेला होता.
"या हरबाला काय अगदी महत्त्वाचे काम होते म्हणून गावी गेला नेमका?"
चुलीसाठी कोठीच्या खोलीत साठवलेली लाकडे फोडताना ते कारवदले. आयुष्यात कधी इतकी अंगमेहनतीची कामे त्यांनी केलेली नव्हती. आता पूजेचे मंत्र ते पार विसरले होते. ओसरीच्या कोपऱ्यात चौरंगावर ठेवलेल्या पोथी आणि पंचांगावर धुळीची पुटे चढली होती. माई मात्र मजेत होत्या. दिवसभर छानशी शाल घेऊन त्या बसून राहत. कधी विणकाम तर कधी भरतकाम करीत असत. गावातील आयाबाया त्यांची विचारपूस करायला येत. मग त्यांच्यासमवेत गप्पागोष्टी करताना वेळ निघून जाई. भटजीबुवा समोर दिसले की त्या न चुकता कण्हत, कधी त्यांना खोकल्याची उबळ येई, तर कधी कपाळावर आल्याचा रस चोळीत मोठ्या कष्टाने रामनामाचा जप करीत राहत. आठवडा सरला, पण माईंचे दुखणे बरे व्हायची चिन्हे नव्हती आणि हरबा पण येत नव्हता.

त्यातच एक दिवस माईंनी भटजींना हाक दिली म्हणाल्या,
"अरे भटा किती मदत केलीस रे तू मला? मी एकटी आजारी बाई. कसं सांभाळले असते रे सारे? तू आहेस म्हणून आधार वाटतो बघ. आज जरा शेताकडे जा. आपला नामू आहे ना, त्याचा मुरगळलाय पाय. जरा तिथल्या कामाचे बघ. तसे मजूर आणि गडीमाणसे आहेतच , पण त्यांच्यावर जर लक्ष ठेवायला पाहिजे. तुझ्या गावी तुझीपण जमीन असेल ना थोडीफार? "
भटजींचा चेहरा आक्रसला होता. घरातली कामे करता करता अंग मोडून आले होते, आणि आता शेतावर जायचे. ते तातडीने म्हणाले,
"तशी लहानशी जमीन आहे सामाइकीतली, पण त्याचे सगळे आमचे अण्णा, माझे मोठे बंधूच बघतात. माई गं मला झेपेनात ही कामे. दुसऱ्या कुणाला सांग की." भटजी कळवळून म्हणाले.
"मी बरी असते तर मीच गेले असते, आता दुसऱ्या कुणाला सांगू? माझी मुले तिकडे दूर, मोठ्या शहरात असतात. त्यांना धाडलाय निरोप, पण तोवर .. "
माईचे बोलणे ऐकताना भटजी दचकले. " तुझी मुले येणार इथे? केव्हा? आणि बोलली नाहीस कधी ते? "
"अरे विषयच निघाला नाही ना. ती पार्वती माहिती आहे ना तुला? चार घरं पल्याड राहते बघ.. ती आणि तिचे यजमान जायचे होते तिकडे. मग त्यांच्यासोबतच निरोप दिला होता. येतील आज उद्या सगळी. " माईंनी माहिती दिली.
भटजींचा चेहरा कसानुसा झाला होता. माई तोंडावर पदर घेऊन आलेले हसू दडवित होत्या.

भटजींवर तर आता आभाळच कोसळले होते. आज काही अन्नं शिजवण्याचे देखिल जमेना. नशिबाने शेजारच्या अन्नपूर्णा काकू आल्या धिरड्यांचा डबा घेऊन. घरात लोणचे होतेच, त्यावर काम भागले. त्यानंतर मात्र भटजींनी घाईने स्वतःचे आवरले. पंचांग, पोथी झोळीत टाकले. माई डोळे मिटून चाहूल घेत होत्या, पण काही बोलल्या नाहीत.
त्यांचा डोळा लागला आहे असे समजून भटजी घराबाहेर आले. आणि शेताकडे न जाता , सरळ डोंगर बाजूचा रस्ता धरला. पलीकडे त्यांचे गाव होते ना.. मनात म्हणत होते,
"थोडक्यात वाचलो. आता म्हातारीची पोरे बाळे येणार, म्हणजे माझी अवस्था घरगड्यासारखीच होणार. नकोच ते. चार घास कमी खाईन, पण स्वतःच्याच घरीच राहीन."

संध्याकाळी नेहमीप्रमाणे माई रामाच्या देवळात आल्या. त्यांनी मनोभावे देवाला नमस्कार केला, आणि त्यांच्या नेहमीच्या खांबाजवळ येऊन बसल्या. त्यांच्या मैतरणी तिथे जमलेल्या होत्याच. मग पार्वती काकूंनी विचारले, "भटजी निघाले की नाही तुझ्या घरातून काशी? सारे घरच काबीज केले की त्याने तुझे.
"माई हसत म्हणाल्या, " गेले बाई एकदाचे, पण मला चांगला धडा शिकवून गेले. "
सगळ्याजणी तोंडावर पदर घेत खुसुखुसू हसू लागल्या.

उपकथा :

"अरे या अंपायरला काय झालंय? क्लीन आऊट आहे रे हा. देत का नाही आऊट."
सुहास चा आवाज चांगलाच तापला होता. भारत पाकिस्तान मॅच बघताना घरातले वातावरण देखिल तंग झाले होते.
"ओ बाबा जरा थांबा ना. कॉमेंट्री ऐकू द्या ना. आई बघ गं. " चिन्मय म्हणाला.
घरातील इन मीन चार सदस्य त्या लहानशा दिवाणखान्यात जमलेले होते. आता शेवटच्या काही ओव्हर्स बाकी होत्या. सगळ्यांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. तितक्यात दारावरची बेल वाजली. ती आपल्या नाही तर शेजारच्यांची असेल कदाचित असे मनोमनी वाटून घेऊन सर्वांनीच तिकडे दुर्लक्ष केले. पण परत वाजलीच ती. आता एकदा वाजून न थांबता सतत वाजतच राहिली. मग नाईलाजाने सुलभा उठली.

दार उघडताच दारातील व्यक्ती कुणी या म्हणण्याची वाट न बघता घरात प्रविष्ट झाली. सोबत एक किशोरवयीन मुलगा होता.
"काय रे तुमचं पुणं? त्या रिक्षावाल्याने किती फिरवलं मला. तुझ्यापाशी सुट्टे पैसे आहेत का? दोनशेची नोट दिली तर मोड नाहीये म्हणाला.
"किती द्यायचेत?" सुलभाने विचारले.
"एकशे पस्तीस." आलेल्या पाहुण्याने सांगितले. सुलभाने आतल्या खोलीतून पैसे आणून दिले.
"जारे चंदू देऊन ये त्या रिक्षाचे भाडे". पाहुण्याने त्याच्या मुलाला सांगितले.
असा अचानक कसा आलास शशी? पत्रं नाही, फोन नाही." सुहासने विचारले.
"तुझ्या कडे यायचे तर वर्दी द्यायला हवी? चंदुची आई म्हणत होती, फोन करा म्हणून. मी म्हणालो, कशाला? काही गरज नाही. भाऊ आहे माझा, मी त्याच्याकडे हक्काने जाऊ शकतो कधीही. बरोबर आहे की नाही?" शशांकने विचारले.
"हो हो म्हणजे काय? आहेच की.. " काय बोलावे सुहासला सुधरेना. डोळ्याच्या कोपऱ्यातून तो सुलभाच्या कपाळावरच्या आठ्या मोजण्याचा प्रयत्न करीत होता.
"अरे तसे नाही रे, पण आज रविवारचा दिवस, आम्ही बरेचदा घरी नसतो. आज मॅच होती म्हणून सगळे घरी आहेत, नाहीतर तुला कुलूपच बघायला लागले असते. बरं ते असू दे कसं काय येणं केलेस? " सुहासने विचारले.
शशांक हा सुहासचा मामेभाऊ. वयाने तसा बरोबरीचाच. रत्नागिरीला त्याचे घरदार, वाडी, आंब्याची बाग असे बरेच काही होते. कुठल्याशा शाळेच्या कार्यालयात कारकुनाची नोकरी पण करीत असे. शाळकरी वयात कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत एकमेकांकडे जाणे येणे असे. परंतु जसा शिक्षण, नोकरी त्यानंतर विवाह, संसार असा व्याप वाढला, तसे जाणेयेणे कमी झाले. शशांक अधूनमधून पुण्याला यायचा तेव्हढाच संपर्क राहिला होता.
"भावजी आधी चहा करू की अंघोळ करून घेताय आधी? " सुलभाने विचारले.
"आधी चहा घेईन. तो हॉटेलातला चहा नाही आवडत आपल्याला. नुसतं मचूळ पाणी. त्यात ना दूध ना साखर. चहाच कर"
शशांकने सविस्तर उत्तर दिले. सुलभा स्वैपाक घरात गेली. मिनी तिच्या पाठोपाठ आत गेली. मॅच चालू होती, पण तिकडे आता कुणाचे लक्षच नव्हते.

जेवणे उरकल्यावर, सगळी आवराआवर करून सुलभा खोलीत आली. आज रविवार असूनही तिची स्वैपाकातून सुटका झालेली नव्हती. घरी पाहुणे असल्याने सारे काही साग्रसंगीत करावे लागले. त्यात हा पाहुणा, सासूबाईंच्या माहेरचा.
"असे अचानक कसे आले शशीभावजी? परत कोर्टाची तारीख आहे का इतक्यात? " सुलभाने विचारले.
सुहास काहीच बोलला नाही. हातातल्या मासिकाकडे बघत राहिला. कसे आणि काय सांगावे याची जुळवाजुळव करीत होता. सुलभाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. मग जरा मोठ्या आवाजात म्हणाली,
"सुहास मी काय विचारतीय? कसला विचार करतो आहेस एव्हढा? "
आता त्याचा नाईलाज झाला. बोलणे भागच होते.
"अगं तो चंदन आहे ना, तो या वर्षी १२वीला होता. त्याला पुण्याच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या साठी आलेत दोघे." सुहासने बातमी दिली. तरी सुलभाला त्यातले गांभीर्य लक्षात आले नव्हते.
"अगं बाई! चंदू बारावी पास झाला? किती भराभर मुले मोठी होतात नाही? आपल्या चिनुपेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा आहे ना तो. बरोबर, चिनू पुढच्या वर्षी दहावीत."
सुलभाचे बोलणे काही थांबेना. आता तिला महत्त्वाची माहिती कशी द्यावी? हे कोडे सोडविण्यात सुहास मग्नं होता.
"आता जरा ऐकतेस का माझे? का बोलतच राहणार आहेस?" सुहास वैतागून बोलला.
सुलभाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. सुहास असं का बोलतोय तिला कळेना.
"हे बघ चंदन ला प्रवेश मिळाला की तो आपल्याच घरी राहणार असे शशी म्हणत होता." सुहास म्हणाला, आणि सुलभाची काय प्रतिक्रिया होते आहे ते बघत होता. सुलभा काही काळ काहीच बोलली नाही. मग जरा वेळाने म्हणाली,
"तू काय सांगितलेस त्यांना? "
"अगं मी काय म्हणणार? आता कुणी तुमच्या कडे राहतो म्हणाला तर त्याला नाही तर म्हणता येत नाही." सुहासने त्याची अडचण सांगितली.
सुलभा तशी समजूतदार होती. तिला पण हे समजत होते की नातेसंबंध फार नाजूक असतात. आणि ते टिकवायचे असले तर मनात आहे तसच वागता, बोलता येत नाही. पण ही तर मोठीच समस्या उद्भवली होती. त्यांचे घर काही फार मोठे नव्हते. मुले मोठी होत होती. त्यांचे खर्च वाढत होते. दोघांच्या पगारात तसे व्यवस्थित भागत होते, पण अजून जबाबदारी घ्यायची म्हणजे त्यांच्या हिशेबाचे सारेच गणित बिघडणार होते.
"मी तसा त्याला म्हणालो की घर लहान आहे, तुझी नोकरी आहे वगैरे. पण तो म्हणतो, चंदू कधी घरापासून दूर नाही राहिला, तर निदान त्याला सवय होईपर्यंत तरी आपल्या घरी राहू देत. मग मी काय बोलणार? "
सुलभाने दिवा बंद केला. रात्रीचे प्रहर उलटत होते, अंधार गडद होत होता, परंतु दोघांच्याही डोळ्याला डोळा काही लागेना.

दुसरा दिवस उजाडला. नेहमीची लगबग सुरू झाली. चंदन आणि शशांकला दोन कॉलेजेस मध्ये प्रवेश अर्ज द्यायला जायचे होते. त्यांच्या सोबत जायचे म्हणून सुहासने रजा घेतली होती. ऑफिसामध्ये सुलभाच्या मनात तेच विचार होते. एकदम तिला आठवले, या सर्व गडबडीत चंदनला किती गुण मिळाले आहेत? कुठला अभ्यासक्रम घ्यायचा आहे? यावर काही बोलणेच झाले नव्हते.
संध्याकाळी घरी आल्यावर, सुलभा परत स्वैपाकात गुंतली. तिला या दिनक्रमाची अनेक वर्षांपासून सवय होती. पण तरीही आज ते सारे नकोसे वाटत होते. रात्री जेवताना तिने विचारलेच,
"चंदन तुला किती मार्क्स मिळाले रे ? आणि कुठल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचाय तुला? "
चंदन काही बोलायच्या आत शशांकच बोलला, " फर्स्ट क्लास आहे त्याला."
"हो का? अरे वा!" सुलभा कौतुकाने म्हणाली.
" किती टक्के?" तिने विचारले.
"६२" आता चंदन बोलला.
सुलभाने एकदम सुहास कडे पाहिले. सुहास गप्प राहून ताटाकडे बघत होता.
"अरे मग कुठल्या कॉलेजमधे.. ? " काय बोलावे ते न सुचून ती गप्प राहिली.
मग शशांक बोलला, " त्याला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचाय. पुढे बॅकेच्या परीक्षा देईल, किंवा सी. ए., आय. सी. डब्ल्यू. ए.. एम बी ए असे काही करू शकेल."
"हो हो बरोबर आहे. त्या शाखेत भरपूर संधी आहेत. पण मला वाटले होते की .. " सुलभाने बोलणे अर्धवटच सोडले.

चंदुला एका चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. शशांक रत्नागिरीला परतला. चिन्मयला आता त्याच्या खोलीत चंदनला सामावून घ्यावे लागले होते. त्याची जरा चिडचिड होई. चंदनने त्याच्या कॉम्प्युटरवर कब्जा केला होता. त्याच्या स्टडी टेबलवर चंदनचा पसारा आला होता. बरेचदा त्याचा टॉवेल सुद्धा चंदू वापरत असे. लोकांच्या वस्तू वापरू नयेत असे सांगूनही त्याच्या सवयीमध्ये काही बदल नव्हता. मग सुहासने त्याला नवीन टॉवेल आणून दिला. एकंदरीत चंदन चे तिथे येणे चिन्मयला आवडले नव्हते. एक दिवस टी. व्ही समोर बसून सुलभा भाजी निवडत होती चिन्मय तिथे आला.
"आई त्या चंदनला सांग ना. तो मोठ्या आवाजात गाणी लावून कॉम्प्युटरवर गेम खेळतोय. माझी युनिट टेस्ट आहे ना उद्या. मला कॉम्प्युटर हवा आहे, तर थोड्या वेळाने देईन म्हणतोय. मग मी नापास झालो तर तू मला काही बोलायचे नाहीस." तो तणतणत तिथेच बसून राहिला.
मग हे नेहमीचे झाले. चंदन कधी त्याचे पेन घेई तर कधी स्वेटर. कधी त्याच्या कपाटातल्या वस्तूंची उचकापाचक केलेली असे. पहिल्या युनिट टेस्ट मध्ये चिन्मयला खूपच कमी गुण मिळाले. नेहमी वर्गात पहिल्या पाचात येणाऱ्या मुलाला जेमतेम उत्तीर्ण होण्यापुरतेच गुण मिळाले होते. त्याच्या वर्गशिक्षिका बाईंनी सुलभाला शाळेत बोलावून घेतले. त्या म्हणाल्या अभ्यासात असे मागे राहून चालणार नाही. पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा आहे त्याची. आतापासूनच अभ्यासाचा पाया पक्का करायला हवा. शाळेला त्याच्याकडून चांगल्या गुणांची अपेक्षा आहे. आणि असेच बरेच काही. सुलभाला काय बोलावे सुचत नव्हते. तिने त्यांचे सारे काही ऐकून घेतले. मी त्याच्याशी याबद्दल बोलेन, इतकेच ती बाईंना सांगू शकली.

दिवाळीचे दिवस जवळ येत चालले होते. तिने सहजच बोलता बोलता चंदनला विचारले,
"काय रे चंदन, दिवाळीला घरी जाणार असशील ना? तुझ्या आई, बाबांना खूप बरे वाटेल बघ."
टी. व्ही वरची नजर न वळवता चंदन उत्तरला,
"नाही काकू, तेच तिघे जण इकडे येणार आहेत पुण्याला."
"काय? कधी? आणि मला बोलला नाहीस आधी तू?" सुलभा आश्चर्यचकित होत म्हणाली.
"सॉरी काकू, विसरलो." थंडपणे चंदन बोलला.
एके दिवशी शशांक त्याची पत्नी सुमती आणि मुलगी चित्रासह पुणे मुक्कामी पोहोचले. ते लहानसे घर गजबजून गेले होते. सुलभाने फराळाचे काही पदार्थ घरी केले तर काही विकत आणले होते. पण ते पुरवठी पडतील असे काही वाटे ना.
घरी पाहुणे असल्याने, सुहास आणि सुलभाला घरातून बाहेर जाणे मुष्कील झाले होते. त्यामुळे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना मोबाईल संदेशाद्वारेच शुभेच्छा देणे भाग होते. शाळेला सुट्टी असल्याने चिन्मय आणि मानसी मात्र मजेत होते. पाहुण्यांचा जायचा दिवस जवळ आला तसे सुलभाला हायसे वाटू लागले. तिची दिवाळीची रजा पाहुण्यांच्या सरबराईतच संपली होती. सगळेजण दिवाणखान्यात जमले होते. इकडचे तिकडचे बोलणे चालू होते. अचानक सुमती म्हणाली,
"सुलभा तू माझ्या लेकाला चांगली सांभाळते आहेस, आता या चित्राला काही शिकव बाई. आता तिच्या लग्नाचे बघायची वेळ झाली. गेल्याच महिन्यात विसावे सरुन एकविसावे लागले बघ. लग्नाची पोर म्हणजे जीवाला घोर. लोकं पण विचारायला लागली आताशा "
सुलभा म्हणाली, "वाहिनी अजून शिक्षण पूर्ण हो द्या तिचे. मग बघा. इतक्यात काय घाई आहे? "
"अगं कसले शिक्षण? मॅट्रिक नंतर घरीच तर आहे. तसे शिवण, टिपण स्वैपाक वगैरे चांगले करते. पण हल्लीच्या मुलांना आधुनिक पद्धतीने राहणाऱ्या मुली हव्या असतात. जुन्या वळणाच्या काकूबाई त्यांना पसंत पडत नाहीत. माझा विचार आहे, तिला काही दिवस इथे राहू दे. तुझ्याकडून थोडे काही शिकेल ती."
सुहास आणि सुलभा अवाक होऊन ऐकत होते. आता मात्र सुलभाने धीर गोळा केला. वाईटपणा येणारच होता, पण बोलणे जरूरी होते.
"वहिनी मी तुम्हाला विचारणारच होते. भावजी म्हणाले होते, चंदुला थोड्या दिवसासाठी इथे राहू दे, मग हॉस्टेलचे बघणार म्हणून? आमचा चिनू नववीला आहे. पुढच्या वर्षी बोर्ड. आणि मिनी पण त्याच्या पाठीमागून येतेच आहे. तुम्ही आमचे घर पाहताच आहात. हॉस्टेल ला राहिला तर चंदुला सुद्धा अभ्यासाला सोयीच होईल. आणि तो हॉस्टेलमध्ये राहिला, तरी काही अडले पडले तर आम्ही आहोतच की इथे."
त्या लहानशा घरात शांतता पसरली होती. सुहासला पण असेच काही बोलायचे होते, परंतु संकोचाने तो बोलला नव्हता. सुलभाने विषय काढताच त्याला हायसे वाटले. मग तो पण म्हणाला,
"शशी सुलभा म्हणते ते बरोबर आहे. गैरसमज नको करून घेऊस."
सगळेजण शशांक कडे बघत होते. आता तो काय म्हणणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. शशांक म्हणाला,
"काही हरकत नाही सुहास, सुलभा, मी समजू शकतो तुमची अडचण. तुमची गैरसोय होते आहे ते कळते आहे मला. पण अजून काही दिवस लागतील ना. तो पर्यंत ही चित्रा राहील इथे. सुलभाला पण मदत होईल ."
सुहासने सुलभा कडे पाहिले, तिने मान डोलावली. अजून काय करू शकणार होती ती?

आता चंदुच्या जोडीला त्याची मोठी बहीण चित्रादेखिल तिथे राहू लागली होती. चिन्मय बऱ्याच वेळा अभ्यासासाठी त्याच्या मित्राकडे जाऊ लागला होता. सुलभाने स्वतःला समजावले,
"अजून थोडे दिवस फक्त... मग सारे काही परत रूळावर येईल. "
पण अनेक दिवस उलटले तरी काहीच घडेना. इकडे चंदन आणि चित्रा घरात चांगलेच रूळले होते. सुरवातीचा संकोच कधीच नाहीसा झालेला होता. चंदू चिन्मयाचा कॉम्प्युटर, त्याचा ब्ल्यू टूथ इत्यादी हक्काने वापरू लागला होता. बऱ्याचवेळा त्याच्या बॅडमिंटनच्या रॅकेटस तो घेऊन जाई, कधी क्रिकेटची बॅट. चिन्मयची समजूत काढताना सुहास आणि सुलभाची नाकीनऊ येई.
इकडे चित्राची निराळीच तऱ्हा. दिवसभर ती घरीच असे. तशी नावाला टायपिंगचा क्लास लावला होता तेव्हढाच. एकदिवस संध्याकाळी स्वैपाकाला सुरूवात करायची म्हणून सुलभाने तिचा नेहमीचा एप्रन हातात घेतला, तर काही वेगळाच वाटला. तिने तो परत नीट पाहिला तर लहान वाटला. तितक्यात चित्रा तिथे आली आणि म्हणाली,
"काकू एप्रन कसा दिसतोय. मी त्याला नवीन स्वरूप दिलंय. तुझा जुनाच एप्रन परत शिवला. तुझं शिवणाचं मशीन मस्त आहे हं."
सुलभा ऐकतच राहिली.
"अगं पण असं का केलस तू ? आणि आधी मला विचारले पण नाहीस? माझा नेहमीचा वापरातला होता तो. आता हा एव्हढासा मी कसा वापरू? आणि त्याला अशी फ्रील कशाला लावलीस ती?" सुलभा चांगलीच चिडली होती.
"आणि हा माझा गाऊन आहे ना? " तिने चित्राकडे बोट दाखवीत विचारले.
"हो काकू, मला आवडला खूप" चित्रा अगदी भोळेपणाने म्हणाली.
"हे बघ चित्रा, दुसऱ्यांच्या वस्तू अशा न विचारता परस्पर घेऊ नयेत बाळा. तुझ्या सासरचे काय म्हणतील मग? म्हणतील आई-वडिलांनी नीट वळण नाही लावले. हो की नाही? आणि माझा गाऊन तुला मोठा होत नाहीये? " सुलभाने शांत राहण्याचा प्रयत्न करीत विचारले.
"हो ना बराच मोठा होत होता, मग मी तो जरा आल्टर करून माझ्या मापाचा करून घेतला? आता बरोबर होतोय" चित्राने उत्तर दिले.
सुलभाला आता हे सारे सहन होईना. तिचा राग आता समोरच्या भांड्यावर निघाला. संतापाने डोळ्यात पाणी येत होते. पण शांत रहायला हवे होते.

त्या दिवशी सकाळची वेळ होती. सुलभा घाईने स्वतःचे आवरत होती. कपाटातली हॅगरवर लावलेली साडी तिने काढली. आज तिच्या कार्यालयात वर्षाअखेरी निमित्त काही समारंभ आयोजित केलेले होते. साऱ्याजणींनी एकसारख्या साड्यांची खरेदी केलेली होती. म्हणजे रंग वेगवेगळे पण प्रकार एक. नाजूक किनारी असलेली ती साडी होती. पदरावर देखिल थोडेसे नक्षीकाम होते. सुलभाने साडी उलगडली आणि तिला धक्काच बसला. पूर्ण साडीवर कुयऱ्यांची नक्षी असलेले भरतकाम केलेले होते. आता मात्र तिचा संयम संपला होता.
"चित्रा .. " तिने मोठ्याने हाक दिली.
चित्रा दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसलेली होती.
सुलभा रागारागात तिथे आली. चित्रा समोर हातातली साडी धरत तिने संतापाने विचारले, "हे काय आहे चित्रा, तूच केलयस ना हे?"
चित्रा शांतच होती, ती म्हणाली, "हो काकू. माझ्या टायपिंगच्या क्लासला ती श्रद्धा येते ना, तिने ही नक्षी साडीवर ट्रेस करून दिली. भरतकामासाठी तिच्याकडे खूप सुंदर सुंदर डिझाइन्स आहेत. मी तिच्याबरोबरच तुळशीबागेत गेले होते. तिथून रेशीम आणली म्हणलं तुला चकीत करावे. सुंदर दिसतीय की नाही ही साडी आता?"
"पण तू मला विचारलं सुद्धा नाहीस? दुसऱ्यांच्या वस्तू घेताना, वापरताना, त्यात काही बदल करताना, ज्याची वस्तू आहे त्याची परवानगी घ्यायला हवी ही साधी गोष्ट तुला माहिती नाही का?" सुलभाने रागारागाने तिला विचारले.
सुलभाला शांत राहणे शक्य होत नव्हते, पण मग उशीर झाला असता. तिने ती साडी कपाटात ठेवून दुसरी साडी नेसली. तिचा पूर्ण विरसच झाला होता. समारंभाच्या ठिकाणी तिचीच एकटीची साडी वेगळी दिसत होती. वेगळी साडी नेसण्याचे कारण विचारणाऱ्या प्रत्येकीला उत्तर देताना सुलभाचा संताप कणाकणाने वाढत होता. समारंभ संपल्यानंतर सर्वजण आपापल्या दिशेने निघून गेले. सुलभा आणि अंजली पार्किंगच्या दिशेने निघाल्या. दोघीजणी अगदी जिवलग मैत्रिणी होत्या. साधारण एकाच वेळेस त्यांची या कार्यालयातील नोकरीची सुरूवात झालेली होती. कार्यालयातील कामाबरोबरच घरगुती अडीअडचणीत देखिल त्या एकमेकींना मदतीस येत असत. अंजलीच्या लक्षात आले की सुलभाचे चित्त थाऱ्यावर नाही. काहीतरी बिनसलेले आहे नक्की. पार्किंगमधली स्कूटर काढताना तिने विचारले, "काय झाले गं सुलभा, काही अडचण आहे का? सुहास भावजींबरोबर भांडलीस की काय? अगं... " आणि ती बोलायची थांबली. सुलभा डोळ्याला रूमाल लावून रडत होती.
"सुलभा अगं काय झालय? मला सांगणार नाहीस का? " अंजलीने विचारले.
सुलभा काही वेळ न बोलता नुसती डोळे पुसत होती. मग जरा वेळाने म्हणाली,
"आता नको, उद्या सविस्तर सांगते. "

आज घरी यायला तिला जरा उशिरच झालेला होता. बघते तर चंदन दिवाणखान्यात फोनवर बोलत होता. चित्रा सोफ्यावर ऐसपैस बसून टी व्ही बघत होती. त्या दृश्याचा सुलभाला उबगच आला. तिचे घर आता तिचे राहिलेच नव्हते.
आज कोणती भाजी करावी असा विचार करीत ती स्वंयपाकघरात आली. ओट्यावर पसारा दिसत होता. बेसिनमध्ये चहा कॉफीचे कप, भांडी, गाळणी पडलेले दिसत होते. पण आता तिने शांत राहायचे ठरवले होते. चिडून काहीच फायदा नव्हता, फक्त घरातले वातावरण बिघडत होते. तिने चित्राला हाक दिली.
"चित्रा, हा ओट्यावरचा पसारा आवरून घे जरा आणि बेसिनमधली कप बश्या वगैरे स्वच्छ करून घे, मला स्वयंपाक करायचा आहे आता."
"काकू मी ती मालिका बघतीय गं, "अतिथी तुम कब जाओगे?" विनोदी आहे, तुला पण आवडेल बघ." चित्रा म्हणाली.
सुलभाच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले, "हं बघीन मी वेळ मिळाला की, पण आता नको. तू पण जरा मदत करा मला " सुलभाने सांगितले.
चित्रा जरा नाराज झाली होती, पण काही बोलली नाही.
रात्री सुलभा सुहासला म्हणाली,
"सुहास आता हे सगळे थांबवायला हवे. आपण वाईटपणा नको म्हणून संकोचाने काही बोलत नाही, याचा गैरफायदा घेतला जातोय. थोडे दिवस इथे राहणार म्हणताना आता वर्ष होत आले. हॉस्टेलचे काही ते बघताना दिसत नाहीत आणि चित्राला देखील इथे पाठवले आहे. बरं ती मुले नीट राहिली असती तरी आपण काही म्हणाले नसते, पण सर्व घरभर ती दोघे हक्काने वावरत असतात, आणि आपली मुले बिचारी कानकोंडी होऊन बसली आहेत. चिन्मय अभ्यासासाठी रोहन च्या घरी जातो आजकाल. मिनी पण काल चिडली होती. तिचे नवीन रुमाल म्हणे चित्राने घेतले वापरायला. आता हे जरा जास्त होतंय. चिन्मयच्या वर्गशिक्षिका बाईंनी सांगितले की त्याचे परीक्षेतील गुण बरेच कमी झाले आहेत. " सुलभा न थांबता बोलत होती आणि सुहास ते सारे ऐकून घेत होता. त्याला पण या साऱ्या घडामोडी दिसत होत्याच. कालच त्याचे नवीन बूट चंदन च्या पायात त्याने पाहिले होते. त्याला पण हे सारे सहन होत नव्हतेच.
"पण मग आता काय करूयात आपण?" सुहासने हताशपणे विचारले.
"दिवाळीच्या वेळी आपण स्पष्ट सांगितले, तरी काही उपयोग झाला नाहीच."
"तू असं कर, शशी भावजींना पुण्याला बोलावून घे, आणि आईंना पण काही दिवस इकडे यायला सांग." सुलभाने सांगितले.
"आईला कशाला? ती काय सांगणार त्या शशांकला? " सुहासने विचारले.
"अरे त्यांच्या समक्षच सारे झाले की नंतर कुरबूर नाही होणार. आपली अडचण त्या समजून घेतील. वडीलकीच्या नात्याने त्यांनी सांगितले की भाऊजींना तक्रार करायला जागा राहणार नाही."
सुलभाचे बोलणे ऐकून हसतच सुहास म्हणाला, "म्हणजे काय करायचे आहे ते तू आधीच ठरवले आहेस."
मनातले सारे बोलल्यामुळे सुलभाच्या मनावरचा ताण जरा निवळला होता. त्यात सुहासने तिला विरोध न करता सहमती दर्शवली होती त्यामुळे तिला अजूनच बरे वाटतं होते. ती म्हणाली,
"दुसऱ्यांना मदत करावी, अडचणीच्या काळात त्यांना उपयोगी होईल अशी वागणूक असावी हे मलाही मान्य आहे रे. पण त्यालाही काही मर्यादा आहेतच ना? आपला संसार आहे, मुले आहेत, त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्याला शक्य होते ते सारे केलेच की, पण त्यांच्या अपेक्षा संपतच नाहीयेत. हे लोकं आपल्या न बोलण्याचा गैरफायदा घ्यायला लागले आहेत. मला आपल्या मुलांचे हित बघणे देखील महत्वाचे वाटते आहे, त्याकरिता थोडा वाईटपणा आला तरी तो स्वीकारायची माझी तयारी आहे" सुलभा निश्चयाने म्हणाली.

सुलभाने आज नवीन साडी नेसली होती. कोपऱ्यावरच्या फुलवालीकडून तिने छानसा गजरा विकत घेतला होता. ऑफिसमध्ये आली तेव्हा अंजली तिला म्हणाली सुद्धा, "घरातले सारे काही रुळावर आलेले दिसते आहे. बरोबर ना?"
"हो गं त्या दिवशी तू मला सांगितले तसेच केले मी. सुहासला तर ते मान्यं होतेच, पण सासूबाईंना पण पटले हे विशेष. त्या आल्या होत्या पुण्याला, महिनाभर राहिल्या. स्वतः:च सारे काही पाहिले आणि अनुभवले. मग त्यांनीच भावजी आणि सुमती वहिनींना समजावले. आता आत्यानेच सांगितले म्हणल्यावर त्यांना मानावेच लागले. वाहिनी चांगल्याच नाराज झाल्या होत्या, पण मी दुर्लक्ष केले. चंदूला त्याच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळाली, आणि चित्रासाठी स्थळे बघायला आम्ही मदत करणार आहोतच. एकंदरीत सारे थोडक्यात निभावले." सुलभाने उत्साहाने माहिती दिली. इतके दिवस त्रासलेल्या सुलभाच्या चेहऱ्यावर हर्ष आणि उत्साह दिसत होता. ती म्हणाली,
"अंजली यातून एक धडा मी घेतला आहे. संकोचाने गप्प न राहता, स्पष्ट बोलणे सोयिस्कर. वाईटपणा येणार असतोच, पण निदान मनस्ताप तरी टळतो . मदत करताना आपला गैरफायदा तर घेतला जात नाही ना हे तपासून बघायचे. नाही तर 'भटाला दिली ओसरी ..' अशीच आपली अवस्था व्हायची. बरोबर आहे ना माझे?
"अगदी १०१ टक्के बरोबर .." अंजली हसत हसत म्हणाली.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet