वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता

कविता

वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता

कवी - वर्जेश सोलंकी

व्हॅक्युमक्लिनर

पसरलो हाॅलभर
सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर
म्हणून लक्षात नाही आली कुणाला
मोज्यातली दुर्गंधी.

मित्रानं दाखवली
एकेक खोली
कीचन
कोठेच खिडकी नसलेली
आली ऐकू
एक्झाॅस्ट फॅनची घरघर
कण्हल्यासारखी
ताटंबिटं। ग्लासंबिसं। बशाकप। डबेबिबे
नावं लेबलासहित
व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.

हाॅलमधल्या भिंतीच्या रंगाला
मॅचिंन असलेलं सागवानी फर्निचर
बोन्सायची झाडं। शोभेच्या वस्तू
गणपतीची कलात्मक फ्रेम
एकंदर सगळं छानच.

आपण त्यात मिसमॅच की काय?
या विचारानं मी एसीकटेन्ड रूममध्ये
घामाघूम.

मित्र म्हणाला:
खिडकीतून पाऊस छानच दिसतो
आणि चंद्र
नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ

मी जेवलो
सवय नसताना
काटेचमच्यातून
ताटाभवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.

इतपत सर्व ठीक होतं
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युम क्लिनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करीत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.

--------------------------

आपण बोललो

आपण बोललो
अघळपघळ.
बकवास लाईफस्टाईलबद्दल.
होणाऱ्या सततच्या पराभवाबद्दल.
अनसेक्युअर इकाॅनाॅमीबद्दल.
न बदलणाऱ्या चालू राजकीय परिस्थितीबद्दल.
हंगाम नसूनही पडणाऱ्या धो-धो पावसाबद्दल.

पीत राह्यलो
थंड होत गेलेला कपातला चहा
पेटवली सिगारेट
सोडला धूर
चावट पीजे करीत
हसलो
नासलेल्या दूधाच्या चेहऱ्यानं.

क्राॅसवर्ड सोडवत
थोडा भेजा खराब करवून घेतला
न्याहाळत राह्यलो
मिड-डे मधल्या गरम चित्रपटांच्या जाहिराती
अॅब्राड असाईनमेन्टस
टेन्डर, राशिभविष्य, नॅटीस वगैरे वगैरे

निघायची वेळ झाली तसे निघालो
पकडली लोकल
चेंगरू दिलं गर्दीत
वाहू दिला घाम
बिनमेहनतीचा
कपाळावरून
काखेमधून
मनगटावरून
कुणाचा पाय, पायावर पडला तरी
जिरवला संताप
आतल्या आत.

रशियन सैन्याचा चेचेन्यावर पुन्हा हल्ला.
बिहारच्या पोटनिवडणूकीला हिंसेचे गालबोट.
कराचीत जाळपोळ.
श्रीलंकन अध्यक्षा मानवी बाॅम्बपासून बालंबाल बचावल्या.
कच्छ सीमारेषेवर पाक सैन्याची जमवाजमव.
काश्मीरमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांची हत्या.
देवून टाकलं वर्तमानपत्र समोरच्याला
कुठलंच स्टेटमेन्ट पास न करता.
पुरेशा पोस्टेजअभावी
साभार परतलेल्या
कवितांच्या बाडासारखा
परतलो घरी
हातपायकाननाकडोळेबोटंछातीमानपोटलिंगासकट
अलिकडे बोकाळत चाललेला एक
कमालीचा थंडपणा
मुठीत घेऊन.

---------------------------

जीवनसत्र

सकाळसत्र:

घड्याळात पहाटेचे किती वाजलेत हे चाचपणं. जाम कंटाळा करीत
एकदाचं उठणं, खचाखच भरलेली लोकल, दुधाची। विजेची।
केबलची बिलं क्रिकेटची मॅच ऑफीसचं शेड्युल आंतरराष्ट्रीय
दहशतवाद असं काय काय आठवणं.

ब्रश,तोंड धुणं, हिरड्यातून येणाऱ्या रक्तावर तोड काय याचा
फालतू विचार करणं.

चहा, हगण्याची किक किंवा तो सकाळी घ्यायचाच असतो
म्हणून.
हगणं मुतणं.

आंघोळ करणं, शरीर पुसता पुसता लिंग चाचपणं, शिंकणं,
काऊंटडाऊनमधलं मध्येच फिल्मी गाणं म्हणणं, केस विंचरणं.
काॅलरवर गळून पडलेले केस झटकणं, रूमाल,मोजे शोधणं.
वैतागणं. घरून निघता निघता सुटे पैसे व पास किती तारखेला संपतो हे तपासणं.

लोकलमध्ये बसणं, बाजूवाल्याचा पेपर वाचणं. मरतमरत स्टेशनवर
उतरणं. बसस्टाॅपवर आपल्या नंबरची बसची वाट पाहात स्वतः ला
पिजवणं. कपाळावर फुटत राहीलेला घाम सारखा सारखा पुसणं.
हगण्याची मध्येच आलेली किक दाबणं. ध्वनिप्रदूषणाचा त्रास नको म्हणून आवाज येऊ न देता पादणं. जाहिराती न्याहाळीत राहाणं.

ऑफीस सत्र:

ऐकावे, सोडावे/ सायबांचे बोल/ सांभाळावा तोल/ आपापला
कलिगबिलीगला/वेंडर बिंडर/ सगळेच दोर/ निसरडे
जेवढा पगार/ तेव्हढी लायकी/एक शून्य बाकी/ आतड्यात
युगे अठ्ठावीस/ ऑफीसची सीट/ सांभाळावी नीट/आठ तास

संध्याकाळ सत्र:

ऑफीस सुटणं. पुन्हा बसची वाट पाहाणं. हवा लागलेल्या
फरसाणासारख्या
चेहऱ्यानं लोकलची वाट पाहाणं. इनमीनटाईम पोरी हुंगणं. भुकेची प्रचंड उबळ येणं. चडफडत घरी येणं.
घातलेले कपडे पुन्हा काढणं. हात-पाय धुणं. दाढी करणं. इस्त्री
करता करता टेप
ऐकणं. पुस्तक चाळणं. नवं काही सुचत नसल्यास जुन्या
कवितांची दुरूस्ती करणं. टीव्ही पाहात जपागप जेवणं गिळणं.

झोप सत्र:

घराचा व जगाचा कम्बाईन विचार करणं. किंवा असंच बिछान्यावर
पडून राहाणं.
झोपेत स्वप्नांचे चित्रविचित्र एपिसोड पाहाणं. मध्यरात्री मुतायचा
प्रायोजित
कार्यक्रम पार पाडणं.

जीवनसत्र: नुस्तं जगणं.

------------------

कवितेच्या धादांत खोट्या ओळी

बस करू या आता हे सारं
भंकसगिरीविषयीचं बोलणं
सालं कोठेतरी सिरिअस व्हायला हवं
सिरिअसली बोलायला हवं
सिरिअसली हसायला हवं
सिरिअसली चिडायला हवं
सिरिअसली लिहायला हवं

तू बस जरा इथे
पंखा चालू कर
टीव्ही लाव
व्हाॅल्यूम थोडा मोठाच असू दे
जेणेकरून खिडकीबाहेरच्या जगाचा पडेल
थोडा विसर
किती वर्ष/ काळ आपण जगत राहाणार
आहोत असं पांडुसारखं
लोकलसारखी रक्तातून धडाडू देणार आहोत भिती
गर्दीतून चालताना
एकांतात बोलताना
संवाद साधताना
हस्तांदोलन करताना
प्रार्थना म्हणताना
उडतोय रे जीवाचा थरकाप
लोकशाही प्रणाली असलेल्या देशाचे आपण
नागरिक ना?
मात्र आता ही कसली सुटली खाज
तुझ्या-माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर
आपण पण या समोरच्या वाहत्या टीव्ही सारखे
आपलीही कळ कुणा भलत्याच्याच हातात
जी बदलू पाहातेय विचार/आचार संहिता
चॅनल्ससारखी.

गोल्डफ्लेक आहे का रे तुझ्याकडे?
नाही म्हणतोस!
चालेल दुसरा कुठला ब्रॅण्ड असला तरी चालेल
मोनोपली तोडायची म्हटल्यास
मार्केटमध्ये असायलाच हवीत होमोजिनियस प्राॅडक्ट
टुडेज मार्केट इज कन्झुमर ओरिएन्टेड म्हणतात.
सप्लाय अॅज पर डिमांड
वाचलाय का रे तू कधी मार्क्स?
त्याचं दास कॅपिटल
ऐकून माहित्येय का रे एका निर्जन बेटावर
राहिलेल्या
राॅबिन्सन क्रुसोची कथा
त्यानं काढलेला निष्कर्ष
प्रत्येक वस्तूला मोल असतं म्हणे
आठवतेय का रे तुला?
टाॅलस्टाॅयच्या कथेतला माणूस जमेल तेव्हढी
जमीन घशात
टाकायला निघालेला
विवेकानंदांनी म्हटलंय की बुद्धानं
नेमकं आठवत नाहीये
गरजाच मानवी दुःखाचं मूळ कारण आहे
म्हणून
मी जाम बोललो का रे?
म्हणजे एकदम हायफंडा
पण ही रॅट रेस आहे यार
जो जीता वो सिकंदर हारा वो गली का बंदर
बघ ना या टीव्हीवरल्या जाहिराती
परफ्यूमच्या /सोपच्या/ दारूच्या
त्यातल्या कमनीय माॅडेल्स
डोळ्यांना भुरळ पाडणाऱ्या
सर्वांनाच करायचंय मार्केट कॅप्चर
किंवा खिळखिळी करून टाकायचीय पूर्ण इकाॅनाॅमी

हा वरचा पाहातोस?
पृथ्वी पण अशीच आजमितीला कमीअधिक
फरकानं का होईना
गरगर फिरत्येय, गुरुत्वाकर्षणाचा नियम
आड न येता रे
तर आपण साले कधीच फेकले गेलो असतो
कुठेतरी
मात्र सरपटत/ रेंगत का होईना
स्वतःला मरेस्तोवर जिवंत ठेवायचा प्रयत्न
चाललाय आपला निकराचा प्रयत्न
व एकमेकांना खाऊन जिवंत राहायचं कसं
याचं दिवसागणिक वाढतंय थ्रील

तुला माहित्येय
आजकाल रोटी कपडा और मकानाबरोबरच
चालूहेत तंत्रज्ञान पुरविण्याच्या लांब लांब
गोष्टी
माणसांनाही राहू लागलेत गर्भ
व समागमाशिवाय डीएन्एच्या आधारावर
जन्मू लागलीत बालकं
निभिषात संपवू शकतो अणुस्फोटानं करोडो वर्षाची सृष्टी
किंवा मल्टिमिडीयाच्या मदतीनं उभं करू शकता
पडद्यावर
कल्पनेपल्याडचं जग सफाईनं
दगडाची हत्यारं व झाडाची पाने घालून
वावरणारा हा मानव
जीवाप्रमाणे जपू लागलाय
आपापले पेटंट, ब्रँड, गुडविल
नेटवर्क व यशाचा पासवर्ड
तू अनुभवतट असशील
सगळीकडे कशी पादल्यासारखी सायबर हवा
इन्सोटेकने वामनासारखी पादाक्रांत चेलीय पृथ्वी
जाहिरातीच्या जादूइ चादरीवर बसून
पाहात असतील झपाट्यानं बदलत चाललेलं
जगण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर
हरवू लागलोय आज आपण आपली
बोलीभाषा
विसरू पाह्तोय परवचे
इडलीच्या पीठासारखे भाषेचे तयार पॅक
बेजारात मिळताना
छड्या खाऊन खाऊन उ
पाटीवर 'गमभन' गिरवलेल्या बोटातून
तुटत चाललीय काही लिहिण्याची सवय
आजी म्हणायची ते खरंय
साले आपण एकदम पेंगापाव झालोय
ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर स्क्रीनवर
ई-भाषा
ई-काॅमर्स
ई-सेवा
ई-डिफेन्स
दिसू लागलीय
ई-हिंसा
तू साल्या इमॅजिन वगैरे करतो का रे कधी गोष्टी
म्हणजे हा समोरचे टीव्ही फोडला तर?
पडतील काय रे बाहेर माणसांचे जथ्थेच्या जथ्थे
केबलमधून उडेल काय रे रक्ताची चिळकांडी
पीसीबीमधून सरपटत बाहेर पडतील का रे
इस्टमनकलर
स्वप्नांची हिरवी पिल्ले
कोसळून पडेल काय रे जाहिरातीचं प्रचंड नेटवर्क
तिच्या हातातलं आईस्क्रीम येईल काय माझ्या हातात.
घराच्या चार भिंतीसारखीच वाटते का रे टीव्हीची चौकट
२१ इंचीच्या काचेच्या छातीतून ऐकू येईल का रे तुझं माझं धपापणं?

खरं म्हणजे मला कळतच नाहीये रे ही जागतिकीकरण,
उदारीकरण, भांडवलीकरणाची मचमच भाषा
जो तो म्हणतोय मंदीचं वातावरण आहे म्हणून
डाॅलरच्या तुलनेत रुपय्या दिवसेन् दिवस पार घसरतोय म्हणे
इंडस्ट्रीज, स्माॅलस्केल युनिट्स धडाधड बंद होताहेत म्हणे
पतपेढ्या दिवाळखोरी जाहीर करू लागल्यात म्हणे
आठवड्याआधीचं संसदेतलं बजेट ऐकलंस?
च्युतिया बनवायची लाईन सगळी
तुला वाटतं का रे कुठेतरी नोकरी मिळावी हा फढतूस हेतू
घेऊनच आपण पदव्या मिळवल्या
लोकलमध्ये अगरबत्त्याचा पुडा विकूनही भरता येते पोटाची
खळगी
कुठे घेऊन जातोय रे तुला मले हा सद्यस्थितीचा लोंढा अचानक दिवे गेलेल्या शहरासारखे आपण सारे संभ्रमित
राहूही शकत नाही एकमेकांच्या आधाराने उभे
श्वास घ्यावा तर बदलत्या हवामानाची भीती संवेदनशील म्हणवून आपण
करवून घेतो ना स्वतःची लाल
मग कवीलोकांनी काय करायचं असतं नेमकं?
प्लेग झालेल्या वस्तीतल्या उंदरासारखा काढावा पळ
किंवा
लिहाव्यात कवितेच्या धादान्त खोट्या ओळी
किंवा
बायकोच्या लुगड्यात लपून करावा सेक्स
माझ्याकडे असा काय पाहातो आहेस रे?
की दिसून येतेय तुला माझ्याही डोक्यात खोटारडेपणाची झाक
कशाला मारायच्या मोठेपणाच्या बाता
अपण बरे की आपली नोकरी बरी म्हणणारी डरपोक जात आपली
आपल्याला उतरता येणार नाही एकदम लढ्यात
गावपातळीवर मोर्चा काढायलाही हव्यात गोट्या
शाळेत छड्या खाताना आठवतंय मुतल्याचं
ढेलू शकणार आहोत का पोलिसी काठ्या
सारं सारं कळून येतानाही
न कळल्याचं आपण वठवू शकतो उत्तम ढोंग
खरंच आपल्यात नाहीत रे गट्स
मात्र एवढं मोठ्यांदा हसूही नकोस रे
कुठेतरी कुणीतरी सारं हे थांबवायला हवं
हे मान्य
मात्र कोण पुढे येणार?
कृपाकरून माझ्याकडून अपेक्षा
ठेवू नकोस रे
आपण जन्मापासून जाम डरपोक रे!

-----------------------------

(वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता, अभिधानंतर प्रकाशन, २००२)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFLROFL

(तूर्तास नुसता हसतोय. पुढेमागे जमल्यास कधी काळी, कोण जाणे, कदाचित वाचेनसुद्धा. (कोणाची बुद्धी कधी कशी फिरावी, कोणी सांगावे, नाही का?))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता फार आवडल्या आहेत. आपली एक कविता पूर्वी वाचली होती बहुतेक मुक्तसुनीत यांनी काही कारणाने ऐसीवर अन्य संस्थळावरती दुवा (http://www.misalpav.com/node/1877) दिलेला होता. तेव्हाच आपण नीट लक्षात राहीलात.
जगण्यातील एकसुरीपणा, बोटचेपपणा, भित्रेपणा, सुरक्षिततेच्या हमीची आवश्यकता छान व्यक्त झाल्या आहेत.
पहील्या कवितेतील कानकोंडेपण तर एकदम अंगावर काटा आणणारं.
____
अधिक कविता शोधल्या. इथे सापडल्या आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0