समाजाची उत्क्रांती

नगरीनिरंजन यांच्या जुलूस या लेखातल्या प्रतिसादाला प्रतिक्रिया लिहायला घेतली आणि वाहावलो. मूळ लेखापेक्षाही मोठा प्रतिसाद होत असेल तर काहीतरी बरोबर नाही असं मला आपलं वाटतं. म्हणून हा लेख म्हणूनच प्रसिद्ध करतो आहे.

हाच परिच्छेद नुकतेच जंगलभागातून किंवा आडगावातून शहरात विस्थापित झालेल्या माणसाला क्रूर वाटेल.

मला हा लेख वरच्या १०-२० टक्क्यांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करणारा वाटला. 'प्रगतीने साधलेली फळं मला मिळाली खरी, पण या या गोष्टी हरवून बसलो' हा विचार तुमचा-आमचाच असतो. ज्यांची प्रगती झालेली नाही त्यांना फार वेगळे आणि मोठे प्रश्न असतात.

तुमच्या लेखनात मार्केट हा शब्दप्रयोग आला असला तरी रोख प्रगतीसाठी जे जे करावं लागलं त्या सर्वांवर - एकंदरीत व्यवस्थेवर दिसतो आहे. रूढ अर्थाने प्रगती (आयुर्मान वाढणं, सुबत्ता वाढणं, मोकळा वेळ वाढणं, रोगराई कमी होणं, शिक्षणाचं प्रमाण वाढणं इ. इ.) झाल्यामुळे काही प्रश्न सुटले. तुम्ही म्हणता तसे प्रश्नही निर्माण झाले. विचार करण्याचा मुद्दा असा की हे प्रश्न सुटल्यामुळे जो फायदा झाला, तो इतर प्रश्न निर्माण झाल्याने होणाऱ्या तोट्यापेक्षा प्रचंड मोठा आहे का? थोडक्यात या सर्व 'व्यवस्थे'तून होणाऱ्या फायद्यापेक्षा तोटेच निर्माण झाले का?

तुम्ही तशी जागा शोधण्याबद्दल ज्या अटी मांडलेल्या आहेत त्यावरून तुमचे स्टॅंडर्ड्स खूपच वरचे आहेत असं दिसतं. (हेही वरच्या वीस टक्क्यांचं लक्षण आहे. असो.) तर घटकाभर धरून चालू की तुम्हाला अशी आखुडशिंगी बहुदुधी जागा मिळाली. आणि एकटेच नाही तर तुम्ही चांगली पन्नास कुटुंबं प्रत्येकी दोन दोन एकर जागा घेऊन तिथे रहायला गेलात. पुढच्या काही वर्षांत काय होईल?

पहिली गोष्ट तुमच्या ताबडतोब लक्षात येईल ती म्हणजे स्वच्छता राखणं तितकं सोपं नाही. आपण जे दररोज दात घासणं, आंघोळ करणं, दाढी करणं, शॅंपू लावणं गृहित धरतो ते मिळणार नाही. निव्वळ नदीच्या पाण्यात आंघोळ करून आणि तिथेच कपडे धुवून (तुम्ही थोडे बरोबर घेऊन जालच बहुतेक) पुरेशी स्वच्छता रहात नाही. प्रातर्विधी उरकण्यासाठी तुम्हाला दररोज कुठेतरी लांब जावं लागेल. भर पावसात देखील.

दुसरी गोष्ट म्हणजे खाणार काय? यावर अर्थात उत्तर आहे की जमिनीतून पिकवू, रानातून गोळा करू, आणि गाईम्हशींचं दूध काढू. एवढ्यासाठी तुमचे दोन एकर, आणि एखादी गाय, दोनचार कोंबड्या पुरतील. पण ते वाटतं तितकं सोपं नाही. इथे मी तुमच्या खाद्यपदार्थांत किती व्हेरिएबिलिटी येईल वगैरेचा विचारही करत नाही - कारण तो तुम्हाला शिवणारही नाही. पहिलं वर्षभर पुरेल इतकं अन्न घेऊन गेलात तरी पुढच्या वर्षी किती पीक येईल सांगता येत नाही. दरवर्षी पावसावर अवलंबून राहिलात तर एका दुष्काळात तुमचा नायनाट होऊ शकेल.

वस्त्र आणि निवारा याबाबतही प्रश्न निर्माण होईलच. कदाचित तुम्ही सगळे मिळून सगळ्यांची घरं बांधाल. पन्नास कुटुंबांनी मिळून पन्नास घरं बांधायची झाली तर तुम्हाला काहीतरी स्पेशलायझेशन करणं सोयीचं ठरेल. म्हणजे कोणीतरी लाकडं तोडून आणणार, कोणीतरी आखणी करणार, कोणीतरी कामकऱ्यांसाठी खाणं तयार करणार... कोणीतरी शेती करणार. कारण सगळ्यांनीच सगळी कामं करणं सोयीचं ठरणार नाही. ते जमणारही नाही.

दरम्यान तुम्हाला जंगली प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं हाही प्रश्न पडेल. निसर्गाच्या सान्निध्यात जायचं तर सगळे धोके पत्करावे लागतातच. कदाचित पहिल्या काही वर्षांत तुमच्यापैकी काही जण सर्पदंशाने, विंचू चावल्याने, लांडग्यांनी मारल्यामुळे मरतीलही. पण सगळ्यात धोकादायक प्राणी म्हणजे जीवाणू आणि विषाणू. अत्याधनिक स्वच्छतेची साधनं (शुद्धिकृत पाणी, साबण, संडास, बाथरूम) वगैरे नसल्यामुळे रोगांच्या साथी येतील. मग तुमच्यापैकी कोणीतरी अनुभवी माणूस रोगांवर ट्रायल ऍंड एररने सापडलेले उपाय सुचवेल. त्याचा सल्ला मानून जीव वाचलेले काही त्याला मान देतील. कदाचित आपल्याकडचं स्पेशल खाणं देतील. तो माणूस कदाचित आपला अभ्यास चालू ठेवेल, आपलं ज्ञान मुलांना देईल. आणि त्याची मुलं त्यात आणखीन सुधारणा करतील, स्वतः नवीन गोष्टी शोधून काढतील.

मग काही वर्षांनी टक्के-टोणपे खाऊन तुमच्यापैकी शिल्लक असलेले काहीतरी व्यवस्था तयार करतील. कामाच्या जबाबदाऱ्या वाटल्या जातील. सगळेच जण आपापली कामं करतीलच असं नाही. मग तुम्हाला काहीतरी शिक्षा देण्याची व्यवस्था करावी लागेल. कारण नाहीतर प्रत्येकालाच सगळीच कामं करावी लागतील, आणि ते इतकं त्रासदायक असेल की त्यापेक्षा सगळ्यांनीच आपापल्या वाट्याची कामं करण्याची व्यवस्था चालवणं खूपच फायद्याचं ठरेल. मग त्यासाठी ही व्यवस्था राबवण्याचं थोडं काम वाढलं तरी चालेल.

आणि हो कपड्यांचं काय? प्रत्येकालाच आपल्या दोन एकराच्या तुकड्यात थोडा थोडा कापूस लावून त्याचे धागे काढून आपल्यापुरते कपडे तयार करणं फारच वैतागाचं होईल. जरी तशी सुरूवात झाली तरी काही वर्षांतच लक्षात येईल की काही विशिष्ट लोकांना हे तंत्र जास्त चांगलं साधलेलं आहे. त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त कापूस आहे, तुमच्या शेतात तितका आला नाही. मग तुम्ही म्हणालच, की हे बघ, माझ्याकडे गहू भरपूर झालाय. तू मला कापूस दे, मी तुला गहू देतो. काय? तसं नाही केलंत तर तुम्ही थंडीने आणि तो भुकेने मराल. मग पुढच्या वर्षी तुम्ही कापूस पिकवण्याच्या फंदात न पडता गहू पिकवाल, आणि तो गडी गहू न पिकवता कापूस पिकवेल. तिसरा कोणीतरी नंतर येईल आणि म्हणेल की तू एवढा गहू का देतोस त्याला? मी तुला तेवढाच कापूस ८०% गव्हात देतो. आणि मग तुम्हाला हा सौदा निश्चितच आवडेल. तुम्ही लोभी आहात म्हणून नाही. तुम्हाला त्या वीस टक्के गहू देऊन तुमचं मोडकं घर दुरुस्त करण्यासाठी मदत घेता येईल.

गहू कसा पिकवायचा याचा वर्षानुवर्षाचा अनुभव तुमच्या गाठी येईल, आणि तुम्ही तुमच्या मुलांकडे तो द्याल. ती त्यांच्या मुलाकडे देतील. तेवढ्याच जमिनीतून, तेवढ्याच कष्टांत कदाचित अधिक गहू पिकत जाईल. गव्हाची उपलब्धता वाढेल. सगळ्यांनाच अधूनमधून पोळ्या खाता येतील. किंवा पुरेसा गहू पिकवण्यासाठी कमी कमी जमीन, कमी कमी माणसं लागतील. मग कोणी मध साठवायला लागेल. कोणी रेशमाच्या किड्यांपासून धागे तयार करायला शिकेल.

वर्षानुवर्षं जातील. तुमच्या बायकांना मुलं होणं तुम्हाला थांबवता येणार नाही. प्रत्येकीची सात-सात आठ-आठ बाळंतपणं होतील. आणि त्या लवकर मरतील. जन्मलेल्या मुलांपैकीही एक तृतीयांश पाच वर्षांच्या आत मरतील. उरलेल्यातली निम्मी दहा-पंधरा वर्षांची व्हायच्या आत जातील. शेवटी प्रत्येक जोडप्यामागे साधारण दोन मुलं शिल्लक रहातील. आणि लोकसंख्या काही पिढ्यांनंतर स्थिरावेल. पण त्यासाठी सर्व स्त्रियांना वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत साताठ बाळंतपणांतून जावं लागेल. त्यातल्या कित्येक जणी त्याआधीच दगावतील. पण दगावल्या नाही तरी त्यांचं आयुष्य मुलांभोवती घोटाळेल. त्यांना जन्म देणं, जगवण्याचा प्रयत्न करणं, आणि अल्पवयातले मृत्यू बघणं यापायी त्या घरातच अडकतील. मग घरची कामं बायकांनीच करायची, बाहेरची कामं पुरुषांनीच करायची. निसर्गाच्या सान्निध्यात राहाण्याच्या स्वातंत्र्यापायी हे बंधन स्वीकारावं लागेलच.

काही पिढ्यांनी वडिलांकडून मुलाकडे कारभार चालत येत राहील, मध काढणारे मधमाशा पाळायला लागतील. कपडे तयार करणाऱ्यांतही सूत कातणारे वेगळे, त्याचं कापड करणारे वेगळे आणि त्यापासून कपडे शिवणारे वेगळे बनतील. याचा फायदा सगळ्यांनाच होईल. कारण पिढ्यानपिढ्यांचं ज्ञान नवीन मुलाला मिळेल. शंभर वर्षांपूर्वी कापूस पिकवणं, सूत कातणं, ते कसंतरी एकत्र करून कापड करणं, आणि त्याचा कपडा बनवणं हे प्रत्येकच करायचा. आता या प्रत्येक बाबतीत कुशल असलेले लोक हे काम विभागून करतील. अर्थातच तयार होणाऱ्या कपड्यांची संख्या आणि प्रत अधिक चांगली असेल. तुम्हा सर्व कुटुंबांना अधिक चांगले कपडे मिळण्यासाठी प्रत्येकाने नक्की कसला त्याग केला? स्वतःचे कपडे स्वतः कापूस पिकवून शिवण्याच्या स्वातंत्र्याचा. पण हे स्वातंत्र्य आहे की जबाबदारी? तुम्ही जर कापूस पिकवणारांपैकी असाल तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुमची जबाबदारी एकच काम करण्याची झाली आहे. आणि तुम्ही जसे इतरांवर अवलंबून आहात, तसेच इतरही तुमच्यावर अवलंबून आहेत. हे एक महाप्रचंड जाळं आहे. एकमेकांना बांधणारं. जोपर्यंत काही कारणाने सगळेच धागे एकदम तुटत नाहीत, तोपर्यंत ते सगळ्यांनाच सुरक्षा जाळं म्हणून काम करतं. एक प्रकारचं स्वातंत्र्य देतं.

या जाळ्याची वीण पक्की असणं जाळ्याच्या प्रत्येक धाग्यासाठी फायद्याचं आहे. मग या फायद्यातून जी संसाधनं मुक्त होतात त्यातली काही संसाधनं हे जाळं पक्कं राहील याची काळजी घेण्यासाठी वापरता येतात. चार शहाणी, अनुभवी माणसं ज्यांचा शब्द सगळे मानतात, ते हे जाळं पक्कं रहावं म्हणून काही नियम करतील. हे नियम पाळणं सगळ्यांनाच फायद्याचं ठरतं. हे नियम आत्ताच्या वैज्ञानिक निकषांवर उतरलेले असतीलच असं नाही, पण त्या त्या काळी ते होण्यासाठी निश्चितच काही कारण असणार. "डुक्कर खाऊ नये" "गाय मारू नये" वगैरे नियम अशा तत्कालीन परिस्थितीतूनच आलेले असतात. कदाचित त्या काळी गुराख्यांमध्ये गायी खाण्याची हौस वाढल्याने गायींची संख्या कमी होत असेल. कदाचित दुध आणि मांस यांच उत्पादन, गरज, मागणी आणि किंमत या शॉर्ट टर्ममध्ये फायदेशीर ठरणाऱ्या समीकरणांचा दूरगामी परिणाम धोकादायक असेल. कोण जाणे. पण असे नियम येतात हे खरं. जाळ्याची वीण घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करणारे असे नियम गोळा करतील आणि त्या नियमांचं संकलन करतील. हे तुम्हा पन्नास कुटुंबांच्या नातवंडांत, पंतवंडात कधीतरी होणारच.

जाळ्याची वीण घट्ट ठेवण्याचे प्रयत्न करणारे असतात त्याप्रमाणेच या नाजूक जाळ्याचं इतर शत्रूंपासून रक्षण करणारेही असतात. त्यांची या जाळ्याला गरज असते. समजा तुम्हा पन्नास कुटुंबांप्रमाणे इतर कोणी तुमच्या बाजूच्याच शंभर एकरांवर स्थिरावलं. आता त्यांच्याकडे नाही चांगली पिकं आली. आणि ते तुमच्या शेतांमध्ये घुसून तुमचं पीक पळवायला लागले. सीमेवरचे शेतकरी एकट्याने मुकाबला करू शकत नाहीत, कारण पंचवीस लोक येतात. बरं सीमेवरच्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही कारण ते देशोधडीला लागले, भुकेने मेले तर आतल्यांचीही तीच गत होते. तेव्हा आख्ख्या समूहालाच याची काळजी करावी लागते. मग संरक्षणासाठी काही लोकांना बोलवावं लागतं. कुंपणं उभारावी लागतात. आणि आलेल्या लुटारूंना जरब बसवण्यासाठी मारामारी करावी लागते. प्रसंगी काही जीव घालवावे लागतात. कधीकधी इतर पन्नास कुटुंबांची गरज नसते. तुमच्यातलेच पंचवीस विरुद्ध पंचवीस अशी मारामारी होऊ शकते. निदान ती एकांगी तरी होत नाही. कधी दुर्दैवाने चाळीस विरुद्ध दहा अशी होते. चाळीस कुटुंबं उरलेल्या दहांना मारून अधिक श्रीमंत होतात. त्यांच्या पोरांसाठी जास्त संसाधनं होतात. मग लोकसंख्या वाढते, आणि पुन्हा इक्विलिब्रियम तोच येतो. पण आपण सगळे एक, आणि आपल्या संरक्षणासाठी आपली फौज हे पक्कं भिनतं.

आपण सगळे एक म्हणताना अर्थातच ही एकात्मता राखण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्या सगळ्यांच्या भोवती काही भिंती उभाराव्या लागतात. आतले आणि बाहेरचे असे भेद होतात. आतल्या समाजाच्या रूढींचं पालन करावं लागतं. यात अर्थातच आपल्या मनासारखं वागण्याचं स्वातंत्र्याचा थोडा त्याग करावा लागतो. पण कोणीही केव्हाही येऊन लुटून आपल्याला नष्ट करण्यापेक्षा ते कायमच परवडतं. जगण्याचं स्वातंत्र्य हे मनासारखं वागण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा केव्हाही महत्त्वाचं ठरतं.

दरम्यान तुम्ही नाही, पण तुमचे वंशज एकमेकांबरोबर वस्तूंची देवाणघेवाण करत असताच. आता या वस्तूंची संख्या वाढलेली असते. आणि बरोब्बर आपल्या गरजा आणि दुसऱ्याच्या गरजा पूरक असण्याची शक्यता कमी झालेली असते. तुमच्याकडे गहू जास्त आहे, आणि तुम्हाला कापड हवं आहे. कारण तुमच्याच कुटुंबातला एक जण कपडे शिवण्याचा व्यवसाय करतो. मात्र ज्याच्याकडे कापड आहे त्याला गव्हाची गरज नसून तांदूळ हवा आहे. आता झालं, तुम्हाला आधी गहू घेऊन तांदूळ देणारा माणूस शोधायला हवा. ज्याला खरोखरच गहू हवा आहे, त्याला मात्र तंबाखूची गरज आहे. प्रत्यक्ष वस्तू बनवण्याला लागणाऱ्या कष्टांच्या तुलनेत योग्य माणूस शोधण्याचेच कष्ट फार व्हायला लागतात. मग कोणीतरी सर्वांना गरज असलेली, महाग असलेली, नष्ट न होणारी वस्तू शोधतं. उदाहरणार्थ सोनं, किंवा चांदी. यांची सगळ्यांनाच गरज असण्याची गरज नाही. कोणालातरी असायला हवी. मग तुम्ही म्हणू शकता, बाबारे, तू गव्हाच्या बदल्यात मला सोनं दे. ते मी साठवून ठेवू शकतो. आणि हवं तेव्हा त्याच्या बदल्यात इतर वस्तू घेऊ शकतो. सगळ्यांनीच सोनं मान्य केलं की सगळ्यांचीच ही कटकट वाचते. जाळ्याची वीण घट्ट ठेवणाऱ्यांच्या कामात या विनिमयाच्या मूल्यमापनाचीही भर पडते. पण शंभर लोकांचा ५% वेळ आणि कष्ट वाचवण्याच्या बदल्यात दोघांना संपूर्ण वेळ यातच घालवणं केव्हाही सर्व समाजाला फायद्याचं ठरतं.

तुम्ही मूळची पन्नास कुटुंबं अत्यंत सभ्य असाल. मात्र तुमची मुलं किंवा विशेषतः इतरांची मुलं तितकी चांगली रहातीलच असं नाही. शिवाय परिस्थिती बिकट झाली की काय करणार? चोरी, खून, मारामाऱ्या होतातच. समाजात चोऱ्यामाऱ्या होणं चांगलं नाही. त्यांना अटकाव केला नाही तर कोणाचीच संपत्ती सुरक्षित रहाणार नाही. त्यामुळे त्यावर काहीतरी उपाययोजना करणं पुढच्या पिढ्यांना भाग पडतं. नक्की चोरी कोणी केली हे शोधून काढणं, त्या चोराला शिक्षा देणं हे काम कोणालातरी करावं लागतंच. नाहीतर कोणीच काम करणार नाही, सगळेच चोऱ्या करतील आणि अनागोंदी माजेल. तुमच्या समाजाने जी जी स्वातंत्र्यं मिळवली ती सगळी उघड उघड चोरीला जातील. ते टाळण्यासाठी समाजाची काही संसाधनं या कामासाठी राबवावी लागतात.

अशा गोष्टी होताना इतर चांगल्या गोष्टीही घडत असतातच. या संपन्नतेपोटी काही लोकांना आपले छंद करायला वेळ मिळतो. काही जण नुसतीच मजा मारतात. काही लोक काहीतरी उपयुक्त शोधून काढतात. म्हणजे विशिष्ट संसर्गजन्य रोग कशामुळे येतात हे काहींना कळतं. किंवा कोणीतरी चाक, तरफ वगैरे गोष्टी शोधून काढतो. काही जण विहिरी खणून काढतात. समाजाला समृद्ध करणारे नवीन उद्योग निर्माण होतात. यंत्रं तयार होतात. शेताला पाणी आणायचं तर मैलभर लांबच्या नदीतून पाट काढून किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून रहाण्याची गरज उरत नाही. विहीर खणून तीमधून रहाटाने पाणी काढता येतं. मळा जोमाने फुलतो. तुमचा फायदा होतो, आणि सर्वांनाच भाज्या जास्त मिळतात. या भाज्यांवर अधूनमधून पडणाऱ्या कीडीवर कोणीतरी औषध तयार करतो. तो फवारा मारला तर कीड मरते, माणसं मरत नाहीत. कदाचित त्यातून काही दशकांनी काही लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता वाढत असेल. मात्र एका वर्षाचं आख्खं पीक गेल्याने जो आख्ख्या समाजाला तोटा होतो त्यातून कायमची मुक्ती होते. स्वातंत्र्य वाढतं, धोका कमी होतो.

पिढ्यान पिढ्या औषधं देणाऱ्याच्या खापर खापर पंतवंडांनी त्यांचं शेत तुमच्या खापर खापर पणजोबांना केव्हाच विकलं. कारण तुमच्याकडे गहू पिकवण्याचं ज्ञान होतं, तर त्यांच्याकडे औषधं देण्याचं. निव्वळ औषधांच्या ज्ञानावर आता त्यांना जगता येतं. मुरब्बी वैद्याने कसाबसा गहू पिकवणं म्हणजे समाजाच्या संसाधनांचा दुरुपयोगच. त्यात सगळ्या समाजाचा तोटा होतो. त्यापेक्षा तुमच्या कुटुंबाला दुप्पट जमिनीवर गहू पिकवण्यात जास्त फायदा आहे.

अजून किती पिढ्या पुढे गेलं की वाफेचं इंजिन, औद्योगिक क्रांती, कॉंप्युटर आणि शहरीकरण येतं हे माहीत नाही. नक्की कधी अचानक समाज बदलतो माहीत नाही. या सगळ्या व्यवस्थांमधून डॉक्टर, वैज्ञानिक, न्यायाधीश, सरकार, पोलिस, धर्म, नोकरशाही, शिक्षणसंस्था, वित्तसंस्था, मार्केट - एकंदरीतच संस्कृती किंवा सिव्हिलायझेशन कधी उगवते माहीत नाही. वरच्या वर्णनात या सर्वांची मुळं धरताना दिसतात, पण त्यांचे स्वतंत्र वृक्ष कधी होतात? ज्याला आपण 'व्यवस्था' म्हणतो, ती कधी घडते? कालांतराने, एवढंच म्हणता येतं. स्त्रियांची बाळंतपणं-चूल-मूल यांतून मुक्ती होते, शिक्षणाचा प्रसार होतो, आयुर्मान वाढतं, सुबत्ता वाढते, गुन्हे कमी होतात.... हे त्याच ओघात येतं. मुद्दा असा आहे की एका समाजाच्या निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या सुरूवातीपासून इथपर्यंत प्रवास होणं अनिवार्य आहे. कारण प्रत्येक पावलात काही ना काही सुधारणा झालेली आहे. ही उत्क्रांती आहे. पिढ्यानपिढ्यांमधून होणारा सावकाश बदल. वर दिलेल्या टप्प्यांमधलं नक्की कुठच्या टप्प्याकडे बोट दाखवून सांगता येईल - हो इथे, इथेच पाऊल वाकडं पडलं म्हणून? कदाचित असं म्हणता येईल की आपल्याला उत्तरेकडे जायचं होतं. पण प्रवास करता करता रस्त्यातल्या चढ-उतारामुळे, वाटेत आलेल्या डोंगरांमुळे, आडवळणांमुळे उत्तरेकडे जायच्याऐवजी पाच दहा डिग्री पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे झुकलो. पण म्हणजे आपण विरुद्ध दिशेलाच चाललो आहोत असं समजण्याची गरज नाही. आपण जिथे आहोत तिथून पुन्हा एकदा कुठे जायचं त्याचा आढावा घ्यावा, योग्य ती दिशा ठरवावी. पण म्हणावं की आत्तापर्यंतचा प्रवास साधारण योग्य दिशेलाच झाला. आताच्या उंचीवरून निश्चित कुठे जायचं हे अधिक स्पष्ट दिसतंय. मागच्या वाटेत थोडं चुकायला झालं, तरीही इथपर्यंत प्रगती झाली. पुढे योग्य रस्ता पकडूनच जाऊ.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखन आवडले.. काय म्हणायचे होते ते पहिल्या पाचेक परिच्छेदात स्पष्ट झाले होते, तरी पुढे वाचावेसे वाटले

कदाचित असं म्हणता येईल की आपल्याला उत्तरेकडे जायचं होतं. पण प्रवास करता करता रस्त्यातल्या चढ-उतारामुळे, वाटेत आलेल्या डोंगरांमुळे, आडवळणांमुळे उत्तरेकडे जायच्याऐवजी पाच दहा डिग्री पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे झुकलो. पण म्हणजे आपण विरुद्ध दिशेलाच चाललो आहोत असं समजण्याची गरज नाही. आपण जिथे आहोत तिथून पुन्हा एकदा कुठे जायचं त्याचा आढावा घ्यावा, योग्य ती दिशा ठरवावी.

या मतितार्थाशी सहमत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय, मीही सहमत आहे मथितार्थाशी. पण लेख थोSSडा लांबला असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे असच काहीसं उत्तर अपेक्षित होतं. लेख्/उत्तर चांगलं.
ज्यांना वेळ मिळतो त्यातील काहीजण उपयुक्त गोष्टी शोधतात. किंवा जो तो जे काही काम काम करतो ते स्वतःच्या पोटाअपाणयसाठी पण त्यातून समजालाही
नकळत योगदान असतच अशा धर्तीचं काही सुचवणारा एक धागा रमताराम ह्यांनी काढला होता. भ्न्नाट गोष्ट होती ती; युरोपिअन साहित्यातून स्वैर अनुवादित होती.
http://www.mimarathi.net/index.php?q=node/1524 इथे वाचायला मिळेल.
सध्या इतकच्.फुरसतीत पुन्हा नीट वाचून प्रतिसाद देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'इतिहासाची पुनर्भेट' असं काहीसं वाटलं लेख वाचताना ....मागे तर नाही जाता येणार, आता पुढेच जायला हवं.. फक्त 'पुढे' कशाला म्हणायचं आणि 'मागे' कशाला म्हणायचं याबाबत मतभेद आहेत आज समाजात! तेही राहणारच कायम!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीचं वय एक वर्षाचं धरलं तर माणसाचं एक दिवसाचं असेल आणि या एका दिवसातल्या शेवटच्या पंधरा मिनिटात घडलेलंच नेहमी घडतं/पुढे घडेल असं म्हणता तर तसं.
माझ्या प्रतिसादात वर्णन केलेला भूभाग हाय स्टँडर्डचा आहे हे आणि तसा भूभाग मिळणे दुरापास्त झाले आहे हे मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.
उत्क्रांतीचा हा मार्ग हा एकमेव आणि सहज नैसर्गिक मार्ग असता किंवा अशी जंगलात राहणारी लोकं सर्पदंशाने, रोगराईने वगैरे फटाफट मेली असती तर जगात अजूनही बर्‍याच ठिकाणी आढळणारे आणि 'प्रगत' समाजात सामील होण्यास नाखूश असणारे 'अप्रगत' समूह दिसले नसते. पण असो.

कल्पनाविस्ताराची पद्धत आवडली. फक्त थोडा लांबल्यासारखा वाटला हा प्रतिसादात्मक लेख.
वेगळ्या मार्गाचा कल्पनाविस्तार करावा असे वाटले होते पण शेवटी हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा प्रश्न असल्याने इथे थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वीचं आयुष्य एक वर्षाचं धरलं तर माणसाचं एक दिवसाचं असेल आणि या एका दिवसातल्या शेवटच्या पंधरा मिनिटात घडलेलंच नेहमी घडतं/पुढे घडेल असं म्हणता तर तसं.

खरं तर पृथ्वीचं आयुष्य एक वर्षाचं धरलं तर माणसाचं अस्तित्व एक तासाचं आहे, आणि गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास हा दहा सेकंदाचा आहे असं गणित आहे. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही, कारण आपण त्या दहा सेकंदांचाच विचार करतो आहोत. त्याआधी जे घडलं, त्याचा परिणाम त्या दहा सेकंदांवर नगण्य आहे. आणि 'असं म्हणता तर तसं' अशी भूमिका का बरं? नक्की कुठच्या टप्प्यावर काय वेगळं घडू शकेल?

माझ्या प्रतिसादात वर्णन केलेला भूभाग हाय स्टँडर्डचा आहे हे आणि तसा भूभाग मिळणे दुरापास्त झाले आहे हे मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.

खरं तर आत्ता तसा भूभाग मिळणं काहीसं दुरापास्त आहे असं मान्य करून पाच-दहा हजार वर्षांपू्र्वी ते दुरापास्त नव्हते हे दाखवून द्यायचं होतं. त्यावेळी जगभर वेगवेगळ्या जागी हीच परिस्थिती होती. त्यातूनच सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या. तेव्हा आत्ता जरी तशी जागा सापडली तरी तुमच्या वंशजांना ते नंदनवन वाटेल का असा प्रश्न विचारायचा होता. कदाचित ही अप्राप्य नंदनवनाची कल्पना तुमच्याच (आपल्याच) उच्च वीस टक्कीय विचारसरणीत असावी.

उत्क्रांतीचा हा मार्ग हा एकमेव आणि सहज नैसर्गिक मार्ग असता किंवा अशी जंगलात राहणारी लोकं सर्पदंशाने, रोगराईने वगैरे फटाफट मेली असती

सर्पदंशाने, दुष्काळाने सर्वच मरत नाहीत हे उघडच आहे. कारण आपण सगळेच त्यातून वाचलेल्यांचे वंशज आहोत. पण मोठ्या प्रमाणावर मरतात. सर्व्हायवलशिप बायस मुळे त्यातून वाचलेलेच फक्त दिसतात.

'प्रगत' समाजात सामील होण्यास नाखूश असणारे 'अप्रगत' समूह दिसले नसते. पण असो.

याबाबत काय उत्तर द्यावं हे कळत नाही, कारण हे धड इथेही नाही अन तिथेही नाही. नाखुष असलेले समाज म्हणजे कुठचे? त्यांच्यात काही त्यांची स्वतंत्र 'व्यवस्था' नाहीच का? मला (भौतिक) प्रगतीपेक्षाही व्यवस्था असलेले - जिथे नियम तयार करणारे, त्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणारे लोक असतील असे समाज म्हणायचे होते. कामांची विभागणी, स्पेशलायझेशन, अर्थव्यवस्था, पैशाची कल्पना, कर्ज देण्या घेण्याची सर्वमान्य पद्धती, प्रस्थापित शिक्षणपद्धती, वैद्यकीय व्यवसाय... हे सगळं असलेले समाज.

आपण दोघं दोन वेगवेगळ्या गोष्टींविषयी बोलतो आहोत का?

लेख लांबला हे खरंच. मग प्रतिसाद म्हणून आला असता तर किती प्रचंड वाटला असता याची कल्पनाच करता येते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर पृथ्वीचं आयुष्य एक वर्षाचं धरलं तर माणसाचं अस्तित्व एक तासाचं आहे, आणि गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास हा दहा सेकंदाचा आहे असं गणित आहे. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही, कारण आपण त्या दहा सेकंदांचाच विचार करतो आहोत. त्याआधी जे घडलं, त्याचा परिणाम त्या दहा सेकंदांवर नगण्य आहे. आणि 'असं म्हणता तर तसं' अशी भूमिका का बरं? नक्की कुठच्या टप्प्यावर काय वेगळं घडू शकेल?

गणित काहीही असले तरी मुद्दा कळला म्हणजे झालं.
पन्नासहजार वर्षांपूर्वी अ‍ॅनॉटॉमिकली मॉडर्न (म्हणजे बुद्धिमत्तेच्या बाबतीत साधारण आजच्या माणसासारखा) माणूस अस्तित्वात असताना ही अशी उत्क्रांती सुरू व्हायला चाळीसहजार वर्षे लागली, पण ते आपण सध्या बाजूला ठेवू.
वेगळं काही तर कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतं अन्यथा या दहाहजार वर्षांतही अनेक नागरी संस्कृती काळाच्या उदरात गडप झाल्या नसत्या. पृथ्वीच्या बायोमासच्या मानाने आपण नगण्य असलो तरी पृथ्वीवरचे स्रोत मर्यादित आहेत आणि स्थिर झालेल्या ९ अब्ज लोकसंख्येला (सध्याच्या) अमेरिकन जीवनशैलीसारखी जीवनशैली देण्यासाठी पुरेसे नाहीत (गेल्या तीनशे वर्षात वीस टक्के जंगल नष्ट झाले आहे). आधीच्या धाग्यावरचे सर्किट यांनी दिलेल्या दुव्यातले भाषण ऐकल्यास या स्रोतांसाठी शर्यत आधीच सुरू झालेली आहे हे लक्षात येईल आणि या शर्यतीत कोणीतरी जिंकणार आणि कोणीतरी हारणार हे नक्की.

कदाचित ही अप्राप्य नंदनवनाची कल्पना तुमच्याच (आपल्याच) उच्च वीस टक्कीय विचारसरणीत असावी.

पृथ्वीवर नंदनवन होते किंवा हंटर-गॅदरर लोक नंदनवनात राहतात असा माझा समज नाही. भटक्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही उत्क्रांती सुरु झाली असे म्हटले तर प्रगती मोजताना त्या मूळ प्रश्नांपैकी किती प्रश्न सुटले हे पाहणे अनिवार्य आहे म्हणून त्या लोकांशी तुलना व्हायला हवी असे मात्र मला वाटते. पण असे म्हटले की "जा मग, राहा जंगलात" हे नेहमीचे वाक्य ऐकायला मिळते.
या उत्क्रांतीआधी आयुष्य खूप कष्टप्रद, छोटे आणि खालच्या दर्जाचे होते हे प्रगतीवाद्यांचे आवडते गृहीतक आहे आणि त्यासाठी तसे पुरावे शोधून सिद्ध करण्याची गरज त्यांना वाटत नाही. जे काही तुटपुंजे पुरावे आहेत त्यावरून तर 'सरासरी' माणूस भुकेने मरत नव्हता उलट चांगल्या शारीरिक अवस्थेत होता, साथीचे रोग नव्हते, कामाचे तास कमी होते आणि ताणतणाव नव्हता असेच दिसते किंबहुना लोकसंख्येची रचनाही आजच्या प्रगत देशांमधल्या लोकसंख्येसारखी होती. सध्याही 'सरासरी' तीच परिस्थिती असेल तर आपण प्रगती झाली म्हणतो ना?
कामाची वाटणी करून शेती करू म्हणजे सगळ्यांना खात्रीशीर अन्न मिळेल असे तेव्हा कोणीतरी म्हणाले असणार, पण प्रत्यक्षात काही काळाने तसे झाले नाही. तेच आजही चालू आहे, अमुक तंत्रज्ञान आले म्हणजे अमुक होईल असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ते तसे होत नाही. तंत्रज्ञान विकणार्‍यांची मात्र प्रगती होते आणि पर्यावरणाची वाट लागते.
सगळ्यांसाठी अन्न उपलब्धता, कामाचे कमी तास, कमी ताणतणाव आणि स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तथाकथित जंगली समाजांच्या मागे आहोत. फक्त वाढते आयुष्यमान आणि आयुष्याची शाश्वती याबाबतीत आपण पुढे असू पण त्यासाठीही ठराविक परीघातले आयुष्य जगण्याची अट आहेच. शिवाय आत्ताच अगदी सुखवस्तु लोकांनाही आपण खूप जगलो तर कसं होईल याची चिंता भेडसावायला लागली आहे.

नाखुष असलेले समाज म्हणजे कुठचे?

जंगलातले आयुष्य इतके वाईट असते तर अ‍ॅमेझॉन खोर्‍यातले आदिवासी असो किंवा मलेशियातले ओरांग असली, जंगल वाचवण्यासाठी झगडले नसते. दक्षिण अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, मलेशिया-इंडोनेशिया, अंदमान-निकोबार या ठिकाणी अजूनही जंगलात राहणारे समूह आहेत आणि त्यांचे समाजनियम असले तरी बाजारापर्यंत त्यांची 'उत्क्रांती' आपोआप झालेली दिसत नाही उलट 'प्रगत' जगानेच जाऊन त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. प्रगत जगाने या लोकांना मुख्य प्रवाहात आणून काम वगैरे देण्याचा प्रयत्न केला तरी हे लोक मेहनतीचे काम करण्यास नाखूश असतात. जंगलात त्यांचं काम एखाद्या खेळासारखं असतं, आपण करतो तसं एकसुरी नसतं हेच त्यामागे कारण आहे. थोडक्यात, या उत्क्रांतीला उत्क्रांती किंवा घडामोड वगैरे म्हणणेच ठीक आहे. विशेषतः पूर्वी नकळत झालेल्या चुका आता जाणूनबुजून केल्या जात असताना याला सरसकट प्रगती म्हणण्याची घाई करू नये एवढाच माझा आक्षेप आहे. याला प्रगती म्हणणे फक्त काही लोकांच्या हिताचे आहे आणि त्यालाच वीस टक्कीय मानसिकता म्हणणे योग्य होईल.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'प्रगत' समाजात सामील होण्यास नाखूश असणारे 'अप्रगत' समूह दिसले नसते.

हे नक्की काय ते समजलं नाही.

प्रगत समजात सामील होता येत नाही म्हणून अनेक प्रगतीशील समाज प्रगती करत आहेत हे समजतंय; पण हे असं उदाहरण समजलं नाही.

(अवतरणांचं प्रयोजन समजलं, फक्त टंकाळ्यामुळे म्हणून वापरलेली नाहीत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडक्यात जुनं तेच सोनं समजणारे समुह असं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरचा नगरीनिरंजन यांचा उपप्रतिसाद वाचुन* अजून एक विचार मनात आला@.. कदाचित अवांतर पण काहिसा समांतर.

माणसाच्या या प्रवासाला 'माणसाची उत्क्रांती' म्हणता येईल का? (लेखाचे हेडिंग समाजची उत्क्रांती आहे हे माहित आहे, त्याला माणसाची उत्क्राम्ती म्हणावे असे राजेश यांना किंवा कोणत्याही प्रतिसादकाला सुचवायचे आहे किंवा नाही याबद्दल काहिहि दावा नाही)

का माणूस समाजात बांधला गेला आणि त्याची उत्क्रांती होणं थांबलं? म्हणजे माणसाची 'प्रगती' ही तांत्रिक / तंत्रज्ञानातील प्रगती आहे. माणूस -एक प्राणी म्हणून- उत्क्रांत झाला काय? बदलला काय? का विविध लसी वगैरेंच्या मदतीने -त्याची रोगप्रतिकारक शक्ती म्हणून-एका अर्थाने प्राणी म्हणून त्यात बदल झाले? का अधिक सुरक्षित झाल्याने काही नैसर्गिक अस्त्रे (जसे दात, बळकट स्नायु, त्वचा) आणि जाणिवा (जसे वास, दृष्टी) कमकुवत होत जाऊन 'निव्वळ एक प्राणी' म्हणून माणूस अधिक अविकसित होत गेला?

------
* खरंतर त्या उपप्रतिसादामुळे नाही पण तो वाचता वाचता
@ खरंतर हा विचारही नवा नाही. अनेकदा अनेकांना पडला असावा, वाचनाही आला आहे, फक्त हे वाचताना नव्याने आठवला म्हणा हवंतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तंत्रज्ञान म्हणजे उत्क्रांतीचा वेगळा मार्ग आहे आणि माणसात गेल्या दहाहजार वर्षात बदल झाला नसेल तेवढा पुढच्या शंभर वर्षांमध्ये होईल असे म्हणणारे लोक आहेत.

As technology is the continuation of evolution by other means, it shares the phenomenon of an exponentially quickening pace.
- Ray Kaurzweil (The Age of Spiritual Machines)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत मुद्देसूद आणि उत्तम विचार. अगदी मनातले.

मुळात कायमचं अशा ठिकाणी राहणं , वसणं दूर राहूदे, नुसती वीकेंड होमची कल्पना पाहू.

हे सेकंड होम स्कीम्सवाले अर्थात विकांताला, उन्हाळी सुटीत मुलांना निसर्गाच्या सानिध्यात बालपण, आजोळ , पक्ष्यांचं कूजन वगैरे विकणार्‍या बिल्डर कंपन्या. (हा बिल्डरांविरोधातला छद्मी उपरोध नव्हे, लिटरली अशा जाहिराती - चाईल्डहूड्स फॉर सेल- आसपास रोज दिसताहेत.)

मी स्वतः असं एक घर घेतलं आहे, बजेटात मिळालं म्हणून. अगदी खेडेगावात. त्या निमित्ताने खूप इनसाईट मिळाली आणि असं ढळढळीत चित्र दिसलं की पाहण्यात तरी कोणतीही "यशस्वी" सेकंड होम वसाहत नाहीये. अगदी कितीही जुनी का असेना. सर्व योजना सुपर फ्लॉप आहेत.

सुरुवातीला उत्साहाने विकांती येणारे लोक हळूहळू आडविकांती, मग महिन्याने, मग चोराचिलटांना, किड्यासापांना किंवा दमटपणा, पाऊस, खाज, यांना कंटाळून पूर्ण पावसाळ्यात फक्त एकदाच, तेही डे पिकनिक, रात्रीचा मुक्काम टाळणं..डब्यातून जेवण कॅरी करणं..तिथे घाट न घालणं.. अशा क्रमाने कमी होत जातात.

नंतर सहाएक महिन्यांनी एकदा येऊन घर स्वच्छ करणं आणि पुढचे तीन महिने धूळ साठवण्यासाठी बंद करुन परत येणं हे सुरु होतं. मग नुसत्या सफाईतच शनिवार जातो आणि रविवारी तर परत यायचं, मग काय मजा, म्हणून जाणं बंद होतं. स्थानिक कोणी उपलब्ध असेल तर जरा बरी स्थिती असते. असा वेळी तिथल्या जवळच्या गावातल्या गावकर्‍याला / माळ्याला किल्ली देऊन अधेमधे साफ करत राहण्याचं कंत्राट दिलं जातं.

तिथे जाऊन नियमित राहून खरंच निसर्गाचा आनंद घेणं, लोकली अन्न शिजवणं हे कोणीही करत नाही.

गावगाडा, तिथल्या मानसिकतेशी शहरी मनुष्य कितीही प्रयत्न केला तरी एकरुप होऊ शकत नाही. तिथे बेटं करुनच राहिलं जातं. सेकंड होम स्कीम ही नोकरदारांची मध्यमवर्गीय वसाहत असेल तर बर्‍याचदा सरपंच, गावकरी आणि लोकल टोळ्या यांच्यापुढे पूर्ण नांगी टाकून किंवा कॉलनीचे रहिवासी अतिश्रीमंत असतील(उदा. अम्बे व्हॅली इ) तर गावकर्‍यांना अंकित करुन, विकत घेऊन, (पण वेगळं/दूर ठेवूनच) स्थिती सांभाळली जात राहते.

हा माझ्या एकट्याच्या सेकंड होमचा अनुभव नसून वेगवेगळ्या जागांच्या पाहण्यातून काढलेला निष्कर्ष आहे.

आपण एकदा शहरी झालो की शहरीच..

अगदी श्री. अरुण देशपांडे या तळमळीच्या शेतीशास्त्रज्ञाने प्रपोज केलेल्या रुरर्बनायझेशनच्या कल्पनेला धरुन थोरामोठ्यांनी गावाकडे प्लॉट्स घेऊन ठेवले पण तिथे राहायला येणार्‍यांचं प्रमाण नगण्य आहे असं कार्यरत या डॉ. अनिल अवचटांच्या पुस्तकात त्यांनी नमूद केलं आहे.

अशा वेळी लोक तात्पुरते भुलतात, गुंतवणूक करतात आणि प्रत्यक्ष आपली जीवनपद्धती सोडू शकत नाहीत असंच खेदाने म्हणावं लागेल.

कदाचित ननिच्या मूळ विचारांशी माझ्या या प्रतिसादाचा थेट संबंध नसेलही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आधीच आपण इतके अवलंबित्व मंजूर केलेले आहे की आता परत फिरणे नाही. वीस वर्षांपूर्वी मोबाईल फार कोणाला माहितही नव्हता, आज त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही अशक्य आहे असे लोक म्हणतात. असंच काही वर्षांनी आपल्या घरांच्या भिंतींपासून आपल्या मेंदूपर्यंत सगळीकडे इलेक्ट्रॉनिक चिप्स बसवल्या जातील, साध्यासाध्या निर्णयासाठी यंत्रांवर अवलंबून राहावे लागेल आणि तरीही आपण म्हणूच की एकदा असे झालो म्हणजे झालो. असो.
कोणत्याही उपायांचा उहापोह करणे हा माझ्या लेखाचा उद्देश नव्हता.
माझा मुद्दा एवढाच आहे की 'प्रगतीवाद' झूट आहे.
प्रगतीवाद्यांनी जे जे प्रश्न सुटल्याचे जाहीर केले आहे ते प्रश्न मुळात काही काळापूर्वी झालेल्या सो कॉल्ड प्रगतीचीच फळे होती.
या प्रगतीचे ट्रॅक रेकॉर्ड पाहता पुढे निर्माण होऊ घातलेले धोके गंभीर आहेत पण मंद गॅसवर ठेवलेल्या पाण्यातल्या बेडकाप्रमाणे आपण कोमट पाण्याला प्रगती म्हणतो आहोत.
आत्ताच नेटवर एक रोचक लेख सापडला. वाचून बघा. त्यात Rational Capitulation हा उपाय सुचवला आहे. ते तरी होईल अशी आशा आपण बाळगूया. बाकी आपण करू तरी काय शकतो?
निराशावादी असणे कोणाला आवडते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0