माझी वाटचाल - भाग १ : अर्व्हाइन रँचवरील कॅलिफोर्निया विद्यापीठात

माझी वाटचाल (गणिताच्या निमित्ताने)

भाग १: अर्व्हाइन रँचवरील कॅलिफोर्निया विद्यापीठात

बालमोहन लिमये

('गणिताच्या निमित्ताने' या लेखमालेत प्रा. बालमोहन लिमये यांनी आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या काळात अवतरलेल्या गणिताशी संबंधित अनेकविध व्यक्तींची आणि इतर गोष्टींची ओळख करून दिली होती. या नव्या लेखमालेत गणिताच्या निमित्ताने प्रा. लिमये ज्या निरनिराळ्या ठिकाणी गेले होते अशा काही स्थळांचे दर्शन त्यांच्या नजरेतून वाचकांना घडवतील. हे काही रुढ प्रवासवर्णन नव्हे, तर सामान्य माणसाला एरवी फारशा न दिसणाऱ्या काही अनोख्या अकादमिक विश्वांची ही सफर आहे. आधीचे लिखाण वाचले असेल तर इथे काही ठिकाणी कदाचित पुनरुक्ती जाणवेल, पण कथनाचा प्रवाह सुविहित ठेवण्यासाठी ते आवश्यक वाटते.)

रॉचेस्टर विद्यापीठात मी करत असलेल्या पीएच्. डी.चा प्रबंध नेमका कधी पुरा करता येईल हे आधीच ठरवणे शक्य नसल्याने आणि तो पुरा झाल्यावर भारतात परतण्यापूर्वी काही अनुभव गाठीशी बांधावा म्हणून मी अमेरिकेतल्या व कॅनडातल्या काही शैक्षणिक संस्थांकडे अर्ज केले होते; त्यांपैकी काही अर्ज संशोधन अधिच्छात्र (Postdoctoral Fellow) आणि काही सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या जागांसाठी होते. 1968 साली पीएच. डी.नंतर इतरत्र संशोधन अधिच्छात्र म्हणून काम न करता सरळ एखाद्या विद्यापीठात सहायक प्राध्यापकाची नोकरी मिळू शकत असे. सध्या मात्र अशा नोकरीच्या आधी दोन-तीन वर्षे संशोधन अधिच्छात्र बनणे जरूर झाले आहे. त्या काळी प्रत्यक्ष मुलाखती क्वचितच होत असत. मार्गदर्शकाने लिहिलेल्या शिफारसपत्रावरच भिस्त ठेवत. मला सहा-सात ठिकाणांहून निश्चित प्रस्ताव आले. त्यांपैकी अर्व्हाइन रँचवर 1965पासून उभारल्या जाणाऱ्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचा प्रस्ताव सरस होता. त्या काळी कॅलिफोर्निया विद्यापीठाची आठ परिक्षेत्रे (campuses) होती. सगळ्या ठिकाणी नऊ महिन्यांच्या शैक्षणिक वर्षाचे तीन विभाग असत. त्याला ‘क्वार्टर पद्धती’ असे म्हणत. रॉचेस्टर विद्यापीठात दोन सत्रांची सेमेस्टर पद्धत होती तशीच. मला एका वर्षात फक्त चार किंवा पाच अभ्यासक्रम शिकवायचे होते; प्रत्येक अभ्यासक्रम आठवड्यात तीन तासांचा. इतके कमी शिकवायचे असल्याने संशोधनाला भरपूर वेळ मिळाला असता. शिवाय कलनीय विश्लेषण (Functional Analysis) या माझ्या विषयात संशोधन करणारे गेलबॉम, केलिश व डॉनोह्यू असे तीन ज्येष्ठ प्राध्यापकही तिथे होते. हा सगळा विचार करून मी या विद्यापीठाचा प्रस्ताव स्वीकारला.

माझ्या प्रबंधाचे समर्थन (thesis defence) केल्याच्या दुसऱ्या दिवशीच मी विमानाने लॉस एंजेलिसला रवाना झालो व तिथून सॅंता ॲना (Santa Ana) येथील ऑरेंज कौंटी (Orange County) विमानतळावर. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अर्व्हाइन रँचवरील परिक्षेत्रात हरकिशन वासुदेव नावाचा प्रौढ विद्यार्थी गणित विषयात पीएच. डी. करत होता. त्याची व माझी व्हँकूव्हर येथील माझ्या वास्तव्यात भेट झाली होती. त्याच्याबरोबर चार-पाच दिवस राहून मी नव्या परिस्थितीचा अंदाज घेतला. आठ-दहा दिवसांत 2 ऑक्टोबरला मी जवळच्या कोस्टा मेसा (Costa Mesa) शहरात एक सदनिका (apartment) भाड्याने घेतली आणि फोर्ड कंपनीच्या मर्क्युरी या ब्रॅंडची लांबुडकी मोटरगाडीही विकत घेतली, मात्र ती आधी कुणी वापरलेली होती. मला प्रथमच माझी स्वतःची कार्यालयीन खोली (office room) मिळाली. सगळे जण मला ‘प्राध्यापक’ असे संबोधू लागले. गेली अठरा वर्षे विद्यार्थी आणि आता एका आठवड्यात शिक्षक! हे स्थित्यंतर मला पचायला जड गेले. प्राध्यापक झालो असलो तरी चोवीस वर्षांचा मी पोरसवदाच दिसत होतो. माझी उंचीही तिथल्या इतर सगळ्या प्राध्यापकांपेक्षा बरीच कमी होती. एक दिवस विद्यापीठाच्या एका सामाजिक समारंभाच्या वेळी मी शिक्षकांच्या प्रवेशद्वारातून आत शिरत होतो म्हणून मला कुणीतरी अडवलेही!

मी गणित विभागात रुजू झाल्यानंतर लवकरच मला कुणी तरी सांगितले की अमेरिकेतील सर्वात जास्त बोलबाला झालेले गणितज्ञ आमच्या विभागात आहेत. इथल्या प्राध्यापकांपेक्षा श्रेष्ठ असणारे किती तरी प्राध्यापक मला माहीत होते. त्यामुळे मी बुचकळ्यात पडलो. पण मुद्दा सरसतेचा नव्हता, प्रसिद्धीचा होता. गणित विभागाच्या सुरुवातीपासूनच एडवर्ड थॉर्प (Edward Thorp) नावाचे प्राध्यापक न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीहून येथे आले होते. त्यांनी 1958 साली लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात पीएच. डी. केली होती, मी काम केलेल्या विषयाच्या जवळपासच. पण नंतर त्यांच्या संशोधनाचा मार्ग बदलला. त्यांनी ‘ब्लॅकजॅक’ (Blackjack) या जुगारघरांतील (casino) पत्त्यांच्या प्रसिद्ध खेळात जिंकण्याच्या संभाव्यतेबाबत काही सिद्धांत मांडले, व या खेळातील काही डावपेचांची IBM 704 या संगणकाच्या मदतीने कसून तपासणी केली. त्यांच्या योजना इतक्या यशस्वी झाल्या आणि त्या वापरून इतके पैसे मिळवता येऊ लागले की थॉर्प यांना तत्काळ ख्याती मिळाली. मी असे ऐकले की त्यांच्यावर लास वेगसमधील मोठ्या जुगारघरांत जायची बंदी घालण्याची पाळी आली होती. 1964 साली त्यांनी ‘बीट द डीलर’ (Beat the Dealer) नावाचे पुस्तक लिहिले; ते अतोनात विकले गेले. नंतर हे महाशय शेअर बाजाराकडे वळले व तेथेही त्यांनी आपला प्रभाव दाखवला, मोठे Hedge Funds स्थापले. 1967 साली त्यांनी लिहिलेले ‘बीट द मार्केट’ (Beat the Market) नावाचे पुस्तकही खूप खपले. अशा माणसाचे नाव बहुजनांच्या तोंडी असले तर काही नवल नाही. ते गणितज्ञ म्हणून फार प्रसिद्ध नसले तरी अतिप्रख्यात असलेले गणितज्ञ होते. ते वेगळ्याच विश्वात वावरत. माझा आणि त्यांचा फारसा संबंध आला नाही.

गणिती म्हणून माझा संबंध आला तो प्राध्यापक जेम्स येह (James Yeh) यांच्याबरोबर. ते यादृच्छिक विश्लेषण (Stochastic Analysis) या विषयात संशोधन करत. हा विषय मी आतापर्यंत केलेल्या कामाहून वेगळा होता, पण आता काही वेगळे करून पाहावे असे मला वाटू लागले होते. ते अतिशय शिस्तप्रिय, टापटिपीचे व काटेकोरपणे वागणारे होते, मला आवडावे असे. आपण शिकवत असलेल्या अभ्यासक्रमाची ते सविस्तर टिपणे लिहून ठेवत असत. त्यांनी मला दोन मितींतील ब्राउनिअन गतीबद्दल (two dimensional Brownian motion) संशोधन करायला सुचवले. मीही हुरूप येऊन नेटाने काम केले, व वर्षअखेरपर्यंत छोटासा शोधनिबंध लिहून एका संशोधनपत्रिकेकडे पाठवला. तो स्वीकारला गेला नाही म्हणून मी खट्टू झालो, पण प्राध्यापक येह मला सतत उत्तेजन देत राहिले. मुळातले चायनीज असले तरी ते जपानी संस्कृतीमध्ये वाढले होते. त्यांना अन्नाचे जपानी प्रकार खूप आवडत. बऱ्याच वेळा आम्ही दोघेच त्यांच्या मोटरगाडीतून मिदोरी नावाच्या उपाहारगृहात जात असू. तेथील एक जपानी परिचारिका आमच्या ओळखीची झाली होती; तीच आम्हाला निरनिराळे पदार्थ आणून द्यायची. प्राध्यापक येह यांनी मला जपानी खाण्यातले बारकावे उलगडून सांगितले. त्याची चव तरल असते, चिनी अन्नासारखी भडक नसते. इथेच मला जपानी अन्नाची गोडी लागली. ती अजूनही कायम आहे, पण भारतात अस्सल स्वरूपातले जपानी खाद्यपदार्थ सहजासहजी मिळत नाहीत. प्राध्यापक येह एकलकोंडे, ना कुणाच्या अध्यात ना मध्यात! ते माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी तरी ज्येष्ठ होते, पण माझ्याशी बरोबरीने वागायचे, मला समजून घ्यायचे. कदाचित त्यांना एक चेला हवा होता!
इथल्या गणित विभागातील प्राध्यापकांपैकी माझी चांगली मैत्री झाली फक्त दोघांशी, डेव्ह न्युवेल (David Newell) आणि बॉब वेस्ट (Robert West) यांच्याशी. डेव्हने माझ्याआधी दोनच वर्षे पीएच.डी. मिळवली होती, कोटिसिद्धांत (category theory) या विषयात. गणिताच्या या भागाशी माझा दुरान्वयानेही संबंध आलेला नव्हता. पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. डेव्हचे पुरोगामी विचार आणि सहज-स्वाभाविक वागणे मला एकदम आवडले, आणि मी गेल्यागेल्याच आमची गट्टी जमली. त्याच्या गाडीतून पन्नास मैलावरील लॉस एंजेलिसला पन्नास मिनिटात जाऊन आम्ही बीटल्स (Beatles) या रॉक बॅंडचा (rock band) नवा चित्रपट पाहिला, त्यांची नव्याने बाजारात आलेली दुहेरी ध्वनिमुद्रिका (Double Album) विकत घेतली. नंतर जोन बाएझ (Joan Baez) या लोकप्रिय संगीतज्ञ स्त्रीची मैफल ऐकली, व एकदा उदयशंकरच्या नृत्यकार्यक्रमालाही उपस्थित राहिलो. डेव्ह डाव्या विचारसरणीचा होता, अमेरिकेने व्हिएटनाममध्ये चालवलेल्या युद्धाच्या विरोधात होता. त्याचबरोबर आमच्या गणित विभागातील सगळ्या विद्यार्थ्यांचा पाठीराखा होता, एस. डी. एस. (SDS: Students for Democratic Society) या संघटनेचा सभासद होता. त्याचा उदारमतवादीपणा विभागाच्या प्रशासनाला खुपत असे, पण त्याला त्याची पर्वा नसे. त्याच्यात एक दुर्गुण होता तो म्हणजे जॉनी वॉकर, रेड लेबल (Jonny Walker, Red Label) नावाची व्हिस्की प्यायचा नाद. उंचापुरा व मोठाड असल्याने आपल्या भल्यामोठ्या रक्ताभिसरण संस्थेवर दारूचा काही परिणाम होत नाही असे तो म्हणे, पण ते काही खरे नव्हते. त्याची सहा फूट आठ इंच उंची पाहून बरेच जण त्याला बास्केटबॉल खेळतोस का असे विचारत. या सततच्या प्रश्नाला कंटाळून तो आपण हताश झालेला अश्वपटु (frustrated jockey) असल्याचे सांगायचा! आम्हा दोघांची तरंगलांबी (wavelength) इतकी जमली की शैक्षणिक वर्षाच्या शेवटी जेव्हा मी भारतात परतायचे ठरवले, तेव्हा आम्ही एकमेकांना दर आठवड्याला पत्र लिहायचे ठरवले होते. ते पाळणे किती कठीण आहे हे माझ्या आई-वडिलांच्याबरोबर मी केलेल्या अशाच करारावरून मला दिसत होते, पण असा निर्णय घ्यावासा वाटणे यावरूनच माझी व डेव्हची मैत्री किती सघन झाली होती याची कल्पना येईल. मी परतल्यावर तो मला भेटायला पुण्या-मुंबईला आवर्जून आला होता.

डेव्ह न्युवेल बॉब वेस्ट
डेव्ह न्युवेल बॉब वेस्ट

माझी बॉब वेस्टबरोबर मैत्री काही काळाने झाली. विद्यापीठाच्या दुसऱ्या क्वार्टरच्या दरम्यान, 23 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीची पंचाहत्तरावी वार्षिक सभा न्यू ऑर्लिन्स शहरातील जुंग होटेलमध्ये भरली होती. गणित विभागाने आम्हा काही जणांचा प्रवासाचा व इतर खर्च देऊ केला होता. मी तेथे दहा मिनिटांचा शोधनिबंध वाचला. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शहराच्या फ्रेंच मोहल्ल्याला दिलेली भेट. हा भाग नैतिक घसरण दाखवणारा (decadent) मानला जात असला तरी तो जॅझ (jazz) पद्धतीचे तालबद्ध संगीत व अत्युत्तम पाककृतींसाठी मशहूर आहे. तेथेच माझी व बॉबची पहिल्यांदा जवळून ओळख झाली. बॉब बीजगणिती संस्थिती (Algebraic Topology) या विषयात काम करत असे. मी या विषयाचा एक अभ्यासक्रम रॉचेस्टरला शिकला होता, पण बॉबच्या संशोधनाबाबत काही थांगपत्ता लावणे मला दुरापास्त होते. असेच असते साधारणपणे कुठल्याही दोन गणित्यांमध्ये; इतके त्यांचे काम विविक्त झालेले असते. बॉबच्या लहानपणी तो आई-वडिलांपासून दुरावलेला होता. दोन वर्षांपूर्वी त्याचा घटस्फोट झाला व विवाहानंतर मिळवलेल्या सर्व संपत्तीचा अर्धाच वाटा त्याच्याकडे राहिला होता. मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने सांगता येतील अशा व्यक्तीची त्याला निकड जाणवत होती. आम्ही दोघे वैयक्तिक बाबींबद्दल बोलू लागल्यावर मी जसजसा खुला होत गेलो तसतसा तोही खुलत गेला. भारतासारख्या अतिदूर देशातून आलेल्या व अगदी वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या माणसाशी आपण निकटचा संवाद साधू शकतो याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटे. बॉबला समुद्रातल्या फेसाळ लाटांवर आरूढ होऊन वेगाने तरंगत जाण्याचा (surfing) मोठा शौक होता. मला त्याने खूप आग्रह केला त्याच्याबरोबर जायचा, पण मला जेमतेम पोहायला येत असताना असले उद्योग करणे अशक्य होते. तो मला त्याच्या शक्तिशाली गाडीतून जवळपासच्या कित्येक ठिकाणीच नव्हे तर लास वेगस (Las Vegas) या नेवाडा राज्यातील शहरातही घेऊन गेला. तेथे जाताना मोहावे वाळवंट (Mojave Desert) लागते. वाटेत राहण्यासाठी हॉटेल्स असतातच, पण बॉब म्हणाला की आपण वाळूच्या राशींवरच (sand dunes) झोपू या रात्री. त्याने बरोबर दोन झोपायच्या उबदार पिशव्या (sleeping bags) आणल्या होत्या. झोपायला बरीच रात्र झाली होती म्हणून जवळपासचे फारसे काही दिसत नव्हते. सकाळी उठल्यावर आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा दिसलेले दृश्य अवर्णनीय होते. लांब लांबपर्यंत वाळूच्या रांगाच रांगा! स्तब्ध राहून मी ते सगळे मनात साठवत होतो. तेवढ्यात बॉबने फोटो काढलेच.

Mojave Desert

लास वेगसमधील जुगारघरात व्यसनाधीन लोकांना जुगारयंत्रांत एकामागून एक डॉलरची नाणी टाकताना पाहून वाईट वाटत होते. मधूनच कुणाला तरी जॅकपॉट लागून यंत्रात साठलेली सगळी नाणी खळकन बाहेर पडल्याचा आवाज यायचा. हे दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे असेच चालू राहणार होते. त्याची किळस येऊन मी बॉबला दुसरीकडे जायला सुचवले. लास वेगसला करमणुकीच्या जगाची राजधानी म्हणतात. पण मला तिथे बिलकुल करमले नाही. मात्र ही आमची शनिवार-रविवारची सहल चांगलीच लक्षात राहिली. बॉबला माझी मैत्री किती मोलाची वाटत होती ते अर्व्हाइनला असताना माझ्या नीट लक्षात आले नाही. मी भारतात परतल्यावर त्याने बारीक अक्षरात लिहिलेली दहा-बारा पानी पत्रे सांगून गेली की तो माझ्याकडे संभाव्यतः आजीव दोस्त (potentially lifelong friend) म्हणून बघत होता. पण अशा गोष्टी एकतर्फी होत नसतात.

रॉचेस्टरमधील गणित विभागाप्रमाणेच येथेही दर आठवड्याला कोणीतरी बाहेरचा गणितज्ञ येऊन आपल्या विषयावर खास भाषण (colloquium talk) देत असे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रा. पॉल हाल्मॉस (Paul Halmos) यांनी एक उत्तम व्याख्यान दिले. आमच्या विभागाचे मुख्य प्राध्यापक गेरहार्ड केलिश (Gerhard Kalish) यांनी विभागातील सगळ्या जुन्या व नव्या सदस्यांची प्रा. हाल्मॉस यांच्याशी ओळख करून दिली. त्या काळात ते प्रशांत महासागरातील एका बेटावरील हवाई विद्यापीठात काम करत. तेथून व्याख्यानासाठी ते इकडे आले होते. संध्याकाळी विभागातील वरिष्ठ सदस्यांबरोबर त्यांनी भोजन घेतले आणि ते परतले. वर्षाच्या शेवटी ते पुन्हा व्याख्यान द्यायला आले. यावेळी ते उत्तर अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात काम करू लागले होते. गणिताच्या क्षेत्रात पॉल हाल्मॉस हे एक मोठेच प्रस्थ होते. त्यांची दोन प्रख्यात पुस्तके आम्ही नेहमी वापरत आलो होतो: 1942 साली त्यांनी लिहिलेले ‘Finite Dimensional Vector Spaces’ हे मूलभूत पुस्तक आणि 1967 साली लिहिलेले ‘A Hilbert Space Problem Book’ हे विचारशक्तीला प्रेरणा देणारे पुस्तक. गणिती लिखाणातील त्यांचे कौशल्य असामान्य होते. आपल्या व्याख्यानाच्या आधी ते प्राध्यापक केलिश यांच्याशी छन्नमार्गामध्ये, म्हणजे कॉरिडॉरमध्ये, गप्पा मारत होते. ते ऐकून मी माझ्या ऑफिसमधून बाहेर आलो. तेवढ्यांत ‘हाय, प्रोफेसर लिमये, हाऊ आर यू?’ असे शब्द माझ्या कानी पडले.


Paul Halmos
प्राध्यापक हाल्मॉस, १९६९

प्रा. हाल्मॉस बऱ्याच लांबून मला पुकारत होते. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. सात-आठ महिन्यांपूर्वी प्राध्यापक केलिशनी माझी ओळख या माणसाला करून दिली होती हे खरे, पण माझा चेहरा व माझे नाव त्यांच्या कसे लक्षात राहिले याचे मला फार नवल वाटले. त्यांच्याशी दोन मिनिटे बोलून मी इतरांच्या बरोबर त्यांचे व्याख्यान ऐकायला गेलो. राहून राहून मला वाटत होते या असामीसमोर मी म्हणजे ‘किस झाडकी पत्ती’ होतो, तरीही तो मला नावाने हाक मारतोय. हा स्मरणशक्तीचा चमत्कारच म्हटला पाहिजे. दुसऱ्या दिवशी न राहवून मी प्राध्यापक केलिशना हे विचारले. त्यांचे उत्तर ऐकून मी चाटच पडलो. ते म्हणाले ‘तू जरा नीट आठवलेस तर तुझ्या लक्षात येईल की गेल्या वर्षी मी तुझी ओळख हाल्मॉसना करून दिली तेव्हा त्यांनी त्यांच्या पोलरॉइड कॅमेरावर तुझा फोटो काढला होता. घरी जाऊन असे सगळे फोटो ते एका अल्बममध्ये लावतात व प्रत्येक फोटोखाली त्या व्यक्तीचे नाव लिहितात. पुन्हा त्याच ठिकाणाला भेट द्यायच्या आधी तो अल्बम बघून आठवणींना उजाळा देतात, आणि नावाने हाक मारून चाट करतात. हे काही फक्त तुझ्या एकट्याच्या बाबतीत नाही झाले. मीही त्यातून गेलो आहे.’ केवढा हा उपद्व्याप! पण मोठ्या लोकांच्या छोट्या गोष्टी अशाच असतात. खूप काळानंतर प्राध्यापक हाल्मॉस यांचे ‘I have a Photographic Memory’ या नावाचे पुस्तक मॅथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका या संस्थेने प्रसिद्ध केले, त्यांच्याकडील 6000 फोटोपैकी 600 निवडक फोटोंचे. अर्थात माझा फोटो उरलेल्या 5400 फोटोंमध्ये असणार! अलीकडच्या काळात फोनवर फोटो घेणे इतके सोपे झाले आहे की कॉलेजांतील प्राध्यापकही मोठमोठ्या वर्गांतल्या मुलांची ओळख राखण्यासाठी फोटो काढून ठेवत असतात, पण त्या काळी हाल्मॉस महाशयांचे वागणे आश्चर्यकारकच होते.

दहा आठवड्यांचा पहिला क्वार्टर संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातील तीन आठवडे हिवाळ्याची सुट्टी होती. तेव्हा मी रॉचेस्टरला जायचे ठरवले. एकतर माझे मातृपीठ (alma mater) तेथे होते. दुसरे म्हणजे मी रॉचेस्टरमधील माझ्या दोस्तांना फारच लगबगीने सोडले होते. ह्या भेटीत त्या सगळ्यांना व्यवस्थित भेटून घेतले, कुणाच्या संशोधनात काय प्रगती होत आहे याची विचारपूस केली. माझे मार्गदर्शक प्राध्यापक आलिंग यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. प्राध्यापक केंपरमन यांनाही भेटलो; त्यांच्याकडून मी पीएच. डी.चे मार्गदर्शन इच्छिले होते आणि त्यांनी माझ्या पत्रपेटीत चिठ्ठी टाकून ते खुबीने नाकारले होते. आता मात्र मोकळेपणाने आणि खुल्या दिलाने त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यांच्या मनात घोळत असलेले एक-दोन गणिती प्रश्न मला समजावले व एकत्र संशोधन करायची तयारी दर्शविली. मी खूश झालो खरा, पण लवकरच परत जाऊन नंतरच्या क्वार्टरमधील अभ्यासक्रम शिकवायची तयारी करायची होती, कारण तो विषय मी कधी शिकवला तर नव्हताच, पण नीटपणे शिकलाही नव्हता, आंशिक विकलक समीकरणांचा (partial differential equations). परतल्यावर 1969च्या जानेवारी महिन्यामध्ये मी आई-बाबांना सुचवले की त्यांनी मला भेटायला इकडे यावे. बाबांनी पत्रात ‘कल्पना उत्तम, पण व्यवहार्य वाटत नाही’ असे लिहून तो प्रश्न निकालात काढला.
लहानपणापासून मला खेळांची खूप आवड होती. शाळा-कॉलेजात असताना सायंकाळी काही मैदानी खेळांत भाग घेतल्याशिवाय राहवायचे नाही. छोटा असताना लंगडी व गोलखोखो आणि त्यानंतर उभा खोखो व आट्यापाट्या मी भरपूर खेळलो. आमच्या कॉलेजच्या आट्यापाट्या संघात मी सूरगडी, व अर्थात संघनायक असे. रॉचेस्टरला गेल्यावरही स्क्वॉश, टेनिस अशा खेळांत मी करमणुकीखातर भाग घेत असे. आता आमच्या गणितविभागातील काही प्राध्यापकांनी बास्केटबॉल खेळायचा मनसुबा रचला. त्यासाठी ते प्रत्येकाकडे विचारणा करत होते. मी जाऊन म्हटले की मी कधी खेळलो नाहीये, पण मला फार आकर्षण आहे या खेळाचे. एका दृष्टीत त्यांनी मला अपात्र ठरवले. कारण उघड होते. बास्केटबॉल खेळणाऱ्या पाच जणांच्या चमूमधील रक्षक (guard) उंचीने जरा कमी असला तरी चालतो, पण अमेरिकेत त्याची उंचीही सहा फूट तरी असावी लागते. माझी उंची होती जेमतेम साडेपाच फूट. शिवाय मला काही अनुभवही नव्हता! मी खट्टू झालो, परंतु जिद्द सोडली नाही. जेव्हा जेव्हा दुपारच्या जेवणवेळी (lunch time) शक्य असेल तेव्हा एकटाच बास्केटबॉल मैदानावर जाऊन मी कडीतून चेंडू पाठवायचा सराव चालू ठेवला. काही महिन्यांनी बास्केटबॉल खेळाचे आंतरविभागीय सामने योजायची टूम निघाली. त्यांपैकी एका सामन्याआधी गणितविभागीय संघाला एक खेळाडू कमी पडत होता. मी सराव करत असल्याचे ज्या एक-दोन जणांनी बघितले होते, त्यांनी नाइलाजाने मला विचारले. मी अक्षरशः एका पायावर तयार झालो. सामना सुरू झाला. माझे काम रक्षणाचेच असले तरी कित्येक वेळा माझ्यापेक्षा एक फुटाहून उंच असलेल्या खेळाडू्‌च्या डोक्यावरून मी चेंडू कडीपार करू शकलो. सामन्यानंतर आमच्या संघातील एकाने मला हटकले व कुतूहल व्यक्त केले. पण मी त्याला कसे सांगू की ही किमया मी खेळलेल्या आट्यापाट्यांमधील पदन्यासाच्या (footwork) कुशलतेची आहे!

शैक्षणिक वर्षाच्या शेवटी सर्व परीक्षा संपल्यावर एका संध्याकाळी विभागप्रमुख केलिश यांनी गणित विभागातील सर्वांना त्यांच्या घरी जेवायला बोलावले. प्राध्यापक येह आणि केलिश यांची खूप गट्टी होती, ते एकमेकांशी खेळीमेळीने वागत. त्या दिवशी केलिश यांच्या घरी सगळा जपानी बेत केला होता: तेम्पूरा, सुकियाकी आणि तांदळापासून बनवलेली साके नावाची मदिरासुध्दा! खाणे, पिणे आणि भरपूर गप्पा झाल्यावर आपापल्या घरी जाण्याची वेळ झाली. निरोप घेणेही जपानी पद्धतीने सुरू झाले. ही गोष्ट फार गुंतागुंतीची होऊ शकते. निरोप घेणारा आणि निरोप देणारा या दोघांनीही आपापल्या मनांत दुसऱ्याच्या मानाने आपली योग्यता किती ते ठरवायचे. मग जितकी योग्यता कमी तितके जास्त कमरेत वाकायचे. सभ्यतेचा सर्वसाधारण नियम असा की स्वत:ला दुसऱ्यापेक्षा कमी लायक समजायचे. त्यामुळे निरोप देणारा जितका वाकेल त्याच्यापेक्षा निरोप घेणारा जास्त वाकतो. पण एवढ्याने भागत नाही. मग निरोप देणारा त्याहीपेक्षा जास्त वाकतो. असे बराचवेळ चालू रहाते. शेवटी कधी ना कधी परिस्थिती स्थिरावते आणि कोंडी सुटते. निरोप घ्यायला प्रथम प्राध्यापक येह उठले. त्यांची आणि प्रा. केलिश यांची ‘वाकावाकी’ बराच वेळ चालली आणि अखेर त्या दोघांनी समतोल स्थिती मिळवली.

गेर्हार्ड केलिश जेम्स येह
गेर्हार्ड केलिश जेम्स येह

जेव्हा माझी निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा प्राध्यापक केलिश यांनी माझी गंमत करायचे ठरवले. ते विभागप्रमुख म्हणून मी सुरुवातीलाच खूप वाकलो. पण प्राध्यापक केलिश इतके वाकले की त्यांची पाठ जमिनीला समांतर झाली. आता मला त्यांच्यापेक्षा जास्त वाकायचे होते. तसे करताना, कदाचित आधी घेतलेल्या जपानी साकेचा परिणाम म्हणून, माझा तोल गेला आणि मी त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यांची तशी योग्यता होतीच, पण माझ्या बरोबरच्या तरुण सदस्यांमध्ये एकच हशा पिकला. मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो की भारतीय संस्कृतीत आदरणीय माणसाला असा पूर्ण नमस्कार करणे ही प्राचीन प्रथा आहे, पण माझे कोणी ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी केलिश यांनी मला उठवले आणि मिठी मारली, तसे करणे जपानी संस्कृतीत बसत नसले तरी. काही प्रमाणात माझे भान हरपले असल्याने त्या रात्री माझा खास मित्र डेव्ह मला आपल्या घरी घेऊन गेला. सकाळी मला माझ्या घरी पोचवण्यापूर्वी त्याने ही सगळी कथा मला रंगवून सांगितली.

मी अमेरिकेत येताना विद्यार्थ्यांना देतात ते एफ-1 प्रवेशपत्र (F1 Visa) घेऊन आलो होतो. विद्यार्थीदशा संपल्यावरही ‘व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम’ (Practical Training Programme) या योजनेखाली मी अठरा महिने अमेरिकेत काम करू शकत होतो. मात्र कॅलिफोर्नियातील नऊ महिन्यांच्या शैक्षणिक वर्षानंतर भारतात परतायचा माझा निश्चय अमलात आणायचे मी ठरवले. डेव्ह व बॉब अगदी नाखूश झाले, पण त्या दोघांनाही माझे व आई-बाबांचे संबंध किती घनिष्ठ होते आणि त्यांची वये बघितली तर ते माझे आजी-आजोबाच ठरले असते हे सगळे माहीत होते. त्यामुळे फार काही समजूत घालावी लागली नाही. माझी कॅलिफोर्निया विद्यापीठातील नेमणूक सुरुवातीला नऊ महिन्याची असली तरी कायमच्या नोकरीकडे नेणारी (tenure track) होती. म्हणून मी विद्यापीठाकडे बिनपगारी रजा देण्याबद्दल अर्ज केला, व तो तत्काळ मान्यही झाला. ही फक्त एक संकटकालीन तरतूद होती. आई-बाबांना भारतात सोडून अमेरिकेत स्थायिक व्हायचा विचारही मला शिवला नव्हता. मध्यंतरी एकदा आईने मला अर्व्हाइनला जम बसतोय ना असे विचारले होते तेव्हा मी तिला लिहिले होते की मला इथे जम बसायला नकोच आहे, मला साऱ्या जगाचे शोषण करणाऱ्या इथल्या प्रस्थापनाचा भाग बनण्याची बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे अमेरिका सोडायची मला मुळीच खंत वाटली नाही. मात्र आज जर कुणी होतकरू तरुणाने सल्ला विचारला, तर अमेरिकेतली नोकरी सोडून फक्त आई-वडिलांकरता परतू नको, परतण्यात मनापासून समाधान असेल तरच परत ये असे मी सांगेन, कारण आई-वडील गेल्यावर उरलेले जीवन समाधानाने जगणे जरुरीचे असते.

(पुढील भाग)
---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला.
तत्कालीन अमेरिकेतील (किमान विद्यापीठीय अमेरिकेतील)चित्र कळले.
आपण जोन बेझच्या कॉन्सर्टला गेला होतात (आणि हे वूडस्टॉकच्या आदल्या वर्षी) हे वाचून कुतुहूल जागृत झाले ( जोन बेझ यांनी वूडस्टॉकमधेही परफॉर्म केले होते, १९६९ साली)
त्या कॉन्सर्टविषयी(म्हणजे तुम्ही उपस्थित असलेल्या) काही लिहू शकाल का ? (अमेरिकेतील फ्लावरपावर काळातील तत्कालीन चित्र फक्त इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठी अनुभव कुणीही लिहिलेला नाही)

आपण बीटल्सचा कुठला चित्रपट बघितलात?
तुम्ही कदाचित म्हणाल की लिहिलंय काय आणि हा विचारतोय काय? मला या विषयात कुतुहूल आहे म्हणून मी तो धागा पकडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बीटल्सच्या मी बघितलेल्या चित्रपटाचे नाव आठवत नाही. कदाचित Magical Mystery Tour असू शकेल. Yellow Submarine हा त्या काळातला चित्रपट त्यांनी बनवलेलला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या काळातला सर्वात गाजलेला बीटल्सपट म्हणजे 'अ हार्ड डेज नाईट' (१९६४). त्यामुळे तो पाहिलेला असण्याची शक्यता दाट आहे. ट्रेलर इथे, अधिक माहिती इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुलंचे रावसाहेब आठवले.
"... तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडी निवडी, कशा चा ही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात.... कुणाचं उष्टं कुठल्या गावी किती सांडावं याचा काही संकेत असावा.. देवाने आमची लहानशी जीनन समृद्ध करण्यासाठी दिलेल्या ह्या देणग्या. न मागता दिल्या होत्या न मागता परत नेल्या. "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे लेख वाचायला नेहमीच आवडतं. माणसांबद्दल तुम्ही फार आपुलकीनं लिहिता म्हणून.

मोहावी वाळवंटाचा फोटोही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.