धाकट्या मामाच्या बारा गोष्टी - माधुरी पुरंदरे

#अंकाविषयी #ललित #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

धाकट्या मामाच्या बारा गोष्टी

- माधुरी पुरंदरे

मोबाईलपूर्व किमान पन्नास वर्षं असा ह्या गोष्टींमधला काळ आहे. म्हणजे नक्की कधीचा त्याचा हिशेब तू कर. गोष्टींची सुरुवात सुरुवातीपासून, म्हणजे माझ्या कुटुंबापासून करावी असं मला वाटतं.

...

आमच्या कुटुंबाची गोष्ट

माझा जन्म एका खाऊनपिऊन सुखी पण तरीही सर्वसामान्य अशा कुटुंबात झाला. तेव्हा कुटुंबाचा आकारही सर्वसामान्य होता. आजी, आजोबा, दोन काका, दोन काकवा, माझे बाबा, माझी आई, सहा नातू आणि मी एकुलती नात.

माझं आजोळही असंच सर्वसामान्य, पण आकारानं थोडं आटोपशीर. आजी, आजोबा, आजोबांची थोरली बहीण म्हणजे माझ्या आईची आत्या, माझा मोठा मामा, मामी, त्यांची मुलगी म्हणजे माझी मामेबहीण, माझे आई-बाबा आणि मीसुद्धा.

शिवाय, आम्हा नातवंडांमध्येच मोजता येईल असा एक धाकटा मामा; माझ्या आईचा पाठचा भाऊ. त्या दोघांच्या वयात जरा जास्त अंतर आहे. माझी मामेबहीण जवळजवळ त्याच्या वयाची आहे म्हणजे बघ.

आणखी जरा दूरचेही नातेवाईक मोजता येतील, पण सख्खे एवढेच.

अर्थात सख्खे असले तरी राहायचे आपापल्या घरीच; पण सारखे एकमेकांच्या पायात पायात असायचे. विशेष निमित्त असलं की सख्खे आणि दूरचे एकत्र यायचेच; पण निमित्त नसलं तरीही यायचे. आजही असं चालूच आहे. आपली काही खास गुपितं कुटुंबातल्या कुणालाच माहीत नाहीत, पण बाकीच्यांची सगळी खास गुपितं फक्त आपल्यालाच माहीत आहेत असं आमच्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं. थोडक्यात काय, तर सगळ्यांना सगळ्यांचं सगळं माहीत असतं. जवळजवळ परमेश्वराइतकेच सगळे सर्वत्र असतात. 'आम्ही आपली नाकासमोर पाहत सरळ मार्गानं चालणारी साधी सर्वसामान्य माणसं' हे आमचं पालुपद आहे. आजच्या भाषेत #सर्वसामान्य किंवा #कुटुंब किंवा #नाकासमोर. आमच्या ओळखीचं किंवा सवयीचं नसलेलं, वेगळं, काळाच्या बोटभर पुढे असलेलं आणि बधिर झालेल्या मेंदूला किंचितशा झिणझिण्या आणणारं असं काहीही किंवा कुणीही आसपास असलं तर त्यापासून आम्ही दूर, सुरक्षित अंतर ठेवूनच राहतो. हे धोरण आम्ही आजपर्यंत निष्ठेनं पाळलं आहे. आमचं पालुपद आजही तेच आहे.

...

हे सगळं बघून मजेत फिदिफिदि हसणारं नियती नावाचं काही तरी असतं ह्या कल्पनेवर मात्र हल्ली माझा विश्‍वास बसायला लागला आहे. नाही तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या मापात न मावणारा एक मुलगा आमच्याच कळपात जन्माला का आला असता? त्या नियतीनंच त्याच्या कपाळावर जाणूनबुजून चुकीचा पत्ता लिहिला असणार आणि आता ती आमची गंमत बघत खुसखुसत असणार.

...

तो मुलगा म्हणजेच माझा धाकटा मामा

त्याचं एक नाव होतं, पण आजोळी त्याला सगळे नुसतं 'धाकटा' म्हणत. 'धाकटा उठला का?' 'धाकट्याला जेवायला बोलाव' असं. म्हणून मीही त्याला 'धाकटा मामा' म्हणत असे, पण ते मोठ्या माणसांसमोर. एरवी फक्त 'धाकटा'. असा करारच आम्हा दोघांमध्ये झाला होता.

रूपरंगानं धाकटा मामा तसा ठाकठीक होता. म्हणजे आमच्यासारखाच सर्वसामान्य होता. पण तरीही त्याच्या दिसण्याबद्दल विशेष असं काही सांगायचंच म्हटलं तर एक सांगता येईल : त्याच्या एकाच गालाला कायमची खळी पडलेली होती. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सतत एक खट्याळ आणि तिरकस स्मित दिसायचं. जन्माला येतानाच तो ते घेऊन आला होता. आता ही गोष्ट काही त्याच्या हातातली नव्हती. पण हे कळत असूनही तो नुसता आसपास असला तरी माणसं अस्वस्थ व्हायची.

घरच्यांना त्याहूनही जास्त चिरडीला आणणारी आणखी एक गोष्ट तो घेऊन आला होता, ती म्हणजे प्रत्येक लहानसहान गोष्टीबद्दलचं कुतूहल. ते त्याला नाकासमोर बघत सरळ चालू देत नव्हतं. कुतूहलापाठोपाठ प्रश्‍न येतात. त्यांची समाधानकारक उत्तरं मिळेपर्यंत ते विचारत राहावे लागतात. बरं, मिळालेली उत्तरंच खरी हे कशावरून? म्हणून मग ती तपासून खात्री करून घ्यावी लागते. त्यासाठी चिकाटी लागते आणि ती धाकट्याकडे भरपूर होती. का? कशाला? कधी? कुणी? किती? केवढं? कसं? कशावरून?... मराठी भाषेत प्रश्‍न विचारण्याच्या इतक्या तऱ्हा असतात ह्याचा आमच्या घरातल्यांना कधीच विसर पडला होता. त्यामुळे धाकट्या मामाच्या अनवट प्रश्‍नांनी त्यांना अनेकदा निरुत्तर व्हावं लागायचं आणि त्यामुळे अपमान झाल्यासारखं वाटायचं. त्याचे प्रश्‍न थांबवण्यासाठी नकळत हात उगारला जायचा. पण तरीही अपमान झाल्याची बोच काही पुसली जायची नाही.

अशा सगळ्या गुंत्यामुळे घरातली मोठी माणसं वैतागून गेली होती. त्यांची परीक्षा पाहण्यासाठी नियतीनं काढलेला हा पेपर एकंदरीत अवघडच होता. त्यातले सगळे प्रश्‍न आमच्या कुटुंबानं स्वतःसाठी आखून घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचे होते.

...

तेव्हापासूनच धाकटा मामा म्हणजे 'सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे' असं, कुणालाच नको असलेलं पण नाइलाजानं सांभाळावं लागणारं, विद्रूप पिल्लू झालं होतं. वर्षानुवर्षं एका सुरात आळवलेल्या 'आम्ही सामान्य' नावाच्या रागातला तो वर्ज्य स्वर होता. ह्याला जबाबदार कोण होतं? चूक कोणाची होती? अर्थातच धाकट्याची! तेव्हा त्याला अद्दल घडवणं आणि वठणीवर आणणं हा त्यावरचा सर्वांना पटणारा आणि जमणारा एकमेव उपाय होता. येताजाता 'तू आमच्यातला नाहीस' अशी जाणीव त्याला करून देणं; परक्या लोकांसमोर त्याचा अपमान करणं; काही तरी निमित्त शोधून त्याला 'दिसामाजी एक तरी धपाटा' घालणं ही आपली जबाबदारीच आहे, अशा कर्तव्यभावनेनं घरातले सर्व लहानथोर त्या उपायाची चोख अंमलबजावणी करत असत.

...

धाकट्या मामाच्या शाळेतल्या दिवसांची गोष्ट

अशा कुठल्याही उपायांचा धाकट्यावर मात्र ढिम्म परिणाम होत नव्हता. किंवा तसं तो दाखवत तरी होता. त्यानं कधी कुणाचा चिडून रडून निषेध केला नाही, कुणाला तो उलट बोलला नाही. बरं, ह्यावरून तो मंदबुद्धी आहे किंवा त्याला समजच कमी आहे असा अर्थ काढण्याचीही सोय नव्हती. ह्याचा पुरावा म्हणजे शाळेत त्याचं पहिल्यापासूनच उत्तम चाललेलं होतं. नेहमी पहिल्या तिनात त्याचा नंबर असायचा. ही घरच्यांसाठी चारचौघांत मिरवण्यासारखी गोष्ट होऊ शकली असती; पण त्याला स्वतःला त्याचंही अप्रूप नव्हतंच. कुणी विचारलं नाही तर तो कुणालाही, घरच्यांनाही त्याबद्दल काही सांगायचा नाही. सगळ्याच बाजूंनी धाकट्यानं घरच्यांची पंचाईत करून ठेवली होती.

खरं तर सुरुवातीला धाकट्याला शाळा फारशी आवडली नव्हती. शाळेत जाण्यापेक्षा शाळेतून बाहेर पडणं त्याला जास्त आवडायचं. बाहेरचं जग हीच त्याची खरी शाळा होती. नाकासमोर पाहत चालणाऱ्यांचं ज्या गोष्टींकडे लक्ष जात नाही, किंवा गेलं तरी त्यांना त्यात जे दिसत नाही, तेच धाकट्याला दिसायचं. त्याचं कुतूहल मग त्याला खेचून तिकडे घेऊन जायचं. कुस्तीचा आखाडा; बांधकामाची साइट; पानाचा ठेला; पाव भाजण्याची भट्टी; जुना बाजार; दुकानांबाहेर बसून भांड्यांवर नावं घालणारे, दागिने गाठवणारे, वह्या-पुस्तकं बांधणारे कारागीर अशी माणसं आणि ठिकाणं त्याची त्यानंच शोधली होती. तिथे जे जे चाललेलं असायचं ते ते शांतपणे बघत धाकटा उभा राहायचा; तासन्‌तास. क्वचित एखादा कारागीर कौतुकानं त्याला आपल्याबरोबर थोडं काम करू द्यायचा. त्याबद्दल शाबासकी मिळाली की धाकट्याला मनापासून आनंद व्हायचा.

ह्या कशाहीबद्दल घरी कुणाशी बोलायचं नसतं हे अनुभवानं लहान वयातच त्याला कळलं होतं.

...

तरीही तो शाळेतही जातच राहिला. बालवर्गात असताना त्याला लागलेला अक्षरांचा लळा हे त्याचं कारण होतं. पिवळसर रंगाचा कागद. त्यावरच्या आडव्या रेषांना धरून लोंबकळणारी तऱ्हेतऱ्हेच्या आकारांची चिमुकली झुंबरं, किंवा शंकर वैद्यांच्या कवितेतली 'शब्दांच्या सुंदर कबुतरांची रांग' तो भान हरपून बघत असे. कधी त्यांना हळूच बोट लावून ती भुर्रकन उडून जातात की काय ते पाहत असे. तेच कागद डोळ्यांपुढे धरून बाई गोष्ट सांगतात, कविता म्हणतात ह्याचं त्याला कमालीचं आश्‍चर्य वाटत असे. ती छोटी चित्रं बाईंशी बोलतात? बाईंना ती ऐकू जातात? माझ्याशीपण ती बोलतील?

त्या काळी मुलांना लवकर लिहावाचायला शिकवण्याची शाळांनाही घाई असायची. त्यामुळे बालवर्गातच स्वतःलाही कळण्याआत धाकटा वाचायला आणि लिहायला शिकला. मुलांना हे शिकवायचं, पण त्यांच्या हातात पुस्तकं मात्र द्यायची नाहीत अशीही पद्धत होती. शाळांमध्येही आणि घरामध्येही. त्यामुळे शाळेतून बाहेर पडलं की हातानं लिहिलेलं किंवा यंत्रावर छापलेलं जे अक्षर दिसेल ते वाचण्याचा धाकट्याला नादच लागला. दुकानांच्या नावांच्या पाट्या, भिंतींवरच्या जाहिराती आणि निवडणुकांच्या घोषणा, नाटक-सिनेमाची पोस्टरं, घरांची नावं, असं काहीही. आधी सुटी अक्षरं; मग अक्षरं जोडून तयार झालेले शब्द; मग सबंध वाक्य. शब्दांचा अर्थ पूर्ण करणारं वाक्य वाचता आल्याचा पहिला अद्भुत अनुभव आणि आनंद त्याला कधीच शब्दांत सांगता आला नाही. तो त्याच्या डोळ्यांत दिसायचा. गल्लीत रोज येणाऱ्या पोस्टमनकाकांशी त्याची दोस्ती होती. त्यांच्या सायकलवर बसून गल्लीत एक चक्कर मारायला मिळायची. वाचता यायला लागल्यानंतर 'मी वाचणार पत्ता' असं म्हणत पत्रवाटपाचं कामही काही दिवस धाकट्यानं केलं. एकदा त्याच्या बाबांनी – म्हणजे माझ्या आजोबांनी – हे पाहिलं. ते पोस्टमनकाकांनाच रागावले. त्यानंतर धाकट्याची आणि पोस्टमनकाकांची दोस्ती संपली.

...

दिवस-महिने-वर्षं पुढे सरकत होती. धाकटा विनासायास एकेक इयत्ता ओलांडत होता. सुरुवातीला प्रगतिपुस्तकावर सही करताना त्याचे बाबा विचारायचे, "पास की नापास?" नंतर तेवढंही विचारणं त्यांनी सोडून दिलं. अभ्यासासाठी त्याच्या मागे लागावं लागत नव्हतं. शाळेतून कधी कसली तक्रार येत नव्हती. त्याचं तो बघत होता. आणखी काय हवं?

धाकटा मामा चौथीतून पाचवीत, म्हणजे माध्यमिक शाळेत गेला. बाबांनी प्रश्‍न बदलला : "आता अभ्यास वाढणार, माहीत आहे ना? नापास झालास तर शाळा बंद, कळलं?" धाकट्यानं मान हलवली. प्रत्येक परीक्षेत पहिला किंवा दुसरा येणारा आपला मुलगा थेट नापासच होईल असं त्याच्या बाबांना का वाटलं असावं कोण जाणे! तो पूर्वी विचारायचा तसे सगळ्यांना हैराण करणारे प्रश्‍न हल्ली विचारत नाही; घरात असून नसल्यासारखं वागतो; घरापासून घरच्यांपासून तो सुटा होत चालला आहे हे कुणाच्या लक्षातही आलेलं नव्हतं.

...

धाकट्या मामाच्या शाळेबाहेरच्या दिवसांची गोष्ट

जुन्या बाजारातल्या एका टपरीमध्ये पोचे आलेली भांडी ठोकून नीट करण्याचं काम चालू होतं. घागरी, हंडे, घंगाळी अशा मोठ्या भांड्यांवर एक आजोबा काम करत होते. तांब्याची आणि पितळ्याची फुलपात्रं, पेले, गडू अशी लहान भांडी घेऊन एक मुलगा बसला होता. दहा-अकरा वर्षांचाच असेल, पण अगदी आजोबांसारख्या सराईतपणे, त्यांच्याच लयीत त्याचं ठोककाम सुरू होतं. आजूबाजूला कोण आहे, काय चाललंय ह्याकडे दोघांचंही लक्ष नव्हतं.

बऱ्याच वेळापासून धाकटा मामा बाजूला उभा राहून त्यांची ठोकाठोक बघत होता. त्याचीही तंद्री लागली होती. आपल्या एका पायानं आपल्या नकळत त्यांच्या ठोकण्याचा ताल धरलाय हेसुद्धा त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

अचानक पाठीमागून त्याच्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवला. दचकून त्यानं वळून पाहिलं. त्याचे वर्गशिक्षक उभे होते.

"सर!...," धाकटा पुटपुटला.

"काय रे, इथं कसा तू?" सरांनी विचारलं.

"बघतोय...."

"ते झालंच; पण पोचे काढायला दिलंयस का काही?"

"नाही, सर, बघतोय फक्त."

सरांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्य आणि जरासं कौतुक दिसलं. "अच्छा! नेहमी येतोस की काय इकडे?" त्यांनी विचारलं.

"हो, सर. काम चालू असताना बघायला मला आवडतं... सर, तुम्ही?...."

"अरे, एक जण इथं जुनी पुस्तकं घेऊन बसायचा. कधी कधी चांगली, उपयोगाची पुस्तकं त्याच्याकडून मिळून जायची. पण काही महिने झाले, तो येत नाहीये. आजही आलेला दिसत नाही. हार्ड लक! असो. निघतो आता." सर मामाकडे बघून हसले आणि जायला निघाले; पण पुन्हा मागे वळून म्हणाले, "तुला सोडतो मी वाटेत कुठे तरी, चल. दिवस मावळायला आलाय. बाजारही उठेल आता. घरी वाट पाहत असतील नं?"

सरांकडे सायकल होती. धाकटा मागच्या कॅरियरवर बसला. सरांनी त्याला निम्म्या वाटेत सोडलं, पण तोपर्यंत जुन्या बाजारात मिळालेल्या पुस्तकांबद्दल, ती लिहिणाऱ्यांबद्दल ते बोलत राहिले. धाकटा सायकलवरून उतरला तेव्हा म्हणाले, "जगात पुस्तकं नसती नं, तर माणसाचं काही खरं नव्हतं. होय की नाही?"

धाकट्यानं समजल्यासारखी मान डोलावली. सरांनी हसून त्याच्या डोक्यावर हलकेच टप्पू मारला आणि सायकलीला पाय मारत ते निघून गेले. ते जे बोलले त्यातलं धाकट्याला जवळ जवळ काहीच कळलं नव्हतं, तरीही त्याला छान वाटलं.

...

धाकट्या मामाला वाचनाचा धडा मिळाला त्याची गोष्ट

धाकटा मोठ्या शाळेत मात्र रुळला. त्याची सरांशी चांगली ओळख झाली. त्याला त्याच्या वयाचे मित्र कधीच नव्हते. शेजारी नाही आणि शाळेतही नाही. कुणी त्याच्या वाऱ्यालाच उभं राहत नसे. पाठीमागे आपली टिंगल होते हे त्याला माहीत होतं; पण त्याची सवय त्याला घरापासूनच होती. त्याच्या ताईला, म्हणजे माझ्या आईला, ढीगभर मैत्रिणी होत्या. शक्यतो बाबा घरात नसताना त्यांची ये जा आणि हसणं खिदळणं चालू असायचं. अशात चुकून जरी धाकटा समोर आला तरी ताई 'तुझं काये रे इथं मुलींमध्ये? जा तुझ्या गच्चीवर, पळ!' म्हणून त्याला पिटाळायची. तिचं पाहून तिच्या मैत्रिणीही त्याची टिंगल करायच्या.

सरांशी ओळख वाढत गेली तसं त्याला जाणवलं, की आपलं मोठ्या माणसांशी चांगलं जमतं. शाळा सुटल्यावर बऱ्याचदा धाकटा आणि सोबत सायकल हातात धरून सर असे दोघं थोड्या अंतरापर्यंत चालतच जायचे. धाकट्याचं वय विसरून सर खूप विषयांबद्दल बोलायचे. मनापासून ऐकणारं कुणी तरी जवळ आहे हेच त्यांना पुरेसं असायचं. धाकट्याला थोडं समजायचं, थोडं समजल्यासारखं वाटायचं, बरंचसं डोक्यावरून जायचं. पण सगळं मिळून ते हवंसंच वाटायचं.

...

पाचवी संपली. सहावीत वर्गशिक्षक बदलले; पण शाळा सुटल्यावर पाचवीच्या सरांबरोबर गप्पा मारत चालत जाण्याचा नेम चुकला नाही. शाळेचं लहानसं ग्रंथालय होतं. आठवीत गेल्यावरच तिथे मुलांना प्रवेश मिळायचा. त्यामुळे सर स्वतःच्या नावावर कधी एक तर कधी दोनसुद्धा पुस्तकं आणून धाकट्याला द्यायचे. इतिहासातल्या गोष्टी, पुराणकथा, लोककथा, थोरांची चरित्रं इथपासून गोट्या, फास्टर फेणे, चिमणराव-गुंड्याभाऊच्या गोष्टी वगैरे वीसेक पुस्तकं धाकट्यानं वर्षभरात वाचून काढली. स्वतःच्या हातात पुस्तक घेऊन एकट्यानं वाचण्यात केवढं थ्रिल होतं!

...

सहावीची वार्षिक परीक्षा संपली. शेवटचा पेपर झाल्यावर सर आणि धाकटा नेहमीप्रमाणे चालत निघाले. जिथून त्यांच्या वाटा वेगळ्या व्हायच्या तिथे पोहोचल्यावर सर थांबले. खांद्याला लटकवलेल्या पिशवीत हात घालून त्यांनी खाकी कागदात गुंडाळलेलं एक पुस्तक बाहेर काढलं आणि धाकट्यासमोर धरलं.

"मुलांसाठी नाहीये हे, पण तरीही वाच. आवडेल तुला. एक मात्र लक्षात ठेव; बकाबका वाचायचं नाही. सावकाश, एक घास बत्तीस वेळा चावून चावून, चव घेत घेत वाचायचं. नाही तर पचायचं नाही ते. पोट बिघडल्यावर जशी अन्नाचीच भीती वाटते तशी वाचलेलं पचलं नाही तर पुस्तकांचीच भीती मनात बसते. तसं होऊ द्यायचं नाही. सगळ्या सुट्टीत एवढं एकच पुस्तक वाचून झालं तरी हरकत नाही, कळलं? निघतो मी," असं म्हणून सायकलवर टांग टाकत ते म्हणाले, "आणखी एक. पुस्तक बक्षीस दिलेलं नाहीये. शाळा सुरू झाल्यावर परत द्यायचं मला, काय!"

धाकटा हसला. सर कोपऱ्यावर वळून दिसेनासे होईपर्यंत बघत राहिला. मग हातातल्या पुस्तकाला गुंडाळलेला कागद त्यानं अर्धवट काढला; पण क्षणभर विचार करून पुन्हा गुंडाळला. बकाबका खायचं नाही, असं स्वतःला बजावत पुस्तक दप्तरात ठेवून तो घराकडे निघाला.

...

दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं होईपर्यंत धाकट्यानं धीर धरला. जेवणं झाली. उन्हाळी दुपार घरावर उतरली. घर शांत झालं.

सरांनी दिलेलं पुस्तक घेऊन धाकटा गच्चीकडे जाणाऱ्या जिन्यात जाऊन बसला. पुस्तकाला गुंडाळलेला खाकी कागद त्यानं ओढूनच काढला आणि कव्हरवरचं नाव पाहिलं : 'माणदेशी माणसे'. असं नाव असतं पुस्तकाचं? काहीशा नाराजीनंच त्यानं दोन पानं उलटली. पहिल्याच कथेच्या सुरुवातीला असलेल्या पानभर चित्रापाशी तो थबकला आणि थबकूनच राहिला. हे वेगळं होतं आणि तरीही खूप ओळखीचंही होतं. ठसठशीत, खरं, जिवंत आणि बोलकं.

भानावर आल्यावर धाकट्यानं पानं उलटत प्रत्येक कथेच्या सुरुवातीचं चित्र पाहिलं. ओळखीचा सगळा जुना बाजार त्याच्या डोळ्यांपुढून सरकत गेला.

त्यानं पहिली कथा वाचून काढली. पुढचं पान उलटलं, पण लगेच पुस्तक मिटून टाकलं. थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. मग त्यानं पुस्तक दप्तरात ठेवून दिलं.

...

त्या सबंध सुट्टीत ते एकच पुस्तक धाकट्यानं तीन-चार वेळा चव घेत घेत वाचून काढलं. बाकीचा वेळ घालवायला बाहेरची शाळा होतीच.

...

धाकटा रद्दीच्या दुकानात जायला लागला त्याची गोष्ट

सातवीच्या वर्गाची सुरुवात झकास झाली. त्या वर्षी मोठ्या मामाला प्रमोशन मिळालं आणि मामीला अर्धवेळ नोकरी लागली. त्या आनंदात मामानं कुठून तरी एक जुनी व्हेस्पा स्वस्तात मिळवली आणि 'मोठा झालास आता' असं म्हणून आपली खिळखिळी झालेली जुनी सायकल धाकट्याला देऊन टाकली. ती चालवायला शिकण्यात दोन दिवस गेले आणि मग धाकट्याला जणू जास्तीचे दोन पायच फुटले.

सायकल हातात आल्यामुळे धाकट्याची शाळेबाहेरची शाळा विस्तारली. देवळांमधल्या कीर्तनांपासून कबड्डीच्या सामन्यांपर्यंत, महिला मंडळात होणाऱ्या व्याख्यानांपासून मोहरमच्या ताबूतांपर्यंत, हस्तकलांच्या मेळ्यापासून कुत्र्यांच्या फॅशन-शोपर्यंत सगळीकडे ती सायकल त्याला घेऊन जात होती. दिवाळीच्या सुट्टीत तिला तेलपाणी करायलाही तो शिकला. पण शाळा सुटल्यावर सरांबरोबर सायकल हातात धरून चालत जाण्याचा शिरस्ता मात्र बदलला नाही.

असंच चालता चालता एक दिवस सर त्याला म्हणाले, "तुझ्याकडे सायकल आली ते बरं झालं. माझं एक काम करशील?"

धाकट्यानं मान हलवून 'हो' म्हटलं.

"माझ्याकडे मासिकांचे जुने, नको असलेले अंक साठतात. तीन-चार महिन्यांनी एकदा ते रद्दीच्या दुकानात नेऊन विकायचे. त्याचे पैसे मिळतील ते साठवून आपल्याला थोडी पुस्तकं घेता येतील."

सर 'आपल्याला' म्हणाले! धाकट्याला आपण मोठे झाल्यासारखं वाटलं.

दुसऱ्याच दिवशी सर एक मोठी पिशवी भरून मासिकं घेऊन आले. "रद्दी देण्याची घाई नाहीये. तुला त्यातलं काही वाचायचं असलं तर वाच आणि मग दे. हा दुकानाचा पत्ता. ह्याच भागात राहतोस ना तू?"

चालता चालता सरांनी मासिकांबद्दल सांगितलं. मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, नियतकालिक, संपादक असे शब्द धाकटा पहिल्यांदा ऐकत होता. एका नव्याच विश्‍वाशी त्याची ओळख होत होती.

घरी जाता जाता धाकट्यानं ते रद्दीचं दुकान शोधून काढलं. बंद होतं. शटरवर खडूनं लिहिलं होतं – 'दुकान रोज (रविवारसह) आमच्या सोयीच्या वेळी उघडेल व बंद केले जाईल.'

...

रात्री जेवण झाल्यावर धाकटा सरांची पिशवी घेऊन गच्चीवर गेला. आतली मासिकं काढून त्यानं समोर ओळीनं मांडली. पाठोपाठ ताई वर आली. धाकटा वर जाऊन काय करतो ते पाहण्याची ड्यूटी आजीनं तिला लावून दिली होती.

"अय्या, मासिकं?" ती चीत्कारली. त्यातलं एक तिनं उचललं, भराभरा पानं उलटून पाहिलं. "बोअर आहे! एकपण गोष्ट नाहीये. काहीही वाचतोस का तू?"

"माझ्या सरांची मासिकं आहेत," धाकटा हळू आवाजात म्हणाला.

"तू एक चक्रम आणि तुझे सर सात चक्रम," असं म्हणून ताईनं मासिक त्याच्यासमोर टाकलं अन् ती निघून गेली.

कितीतरी वेळ धाकटा त्या मासिकांकडे बघत राहिला. मग त्यानं सगळी गोळा करून पिशवीत नीट भरली.

दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्याआधी त्यानं रद्दीचं दुकान गाठलं. मासिकं दिली आणि संध्याकाळी सरांना पैसे देऊन टाकले. मासिकांमधलं काही वाचलंस का असं सरांनी विचारलं नाही. धाकटाही काही बोलला नाही.

...

सातवीचं वर्ष भुर्रकन संपलं. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी सरांनी मासिकांचा गठ्ठा आणून दिला. हा वर्षभरातला तिसरा की चौथा होता. सुट्टी लागल्यामुळे धाकट्यानं रद्दी द्यायला जाण्याची घाई केली नाही. काही दिवस गठ्ठा तसाच पडून होता.

एका रिकाम्या दुपारी त्यानं तो सोडला. एक मासिक उचललं आणि सावकाश एकेक पान उलटून त्यावरून नजर फिरवली. मध्येच थांबून थोडं वाचलं. एक प्रवासवर्णन पूर्ण वाचलं. नंतर एक-दोन कविता. मग दुसरं मासिक... तिसरं... अर्धी सुट्टी संपेपर्यंत सरांचा बकाबका न वाचण्याचा सल्ला आठवत धाकट्यानं बहुतेक सगळी मासिकं वाचून काढली. लिहिणारी किती माणसं आहेत आणि प्रत्येकाला किती वेगवेगळं सांगायचं असतं! किती विषय आणि लिहिण्याच्याही किती तऱ्हा!

...

ह्या खेपेला रद्दीच्या दुकानमालकानं पहिल्यांदाच मान वर करून धाकट्याकडे बघितलं आणि विचारलं, "कुठनं आणतोस रे एवढी सगळी मासिकं?"

धाकट्यानं सरांबद्दल सांगितलं.

"हां हां, ते मास्तर होय? मला शंका आलीच होती. बरं, त्यांना निरोप दे. म्हणावं तुमची पुस्तकं आलीयेत."

"कसली पुस्तकं?" धाकट्यानं उत्सुकतेनं विचारलं, "तुम्ही पुस्तकं विकता?" मालकानं उत्तर दिलं नाही. "मला बघता येतील?"

मासिकांचं वजन करता करता धाकट्याकडे न बघताच मालक म्हणाला, "हे बघ, साधी रद्दी विकायला लोक माझ्याकडे येतात. पण दुर्मीळ पुस्तकं आणि मासिकं स्वतः मी शोधून आणतो, त्यांची डागडुजी करतो आणि चढ्या किमतीला विकतो. हे तुझे पैसे."

धाकटा जागचा हलला नाही. मालकानं पैसे त्याच्यापुढे ठेवले. बाजूच्या रद्दीच्या ढिगातून पानं सुटी झालेला चांदोबाचा एक जुना अंक ओढून काढून धाकट्यासमोर धरला. त्याकडे दुर्लक्ष करून धाकटा म्हणाला, "माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही म्हणालात ती पुस्तकं मला बघायची आहेत आणि वाचायचीही आहेत. मी इथंच बसून वाचेन. चालेल?"

मालकानं चांदोबा पुन्हा रद्दीत टाकला आणि हातानं 'नीघ' अशी खूण करून तो आपल्या कामाकडे वळला. धाकट्यानं पैसे उचलले. वळून तो चालू लागला आणि मागून आवाज आला, "तुझ्या मास्तरांची चिठ्ठी घेऊन ये."

...

धाकट्या मामाच्या आठवणीतले ते अत्यंत आनंदाचे दिवस होते. आठ बाय दहा फुटांचं अरुंद बोळासारखं ते रद्दीचं दुकान म्हणजे एक लहान गुहाच होती. वरचं छत आतल्या बाजूला उतरत गेलं होतं, त्यामुळे आतपर्यंत पोहोचण्यासाठी मालकाला रांगतच जावं लागायचं. पुढच्या बाजूला वर्तमानपत्रं, मासिकं, पुठ्ठे वगैरेंचे गठ्ठे छताला टेकलेले होते. मागच्या ठेंगण्या जागेत जुनी, कव्हर निघालेली, शेवटची पानं फाटलेली किंवा भिजल्यानं डाग पडलेली पुस्तकं दोन-तीन खोक्यांमध्ये ठेवलेली असायची. काही दहा-वीस वर्षांपूर्वीची तर काही चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीची. क्वचित एखाददोन मागच्या शतकातलीही असायची. काहींवर लेखकाची स्वाक्षरी असायची. त्या अंधाऱ्या खबदाडीत बसून धाकट्याचं वाचन चालायचं. कुठल्याही विषयाचं त्याला वावडं नव्हतं.

"वाटेल ते वाचतोस तू? त्यातलं काही कळतं तरी का?" एकदा मालकानं विचारलं.

"म्हणूनच सगळं वाचायचं. त्याशिवाय कसं कळणार?" धाकटा म्हणाला.

मग मालकानं त्याला आतल्या कोपऱ्यात एक लहानसा दिवा बसवून दिला. धाकटाही अधूनमधून जुन्या पुस्तकांची डागडुजी करायला मालकाला मदत करायला लागला. संध्याकाळी एक-दोन तास आणि सुट्टीच्या दिवशी कितीही वेळ त्याचा मुक्काम तिथंच असायचा.

...

शाळेत पहिल्या नंबरांमध्ये येणारे आपले हुशार चिरंजीव हल्ली एका रद्दीच्या दुकानात वेळ घालवत असतात ही शुभवार्ता धाकट्याच्या बाबांना – म्हणजे माझ्या आजोबांना – एक दिवस कळणार होतीच, ती अखेर कळली. दुसऱ्याच दिवशी भल्या सकाळी बापलेकांमध्ये एक उद्बोधक संवाद झाला, तो असा –

"काय करतात आमचे कुलदीपक रद्दीच्या दुकानात, कळेल का आम्हाला?"

"पुस्तकं वाचतो."

"कसली पुस्तकं?"

"वेगवेगळ्या विषयांवरची."

"अभ्यासाचे विषय सोडून...."

"सगळेच विषय अभ्यासाचे असतात."

"अरे, पण रद्दीच्या दुकानात...."

"अभ्यासासाठी उपयोगी असणारी पुस्तकं रद्दीच्या दुकानातच मिळतात. तिथं बसून वाचली तर फुकट. म्हणून मी तिथं बसतो."

"तुझ्या मास्तरांना ठाऊक आहेत तुझे हे उद्योग?"

"त्यांना हवी असलेली पुस्तकंही तिथंच मिळतात. मीच नेऊन देतो त्यांना. कालच र.धों.च्या समाजस्वास्थ्याचे दोन जुने अंक नेऊन दिले मी. तुम्हाला हवे असतील तर अजून आहेत...."

कोपरापासून हात जोडत आजोबा नाटकीपणे म्हणाले, "आभार! पण आम्ही आपली नाकासमोर चालणारी साधी माणसं. आम्हाला नाही झेपणार एवढं ज्ञान."

"पण बाबा, अहो ...."

"खूप मोकळं सोडलंय तुला," आजोबा एकदम कडाडले, "तुझी पुस्तकी हुशारी, पहिला नंबर वगैरेचं कौतुक होतं ना, त्यानं शेफारलायस तू. वार्षिक परीक्षा जवळ आलीये. नंबर खाली घसरला तर माझ्याशी गाठ आहे, सांगून ठेवतो."

आजोबांना र. धों. कोण आणि त्यांचं समाजस्वास्थ्य हे काय प्रकरण आहे ते माहीतच नव्हतं म्हणून त्या दिवशी धाकटा जिवानिशी वाचला.

...

धाकटा नापास झाला त्याची गोष्ट

त्या वर्षी माझ्या आई-बाबांचं लग्न ठरलं, म्हणजे दोघांच्या घरच्यांनी ठरवलं.

जावई म्हणून परंपरेनंच आपल्याला काही विशेष अधिकार दिले आहेत असं बहुतेक सगळ्याच जावईलोकांना वाटतं. तसंच ते माझ्या बाबांनाही वाटत असणार. शिवाय लग्न ठरलंय म्हणजे आपण लढाई करून बायको जिंकून आणली आहे अशा आविर्भावात ते वावरत असणार ह्याचीही मला खात्री आहे. अशा माझ्या बाबांचं लग्नाआधीच्या त्या सहा महिन्यांमध्ये आईच्या माहेरी जाणं होतच होतं. तिथे एकदा धाकट्या मामाशी त्यांची पहिल्यांदाच समोरासमोर गाठ पडली. आईनं त्यांना धाकट्याबद्दल काही सांगितलं असणारच. ते मनात धरून त्यांनी विचारलं, "तू म्हणे खूप हुशार आहेस! वर्गात पहिला-दुसरा असतोस. अभ्यास करताना मात्र कधी दिसत नाहीस. बघावं तेव्हा बाहेरच असतोस. मग कसं काय जमवतोस ते?"

एरवी कधी कुणाच्या वाकड्यात न शिरणाऱ्या धाकट्याला तेव्हा अचानक काय सुरसुरी आली कोण जाणे. तो म्हणाला, "पहिलं-दुसरं येण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही, पण मी नापासही होऊ शकतो. त्यासाठी मात्र हिंमत लागते."

"म्हणजे?" बाबांनी गोंधळून विचारलं.

"कळेल."

पंधराच दिवसांनी झालेल्या नऊमाही परीक्षेचा 'चार विषयांत नापास; तीन विषयांत जेमतेम पास; एका विषयाच्या परीक्षेला अनुपस्थित. एकूण अनुत्तीर्ण' असा निकाल घेऊन धाकटा घरी आला. अर्थातच त्यामुळे उठलेल्या वादळानं घराच्या भिंती काही दिवस थरथरल्या.

ह्या प्रकारानं बाबा घाबरलेच. आईला म्हणाले, "चक्रमच आहे हा तुझा भाऊ! ह्याच्याशी बोलायचं म्हणजे... काही सांगायला जावं की हा असं टांगायलाच नेतो का?"

मग आईही धाकट्यावर वैतागली, कारण त्याच्या तऱ्हेवाईक वागण्यावरून सासरी तिला लग्न होण्याआधीच टोमणे मिळायला सुरुवात झाली होती.

...

पुढच्याच वर्षी माझा जन्म झाला.

...

धाकट्या मामावर आणीबाणी लागू झाली त्याची गोष्ट

पहिल्या बाळंतपणासाठी प्रथेप्रमाणे आई माहेरी आली होती. मी दीडएक महिन्याची असेन, तेव्हा एक गंमत झाली. त्याबद्दल सांगणं आवश्यक आहे, कारण ती गंमत तेव्हा झाली म्हणूनच माझी आणि धाकट्या मामाची गट्टी झाली.

झालं काय, की आई-बाबांचं लग्न होऊन थोडा काळ गेला आणि देशात आणीबाणी लागू झाली. काही लोकांना हे अजिबात आवडलेलं नव्हतं. त्यामुळे निदर्शनं करणे, मोर्चे काढणे, भिंतींवर निषेधाची पत्रकं लावणे अशासारखे त्यांचे खोडसाळ उद्योग अधूनमधून चालू असायचे. धाकट्याला हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असे. तशी संधी तो सोडत नसे.

...

एकदा तो शाळेत जात असताना एका चौकात – शाळेच्या वाटेत जो लागत नव्हता अशा दुसऱ्याच एका चौकात – कुणी तरी घोषणा देत निदर्शनं करतंय असं त्याला दुरून ऐकू आलं. त्याच्या सायकलीची चाकं वळलीच त्या दिशेला. त्या चौकात तो पोहोचला आणि त्याच क्षणी पोलिसांचा लाठीमार सुरू झाला. निदर्शक आणि रस्त्याकडेला उभे असलेले बघे वाट फुटेल तिकडे धूम पळत सुटले. चार पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, पण त्यांच्या हाती जेमतेम तीन-चार जणच लागले.

रस्त्याच्या मधोमध सायकल थांबवून धाकटा ही धावपळ बघत होता. पाचव्या पोरगेल्या पोलिसाच्या हाती एकही निदर्शक न लागल्यामुळे तो हिरमुसला होता. त्याची नजर धाकट्यावर पडली.

"तू काय करतो रे हितं?"

"काही नाही, बघतोय," धाकटा म्हणाला.

"व्हय? गंमत चाललीये हितं? चल, तुला आनखी गंमत दाखवितो. बस गाडीत."

चौकाच्या एका कोपऱ्यात एक पोलिसी व्हॅन उभी होती. धाकटा सायकलीवरून उतरला. रस्त्याच्या कडेला त्यानं ती नीट उभी केली आणि खांद्यावरचं दप्तर सावरत तो व्हॅनमध्ये जाऊन बसला. पुढच्या बाजूला ड्रायव्हरशेजारी सबइन्स्पेक्टरसाहेब बसले होते. मागे काय चाललंय ते त्यांनी पाहिलंच नव्हतं. धाकट्यामागोमाग बाकीचे मोर्चेकरी आणि पोलीस गाडीत बसले.

व्हॅन निघाली. भरघोस मिश्या राखलेले एक प्रौढ हवालदार पळापळ करून घामाघूम झाले होते. दुपारच्या उन्हाला, आणीबाणीला अन् मोर्चेकऱ्यांना एकत्रित शिव्या घालत ते रुमालानं चेहरा पुसत होते. तेवढ्यात त्यांचं लक्ष धाकट्याकडे गेलं. डोळे बारीक करून त्यांनी विचारलं, "तू... तू मोर्चामधी होता?"

"नाही. मी फक्त बघत होतो."

"मंग तुला गाडीत कुनी घेतलं?"

धाकट्यानं त्या पोरगेल्या पोलिसाकडे बोट केलं. "ते काका म्हणाले गाडीत बस."

धाकट्याच्या खांद्यावरच्या दप्तराकडे पाहत हवालदारांनी विचारलं, "साळंत चाललावता?"

"हो."

"आरं, मंग या काकाला तसं सांगायचं न्हाई? त्यो गाडीत बस म्हनला तर तू लगीच बसला कसा?"

"मला खूप दिवसांपासून पोलीस चौकी आतून बघायची होती."

हवालदारांनी कपाळावर हात मारून घेतला. मग त्या पोरगेल्या पोलिसावर ते खेकसले, "बेनके, शाळकरी पोरान्ला उचलाय लागले तुमी आता? डोस्क्यात काय भुस्सा भरलाय का? ए पोरा, वय काय तुजं?"

"चौदा."

"म्हंजी अज्ञान. बेनक्या, मरतोय तू आता." मग धाकट्याकडे वळून ते म्हणाले, "चौकी म्हंजी झोपाळे आन् घसरगुंडी खेळन्याची बाग वाटती काय रं, आं? सायबांचं डोस्कं ठिकानावर आसंल तं सुटशील. न्हाय तर मंग... हुंऽ...!" हातातला दंडुका दाखवत ते म्हणाले. धाकट्यानं हळूच शेजारी बसलेल्या बेनक्यांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा रडवेला झाला होता.

मोर्चा लवकर आटपल्यामुळे सायबांचा मूड बरा होता. चौकीत पोहोचल्यावर त्यांनी बेनक्यांची नीट हजेरी घेतली. वर शिक्षाही सुनावली : मुलाला स्वतः घरी सोडायचं. घरच्यांना जे जसं झालं ते तसंच सांगायचं आणि मुलगा सुखरूप घरी पोहोचल्याचं पत्र त्यांच्याकडून आणायचं.

घरी जाता जाता धाकट्यानं रस्त्यात उभी केलेली सायकल घेतली. कुतूहलापोटी बेनक्यांना काही प्रश्‍न विचारण्याचा प्रयत्न केला, पण बेनके घुश्शात होते. त्यांनी तोंड उघडलंच नाही.

घराच्या गल्लीत दोघं शिरले. हातात सायकल धरून चालणारा धाकटा आणि सोबत खांदे पाडून चालणारा एक पोलीस शिपाई असं दृश्य अख्ख्या गल्लीनं पाहिलं. काही वेळानं तो पोलीस आमच्या घरातून एकटाच बाहेर पडला हेही पाहिलं.

...

घरातलं वातावरण तंग झालं होतं. पोलीस दारात पाहून आजीची वाचाच बसली होती. त्याची पाठ फिरल्यावर तिनं रडायला सुरुवात केली. तिचं पाहून आत्यानंही सूर धरला. माझी आई रागानं म्हणाली, "ह्याचं आता जरा अतीच व्हायला लागलं आहे. चालवून कसं घेता तुम्ही लोक! जाऊ दे. मी कशाला बोलू मध्ये! बाबा येतीलच. ते अन् हा, बघून घेतील काय ते," असं म्हणून ती आपल्या खोलीत निघून गेली. धाकटा अजून दारापाशीच उभा होता.

आणि आजोबा आलेच. कारण काहीही असो, चूक कुणाचीही असो, पण पोलीस आपल्या घरापर्यंत आले हे ऐकून त्यांचा भडकाच उडाला. नंतर काय काय झालं असेल त्याची कल्पना कुणीही करू शकेल. सगळ्याचा शेवट असा झाला : घरात धाकट्यापुरती आणीबाणी जाहीर झाली. वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती. तोपर्यंत त्यानं फक्त शाळेत जाण्यापुरतं बाहेर पडायचं. शाळा सुटल्यावर थेट घरी येऊन मुकाट्यानं अभ्यासाला बसायचं. पुढचं वर्ष दहावीचं आहे, तेव्हा उन्हाळ्याची सुट्टीही घरातच.

ह्यावर एक शब्दही न बोलता धाकटा आपल्या खोलीत गेला. एरवीही घरात कुणाशी त्याचा संवाद असा नव्हताच. जेमतेम कामापुरतं संभाषण होतं. आता तेही जवळ जवळ शून्यावर आलं.

...

नंतरचा किमान एक आठवडा सर्व प्रकारचे नातेवाईक, शेजारी, परिचित, आजोबांचे सहकारी वगैरे मंडळी आजी-आजोबांचं सांत्वन करायला येऊन गेली. जाता जाता धाकट्याला घोटभर उपदेशामृत पाजण्याची संधी कुणीही चुकवली नाही. धाकट्यानं सगळं ऐकून घेतलं आणि मनात नोंदवून ठेवलं.

...

धाकट्या मामाशी माझी पहिली भेट झाली त्याची गोष्ट

मला जन्म देताना माझ्या आईला बराच त्रास झाला होता. डॉक्टरांनी शक्य तेवढी विश्रांती घ्यायला सांगितलं होतं, पण ते काही तिला जमत नव्हतं. त्याला कारण होते मी. माझी तब्येत ठणठणीत होती, पण तरीही मी उगीचच रडकी होते. जागी असतानाचा माझा बहुतेक वेळ रडण्यात जायचा, पण झोपेतही माझी पिरपिर चालूच राहायची. मग आईनं मला मांडीवर घेऊन बसायचं किंवा हातात घेऊन घरात फेऱ्या मारायच्या. खाली ठेवायचा अवकाश की माझी पिपाणी सुरू झालीच. आईशिवाय दुसऱ्या कुणाहीकडे मी राहत नव्हते. ती अगदी वैतागून आणि थकून गेली होती.

एरवी धाकट्या मामाचा पाय घरात ठरायचाच नाही. पण ते पोलीस प्रकरण झाल्यानंतर नाइलाजानं तो बराच वेळ घरात असायचा. हॉलला लागून असलेल्या गॅलरीत त्यानं आपलं बस्तान बसवलं होतं. घरात असूनही घरच्यांच्या नजरेआड.

...

एकदा तिथंच जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर मांडी ठोकून तो अभ्यास करत बसला होता. माझी आई नेहमीप्रमाणे मला हातात घेऊन घरात फेऱ्या मारत होती. अचानक ती गॅलरीत आली आणि धाकट्याला कळण्याआत मला त्याच्या मांडीवर ठेवून म्हणाली, "थोडा वेळ बघ रे हिला! कंटाळलेय मी. माझी पाठ हिला फिरवून फिरवून गेलीये. खोलीत जाऊन जरा आडवी होते मी. ही फारच त्रास द्यायला लागली तर हाक मार." असं म्हणून गॅलरीचा दरवाजा ओढून घेऊन ती गेलीसुद्धा.

अचानक समोरासमोर आलेल्या दोन मांजरींसारखे आम्ही दोघं प्रसंगाचा अंदाज घेत एकमेकांकडे थोडा वेळ बघत राहिलो. पहिल्यांदा मी भानावर आले. हा आपल्या ओळखीचा माणूस नाहीये हे कळून मी चेहरा वेडावाकडा केला आणि सवयीनं रडायला सुरुवात करणार, एवढ्यात धाकट्यानं हातातलं पुस्तक अगदी हळू आवाजात वाचायला सुरुवात केली. हे काही तरी वेगळं होतं. रडण्याचा विचार रद्द करून मी ऐकायला लागले –

"माउली हा शब्द मराठी आहे. मराठीच्या नियमानुसार शब्दाचे अन्त्य अक्षर दीर्घ स्वरयुक्त असेल तर उपान्त्य अक्षराचा इकार किंवा उकार ऱ्हस्व असतो. शिवाय अपवादात्मक जोडशब्द वगळता – जसे, थालीपीठ – मराठीत दोन दीर्घ स्वर कधीही लागोपाठ येत नाहीत. माउली हा जोडशब्द नाही. त्यामुळे तान्हुली, बाहुली, वाकुली, सानुली ह्या शब्दांप्रमाणेच माउली ह्या शब्दातीलही उपान्त्य उ हे अक्षर ऱ्हस्वच हवे."

धाकट्यानं वाचन थांबवून डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहिलं. मी एकटक त्याच्याकडे बघत होते. काही रिकामे क्षण गेले आणि मी पुन्हा चेहरा वेडावाकडा केला. ही मी रडायला लागण्याची पूर्वसूचना आहे हे धाकट्याच्या लक्षात आलं. त्यानं हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि सरळ माझ्या डोळ्यात बघत तो म्हणाला –

"आता नदीच्या पात्राची रुंदी मोजायची असेल तर पहिल्या अबक त्रिकोणाची एक बाजू बक व तिच्या लगतचे कोन ब व अकब हे दुसऱ्या इडक त्रिकोणाची डक बाजू व तिच्या लगतचे कोन ड व इकड त्रिकोणाची बाजू व तिच्या लगतचे कोन ड व इकड यांच्याबरोबर असल्यामुळे हे त्रिकोण एकरूप आहेत. म्हणून इड मोजून अबचे माप मिळते. आलं लक्षात? रडून काय होणार? तुझ्या माउलीला त्रास तेवढा होईल, पण नदीची लांबीरुंदी तुला मोजता येईल का? तर नाही! गडकऱ्यांनी आपल्या दीड पानी नाटक ह्या प्रहसनात म्हटलंच आहे ना, की रडण्याने स्वतः रडणाराला काहीच फलप्राप्ती होत नसून निकटतरवर्ती जनसमुदायाला मात्र कर्णकर्कश रूदनध्वनीपासून महत्तम त्रास होण्याचाही संभव असतो."

बोलता बोलताच धाकट्यानं मला अलगद उचललं आणि विषय बदलून 'शाळेस रोज जाता' ही कविता गुणगुणत मला बाजूच्या आरामखुर्चीत ठेवलं. कविता पूर्ण होण्याआधीच मला झोप लागली आणि धाकटा आपल्या अभ्यासाला लागला.

किती वेळ गेला मला माहीत नाही. धाडकन दरवाजा उघडल्याच्या आवाजानं मी दचकून जागी झाले, तर समोर आई! बराच वेळ आपण रडलो नाही हे जाणवून मी मोठ्यानं गळा काढला. आईनं मला उचललं आणि ती तिथून निघून गेली. हवी होती तेवढी विश्रांती तिला मिळाली होती. धाकट्याकडे तिनं बघितलंसुद्धा नाही. त्याच्याही ते लक्षात आलं नाही. त्याचा वेळ मजेत गेला होता. आपल्याला हे काम आवडलंय ह्याचंच त्याला नवल वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यानंतर सर भेटले तेव्हा धाकट्यानं हे सगळं त्यांना सांगितलं. आपण काय वाचून दाखवलं तेही सांगितलं, तर सर हसायलाच लागले. त्यांना इतकं मनमोकळं हसताना धाकट्यानं पहिल्यांदाच पाहिलं. मग सर म्हणाले, "वा वा! छान! पण तिला काही कळत नसेल असं मात्र समजू नकोस. काही ना काही मनात पेरलं जातंच. तुला आनंद वाटतोय त्यात, तर कधी तरी त्यातून छान काही तरी उगवेलच."

...

मला धाकट्याच्या हाती सोपवण्याचा हा प्रयोग आईनं नंतर दोन तीन वेळा केला. तो यशस्वी झाल्यामुळे मला सांभाळणं हे धाकट्याचं रोजचं काम होऊन बसलं. त्याची काही तक्रार नव्हती. एकंदरीत आमचं दोघांचं गणित बरं जमलं होतं.

माझे बाबा दिवसाआड मला आणि आईला भेटायला यायचे. आपल्या चक्रम मेव्हण्याकडे थोड्या वेळासाठीसुद्धा मला सोपवणं त्यांना अजिबात पसंत नव्हतं. आईला विश्रांती मिळत होती आणि तिची तब्येत सुधारत होती म्हणून ते चालवून घेत होते इतकंच. पण आपली नाराजी न बोलता धाकट्यापर्यंत पोहोचवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.

दरम्यान बाहेरची आणीबाणी उठली होती, पण धाकट्याला शिक्षेतून सूट देण्याबद्दल आजोबा काही बोलत नव्हते. तोही स्वतःहून विषय काढत नव्हता.

...

नववीची वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेसाठी बाहेर जाणंही थांबलं. तरीही धाकटा आनंदात होता. घरात डांबल्यामुळे आपलं मन कडू झालं होतं हेदेखील तो विसरून गेला होता. शिवाय सरांनी सुट्टीत पुरतील एवढी मासिकं आणि पुस्तकं त्याला दिली होती. गच्चीत जाण्यावर बंदी नसल्यामुळे त्याचं वाचन सुरळीत चालू राहिलं होतं.

माझं उगीचच रडणंही आता कमी झालं होतं. आई अधूनमधून म्हणायचीच : "आईचे हात बोचतात होय गं तुला? त्याच्याशी बरं जमतं तुझं!"

एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे धाकटा गच्चीत वाचत बसला होता. जेवणाची वेळ टळून गेली तरी कुणाची हाक आली नाही. शेवटी तोच उठून खाली आला. आत्यानं दरवाजा उघडला. घरात सामसूम होती. कुणाचीच चाहूल नव्हती.

"ताई गेली मघाशी तिच्या घरी. जावई आले होते न्यायला. तुझे आई-बाबा गेलेत बरोबर. उशीर होईल म्हणाले...," आत्या म्हणत होती.

धाकटा जागीच खिळल्यासारखा स्तब्ध झाला. आपण आता काय करायचंय? गॅलरीत जायचंय आणि... आणि काही नाही. काहीसुद्धा नाही.

...

काही क्षणांनंतर तो गॅलरीत गेला. दिवा न लावता काही वेळ भिंतीला टेकून बसून राहिला. मग न जेवताच झोपून गेला.

...

धाकट्या मामाच्या दहावीच्या वर्षाची गोष्ट

आई मला घरी घेऊन गेल्यानंतर माझ्यासाठी फार नाही, थोडासाच बदल झाला. म्हणजे आठवड्यातून किमान दोनदा तरी मी आईबरोबर आजोळी जातच होते. उन्हाळ्याच्या संपूर्ण सुट्टीत धाकट्यानं घरातच असणं आईच्या पथ्यावर पडलं होतं. आजीबरोबर किंवा बाबांबरोबर तिला कुठं जायचं असलं की ती मला खुशाल धाकट्यापाशी ठेवून जात होती. धाकट्याच्या माझ्याशी एकतर्फी साहित्यिक गप्पा होतच राहिल्या होत्या.

...

सुट्टी संपली. शाळा सुरू झाली. आजोबांनी दिलेली शिक्षा धाकट्यानं बिनतक्रार पूर्ण केली होती. आता त्याची शाळेबाहेरची शाळाही पुन्हा सुरू झाली. दहावीच्या वर्षाचं त्याला काहीच कौतुक नव्हतं. जशी आठवी, नववी तशी दहावी. त्यामुळे त्याचं रद्दीचं दुकानही सुरू झालं. रविवारचा आणि इतर कुठल्याही सुट्टीच्या दिवसाचा कार्यक्रम मात्र धाकट्यानं बदलला. सकाळी लवकर बाहेर पडायचं ते थेट संध्याकाळी अंधार पडल्यावरच घरी परतायचं. शहरात आणि शहराबाहेरही कधी सायकलवरून तर कधी चालत दिवसभर भिरीभिरी भटकायचं. तीनचार वेळा तो तासाभराच्या अंतरावर असलेल्या गावांपर्यंतही जाऊन आला. 'काय मिळतं असं करून? परीक्षेत ह्याबद्दल प्रश्‍न विचारणार आहेत का?' ह्यापलीकडे तिसरा प्रश्‍न घरच्यांना पडत नव्हता. एकदाच मोठ्या मामानं विचारलं, "मग? दहावीचं वर्ष आहे; अभ्यास चाललाय की नुसतंच इकडेतिकडे?" त्यावर धाकटा फक्त गालात हसला.

...

रोज शाळा सुटल्यावर सरांचं भेटणं मात्र अनियमित झालं होतं. बऱ्याचदा त्यांच्याबरोबर पाचवीतली दोन मुलं असायची. सर त्यांच्याशी बोलण्यात गुंगून गेलेले असायचे आणि दोन्ही मुलं भारावून त्यांचं बोलणं ऐकत असायची. रोजच्याप्रमाणे हातात सायकल धरून वाट पाहत असलेल्या धाकट्याकडे सरांचं लक्षच नसायचं. त्या तिघांकडे बघताना धाकट्याला गंमत वाटायची. तेव्हापासून सर एकटे असले तरच तो त्यांच्याबरोबर जायचा. एकदोनदा त्यानं सरांची त्या मुलांवरून चेष्टाही केली. त्यावर ते निर्मळ हसले. म्हणाले, "अशी साखळी गुंफत राहावी लागते, बाबा! ती एकाच जागी अडकून राहिली तर मग पुढं अंधारच सगळा."

...

दहावीचं वर्ष संपलं. परीक्षा झाली. धाकट्याचं वर्षभरातलं एकूण वर्तन पाहता तो काही चमत्कार करून दाखवेल अशी कुणाला आशा नव्हतीच. नातेवाईक आणि शेजारपाजारचे तर तो दहावीला आहे हेच विसरून गेले होते.

निकालाचा दिवस उजाडला. धाकटा नेहमीप्रमाणे सकाळीच घरातून बाहेर पडला होता. संध्याकाळ झाली. आजोबा कामावरून आले. पाठोपाठ मोठा मामाही आला.

"अजून आला नाही धाकटा?" त्यानं विचारलं, "मी शाळेत जाऊन बघून येऊ का?"

"काही गरज नाहीये," आजोबा कोरड्या सुरात म्हणाले. "फोन आहे ना आता घरात? पण नसेलच काही सांगण्यासारखं तर कुठल्या तोंडानं कळवणार? कुणी काही करायची गरज नाहीये."

थोडा वेळ थांबून मामा गेला.

नेहमीच्या वेळी धाकटा घरी आला. आजोबा जेवण उरकून हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते, त्यांनी त्याच्याकडे बघितलंही नाही. कपडे बदलून धाकटा स्वयंपाकघरात गेला. आजी आणि आत्या जेवत होत्या. त्यानंही आपलं ताट वाढून घेतलं.

"काही बोलणार आहेस का?" आजीनं अखेर न राहवून विचारलं.

"कशाबद्दल?"

"निकाल! नक्की बसला होतास ना परीक्षेला?"

"ते होय! झालो पास... सगळ्या विषयांत."

"पास!" आजी पुटपुटली आणि गप्प बसली.

जेवण झालं. धाकटा हॉलमध्ये आला. पाठोपाठ आजीही येऊन दारात उभी राहिली.

"बाबा, दोनच मिनिटं टीव्ही बंद करू? बोलायचंय," धाकटा म्हणाला आणि आजोबांच्या उत्तराची वाट न बघता त्यानं टीव्ही बंद केला. मग त्यांच्यासमोर उभा राहून त्यांच्या डोळ्यांत बघत शांतपणे म्हणाला, "सगळ्या विषयांत पास झालोय. पण मी एक वर्ष ड्रॉप घ्यायचं ठरवलंय. एकच वर्ष. पुढं नक्की काय करायचं ते ठरवायला मला वेळ हवाय. नंतर मी करीन अकरावी, बारावी वगैरे. एवढंच सांगायचं होतं."

आजोबा काही म्हणतील, विचारतील म्हणून त्यानं थोडी वाट पाहिली. मग टीव्ही पुन्हा चालू करून तो आपल्या खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी शाळा सुटण्याच्या वेळी धाकटा शाळेच्या फाटकापाशी जाऊन थांबला. शाळा सुटली. सायकल हातात धरून येत असलेले सर त्याला दिसले. बरोबर ती दोन बाळं होतीच. पण आज मात्र दुरूनच सरांनी धाकट्याला पाहिलं. मुलांना काही तरी सांगून ते थेट धाकट्याकडे आले.

"बरं झालं आलास ते. चल," ते म्हणाले.

दोघं सायकली हातात धरून चालायला लागले. थोडं अंतर गेल्यावर धाकटा म्हणाला, "मी यंदा ड्रॉप घेणार आहे, सर. तसं मी घरी सांगितलंही आहे."

सर थोडा वेळ बोलले नाहीत. मग म्हणाले, "काहीच हरकत नाही. मन आणि बुद्धी ताजीतवानी होण्यासाठी आवश्यकच असतं ते. खरं तर माझ्यासारख्या शिक्षकांनाही असं करता आलं पाहिजे. सतत ताजं, टवटवीत राहता आलं पाहिजे. ते काही होणे नाही. पण तू निर्णय घेतला आहेस तर चांगला उपयोग कर त्याचा, काय!"

"हो, सर."

"येत रहा अधूनमधून."

"येईन आणि मासिकांची रद्दी मीच नेत जाईन. निदान ते दोन बालवीर सायकल चालवायला लागेपर्यंत तरी."

सर मोकळं हसले. नेहमीचं वळण आल्यावर धाकटा म्हणाला, "येऊ मी, सर?"

"एकच मिनिट थांब," असं म्हणत सरांनी आपल्या झोळीत हात घातला आणि दोन पुस्तकं बाहेर काढली. जुनी दिसत होती. "तुझ्यासाठी," धाकट्याच्या हातात ती देत सर म्हणाले. 'विशाखा' आणि 'स्पर्शाची पालवी'. धाकट्यानं 'विशाखा'चं कव्हरपान उलटून पाहिलं. "सर, हे काय! तुम्हाला भेट मिळालेलं पुस्तक मला का...."

त्याला थांबवत सर म्हणाले, "मुद्दामच तुला. माझ्या शिक्षिका होत्या त्या. मॅट्रिकच्या परीक्षेत मीही शाळेत पहिला आलो होतो तेव्हा त्यांनी हे मला दिलं होतं. दुसरं मी तुला दिलंय. जमेल तितके दिवस सांभाळ. नंतर देऊन टाक कुणाला तरी. तुझ्या भाचीला, उदाहरणार्थ."

"साखळी?"

"साखळी. निघतो मी."

...

धाकट्या मामाशी मी पहिल्यांदा बोलले त्याची गोष्ट

धाकटा मला काही वाचून दाखवतोय किंवा म्हणून दाखवतोय किंवा माझ्याशी नुसत्याच गप्पा मारतोय आणि जेमतेम तीन चार महिन्यांची मी ते मन लावून ऐकते आहे, असं दृश्य डोळ्यांसमोर आणण्याचा मी अनेकदा प्रयत्न करते. माझ्या मेंदूत काय घडामोडी होत असतील तेव्हा? धाकट्याचे सर म्हणाले होते तसं खरंच माझ्यात काही उतरलं असेल का? अनेकदा माझ्या नकळत मी ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा खेळ खेळत असते.

मध्यंतरी एक प्रसिद्ध फ्रेंच चित्रपट पाहिला. त्यात एक बाप बाथटबमध्ये बसलेला आहे. एका जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकाराबद्दलचं पुस्तक त्याच्या हातात आहे. त्याची रांगत्या वयाची मुलगी टबबाहेर बसलेली आहे आणि तो तिला पुस्तकातला गंभीर मजकूर गंभीरपणे वाचून दाखवतो आहे, असा प्रसंग होता. चित्रपटाची एकंदरीत प्रकृती पाहता तो प्रसंग मजेशीर वाटणारा होता. त्यामुळे प्रेक्षकांना खुदकन हसू आलं. माझा मात्र गळा दाटून आला.

आज मला जाणवतंय, की तेव्हा धाकटा मला ऐकायला शिकवत होता. ऐकायला आणि ऐकून घ्यायला. हे तो समजूनउमजून करत होता का ते मला नाही सांगता येणार. बहुधा नसावंच. आधी एकचित्तानं, मनःपूर्वक ऐकायचं आणि मग बोलायचं ही त्याची स्वतःचीच स्वाभाविक वृत्ती असेल. त्यामुळेच मीही उशिरा बोलायला लागले असणार.

त्याचं असं झालं, की जवळ जवळ दोन वर्षांची होईपर्यंत माझ्या तोंडातून रडण्याखेरीज दुसरा आवाज निघत नव्हता. अगदी गुदगुल्याच केल्या तर हसण्याचाही आवाज ऐकू यायचा, नाही असं नाही; पण एरवी माझं हसणं म्हणजे फक्त स्मित. अगदी तान्ही बाळंसुद्धा ता... ता... बा... दा... अशी एकाक्षरी बडबड करतात तशीही मी कधी केली नव्हती. डॉक्टर म्हणत होते की घाबरू नका, असं होतं कधी कधी. पण तरीही मला समोर बसवून नाना प्रकारचे आवाज आणि हातवारे करून मला बोलती करण्याचे आटोकाट प्रयत्न घरात सुरू होते. त्यात आजीनं तिसरीच रेकॉर्ड लावली होती : "हिचं लग्न कसं होणार!" आधीच घाबरून गेलेल्या माझ्या आईचं त्यामुळे धाबं दणाणलं होतं. माझ्या तोंडून एखादं अक्षर, एखादा शब्द निघालाच तर तो आपल्याला कळणार नाही ह्या भीतीनं ती मला क्षणभरही नजरेआड होऊ देत नव्हती. त्यामुळे आजोळी गेल्यावरही धाकट्याची आणि माझी निवांत गाठच पडेनाशी झाली होती. ना वाचन ना गप्पा. सगळंच थांबलं होतं.

अशीच एकदा मी आईबरोबर आजोळी गेले होते. स्वयंपाकघरात ती आजीबरोबर बोलत बसली होती आणि मी तिच्या पाठीला रेलून तिच्या पदराशी चाळा करत उभी होते. तेवढ्यात धाकटा आपल्या खोलीतून बाहेर पडून हॉलकडे जाताना मला दिसला. त्याच्या हातात काही तरी होतं. मी त्याच्या मागे गेले. बाहेरच्या दरवाजापाशी एक छोटी हॅन्डबॅग ठेवलेली होती आणि बाजूच्या खुर्चीवर बसून धाकटा पायात मोजे घालत होता. जाऊन मी बॅगेकडे बघत उभी राहिले.

"बॅग आहे ती. तिच्यात कपडे आहेत; टॉवेल, टूथब्रश, साबण आहे. मी गावाला चाललोय ना म्हणून ती बरोबर नेणार आहे," खाली पाहून बुटाची लेस बांधता बांधता धाकटा सांगत होता.

"तू परत कधी येणार?" मी विचारलं.

धाकट्याच्या हातांची हालचाल काही क्षण थांबली. मग वर न पाहता जरा मोठ्यानं त्यानं हाक मारली, "ताई गं, जरा बाहेर येतेस?"

हाक ऐकून आई दचकली. तिनं वळून पाहिलं तर मी मागे नव्हते. ती उठली आणि घाबऱ्या घाबऱ्या बाहेर आली. दुसऱ्या बुटाची लेस बांधत धाकट्यानं मला विचारलं, "काय म्हणत होतीस गं? मी ऐकलंच नाही. पुन्हा सांग."

"तू परत कधी येणार?"

"दोन दिवसांनी. का गं?"

"मला गोष्ट ऐकायची आहे."

"आल्यानंतर सांगेन, नक्की. आता निघतो मी. बस निघून जाईल नाही तर," धाकटा आईकडे बघत म्हणाला आणि बॅग उचलून दरवाजाबाहेर पडला.

"मामा, टाटाऽऽ!"

"टाटाऽऽ!"

जन्माला येताना बोलतच आल्यासारखं मी सहज बोलले होते. शब्दांचे स्पष्ट, स्वच्छ उच्चार. आईचे डोळे विस्फारलेले होते, एक हात तोंडावर होता आणि तिचा श्‍वास वरचा वरच राहिला होता. सिच्युएशन तशी जरा फिल्मीच होती. आईचे डोळे भरून आले. खाली बसून तिनं मला जवळ ओढलं, माझ्या गालांचे पापे घेतले. तेवढ्यात आजीही बाहेर आली. आईनं आपले डोळे पुसत तिला जे झालं ते सांगितलं.

"बघ, म्हणत नव्हते मी? चला, एक काळजी मिटली," आजी म्हणाली. मग तिनं आत जाऊन साखर आणली आणि आम्हा दोघींच्याही तोंडात एकेक चिमूट घातली.

"कशी आहे गं साखर?" आईनं मला विचारलं.

"गोड आहे!" मी म्हणाले.

आईला पुन्हा रडण्याचा उमाळा आला. मग आजीनंच आजोबांना आणि बाबांना फोन करून बातमी सांगितली.

आईचं रडणं आणि मुसमुसणं आलटूनपालटून चालूच होतं. थोड्या वेळानं आजीच वैतागली. "पुरे की तुझं! आनंदाश्रू वगैरे ठीक आहे, पण किती! गप आता."

"मला गंडवलं हिनं, आई," ती रडतच आजीला म्हणाली, "मला तिचं बोबडं बोलणं ऐकायचं होतं गं! किती प्रयत्न केले आम्ही; पाहिलंयस तू. जाम दाद दिली नाही बयेनं. आज अचानक स्पष्टच बोलली. बरं, बोलली तर बोलली, पण माझ्याशी नाही, त्याच्याशी... धाकट्याशी बोलली. मला वाटलं होतं की हिच्या तोंडून आई हाच शब्द पहिला निघेल. पण ही...." आई आता सरळ हुंदकेबिंदके देऊन रडायला लागली.

...

गेल्याच वर्षी आई गेली; पण शेवटपर्यंत ह्या गुन्ह्याबद्दल तिनं मला माफ केलं नाही.

...

धाकट्या मामाच्या एकतर्फी पत्रसंवादाची गोष्ट

धाकट्याची आणि माझी भेट आई मला आजोळी घेऊन जायची तेव्हाच होत असे. भेट तरी म्हणावं का हा प्रश्‍नच आहे. कारण तो घरात असला तर आम्ही आल्यानंतर थोड्याच वेळात बाहेर निघून जायचा. अशा वेळी 'परत कधी येशील?' असं मी विचारलं की तो नुसतंच हसायचा. कधी आम्ही जायचो तेव्हा तो घरात नसायचा. थोड्या वेळानं जरी आला तरी सरळ आपल्या खोलीत जाऊन बसायचा. "अभ्यास करतोय तो. त्रास देऊ नकोस," म्हणत आई मला तिकडे जाऊ द्यायची नाही. हे झालं आजोळचं. आमच्या घरी कधी तो आल्याचं मला तरी आठवत नाही.

हे कौटुंबिक मत्सरनाट्य फारच बालीश होतं. धाकट्याला त्याचा कंटाळा यायला लागला होता. एक दिवस त्यानं घर सोडलं, शहरही सोडलं. बहुधा तो दिल्लीला शिकायला म्हणून गेला. काय शिकायला ते त्यानं सांगितलं नाही आणि कुणी त्याला विचारलंही नाही. ('आम्हाला काय कळतंय त्यातलं! आम्ही आपली साधी माणसं...' इ. इ. इ.) सुट्टीत कधी तरी काही दिवस यायचा. नंतर तेही बंद झालं. तेव्हापासून आजतागायत तो आम्हाला दिसलेला नाही. आजोळची आजी म्हणायची की तो परागंदा झालाय. माझा विश्‍वास नाही त्यावर. कारण मला तो पत्र लिहायचा. वर्षात एखादंच, पण लिहायचा. त्यात स्वतःबद्दल काहीच नसायचं. त्याचा ठावठिकाणा, काम, मित्रमैत्रिणी असं काहीच नाही. वाचलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं असं काही काही असायचं. एका पत्रात 'कलकत्त्याला जाताना बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये बिस्मिल्लाखाँसाहेब होते. इतका लांबचा प्रवास त्यांच्याशी गप्पा मारताना कसा संपला, कळलंच नाही' असं लिहिलं होतं. कधी वाचलेल्या पुस्तकांची फक्त नावं असायची. कधी शेंडाबुडखा नसलेलं एखादंच वाक्य असायचं : 'मी जिथे नाही आहे अशा ठिकाणीच मी जास्त सुखी असेन', किंवा 'चिनी माणसं किती वाजले ते मांजराच्या डोळ्यांत बघून सांगतात', असं काहीही. लिफाफ्यावर घराचा पत्ता असायचाच, आणि मागच्या बाजूला 'परत कधी येशील असं मला नेहमी विचारणाऱ्या मुलीसाठी' हे वाक्यही असायचंच.

मध्ये तीन-चार वर्षं एकही पत्र आलं नाही. मग एक दिवस अचानक आलं. 'तुझ्याकडे अ‍ॅटलास असेलच. नसेल तर विकत घे. त्यात क्यूबा नावाचा देश शोध. तिथं मी तुझ्या दिशेनं 'हॅलो' म्हणत हात हलवत उभा असेन.'

क्यूबा? तिकडे कसा पोचला हा? आणि कशासाठी? धाकटा मामा नक्की करतो तरी काय? ह्या प्रश्‍नांची उत्तरं कधीच मिळणार नाहीत आपल्याला?

माझ्याकडे अ‍ॅटलास नव्हताच, पण मी एक विकत आणला. त्यात तो क्यूबा नावाचा देश शोधून काढला. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या त्या अनोळखी देशाच्या नकाशाकडे पाहत हात हलवून 'परत कधी येशील?' असा प्रश्‍नही पुटपुटत विचारला.

...

धाकट्याचं शेवटचं पत्र आलं त्याला काही वर्षं झाली आहेत. जिथे कुठे तो असेल तिथे त्याला हवं तसं जगता येत असेलच. माझी खात्री आहे. जिथे त्याला जास्त सुखी असता येईल अशा ठिकाणाचा शोध घेणंही चालूच राहील, पण ते ठिकाण त्याला कधीच सापडू नये अशी इच्छा आहे.

...

एकच प्रश्‍न मीही चिवटपणाने त्याला विचारत राहीन : 'परत कधी येशील?'

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

गोष्टी छान आहेत, एकंदरीत आवडल्या. (तूर्तास अधिक खोलात न शिरण्याचे ठरविले आहे, परंतु थीम छान आहे.)

मात्र, याचा आफ्रिकेशी नक्की संबंध (क्यूबा - अंगोला असला काहीतरी बादरायणस्वरूपाचा असल्याखेरीज) समजला नाही. तसेच, भारतीय मनुष्य (ऑफ ऑल द प्लेसेस) क्यूबात जाऊन कशाला (आणि, मुख्य म्हणजे, नक्की कसा) कडमडेल, याबद्दल प्रचंड कुतूहल जरी वाटले, तरीसुद्धा, खुद्द नायिकेस या बाबतीत काही कल्पना नसल्याची बतावणी करून ही बाब लेखिकेने मोठ्या खुबीने गुलदस्तात ठेवलेली आहे, तथा त्याबद्दल काही विचारायची सोय ठेवलेली नाही. (तरीसुद्धा, ‘धाकटा मामा’ ‌अद्याप क्यूबाला (स्थानिकांच्याप्रमाणे) ‘कूबा’ म्हणायला लागलेला नसून ‘क्यूबा’च म्हणतोय, याचा अर्थ (१) तो नुकताच तेथे टपकला असणार, तथा (२) अद्याप तेथे फारसा रुळला नसणार, असा तर्क बांधावयास मुबलक जागा आहे. अन्यथा, ‘धाकट्या मामा’ची एकंदर ‘पर्सनॅलिटी’ लक्षात घेता, त्याला माहीत असूनसुद्धा तो या बाबतीत काटेकोरपणा बाळगणार नाही (आणि तोसुद्धा ‘मामाची भाचीस पत्रे’ प्रकारच्या (नेहरूछाप) पत्रांतून), यावर विश्वास बसत नाही.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र, याचा आफ्रिकेशी नक्की संबंध (क्यूबा - अंगोला असला काहीतरी बादरायणस्वरूपाचा असल्याखेरीज) समजला नाही.

अनुक्रमणिकेत 'संकल्पनाविषयक' विभागात या गोष्टी दिसतायत का तुम्हाला?

खुद्द नायिकेस या बाबतीत काही कल्पना नसल्याची

निवेदिका ही कथानायिका वाटतेय का तुम्हाला?

असो. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा! काय लिहिलं आहे!

अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुमच्या लेखनातली सहजता फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज सुंदर आणि अतिशय हृद्य!
खूप आवडला हा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर सुंदर लिहीलंय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक ते पोलिसांची भाषा, जरा ब्लॅकनव्हाईट मराठी चित्रपटातल्या पोलीसांसारखी फिल्मी वाटते, तेवढे सोडले तर कथा उत्तम झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

छान लिहिले आहे... आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा वाचायला घेतल्यावर मध्ये सोडणं शक्यच नव्हतं. अत्यंत ह्रुदयस्पर्शी आणि चित्तवेधक रेखाटन! आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0