कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर
कोव्हिडचा अनपेक्षित उद्रेक झाला आणि जगातील सर्व देशांना एका अनोळखी संकटाला तोंड द्यावे लागले. कुठल्याच देशाची तयारी नव्हती. सुरुवातीस गोंधळ झाला. करोना किती वेगाने पसरणार याची कल्पना आली नाही. उपचार आणि औषधे याबाबत अनिश्चितता होती. असे असताना विविध देशांनी अपेक्षेपेक्षा जलदगतीने लसींची निर्मिती केली. मात्र मानवतेसाठी सर्व देशांनी एकत्र येणे, गरीब देशांना मदत करणे, औषधी कंपन्यांनी नफ्याऐवजी मानवतेला प्राधान्य देणे आवश्यक होते. कदाचित अजूनही दर्जेदार लसी बनल्या असत्या. आणि त्या त्वरित जगभर वितरित होऊन कोव्हिड-१९ लवकर आटोक्यात आला असता. मात्र हा वेगळा विषय आहे. या लेखात कोव्हिड लसींची परिणामकारकता आणि कोव्हिड होण्याची शक्यता यावर लक्ष केंद्रित केले आहे. उदाहरणांसाठी अमेरिकेतील आणि भारतातील लसींवर चर्चा केली आहे.
जगात ज्या लसींना निरनिराळ्या देशात संमती मिळाली आहे त्यांच्या नावाबरोबर परिणामकारकतेचा आकडा (% efficacy) दिला जातो. याचा अर्थ काय? अमेरिकेत सध्या तीन लसी दिल्या जात आहेत. त्या म्हणजे फायझर (९५% परिणामकारकता), मॉडर्ना (९४% परिणामकारकता) आणि नुकतीच आलेली जॉन्सन अँड जॉन्सन (७०% परिणामकारकता) किंबहुना सर्व जगात इतर लसींच्या तुलनेत हिची परिणामकारकता खूप खाली आहे. त्यामुळे मिशिगनमधील डिट्रॉइट शहराला जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा पुरवठा गेला तेव्हा डिट्रॉइटच्या महापौरांनी परिणामकारकता तुलनेने कमी आहे ती लस स्वीकारायला नकार दिला. ते बरोबर होते का? भारतातील मिळणाऱ्या दोन लसी म्हणजे ऑक्सफर्डची ॲस्ट्राझेनेका म्हणजे कोव्हिशिल्ड (९०% परिणामकारकता) आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (८१% परिणामकारकता). म्हणजे इथे ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड सरस वाटू शकते. तसे खरे आहे का?
पण कुठली लस वापरावी हे ठरवण्यासाठी हे आकडे तसे फसवे आहेत. ते कसे बघण्यासाठी आधी हे आकडे कसे काढले जातात हे बघणे आवश्यक आहे. कुठल्याही लसीच्या चाचणीत हजारो उमेदवार असतात. उदा. फायझरच्या चाचणीत ४३ हजार उमेदवार होते. उमेदवारांचे दोन सारखे गट केले जातात. त्यांना ‘प्लॅसीबो’ गट आणि ‘लस’ गट म्हणूयात. उमेदवारांना आपण कोणत्या गटात आहोत हे अजिबात माहीत नसते. ‘प्लॅसीबो’ गटाला प्लॅसीबो, म्हणजे खोटी लस दिली जाते. व्हिटॅमिन बी किंवा तत्सम इंजेक्शन दिले जाते. ‘लस’ गटाला मात्र चाचणी करण्यात येणारी लस दिली जाते. ही माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. उमेदवारांना तर अजिबात माहीत नसते. यानंतर या सर्वांना दैनंदिन आयुष्याप्रमाणे इतर जनतेत मिसळू दिले जाते. त्यांचे निरीक्षण करण्यात येते. काही कालावधीनंतर त्यांचे टेस्टिंग केले जाते. दोन्ही गटातील कोव्हिड झालेल्या पेशंटच्या मोजणीच्या विशिष्ट समीकरणाने परिणामकारकतेची संख्या काढतात. दोन गटातील कोव्हिड झालेल्या संख्येतील फरकाला ‘प्लॅसीबो’गटातील संख्येने भागतात आणि नंतर १००ने गुणतात.
परिणामकता % = (दोन गटातील कोव्हिड झालेल्यांच्या संख्येतील फरक) / (‘प्लॅसीबो’ गटातील कोव्हिड झालेल्यांची संख्या) x १००
आता ही आकडेवारी कशी असते ते बघू यात. उदाहरणार्थ जर ‘प्लॅसीबो’ गटात ५० आणि ‘लस’ गटात ५० रोगी असतील तर परिणामकारकता शून्य टक्के. कारण लस दिली काय, नाही दिली काय दोन्ही गटात कोव्हिडचे पेशंट सारखेच. परंतु जर ‘प्लॅसीबो’ गटात सर्व १०० पेशंट आणि ‘लस’ गटात कुणीच नाही तर परिणामकारकता १०० टक्के.
वास्तवात फायझरच्या चाचणीत दोन्ही गटात एकूण १७० उमेदवारांना कोव्हिड झालेला आढळला. त्यातील ‘प्लॅसीबो’ गटातील १६२ उमेदवारांना कोव्हिड झाला तर ‘लस’ गटात उर्वरित ८ उमेदवारांना कोव्हिड झाला. त्यांच्यातील फरक १६२ - ८ म्हणजे फरक १५४ आहे. यावरून आपल्याला वरील समीकरण वापरून काढता येईल. १५४ भागिले १६२ गुणिले १००. फायझरची परिणामकारकता ९५% आहे.
फायझरची परिणामकारकता % = 154 /162 x 100 = 95%
फायझरची परिणामकारकता ९५% आहे याचा अर्थ फायझरची लस घेतलेल्या दर १०० जणांपैकी ५ जणांना कोव्हिड होऊ शकतो असा अजिबात नाही. तसे अनुमान चुकीचे आहे. हे जे परिणामकारकतेचे आकडे आहेत ते शास्त्रज्ञांना चाचणीत काय आढळले ते आहेत. हे आकडे संशोधनासाठी उपयुक्त आहे. भविष्यात काय होईल ते परिणामकारकता सांगत नाही. मात्र गणिती शक्यतेनुसार आपण म्हणू शकतो की परिणामकारकतेचा अर्थ असा आहे की ती लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता परिणामकारकता % ने कमी आहे. जेवढे टक्के जास्त तेवढे जास्त संरक्षण मिळू शकते. उदा. फायझर घेतलेल्या व्यक्तीला लस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता ९५% ने कमी आहे.
अशा गणिती शक्यता शास्त्रानुसार जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता ६९% ने कमी आहे. म्हणजे या लसीची कोव्हिड होण्याची गणिती शक्यता फायझर आणि मॉडर्नापेक्षा जास्त आहे. म्हणून फायझर आणि मॉडर्ना या लसी जॉन्सन अँड जॉन्सन लसीपेक्षा सरस आहेत का? तसेच भारतात भारत बायोटेकची, कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता ८१% ने कमी आहे. तर ऑक्सफर्डची ॲस्ट्राझेनेका म्हणजे कोव्हिशिल्डची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता ९०% ने कमी आहे. म्हणजे भारत बायोटेकची, कोव्हॅक्सिनची लसीची कोव्हिड होण्याची गणिती शक्यता ॲस्ट्राझेनेकाच्या लसीपेक्षा जास्त आहे. म्हणून ॲस्ट्राझेनेकाची लस ही भारतात भारत बायोटेकच्या लसीपेक्षा सरस आहे का?
या प्रश्नांची उत्तरे आपण लसींकडून काय अपेक्षा आहेत यावर अवलंबून आहे, लसी काय करू शकतात तसेच हॉस्पिटल आणि आरोग्य सेवेतील मनुष्यबळाच्या (डॉक्टर आणि इतर कर्मचारी) याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
आकृती क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे करोना व्हायरसचा संसर्ग झालेले रोगी विविध स्टेजमध्ये पोचतात. बऱ्याच जणांना संसर्ग होऊनही कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. तरीही ते व्हायरस दुसऱ्यांना देऊ शकतात. नंतरच्या स्टेजमध्ये सौम्य लक्षणांपासून मृत्यू हा स्पेक्ट्रम आहे. सौम्य लक्षणे आणि तीव्र लक्षणे असलेले रोगी घरच्या घरी औषधे घेऊन आणि क्वारन्टीन होऊन बरे होऊ शकतात. मात्र तीव्र लक्षणवाल्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागण्याची दाट शक्यता असते.
हॉस्पिटल, आरोग्य मनुष्यबळ यांच्या दृष्टीने तीव्र लक्षणे असलेले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले रोगी हे आरोग्य व्यवस्थेवर ताण आणतात, संसर्ग मृत्यूचे प्रमाण वाढवतात. डॉक्टर्स आणि नर्सेस यांना दिवसाला विश्रांती न घेता १२-१२ तास काम करावे लागते. हॉस्पिटल क्षमतेच्यावर रुग्णांनी भरभरून वहात असतात. मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात. सध्या तरी विकसित झालेल्या लसी संसर्गापासून संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे तीव्र लक्षणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मृत्यू पावणे या गोष्टी होऊ देऊ नये ह्या लसींकडून अपेक्षा आहेत. फायझरच्या चाचणीतील ‘लस’ गटात ८ जणांना कोव्हिड झाला. मात्र त्यातील एकाही व्यक्तीला ना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले ना ती मृत्यू पावली. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्याही मान्यता मिळालेल्या लसीमुळे कोव्हिड होण्यापासून संपूर्ण संरक्षण मिळाले नाही मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल होणे किंवा मृत्यू यांपासून संरक्षण झालेले दिसत आहे. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत हॉस्पिटल आणि आरोग्य मनुष्यबळ यांच्या दृष्टीने हे पुरेसे आहे.
आकृती क्र. २ मधे दाखवल्याप्रमाणे कुठलीही लस घेतल्यानंतर तीन शक्यता आहेत. एक, संसर्ग न होता व्यक्ती निरोगी राहू शकते. दोन, व्यक्तीला कोव्हिड होऊ शकतो परंतु त्याची लक्षणे न दिसता ती व्यक्ती (Asymptomatic Patient) करोना व्हायरस दुसऱ्याला देऊ शकते. तीन, हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य लक्षणांचा कोव्हिड होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. औषधे आणि स्वतःला घरी क्वारन्टीन ठेवून तो बरा होऊ शकतो. म्हणजे लस घेतली तरी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहता. समाज सुरक्षित राहू शकतो.
चाचण्यांनंतर जेव्हा लस मोठ्या प्रमाणात लोकांना दिली जाते तेव्हा तिचे साईड इफेक्ट्स दिसू लागतात. वर बघितल्याप्रमाणे लस घेऊनही कोव्हिड होऊ शकतो. पण लक्षणे तीव्र नसतात. लस घेऊनही कोव्हिड झाला अशा बातम्या येतात. त्यांनी आश्चर्य वाटून घेऊ नये आणि घाबरून जाऊ नये. लसींचे साईड इफेक्ट्स मात्र गंभीर असू शकतात. कधीकधी वर्तमानपत्रात वाचतो की लस घेऊन मृत्यू झाला. ते शक्य आहे. परंतु किती जणांना लस दिली आणि त्यातील किती जणांना मृत्यू आला हे जाणणे महत्त्वाचे आहे. अशा घटना एका लाखात दोन-तीन मृत्यू असतील त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मध्यंतरी युरोपच्या बऱ्याच देशांनी ऑक्सफोर्डच्या ॲस्ट्राझेनेकाची लस घेतल्यावर रक्तात गुठळ्या होतात म्हणून बंदी घातली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ती लस स्वीकारणीय आहे असे म्हटले आहे. असे दिसले की ५० लाख लस दिलेल्यांपैकी फक्त ३० लोकांना गुठळ्या झाल्या. काही तज्ज्ञांनी लस आणि गुठळ्या यांच्या संबंधावर शंका व्यक्त केली आहे. जरी त्या गुठळ्या लसीमुळे झाल्या असे मानले तरी हे प्रमाण इतके कमी आहे की त्यामुळे ही लस वापरणे बंद करावे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय इतर लसींच्या साईड इफेक्ट्सचा डेटा अजून मिळालेला नाही. कुठल्याही औषधाला साईड इफेक्ट्स असतातच. म्हणून लस न घेणे हे योग्य नाही. लस घेण्याचे फायदे हे लस न घेण्याच्या तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत.
या सर्व चर्चांनंतर थोडक्यात असे म्हणता येईल की -
- लसींच्या परिणामकारकतेच्या आकड्यांच्या अर्थ माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे.
- भविष्यात काय होईल ते परिणामकारकता सांगत नाही.
- एखाद्या लसीची परिणामकता जर (उदाहरण म्हणून) ८०% असेल तर लस घेतल्यांपैकी शंभरातील ८० जणांना कोव्हिड होत नाही आणि २० लोकांना कोव्हिड होऊ शकतो असा अर्थ होत नाही. तर ती लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता ८०% ने कमी आहे असा अर्थ होतो.
- कोव्हिड अजिबात होऊ न देणे लसींचे उद्दिष्ट नाहीये. तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नसणे आणि मृत्यू होऊ नये ही उद्दिष्टे आहेत.
- मान्यता मिळालेल्या सर्व लसींमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि मृत्यू यांच्यापासून संरक्षण मिळते. या परिप्रेक्ष्यातून सर्व लसी या सारख्या परिणामकारक आहेत.
- लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य लक्षणांचा कोव्हिड होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे आवश्यक आहे.
- सर्व लसींना गंभीर साईड इफ़ेक्ट्स असणार आहेत. मात्र लस घेण्याचे फायदे हे तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत.
---
टीप – सर्व संख्या मार्चच्या सुरुवातीच्या आहेत. आज त्या बदलल्या असू शकतात. तरीदेखील या लेखातील स्पष्टीकरण, युक्तिवाद आणि निष्कर्ष बदलणार नाहीत.
डॉ. प्रमोद चाफळकर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात. ते अमेरिकेत मिशिगन राज्यातील ग्रँड रॅपिड्स या शहरात राहतात.
(मूळ लेख वायर (मराठी) येथे प्रकाशित झाला होता. त्यांच्या आणि लेखकाच्या संमतीने तो 'ऐसी अक्षरे'वर जनहितार्थ पुनर्प्रकाशित केला आहे.)
लेख उत्तम आहे
लेख उत्तम आहे, आवडला.
शंका - दुसऱ्या आकृतीत, लस घेतली नाही हा लाल तुटक रेषांच्या खोक्यात हिरवा खोकासुद्धा हवा, बरोबर ना?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बरोबर
सुलभीकरणात एवढं चाललंही पाहिजे. बरोबर ना...?
ते इतके उठून दिसून येत नाही - माझे मत.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
नाही.
सोपं करून सांगितलं आहे म्हणून लस न घेतलेल्या लोकांनाही करोनाचा संसर्ग होऊनही कोव्हिड न होण्याची शक्यता आहे, लस न घेतलेली आणि कोव्हिड झालेली माणसंही बरी होत आहेत, गंभीररीत्या आजारी पडून बरी होत आहेत, हे खरं आहे. लस हा काही देव नाही, की तिचं माहात्म्य तयार करून, लोकांना फसवून हे सांगावं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अपुरी आकृती
लस ही कवच नसली तरी ती एकप्रकारची ढाल आहे; इतकाच तो मुद्दा आहे. हे खरंय, की आकृती तोकडी आहे. त्यात लाल खोका तर जास्तीच तोकडा दिसून येतोय. त्यात निदान मृत्यू होईलच असे नाही असे काहीसे असायला हवे. पण इथे मेजर/तीव्र घटक पकडलेला दिसून येतोय...
लसीला देवत्व बहाल करण्यासारखं तरी मला ह्यात काही दिसलं नाही.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
ओके.
ओके.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे माहित नव्हतं!
हे माहित नव्हतं!
मी ही सरधोपटपणे, परिणामकता = ८०% म्हणजे शंभरातल्या ८० जणाना होत नाही असं समजत होतो
परिणामकता काढायची ही पद्धत सगळ्या कंपन्या / सगळे देश एकसारखीच वापरतात की या जगभराच्या उद्रेकामुळे ही समाईक पद्धत अवलंबिली जात्येय?
अजून एक प्रश्न विचारतो. चाचणी घेताना सगळ्या उमेदवारांचं निरीक्षण करतात ते ठीक आहे. पण लस दिलेल्या लोकांचाही असा काही सर्व्हे, लस देण्याच्या प्रक्रियेचा नेहेमीचा भाग म्हणून, केला जातो का? या प्रश्नाचं कारण म्हणजे "डॉक्टरानी हाताने बाट्ली धरली होती", "आईस बॉक्स रूम टेम्परेचरलाच होता" वगैरे बातम्या वाचल्या होत्या. अशा कारणामुळे, कींवा अजूनही काही कारणाने, लस परिणामकारक नसली (पुरेशी किंवा अजिबातच) तर त्याचं मूल्यमापन काही ठरलेल्या प्रकारे होतं का ते जाणून घ्यायचंय.
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
अवांतर ...
अबापट, इंग्रजी शब्द वापरले म्हणून संज्ञा समजलेच असं नाही, यासाठी आणखी काही बोलू का तुम्हाला पटलं माझं म्हणणं?
मिसळपाव, खाजगीत अबापट आणि माझी वादावादी सुरू असते. मग त्यांनी मला फोन करून एफिकसी किंवा गुणकारकता (हा परिभाषा कोशातला शब्द) म्हणजे काय ते समजावून सांगितलं होतं. माझ्या भौतिक-सांख्यिकी बुद्धीला हे परिमाण पटलंही. पण मुद्दा भलताच, भाषेचा होता.
अबापटांनी सांगितल्यानुसार सगळीकडेच ही पद्धत वापरतात. कदाचित सुरुवातीला, घाईघाईत ही पद्धत वापरतात. ही गुणकारकता ५०%पेक्षा जास्त असल्याशिवाय पुढे सरकायला परवानगी मिळत नाही. त्याबद्दल बोलताना बापटांनी बोलणं आवरतं घेतलं होतं. त्याबद्दल त्यांनी आता तपशिलात लिहावंच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कारण
समजा मी एखाद्या बेटावर लशीची चाचणी करायची म्हटलं, तिथे अजून करोना पसरलेला नाही असे धरून चालू. अशा वेळी लस घेतलेल्या कोणालाच इंन्फेक्शन झाले नाही तर 'इफिकसी' 100% मानायची का? म्हणून लस न घेतलेल्यांनाही संसर्ग होतोया का नाही हे पहावे लागते.
त्याशिवाय, म्हणूनच जर द. आफ्रिकेत चाचणी केलेल्या लशीची इफिकसी 80% असेल अन इंग्लडमध्ये केलेल्याचीही 80% असेल म्हणून त्या लशी सारख्यास असे मानून चालण्यात अर्थ नाही.
-Nile
" समजा मी एखाद्या बेटावर
" समजा मी एखाद्या बेटावर लशीची चाचणी करायची म्हटलं"
निळे सर , असं 'समजा ' म्हणून नाही केलं जात कधी. इफिकसी मोजण्याच्या पद्धतीला मर्यादा आहेत हे ओळखूनच यात बदल केले जातात .
जसे गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची फेज ३ चाचणी इंग्लंड मध्ये सुरु असतांना इंग्लंड मधील पहिली लाट झपाट्याने ओसरू लागलीय हे लक्षात आल्यावर हि चाचणी दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आली ( तिथे लाट जोरात सुरु होती )
दक्षिण आफ्रिका , दक्षिण अमेरिका आणि इंग्लंड यातील लसी वेगळ्या असतील असा आपला का समज झाला आहे हे कळेना. कृपया उलगडून सांगाल ?
आभार
पुन्हा एकदा वाचून पहा.
समजा म्हणजे "थॉट एक्स्पिरेमेंट". असो. वेगवेगळ्या रेटने इंफेक्शन पसरत असलेल्या ठिकाणांच्या चाचणीतून मिळालेल्या इफिकसीची थेट तुलना होऊ शकत नाही असे म्हणायचे आहे.
अधिक माहिती करता हे पहा: https://www.wect.com/2021/03/05/heres-why-you-shouldnt-compare-efficacy-...
किंवा हे पहा https://youtu.be/K3odScka55A
इथे मी काय म्हणालो तेच पण वेगळ्या शब्दांत: "Efficacy depends on the details of a trial, such as where it took place. Johnson & Johnson ran trials at three sites: in the United States, Latin America and South Africa. The overall efficacy was lower than that in the United States alone. One reason for that appears to be that the South Africa trial took place after a new variant had swept across that country. Called B.1.351, the variant has mutations that enable it to evade some of the antibodies produced by vaccination. The variant didn’t make the vaccine useless, however. Far from it: In South Africa, Johnson & Johnson’s efficacy was 64 percent.
.
.
.
Making matters more complicated, the vaccines were tested on different groups of people at different stages in the pandemic. In addition, their efficacy was measured in different ways.
"
https://www.nytimes.com/interactive/2021/03/03/science/vaccine-efficacy-...
-Nile
लेख आवडला. अनेक वेळा
लेख आवडला. अनेक वेळा आकड्यांचा निर्देशकांचा अर्थ न समजल्याने चुकीचे निष्कर्ष काढले जातात. चर्चा योग्य पद्धतीने केल्या जात नाहीत आणि गैरसमज पसरतात. या माहितीमुळे काही प्रमाणात तरी गैरसमज कमी होतील.
'लस घेऊनही कोव्हिड होतोच, मग काय उपयोग?' असं विचारणारांसाठी 'कोव्हिड झाला तरी लस घेतलेल्यांसाठी तीव्रता कमी होते' हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. या लेखात तेही अधोरेखित केलेलं आहे.
सोप्या शब्दांत माहिती दिली आहे
लेख अतिशय माहितीपूर्ण आहे.
लसीची परिणामकारकता आणि ती घेतल्याने संभाव्य आजाराची लक्षणं सौम्य होणं हे दोन निराळे विषय आहेत. लस घ्यायला हवी याविषयी दुमत नसावं.
Nile म्हणतात तसं निदान कोव्हिड लसीच्या बाबतीत "Efficacy depends on the details of a trial, such as where it took place." हे विदा पाहिल्यावर पटतं. कारण साथीची पायरी, लोकसंख्येची घनता, prevalent viral mutations सर्व देशांत सारखी नसणार, असं वाटतं. मलाही हा प्रश्न पडला होता.
उत्तम लेख
सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली.आणि लसी बदल असलेले गैर समज दूर झाले.हे खर तर न्यूज चॅनल वर लोकांना सांगितले गेले पाहिजे .पण ते घडत नाही.
मीडिया संभ्रम निर्माण करतात.
लेख छान आहे
लसी ची परिणामकारक त ९५ आहे ह्याचा अर्थ लस न घेतलेल्या व्यक्ती पेक्षा लस घेतलेल्या व्यक्ती ला कॉरोना होण्याची शक्यता ९५ टक्के कमी असते .
ह्याचा अर्थ फिरून तोच येतो .फक्त शब्द फिरवले आहेत.
लस ही रोगापासून रक्षण करते रोग होवून देत नाही हीच माहिती आता पर्यंत लोकांना होती आणि तेच सांगितले जायचे.त्या साठी पोलिओ आणि बाकी लसी ची उदाहरणे दिली जायची.
पण लस द्यायला सुरुवात करण्या अगोदर उत्पादक कंपन्या पण गप्प होत्या.
पण लस घेवून पण covid होत असल्याची अनेक उदाहरण दिसू लागल्यावर आता लस लक्षण कमी करते लस घेतल्या मुळे रोग होणार नाही हा समज चुकीचा आहे असे दावे उत्पादक करायला लागले.
लस न घेता पण तीव्र किंवा बिलकुल लक्षण नसलेली खूप percent लोक सन २०१९ पासून आहेत
लस आता आलीय महिना च झाला असेल .
एका महिन्यात लस घेतल्यावर तीव्र लक्षण दिसत नाहीत ह्याचा अभ्यास कोणी आणि कधी केला.
उलट सुलट दावे उत्पादक,संशोधक,सरकारी यंत्रणा ,मीडिया करतात.
त्या मुळे लोक मध्ये संभ्रम निर्माण होतो.
अहो वाचत जाहो नीट.
अहो वाचत जाहो नीट.
दर शंभरापैकी हे महत्त्वाचं आहे. तसं अनुमान चुकीचं आहे.
जेव्हा
१०००० लस न घेतलेले - रोगी १००
१०००० लस घेतलेले - रोगी ५
मात्र लोक गैरसमज करून घेतात की
१०००० लस घेतलेले - रोगी ५००
असा अर्थ आहे. हे फिरवलेले शब्द नाहीत. गैरसमज काय होतो आणि प्रत्यक्षात काय आहे ते सांगितलंय.
दोन चार महिन्यात
खूप लोकांना लस दिली जाईल.मग corona control मध्ये येवू शकतो .म्हणजे निदान 2022 तरी सुखाचे जाईल
ब्रिटनमध्ये लसीकरणाचे परिणाम
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-infection-in-brita...
उत्तम माहिती. हे आकडे (टक्के
उत्तम माहिती. हे आकडे (टक्के) नेमके कसे काढले जातात हे नीट समजले. धन्यवाद.
बाकी..
प्रश्न अगदी स्पष्ट आहे. त्याला वापरलेल्या सूत्रानुसार उत्तर "हो" असे स्पष्ट द्यायला हरकत नाही.
७०% ते ९०% रेंजमधल्या मान्यताप्राप्त सर्व लशी स्वीकारार्ह आहेत, कारण सध्याची गरज हॉस्पिटलायझेशन टाळणे ही आहे. हे म्हणणे वेगळे आणि सर्व लशी अगदी एकसमान, कोणी सरस किंवा कमी नाहीच अशी रचना वेगळी.
हो. अधिक एफिकसी असलेल्या लशी तुलनेत सरस म्हणाव्या लागतील, पण त्या फरकासाठी आत्ता अडून राहण्याची गरज नाही. उपलब्ध असेल ती लस घ्या असे म्हणणे जास्त योग्य.
प्यारलल उदाहरण,
"अ" या विद्यार्थ्यास प्रवेश परीक्षेत ९९% गुण आहेत. "ब" यास ९०% गुण आहेत.
समजा सध्या येती काही वर्षे युद्धसदृश परिस्थिती राहणार असल्याने आपल्याला अनेक डॉक्टर्सची गरज लागणार आहे. सध्याच तुटवडा जाणवू लागला आहे. अशा वेळी या दोन्ही टक्केवारया (त्यातला फरक) स्वीकारार्ह ठरवून आपण दोघांनाही मेडिकलला एडमिशन देत आहोत.
पण
१. सध्या आपणच डिझाईन केलेल्या प्रवेश परीक्षा पद्धतीनुसार अ हा ब पेक्षा सरस आहे का? तर "हो".
२. अ आणि ब दोघांनाही डॉक्टर म्हणून स्वीकारावे का? तर सध्या परिस्थिती पाहता "हो"
पण वरील प्रामाणिक प्रश्न १ समोर आला असता उगीच अ आणि ब या दोघांतला फरकच पुसून टाकू नये. उगीच ९०% आणि ९९% हे तर फक्त प्रवेश परीक्षेतले गुण आहेत, भविष्यात ब कसा डॉक्टर होईल हे त्यावरुन सांगता येत नाही वगैरे यात फार अर्थ नाही. अ हा आत्ता ब पेक्षा सरस. चॉइस असला तर अ ला ब च्या आधी स्वीकारावे. चॉइस नसला तर जे मिळेल ते घेणे फायद्याचे आहेच.