तफावत
जेवणानंतर जडावलेलो. टळटळीत ऊन मी म्हणत होतं. ऑफीसच्या दिशेने जाणारा रस्ता उभाच्या उभा सुस्त अजगरागत पडलेला. म्हंटलं, गाडी मागवण्यापेक्षा आज अंगाला उन्हं द्यावं. तसाच चालू लागलो. रस्त्याला लागलो तर लक्षात आलं, दुतर्फा झाडीही कमीच झालीयेत. बिनरहदारीच्या रस्त्यावर आता आरामात चालू लागलो तर दिसलं, लांबवरच्या एकमात्र काहीशा डेरेदार वडाखाली सावलीला तिघजणं बसलीयेत, बुवा, बाई नि बहुतेक त्यांचं लहानसर लेकरू. आणखी पुढे जाईतो चित्र जास्त स्पष्ट झालं. तिघेही सावलीलाच बसलेले. मी लांबवरचे हिरवट नीळे डोंगर, आजुबाजूची फुटकळ झाडी नि भाताची पिवळट शेतं बघत त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मला कळलं, त्यांचंही माझ्याकडे लक्ष होतं. तिघांनी बरीच दलमजल केल्याचं कळत होतं. मी जवळ पोहोचताच मळकट सदर्याच्या बुवानं तसल्याच रंगाची गांधी टोपी डोक्यावर चढवून लेकराला खूण केली नि ते लेकरू सावलीखालून उठून बापासंगत चालू लागलं. त्यासरशी रस्त्याच्या टोकाशी सावलीत बसलेल्या ठसठशीत कुंकू लावलेल्या नि तसल्याच रंगाची साडी नेसलेल्या त्याच्या आईने उठून बुडाखालच्या बर्यापैकी झिजलेल्या प्लॅस्टीकच्या चपल्या चढवल्या आणि तीही त्यांच्या मागोमाग चालती झाली. जणू मी त्यांच्यापर्यंत येईतो विश्रांती घेऊ असं आधीच ठरलेलं. अंतर बरच कापायचं असावं बहुतेक, आधी तिठ्यापर्यंत आणि नंतर पुढेही, मिळालं तर वाहन नाही तर पुन्हा पायीच. मजेखातर उन्हात घाम गाळणारा मी, रस्ते, सरकारी बसेस् किंवा इतर वाहनं अजूनही न पोचलेली गावं, तिथल्या गावकर्यांचं गरीबीतलं जीवन, खर्चाच्या हातमिळवणीसाठी त्यांना करावे लागणारे कष्ट असा काहीबाही विचार करतोय तोच मागून एक चारचाकी सर्राट् करून पुढे गेली. दिसलं, त्यातही आई-बाप-लेकरू असं तिघांचंच एक कुटूंब आहे.....
मला या बाबतीत हे विचारावसं
मला या बाबतीत हे विचारावसं वाटलं - की अनेकांना इथे इक्वालिटी नसणं, समानता नसणं खटकलं असेल. मग जेव्हा तो मजूर झोपा काढत होता अन कारवाला घाम गाळात होता तेव्हा कुठे गेली तुमची समानता? आय मीन असंही असू शकेला ना की संधीचा उपयोग त्या मजूर कुटुंबाने करुन घेतला नसेल.
बरं प्रत्येक व्यक्ती काही एक विशिष्ठ स्ट्रेन्थ्स घेऊन येते तसेच लिमिटेशन्स घेऊन जन्मास येते. ते देखील तर विचारात घ्यायला हवे.
अन अगदी खरं सांगायचं तर असंही असू शकतं की तो मजूर त्या कारवाल्यापेक्षा १० पटींनी सुखीही असेल.
मला कथावस्तू फार अॅब्स्ट्रॅक्ट वाटली. अनेक पॉसिबिलीटीज आहे. पण हे माहीत आहे की अनेक जण , लगोलग निष्कर्ष हाच काढणार की अरेरे मजूर बिचरा न कारवाला माजलेला!
शंका
मला पूर्ण लिखाणाचा बाज हा ह्या साध्याशा पण प्रभावी ओळींसारखा वाटला :-
(ओळी बहुतेक पद्मा गोळे/इंदिरा संत /अरुणा ढेरे ह्यापैकी कुना एकाच्या आहेत.)
वर कोर्या आभाळाची |
भट्टी तापली तापली ||
खाली लेकरांची माय |
वारा पदराने घाली ||
वार्या खाली कसेबसे |
उभे रोप जवारीचे ||
एक मलूल पोपटी |
दोन सुकल्या पात्यांचे ||
उभी कोणाच्या दारात |
रांग भुकेल्या बाळांची ||
तहाला वाडगा घेवून |
अशी तिष्ठत केंव्हाची ||
.
.
.
हे असं काही दिसल्यावर इतर संवेदना गुंडाळून फक्त तार्किक विचारच करत बसशील ?
शक्य आहे ?
अरेरे मजूर बिचरा न कारवाला
अरेरे मजूर बिचरा न कारवाला माजलेला!
कारवाल्याला माजलेला म्हटलेलं मला तरी दिसलं नाही. विकासाची गंगा काही लोकांच्या घरात पोहोचण्याआधीच आटलेली आहे. कारवाल्याला कदाचित या वस्तुस्थितीची जाणीवही नाही. लेखकही बहुदा कारवालाच आहे, पण त्याला या वस्तुस्थितीची जाणीव आहे, कारण तो ही आज एक दिवस गंमत म्हणून, अंगाला ऊन लागू देण्याचा पर्याय निवडतोय. मजूराची कदाचित कष्टाची तयारी नसेल, कदाचित संधीचा उपयोग करून घेण्याची त्याची पत नसेल; त्या कुटुंबाला उन्हातान्हांतून, काहीश्या अमानवी म्हणाव्याशा परिस्थितीत रहावं लागतं हे त्याचं समर्थन असू शकत नाही.
कारवाला कदाचित असंवेदनशील असेल, कदाचित माजलेला असेल, कदाचित इग्नरंट असेल. लेखकाने हा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.
नोप्स. 'जितकी जास्त गरीबी
नोप्स. 'जितकी जास्त गरीबी तितकी जास्त मुलांची लैन' असे मला म्हणायचे होते.
पूर्वीदेखील मी एका धाग्यावर प्रश्न विचारलेला 'जर किती मुलं असावीत हा वैयक्तीक निर्णय असावा तर त्या मुलांना जगवता येते की नाही किंवा कसे जगवता येते आहे हादेखील वैयक्तीक प्रश्न/निर्णय का असू नये?'
गब्बर म्हंतो तसे 'सरकार/डावे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र करणारे असतात' या अर्ग्युमेंटचे खंडन कसे करणार?
असो. ललित आहे. अवांतर नको उगाच.
पण तरी लेख 'नावडला'.
मेघना करते ती तक्रार, "ऐसीवर
मेघना करते ती तक्रार, "ऐसीवर ललित लिहिलं की त्याची चिरफाड होते," मला पुरेपूर समजली.
कारण, माझी तक्रार, "सांख्यिकी निष्कर्ष एकेका व्यक्तीला लावले की गडबड होणारच" ही इथे दिसते. लेखकाला मांडायचा मुद्दा काय आहे तो सोडून बाकी भलत्या गोष्टींबद्दलच चर्चा करण्यासाठी मुळातच तार्किक गफलत केलेली आहे. आणि हा प्रतिसादही इथे द्यावा का? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी गत.
अदिती, नवीन असताना मला हेच
अदिती, नवीन असताना मला हेच वाटायचं की लेखकाचा मूळ मुद्दा लोक समजूनच घेत नाहीत पण हळूहळू लक्षात आलं की भिन्न भिन्न प्रकृतीचे लोक त्यांना जे दिसतं/भावतं/ मांडावसं वाटतं तेच मांडणार. असा कोणता नियम आहे की लेखकाला म्हणायचं त्याच्याशीच एकनिष्ठ रहा? माझ्या मनात वेगळे तरंग उमटू शकतात कारण भिन्न प्रकृती.
पोचलं
लिखाण पोचलं; भावलं.