मला पाहताना - भाग २

(याच लेखाचा पहिला भाग या लिंकवर वाचता येईल. )

जी आणि जशी मी आत्ता आहे, त्यातला महत्वाचा भाग होता/ आहे - सेल्फ लव्ह! स्वतःचा स्वीकार आणि स्वतःसोबत खूप कम्फर्टेबल असणं. हे किती महत्वाचं आहे, याची अजिबातच जाणीव मला नव्हती. स्वतःबद्दल सतत असमाधान असायचं. विविध प्रकारच्या अभावग्रस्ततेने ग्रासलेली माणसं आतून कुरतडलेली, पोखरलेली नि असमाधानी असू शकतात. पण म्हणून किती? तुमची भौतिक परिस्थिती, सामाजिक स्थिती, वर्ग बदलत असेल तर तेव्हा तरी हे निवळत जायला पाहिजे.

असं माझं तीन-चार वर्षांपूर्वी होत नव्हतं. मनात सतत इतरांशी- मित्र मैत्रिणींशी तुलना केली जायची.

अनेक प्रकारची अधिमान्यता जगताना प्रत्येकाला आवश्यक असते, ती मिळत नसली तर माणसं एकटी, एकाकी, असमाधानी, मानसिक आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. मी जेव्हा अशा अवस्थेत होते, तेव्हा मला माझ्या 'जवळच्या' आणि सूज्ञ मित्र-मैत्रिणींनी 'पण तू कशाला कुणाकडून अपेक्षा ठेवतेस? असं झालं तर अपेक्षाभांग होणारच ना...' अशा सूचना दिल्या. यात तथ्य असलं आणि स्वतःकरता हे करावं लागलं तरीही हे समाजाने मानसिक स्वास्थ्याप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीतून निर्दयपणे अंग काढून घेणं आहे. मी नवे मित्र-मैत्रिणी मिळवीनच हो, पण त्याने आधीच्या मित्र-मैत्रिणींनी केलेला भेदभाव क्षम्य नसतो, दुर्लक्ष करण्याजोगा नसतो. पण पिडीत व्यक्तीलाच सल्ले देण्याची जन्मजात खोड आपल्या समाजाला आहेच.

Priyanka Part 2 Image 1

पुढे पुढे मला याचाही त्रास होणं बंद झालं आणि ‘हे सगळं असंच असतं, असंच चालणार…जगरहाटी, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ प्रकारच्या निर्दयी टेप्सचा त्रास होऊ लागला. त्याच्या नॉर्मलायजेशनचा त्रास होऊ लागला. का असंच असतं? असं मुळी नसलंच पाहिजे, असं कसं कुणीही कुणाशी तुच्छतेनं, भेदभावानं वागू शकतं? वर या सगळ्याला मान्यता मिळतेच कशी? मूलभूत मानवतेने वागणं एवढं अवघड आहे की काय लोकांसाठी? अशा प्रश्नांचा त्रास होऊ लागला. पाठोपाठ चोरपावलांनी त्याचं विश्लेषणही मनात शिरलं.

मग माझ्या असं लक्षात आलं की, अशा प्रकारच्या वगळलेपणाकडे ना कुणी सामाजिक समस्या म्हणून पाहत, ना त्याचा समाजशास्त्रीय अंगाने विचार होत. अगदी समाजशास्त्र, कायदा, विविध आंतरविद्याशाखेतून पी.एचड्या वगैरे करणारे लोकही एरवी Exclusion, Lived experience वर भरपूर अकादमिक चर्चासत्रे झोडतात, भरभरून लिहितात, मात्र आपल्या वागण्यातूनही काही तरी गफलती होतात, हे लक्षात घेत नाहीत. तसं तर प्रत्येक व्यक्ती विरोधाभास, विसंगतींनी भरलेली आहे, पण सामाजिक शास्त्रं शिकणाऱ्या, त्यात काम करणाऱ्या व्यक्तींना हे अधिक चांगल्या प्रकारे लक्षात यावं, अशी माझी अपेक्षा असते.

आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे, व्यक्तीला लागणारी सामाजिक अधिमान्यता आणि आनुषंगिक गोष्टींकडे मूलभूत गरज म्हणून पाहिलं जात नाही. म्हणजे असं की आपण भूकबळी मोजतो, तसे स्पर्शबळी मोजत नाही - मोजता येण्याची यंत्रणा नाही. त्याकरता आपण कुठलेच लढे उभारत नाही नि त्याविरोधात कुठेच न्याय मागत नाही - तशी व्यवस्थाच अस्तित्वात नाही. प्रेम, स्पर्श, सन्मान, समूहातलं सामावलेपण याअभावी कितीतरी लोक रोज कणाकणानं मरतात, पण आपण हा सामाजिक नाही तर व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नि लढा मानतो.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण याप्रमाणे मानसिक आरोग्य हीसुद्धा व्यक्तीची मूलभूत गरज असायला हवी. आणि मानसिक आरोग्य बरंचसं समूहातलं सामावलेपण, प्रेम, सन्मान, अधिमान्यता या घटकांवर अवलंबून असतं, असं मला वाटतं, अर्थात यामागे माझं कुठलं संशोधन नाही, तर मी स्वत:लाच एक सामाजिक एकक मानून केलेली चिरफाड आणि वैचारिक घुसळण यातून समोर आलेल्या या गोष्टी आहेत. मानसिक आरोग्य, सामाजिक शास्त्रं या साऱ्याचा माझा यत्किचिंतही अकादमिक अभ्यास नाही, आणि हे जे लिहितेय तो रिसर्च पेपरही नाही, ही या लेखनाची एक मर्यादा मला मान्य आहे आणि वाचकांनीही याकडे या मर्यादेसकट पाहावं.

तर हे असं सगळं असं असलं तरीही मी याचं काय करणार? हा प्रश्न उरतोच. मग वाटलं, यावर रचनात्मक काही केलं पाहिजे. कसं नि काय हे पुन्हा पुढचे प्रश्न. किंचित निराशा आली नि वाटलं की, च्यायला आपण अकादमिक क्षेत्रात असतो, तर अशा प्रकारच्या वगळलेपणाचा व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार दीर्घकालीन परिणाम असं काहीसं संशोधन केलं असतं, नवं थियरायजेशन केलं असतं कदाचित. पण आता त्या वाटेवरची गाडी कधीच हुकली आहे, तर प्लॅटफॉर्मवरून वाकून वाकून दूरवर पाहण्यात काही अर्थ नाही. एक पर्याय एलिमिनेट झाला. दुसरा पर्याय याबद्दलचा लोकांमधला जाऊन संघटित संघर्ष, लढा, जनजागृती, करता येण्याजोगा हरेक कृतीकार्यक्रम. तर या वाटेवर जाण्याचा पिंड, चिकाटी, निरलस वृत्ती आणि तशी भौतिक परिस्थितीही माझी नाही. सबब दुसरा पर्यायही बाद. तिसरा पर्याय होता - लिहिणं. हा मी स्वीकारला. हे आपण बरं करू शकू, याबाबतीत आत्मविश्वास होताच आणि आहे, आणि फिक्शन लिहिण्यातून किंबहुना या सगळ्या ताण-तणाव, गदारोळाला एक सर्जनशील वाट मिळेल, असं मला वाटलं आणि मी हे स्वीकारलं. एकदा स्वीकारलं, सुरु केलं नि त्यानंतर अशा गोष्टींचा त्रास खूप कमी झाला. किंवा कधी कधी तेवढ्यापुरता तात्कालिक झाला.

आपल्या भोवताली आपल्याला न पटणारं, विरोधी, अन्यायकारक असं बरंच सतत घडत असतं, त्याची केवळ चर्चा फुकाची आहे, त्यानं तात्पुरतं बरंही वाटेल, पण आपण विक्टीमहूड एकदा गोंजारू लागलो, की वाढ खुंटते. हे लवकर लक्षात आल्याने या सगळ्याचं करायचं काय, त्यासाठीही एक सर्जनशील मार्ग सापडला. जे दुखावणारं, धक्कादायक, विचित्र, नाट्यमय असं दिसेल, त्यात मला काही तरी गोष्ट दडलेली दिसू लागली. अनेक कथाबीजं नोंदवून ठेवण्याचा चाळा लागला. काही लिहिल्यासुद्धा, पण त्यातल्या काही सपशेल गंडल्या. काहींवर बरंच काम करणं बाकी आहे, ते वेळ मिळेल, सुचेल तसं करायचं, असंही ठरवलं. यात खरं खूप मजा येऊ लागली. पण म्हणजे जादूची कांडी फिरावी तसं होऊन आता मला कशाचंच काही वाटत नाही, असं झालेलं नाही. अजूनही मला वगळलेपण, बुलिंग याचा अनुभव आला की खिन्न वाटतं, फक्त आता त्यातच अडकून पडून स्वत:चं नुकसान करून घेणं जवळपास संपलं.

याशिवाय काही गोष्टी केल्या. वर ‘सेल्फ लव’चा मुद्दा सुटून गेला होता. मलाही वाटायचं, स्वत:वर प्रेम करायला पाहिजे, पण कसं? स्वत:वर प्रेम करा, तुम्ही स्वत:वर प्रेम करत नाही, तोवर दुसऱ्यावर करू शकणार नाही, वगैरे गोष्टी तुम्हाला सगळे सांगतात, पण ते नेमकं कसं करायचं, याबाबत कुणी बोलत नाही. अशा वेळी थेरपिस्टची मदत होते. ते काही एक्सरसाईजेस देतात, ते शिस्तीत करायचे. मला आवडणाऱ्या माझ्या काही गोष्टी, सवयी, गुण इ. ची नोंद करायची, काय आवडत नाही ते त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये लिहायचं…इ गोष्टी. (हे एक उदाहरण झालं, व्यक्तीपरत्वे गोष्टी बदलू शकतात) दुसरं म्हणजे मला आवडणाऱ्या कित्येक साध्या साध्या लहान-लहान गोष्टी मी मागच्या काळात केल्या. उदा., ठरवून एखादा सबंध दिवस लोळून पुस्तक वाचण्यात घालवला. रोज सात-आठ किलोमीटर चालले. चित्रपट पाहिले. काही अगदीच फालतू सिनेमेही पाहिले. आपलं चुकलं तर व्यक्ती आपल्यापेक्षा कितीही लहान का असेना, लगेच सॉरी म्हणून टाकणं (मनापासून, उपचार म्हणून नव्हे), नवनवीन लोकांशी गप्पा मारणं, कुटूंबासोबत काही वेळ घालवणं, अधूनमधून ट्रेकला जाणं, एकटीनंच स्कूटरवरून भटकून येणं, चांगला आहार - व्यायाम इ. बारीक सारीक गोष्टींनी खूप बदल झाला. साताठ किलो वजन कमी करण्यानं बराच काळ शरीर-मनावर आलेली मरगळ, सुस्तपणाही गेला आणि बरंच उत्साही वाटू लागलं.

Priyanka Article 2 Image 2

याबरोबर सोशल मीडियावर कुठलेही वाद, ट्रोलिंग होऊ देत, तिथं एंगेज होणं पूर्ण बंद केलं. त्यात मनस्ताप तर व्हायचाच, नाहक उर्जा नि वेळ जायचा. एंझायटी वाढायची. कारण तिथल्या कमेंट्सयज्ञात सतत आहुत्या पडत राहून ते कुंड धगधगतच राहतं कायम. अगदीच एखादी गोष्ट सेक्सिस्ट, रेसिस्ट, कास्टिस्ट आणि अजून कुठल्या अशा निकषावर भयंकर वाटली, राहवलं नाही तर उपहासाने त्यावर बदाम दिला किंवा एखादीच खोचक, उपहासात्मक ( केवळ स्वत:ला बरं वाटण्यासाठी) कमेंट केली की नंतर नोटिफिकेशन ऑफ करून निवांत तासभर पडी मारायची नाहीतर आपल्या कामात गुंतून जायचं. पुन्हा तिकडे फिरकणं नाही. यानं खूप वेळ वाचू लागला आणि नकारात्मक उर्जा दूर गेली.

कधी कधी काही गोष्टी केवळ मला आवडतात, पटतात म्हणून केल्या. इतरांना काय वाटतं ते मरो. ‘मेरे मन को भाया, मैने कुत्ता काट के खाया.’ यामुळे स्वत:वर प्रेम करण्याची सुरुवात झाली, सवय जडली. टीका स्वीकारायची, पण त्याने न्यूनगंडात जायचं नाही, आपलं काम अधिकाधिक उत्तम करण्यासाठी दिलेले ते इनपुट्स आहेत, त्याकडे खेळकरपणे बघायचं, असा बदल दृष्टीकोनातच करू शकले.

दुसरं म्हणजे अतिविनम्रता सिंड्रोमला टाटा केलं. कुणी लिखाण वा अजून कशाचं कौतुक केलं तर ते निमुटपणे स्वीकारायचं. आपल्याला आवडलंय ना, आतून छान वाटलंय ना, मग समोरच्याचे आभार मानायचे. ते न करता, ‘छे! हो..मला कुठे येतं लिहायला…मी आपलं प्रयत्न करते फक्त…’ असला पांचटपणा बंद करायचा. माणूस कायमच उमेदीच्या वयात नसतो, आपल्या कौशल्यांच्या, चिकाटीच्या बळावर महत्वाकांक्षेच्या पटावर तो एकेक घर पुढं पुढं सरकत असतो आणि प्रयत्न तर प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीसाठी कायमच करतो, त्यामुळे मी काही लेखक नाही, प्रयत्न करतो वा करते असं म्हणणं एकदम दांभिक, पोकळ आणि अतिशय सटली आत्मविश्वासाला मागे सारणारं असतं.

‘प्रयत्न करणे’ अत्यंत मोघम वाक्प्रचार आहे.

त्यामुळे योग्य कारणाकरता मिळणारा योग्य आदर, अतिविनम्रता सिंड्रोमला टाटा करून घेतला पाहिजेच, त्याचबरोबर मी आणखी एक नवी गोष्ट शिकले. मित्र-मैत्रिणींसोबत वा इतर कुणाशीही वैचारिक चर्चा करताना दरवेळी आपण बोललंच पाहिजे, असं काही नाही. प्रत्येक चर्चेत कुणालाही न बोलू देणारी, सगळं लक्ष स्वत:कडे खेचणारी, इतरांची मतं येनकेनप्रकारे दडपणारी एक तरी व्यक्ती असते. तिला खुशाल बोलू द्यावं. चर्चा ही खरंच काही तरी घुसळण होण्यासाठी, नवं काही माहीत करून घेण्यासाठी असते, आपल्याला आकळलेलं जगाला वाटण्याची अहमहमिका, स्पर्धा हा तिचा उद्देश नसतो

(माझ्यासाठी तरी नाही.) त्यामुळे तेवढं काही तरी महत्वाचं, वेगळं आपल्याकडे असल्याखेरीज आपण बोलायचं नाही. जिथे पॅनल डिस्कशनलाच आमंत्रित करतात तिथली गोष्ट वेगळी. बाकीच्या चर्चांमध्ये शांतपणे ऐकणं हाही आपला त्या चर्चेतला महत्वाचा सहभाग असतो. अशावेळी आपल्याला माहीत नसलेले अनेक संदर्भ आले, तर त्याने गांगरून न जाता, ते नोंदवून ठेवायचे आणि नंतर त्याबद्दल वाचायचं…नाही समजलं तर कुणाला तरी विचारायचं, असं मी करू लागले.

जगात किती तरी पुस्तकं, विषय, सिनेमे, संस्कृती आणि बरंच काही आहे, ते सगळंच समजून घ्यायचा अट्टहास नको. आयुष्य सरून गेलं तरी काही तरी जाणायचं, वाचायचं उरणारच आहे. जे माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची खूप निकड वाटते, त्यासाठी आवश्यक ते करायचं. उगाच ह्याला/ हिला किती माहीत आहे, असा दबाव घेण्यात हशील नाही. त्यांची भौतिक परिस्थिती वेगळी होती, आपली वेगळी आहे, म्हणून त्यांच्याकरता ते सुकर होतं, आपल्याला थोडे अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत, बास! असा विचार मी करू लागले. शिवाय आपल्याला किती तरी अशा गोष्टी माहीत आहेत, आपल्यापाशी असे अनुभव, जीवनदृष्टी आहे, जी त्यांच्यापाशी नसेल, हे क्लीशे वाक्य तर तंतोतंत खरंच आहे.

या सगळ्या गोष्टींचा मला एवढा फायदा झाला की मला स्वत:ला ऐकता येऊ लागलं. नाहीतर बाहेर एवढा गदारोळ माजलेला होता की त्यात स्वत:च्या आत डोकावणं, आतलं ऐकणं होतच नव्हतं. याकरता, माझे लोकसत्ताचे माजी सहकारी अभिजीत ताम्हणे, तिथलाच सहकारी मित्र सिद्धार्थ ताराबाई यांची मी आजन्म आभारी आहे. माझं ‘लिसनिंग पुअर’ आहे, मी ऐकते, शब्द माझ्या कानावर पडतात, पण नीट आकळण्याच्या बाबतीत बोंब आहे आणि यामुळे मी माझं खूप नुकसान करून घेते, यात बदल व्हायला हवा, हे त्यांनी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे लक्षात आणून दिलं. मग मी त्यावर काम करायला सुरूवात केली. कुठल्याच संवादात - रिएक्ट होण्याची, स्वत:ला डिफेंड करण्याची घाई नको, समोरच्या माणसाचं म्हणणं नीट पूर्ण होऊ दे, त्यातलं बीटवीन द लाईन समजू दे, मग व्यक्त होऊ…असं मी शिकले. त्याचा बराच फायदा होतो, म्हणजे लिसनिंग स्किल्समध्ये मला आज शंभरपैकी शंभर गुण मिळतील असं नव्हे, पण मी नीट उत्तीर्ण होईन, इतपत काम करू शकले. याकरता मेडिटेशनचा खूप फायदा झाला. झोपण्यापुर्वी नि झोपेतून उठल्यावर तीन मिनिटं लक्ष एकाग्र करून पसायदान ऐकणं, हे माझं मेडिटेशन. कधी कधी चालताना कानात इयरफोन्स घालून काहीच न ऐकता शांतपणे विचार करणं हेही माझ्यासाठीचं एक मेडिटेशन. मानसशास्त्रज्ञ गौरी जानवेकरची पॉडकास्ट ऐकत असल्याचा उल्लेख मागच्या भागात आहेच, तरी इथं पुनरावृत्ती - कारण अनेकांना ते उपयोगी पडेल असं वाटतं.

आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग आपल्या हातात, म्हणजे नक्की कसं, नेमकं काय, हे बहुधा मागच्या भागात मी पुरेसं स्पष्ट लिहिलेलं नाही.

माझ्याकरता ही बाब म्हणजे पूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव. संपूर्णपणे आपले निर्णय आपण घेणे, योग्य तिथे नाही म्हणणे. उदा., काही महिन्यांपुर्वी मला जेंडरवर काम करणाऱ्या एका संस्थेतील व्यक्तीचा अत्यंत विपरीत अनुभव आला. संमती (consent) ची तमा न बाळगता माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीनं केला. त्यावेळी मला त्या व्यक्तीला जोरदार विरोध करता आला, सत्तास्थानावर अतिशय वर बसलेल्या त्या व्यक्तीच्या सामर्थ्याची पर्वा न करता, त्या पुरुषाला त्याची जागा दाखवता आली. त्यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आणले. अर्थात याआधीही असे प्रसंग मी पुरेशा विवेकी आक्रमकतेने हाताळले आहेत, पण तेव्हा मनात रिटॅलिएशनची काहीशी भीती असायची. संभाव्य परिणामांची, चुकवाव्या लागणाऱ्या किंमतीची चिंता असायची. यावेळी परिस्थिती वेगळी होती. अर्थात यात ज्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी हे शेअर केलं होतं, त्यांच्या सपोर्टचंही योगदान आहेच.

आपल्या आयुष्यावर आपलाच ताबा याचा दुसरा अर्थ कुणाच्याही अधिमान्यतेची गरज न भासणे किंवा ती नाही मिळाली तर त्याचा त्रास होऊ न देणे. २०२० - २१ करता माझं स्लोगनच होतं, ‘Fuck the validation’ आपल्याला फक्त आपणच वॅलिडेट करू शकतो, बाकी कुणीही नाही. कुणी कौतुक केलं तर आनंद व्हायला हवा, पण त्यावाचून काही अडायला नको, तेवढी पॉवरच कुणाला द्यायची नाही. असं मी ठरवलं आणि बऱ्यापैकी त्यात यश मिळालं. कधीच काहीच त्रास झाला नाही, असं मी म्हणणार नाही, पण दोन वर्षापुर्वीच्या मला होणारा त्रास आणि आताच्या मला होणारा त्रास यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. इथं माया अँजेलोचा उल्लेख क्रमप्राप्त आहे. ‘फेनॉमेनल वुमन’ ही कविता अक्षरश: मी शेकडोवेळा पाहिली/ऐकली आहे - युट्यूबवर स्वत: मायानं सादर केलेली. तिच्या ग्रेसफुल सादरीकरणानं आणि मूळ कवितेच्या अर्थानं जे काय वाटतं, आत रुजतंं, त्याला तोड नाही. तुमचं स्त्री म्हणून नुसतं असणंच किती अर्थगर्भ असतं आणि त्याचवेळी पुरुषसत्ताक परिवेशात जगणं, काही तरी करून दाखवणं किती आव्हानात्मक असतं, या परिस्थितीशी दोन हात करत तुम्ही तगता म्हणजेच तुम्ही (प्रत्येक बाई) ग्रेट आहे. अशाच काही स्त्रिया तुमची जीवनदृष्टी बदलून टाकतात. माझ्यासाठी त्यात महाश्वेतादेवी, टोनी मॉरिसन, सिमॉन द बोव्हुआर या आहेतच. पण असे काहीसे प्रसंगही साक्षात्कारी ठरतात. एक अगदीच महत्वाचा इथं थोडक्यात सांगते. मागच्या वर्षी मार्चमध्ये मी आणि माझी मैत्रीण सई तांबे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या चिखली गावी बालमेळ्यासाठी गेलो होतो. हा बालमेळा म्हणजे मेधा पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नर्मदेच्या खोऱ्यातल्या विस्थापित आदिवासी मुलांसाठी बांधलेल्या जीवनशाळांमधल्या मुलांचं वार्षिक स्नेहसंमेलन. या कार्यक्रमादरम्यान आम्हाला दोन नवीन मैत्रिणी भेटल्या. लतिका राजपूत आणि योगिनी खानोलकर. या दोघीही तिथं पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्या. अत्यंत साधं राहणाऱ्या पण प्रचंड तडफेनं काम करणाऱ्या. कार्यक्रमादरम्यान योगिनीला काही बंजारा स्त्रिया येऊन भेटल्या. त्या रोज गुजरातमध्ये मजुरीला जात. अत्यंत गरीब असलेल्या त्या स्त्रियांना दोन राज्यांच्या सीमेलगतच्या भागात राहून, एका राज्यात मजुरीला जावं लागे आणि पुन्हा राहण्यासाठी महाराष्ट्रात. त्यात फिरत्या असल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रं नव्हती, त्यामुळे त्यांना काय अडचणी येत असत, तेच त्या योगिनीला सांगत होत्या. मी तिथेच होते, मला त्यांची भाषा कळत नव्हती. योगिनी मात्र त्यांच्याशी खूप प्रेमाने, त्यांच्या भाषेत बोलत होती. तिने त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि काय काय करायचं हे त्यांना सांगितलं, त्या बायकांना किती आश्वासक वाटलं तेव्हा. त्या क्षणी योगिनी मला जगातली सगळ्यात सुंदर, विलक्षण स्त्री भासली. तिनं एक साधासाच कुर्ता आणि जीन्स घातली होती. एकदम छोटे केस होते तिचे, कसलाच मेकअप, दागिने काहीही नाही, तरी ती मला खूप आकर्षक, सुंदर स्त्री वाटली होती. हेच लतिकाच्या बाबतीतही. संपूर्ण कार्यक्रमातला तिचा ग्रेसफुल वावर, बालमेळ्याचं नेतृत्व, मुलांना सूचना देणं आणि बाकी बऱ्याच बॅकस्टेज गोष्टी सांभाळणं या तिच्या कामामुळे, तिच्या कामाप्रती असलेल्या तिच्या झपाटलेपणामुळे, देहबोलीमुळे तीही मला कमालीची सुंदर वाटली. तीही खूप साध्या कपड्यात, कसल्याही मेकअप, दागिन्यांशिवाय वावरत होती. पण दोघींच्याही डोळ्यांत आपल्या कामाप्रतीची आस्था, प्रेम नि त्यातून आलेली चमक होती. त्या दोघींची भेट, त्यांचा वावर या अर्थाने मला फार विलक्षण साक्षात्कारी वाटला. त्या दिवसानंतर आजपर्यंत मला, कधीही आपल्या दिसण्याबद्दल जराही कॉन्शस व्हायला झालं नाही. शॉर्ट ड्रेसेस घालण्यासाठी वॅक्स केलेलं असलंच पाहिजे, श्शी…माझे पाय किती खराब दिसतायत, आता पेडिक्युअर केलंच पाहिजे नि चार महिने झाले आयब्रोज केलेच नाहीत, किती वाढलेत नि उन्हात जाऊन स्कीन टॅन झालीये…इ.इ. असलं काहीही वाटलेलं नाही. जेव्हा जे उपलब्ध आहे, त्यात स्वच्छ-टापटीप राहणं पुरेसं आहे. जेव्हा सवड असेल तेव्हा - फक्त स्वत:ला छान वाटावं म्हणून (पुरुषांना आणि इंस्टाग्रामला नव्हे) नटायचं, आवरायचं. हे मी करू लागले. साधी राहणीच उत्तम आणि इतर सगळं करणाऱ्या स्त्रिया फालतू असं बाष्कळ बायनरीयुक्त काहीही मला म्हणायचं नाही, ज्याला जे आवडतं, त्यानं ते करावं. मलाही वेळ असतो, तेव्हा खूप नीट आवरायला आवडतंच पण तसं झालं नाही म्हणून पुर्वी जी चिडचिड व्हायची, underconfident वाटायचं, तसं आता अजिबात होत नाही. माणूस त्याच्या कामाने आणि विचारांनी जास्त सुंदर दिसतो, असं क्लिशे वाक्य मीही अनेकदा ऐकलं होतं. कळलं होतं, मात्र वळलं नव्हतं, या प्रवासात तेही झालं.

असं खूपसं आहे, पण आत्मकथन लिहिणं हा या लेखनाचा उद्देश नाही, तर सेल्फ हेल्प पुस्तकांचा असतो, तसा काहीसा आहे आणि आपलं अन्वयन. त्यामुळे ठळक गोष्टींच्या उल्लेखावर थांबलेलं बरं. शेवटी एक गोष्ट, आपल्या आनंदासाठी आपण कुणावर अवलंबून नको राहायला, आपल्याला कशाने बरं वाटतंय, हे शोधून काढून त्यात गुंतायचं. जसं फेसबुकवरचा ‘मुंबई स्वयंपाकघर’ हा एक ग्रुप आहे, तिथं मी रोज एकदा तरी चक्कर मारते. मला चारी ठाव स्वयंपाक करण्याची, किंबहुना किचनमध्ये जाण्याचीही आवड, सवड नाही, पण रेसिपींबद्दल, खाद्यसंस्कृतीबद्दल वाचायला खूप आवडतं. त्यामुळे तिथं मजा येते. एरवीही आपण इतकं गहन-गंभीर लिहित बोलत असताना, तसलंच काम करत असताना काहीतरी हलकंफुलकं हवं आयुष्यात. तसं माझ्यासाठी हा ग्रुप आहे. शिवाय पांचट पन्स, मीम्स, स्टॅंड अप कॉमेडी, ‘द ऑफिस’ नावाचं सिटकॉम, सोलो ट्रॅवलर्सचे ग्रुप्स असं बरंच काही मला आनंद मिळेलसं मी पाहते/ करते.

या सगळ्यात महत्वाचं, वगळलेपणाचा जसा अनुभव आपल्याला आला, तसा आपल्याकडून कोणाला येता कामा नये, याची खबरदारी घेते. जे आणि जसं माझ्याशी कोणी वागलेलं मला आवडणार नाही, तसं मी कुणाशी वागणार नाही, याची खबरदारी घेते, यातून मला आपण काहीतरी शिकलो, याचं किंचितसं समाधान मिळतं.

समाप्त.

तुम्हा साऱ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लिखाण आवडलं आहे.

या लेखाचा पहिला भाग इथे वाचता येईल : https://aisiakshare.com/node/8344

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा भाग जास्त आवडला.
तुला नक्की काय म्हणायचं आहे हे यात स्पष्ट झालं आहे. आणि लेखन सहज वाटतं आहे.
तुझ्या सगळ्याच मतांशी सहमत आहे. 'self love' म्हणजे नक्की काय हे कुणी स्पष्ट सांगत नाही हे अगदी पटलं. आणि समुपदेशनात सांगितलेले exercise नीट केले की फायदा होतो हेही अगदी अनुभवातून बघितलं आहे.
आजूबाजूच्या मैत्रिणींशी तुलना करणे हे कदाचित सगळ्यांच्या बाबतीतच खरं असावं. त्यावरही "comparison is the thief of joy" वगैरे Pinteresty सुविचार सतत आपल्यावर फेकले जातात. पण तुलना न करण्याचा खूप सराव करावा लागतो. ते जमायला लागलं की मात्र पुन्हा आपण त्यात अडकत नाही असाही स्वानुभव.
मला हा लेख फारच आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच मुद्दे पटले. मानसिक आरोग्य हे शारिरीक आरोग्यापेक्षाही महत्वाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्लीच किंडलनं जाहिरात दाखवली आणि आली लहर केला कहर म्हणून एक पुस्तक विकत घेतलं. (ते वाचत्ये.) त्याचं नाव Atlas of Emotions. पुस्तकात माझ्यासाठी नवीन फार काही सापडलेलं नाही, एक अपवाद. आपण ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही त्यांच्यावर प्रेम करणं सोपं असतं. अर्थातच, तिर्री मांजरीवर प्रेम करणं फारच सोपं आहे.

दुसरं, आपल्याकडे लोक पीडीत व्यक्तीलाच सल्ले देतात असं नाही. म्हणजे पीडा आपल्या नजरेत नाही, सल्ला देणाऱ्यांच्या नजरेत असावी लागते. समोरची व्यक्ती पीडीत आहे, किंवा लवकरच पीडीत होईल असं त्यांना वाटलं की ते सल्ले देतात. म्हणजे कुणी चाकोरीबाहेरचं काही करत असतील, किंवा तसं करण्याचा इरादा व्यक्त केला की लोकांना वाटतं, ही व्यक्ती अशा वर्तनामुळे गोत्यात येणार आणि आपणच त्यांना वाचवलं पाहिजे. आणि सल्ले देतात.

मी स्वतःला पीडीत वगैरे कधीच समजले नाही. (यात माझी फार कर्तबगारी नाही.) तरीही मला चिक्कार सल्ले मिळतात. लहान वयातच मिळायचे असं नाही; आता चाळीशीची आहे मी. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे लोकही सल्ले देतात. केस कसे कापायचे इथपासून, ऑफिसात मी किती वेळ कुठलं काम करावं याबद्दल शेजारीपाजारी सल्ले देतात. मला हे थांबवता येत नाही म्हणून हे सगळे विनोद आहेत असं मी समजायला सुरुवात केली. आता मला पीडा होत नाही, मला पीडा न झाल्यामुळे इतरांना झाली तरी मी सल्ले देण्याच्या फंदात शक्यतोवर पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

“वाचते” हा शब्द तुम्ही “ वाचत्ये” असा का लिहिता?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

प्रतिसादाचा रोख पोहोचला. त्यातील स्कोअर-सेटलिंगचा भाग (त्यामागील वादाच्या तत्त्वाबद्दल तुमच्याशी व्यक्तिशः काहीसा सहानुभूत असलो, तरीही) तुम्ही आणि ३_१४ विक्षिप्त अदिती यांचा आपापसातील मामला म्हणून सोडून देऊ. मात्र, त्यातील तपशिलाविषयी:

३_१४ विक्षिप्त अदिती यांनी तो शब्द तसा का लिहिला, याबद्दल खात्रीशीर असे कोणतेही वक्तव्य मी (अंतर्ज्ञानाच्या अभावापोटी) अर्थातच करू शकत नाही. मात्र, मराठी आंतरजालाच्या माझ्या आजवरच्या परिशीलनावरून एक अंदाज जरूर वर्तवू शकतो. (अंदाज बरोबर की चूक, हे एक तो जगन्नियंता (असलाच, तर) जाणे, आणि दुसऱ्या त्या ३_१४ विक्षिप्त अदिती (आहेत, असे गृहीत धरून) जाणोत.)

अंदाज असा, की तो शब्द मुळात “वाचते” हा नसावा, तथा (पूर्वीच्या मराठी वाङ्मयातील कोकणस्थ बायकांच्या तोंडी दाखवत, तदनुसार) “वाचते” अशा अर्थाने त्यांनी “वाचत्ये” असे लिहिले नसावे.

आजकाल मराठी आंतरजालावर अनेक स्त्री-आयडी “करत्ये”, “वाचत्ये” अशी रूपे “करते आहे”, “वाचते आहे” (कोकणस्थी डायलेक्टमध्ये “करती आहे”, “वाचती आहे”) अशा अर्थाने सर्रास लिहिताना आढळतात. हा बहुधा त्यातला प्रकार असावा. (अर्थात, हे मी ३_१४ विक्षिप्त अदिती यांच्या वतीने लिहीत नाही. सबब, चूभूद्याघ्या.)

—————

प्रस्तुत प्रतिसादात कोकणस्थ हा शब्द कोकणस्थ ब्राम्हह्मण अथवा चित्पावन अशा अर्थाने घ्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी प्रमाणलेखनावरून स्कोर सेटलिंग! ऐसी खरंच उच्चभ्रू आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उच्चभ्रूपणाचा हाच जर का निकष असेल, तर उच्चभ्रूपणास फारच स्वस्त करून ठेवलेले आहे, असे सुचवू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोदाचं मरण १६ तारखेला झालं म्हणावं का १७ला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कल्पना नाही. मला काही मर्तिकाचे आमंत्रण आले होते, त्यामुळे, कधी मेला, कशाने मेला, कळायला मार्ग नाही. किंबहुना, मेला हेदेखील मला तुमच्याकडूनच कळले. त्यामुळे, तुम्हालाच तपशील माहीत असतील असे वाटले होते. परंतु आता तुम्हालाही ठाऊक नाही म्हणताय, म्हणजे बहुधा तुम्हालासुद्धा आमंत्रण आले नसावे. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुल्लिंगी कर्त्याने चालू वर्तमान काळातील वाचनाबाबत "वाचत्यो" असे लिहिण्याची प्रथा मआंजावर लवकरच चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण भूकबळी मोजतो, तसे स्पर्शबळी मोजत नाही

म्हणजे बॅड टच, गुड टच वाला प्रकारातील बॅड टचचा स्पर्श बळी कि आपुलकी मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेले परन्तु अस्पर्श राहिले म्हणुन स्पर्शबळी?
मानसिक आरोग्य, सामाजिक शास्त्रं या साऱ्याचा माझा यत्किचिंतही अकादमिक अभ्यास नाही, आणि हे जे लिहितेय तो रिसर्च पेपरही नाही, ही या लेखनाची एक मर्यादा मला मान्य आहे आणि वाचकांनीही याकडे या मर्यादेसकट पाहावं. हे आपण अगोदरच डिस्क्लेमर स्वरुपात दिल्याने ऐसी वरील वाचक त्याच मर्यादेत वाचतील या बाबत शंका वाटत नाही.
उदा., काही महिन्यांपुर्वी मला जेंडरवर काम करणाऱ्या एका संस्थेतील व्यक्तीचा अत्यंत विपरीत अनुभव आला. संमती (consent) ची तमा न बाळगता माझ्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीनं केला. त्यावेळी मला त्या व्यक्तीला जोरदार विरोध करता आला, सत्तास्थानावर अतिशय वर बसलेल्या त्या व्यक्तीच्या सामर्थ्याची पर्वा न करता, त्या पुरुषाला त्याची जागा दाखवता आली. त्यांच्यासोबतचे व्यावसायिक संबंध संपुष्टात आणले. अर्थात याआधीही असे प्रसंग मी पुरेशा विवेकी आक्रमकतेने हाताळले आहेत, >>,>>>>> इथे तुम्हाला लैंगिकते संदर्भातील म्हणजे लैंगिक छळ किंवा तत्सम काही असे म्हणायचे आहे का? कधी कधी स्त्री पुरुष मैत्री किंवा सहजीवनात लैंगिक साहित्यातील चावट जोक शेअर केले जातात. काही स्त्रिया अशा हास्यविनोदात अगदी सहज सहभागी होउ शकतात तर काही स्त्रियांना ते चक्क लैंगिक शोषण/ छळ वाटू शकते. देहबोलीतून ( इथे टंकबोलीतून) ते आपली नाराजी व्यक्त करतात.र.धों. कर्व्यांचे समाजस्वास्थ्य त्या काळात अश्लील म्हणूनच गणले जात असे. कारण मुखपृष्ठावर नग्न चित्र असायचे. लैंगिकता ही मानसिकता असल्याने त्याबाबत अनेक बाबी सापेक्ष असणार आहेत. लैंगिक आरोग्याविषयी महत्वाची व्हिडिओ मालिका - 'तारुण्यभान' या कार्यक्रमात - पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी शिबिरातील तरुणांसाठी लैंगिकते संबंधी मार्गदर्शन केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

संबंधित स्त्रीस जे वर्तन लैंगिकदृष्ट्या अस्वीकारार्ह वाटते, आणि ज्यासंबंधी तिला तक्रार करावीशी वाटते, ते वर्तन by definition, त्या संदर्भातले “अस्वीकारार्ह लैंगिक वर्तन” असे prima facie मानावयास हवे. Corporate sector मधील लैंगिक छळ-प्रतिबंधक धोरणांमध्ये हे axiomatic मानले जाते. पुढील चौकशीचेही तपशीलवार नियम असतात. “इतर बायकांना जे चालते, ते हिला का चालत नाही?” हा मुद्दा सर्वथा गैरलागू आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

माझी मुख्य शंका ही गैरवर्तन म्हणजे लैंगिक गैरवर्तन अभिप्रेत आहे का? अशी होती. अ ला जे वर्तन गैर वाटेल ते ब ला वाटेलच असे नाही हा सामाजिक/ मानसिक/वैयक्तिक मुद्दा मी सांगितला त्या अर्थाने तो सापेक्ष आहे. ऐसी च्या बौद्धिक प्रकृतीशी तो सुसंगत आहे. कायद्याची व्याख्या त्याचे न्यायालयीन अर्थ अन्वयार्थ वा आकलन याच्या बद्दल मी बोलत नाहीये. तो कीस असतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

संबंधित स्त्रीस जे वर्तन लैंगिकदृष्ट्या अस्वीकारार्ह वाटते, आणि ज्यासंबंधी तिला तक्रार करावीशी वाटते, ते वर्तन by definition, त्या संदर्भातले “अस्वीकारार्ह लैंगिक वर्तन” असे prima facie मानावयास हवे.

Smile __/\__ सुरेख!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात वर्णिलेला प्रसंग लैंगिक गैरवर्तणुकीचा आहे की नाही याबद्दल संशय घेण्यास जागा मला तरी दिसली नाही. नपेक्षा consent चा उल्लेख लेखिका करती ना.

लैंगिक गैरवर्तणुकीसारख्या संवेदनशील आणि सामाजिक न्यायाशी निगडित विषयासंबंधी "तात्विक" आणि "व्यावहारिक" असे दोन वेगळे दृष्टिकोन असू शकतात आणि त्यानुसार लैंगिक गैरवर्तनासंबंधीचे निकष आणि निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात हे मात्र भारीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

नपेक्षा consent चा उल्लेख लेखिका करती ना.

हो या उल्लेखामुळेच ते लैंगिक गैरवर्तन असावे असे म्हणण्यास वाव आहे हे मात्र बरोबर. बरेचदा गैरवर्तन हा शब्द बराच सैल असतो. तसेही हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर भाष्य करण्याचे लोक सहसा टाळतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

लेखिकेने जे लिहिलंय त्यावरून ते कुठल्या बाबतीत आहे हे पुरेसं स्पष्ट होतं आहे. पण तरीही त्यात ते नक्की लैंगिक होतं का? असलं तर काय प्रकारचं होतं? पुढे मग नॉन व्हेज जोक वगैरे उदाहरणं!
म्हणजे स्वतःला आलेला एखादा अनुभव एखाद्या स्त्रीने तिला नकोसे तपशील गाळून लिहिला तरी नक्की तिला वाटलं ते खरंच तिला वाटतंय ते आहे का वगैरे शंका घेता येतात हे थोर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी!

ऐसी किंवा कुठल्याही सार्वजनिक व्यासपीठावर लिहिणं म्हणजे पोलिसी तक्रार किंवा न्यायालयीन कज्जा नव्हे; आणि इथे कुणी वाचकांकडे न्यायही मागायला आलेलं नाही की त्यांच्या समाधानासाठी तिनं सगळे तपशील सांगावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि इथे कुणी वाचकांकडे न्यायही मागायला आलेलं नाही की त्यांच्या समाधानासाठी तिनं सगळे तपशील सांगावेत.

लेखिका वाचकांकडे न्याय मागायला आलेली असो वा नसो, एकदा का पब्लिक डोमेनमध्ये (= वाचकांनी (असल्यास/वाटल्यास/जमल्यास) वाचावे, अशा (implied?) अपेक्षेसहित?) काही लिहिले, की (निदान काही) वाचक (तरी) आपापल्या (वाजवी/गैरवाजवी) शंकांचे/कुतुहलांचे पूर्ण समाधान करून घेण्याचा प्रयत्न करणार, हे अपरिहार्य आहे. (हे दर खेपेस समर्थनीय असेलच, असा दावा अर्थातच करू इच्छीत नाही; दर खेपेस हे होईलच, असेही नाही; केवळ, (असे झाल्यास) यात अनपेक्षित वा आश्चर्यकारक असे काहीही नाही, एवढेच सुचवू इच्छितो. ‘अन्तू बरव्या’चा ‘गोठ्यात निजण्याऱ्या’चा दृष्टान्त हा मुद्दा समजून घेण्यास कदाचित उपयुक्त ठरावा. (चूभूद्याघ्या.))

उलटपक्षी, (पब्लिक डोमेनमध्ये लिहिण्याचा निर्णय घेतल्यानंतरसुद्धा) वाचकांचे कोणत्याही प्रकारे समाधान करण्यास (झालेच तर कोठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास) लेखिका अर्थातच बांधील नाही. (याअगोदर वारंवार म्हटल्याप्रमाणे, One doesn’t (usually) owe the world an explanation.) लेखिकेने तिला हवे तेवढेच तपशील द्यावेत, सगळेच तपशील द्यावेत, की कोणतेही तपशील देऊ नयेत, हा सर्वस्वी लेखिकेचा प्रश्न आहे.

—————

हॅविंग सेड दॅट, प्रश्नांकित बाबतीत लेखिकेने जे लिहिलेले आहे, ते कशासंदर्भात आहे, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे, असे मला(सुद्धा) वाटले.

असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"न"वी बाजू आपल्या प्रतिसादाशी पुर्णपणे सहमत आहे. सहमत असण्यावर देखील चर्चा होउ शकते. न जाणॊ एखादी "न"वी बाजू चर्चेतून समोर येईल. बर्‍याचदा भावनिक मुद्द्यांचे वैचारिक मेंदुने केलेले विश्लेषण हे काहींना असंवेदनशील वाटते. विश्लेषण करताना विश्लेषणकर्त्याला अभिप्रेत असलेला अर्थ हाच लेखकाला / प्रस्तावकाला अभिप्रेत आहे का? तो निं:संदिग्ध असावा यासाठी खातरजमा करावी लागणे हे इथल्या लोकांना नवीन नाही. तस असणं हे तर्कसुसंगत आहे. संवेद्नशीलतेबाबत ‘अन्तू बरव्या’चा ‘गोठ्यात निजण्याऱ्या’चा दृष्टान्त हा मुद्दा समजून घेण्यास कदाचित उपयुक्त ठरावा असे जे आपण म्हटले आहे ते अगदी इथे मला चपखल वाटते.(त्या निमित्त अंतू बर्वा परत एकदा वाचला) विनोदा बाबत सुद्धा असेच काहीसे होते.एखाद्याचा विनोदाचा विषय दुसर्‍याच्या वेदनेचा असू शकतोच. शिवाय विनोदाकडे बघण्याची दृष्टी संस्कारावर जशी अवलंबून आहे तशी ती आपल्या मूडवर देखील अवलंबून असते. एकच विनोद आपल्याला कधी चिडवणारा/ डिवचणारा वाटतो तर कधी हसू आणणारा वाटतो. म्हणजे तो कोणी केलाय कसा केलाय कुठे केलाय हे घटक देखील प्रभावित करणारे असतात. आपल्या आवडत्या व्यक्तिने केलाय की नावडत्या ( पुर्वग्रहदूषित) व्यक्तिने केलाय यावर आपले प्रतिसाद अवलंबून असतात. नावडतीचे मीठ अळणी या वाक्प्रचारामागचे मानसशास्त्र तेच आहे.आपल्या समजूतीशी अनुकूल प्रतिसाद आले की ते संवेदनशील व प्रतिकूल प्रतिसाद आले की असंवेदनशील हे समीकरण आपला भावनिक मेंदु स्वीकारतो. माणसाचे मन जेव्हा "संवेदनशील" अवस्थेत असते त्यावेळी तो "विचार" नाकारतो. भावनिक मेंदु व वैचारिक मेंदु यांचा अंतर्गत संघर्ष त्याचा चालू असतो. त्याचा परिणाम वर्तनावर होतोच. डॉ आनंद नाडकर्णी त्यांच्या अनेक व्याखानात हे आवर्जून सांगत असतात. मनात- अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी, मनकल्लोळ -अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी, मेंदुतला माणुस- डॉ आनंद जोशी- सुबोध जावडेकर, मेंदुच्या मनात- सुबोध जावडेकर,स्वभाव विभाव- डॉ आनंद नाडकर्णी, मनोविकारांचा मागोवा- डॉ श्रीकांत जोशी, मन- निरंजन घाटे अशा अनेक मानशास्त्रावरील पुस्तकात भावूक व घावूक मनामागील मानसशास्त्र सविस्तर लिहिले आहे.लोकांच्या "भावना दुखावल्या" हे जे प्रकरण समाजमाध्यमात /राजकारणात आपण आजूबाजूला पहातो तो मुद्दा इथे विचारात घेता येतो.भावना दुखावल्या या प्रकरणाचे राजकीय भांडवल होताना आपण पहात असतो. भावना केवळ श्रद्धाळूंच्याच असतात असे नाही त्या अश्रद्ध पुरोगाम्यांच्याही असतात. फार तर आपापली संवेदनक्षेत्रे वेगवेगळी असतील. शेवटी सगळे होमो सेपीयन्स. ऐसी कर काही आभाळातून पडले नाहीत ना! त्यांच्यासाठी निसर्गाचे काही वेगळे नियम नाहीत. मनोगत,उपक्रम,मायबोली,मिसळपाव, ऐसी अक्षरे अशी आंतरजालावर अनेक चर्चापीठे आहेत.प्रत्येक संकेतस्थळाची काही वैशिष्ट्ये असतात. एक पिंड असतो. त्यावर लिहिणार्‍या प्रतिसाद देणार्‍या असंख्य सभासद वाचकांच्या सामूहिक व सरासरी आयक्यू व ईक्यू वरुन ती प्रकृती आपल्या लक्शात येते. एखाद्या विषयाचा कीस पाडणे, चिरफाड करणे, धागाकर्त्याला किंवा आपापसात प्रश्न विचारणे, शंका उपस्थित करणे, प्रतिवाद करणे, पुरक माहिती देणे, दिलेल्या माहितीतल्या त्रुटी दर्शवणे,कंपुबाजी करुन एखाद्याला त्रस्त करणे,एखाद्याला डिवचुन प्रतिसाद देण्यास भाग पाडणे, चिडून प्रतिसाद दिल्यावर स्वयंघोषित न्यायालय उभारुन त्याला दोषी ठरवणे, एकमेकांची फिरकी घेणे, कधी कधी स्वत:वरचे नियंत्रण जाउन शिवीगाळ करणे, सावध भाषा वापरुन स्वत:ला सुरक्षित करणे, इत्यादी इत्यादी गोष्टी आंतरजालीय पीठावर घडत असतात. कधी आपण त्या रंगमंचावरील पात्र असतो तर कधी मूक साक्षीदार. मी स्वत: 2007 पासून या रंगमंचावरील पात्र व साक्षीदार असल्याने काही गोष्टी अधिकारवाणीने सांगू शकतो. असो ते महत्वाचे नाही.

"हॅविंग सेड दॅट, प्रश्नांकित बाबतीत लेखिकेने जे लिहिलेले आहे, ते कशासंदर्भात आहे, हे पुरेसे स्वयंस्पष्ट आहे, असे मला(सुद्धा) वाटले.

" या व पब्लिक डोमेनवर असलेल्या आपल्या मुद्द्याबाबत आनुषंगिक बोले तो कडेकडेने वर लिव्हल हायेच.
मी तुमच्याशी सहमत आहे. मला ही तेच वाटत. कंसेंट या उल्लेखामुळेच ते लैंगिक गैरवर्तन असावे असे म्हणण्यास वाव आहे हे मात्र बरोबर.बरेचदा गैरवर्तन हा शब्द बराच सैल असतो. तसेही हा विषय संवेदनशील असल्याने त्यावर भाष्य करण्याचे लोक सहसा टाळतात. अस माचीवरचा बुधा यांना दिलेल्या प्रतिसादात मी वर म्हटले आहेच लैंगिकतेबाबत मी स्वगत मधे स्वानुभवावर लिहिले आहेच.शिवाय स्वप्रतिसादात ऐसीच्या लैंगिक बौद्धिकतेचा दाखला म्हणून एक लिंक दिली होती. आता हे स्वगत पुरुषस्पंदन दिवाळी 2005 साठी मी लिहिल होत. त्यावेळी गीताली वि.मं त्याच्या संपादिका होत्या. त्यांच्या घरी विविध विषयांची आमची चर्चासत्रे तेव्हा व्हायची. सर्वसामान्य स्त्रीवाचकांना वाचताना काहीसा संकोच वाटेल की काय असे मनात येउन गेले.पण हे मासिक पुरोगामी व स्त्रीवादी वर्तुळातले असल्याने पारंपारिक स्त्रीला नकोसे वाटणारे तपशील वगैरे हा मुद्दा आला नाही. आशयहानी होउ नये म्हणून मी शाब्दिक तडजोड करायला तसे ही तयार नव्हतो. काही वाचकांना आजही तो लेख "असंवेदनशील" वगैरे वाटतो याची मला जाणीव आहे. आता 2022 साली त्यातील लैंगिक अभिव्यक्तीच्या तांत्रिक मुद्द्यांची व्याप्ती वेगाने व बरीच वाढली आहे. वर मी राणी बंग याच्या तारुण्यभान या कार्यक्रमाची लिंक दिली आहे. ती मुख्यत: तरुणांसाठी असली तरी सर्वांनाच उपयुकत आहे.पुरोलैंगिक लोकांना कदाचित त्यातील काही मुद्दे मागास वाटू शकतील. माझ्या प्रतिक्रियेतील "स्पर्शबळी" हा मुद्दा अस्पर्शच राहिला पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे धागाकर्ती वा वाचक दोघेही त्यासाठी बांधील नाहीत हे वरच मान्य केले आहे. धागाकर्तीची पार्श्वभूमी व विचारधारा आपल्या पर्यंत पोहोचावी म्हणून मागील भागात मी मला त्यावेळी ( व आजही) आवडलेल्या व लेखनाच्या ताकदीमुळे लक्षात राहिलेला आजचा सुधारक मधील आरक्षण संबंधी लेखाची लिंक मी दिली होती. एखाद्या चित्राचा कॅनव्हास बदलला तर चित्राचे आकलन देखील बदलते. त्यामुळे आपल्या प्रतिसादाच सूर देखील काही अंशी बदलल्याचे मला जाणवले. तुर्तास इतकेच.
अवांतर- तुम्ही "न"वी बाजू म्हणजे उपक्रमावरील सर्किट चा पुनर्जन्म असल्याचे भाकित मी वर्तवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

धन्यवाद प्रघा. खूप छान प्रत्युत्तर दिलेत आपण. आपली बाजू व्यवस्थित मांडलीत. मी द्विधा आहे. कोण्या स्त्रीने तिच्याशी कोणा पुरुष व्यक्तीने गैरवर्तन केले' असे जर आंजावर लिहीले तर तिला खोदुन(चांगल्या अर्थाने) प्रश्न विचारले जावेत का - या प्रश्नाबाबत मी द्विधा आहे.
- ती स्त्री काही न्यायालयात नाही की तिच्या अनुभवाची चिरफाड व्हावी
विरुद्ध
- ती फक्त 'स्त्री' आहे व मी पुरुष आहे म्हणुन मी तर अजिबात चिरफाड करता कामा नये - ही बाबही चूकीची आहे.

प्रत्येक वेळी होते तेच. सगळ्या बाजू इक्वली पटतात. आय कॅनॉट फॉर्म ओपिनिअन Sad Sad मला कंटाळा आलेला आहे या इनॅबिलिटीचा. एक मत धड ठरत नाही ना मांडता येतं. असो त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुषांचे लैंगिक वर्तन स्त्रियांशी आजच्या काळात कसे असायला हवे, हा खरा प्रश्न आहे. वैयक्तिक आयुष्यात तर झालेच, पण मूळ लेखातील मुद्द्याला धरून, सार्वजनिक जीवनात - विशेषत: संस्थात्मक रचनेत ते कसे असावे हा. त्यात सापेक्षता बिल्कुल नसते. त्यासंबंधात काही भूमिकाच न घेता शब्दांचे इमले चढवण्यात काही अर्थ नाही. त्याने फार तर काही लोकांचा बुद्धिभेद होऊ शकेल, पण कोणताच सकारात्मक बदल होणार नाही.

कमरेखालचे शब्द, विनोद, शिव्या इत्यादिंचा वापर परक्या स्त्रियांसमोर करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. तसे करणे, आणि प्रकरण अंगाशी येण्याची भीती वाटली, की “तुम्ही माझ्या मुलीसारख्या” (खरा उद्देश असे म्हणण्याचा, की “मी तुमच्या बापासारखा”) किंवा “स्वारी, आमचं तोंड म्हणजे *ड आहे” वगैरे बोलणे; आपल्या वैयक्तिक अवकाशाचा पुरुषांनी आदर केला पाहिजे, याबद्दल ठाम असणाऱ्या स्त्रियांबद्दल लिहिताना “उंदराला खेळवणाऱ्या मांजराप्रमाणे एखादी बाई कधी नरडीचा घेाट घेईल काही सांगता येत नाही.” असा कांगावा करणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा दांभिकपणा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

पुरुषांचे लैंगिक वर्तन स्त्रियांशी आजच्या काळात कसे असायला हवे, हा खरा प्रश्न आहे. वैयक्तिक आयुष्यात तर झालेच, पण मूळ लेखातील मुद्द्याला धरून, सार्वजनिक जीवनात - विशेषत: संस्थात्मक रचनेत ते कसे असावे हा. त्यात सापेक्षता बिल्कुल नसते.

(मुद्दा - आणि एकूण प्रतिसाद - अर्थातच मान्य आहे. परंतु तरीही, एक खुसपट.)

पुरुषांचेच नि स्त्रियांशीच काय म्हणून? (Unless, of course, it is just a beginning?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं फक्त ऐकून घेणं, त्यावर सल्ले न देणं, प्रश्न न विचारणं, हा समजूतदार व्यक्तीचा गुणधर्म आहे. कधी सल्ला मागितला आहे, हे समजून सल्ला देणं हा सुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि या संवेदनाहीनतेचे समर्थन स्वत:च्याच नव्हे, तर “ऐसी” च्या बौद्धिकतेचा दाखला देऊन केले जात आहे…..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेम, स्पर्श, सन्मान, समूहातलं सामावलेपण याअभावी कितीतरी लोक रोज कणाकणानं मरतात, पण आपण हा सामाजिक नाही तर व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नि लढा मानतो.

खरे आहे.

लेख वाचनिय तसेच खूप मननिय आहे.

तुम्ही म्हणता तसे स्वत:बद्दल आवडणाऱ्या/नावडणाऱ्या गोष्टीचे जर्नल केले पाहीजे. स्वभान जास्त प्रमाणात येइल.
इन्ट्रोस्पेक्शन करताना स्वभान नेहमी येतेच परंतु, जास्त भर स्वत:लाच पार अपमानित करण्यात, स्वत:च्याच आत्मप्रतिमेच्या ठिकऱ्या करण्यात होतो - माझा तरी. कारण काय चांगलं वाटतय स्वत:बद्दल याचे इन्ट्रोस्पेक्शन होतच नाही. टिकेचा आवाज इतका मोठा व कानाचा पडदा भेदणारा (पियर्सिंग) असतो ना की "पण .... मी अमकं देखील केलं आज जे की चांगलं होतं" असे सांगणारा क्षीण आवाज कुठच्या कुठे दबून जातो आणि खरं सांगू - कालांतराने त्याची कुजबूजही पार मरते.
तेव्हा जर्नलिंग तर केलेच पाहीजे पण होइल तितक्या तटस्थ वृत्तीने ते वाचले पाहीजे.

तरी ती मला खूप आकर्षक, सुंदर स्त्री वाटली होती.

हे माझेही सतत होते. आपण स्त्रिया अन्य स्त्रीकडे 'परिपूर्ण/होलसम' दृष्टीकोनामधुन पाहू शकतो. याउलट पुरुषांना एखाद्या स्त्रीकडे तसे पहाता येत असेल की नाही याची मला शंका वाटते.

दुसरं म्हणजे मला आवडणाऱ्या कित्येक साध्या साध्या लहान-लहान गोष्टी मी मागच्या काळात केल्या. उदा., ठरवून एखादा सबंध दिवस .
.
.
आणि बरंच उत्साही वाटू लागलं.

हा उतारा तर इतका अवडलाय ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर अजुन लिहा. खूप छान लेखिका मिळाली आहे ऐसीला. म्हणजे आमच्यासारख्या ललित व कविता रसिकांना आवडेल अशी लेखिका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही भाग आवडले - पहिला भाग पार्श्वभूमी म्हणून आवश्यक आणि दुसरा अधिक नेमका.

जगात किती तरी पुस्तकं, विषय, सिनेमे, संस्कृती आणि बरंच काही आहे, ते सगळंच समजून घ्यायचा अट्टहास नको. आयुष्य सरून गेलं तरी काही तरी जाणायचं, वाचायचं उरणारच आहे. जे माहीत नाही आणि माहीत करून घ्यायची खूप निकड वाटते, त्यासाठी आवश्यक ते करायचं. उगाच ह्याला/ हिला किती माहीत आहे, असा दबाव घेण्यात हशील नाही.

हा Fear of missing out (FOMO)चा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व तत्सम ॲप्समुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तुमच्यावर याचा दबाव येत असतोच. अगदी ह्याच विषयावरचा नव्हे, पण साधारण याच भूमिकेतून लिहिलेल्या पुस्तकाचं हे परीक्षण यावरुन आठवलं:
https://www.nytimes.com/2021/08/11/books/review-four-thousand-weeks-time...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरा भाग पण आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाचे आयुष्य च खूप कमी आहे .त्या मधील अर्धे शिक्षण घेण्यात जात
जीवनाकडे जास्त गंभीर पने बघून अमूल्य जीवन .चिंता करण्यात,द्वेष करण्यात,लोकांच्या चुका काढण्यात,समाजाचे दोष शोधण्यात वाया घालवू नका .
माहीत पण पडणार नाही आयुष्याची सांज वेळ कधी
आली ती .
लाइफ एन्जॉय करा जास्त विचार करून दुःखात आयुष्य जगू नका.
उतार वय लागले की सर्व आदर्श विचार, आखड,गर्व,अभिमान काही कामाला येत नाही .
लोक मस्करी करतात शरीराने अशक्त झालेल्या लोकांची.आणि काळ ती अवस्था आणतोच आणतो
तत्त्व असावीत पण अतिरेक नको

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0