जाणीव भान भाग - 5

मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे निरीक्षण

ಜ1
जगाच्या रहाटगाडग्यात वावरत असताना प्रत्येकाला हजारो समस्यांचा सामना करावा लागतो, प्रश्नांची उत्तर शोधावी लागतात. काही प्रश्न अगदीच क्षुल्लक असतात; परंतु आपणच त्यांना मोठे समजून आपला श्रम आणि वेळ वाया घालवत असतो. काही वेळा प्रश्न गंभीर असला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे गोत्यात सापडतो. काही समस्या मात्र खरोखरच गुंतागुंतीच्या असल्यामुळे त्यांची उत्तरं शोधण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. काही समस्यांना उत्तरं सापडतात, काहींना अर्धवट अवस्थेत सोडून द्यावे लागतात. व इतर कांहींच्या बाबतीत उत्तर नाही म्हणून गप्प बसावे लागते. उत्तर न सापडलेल्या अशाच समस्यांच्या यादीत जाणीव – सबोधता – (consciousness) – म्हणजे नेमके काय या समस्येचा/प्रश्नाचा क्रमांक कदाचित सर्वात वरचा असेल. जेमतेम एक किलोभर असलेले चेतापेशी आपण क्षणोक्षणी अनुभवत असलेल्या संवेदना, विचार, भावना, व स्मृती यांचा कॅलिडोस्कोप कसे काय दाखवू शकतात, याचे राहून राहून आश्चर्य वाटू लागते. एका समाजतज्ञाच्या मते जाणीव ही एक फॅसिनेटिंग, तरीसुद्धा भासमय, धूसर असे काही तरी आहे आणि त्याबद्दल आवर्जून वाचावेत असे लेख सापडत नाहीत.

या कठिण समस्येला अजून उत्तर सापडत नाही म्हणून त्याबद्दल कुणीच काही विचार करत नाहीत अशी स्थिती नाही, हेही तितकेच खरे. काही नसतज्ञ जाणीवाविषयी नवीन काही सांगण्याच्या प्रयत्नात आहेत. जाणीवेची स्थिती लक्षात येण्यापासून ते जाणीव काम करेनाशी होते तेव्हाच्या अडचणीपर्यंतचे वेध नसतज्ञ घेत आहेत.

जाणीव खरोखरच फॅसिनेटिंग आहे का? नसल्यास भासमय आहे का? कदाचित दोन्ही....
ಜ2
मेंदूचे स्कॅनिंग
हृदयाघाताचा झटका आल्यामुळे दवाखान्यात दाखल केलेल्या एखाद्या जवळच्या नातलगाला जेव्हा आपण जावून भेटतो तेव्हा मन विषण्ण होऊन जाते. कालपर्यंत अतिशय व्यवस्थित असलेला व विश्वासपूर्वक जीवन जगणारा हा नातेवाईक काही तासातच एकदम लोळागोळा, लेचापेचा, गोंधळलेला व एखाद्या लहान मुलासारखा का वागतो हे एक न सुटलेले कोडे आहे. हा माणूस पूर्वस्थितीत येतो की नाही याची काळजी वाटू लागते. हे असे का घडते हा प्रश्न विचारावासा वाटतो. त्याची आध्यात्मिक सुसंगती लावण्याचा प्रयत्नही आपण करत असतो.

जाणीव ही शारीरिक अवस्था नसून त्याचा संबंध मेंदू किंवा मेंदूतील घटक यासारख्या शारीरिक अवयवांशी जोडू नये असे 400 वर्षापूर्वी दे कार्त या तत्त्वज्ञानी केलेल्या विधानाशी आज आपण सहमत होणार नाही. कारण जाणीव हे मेंदूतील क्रिया – प्रक्रियांचे फलित आहे याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत. या नातलगाच्या मेंदूतील रक्ताचे गाठुळेच त्याच्या या अवस्थेला कारणीभूत आहेत, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे.

आध्यात्मिक पातळीवर आपल्या मनात हजारो प्रश्न असतात. मला जसा रंग दिसतो तसाच रंग दुसऱ्याला दिसत असेल का? प्राण्यांना मन असते का? माणसाला माणूसपणाची जशी जाणीव असते तशी कुत्र्यांना ‘कुत्रेपणा’ची जाणीव असते का? इतर प्राण्यांना या ‘जाणिवे’चा अनुभव येत असेल का? हॉस्पिटलच्या खाटेवर पडलेल्या या नातलगाच्या जाणिवेचे काय झाले असेल? काही काळासाठी (किंवा कायमचेच) जाणीवेला समाधी अवस्थेत (हायबरनेशन) ठेवता येणे शक्य आहे का? जाणीव म्हणजे नेमके काय असते? यासारख्या अनंत प्रश्नांची उत्तरं यानंतर तत्त्वज्ञानात वा अध्यात्मात न शोधता मेंदू व/वा नस विज्ञानात शोधावे लागतील.

विज्ञानातील संशोधनाने चेतापेशींचा संबंध जाणिवेशी आहे हे स्पष्ट केलेले आहे. मेंदूमधूनच जाणिवेचा उगम कसा होतो हे आता कळू लागले आहे. जाणीव क्षीण होत होत पूर्ण जाणीवच नाहिशी झालेल्या vegetable स्थितीत असलेल्या माणसाच्या मेंदूच्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढले आहेत. आणखी जास्त अभ्यास करून मेंदू व जाणीव यांच्यातील अन्योन्य संबंधावर प्रकाश टाकणे शक्य होईल असे या क्षेत्रातील वैज्ञानिकांना वाटत आहे.

ಜ3

या प्रकारच्या रुग्णाच्या मेंदूच्या मध्यभागी असलेल्या thalamusमध्ये काही बिघाड असल्यामुळे त्याच्यातील जाणिवेवर आघात झाला आहे, हे त्याच्या मेंदूच्या scanवरून कळते. Thalamus व prefrontal cortex - मेंदूचे हे घटक गुंतागुंतीच्या विचारांचा स्रोत असतात – यांच्या जोडणीत दोष निर्माण झाल्यामुळेसुद्धा जाआपल्याला कल्पना नाही. उदाहरणार्थ, आपण तांबड्या रंगाकडे बघितल्यानंतर नेमके काय होत असते? णिवेला धक्का बसू शकतो. Prefrontal cortex चा संबंध भूल दिलेल्या मेंदूच्या स्कॅनिंगवरूनसुद्धा कळू शकते. कारण भूल दिल्यानंतर जागरूकता कमी होत होत जाते; त्याचवेळी prefrontal cortexच्या पृष्ठभागाचे कार्य मंद होत जाते. व रुग्णाचा जाणिवेशी काही संबंध उरत नाही.

उद्दीपन (stimuli) या प्रकारच्या संशोधनातून आपण जागृतावस्थेत आहोत की सुप्तावस्थेत याचा मेंदूशी संबंध जोडणे शक्य झाले. परंतु मेंदूशी संबंधित अनेक गोष्टी आहेत की त्याची अजूनही आपल्याला कल्पना नाही. उदाहरणार्थ, आपण तांबड्या रंगाकडे बघितल्यानंतर नेमके काय होत असते?

ब्रेन स्कॅनच्या यंत्रासमोर उभे राहून मेंदूच्या पृष्ठभागावरील काही मोजक्या स्थित्यंतरांचा आढावा घेणे हे काही अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर होऊ शकत नाही. कारण डोळ्याने एखादे दृश्य बघत असताना मेंदूतील unconsciously होत असलेल्या प्रक्रिया, बघणारे डोळे, प्रकाश, आणि मेंदू यांच्यातील देवाण घेवाणीचे परिणाम अजूनही अज्ञात आहेत. ही समस्या डोळ्याप्रमाणेच इतर ज्ञानेंद्रियाबाबतीतही तितकीच खरी आहे. ब्रेन स्कॅनमध्ये डोके अडकवून घेऊन लाल दिव्याकडे पाहत राहण्यातून काही निष्पन्न होणार नाही. कारण सुप्तावस्थेतील मेंदूवर बाह्य दृश्यांच्या उद्दीपनामुळे काही प्रक्रिया सतत घडत असतात. त्यामुळे यातून मार्ग कसा काढता येईल हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

मेंदू जागृतावस्थेच्या आणि सुप्तावस्थेच्या काठावर असताना त्यावर होणाऱ्या उद्दीपकांच्या परिणामांच्या निरीक्षणावरून काही प्रमाणात याची कल्पना येऊ शकते. उदाहरणार्थ, क्षीण आवाजातील उमटणारा एखादा उच्चार, किंवा संगणकाच्या पडद्यावर काही क्षणासाठी उमटलेला शब्द – मेंदूवर कसा परिणाम करतो याचा अभ्यास करता येईल. जर जाणून बुजून शब्दांची नोंद होत नसल्यास किंवा मेंदूच्या पृष्ठभागावर काही प्रतिक्रिया उमटत नसल्यास हे दृश्यसंवेदनामुळे होत आहे असा निष्कर्ष काढता येईल. परंतु मेंदू आवाज वा शब्दाची नोंदच घेत नसल्यास मेंदूत होत असलेले बदल भलत्याच कुठल्या तरी ठिकाणी होत असावेत असे म्हणता येईल. तज्ञांच्या मते याच्या नोंदी मेंदूच्या lateral prefrontal cortex आणि posterior parietal cortex च्या भागात होत असावेत. मेंदूचे हे घटक क्लिष्ट विचार व गुंतागुंतीच्या गोष्टींचे नोंद करत असतात. आणि ही नोंद या घटकांच्या अंतर्भागात न होता पृष्ठभागावरच होतात, हे प्रयोगा-अंती लक्षात आलेले आहेत.

इतर प्राण्यांच्या मेंदूमध्येसुद्धा thalamus असतो. परंतु मेंदूतील हा अतीसंवेदनशील पृष्ठभाग मनुष्य प्राण्याइतका मोठा नसतो. यावरून इतर प्राण्यामध्येसुद्धा – क्षीण प्रमाणात का होईना – जाणीवा असतात. परंतु माणसामध्ये त्याचे वैशिष्ट्यपूर्ण असे रूप व आकार असते.

माणसाच्या मेंदूतील thalamus, lateral prefrontal cortex आणि posterior parietal cortex चा सहभाग जाणीवभानात असतो. मेंदूच्या इतर भागापेक्षा neurons जोडण्या या तीन भागात जास्त आढळतात. या दाट जोडण्यामुळे मेंदूच्या इतर कुठल्याही पृष्ठभागापेक्षा माहितीचा स्वीकार, संकलन आणि विश्लेषण करण्यात याच भागाचा हातखंडा असतो. नसतज्ञांच्या मते माहितीचे या प्रकारचे संकलन व विश्लेषण हेच माणसाच्या जाणीवभानाचे वैशिष्ट्य असू शकते.

क्रमशः
या पूर्वीचेः
बुद्धीमान रोबो: जाणीव भान – 1 https://aisiakshare.com/node/8827
मेंदू’ नावाचे मशीन : जाणीव भान – 2 https://aisiakshare.com/node/8837
बदलत्या स्थितीतून शिकण्यासारखे...: जाणीव भान – 3 https://aisiakshare.com/node/8845
बधिरावस्थेचे गूढ: जाणीव भान – 4 https://aisiakshare.com/node/8852

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet