माझी वाटचाल - भाग ६: आय.आय.टी. धारवाडचे आमंत्रण

माझी वाटचाल (गणिताच्या निमित्ताने)

भाग ६: आय.आय.टी. धारवाडचे आमंत्रण

बालमोहन लिमये

(मागील भाग)
2006 सालच्या ऑगस्ट महिन्यात मी पवईच्या आय.आय.टी.मधून तत्त्वतः निवृत्त झालो. नंतर पुनर्नियुक्त प्राध्यापक (Reemployed Professor), गुणश्री फेलो (Emeritus Fellow), उपांगभूत प्राध्यापक (Adjunct Professor) अशा निरनिराळ्या उपाधींखाली आधीसारखेच अध्यापन व संशोधन तिथे अकरा वर्षे करत राहिलो. मग मात्र ‘आता पुरे’ असे म्हटले व तसे गणित विभागाच्या प्रमुखांना कळवले. निवृत्त जीवनाची फळे कशी चाखायची याचा विचार चालू असतानाच प्राध्यापक शेषु पशुमर्ती यांचा दूरध्वनी आला. कर्नाटक राज्यातील धारवाड येथे नव्याने सुरू झालेल्या आय.आय.टी.चे निदेशक (Director) म्हणून त्यांची नेमणूक मार्च 2017 मध्ये झाली होती. त्याआधी ते पवईच्या आय.आय.टी.तील यंत्र अभियांत्रिकी विभागात (Mechanical Engineering Department) प्राध्यापकाचे काम करत असताना त्यांचा व माझा परिचय झाला होता. नेहमीचे क्षेमकुशल विचारल्यावर ते सरळ मुद्द्यावरच आले. माझे गणित विभागातले काम लवकरच थांबणार आहे, याची त्यांना कुणकुण लागली होती, कशी कुणास ठाऊक. अभ्यागत प्राध्यापक (Visiting Professor) म्हणून एक-दोन वर्षांसाठी मी धारवाडला यावे असा प्रस्ताव त्यांनी मांडला. ही संधी स्वागतार्ह असली तरी मी लगेच स्वीकारली नाही. त्यांनी मला व निर्मलाला दोन दिवस धारवाडला येऊन जायला सुचवले. त्याप्रमाणे एप्रिल 2017च्या मध्याला आम्ही दोघे विमानाने बेळगावला व तिथून आय.आय.टी.ने पाठवलेल्या गाडीने कर्नाटक भवन या धारवाडमधील निवासगृहात पोचलो. हे ठिकाण वसतीच्या व बाजाराच्या दृष्टीने मध्यवर्ती होते, पण आय.आय.टी. ज्या तात्पुरत्या परिसरात कार्यरत होती तो बेलूर औद्योगिक वसाहतीतला (Belur Industrial Estate) भाग तिथून बराच दूर होता, सुमारे बारा-तेरा किलोमीटर लांब. तिथे पोचल्यावर निदेशकांच्या कार्यालयात आमचे यथोचित स्वागत झाले. प्राध्यापक शेषूंनी एक आठवण सांगितली, ते 1988 साली पवईच्या आय.आय.टी.त सहायक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून रुजू झाल्यानंतरची. मी आय.आय.टी.च्या परिसरात राहणाऱ्यांसाठी एक निसर्ग भ्रमणाचा (Nature Walk) कार्यक्रम योजला होता. त्यात ते सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर त्या प्रसंगी त्यांची व त्यांच्या भावी पत्नीची ओळख, गाठ-भेट झाली होती. मी म्हणालो वा, तो तर उत्तम सुयोगच म्हटला पाहिजे. त्यांनी सांगितले की गणिताचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अजून कोणाची कायमस्वरूपी नियुक्ती झाली नसल्याने पवईच्या आय.आय.टी.तील प्राध्यापक एक सत्रभर इथे राहायला येऊन काम बजावतात. शिवाय बंगलोरच्या भारतीय सांख्यिकी संस्थेतून निवृत्त झालेले नरसिंह शास्त्री अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकवतात. येत्या वर्षी नव्याने बी. टेक. पदवीसाठी दाखल होणाऱ्या 120 विद्यार्थ्यांना कलन (Calculus) हा अभ्यासक्रम मी शिकवावा अशी त्यांची सूचना होती. मला ते मान्य होते, पण इथे यायचे की नाही हेच ठरवले नव्हते.

प्राध्यापक शेषूंनी तिथले अधिष्ठाते (Deans) प्राध्यापक सिद्दिनी प्रभू आणि प्राध्यापक महादेव प्रसन्न यांच्याशी माझी ओळख करून दिली, व कुणाला तरी बरोबर देऊन आय.आय.टी. धारवाडचा सांप्रत परिसर बघायला पाठवले. खरे तर या परिसरात जल आणि भूमी प्रबंधन संस्थेची (Water and Land Management Institute, WALMI) कर्नाटक सरकारने 1985 साली स्थापना केली होती; ‘वर्ल्ड बँके'चे साह्य घेऊन कार्यालयांसाठी व घरांसाठी कित्येक इमारती बांधल्या होत्या. परंतु तिच्या एका निदेशकाच्या कुकर्मांमुळे गेली दहा-पंधरा वर्षे ही संस्था जवळजवळ निष्क्रिय (defunct) झाली होती, तिथे काम करणारे लोक निघून गेले होते. 125 एकरांच्या पूर्ण परिसराला अवकळा आली होती. इमारती मोडकळीला आल्या होत्या. त्यांची नुसतीच डागडुजी करून उपयोग नव्हता, तर कायापालट करणे जरूर होते. कर्नाटक सरकारने हा परिसर 2016 सालापासून दहा वर्षांच्या भाडेपट्ट्याने आय. आय.टी. धारवाडला देऊ केला. मग दर वर्षी जरुरीप्रमाणे इमारतींचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) करावे असे ठरले. अजूनही या परिसरात शेती होती, झाडांना हाताला लागतील असे आंबे लगडले होते. पवईला नेण्यासाठी त्यांतले दोन-चार तरी आंबे तोडून घेण्याचा मोह आवरला नाही. या परिसराला लागूनच कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायपीठ (Dharwad Bench, High Court of Karnataka) आहे, त्याची गडद तांबड्या रंगाची इमारत भारावून (imposing) टाकत होती.

सुरुवातीच्या काळात, म्हणजे स्थायी परिसरात आपल्याला हव्या तशा इमारती नव्याने बांधून पुऱ्या होईपर्यंत, वाल्मीचा परिसर वापरायला मिळणे धारवाडच्या आय.आय.टी.साठी फारच उपकारक होते. सुमारे त्याच वेळी सुरू झालेल्या गोव्यातील आय.आय.टी.ची स्थिती या मानाने फारच कठीण होती, सगळे कामकाज गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका इमारतीतूनच चालवावे लागत होते.

कर्नाटक भवनात परतल्यावर मी व निर्मला जवळपास पायी फिरलो. एखाद्या नव्या जागेची ओळख करून घ्यायची असेल तर पायी फिरण्यासारखे दुसरे काही नाही. समोरच ‘बसप्पा खानावळी’ होती. तिथला गरम भाकरी, भरल्या वांग्यांची भाजी आणि दही हा बेत उत्कृष्ट होता. भिंतीवर लटकावलेल्या एका फलकावर इंग्लिशमध्ये लिहिले होते ‘येथे धूम्रपानाचा विचारसुद्धा करण्याची परवानगी नाही.’ आणखी कोणते सद्वाक्य हवे? बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला बाबूसिंग ठाकुर यांनी बनवलेल्या धारवाडी पेढ्यांचे दुकान होते. असा लुसलुशीत खमंग पेढा मी आतापर्यंत खाल्ला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला वीस किलोमीटरवरील हुब्बळीचा फेरफटका मारता यावा म्हणून आय.आय.टी.ने गाडी पाठवली. वाटेत एक मोठे सरोवर लागले, उंकल (Unkal) नावाचे, त्याच्या मध्यभागी असलेला विवेकानंदाचा पुतळा खूप लांबूनही स्पष्ट दिसत होता. शिवाय एस.डी.एम. वैद्यकीय कॉलेज व त्यांचे हॉस्पिटल वाटेवरच होते. धारवाडच्या आय.आय.टी.त काम करायला लागल्यावर काही विशेष आजार झाला तर आम्हाला इथेच यायचे होते. हुब्बळीमधील सिद्धारूढ मठ आणि चंद्रमौलेश्वर मंदिर आमच्या कायमचे लक्षात राहिले. खरे म्हणजे धारवाड व हुब्बळी ही जोडशहरे आहेत, धारवाड प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र, तर हुब्बळी व्यावसायिक व व्यापारधंद्याचे केंद्र, दोन्ही एकमेकांना पूरक.

आमची समन्वेषी भेट (exploratory visit) फारच सुरळीत गेल्याने धारवाडला जाण्याबाबत काहीच दुमत नव्हते. मी प्राध्यापक शेषूंना एवढेच सांगितले की काही कारणाने आम्हा दोघांपैकी कुणाला धारवाडची हवा मानवली नाही तर मात्र लवकर परतावे लागेल, नाही तर मी दोन वर्षे तिथल्या आय.आय.टी.मध्ये शिकवायला तयार आहे. मे महिन्याच्या मध्याला मला त्यांचे नियुक्तिपत्र आले आणि 1 ऑगस्ट 2017 रोजी मी तेथे रुजू झालो. या वेळी जाताना मात्र आम्ही दोघे मुंबईहून धारवाडला रात्रभरात पोचणाऱ्या रेल्वेने गेलो आणि धारवाडला न्यायचे बरेचसे सामान आमच्याच गाडीतून धारवाडच्या एका वाहनचालकाबरोबर पाठवून दिले. आमची राहण्याची व्यवस्था कल्याणनगरमधील ‘साई पर्ल’ (Sai Pearl) नावाच्या इमारतीच्या एका प्रशस्त सदनिकेत केली होती. ही जागा शांत वातावरणाची होती, शहराच्या मुख्य बाजारात जाण्यासाठी दर 30 मिनिटांनी बस जा-ये करत असे. शिवाय साई पर्लमध्ये राहणाऱ्या प्राध्यापकांना सकाळी आय.आय.टी.त घेऊन जाण्यासाठी व सायंकाळी परत आणण्यासाठी एक खास गाडी दोन चकरा मारत असे. ही सोय फारच वाखाणण्याजोगी होती; आपण कोणी बडे अधिकारी असल्यागत आम्हाला कधी कधी वाटून जात असे.

मी धारवाडला पोचलो त्याच आठवड्यात तेथील आय.आय.टी.तील नवे सत्र सुरू झाले. संयुक्त प्रवेश परीक्षेमधील (Joint Entrance Examination, JEE) पात्रतेनुसार ज्यांनी आय.आय.टी. धारवाड ही संस्था बी. टेक. पदवीसाठी निवडली आहे असे 120 नवे विद्यार्थी आणि त्यांना पोचवायला आलेले त्यांचे पालक परिसरात दाखल झाले. त्या सगळ्यांच्या मनात एक प्रकारची धाकधूक होतीच. ती निवारण्याचे काम आम्हा शिक्षकांना आणि प्रशासकांना करावे लागले. सत्राच्या पहिल्याच दिवशी माझी गणित शिकवायची पाळी होती. जे.इ.इ.च्या पाठ्यक्रमातील पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र या विषयांपेक्षा गणित हा विषय जास्त कठीण मानला जातो. मुलांच्या मनातील गणिताबद्दलची भीती तर मला कमी करायची होतीच, पण त्याबरोबरच आतापर्यंत पाठांतर करून मिळवलेले प्रावीण्य पुरेसे नसणार, स्वतः तर्कशुद्ध विचार करून व शिकवलेली प्रमेये वापरून गणिताचे प्रश्न सोडवावे लागणार आहेत हे त्यांच्या मनात बिंबवायचे होते. हा अभ्यासक्रम मी आठवड्यातून तीन तास शिकवणार होतो. पवईच्या आय.आय.टी.त तोच अभ्यासक्रम अलीकडच्या काळात शिकवला असल्याने व्याख्यान देताना संगणकाद्वारे दाखवायची सरकचित्रे (slides) तयार होती. अभ्यासक्रमाचा आवाका व खोली किती ठेवायची याची मला पूर्ण कल्पना होती. अर्थात इथल्या मुलांची अखिल भारतीय स्तरावरील क्रमवारी पवईच्या आय.आय.टी.त प्रवेश घेणाऱ्या मुलांपेक्षा बरीच खालची असल्याने सर्वच प्रमेये सोपी करून शिकवणे योग्य ठरले. गणित विषयाची व्याख्याने समजण्यापेक्षाही त्यांवर आधारलेले प्रश्न स्वतः सोडवता येणे महत्त्वाचे असते. याचा सराव करून घेता यावा म्हणून दर आठवड्यात एक तास पाठनिर्देशाची (tutorial) योजना होती. वर्गातील 120 मुलांपैकी 40 मुलांचा एक असे तीन भाग करून पाठनिर्देशाचे संचालन तीन सहयोगी (associate) जणांवर सोपवले. या तिघांनाही असे काम आय.आय.टी.मध्ये करण्याचा अनुभव होता, तरीही प्रत्येक पाठनिर्देशाच्या आधी मी त्यांना माझ्या कार्यालयात बोलावून त्या दिवशी सोडवायच्या सर्व प्रश्नांची उजळणी करत असे. शिवाय व्याख्यानाआधी सरकचित्रांच्या प्रती तिघांकडे पाठवून त्या तपासायला सांगत असे, त्यांच्याकडून सूचना मागवत असे. या संदर्भात डॉ. प्रियब्रत बाग या सहयोग्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सर्व सरकचित्रे बारकाईने वाचून अनवधानाने राहून गेलेल्या कित्येक दुरुस्त्या तो दाखवून देत असे. सत्राच्या मध्याला दोन तासांची एक परीक्षा, तिच्या आधी व नंतर एक-एक चाचणी परीक्षा (quiz) आणि सत्राच्या शेवटी तीन तासांची अंतिम परीक्षा असे मूल्यमापन (evaluation) करायची पद्धत मी ठेवली होती. हाच परिपाठ नंतरच्या तीन सत्रांत शिकवत असलेल्या अभ्यासक्रमांबाबत मी चालू ठेवला. परीक्षेत मी बहुविकल्पी प्रश्न (Multiple Choice) शक्यतो कमी प्रमाणात ठेवत असे, कारण त्यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कुवतीबद्दल खात्री देता येत नाही. अशा प्रत्येक प्रश्नाची चार संभाव्य उत्तरे प्रश्नपत्रिकेत दिलेली असतात आणि त्यांपैकी एकच उत्तर बरोबर असते. विद्यार्थ्याने फक्त बरोबर असणाऱ्या उत्तरावर फुली मारायची असते. चुकीच्या तीन उत्तरांपैकी एकावर फुली मारली तर त्याला उणे गुणांकन मिळे. बरोबर असणारे उत्तर सोडून बाकीची तीन उत्तरे सत्याभासी (plausible) असावीत म्हणून मी एक पद्धत वापरत असे. परीक्षेआधी माझ्या सहयोग्यांना असे प्रश्न मी सोडवायला सांगायचो. जर काही कारणाने त्यांची उत्तरे चुकीची आली तर मग ती उत्तरे सत्याभासी समजायला हरकत नसे.

पवईच्या आय.आय.टी.त काम करत असताना प्राध्यापक सुधीर घोरपडे व मी अशा दोघांनी मिळून कलन आणि वास्तव विश्लेषण (Calculus and Real Analysis) या विषयांवर एक पुस्तक लिहिले, आणि ते 2006 साली अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील श्प्रिंगर या प्रख्यात कंपनीने प्रसिद्ध केले. भारतातील विक्रीसाठी त्या पुस्तकाची कागदी बांधणी असलेली पाच-सात पुनर्मुद्रणेही झाली होती. ऑक्टोबर 2016मध्ये म्हणजे सुमारे दहा वर्षांनी श्प्रिंगरच्या संपादकांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लिहिण्याबद्दल आम्हा दोघांना सुचवले. त्यांची एक अट अशी होती की दुरुस्त्या आणि किरकोळ बदल सोडून दुसऱ्या आवृत्तीतला कमीत कमी वीस टक्के मजकूर नवा असला पाहिजे. याचा अर्थ आम्हाला बरेच नवीन लिखाण करायला हवे होते. आम्ही ते मान्य केले; एक संपूर्ण नवे प्रकरण व दोन नवी परिशिष्टे लिहायचे ठरवले. 2018 सालाच्या डिसेंबर महिन्याअखेर अंतिम प्रत लिहून तयार करण्याचा आमचा इरादा त्यांनी मानला. हा काळ माझ्या धारवाडमधील सुरुवातीच्या वास्तव्याचाच होता. दूरध्वनी आणि इमेलने मी व सुधीर घोरपडे एकमेकांबरोबर सल्लामसलत करू शकत असलो तरी प्रत्यक्ष भेटून तपशीलवार व सविस्तर चर्चा केल्यानेच बऱ्याच प्रश्नांचा निकाल लावणे सोयीचे असते. यासाठी आय.आय.टी. धारवाडने सुधीरला दोन वेळा आमंत्रण पाठवले आणि तो एकूण सुमारे पंधरा दिवसांसाठी धारवाडला आला. तो कर्नाटक भवनमध्ये उतरत असे व मी तेथे जाऊन रात्री उशिरापर्यंत त्याच्याबरोबर काम करत असे. बऱ्याच लहान-मोठ्या मुद्द्यांवर निर्णय घेता घेता अक्षरशः रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती व्हायची. सुधीर घोरपडेने माझ्या नव्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी एक सुबोध पण आकर्षक व्याख्यानही दिले. त्याचप्रमाणे मीही एकदा पवईच्या आय.आय.टी.ला भेट दिली, आणि एकदा तो जेथे एक सत्रभर शिकवत होता त्या गोव्यातील आय.आय.टी.लाही गेलो. या प्रकारे पुस्तक लिखाणाचे काम उरकते घेऊन अखेर मार्च 2018मध्ये आम्ही दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना लिहिली आणि तिची पूर्ण प्रत इंटरनेटद्वारे न्यू यॉर्कला पाठवून दिली. पहिल्या आवृत्तीत 432 पाने होती तर दुसरीत होती 538 पाने. नव्या पुस्तकावर लेखक म्हणून सुधीरची संलग्नता (affiliation) पवईची आय.आय.टी., तर माझी संलग्नता आय.आय.टी. धारवाड अशी नोंदली होती. धारवाडशी संलग्नता असलेल्या पहिल्या थोड्या पुस्तकांपैकी हे एक होते.

आय.आय.टी. धारवाडच्या त्या सुरुवातीच्या दिवसांत काही महत्त्वाच्या निवडी करायच्या होत्या. उदाहरणार्थ, ब्रीदवाक्य (motto) आणि परिचयचिह्न (logo). निदेशक शेषु यांनी सर्व प्राध्यापकांकडून सूचना मागवल्या व नंतर एक खास सभा बोलावली. अर्थातच खूप जणांच्या आवडी भिन्न भिन्न होत्या, आणि अशा बाबतीत एकमत होणे दुरापास्तच असते. शेवटी तीन जणांची एक समिती नेमण्यात आली, पवईच्या आय.आय.टी.हून इथे शिकवायला आलेले प्राध्यापक महेश पाटील, हृषिकेश जोशी आणि मी यांची. कदाचित संस्कृत जाणणारा म्हणून माझा समावेश झाला असावा. बऱ्याच पर्यायांचा विचार केल्यावर समितीने एक शिफारस पाठवली व पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर चर्चा झाल्यावर ती मान्यही झाली.


IIT Dharwad Logo

या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे ‘जी विमुक्ती देते तीच विद्या’. विमुक्ती म्हणजे स्वातंत्र्य. परिचयचिह्नाचा आकृतीबंध पक्का करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2017 रोजी पवईच्या आय.आय.टी.तील औद्योगिक अभिकल्प केंद्रामधील (Industrial Design Centre) प्राध्यापक श्रीकुमार धारवाडला आले होते. या चिह्नातला खालचा भाग एक पाने उघडून ठेवलेले पुस्तक दर्शवतो, तर वरचा भाग कमळ, सूर्य व दोन्ही हात वर करणारा एक अमूर्त मानव दाखवतो. माझ्यासारख्या अभ्यागत प्राध्यापकांना निदेशकांनी आणखी एकदाच सल्लामसलत करायला बोलावल्याचे मला आठवते, त्यांना द्यायच्या घरभाड्यासंबंधी किंवा वैद्यकीय खर्चासंबंधी. आमची मते आजमावलीच पाहिजेत असे काही नसले, तरी आमच्या दीर्घकालीन अनुभवांचा जास्त उपयोग करून घेता आला असता तर आय.आय.टी. धारवाडला उपकारक ठरले असते व आम्हालाही त्याचे समाधान वाटले असते.

आय.आय.टी. धारवाडमध्ये माझा अधिकृत संबंध आला तो निदेशक शेषु आणि दोन अधिष्ठाते प्राध्यापक प्रभू व प्राध्यापक प्रसन्न यांच्याबरोबर. निदेशकाची जागा सर्वात वरची व अधिकारयुक्त असल्याने त्यांच्यात व इतरांच्यात एक प्रकारचे अंतर, काहीशी औपचारिकता नेहमी असते. परंतु माझ्या बाबतीत तसे काही नव्हते. मी धारवाडमध्ये शिकवायला सुरुवात केल्यावर थोड्याच दिवसात शेषु माझ्याशी गमतीने बोलू लागले, माझी मस्करी पण करू लागले, अर्थात एकीकडे आदरभावना राखून. मी दिसलो की ते नेहमी ‘हॅलो, बॉस!’ असे पुकारत. खरे म्हणजे तेच माझे वरिष्ठ होते. मग मीही माझ्या वयोवृद्धतेचा वापर करून त्यांची हलकी थट्टा करायची संधी सोडत नसे. एके दिवशी हे परस्पर कुरघोडी करणे जरा जास्तच झाल्याचे आम्हा दोघांनाही वाटले. तेव्हा शेषूंनी माझ्याबरोबर एक सौदा (deal) केला: एका दिवसात ते माझी एकदा चेष्टा करू शकतात व मीही त्यांची एकदाच. नंतर केव्हा तरी ते एकाच दिवशी दुसऱ्यांदा थट्टा करताहेतसे दिसल्याबरोबर मी त्यांना थांबवू लागलो, तर ते लगेच म्हणाले, ‘निदेशकाचा खास हक्क (prerogative) मी वापरतोय.’ दोघांनाही हसू आवरेना. प्राध्यापक प्रभू पवईच्या आय.आय.टी.हून काही वर्षांसाठी येथे आले होते. ते दररोज हुब्बळीहून स्वतःच्या गाडीने यायचे आणि उशीरापर्यंत कामात गुंतलेले असायचे. सर्व शैक्षणिक कार्यक्रमांची आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाची (Student Welfare) जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांना क्षणाची उसंत नसे. ते इकडून तिकडे इतक्या जलद जात की बोलता बोलता त्यांच्याबरोबर चालत राहणे मलाच काय पण तरुण मुलांनाही जड जाई. मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्या की मोठे अधिकारही प्राप्त होतात. मात्र सर्व बाजू लक्षात घेऊन ते अधिकार वापरले तरच संघर्ष टळू शकतात हे मला उठून दिसत असे. प्राध्यापक प्रसन्न आय.आय.टी. गुवाहत्ती सोडून त्यांच्या कार्यकालातच धारवाडला आले होते. त्यांच्याकडे संशोधन व विकास, तसेच सगळ्या शिक्षकांच्या कल्याणाची (Faculty Welfare) जबाबदारी होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व मला शांत व वागणूक व्यवहारी वाटत असे. त्यामुळे त्यांच्यावर कुणाचा रोष क्वचितच ओढवत असे. मला रजा, प्रवास वगैरे ज्या काही गोष्टींची आवश्यकता होती, ती त्यांनी तत्काळ भागवली.

धारवाडमध्ये माझा दोन अभ्यागत प्राध्यापकांशी जवळून परिचय झाला. एक होते पवईहून आलेले रसायनशास्त्र विभागातले प्राध्यापक टेंबे. ते आमच्या साई पर्ल इमारतीतच राहायचे, त्यांची वृद्ध आईदेखील त्यांच्याबरोबर असायची. माझ्याप्रमाणेच ते आय.आय.टी. धारवाडला नव्याने आलेल्या मुलांना एक अभ्यासक्रम शिकवत, मी गणिताचा तर ते रसायनशास्त्राचा. नंतर ते पर्यावरण विज्ञानावरील अभ्यासक्रमही शिकवू लागले. सुरुवातीपासूनच ते दररोज नियमाने योगासने करत व माझ्यासारख्यांना शिकवतही. त्यांचे शाळा-कॉलेजमधले शिक्षण धारवाडलाच झाले असल्याने स्थानिक लोकांशी ते व त्यांची आई सहज संवाद साधू शकत. आम्ही धारवाडला राहायला लागल्यानंतर अडीच महिन्यांनी जोग धबधब्याला जाऊन यायचा बेत केला. टेंबे आणि त्यांची आई यायला खुशीने तयार झाले. त्यांचे नातेवाईक सन्नकेरी, शिरसी, चंद्रगुत्ती अशा वाटेवरच्या गावांत राहायचे. माझी गाडी मी धारवाडला नेली असल्याने कुणा वाहनचालकाला बरोबर घेऊन प्रवास करायचे म्हणत होतो. पण टेंब्यांनी स्वतः गाडी चालवायचा आग्रह धरला. मग मी म्हटले की आपण दोघे आळीपाळीने गाडी चालवू या. त्याला पण ते राजी नव्हते, त्यांना एकट्याला गाडी चालवायची होती. मग पेट्रोलचा खर्च मी करतो असे त्यांना म्हटले. त्यावर ते काहीच बोलले नाहीत. आधी सहस्रलिंगेश्वर मंदिराला आणि मग शिरसीमधील प्रचंड मरिकाम्बा मंदिराला भेट दिली. तेथे रात्रीच्या वेळी यक्षगान नावाचा खास कार्यक्रम चालू होता, त्यालाही काही काळ उपस्थित राहिलो. दुसऱ्या दिवशी जिथे शरावती नदी साडेआठशे फूट खाली कोसळते तो गिरसप्पा येथील जोग धबधबा दोन्ही कडांवरून पाहिला. संध्याकाळी उशीरा धारवाडला परत पोचेपावेतो टेंबे यांना वीस-एक तास तरी नेटाने गाडी चालवावी लागली, कारण माझी गाडी चालवायला मलाच बंदी होती ना! कदाचित कोणी आपल्याइतकी सुरक्षितपणे गाडी चालवेल की नाही याची त्यांना खात्री नसावी. प्रवासखर्चाचा हिशोब करायची वेळ आली तेव्हा टेंबे म्हणाले की गाडी तुमची आणि ती चालवायचे काम मी केले म्हणून बरोबरी झाली आहे, तर आता पेट्रोलचा खर्च आपण दोघे निम्मा-निम्मा करू या. हे वरपांगी रास्त वाटत असले तरी पेट्रोलचा खर्च तरी फक्त मी केला पाहिजे असे मी मानत होतो. या प्रवासात आणि नंतरही त्यांची एक नेहमीची शिस्त माझ्या लक्षात आली. ते कुठल्याही खाद्यपदार्थाला कधीही नावे ठेवत नाहीत व काहीही पानात टाकत नाहीत; जर पानात दुसरा कोणी टाकत असला तर त्याच्याशी सौम्यतेने बोलून त्याला परावृत्त करतात. एखादा पदार्थ जर खावासा वाटत नसेल तर तो पानात घेऊच नये असे ते मानत. केवढी महत्त्वाची आहे ही गोष्ट. जेवायच्या सुरुवातीला ‘वदनी कवल घेता ...’ हा श्लोक म्हणताना ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे नुसतेच उच्चारून काही उपयोग नसतो.

मी धारवाडला येऊन एक सत्र संपल्यावर, म्हणजे 2018 सालच्या सुरुवातीला, माझी आणि प्राध्यापक नारायण पुणेकर यांची पुनर्भेट झाली. त्यांच्या निवृत्तीच्या पाच-सहा वर्षे आधी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी पवईच्या आय.आय.टी.ने सोपवली होती. 2016 साली धारवाडला आय.आय.टी. सुरू करायचे ठरवल्यावर पवईच्या आय.आय.टी.ला सदुपदेशक (mentor) म्हणून नेमण्यात आले. एप्रिल महिन्यातच पुणेकरांना अधिष्ठात्याचे अधिकार देऊन शैक्षणिक कार्यक्रम सुसूत्रपणे चालवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाची काळजी वाहण्यासाठी पाठवण्यात आले. त्या वेळी शून्यातून सगळे विश्व उभे करायचे होते : प्रशासनासाठी जागा, वर्ग, प्रयोगशाळा, विद्यार्थीगृहे, शिक्षकांचे निवास, आणि या सगळ्याला लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचा प्रवाह चालू ठेवायचा होता. निरनिराळ्या संस्थांना आणि व्यक्तींना भेटून त्यांच्याकडून अभिवचने मिळवून ती कार्यवाहीत आणणे गरजेचे होते. अशाच प्रयत्नांतून वाल्मी (WALMI) या संस्थेच्या भल्या थोरल्या जागेचा कायापालट पुणेकरांनी सुरू केला. आय.आय.टी. धारवाडमध्ये नवीन शिक्षक सामील करून घेण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असल्याने पहिल्या काही वर्षांत पवईच्या आय.आय.टी.मधील निरनिराळ्या विषयांच्या प्राध्यापकांना धारवाडला पाचारण करणे क्रमप्राप्त होते. मग त्यांच्यासाठी राहण्याची चांगली सोय लगेच करावी लागणार. यासाठी धारवाड गावाच्या मध्यवर्ती भागातील ‘साई पर्ल’ नावाच्या इमारतीतील सहा सदनिकांचा भाडेपट्टा पुणेकरांनी पाच वर्षांसाठी करून घेतला. अशा एक ना दोन किती तरी गोष्टी तडीस नेल्यावर आय.आय.टी. धारवाडमध्ये 2016चे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट महिन्यात सुरू झाले. ते संपायच्या आधीच 2017 सालाच्या मार्च महिन्यामध्ये प्राध्यापक शेषु यांनी निदेशक म्हणून कार्यभार सांभाळला. थोड्याच काळात त्यांच्या हाती कारभार सोपवून पुणेकर मे महिन्यात पवईच्या आय.आय.टी.त परतले. यथाकाल पवईतील जीवविज्ञान व जैव अभियांत्रिकी (Bioscience and Bioengineering) विभागातून निवृत्त झाल्यावर आता पहिल्या वर्षातील मुलांना जीवशास्त्र (Biology) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून आले होते. पुणेकर मूळचे धारवाडपासून 30 किलोमीटर दूर पुणे-बंगलोर रस्त्याच्या जवळील कित्तूर या गावचे. कर्नाटकातली राणी चन्नम्मा याच गावची; तिला एका लढाईत पकडून इंग्रजांनी बंदी बनवले व कैदेतच ती मृत्यू पावली 1829 साली. पुणेकरांशी माझे सूर छान जमले. तसे पूर्वी आम्ही दोघांनीही एम.एस्सी.च्या पाठ्यक्रमांसाठी भारतभर घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे (Joint Admission Test for MSc, JAM) अध्यक्ष (Chairman) म्हणून काम केले होते. तेव्हा आमच्यांत आदरयुक्त संबंध निर्माण झालेच होते. ते आता जास्त दृढ झाले. आय.आय.टी. धारवाडच्या कामकाजाबद्दल आणि तिच्या होऊ घातलेल्या विकासाबाबत आम्ही बरीच चर्चा करत असू. आपण शिकवत असलेला अभ्यासक्रम संपवून मे महिन्यात ते मुंबईला परत गेले. त्यांच्या पायाभूत कामासाठी त्यांना आय.आय.टी. धारवाडने गौरवायचे ठरवले, व ऑगस्ट महिन्यातील संस्थापना दिवशी (Foundation Day) प्राध्यापक पुणेकरांना खास आमंत्रण गेले. त्या दिवशी व्यासपीठावर जाऊन त्यांना श्रीफळ आणि शाल अर्पण करायचा मान मला मिळाला. माझे काम उरकून मी व्यासपीठावरून उतरण्याआधी पुणेकरांनी मला थांबवले, आणि अक्षरशः खाली वाकून त्यांनी मला नमस्कार केला. मला किती ओशाळल्यासारखे वाटले असेल याची कल्पनाच केलेली बरी!

धारवाडच्या आजूबाजूच्या भागातील टेकड्या, वृक्षराजी आणि तिथल्या आल्हाददायक वातावरणामुळे कर्नाटकात त्याला छोटे महाबळेश्वर म्हणत. मुंबईच्या मानाने तिथली हवा कोरडी व थंड होती. पाऊसही फार पडत नसे; पण जेव्हा पडायचा तेव्हा हवेत चांगलाच गारठा यायचा. एकंदर वातावरण उत्साहवर्धक होते. आम्ही राहत होतो त्या कल्याणनगरमधील साई पर्ल इमारतीपासून कर्नाटक विद्यापीठ अगदी जवळ होते. बसने तिथे जायला दहा मिनिटे पुरत. तो जवळजवळ 900 एकरांचा परिसर खूपच शांत व स्वच्छ होता. तिथे रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जाणे आनंददायक असे. या विद्यापीठाची स्थापना 1950 मध्ये झाली. 1954 ते 1967 ही तेरा वर्षे रँग्लर डी. सी. पावटे या विद्यापीठाचे कुलगुरू होते. विद्यासौध नावाने ओळखली जाणारी प्रशासकीय इमारत त्यांच्याच प्रयत्नांनी बांधली गेली. या भव्य दगडी इमारतीचे उद्घाटन 1959 साली जून महिन्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे (University Grants Commission) अध्यक्ष चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. हा सगळा परिसर आता पावटेनगर या नावाने संबोधला जातो. मला आठवले की शाळेत असताना अकराव्या इयत्तेतील गणिताच्या अभ्यासक्रमासाठी व्ही. टी. ताटके आणि डी. सी. पावटे यांचे पुस्तक आम्ही वापरत असू.


Karnatak University

Karnataka University Pawate Statue

विद्यासौध, कर्नाटक विद्यापीठ कुलगुरू पावटे यांचा पुतळा

इमारतीच्या पुढ्यात उंच चौथऱ्यावर एक पुतळा मला दिसला. जवळ जाऊन पाहिले तर त्याच्या पायथ्याशी एक कोनशिला आढळली. तिच्यावर लिहिले होते: ‘हा पुतळा कुलगुरू पावटे यांच्याप्रती असणाऱ्या जनतेच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. तो त्यांच्या साठाव्या वाढदिवशी (म्हणजे 2 ऑगस्ट 1959 रोजी) उभारला गेला.’ ज्या अर्थी हा पुतळा विद्यासौध या मुख्य इमारतीच्या उद्घाटनानंतर दोन महिन्याच्या आत स्थापला जातो, त्या अर्थी इमारतीचे बांधकाम चालू असतानाच या पुतळ्याचेही चालू होते तर! नंतरची आठ वर्षे कुलगुरूंच्या कार्यालयात जाताना श्रीयुत पावटे आपल्याच पुतळ्याकडे दृष्टी टाकत जात असावेत. ‘कीर्तिरूपे उरावे’ या उक्तीचा ध्यास किती जोरदार असला पाहिजे! त्याची निश्चिती आपण स्वतः अधिकारपदावर असतानाच केली तर उत्तम, नाही का? पण या कारणामुळे ह्या पुतळ्याची कुचेष्टा झाल्याचेही माझ्या एका मित्राने सांगितले.

विद्यासौधाच्या जवळपास भटकताना मला व निर्मलाला एक बाग दिसली. इतर बागांत असतात तशी झाडे-झुडुपे, हिरवळी तर तिथे होत्याच, पण कित्येक विद्यार्थी तेथील बाकांवर गंभीरपणे अभ्यास करत बसले होते. सुरक्षा अधिकाऱ्याला विचारले तर त्याने सांगितले की ते ‘वाचन उपवन’ (Reading Park) आहे; गंमत-मजा करण्यासाठी आत जाता येणार नाही. मी आतापर्यंत भेट दिलेल्या अनेक शिक्षणसंस्थापैकी कुठेही असा प्रकार पाहिला किंवा ऐकला नव्हता.


Reading Park, Dharwad
Reading Park, Dharwad
‘विद्यार्जनासाठी हरित उद्यान’

Reading Park, Dharwad
Reading Park, Dharwad

प्रवेशद्वाराच्या वर दोन फलक होते. एकावर लिहिले होते, ‘वाचका रे, हात जोडून प्रवेश कर.’, तर दुसऱ्यावर लिहिले होते, ‘हे अक्षरधाम आहे, विहारधाम नव्हे.’ किती सुरेख कल्पना आणि तिची स्तुत्य अंमलबजावणी! आमच्याजवळ वह्या-पुस्तके नसली तरी आम्ही पूर्ण शांतता राखू, मोठ्याने बोलणार नाही अशी खात्री दिल्यावर आम्हाला आत जाऊ दिले. मी एका दगडी बाकावर बसून काही तरी वाचत असल्याचे नाटक केले व पाच-दहा मिनिटातच बाहेर पडलो. असे एकमेवाद्वितीय उद्यान निर्माण करण्याचा विचार कुलगुरू पावटे यांचाच होता का? तसे असेल तर मी त्यांच्यापुढे नतमस्तक.

धारवाडमधील सामान्य लोक सत्शील वाटले. बाजारहाट करताना आम्हाला कधीच फसवाफसवीचा सामना करावा लागला नाही. उलट काही वेळा अतीव सचोटीच बघायला मिळाली. एकदा एका दुकानातून बरीचशी प्लॅस्टिकची भांडी विकत घेऊन निर्मला घरी आली. आठवड्याभरानंतर त्या दुकानावरून जात असताना तो दुकानदार निर्मलाच्या मागे धावत आला. त्याच्या हातात एक भांडे होते. ‘अहो बाई, तुम्ही विकत घेतलेल्या वस्तूंपैकी हे भांडे दुकानातच राहून गेले’ असे म्हणून ते त्याने देऊन टाकले. आपल्या दुकानात प्रथमच आलेल्या गिऱ्हाइकाचा चेहरा सात दिवस लक्षात ठेवून केलेले असे सत्कृत्य पुण्यामुंबईकडे बघायला मिळेलसे वाटत नाही. धारवाडमधील बसवरचे नंबर कानडी लिपीत असल्याने आम्ही दुविधेत असायचो. पण बसवाहक आमची नेहमीच मदत करत, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली सवलतही उन्मेखून देऊ करत.

धारवाडमध्ये राहणाऱ्या काही लोकांबरोबर आमचा स्नेहभाव जमला. त्यांत प्रमुख म्हणजे साई पर्ल इमारतीतच राहणारे भट कुटुंब. विनोद भट मुळातले मंगलोरचे. सैन्यातून लवकर निवृत्ती घेतल्यावर त्यांनी बरीच वर्षे म्हैसूर किर्लोस्कर कंपनीत काम केले. त्यांच्या पत्नीचे नाव प्रभा, त्या धारवाड विद्यापीठात हिंदी विषयाच्या प्राध्यापक होत्या; त्यांच्याजवळ राहणारी त्यांची मोठी मुलगी अश्विनी आय.आय.टी. धारवाडच्या कार्यालयात काम करायची. आम्ही धारवाडमध्ये पाऊल टाकल्या दिवसापासून या तिघांनी आमची नुसती ख्यालीखुशालीच नाही विचारली तर वेळोवेळी छोट्यामोठ्या प्रश्नांतून मार्ग काढून दिले, कर्नाटकाच्या या भागातले रीतिरिवाज समजावले. आम्ही गोव्याला असताना जसे माधव व मित्रा बीर आमची काळजी वाहायचे त्याचीच ही पुनरावृत्ती होती. अशा संबंधांमुळे कुठलेही वास्तव्य सुखकर होते. मला व निर्मलाला धारवाडच्या होयसाला हॉटेलमधील दोसा फार आवडतो हे पाहून भट मंडळी दावणगेरे पद्धतीचा बेन्ने दोसा (Butter Dosa) खायला आम्हाला पीबीरोडवरील (Pune-Bangalore Road) अशोक सम्राट उपाहारगृहात घेऊन गेली. तसा लोण्याने माखलेला पण खुसखुशीत दोसा मी कधी खाल्ला नव्हता, आणि अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही पुन्हा खायला मिळाला नाही. आमच्या इमारतीजवळच राहणारी सुरेखा नावाची स्त्री विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवत असे. हाताने थापून अगदी पातळ बनवलेल्या ज्वारीच्या भाकरी ती आमच्या घरी पाठवायची, सोबतीला भरल्या वांग्यांची भाजी असली तर काय बहार यायची विचारू नका. धारवाडमधील सप्तपूरच्या बावीजवळ माझा शाळेतला मित्र वसंत जोशी आणि त्याची पत्नी गीता राहायची. तो माझ्यासारखा निवृत्त झाला होता, पण ती भौतिकोपचार (physiotherapy) देण्याचे काम करे. त्यांच्याकडेही आम्ही दोघे बरेचदा चहापानाला गेलो. तिचे मोठे भाऊ मदनमोहन यांनी धारवाडमध्ये सुरू केलेले डॉक्टर तावरगेरी नर्सिंग होम प्रख्यात होते. पंचाऐंशी वर्षाचे असतानाही दररोज थोडा वेळ तरी ते सल्ला देण्यासाठी दवाखान्यात जायचे. त्यांनी स्वतः निर्मलाला घशाच्या विकारासंबंधी मोफत तपासले आणि औषधही लिहून दिले. अशा वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध माणसांना कार्यरत बघून एक प्रकारची उभारी यायची मला.

आम्ही आमची गाडी धारवाडला नेली असल्याने त्या भागातल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या आणि निसर्गसमृद्धीच्या ठिकाणांना भेटी देणे सोपे झाले. आम्ही दोघे गाडी चालवू शकत होतो, तरी वयोपरत्वे गाडी दीर्घकाळ चालवणे योग्य नव्हते. पण दोन किंवा तीन दिवसांसाठी वाहनचालक सहज मिळायचा. आम्ही गोव्यात असताना जशी बरीच मित्रमंडळी तिकडे येऊन गेली, त्याप्रमाणे धारवाडला खूप नातेवाईक व मित्रमैत्रिणी यायचे व त्यांना घेऊन आम्ही हिंडायला निघायचो. बदामी-पट्टदकल-ऐहोले येथील पुरातन लेणी पाहिली. पुढे गेल्यावर कृष्णा आणि मलप्रभा नद्यांच्या कुडालसंगमावर नदीच्या पात्रात बांधलेले संगमेश्वर मंदिर फारच अनोखे वाटले. हंपी येथील दगडांची नैसर्गिक किमया बघत राहायला दोन दिवस पुरे पडले नाहीत. यल्लम्मा देवीचे मंदिर व नंतर गोकाक आणि गोडाचिनामल्की येथील धबधबे पाहून त्याच दिवशी धारवाडला परतलो खरे, पण मन तिकडेच रेंगाळत राहिले. या सर्व ठिकाणची स्वच्छता महाराष्ट्रातील यात्रेच्या जागांपेक्षा किती तरी पटींनी जास्त आढळली, आणि पुरातन लेण्यांचे संरक्षणही कसोशीने केलेले दिसले. तसेच कर्नाटक राज्य सडक परिवहन निगमाने (Karnataka State Tourism Development Corporation) चालवलेली बदामीचे हॉटेल मौर्य चालुक्य किंवा हंपीचे हॉटेल मौर्य भुवनेश्वरी ही निवासस्थाने मोक्याच्या जागी उभारली होती; टापटीप राखणारी आणि खिशाला परवडणारी होती. माझा पूर्वीचा विद्यार्थी शरद साने धारवाडला येऊन विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान देऊन गेला. तो जाण्याआधी त्याला धारवाडपासून सुमारे पन्नास किलोमीटरवरील अगडी थोटा या ठिकाणी घेऊन गेलो होतो. इथे कानडी खेडेगावांतील आयुष्याची व करमणुकींची झलक दाखवली जाते व उत्तर कर्नाटकातील खास खाद्यपेये चाखायला मिळतात. हे सगळे जरा कृत्रिमरीत्या घडवून आणताहेत अशी भावना होते खरी, पण बाहेरून आलेल्या माणसांना अस्सल जीवन अनुभवायला मिळणार तरी कसे? अहमदाबाद किंवा जयपूर जवळच्या ‘चोखी धानी’सारखीच ही जागा आहे.

धारवाडला असताना मी प्रत्येक सत्रात एका मोठ्या 120 मुलांच्या वर्गाला अभ्यासक्रम शिकवत होतो. पहिली तीन सत्रे संपल्यावर मी निदेशक शेषु यांना जाऊन सांगितले की सुरुवातीलाच बोलणे झाल्यानुसार येत्या सत्रात मी शेवटचा अभ्यासक्रम शिकवीन आणि मग मुंबईला परतेन. त्यांनी ते निर्विकार चेहऱ्याने ऐकून घेतले आणि ठीक आहे म्हणले. मला उगीचच वाटत होते की ते मला जास्त काळ राहण्याचा आग्रह करतील. परंतु त्यांचेही काही आडाखे असणारच. मी शिकवायचा शेवटचा अभ्यासक्रम सुरू व्हायच्या आधीच मला एक वाईट बातमी मिळाली; माझी अमेरिकेत राहणारी मोठी मुलगी कल्याणी एका कठीण दुखण्याने आजारी पडली होती. माझी पत्नी निर्मला ताबडतोबीने तिकडे रवाना झाली. सत्र सुरू होण्याची तारीख अगदी तोंडावर आली असल्याने मी अमेरिकेला जायचे लांबवले. गेल्या वर्षी शिकवलेलाच रेखीय बीजगणितावरचा (Linear Algebra) अभ्यासक्रम यावेळी माझ्या वाट्याला आला होता. महिनाभर शिकवून झाल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये मी माझ्या मुलीकडे जायचे ठरवले. माझ्या आतापर्यंतच्या व्यावसायिक जीवनामध्ये मी कधीच अभ्यासक्रम अर्धवट सोडून गेलो नव्हतो. पण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्यालाच सर्वाधिक प्राधान्य द्यावे लागते. प्राध्यापक नरसिंह शास्त्री यांनी उरलेला अभ्यासक्रम शिकवायचे मान्य केले. त्यांना मी गतवर्षी तयार केलेली व्याखानांची सगळी सरकचित्रे आणि पाठनिर्देशांसाठी रचलेले सर्व प्रश्न सुपुर्द केले. खरे म्हणजे जातीच्या प्राध्यापकाला दुसऱ्या कोणी असे कानमंत्र दिलेले आवडत नाहीत; त्याला आपण शिकवायचा अभ्यासक्रम स्वतःच विकसित करायला आवडतो. पण वेळ फार थोडा होता आणि माझी त्या अभ्यासक्रमातील बारा-चौदा व्याख्याने देऊन झाली होती, त्यामुळे काही पर्याय नव्हता. मी घाईघाईने माझ्या विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. आदल्या सत्रात मी त्या सगळ्यांना कलन (Calculus) विषयावरचा अभ्यासक्रम शिकवला होता, व त्यांच्याशी सुसंवाद जमवला होता; रशित सैया, हर्ष राज, गांद्रा जोसिता यांसारख्या काही जणांबरोबर तर वैयक्तिकरीत्याही बातचीत होत असे. परंतु आता यानंतर त्यांची भेटही होणार नव्हती, कारण मी प्रथम दीर्घकालीन रजा आणि नंतर उन्हाळ्याची सुट्टी घेतली असल्याने मी परतेपर्यंत ते सर्व आपापल्या घरी निघून जाणार होते.

मी व निर्मला अमेरिकेत असताना हळूहळू माझ्या मुलीच्या प्रकृतीला आराम पडला. कॅलिफोर्नियामधील मोहावे वाळवंटातील ‘मृत्यूची दरी’ (Death Valley) या ठिकाणाला आम्ही सर्वांनी भेटही दिली. शिवाय मी व निर्मला भारतात परतल्यावर सगळ्यांनी स्कॉटलंडची सफर करायचे ठरले. परंतु स्कॉटलंडला पोचल्यावर दोनच दिवसांत मला पुरस्थ ग्रंथीमुळे (Prostate Gland) अतोनात त्रास होऊ लागला. मला व निर्मलाला तत्काळ मुंबईला परतणे भाग होते. 17 जून 2019 रोजी मी पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये पोचेतो माझ्या रक्तातील क्रिॲटिनिनचा (creatinine) स्तर इतका वाढला होता की लगेच अपोहन (dialysis) करून माझे प्राण वाचवावे लागले! नंतर झालेले मूत्रमार्गातील संसर्ग (urinary infection) घालवल्यावर यथाकाल शस्त्रक्रिया करून पुरस्थ ग्रंथीचा बराचसा भाग कापून टाकावा लागला. हे सगळे आटपून मला आमच्या पवईच्या घरी यायला 25 जुलैचा दिवस उजाडला. मग धारवाडमधील माझा पदावधी (tenure) 31 जुलैला संपायच्या आधी कसा मी जाणार तिकडे गाशा गुंडाळायला? प्राध्यापक टेंबे यांनी माझ्या कार्यालयाची व आमच्या साई पर्लमधील सदनिकेची आवराआवर केली, जरूरीचे सामान आमच्या गाडीत घातले. भर पावसातून सुमारे 600 किलोमीटर स्वतः गाडी चालवत ते आमच्या पवईच्या घरी येऊन थडकले, तो दिवस होता 26 जुलै. याला म्हणायचे मित्रकर्तव्य!

त्याच दिवशी पवईच्या आय.आय.टी.ने मला ‘गुणश्री प्राध्यापक’ (Professor Emeritus) हे बिरुद माझ्या अनुपस्थितीत बहाल केले. बेचाळीस वर्षे निरनिराळ्या स्तरांवर काम करून संस्थेची जोपासना केल्याची ही पावती होती. तीस वर्षांपूर्वी प्राध्यापक वर्तक गुणश्री प्राध्यापक झाल्याचे मला माहीत होते. मध्यंतरी प्राध्यापक देवीदास पै यांना हा मान मिळाला होता. 1988 सालापासूनच्या 31 वर्षांच्या कालखंडात गणित विभागातील कुणाला अशी मान्यता मिळण्याची ही तिसरीच वेळ होती. आता माझा पवईच्या आय.आय.टी.बरोबर थोडा तरी संबंध कायम टिकून राहणार होता. याबद्दल खूप बरे वाटत असले तरी प्रथम मला माझी तब्येत बरी करायची होती. निर्मलाच्या अथक परिश्रमांमुळे माझी गाडी सावकाश का होईना मूळ पदावर आली. धारवाडमधील माझ्या विद्यार्थ्यांचा आठ महिन्यांपूर्वी मला वरवरचा निरोप घ्यावा लागला होता, याचा वचपा काढण्यासाठी तिकडे जाऊन मुलांना यथेच्छ भेटावे, हवे तर गणितातल्या एखाद्या रंजक विषयावर व्याख्यान द्यावे असा विचार केला. सर्वांना सहज समजेल व कुतूहल पैदा करेल असा गणितातील विषय म्हणजे मूळसंख्या (prime numbers). अगदी बाळबोध सुरुवात करून अनेक शतकांपासून जगातील कुणालाही सोडवता न आलेल्या काही प्रश्नांबद्दल मी विद्यार्थ्यांसमोर बोललो. नंतर चहापान झाले.


IIT Dharwad Class

पण मुख्य म्हणजे मुलांनीच एक करमणुकीचा कार्यक्रम सादर केला. मला श्रोत्यांच्या मध्यभागी बसवले. गाणी म्हटली, व्यासपीठावरून माझी नक्कल करून दाखवली, नंतर मला तिकडे बोलावून माझी आयत्यावेळची (impromptu) मुलाखत घेतली. इत्थंभूत गोष्टींचे ध्वनिचित्रमुद्रण (audio-visual recording) करून त्यांनी मला त्याची एक प्रत पाठवून दिली. अशा खेळीमेळीच्या वातावरणातून मिळालेला आपलेपणा हीच धारवाडला मी केलेली खरी कमाई.

पश्चलेख (Postscript) : आय.आय.टी. धारवाडचा स्थायी परिसर चिक्कमल्लिगवाड येथे योजला होता, सध्याच्या तात्पुरत्या वाल्मी परिसरापासून अवघ्या चार-पाच किलोमीटरवर. मार्च 2022 पर्यंत स्थायी परिसरातील बऱ्याचशा इमारती उभारल्या जात होत्या. लवकरच तिकडे स्थानांतर करायचे होते. केंद्रीय सरकारने किती तरी मोठ्या प्रमाणावर आपली साधनसंपत्ती कर्नाटक सरकारच्या ताब्यातील वाल्मी परिसरात ओतली होती. तेव्हा या दोन्ही सरकारांच्या सहकार्याने व काही खासगी गुंतवणुकींचा उपयोग करून वाल्मी परिसरात (Incubation Centre, Research Park, Testing Facility, Skilling Centre) अशा गोष्टी निर्माण करण्याच्या योजना आय.आय.टी. धारवाडचे निदेशक शेषु पशुमर्ती आखत होते. त्यांचा पाच वर्षांचा नियुक्तिकाल संपत आला असल्याने त्यांनी पुनर्नियुक्तीसाठी शिक्षणखात्याकडे अर्ज केला. त्यांची नेमणूक झाली खरी, पण ती आय.आय.टी. गोवाचे निदेशक म्हणून, व दुसऱ्या कुणाला तरी आय.आय.टी. धारवाडचे निदेशक नेमण्यात आले. शेषु पशुमर्ती यांनी आपली नवी नेमणूक साभार नाकारली, आणि ते परत पवईच्या आय.आय.टी.तील यंत्र अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या घडामोडीला काय म्हणायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे.

(समाप्त)
---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

हा ही भाग अत्यंत वाचनीय. इतक्या सुंदर लेखमालिकेवर अगदी कमी प्रतिसाद यावेत याचे वाईट वाटते. पण वाचने होत आहेत हे चांगले आहे.

असेच लिहीत रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात उल्लेख असलेले INDIAN INSTITUTE OF INFORMATION TECHNOLGY आहे का ? की I I T Indian institute of technology
ही संस्था आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Indian Institute of Technology, Dharwad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे सर्व लेख आवर्जून वाचतो. दर वेळेला प्रतिसाद देता येईलच असे नाही. परंतु लेखन चालू ठेवा ही विनंती विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0