करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

मुलाखतीची पूर्वपीठिका : विषाणू, आजार, साथ, महासाथ, कोरोना, सायटोकाईन स्टॉर्म, प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद असे विविध शब्द गेल्या वर्षभरात आपल्या कानांवर वारंवार आदळले आहेत. सुरुवातीच्या काळात अजिबात व नंतर पुरेसे आकलन नसल्याने या विषयावर मराठीत फक्त वरवरचे, सुलभ आणि जनहितार्थ पण ढोबळ लेखन केले गेले. म्हटले तर यात वावगे काहीच नाही. पण आता सव्वा वर्ष झाल्यानंतर किमान काही गोष्टी तरी नक्की कळलेल्या आहेत आणि काही गृहीतके ढासळली आहेत. इंग्रजीत विशुद्ध शास्त्रीय माहिती उपलब्ध होत आहे, पण मराठीत मात्र या विषयावर शास्त्रीय लिखाण कमी झाले असावे. ही मुलाखत घेण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे विषाणू, प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद वगैरे विषयांवर सखोल शास्त्रीय माहिती घेणे हे होय.

डॉ. विनिता बाळ यांचा अल्प-परिचय : डॉ. बाळ या मूळच्या पुण्याच्या. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून MBBS केले. मुंबई विद्यापीठातून MD केले. त्यांनी पोस्ट डॉक्टोरल रिसर्च हाफकिन इन्स्टिट्युट, लंडन विद्यापीठातून केला. त्यानंतर त्या दिल्लीच्या प्रतिष्ठित National Institute of Immunologyमध्ये २५-३० वर्षे ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांचे संशोधन अनेक सुप्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले (उदा. नेचर इम्युनॉलॉजी). निवृत्तीनंतर त्या पुण्यात परत आल्या आहेत आणि आता त्या आयसर संशोधन संस्थेत व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. इम्युनॉलॉजी या विषयावर त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान असणारी मराठी व्यक्ती दुर्मीळ, त्यामुळे वरील विषयासाठी ’ऐसी अक्षरे’ने त्यांची मुलाखत घेतली.

(पहिला भाग इथे वाचता येईल.)

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

प्रश्न - सार्वत्रिक लसीकरणाचं उद्दिष्ट काय असतं, आणि लस घेतल्यानंतर प्रतिकारशक्तीशास्त्राच्या (immunology) संदर्भात नक्की काय प्रतिसाद सुयोग्य, इष्टतम (optimal) ठरेल?

उत्तर - सार्वत्रिक लसीकरणाबद्दल मी आत्ता फार बोलत नाही. ते आपण सांघिक प्रतिकारक्षमतेच्या (herd immunity) संदर्भात प्रश्न येईल तेव्हा बघू.

लस दिल्यानंतर काय घडतं, काय प्रकारची प्रतिकारशक्ती आपल्याला हवी असते (desirable, ideal) याविषयी आधी सांगते : रोग होऊ नये, हा लसीचा उद्देश असतो. नुसतीच प्रतिकारशक्ती असणं आणि संरक्षण देणारी प्रतिकारशक्ती असणं या दोन्हींत फरक आहे. हे अशा अर्थानं : गेल्या भागातही मी म्हणाले होते, सार्स-कोव्ह-२ या विषाणूमध्ये बरीच प्रथिनं आहेत. जेव्हा पेशीत विषाणू शिरतो, तेव्हा ही प्रथिनं तिथे तयार होतात, हळूहळू प्रोटिओलिटिक एन्झाइममुळे त्यांचे तुकडे होतात. अशा वेळेला त्यापैकी खूपशा प्रथिनांविरोधात प्रतिपिंडं (antibodies) तयार होतात. यातल्या बऱ्याचशा प्रथिनांची पेप्टाईड तयार होतात आणि त्यांच्या विरोधात टी पेशी काम करतात. त्यामुळे कुठल्याही विषाणूचा (किंवा जीवाणूचाही) संसर्ग झाला, आणि हा विषाणू पेशीमध्ये गेला की लिंफ नोडमध्ये अनुकूलक प्रतिकारशक्तीचं (adaptive immune system) कामकाज सुरू होतं आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रथिनांच्या, किंवा कर्बोदकांच्या विरोधात प्रतिपिंडं तयार होतात. सर्व प्रथिनांत पेप्टाईड्स असतात. त्यांपैकी १०-१५ अमिनो आम्लं लांबीचे पेप्टाईड टी पेशींना ओळखता येतात आणि त्या मग त्यांच्या विरोधात काम करतात. म्हणजे, सगळी प्रतिकारशक्ती असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचा हा एक भाग असतो. अनुकूलक (adaptive) प्रतिकारशक्ती म्हणजे बी पेशी, CD4 (helper cell - मदतनीस पेशी), CD8 (killer cells - मारेकरी पेशी) या सगळ्यांचं योगदान प्रतिकारशक्तीमध्ये असतं. (CD = cluster determinant.)

पण कोणत्याही लसीबाबत बोलताना सगळ्यांत कळीचा मुद्दा म्हणजे - ही लस संरक्षण देणाऱ्या प्रतिकारक पेशी आणि त्या विशिष्ट विषाणूला निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं (neutralising antibodies) निर्माण करेल की नाही? कारण भाराभर प्रमाणात इतर प्रतिकारशक्ती तयार झाली तरी त्या विशिष्ट विषाणूविरोधात (किंवा जीवाणूविरोधात) त्याचा आपल्याला तसा काही उपयोग नसतो. म्हणजेच, त्या विशिष्ट विषाणूला निष्प्रभ करणारी प्रतिकारशक्ती तयार झाली नाही, तर इतर गोष्टींचा तसा काही फार उपयोग नसतो.

संरक्षण देणाऱ्या या प्रतिकारशक्तीतला एक भाग बी पेशींपासून येतो. बी पेशी प्रतिपिंडं निर्माण करतात, हे थोडं सुलभीकरण झालं. खरं तर, बी पेशीचं विभाजन होतं, आणि त्यांच्या प्लाझ्मा पेशी तयार होतात. या प्लाझ्मा पेशी सतत प्रतिपिंडं तयार करत राहतात. आपल्या प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडं सापडतात ती या प्लाझ्मा पेशींनीच तयार केलेली असतात. या सगळ्या प्रतिपिंडांत विषाणूंना निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं अगदी कमी प्रमाणात असतात, आणि ती लसींमुळे तयार होऊ शकतात का, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे.

लसीकरणानंतर साधारण १५-२० दिव‌सांनंतर प्रतिपिंडं हळूहळू दिसायला लागतात. मग जोवर या प्लाझ्मा पेशी जिवंत आहेत, तोवर ती प्रतिपिंडं टिकून राहतात, कधी आयुष्यभरसुद्धा टिकतात. तुम्ही हेही ऐकलं असेल की संसर्गानंतर माणसं आजारी पडतात आणि त्यांच्यात खूप प्रतिपिंडं तयार होतात; किंवा लसीकरणानंतर खूप प्रतिपिंडं तयार होतात आणि त्यानंतर ती कमी होऊ लागतात. ती कमी व्हायला लागल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते; परंतु यात खरं तर आश्चर्यकारक किंवा भीतीदायक काहीही नाही. कारण काही प्लाझ्मा पेशी २-४-५ आठवडेच जिवंत राहू शकतात. परंतु इतर प्लाझ्मा पेशी बोन मॅरोमध्ये, हाडामध्ये जाऊन निवास करतात, आणि एकदा त्या तिथे गेल्या की पुष्कळ वर्षं प्रतिपिंडं तयार करू शकतात. त्यातून दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. कधी कधी ती आयुष्यभर टिकून राहते. लसींमुळे अशा प्लाझ्मा पेशी तयार होतील का, हा मुद्दा आहे. मात्र, बोन मॅरोत राहणाऱ्या प्लाझ्मा पेशींचा आकडा कमी असतो. त्यामुळे ही प्रतिपिंडं कमी असतात.

एवढ्यानं भागत नाही. चांगली दणकट प्रतिपिंडं तयार होण्यासाठी आणि विशेषतः या प्लाझ्मा पेशी बोन मॅरोमध्ये जाऊन त्यांचा तिथे निवास सुरू होण्यासाठीसुद्धा टी पेशींचं महत्त्वाचं योगदान असतं. साधारणपणे CD4 प्रकारच्या मदतनीस टी पेशींचा शरीरामध्ये प्रतिपिंडं तयार करण्यात मोठा सहभाग असतो.

निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं (neutralizing anitibody) ही संरक्षण देणारी एक प्रकारची प्रतिकारशक्ती आहे. प्रतिकारशक्तीचा दुसरा भाग म्हणजे टी पेशींनी या विषाणूच्या विरोधात फळी उभारणं. गेल्या भागातही मी उल्लेख केला होता, CD8 प्रकारच्या टी पेशी असतात. HIV-AIDSच्या संदर्भात तुम्ही कदाचित CD4 टी पेशींचं नाव ऐकलं असेल. या CD8 हे त्यांचंच भावंड. या मारेकरी (killer) पेशी असतात. विषाणूचा संसर्ग ज्या पेशीत झाला आहे अशी पेशी या मारेकरी पेशींच्या समोर आली की त्या पेशी संसर्ग झालेल्या पेशींना मारून टाकतात. हे अतिशय महत्त्वाचं, संरक्षण देणारं अंग आहे.

लसीकरणामुळे मारेकरी पेशी तयार होतात का, हे खरं तर बघायला हवं. यात ‘खरं तर’ असं म्हणायचं कारण असं की, प्रयोगशाळेत याचे Assay करणं खूप अवघड असतं, म्हणून बहुतेकदा शॉर्टकट घेऊन अशा CD8 पेशी तयार झाल्या आहेत का, याची तपासणीच करत नाहीत. तो चांगला शॉर्टकट नाही, पण बहुतेकदा लसीकरण मोठ्या प्रमाणावर करायचं असल्यामुळे हे आपण चालवून देतो. ही काही आदर्श परिस्थिती नाही.

[Assay म्हणजे प्रयोगशाळेत एखाद्या गोष्टीचा दर्जा आणि संख्या यांची मोजमाप करण्याचा प्रयोग. मारेकरी टी पेशी मोजण्यासाठीचा हा असा assay प्रयोगशाळेत करणं जटिल आणि खर्चिक असतं. यासाठी लागणारी उपकरणं महाग असतात आणि ती सर्वसामान्य प्रयोगशाळेत उपलब्ध नसतात. म्हणून हे काम अवघड आहे.]

मदतनीस किंवा CD4 टी पेशीसुद्धा महत्त्वाच्या असतात. त्यांच्यामुळे प्रतिजनांना (antigen) ताकदीनं चिकटणारी (high affinity) प्रतिपिंडं मोठ्या प्रमाणात तयार होतात. मदतनीस टी पेशी नसल्या तर प्रतिजनांविरोधात तयार केलेल्या प्रतिपिंडांची चिकटण्याची क्षमता कमी होते. ही क्षमता महत्त्वाची असते, कारण प्रतिजन म्हणजे विषाणूचे छोटे छोटे भाग असतात. यांच्या विरोधात तयार झालेली प्रतिपिंडं अगदी कमी संख्येत, पण ताकदवान असली तरी सहज चिकटू शकतात. म्हणून प्रतिकारशक्ती आणि संरक्षण देणारी प्रतिकारशक्ती असे दोन भाग मी केले.

एकंदर प्रतिकारशक्ती चिकार असते, पण संरक्षण द्यायला तिचा काही उपयोग नसतो. संरक्षण देणारी प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, ती खूप काळ टिकावी, तर तो इष्टतम प्रतिसाद समजता येईल. पण कोव्हिड-१९च्या संदर्भात विचार केला तर हा रोगच सध्या १५-१८ महिन्यांचा आहे. लसी तयार करण्याची प्रक्रिया आणि तपासणी-चाचणी ही प्रक्रिया मे-जून २०२० मध्ये सुरू झाली. म्हणजे अजून वर्षही झालेलं नाही. याचा अर्थ ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्या व्यक्तींची विदा (data) आजमितीला दहा किंवा, डोक्यावरून पाणी, बारा महिन्यांहून अधिक काळाची नाही.

वेगळं उदाहरण घ्यायचं झालं तर, देवीच्या लसी आपल्यांतल्या काही लोकांनी घेतल्या असतील. त्या लसीनं पाच-पाच ‌‌वर्षं संरक्षण मिळायचं. ही आदर्श परिस्थिती आहे; पण प्रत्येक रोगाच्या बाबतीत ते तसं शक्य नसतं. तुम्ही फ्लूच्या लसींबद्दल ऐकलं असेल - प्रगत-थंड देशांत, विशेषतः थंडी सुरू होण्याआधी, विशेषतः वृद्ध माणसांना फ्लूची लस देतात. पुढच्या वर्षी ती पुन्हा द्यावी लागते, कारण पुढच्या वर्षी तिचा परिणाम टिकत नाही. सार्स-कोव्ह-२च्या लसींचा परिणाम किती टिकतो, हे आपल्याला काळच सांगेल. प्रतिकाराची स्मरणशक्ती (memory) दीर्घकाळ टिकायला हवी हा मुद्दा महत्त्वाचा असतो.

Strategies used to control infections
प्रतिमा स्रोत : रेझोनन्स, फेब्रुवारी १९९७

आता मी विषाणूच्या संदर्भात सांगितलं. वरचं चित्र पाहा. आपल्याला ज्या-ज्या विषाणू किंवा जिवाणूंचा संसर्ग होत असतो, त्या वेळेस संरक्षण देणारी आदर्श प्रतिकारशक्ती कोणती असते, याबद्दल मी थोडं सांगते.

हे चित्र मी आणि माझे सहकारी सत्यजित रथ यांनी तयार केलं. (आम्ही तीसेक वर्षांपूर्वी हे तयार केलं होतं; बंगळुरूच्या ‘इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’चं विज्ञानविषयक शैक्षणिक नियतकालिक ‘रेझोनन्स’साठी लिहिताना आम्ही हे तयार केलं होतं.

Various strategies used to control infection - संसर्ग रोखण्यासाठी योजलेले विविध उपाय असं या चित्राचं शीर्षक आहे. जीवाणू किंवा विषाणूंमुळे संसर्ग होतो तेव्हा शरीरात कुठेकुठे हे जंतू सापडतात त्यानुसार त्यांच्याशी चार हात कसे करायचे हे ठरतं. चित्राच्या वरच्या भागातल्या गुलाबी पेशी आहेत, त्यात जंतू पेशींच्या बाहेर आहेत. दुसऱ्या भागात जिथे मदतनीस CD4 पेशी दाखवल्यात तिथले जंतू पेशीतल्या रिक्तिकांमध्ये (vacuole - पेशीतली पोकळी) आहेत. तिसऱ्या भागात, पिवळ्या पेशीत जंतू पेशीद्रव्यात (cytoplasm) आहे.

पेशींच्या बाहेर राहणाऱ्या जंतूंना काँप्लिमेंट नावाची व्यवस्था पटकन चिकटते. ते जंतू आहेत, याची नोंद होते. काँप्लिमेंट आणि प्रतिपिंडं या पेशीबाहेरच्या जंतूंना चिकटून त्यांचा फन्ना उडवतात; आणि जंतूंचा नायनाट होतो. डावीकडच्या पेशीत ते दाखवलं आहे. प्रतिपिंडं आणि काँप्लिमेंट या दोन्हींमुळे phagocytic cells - neutrophils आणि macrophage या जंतूंना भराभरा खाऊन टाकतात. मग पोकळीतल्या विकरांद्वारे (enzymes) त्यांचा नायनाट होतो. उदाहरणार्थ, न्यूमोनिया ज्यांच्यामुळे होतो ते न्यूमोकॉकस जंतू किंवा घसा खराब करणारे स्ट्रेप्टोकोकाय जंतू पेशीबाहेर सापडतात.

दुसरा प्रकार म्हणजे आपल्या मदतनीस CD4 पेशींच्या आत राहणारे जंतू. पेशीच्या आत phagosomes, endosome असे बुडबुडे असतात. त्यांत जंतू राहतात. परिचयाची दोन उदाहरणं म्हणजे, टायफॉईड ज्याच्यामुळे होतो तो सालमोनेला टायफी हा जीवाणू, आणि टीबीसाठीचा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्यूलॉसिस. हे दोन्ही जंतू पेशींच्या बाहेर सहसा राहत नाहीत. ते एकदा शरीरात शिरले की ते भराभरा पेशींच्या आत शिरून पेशींमधल्या रिक्तिकांमध्ये जाऊन बसतात. तेव्हा काँप्लिमेंट आणि प्रतिपिंडं ही शस्त्रं या जंतूंविरोधात निरुपयोगी ठरतात. इथे मदतनीस पेशींचा फायदा होतो. CD4 टी पेशी या मॅक्रोफेजना (कण खाणाऱ्या पेशी) सक्रिय करतात आणि मग बुडबुड्यात असणारे जंतू विकर (enzymes) किंवा reactive oxygen species, reactive nitrogen species यांच्याद्वारे मारले जातात.

तिसरा प्रकार हा आपल्या सार्स-कोव्ह-२ विषाणूसारखा. ते पेशीद्रव्यात (cytoplasm) राहतात. ते मारायचे असतील तर फक्त जंतू मारला असं करून भागत नाही. तेव्हा पेशीबाधक (cytotoxic) CD8, किंवा सोपा शब्द मारेकरी टी पेशी उपयोगी ठरतात. या मारेकरी पेशी सार्स-कोव्ह-२च्या संदर्भात फुफ्फुसांच्या आतल्या भागात, किंवा नाकाच्या आतल्या भागात, जिथे विषाणूचा संसर्ग होतो, तिथे असतात. संसर्ग झालेल्या पेशींना त्या मारून टाकतात.

याचा अर्थ : टायफॉईड किंवा टीबीसाठी लस हवी असेल तर मोठ्या प्रमाणावर पेशीबाधक (cytotoxic) मारेकरी टी पेशी बनवणाऱ्या लसींचा फायदा नाही. त्यांसाठी मदतनीस पेशी मोठ्या संख्येनं उपलब्ध होतील अशी लस शोधावी लागेल. उलट विषाणूविरोधी लस शोधायची तर मारेकरी टी पेशी मोठ्या प्रमाणात तयार होतील अशा त्या लसी असल्या पाहिजेत. फक्त CD4 मदतनीस पेशी बनवणाऱ्या लसी विषाणूंविरोधात फार उपयोगाच्या नाहीत. किंवा फक्त निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं (neutralizing antibody) बनवणाऱ्या लसी असल्या तरीही फायदा नाही.

प्रश्न : सध्याच्या सगळ्या लसी सार्वदेहिक (systemic) आहेत का? श्लेष्मल (mucosal) लसींचा कितपत सहभाग असू शकेल?

उत्तर : पुन्हा आपण सार्स-कोव्ह-२कडे वळू. सध्या उपलब्ध असलेल्या ज्या लसी आहेत त्या सगळ्याच सार्वदेहिक किंवा systemic प्रकारच्या आहेत. म्हणजे काय, तर स्नायूमध्ये इंजेक्शन दिलं जातं. स्नायूमध्ये लस दिली तरीही संपूर्ण शरीरभर प्रतिकारशक्ती तयार होते, त्याला systemic vaccine म्हणतात. कारण शरीरभर (म्हणजे सगळ्या सिस्टिममध्ये) प्रतिकारशक्ती निर्माण होते. त्याचा एक भाग म्हणून नाकातोंडात, फुफ्फुसांमध्ये थोडीबहुत प्रतिकारशक्ती निर्माण होते. याउलट, विषाणू नाकातोंडातून शरीरात शिरतो हे लक्षात घेऊन, समजा फक्त नाकातोंडात आणि फुफ्फुसांमध्येच प्रतिकारशक्ती निर्माण करायची असेल तर त्यासाठी जी लस तयार होईल त्या लसींना mucosal vaccine म्हणतात, श्लेष्मल लस. (किचकट शब्द आहे, मी म्युकोजल हा शब्दच वापरते.)

Systemic लसी कशा काम करतात, ते मी वर सांगितलं. निरनिराळ्या तंत्रज्ञानांवर आधारित ४-५ लसी सध्या उपलब्ध आहेत. त्याबद्दलही मी आता थोडं सांगते. एक जुनी पद्धत मेलेले विषाणू वापरण्याची. यात टिश्यू कल्चरमध्ये विषाणू वाढवतात, ते मारतात आणि ते मेलेले विषाणू शरीरात टोचतात. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं विषाणू वेगळा काढला, त्यापासून भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सिन’ नावाची लस बनवली आहे, ती या प्रकारची आहे. चीनमधली ‘सायनोव्हॅक’ ही लस याच प्रकारात मोडते. (सध्या सायनोव्हॅकबद्दल काही वादही निर्माण झालेले आहेत.)

विषाणू किंवा जीवाणूमधली प्रथिनं वापरणं हीसुद्धा एक जुनी पद्धत आहे. बहुतेकदा ती तुरटीबरोबर (alum) मिसळून त्याचं इंजेक्शन दिलं जातं. हेसुद्धा बहुतेकदा स्नायूत दिलं जातं. ‘नोव्हाव्हॅक्स’ नावाच्या कंपनीची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल अशी शक्यता दिसत आहे. ती या प्रकारची लस आहे.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ‘कोव्हिशील्ड’ नावाची लस ॲडिनो व्हायरसचा सांगाडा वापरून बनवलेली आहे. ॲडिनो व्हायरसमुळे आपल्याला सहज संसर्ग होऊ शकतो; पण त्यातून आजार फार होत नाही. बहुतेकांना या विषाणूचा संसर्ग होऊन गेलेला असतो. तो सांगाडा वापरण्याची पद्धत अशी की संसर्ग आणि रोग करवण्याची क्षमता असलेले ॲडिनो व्हायरसच्या जनुकाचे भाग काढून टाकायचे, त्याजागी आपल्याला हवं ते जनुक वापरायचं. ‘कोव्हिशील्ड’मध्ये सार्स-कोव्ह-२चं स्पाईक प्रथिन या भागात वापरलं आहे. जो शरीरात पटापट वाढणार नाही, पसरणार नाही असा ॲडिनो व्हायरस लस म्हणून आपल्या शरीरात टोचला जातो. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक-५ या लसीसुद्धा याच प्रकारच्या आहेत. फक्त ॲडिनोच नाही तर इतरही काही विषाणू यासाठी वापरले जातात.

भारतात मान्यता मिळण्याआधी काही mRNA प्रकारच्या लसींना भारताबाहेर मान्यता मिळाली. आपल्या शरीरातल्या जनुकांमध्ये एरवी DNA असतो. त्यापासून mRNA बनवतात (messenger म्हणून m). त्यापासून पुढे प्रथिनं बनवतात. या mRNA चा वापर करून पहिल्यांदाच माणसांसाठी लसी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. इथे स्पाईक प्रथिनाची माहिती साठवलेले mRNA थेट शरीरात टोचले जातात. (यामुळे लसीचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर पेशी मोठ्या प्रमाणात स्पाईक प्रथिन तयार करतात, त्याविरुद्ध शरीर प्रतिकारशक्ती निर्माण करतं) इथेही स्पाईक प्रथिनाधारित का, तर ही प्रथिनं receptor binding domain विषाणूचा शरीरात प्रवेश करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण व्हावी म्हणून हे वापरलं जातं.

शिवाय live attenuated प्रकारच्या लसीही असतात. Attenuated म्हणजे विषाणूची संसर्ग करण्याची ताकद कमी करायची, म्हणजे लुटूपुटूचा संसर्ग होण्याची सोय करायची. यामुळे संसर्ग होईल पण आजार होणार नाही. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत : संसर्ग होणं, आणि तरीही आजार न होणं. अनेकदा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर झाला की आजारी वाटतं. तेव्हा आपण तक्रार करतो की, मला बरं वाटत नाही. जोपर्यंत मी तक्रार करत नसते, तोपर्यंत मला फक्त संसर्ग झालेला असतो आणि आजार झालेला नसतो. हा महत्त्वाचा फरक आहे. BCGची टीबीविरोधी लस आहे, ती या प्रकारात मोडते.

आता श्लेष्मल, म्हणजे म्युकोजल लसीबद्दल बघू. प्रवेशद्वार, म्हणजे नाक, तोंड आणि थोडं पुढे जाऊन फुफ्फुसं, या ठिकाणी बहुतेकदा कोव्हिड-१९चा विषाणू राहतो. त्यामुळे फुफ्फुसांत आजार होतो, न्युमोनायटिस होतो, वगैरे. या गोष्टी घडू नयेत अशी अपेक्षा असेल तर त्या-त्या ठिकाणी, म्हणजे स्थानिक पातळीवर, मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं (neutralizing antibodies) आणि मारेकरी टी पेशी दोन्ही असायला पाहिजेत. समजा विषाणू माझ्या नाकामध्ये पोहोचला आणि तिथे निष्प्रभ करणारी प्रतिपिंडं हजर असतील तर ती विषाणूला चिकटतील आणि तो विषाणू ACE2 receptor पर्यंत पोहोचणारच नाही. मग संसर्ग पसरणारच नाही.

स्थानिक म्युकोजल लसीचा विचार करायचा असेल तर त्यासाठी ही प्रतिपिंडं नाकातोंडात असणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती थोडी पुरेशी नाहीत, तर मोठ्या प्रमाणात हवीत. स्थानिक पातळीवर जी प्रतिपिंडं असायला पाहिजेत, त्यात एक IgG (ImmunoGlobulin-G) प्रकारचं असतं, आणि दुसरं IgA प्रकारचं असतं. ही IgA अधिक उपयुक्त ठरतात, आणि ती तयार करणं तितकंच अवघड काम आहे. त्यामुळे अशा लसी उपलब्ध झाल्या तरी त्या पुरेशा प्रमाणात आणि पुरेशी दीर्घकालीन परिणामकारक राहणारी प्रतिपिंडं निर्माण करतील, हे अवघड आहे. त्यामुळे अशा लसी जवळजवळ उपलब्ध नाहीत. हे केवळ नाकातोंडाविषयीच नाही. उदाहरणार्थ, टायफॉईडचे जंतू तोंडातून आत जातात, आणि पोटाच्या आतल्या आवरणाला छेदून ते टायफॉईड हा आजार निर्माण करतात. समजा आपल्या आतड्यात टायफॉईडविरोधी IgA प्रतिपिंडं उपलब्ध असतील तर पुन्हा टायफॉईड होण्याची शक्यता खूप कमी होते. पण हे खूप अवघड आहे. सध्या सार्स-कोव्ह-२साठीही अशी लस बनवण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, पण एवढ्यात काही ती लस उपलब्ध होईल असं वाटत नाही.

प्रश्न : लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? त्यामुळे लस न घेतलेल्यांना संरक्षण देणारी सांघिक प्रतिकारक्षमता (herd immunity) कितपत वाढते? भारतात सांघिक प्रतिकारक्षमता येण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण करावं लागेल?

उत्तर : लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो. त्यामागचा तर्क असा - स्नायूमध्ये लस घेतली, की त्यामुळे संसर्ग जिथून होतो त्या प्रवेशद्वारांमध्ये, म्हणजेच नाकातोंडामध्ये, प्रतिकारशक्ती कमी प्रमाणात असते, पण असते. विषाणू आले की ACE-2 receptor द्वारे जंतूप्रवेश होतो. पण लसीमुळे जर मारेकरी टी पेशी तयार झालेल्या असतील तर त्या पेशींना समजतं की संसर्ग झालेल्या पेशींना मारायला पाहिजे. त्या संसर्ग झालेल्या पेशींमध्ये विषाणू वाढले तरी पुढे (लस दिलेली नसेल तर) साखळी अभिक्रियेनं (chain reaction) विषाणूंची संख्या जशी वाढली असती तशी लस दिल्यानंतर वाढत नाही. निष्प्रभ करणाऱ्या प्रतिपिंडांचाही (neutralizing antibody) तसाच फायदा होतो.

किंवा जरी अगदी नुसती साधी प्रतिपिंडं असली आणि तीसुद्धा विषाणूला चिकटली, तर neutrophils, macrophages सारख्या phagocytic - कण खाणाऱ्या पेशी तिथे पोहोचू शकतात आणि विषाणू खाऊ शकतात. जेव्हा पहिल्यांदा विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा आपल्या शरीरात प्रतिपिंडं नसतात हे लक्षात घ्यायला पाहिजे. लस घेतल्यानंतर प्रतिपिंडं तयार असतात त्यामुळे जंतूंना खाऊन टाकण्याची प्रक्रिया लस दिल्यानंतर खूप भरभर होते. जंतूंची शरीरातली संख्या मर्यादित ठेवण्यासाठी लसीचा नक्की फायदा होतो. हा साधा तर्क आहे. समजा शरीरात एक कोटी जंतू असतील - अशा वेळी थुंकीचा एक बारका थेंब जरी बाहेर पडला तरी त्यात जंतूंची संख्या बरीच असेल. पण एक कोटीऐवजी एक लाखच जंतू असतील तर प्रत्येक थेंबात कमी प्रमाणात जंतू असतील. म्हणजे आपण लोकांना संसर्ग देऊ शकतो, पण त्याचं प्रमाण लसीकरणानंतर कमी होईल.

इथे जाता जाता एक गंमत सांगते : कुठल्याही जंतूनाशकाची जाहिरात पाहा, डेटॉलछाप, वगैरे. “९९% जंतूंचा नायनाट होतो!” मुळात एक कोटी जंतू असतील तरी ९९% मेल्यानंतर एक लाख जंतू शिल्लक राहतातच! (संसर्ग होण्यासाठी) कधीकधी तेवढेही पुरतात.

पण असंच, म्हणजे जंतूनाशकासारखंच काम जर प्रतिपिंडांनी शरीराच्या आत केलं तर काय होईल? म्हणजे शरीरात एक कोटी जंतूंऐवजी एक लाखच जंतू शिल्लक राहतील तर तेवढ्या प्रमाणात रोगप्रसार कमी होईल. तात्पर्य, इतरांना संसर्ग कमी होईल. संसर्गजन्य रोग पसरण्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणूनही लसीकरण नक्कीच उपयुक्त आहे

आता या संदर्भात herd immunityबद्दल आपण बोलू. या शब्दाचं मराठीकरण करताना काही लोकांनी शब्द वापरला आहे, कळपाची प्रतिकारशक्ती. “आम्ही काय कळप आहोत का, प्राणी आहोत का”, असं यावर काही इतर लोक म्हणतात. खरं तर आपणही प्राणीच आहोत, पण आपल्याला प्राणी म्हणवून घ्यायला आवडत नाही. तो शब्द पचनी पडत नाही. म्हणून मी शब्द वापरते, सांघिक प्रतिकारशक्ती (आणि त्याच्या उलट म्हणजे वैयक्तिक प्रतिकारशक्ती).

आता हे चित्र पाहा :

सांघिक प्रतिकारक शक्ती - herd immunity
प्रतिमा आंतरजालावरून साभार.

या चित्रात तीन पॅनेल्स दाखवली आहेत. यातली निळी माणसं आहेत त्यांना रोग झालेला नाही, आणि त्यांचं लसीकरण झालेलं नाही. तांबडी माणसं आहेत त्यांचं लसीकरण झालेलं नाही, आणि त्यांना संसर्ग झालेला आहे. ती माणसं रोग पसरवू शकतात. पार्श्वभूमीला काढलेला गोलाकार पाहा. त्यातल्या सगळ्या माणसांना एक लाल माणूस संसर्ग देऊ शकतो. पहिल्या रांगेतल्या चित्राप्रमाणे परिस्थिती असेल, तर लवकरच सगळ्या माणसांना संसर्ग होईल, आजार ही पुढची गोष्ट. अगदी कोपऱ्यांतली माणसं संसर्गाच्या कक्षेबाहेर असली तरी हळूहळू त्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता दाट होईल. ही परिस्थिती म्हणजे जिथे आजार नवा आहे, लस कुणालाही मिळालेली नाही अशी.

मधल्या रांगेतली चित्रं पाहा, पिवळ्या लोकांना लस मिळालेली आहे. निळ्या आणि तांबड्या रंगांचा अर्थ वरच्यासाारखाच. ही परिस्थिती आपल्याकडे लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या अनेक लसींबाबत आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण होताना दिसलं तरीही अनेक मुलं लसीकरणाच्या कक्षेबाहेर राहतात, त्यामुळे अशी परिस्थिती दिसू शकते. इथे तांबडी माणसं पुन्हा संसर्ग पसरवणार. पिवळी माणसं लसीकरणामुळे सुरक्षित असतील. त्यांना संसर्ग होणार नाही, आणि त्यांच्याच जवळ असणाऱ्या निळ्या माणसांचंही संसर्गापासून रक्षण होईल. तरीही मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरेल आणि आजारही पसरू शकेल.

सगळ्यात खालच्या रांगेतली चित्रं पाहा. यांत बहुतेक लोकांनी लस घेतलेली आहे. ही आदर्शवत परिस्थिती आहे. सांघिक प्रतिकारशक्तीचं यथायोग्य उदाहरण आहे हे. निळी माणसं, जी काय खट-नटखट असतील ती, त्यांनी लस घेतलेली नाही. इंग्लिशमध्ये ज्यांना anti-vaxxers (लसविरोधक) म्हणतात असे लोकही असतात. अशा परिस्थितीत त्यांनाही (गैर)फायदा मिळून संरक्षण मिळतं. समाजाच्या दृष्टीनं, माझ्या लेखी, हितकारक वागणूक काय तर लसीकरण करून घेणं. या लसविरोधकांनी लस घेतली नाही तरी बाकीच्या बहुतांश समाजाचं लसीकरण झालं असलं तर या लोकांनादेखील संरक्षण मिळतं. ज्या प्रमाणात पहिल्या किंवा दुसऱ्या रांगेतल्या चित्रांत संसर्ग पसरलेला दिसत आहे, तेवढ्या प्रमाणात तिसऱ्या रांगेतल्या चित्रांत ते दिसत नाही. हे सांघिक प्रतिकारशक्तीमुळे. या निळ्या लोकांनी लस न घेऊनही त्यांना या समूहाच्या प्रतिकारशक्तीचा फायदा झाला असं म्हणता येईल.

चांगल्या मनानं विचार करताना ‘वसुधैव कुटुंबकम्’ वगैरे आपण म्हणतो, एकमेकांना मदतच केली पाहिजे, वगैरे. प्रत्यक्षात असं काही होत नाही. सांघिक प्रतिकारशक्तीच्या संदर्भात अगदी ‘वसुधैव कुटुंबकम्’ (म्हणजे अखिल पृथ्वीचा) नाही तरी देशापुरता सांघिक प्रतिकारशक्तीचा विचार करायचा झाला तरी तो विचार चुकीच्या पद्धतीचा कसा आहे हे आता सांगते. सांघिक प्रतिकारशक्तीसाठी जर सगळी पिवळी माणसं त्याच एका पेठेत राहत आहेत, किंवा एका वस्तीत राहत आहेत, किंवा त्याच गगनचुंबी इमारतीत राहत आहेत (मग भले तिथे हजार माणसं का असेनात); तर, जोवर ही हजार माणसं त्याच एका मोठ्या ‘कुटुंबा’त राहत आहेत आणि जोवर बाहेरून तिथे जा-ये होत नाहीये तोवर तिथल्या लस न घेतलेल्या लोकांना संरक्षण मिळण्याची शक्यता आहे. पण जरा सध्याचं जग पाहा : शहरातल्या शहरात, दोन शहरांमध्ये, दोन देशांमध्ये प्रवास घडत असतो असं हे जग आहे. मी आणि माझ्या भोवतीची हजार माणसं, यांचाच जर एक संघ किंवा कुटुंब मानलं; तर जोवर त्याचा इतर संघांशी संबंध येत नाही तो‌वर त्यांची सांघिक प्रतिकारशक्ती उपयोगी पडेल. पण या संघात गावाबाहेरची, लस न घेतलेली १०-१५ माणसं जेव्हा येतील, तेव्हा या संघातल्या लस न घेतलेल्या लोकांना त्याआधी मिळालेलं संरक्षण वृथा ठरेल. अशी माणसं भराभरा आजारी पडू शकतात. सांघिक प्रतिकारशक्ती अगदी छोट्या वस्तीपुरती, पेठेपुरती असेल; जोवर या लोकांपैकी कुणाचाही बाहेरच्या लोकांशी संबंध येत नाही, तोवरच त्या सांघिक प्रतिकारशक्तीचा फायदा. देवघेव सुरू झाली की हा सांघिक प्रतिकारशक्तीचा मुद्दा निरुपयोगी ठरू शकतो.

या संदर्भात आणखी एक सांगते : आता मी पुण्यात बसून बोलत्ये. पुण्यात २०२०च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बिकट परिस्थिती होती. सप्टेंबरमध्ये हॉस्पिटलात एकही बेड नव्हता. तेव्हा शहरातल्या कुठल्या भागात संसर्ग आणि आजाराचं प्रमाण जास्त होतं हे आठवा. ती, त्या भागातली माणसं आता पुन्हा आजारी पडताना दिसत आहेत का? जवळजवळ नाही. गेल्या वेळेला गरीब वस्त्यांमध्ये, ज्यांची घरं छोटी छोटी आहेत, तिथे एकाला जर रोग झाला तर घरच्या बहुतेकांना होत होता. आजूबाजूच्या लोकांशीही त्यांची मोठ्या प्रमाणावर देवघेव असते, कारण फार जागा नसते. तर, अशा लोकांना तेव्हा मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती येऊन गेली. आता बघितलं तर आपल्यासारख्या, फ्लॅट-सिस्टिममध्ये राहणाऱ्या, मध्यमवर्गीय लोकांमध्ये किती लोकांना आजार झाला? गेल्या सप्टेंबरपेक्षा याची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे, गेल्या वर्षी ज्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाली होती, त्यांना आता आजार होत नाहीये. प्रतिकारशक्ती काम करत आहे. पुन्हा संसर्ग झालेला दिसत नाही.

भारतात लसीकरणाचं प्रमाण अद्याप फार मोठं नाही, जेमतेम ५-७% आहे. साठीच्या वरच्या लोकांचं लसीकरण सुरू झालं, मग ४५ वर्षांवरच्या लोकांचं, त्यातही पहिला डोस झालेला आहे, अशी रडकथा सुरू आहे. म्हणून, लसीकरणामुळे सांघिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे असं म्हणण्याऐवजी, माझं म्हणणं असं आहे की छोट्या छोट्या गटांमध्ये, क्लस्टर्समध्ये, महापालिकांच्या प्रभागापेक्षाही लहान भागांत प्रतिकारशक्ती निर्माण झाली होती. तिथे स्थानिक पातळीवरची सांघिक प्रतिकारशक्ती या विचित्र लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात उपयोगी ठरली. तिथली माणसं नव्या आलेल्या म्यूटेशन्समुळे आजारी पडत नाहीत अशी परिस्थिती आहे.

Serological survey - Pune

आता वरच्या चित्रात विदाधारित माहिती दाखवली आहे. यात या वरच्या स्पष्टीकरणाच्या संदर्भातली, सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाची विदा आहे. या सर्वेक्षणात ‘आयसर’ आणि पुणे विद्यापीठातली काही मंडळी सहभागी होती आणि पर्सिस्टंट फाऊंडेशननं याला आर्थिळ बळ पुरवलं होतं. यात य-अक्षावर आहे : दर हजारी लोकसंख्येमागे, ऑगस्ट आणि सप्टेंबर (२०२०) महिन्यांच्या काळात किती माणसांत संसर्ग झाला तो आकडा (incidence). क्ष-अक्षावर आहे जुलै महिन्यातला सिरो-प्रिव्हॅलन्स. रक्तचाचणीतून हा आकडा मिळवला जातो. ही अक्षरं - KP-SP म्हणजे कसबा आणि सोमवार पेठ. LK म्हणजे लोहियानगर आणि कासेवाडी. या आलेखातली ही दोन टोकं आहेत. आलेखातला परस्परसंबंध व्यस्त आहे, inverse correlation. लोहियानगर भागात त्या सर्वेक्षणातल्या वानवळ्यापैकी (sample) ६५% लोकांमध्ये सार्स-कोव्ह-२ची प्रतिपिंडं होती (सिरो-प्रिव्हॅलन्स). उलट कसबा आणि सोमवार पेठांत ३०-३५% लोकांमध्येच ही प्रतिपिंडं होती. त्या नंतरच्या तीन महिन्यांत कसबा-सोमवार पेठांत संसर्ग होणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती कारण कमी लोकांमध्ये प्रतिपिंडांमधून मिळणारं संरक्षण होतं. लोहियानगर भागात आधीच ६५% लोकांमध्ये प्रतिपिंडं होती, त्यामुळे पुढे होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण दर हजारी ४ एवढंच होतं. लोहियानगरच्या एका वस्तीमधूनच वानवळा घेतला होता.

जेव्हा ६०-६५% लोकांत प्रतिपिंडं होती, तेव्हा सांघिक प्रतिकारशक्तीचा काही प्रमाणात उपयोग झालेला दिसून आला. पण ३०-३५% लोकांतच प्रतिपिंडं होती, तेव्हा त्याचा फायदा होत नव्हता. या उदाहरणावरून सांघिक प्रतिकारशक्तीचा विचार केला तर प्रत्येक छोट्या-छोट्या भागांत याचे सांख्यिकी स्थिरांक निरनिराळे येतील. जगाविषयी, देशाविषयी, पुणे जिल्हा, शहराविषयी असे काही एकच एक आकडे देता येणार नाहीत. आपल्याकडे विदा असते ऐवजी नसतेच, असं वास्तव असताना सांघिक प्रतिकारशक्तीविषयी एक आकडा सांगणं, हे पुरेशा माहितीशिवाय काही तरी ठोकून देणं आणि “चालवून घ्या हो, एवढाच डेटा असतो”, असं होईल. तसं करू नये. लसीकरणाचा उपयोग होत नाही, असं नाही. रोग होऊन गेल्यावर संरक्षण मिळत नाही असंही नाही. आत्ता सांख्यिकी स्थिरांक एवढा आहे, आणि देशाचा आकडा एवढा असला पाहिजे, अशा निष्कर्षापर्यंत आपण उडी मारू नये. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर जेव्हा देशाची ७०% जनता प्रतिपिंडं दाखवेल तेव्हा उरलेली ३०% सुरक्षित असेल, अशी मोठी विधानं गंभीरपणे करू नयेत.

प्रश्न : भारतात आढळणाऱ्या नव्या करोना प्रकारांबद्दल (mutation variants) कुठल्या भारतीय प्रयोगशाळा काम करत आहेत? भारतात कुठले नवे प्रकार सापडले आहेत? ते किती चिंताजनक आहेत?

उत्तर : नव्या प्रकारांवर काम करणाऱ्या किमान ५-६ प्रयोगशाळा आहेत, त्यांतल्या पुण्यात दोन आहेत. एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, जिचा लसीकरणाच्या संदर्भात उल्लेख केला होता. दुसरी नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस. दोन्ही संस्था genome sequencing - जनुकसंचाच्या क्रमनिर्धारणाचं काम करत आहेत. याशिवाय हैद्राबादची CCMB, कलकत्त्याजवळ NIBM, दिल्लीतही IGIB. या सरकारी संस्था मला माहीत आहेत, इतरही आहेत.

हे तीन प्रकारचं काम असतं. जागोजागी लोकांच्या नाकांतून नमुना पदार्थ गोळा करणं, त्या व्यक्तीची माहिती गोळा करणं, ती व्यक्ती कुठली, एकटी राहणारी का, कुंभमेळ्यातून आलेली का, अशीही माहिती गोळा केली जाते. गेल्या वर्षी मरकजची परिस्थिती होती तेव्हा खूप आरडाओरडा झाला होता, आणि आता आपण कुंभमेळ्याविषयी अगदी मौन बाळगून आहोत. पण कुंभमेळा संपला, किंवा शाही स्नानाला गेलेली माणसं जागोजागी परत गेली की काय होईल या कल्पनेनंच मला भीती वाटते. पुण्यातली माणसं तिथे गेली नसतील, असं मला उगाच वाटतं. कुणी असला देव, आणि कुणी मानत असेल तर त्याच्याकडे प्रार्थना करा असंही मला म्हणावंसं वाटतं. सध्या पुण्यातली परिस्थिती वाईट आहे. त्यात कुठले कुठले विषाणूचे प्रकार इथे आणून पसरवण्याची गरज नाही. आहे तेवढं पुरे आहे.

तर आता म्यूटेशनबद्दल : कुठलीही पेशी - विषाणू, जीवाणू, आपल्या शरीरातली कुठलीही - त्यात डीएनएची दोन सर्पिलाकार (double helical) रचना असते, त्याचं विभाजन होतं, दोनाचं एक होतं, आणि प्रत्येकाला पूरक (complementary) असं दुसरं हेलिक्स तयार होतं. यात दुसरी साखळी बनताना नेहमीच म्यूटेशन - बदल होत असतात. जी एन्झाईम्स काम करतात त्यांची कार्यक्षमता कमी पडते. काही high fidelityची म्हणजे कमीत कमी चुका करणारी असतात, काही खूप चुका करणारी असतात. कुठल्याही पेशीचं विभाजन होतं तेव्हा काही ना काही बदल - म्यूटेशनं होत असतात. आपल्या एका मूळ पेशीपासून - zygote - आपणही वाढलो आहोत. प्रत्येक पेशीचा डीएनए त्या मूळ झायगोटपेक्षा थोडा निराळा असणार आहे.

हेच विषाणूसंदर्भात, आणि जरा जास्तच प्रमाणात, कारण तो आरएनए असतो, त्यात एकच हेलिक्स असतं. त्यात कुठले बदल होतात, कुठले टिकून राहतात? तर विषाणू जिवंत राहायला किंवा संसर्ग अधिक सक्षमपणे होण्यासाठी जे बदल जास्त फायद्याचे ते टिकून राहतात. असा फायदा नसणारे विषाणू टिकत नाहीत. कधी कधी बदलांमुळे काही फरक पडत नाही. कधी विषाणूबदलानंतर समजा त्याची ACE-2 receptorला चिकटण्याची क्षमताच संपली तर त्याचं पुनरुत्पादन होणार नाही, मग तो जगूच शकणार नाही. अशी वेगवेगळी म्यूटेशन होत जातात.

अशी मोठी महासाथ सुरू असताना प्रत्येकाच्या शरीरात काही ना काही म्यूटेशन घडत जातात. त्यांचा प्रसारही होत असतो. औषधंदेखील कधी mutagenic असतात, कधी प्रतिपिंडं देतात - प्लाझ्मा थेरपी - तर त्यामुळे म्यूटेशन होणं भाग पडतं.

तर सध्या पुण्यात, महाराष्ट्रात एक नवा म्यूटंट - प्रकार सापडला आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे B.1.617. मूळच्या विषाणूमध्ये L हे अमिनो आम्ल स्पाईक प्रथिनाच्या ४५२ जागेवर होतं, नव्या म्यूटंटमध्ये त्याजागी R हे अमिनो आम्ल आलेलं आहे. त्यामुळे त्याचं वर्णन L452R असं करतात. तसंच आणखी एक आहे E484Q. म्हणजे ४८४ जागेवर Eच्या जागी Q आलेलं आहे. ही दोन्ही स्पाईक प्रथिनांतली म्यूटेशनं आहेत. यामुळे स्पाईकचा आकार बदलू शकतो. त्याचे परिणाम घडू शकतात. या बदलांना B.1.617 असं नाव मिळालेलं आहे. महाराष्ट्रात आणि भारतातच हे genome sequencingचं काम थोडंसंच होतंय.

साधारण जानेवारीत, अकोल्यात थोड्या कमी प्रमाणात हा दुहेरी-बदल (double mutant) सापडला होता. आता या दुहेरी बदलाचं प्रमाण बरंच वाढतं आहे, २०-२२ जिल्ह्यांत त्यांनी थोडी सँपल्स तपासली आहेत, आणि त्यांत हा सापडतो आहे. ज्यांना संक्रमण झालेलं नव्हतं, त्यांना आता होतंय हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तसाच हा दुहेरी-बदल झालेला विषाणू, double mutant भराभरा पसरतो आहे हेही खरं आहे. या म्यूटेशनांपैकी एकामुळे ACE-22 receptorला चिकटण्याची क्षमता वाढते, असं प्रयोगशाळेत दाखवून झालेलं आहे. तरीही लसीकरणाचा फायदा असूच शकतो असं मला वाटतं.

जर लस घेतलेलीच नसेल, आणि संसर्गही होऊन गेलेला नसेल तर या विषाणूच्या ‌विरोधातली तुमची प्रतिकारशक्ती शून्य आहे. जर आधी संसर्ग होऊन गेलाय आणि आता या बदल झालेल्या विषाणूचा संसर्ग जरी झाला तरी जुन्या संसर्गामुळे जी प्रतिकारशक्ती तयार झालेली असेल ती संपूर्णपणे वाया जात नाही. पुन्हा नव्यानं संसर्ग झालाच, तरीही त्या आधीच्या प्रतिकारशक्तीमुळे व्यक्तिगत पातळीवरही जगबुडी होण्याची शक्यता कमी असेल. तसंच लसीकरणाच्याही बाबतीत. लसीकरणाची प्रतिकारशक्ती नव्या विषाणूच्या विरोधात १००% उपयोगी पडेलच असं नाही. मात्र, लस न घेतलेल्या माणसांपेक्षा (किंवा संसर्ग न झालेल्या माणसांपेक्षा), सुरुवातीपासून आपण (म्हणजे लस घेतलेले) चार पावलं पुढे असू. पंधरा पावलं पुढे असणं आणखी चांगलं. पण अजिबातच काही आघाडी नसण्यापेक्षा हे चांगलंच.

व्हेरियंट्सना घाबरून, ‘आता आम्हांला होणारच आहे’, असं हातपाय गाळून अफवांवर विश्वास ठेवू नये. लसींचा फायदा असा की अत्यंत गंभीर आजार आणि मृत्यू यांपासून खूप मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळतं. एरवी साठीच्या पुढच्या लोकांना आजार झाला तर त्याचं गांभीर्य भराभर वाढत जातं. तेही लसीकरणामुळे होत नाही, त्यामुळे याचा थोडक्यात सारांश असा की लस घ्याच.

प्रश्न : ऑटोइम्यून आजार असणाऱ्या लोकांचा कोव्हिडला प्रतिसाद कितपत निराळा असेल? कोव्हिडमुळे त्यांच्या ऑटोइम्यून स्टेटसवर काय परिणाम होईल? याबद्दल पुरेशी विदा नसेलही, पण सैद्धांतिक आकलन काय असेल?

उत्तर : सगळ्या प्रश्नांची उत्तरं (लगेच) मिळणार नाहीयेत. ऑटोइम्यून आजार असणाऱ्या लोकांची आपापली औषधं असतीलच. फार गंभीर आणि आजारी नसाल तर लस घेता येईलच. काही प्रमाणात गैरपरिणाम घडतील, पण ऑटोइम्यून आजारामुळे प्रतिकारशक्ती निर्माणच होणार नाही, असं नाही. उदाहरण ऱ्हूमटॉईड आर्थ्रायटिस, संधिवात. मेथोट्रिक्सेट हे औषध त्यासाठी वापरतात, ते कॅन्सरसाठीही वापरतात. [हे immunosuppressive आहे; म्हणजे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती दाबली जाते.] असे उपचार सुरू असताना लस घ्यायची का, हा विचार नक्कीच करावा लागतो. काही टी-पेशी उपचारही असतात, रोगप्रतिकारशक्तीसंदर्भात. अशा वेळेस त्या-त्या रुग्णानुसार ठरवावं लागेल.

इतर अनेकांच्या तुलनेत ऑटोइम्यून आजार असलेल्या लोकांची परिस्थिती गंभीरच असेल असंही नाही. कदाचित त्यांची लक्षणंही दिसणार नाहीत. ते बरेही होऊ शकतात. पण मी इथेच थांबते.

प्रश्न : लस घेतल्यामुळे संसर्ग थांबतो किंवा कमी होतो. याचा मुख्य अर्थ खोकला, बोलताना जो विषाणू पसरतो त्यात श्वसनमार्गाचा वरचा भाग, नाक-घशाच्या मागचा भाग. तिथला विषाणू (खूप) कमी होणं, हे लसीमुळे घडतंय का?

उत्तर : हो. ‘खूप’ हा आकडेवारीचा भाग झाला. परिणामही आकडेवारीत दिसून येतो. लसीकरणानंतरसुद्धा मास्क का लावायचा आणि सहा फुटाचं अंतर का राखायचं, यामागेही हेच कारण आहे.

समजा माझं लसीकरण झालं आहे. मग मला संसर्ग झाला तरीही प्रतिकारशक्ती असल्यामुळे माझ्या शरीरातल्या विषाणूचं प्रमाण कमी होतं. दर मायक्रोलिटरमागे मी किती ‌विषाणू बाहेर टाकेन, याचं प्रमाण लसीकरण झाल्यानंतर खूपच कमी होईल. विषाणूचा प्रतिकार करायला स्थानिक पातळीवर असणारी प्रतिपिंडं लसीकरणानंतरच उपलब्ध झाली, त्याआधी ती नव्हती. तरीही मी समजा, कुणावर नेम धरून शिंकले-खोकले तर मी त्यांना संसर्ग देऊ शकतेच. पण फोमाईट्समार्फत जेवढा सहजी प्रसार होऊ शकतो तेवढ्या सहज होणार नाही. आणि हा सगळा आकड्यांशी संबंधित, quantitative मुद्दा आहे.

प्रश्न : विषाणूच्या नव्या प्रकारांबद्दल, व्हेरियंटबद्दल प्रश्न आहे. बरेचसे संसर्ग मिश्र प्रकारचे असणार आहेत का?

उत्तर : खात्री नाही मला. एचआयव्हीच्या बाबतीत पाहा, तो क्रॉनिक - आयुष्यभर पुर‌णारा - आजार असल्यामुळे त्याच माणसाच्या शरीरात अनेक वर्षं विषाणू जिवंत राहतात. त्यामुळे एकाहून जास्त सिक्वेन्सेस असणारे विषाणू निघू शकतात. तुलनेत, कोव्हिड हा acute, कमी काळ चालणारा आजार आहे. १०-१५ दिवसांत सगळं आटोक्यात येतं. जरी आपल्या शरीरात पहिल्या दिवशी आणि पंधराव्या दिवशी असणाऱ्या विषाणूंत थोडाफार फरक असला तरी गोंधळ निर्माण होईल एवढा फरक पडणं कठीण आहे.

नवा व्हेरियंट पसरतो तेव्हा संसर्ग होतानाच नव्याचा संसर्ग होतो. हा नवा डबल-म्यूटंट कुठे जन्मला आहे हे माहीत नाही. पण पंजाबात तो जवळजवळ नाहीच. तिथे यूके व्हेरिएंट खूप पसरला आहे. पंजाबात यूकेमधल्या लोकांची जा-ये जास्त असेल. तिथले जितके वानवळे तपासले (आणि हा आकडा मोठा नाही, ६००-७०० सँपल्स असतील) तिथे सुमारे ७०% यूके व्हेरियंट दिसला आहे. तेव्हाच महाराष्ट्रातलीही काहीशे सँपल्स बघितली तर त्यात ६०-७०% डबल म्यूटंट आहे. एवढा फरक आहे.

सुरुवातीला आपण म्हणालो की परदेशातून आलेल्या लोकांनी ही साथ पसरवली. हे आता पंजाबविषयी म्हणता येईल एक वेळ. पण महाराष्ट्राबद्दल असं म्हणता येणार नाही.

घेतलेल्या वानवळ्यापैकी जेमतेम १-२ टक्क्यांचं sequencing होत असेल (जे ५% व्हायला हवं). त्यामुळे यात खूपच वानवळ्याची त्रुटी (sampling error) असणार. महाराष्ट्राबद्दल एवढंच म्हणता येईल की जानेवारीतही हा डबल-म्यूटंट महाराष्ट्रात होता. कारण दोन लोकांमध्ये तो सापडला होता. आता एक तर साथ खूप पसरली आहे, आणि sequencing करण्याची सोय जऽऽऽरा वाढली आहे. त्यामुळे १५ मार्चपर्यंतची जी सँपल्स होती, त्यात हे प्रमाण जास्त होतं. महाराष्ट्रात काय, आणि पूर्ण देशभरात काय, संसर्ग झालेल्या सगळ्यांचं तर नाहीच, पण संसर्ग झाल्याचं माहीत असलेल्यांपैकीदेखील १% लोकांचंही sequencing होत नाहीये. त्यामुळे आपली विदा खूप गरीब, तोकडी आहे, आणि त्यावर आधारित आपण बोलत आहोत हे लक्षात घ्या. साथशास्त्राचा जो मुद्दा आहे, त्यात पुरेशी विदा नसल्यामुळे कार्यकारणभावाबद्दल आपल्याला काही बोलताच येत नाही.

प्रश्न : विषाणूचे नवे प्रकार, व्हेरियंट्स, पसरण्याच्या बाबतीतच जास्त कार्यक्षम आहेत का त्यांची रोगनिर्मितीक्षमता - virulenceसुद्धा जास्त आहे?

उत्तर : रोगनिर्मितीक्षमता जास्त नाही असं सध्या वाटत आहे. त्यासाठीही चाचण्या, परीक्षणं करावी लागतात, तेही पुरेसं झालेलं नाही. Convalescent serum - आजारातून उठणाऱ्यांच्या चाचण्या, vaccinated serum - लस घेतलेल्या लोकांच्या चाचण्या असे प्रकार असतात. तरी जी काही प्राथमिक विदा आहे, (जी भरभक्कम नाहीच) त्यावरून असं वाटतंय की दोन बदलांपैकी एकाची संसर्गक्षमता (transmissibility) जास्त आहे, आणि लसीमुळे तयार झालेली प्रतिपिंडं आहेत ती कदाचित दुसऱ्या बदलाविरोधात १००% उपयोगी पडणार नाहीत. पण हे सगळे अंदाज आहेत, तर्क आहेत आणि त्याची कारणं मी आत्ताच सांगितली तशी - विदा फारशी नाही. खूप लोकांचं sequencing झालेलं नाही, ना या सिरम चाचण्या झाल्यात. हे हवेतलं बोलणं आहे.

प्रश्न : नवीन व्हेरियंट्स बहुतेकदा किमान काही अंशी तरी लसींना दाद देतात, या नियमाला द. आफ्रिकन व्हेरियंट आणि ॲस्ट्राझेनेका (सिरम) लस हा अपवाद आहे का?

उत्तर : हो. द. आफ्रिकेतली विदा आश्चर्यकारक आहे. तर्क असं सांगतो की म्यूटेशन्स (जनुकांमधले बदल) जसे हळूहळू वाढत जातात तशी हळूहळू लस निरुपयोगी होण्याचं प्रमाण वाढत जातं. पण एखादं म्यूटेशन असं निघू शकतं, की ते बरोब्बर योग्य (का चुकीच्या!) ठिकाणचं झाल्यामुळे चांगली, निष्प्रभ करणारी (neutralizing) प्रतिपिंडं पूर्णपणे निरुपयोगी ठरतात. अशी एक शक्यता आहे.

मात्र, द. आफ्रिकेतली विदा मर्यादित केसेसवर आधारित आहे. भारतात अजूनपर्यंत जी काही मर्यादित विदा आहे, त्यात द. आफ्रिकन व्हेरियंटचं प्रमाण फार नाही. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण जितकं लवकरात लवकर लसीकरण सार्वत्रिक करू तेवढं आपल्या फायद्याचं आहे. तसं झालं तर किमान आजारी पडून मरणाऱ्या माणसांची संख्या खूप कमी होईल, आणि सध्या त्याची फार गरज आहे.

प्रश्न : आजच (१५ एप्रिल) दुपारची बातमी आहे की छत्तीसगढचे एक सरकारी अधिकारी पंधरा दिवसांपूर्वी लसीकरण पूर्ण होऊनही कोव्हिडनं गेले. याचा अर्थ कसा लावायचा?

उत्तर : लसीकरण होतं, किंवा संसर्ग होतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती काम करते. आपण खूप निरनिराळी माणसं आहोत; आपला जनुकसंच (genome) इतका निरनिराळा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती कमीअधिक प्रमाणात निर्माण होते असं धरू. तर सगळ्यांची प्रतिकारशक्ती एका आलेखात मांडायची झाली तर त्याचा normal distribution curve दिसेल. उदा. -

Normal Distribution Curve (Representative)
प्रातिनिधिक प्रतिमा (आंतरजालावरून साभार)

म्हणजे, सगळ्यांची प्रतिकारशक्ती पाहिली तर काहींची खूप जास्त असेल, काहींची प्रतिकारशक्ती खूप कमी असेल. समजा १०% लोकांमध्ये १००० एकक प्रतिकारशक्ती आहे. ८०% लोकांमध्ये साधारणपणे ५० ते ८०० एकक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. आणि या आलेखात अगदी डाव्या बाजूच्या लोकांमध्ये फार कमी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असेल. या प्रत्येकाचं कारण, एकेकाच्या बाबतीत शोधता येणार नाही.

वेगळं उदाहरण घ्यायचं तर मानवी शरीरातला लूकोसाईटचा आकडा पाहा. आपण सगळ्याला काही एक पल्ला (range) देतो. बहुतेकांच्या शरीरातल्या पांढऱ्या पेशींचा जो आकडा असतो त्याला आपण नॉर्मल म्हणतो. एखाद्याचा आकडा फार जास्त असेल तर त्याला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. एखाद्याचा आकडा फार कमी असेल तर त्यालाही आपण ॲबनॉर्मल म्हणतो. पण कदाचित त्या व्यक्तीसाठी तो नॉर्मल असेल. मुद्दा असा आहे की लसीकरणानंतर असंच नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन येतं. लसीकरणानंतर किती प्रतिपिंडं असायला पाहिजेत हे आपण मोजलं, आणि ते अमुक एवढ्यापेक्षा जास्त असलं पाहिजे, असं ठरवायचं झालं, तर तो आकडा कसा ठरवतात? (१०००, ५००० एकक जे काय असेल ते. )

तर, चाचण्यांमध्ये जे लोक सहभागी झाले होते, त्यांचे आकडे मोजतात. बहुतेक लोकांमध्ये या आकड्याच्यावरच प्रतिपिंडांचे आकडे दिसत आहेत. त्यानुसार तो पल्ला मान्य करतात. चाचण्यांमध्येही त्या खाली असणारे लोक असतात. हे सरसकटीकरण अशासाठी केलं जातं, की आकडे बघून हो का नाही, किंवा ० का १, असं ठरवता येतं. अमक्या मर्यादेच्या वर प्रतिपिंडांचा आकडा असेल तर तुम्ही सुरक्षित आहात.

पूर्ण लसीकरण झाल्यानंतरही अशी माणसं असतात की ज्यांच्याकडे पुरेशी प्रतिपिंडं नाहीत. म्हणजे त्यांच्यात पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही. पण हे तपासता येणं शक्य नाही. उदाहरणार्थ, एका हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांच्या एका मोठ्या समूहाला पुन्हा संसर्ग झाला असं वाटलं. म्हणून तपासणी सुरू झाली. या डॉक्टरांचं पूर्ण लसीकरण झालेलं होतं. पंधरा दिवस उलटले होते, तरी त्यांना पुन्हा का संसर्ग झाला? त्या पाचच लोकांची विदा माझ्यापर्यंत (अशीच) पोहोचली होती. पाचांतल्या एका डॉक्टरांच्या शरीरात, लसीकरण होऊनही प्रतिपिंडं नव्हती. आता पाच लोकांवरून सांख्यिकी निष्कर्ष काढता येत नाहीत, हे खरंच.

एखादी लस ९०% संरक्षण देते, असं म्हणतो तेव्हा ती लस मला ९०% संरक्षण देते असं नाही. मला संरक्षण एक तर असतं, नाही तर नसतं. पण १०० माणसांपैकी ९० लोकांना पूर्ण संरक्षण देते, आणि उरलेल्या दहा लोकांना देत नाही. हा बायनरी विचार आहे, हो-नाही सारखा. तो इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. ही बाब फक्त व्हेरियंट्सच्या बाबतीतच नाही, जुन्या विषाणूंबद्दलही हे होऊच शकतं.

कधी अशा लोकांना दुसरा किंवा तिसरा बूस्टर डोस घेऊन मदत होते. पण मोठ्या प्रमाणावर ही महासाथ आलेली असताना हे करणं शक्य नाही. आपल्या वाटणीला जे आलं ते आलं.

प्रश्न : भारतात ज्यांना कोव्हिड-१९ होऊन गेला आहे आणि जे बरे झाले आहेत त्यांनाही लस घ्यायला सांगत आहेत. त्यामागचा काय विचार आहे?

उत्तर : संसर्ग होऊन बरे झालेल्या लोकांकडे काही अंशी प्रतिकारशक्ती आहे.

आज माहीत नसलेल्या काही गोष्टी खालीलप्रमाणे -

१. संसर्ग, किंवा रोगानंतरही जी प्रतिकारशक्ती आहे ती किती काळ टिकेल? प्रत्येक माणसात किती प्रतिकारशक्ती आहे, कमी-जास्त आहे? हे संक्रमणाच्या बाबतीतही खरं आहे.
हे माहीत नसल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लस घेणंच शहाणपणाचं ठरतं.
समजा, आजार होऊन गेल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरातली प्रतिपिंडांची संख्या कमी झाली असेल तर लसीमुळे तो आकडा पुन्हा वर जाईल, आणि काही काळ टिकेल.

२. लसीचं एक uniform formulation असतं - डोस म्हणा किंवा आणखी काही. ते सगळं समान असतं. जेव्हा तुम्हांला-मला संसर्ग होतो तेव्हा पाच विषाणूंमुळे होणारा संसर्ग आणि पाचशे विषाणूंमुळे होणारा संसर्ग असं काही वेगवेगळं असू शकतं. त्यानुसार, काही प्रमाणात, किती प्रतिकारशक्ती, कशा प्रकारे निर्माण होते, असे माणसांमाणसांतले फरक असू शकतात. ते फरक काही प्रमाणात लसीचा एकसमान डोस दिल्यामुळे नाहीसे होऊ शकतात.

सध्या लसींना आपात्कालीन परवानगी दिलेली आहे, ती काय तपासणी करून दिलेली आहे? तर प्रतिपिंडं तयार होतात का, यापेक्षा त्यांना रोग झाला आहे का नाही, एवढीच तपासणी केली होती. त्यानंतर हळूहळू अशी विदा मिळायला लागली की समजा १०० लोकांना रोग झाला होता त्यांपैकी पाच लोकांना लस दिलेली होती आणि बाकीचे ९५ प्लासिबोवाले होते. मग जी प्रतिकारशक्ती तयार झाली होती, ती कशी होती याचे गुणधर्म वगैरे तपासणं बाकी आहे. आपात्कालीन परवानगीसाठी या कशाचाही अभ्यास झालेला नाही. माणूस आजारी पडलं, का नाही पडलं, बस्स.

ज्या जुन्या, पारंपरिक लसी आहेत, त्यांत अशा प्रकारचे सखोल अभ्यास जास्त प्रमाणात केले गेले आहेत. त्याची गरजही असते. पण महासाथ चालू असताना आता माणसं मरत आहेत म्हणल्यावर फार पर्याय नसतो, बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. लस किती काळ, आणि किती संरक्षण देऊ शकते याचा अंदाज नाही. पण ती सुरक्षित आहे हे आपल्याला माहीत आहे. वेगे वेगे ज्या लसी तयार केल्या त्यात सुरक्षिततेचा भाग अजिबातच नजरेआड केला नाही. पण गुणकारकता किती याला एक चाप लावला. दुसरा डोस दिल्यानंतर ४५ दिवसांत आजारपण येतंय का, एवढी छोटीशी चाचणी केली गेली. त्यावरून आपात्कालीन परवानगी दिलेली आहे.

चाचणीत सहभागी झालेल्या सगळ्या स्वयंसेवकांचा एक वर्षं पाठपुरावा करावा लागतो. [उदा. हे दुवे पाहा. दुवा १ आणि दुवा २] तो अजून कुणाचाही पूर्ण झालेला नाही.

प्रश्न : हृदय आणि कोव्हिडचा काय संबंध आहे? फुफ्फुसं आणि कोव्हिडबद्दल बरंच कानांवर येतं.

उत्तर : यात सिद्ध काहीच झालेलं नाही.

विशेषतः लसीचे गंभीर किंवा कमी गंभीर प्रकारचे दुष्परिणाम काय होतात, हे पाहता असं दिसलं की काही लोकांचा रक्तदाब खूप कमी होतो किंवा वाढतो.

कोव्हिडबाबतीत असं दिसलं की गंभीर परिस्थिती उद्‌भवते तेव्हा homeostatis - शरीराचा समतोल नष्ट होतो. रक्तदाब आधी ताब्यात असेल तरी तो विचित्रपणे वरखाली होऊ शकतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांचा हा नेहमीचा अनुभव आहे. जरा काही संसर्ग झाल्यावर, दोन-चार दिवस ताप आला की औषधं किंवा इन्सुलिनचा डोस कमीजास्त होऊ शकतो. अचानक शरीरातली साखर खूप वाढते किंवा कमी होते. किंवा, प्लेटलेट्स या रक्त गोठवण्याला मदत करणाऱ्या रक्तपेशींचे आकडे अचानक कमी होणं, रक्तात गुठळ्या होणं, असे दुष्परिणामसुद्धा दिसून येतात. शरीरातला एकेक अवयव इतर अवयवांशी जोडलेला असतो. शिवाय हॉर्मोन्सचा एकमेकांवर परिणाम होतो.

यांतल्या कुठल्याच घटकाचा फार तपशिलवार अभ्यास झालेला नाही. पुरुषांच्या तुलनेत बायकांवर दुष्परिणाम कमी होतो असं दिसलं आहे. आजारपण (Morbidity) आणि मृत्यू (mortality) दोन्ही बाबतींत. बायकांमध्ये इस्ट्रोजेन-प्रोजेस्टिरॉन जास्त असतात, पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन जास्त असतं म्हणून होत असेल; असं म्हणणं सोपं आहे. पण कार्यकारणभाव दाखवणं अवघड आहे. परस्परसंबंध (association) - हृदयविकाराचा धक्का येणं, रक्तदाब बदलणं, मधुमेहाचा त्रास वाढणं, यांसारख्या असंख्य गोष्टी नोंदल्या गेल्या आहेत. मी हेही ऐकलं आहे की काही लोकांमध्ये आधी मधुमेह नव्हता आणि बरं झाल्यानंतरही अचानक झालाय, आता औषध घेण्यावाचून गत्यंतर नाही. जास्त रक्तदाबाबद्दलही अशा एखाद-दोन घटना माझ्या कानांवर आल्यात. हा सगळा दीर्घ-कोव्हिडचा भाग असू शकेल असं मला वाटतं, आणि आपल्याला त्याबद्दल फार माहीत नाही. यातही परस्परसंबंध दिसला तरी कार्यकारणभाव दाखवता येत नाही.

त्यामुळे, याला ठोस उत्तर असं सध्या माझ्याकडे नाही.

---
(समाप्त)
(चर्चेत सहभाग : अबापट, मिलिंद पदकी, डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. विनायक जोशी, डॉ. निशिगंधा नाईक, नेहा चाबुकस्वार, डॉ. शारदा बापट, रोहिणी गानू दाते, योगिनी सरंजामे, सविता गोळे, अरुंधती वाघ सराफ, डॉ. उमेश घोडके, विवेक वैद्य, धनंजय, मिहिर, अद्वैत जोशी, संदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, भूषण पानसे, अनुपम बर्वे, मंदार कुलकर्णी)

field_vote: 
0
No votes yet

या संपूर्ण मुलाखतीत सहभागी असणाऱ्या सर्वांचे आणि अर्थातच, डॉ. बाळ यांचे शतःश आभार! यातील सर्व माहिती नीट समजाऊन घेण्याला खूप वेळ लागेल.

याच विषयाशी कदाचित सवांतर असा हा लेख :

https://science.thewire.in/the-sciences/zydus-virafin-pegylated-interfer...

झायडस कॅडिला या कंपनीच्या 'विराफिन' या औषधाला आपल्या देशात इमर्जन्सी वापराला कोविड-१९ विरोधी उपचार म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स कशा फसव्या आहेत आणि अंतिमतः झायडस कॅडिलाला कसा धो-धो नफा मिळणार आहे हे या लेखात चांगले स्पष्ट केले आहे. डॉ. बाळ यांचे ह्यावर काय मत आहे हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही भाग उत्तम झाले आहेत. वैयक्तिक प्रतिकारशक्ती, सांघिक प्रतिकारशक्ती, लशीची परिणामकारकता, तिच्या मर्यादा अशा अनेक अंगांबद्दलच चित्र सुस्पष्ट झालेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतेक मानवी शरीरात corona विषाणू नी प्रवेश केल्या नंतर .
शरीरात असणारी आणि विविध पातळीवर कार्य करणारी रोग प्रतिकार शक्ती एक सारखी काम करते की प्रतेक व्यक्ती नुसार वेग वेगळी.
ह्याचे उत्तर शक्यता आहे ,शक्यता नाही.
असे नको तर ठाम हवे.
T cell, हेल्पर cell आणि system मधील बाकी cells
रोग कारक विषाणू,जिवाणू शरीरात प्रवेश केल्यावर एक सारखे रिॲक्ट करतात की प्रतेक व्यक्ती मध्ये react होणे वेग वेगळे आहे
. आणि हे react होण्यावर मेंदू चे नियंत्रण असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0