सिनेमे आणि सध्याची प्रमोशन्स

अलिकडेच आमच्या कॉलेजचं स्नेहसंमेलन झालं. मुंबईतलं कॉलेज त्यामुळे सेलेब्रिटींना यायला काही जास्त त्रास झाला नसेल . आजपावेतो अमका येणार, ढमकी येणार याच्या चर्चा असत आणि प्रत्यक्षात कधी वेगळेही घडत असे. काही जणांनी इथपर्यंत येऊन गर्दी पाहून काढता पाय घेतला होता. पण आता चित्र बदलेलं दिसतंय. सिनेकलाकारांना सिनेमाचे प्रमोशन फक्त रिअ‍ॅलिटी शोज मध्येच न करता आता कॉलेजेसमध्येही जाऊन करावे लागते असे दिसते. तारक मेहताच्या उलट्या चष्म्यात बिचार्‍यांना सोसायट्यांमध्येही जायला लावतात. तर असो.

दोन वर्षांपूर्वी 'जयंताभाई की लव्ह स्टोरी'साठी विवेक ओबेरॉय आणि नेहा शर्मा आले होते. विवेकसाठी हा काही चांगला अनुभव नव्हता. ऐश्वर्याच्या नावाने ओरडत लोक त्याला बोलूही देत नव्हते. त्याने पाचेक मिनिटे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. हाती लिहिलेली स्क्रिप्ट असताना अभिनय करणं वेगळं आणि असे प्रसंग वेगळे. शेवटी त्याने खूपच आरडाओरडा करणारा मुलगा हेरला आणि जयंता'भाई'च्या थाटात त्याला मंचावर बोलून कानपिचक्या दिल्या. गर्दी शांत झाली. पुढची दहा मिनिटे त्याची बरी गेली. थोडक्यात तो आला आणि पंधरा-वीस मिनिटांत गेला. तेच त्याचा साथिया-कंपनी हे पिक्चर जोमात असताना आधी कबूल करूनही त्याने टांग दिली होती. स्टुडंट कौन्सिल त्याला येण्यासाठी पैसे द्यायला तयार असूनही.

यावर्षी 'व्योमकेश बक्षी', 'दम लगा के हैय्या' आणि 'हे ब्रो' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सुशांत सिंग राजपूत-दिबाकर बॅनर्जी, अनू मलिक आणि गणेश आचार्य आले होते. पैकी निरिक्षण असे आहे की यावेळी लोक आले आणि आपलं काम करून गेले असं झालं नाही. चांगले दीडेक किंवा त्याहूनही अधिक तास बसून कार्यक्रम पाहिले, स्वत: काहीतरी सादर केलं, लोकांशी गप्पा मारल्या. मुंबईतल्या एकूण महाविद्यालयांची संख्या पाहता त्यांनी असे कार्यक्रम कित्येक ठिकाणी केले असावेत आणि अर्थातच त्यांचा यात खूप वेळही गेला असेल. परंतु वाढती स्पर्धा आणि एकूणातच रागरंग पाहता सेलेब्रिटी ही समाजाची किंबहुना तरूण पिढीची असोशी राहिली नसून उलट त्यांना या लोकांची अधिक गरज आहे असं दिसतं. ऐकिव माहितीनुसार त्यांना येण्यासाठी पैसे देण्याऐवजी आता तेच लोक पैसे देऊन येताहेत असं दिसतं. यश राज फिल्म्सचं नांव स्पॉन्सर्समध्ये होतं, याचा अर्थ ते खरंही असावं.

सुशांत सिंगला त्याचं अपिल चांगलं माहित असावं. त्याने फॅशन शोज पाहिले. मधूनच तो मुलींकडे आणि मुलांकडे पाहून हसून पोझेस देत होता आणि पब्लिक वेड्यासारखं चित्कारत होतं. तो ते भारी एंजॉय करत होता. तो येणार म्हणून बाँबे टाईम्स मध्ये आधीच कॉलेजच्या नावे बातमी होती. तो येऊन गेल्यावरही त्याचे मुलांसोबतचे फोटो डीएनए पुरवण्यांमध्ये आले. पूर्वी अशा बातम्यांना स्थान नसे किंवा बातम्या मोघम असत. त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनमुळे फॅशन शो ची थीम 'धोती' होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्याने जिंकलेल्या टीमसोबत रँप वॉक केला, अचानकपणे (खरंच अचानक कारण ती टीम आमच्या कॉलेजची नव्हती आणि ते काय प्रॉप्स आणणार आहेत हे आधीच माहित असण्याची शक्यता मला वाटत नाही) एका टीमने देऊ केलेली तलवार घेऊन त्याने तलवारबाजी दाखवली. एका मुलीसोबत थोडा डान्सही केला आणि रोमँटिक अभिनय कसा कुणासोबतही सहज करता येतो त्याचं प्रात्यक्षिकच दाखवलं. त्यानंतरही मुला-मुलींमध्ये जाऊन फोटो काढणं, तिथे आलेल्या माध्यमप्रतिनिधींना मुलाखत देणं यामध्ये एकूण त्याचा तीन तासांपेक्षा अधिक वेळ गेला. तरीही त्याने घाई दाखवली नाही. विवेक ओबेरॉयपेक्षा त्याला लोकांना चांगला प्रतिसाद दिला.

अनू मलिकने गाण्यांच्या स्पर्धांचे परिक्षण केले. त्यानंतर त्याने तीनचार स्पर्धकांना नांवाने बोलावून त्यांची प्रशंसा केली. त्याच्या बर्‍यापैकी जवळ मी बसले असल्याने ती नावे त्याने कुणाला विचारली नाहीत, किंवा त्याने कुठे लिहूनही नव्हती हे माझं निरिक्षण. त्यानंतरच्या भाषणात त्याने "त्याच्याकडे दहा वर्षे काही काम नव्हते आणि लोकांना वाटले की तो संपला. तरीही तो एका चांगल्या संधीची वाट पाहात होता आणि ती आता त्याला मिळालीय. त्यामुळे आयुष्यात कितीही निराशाजनक घडले तरी खचून जाऊ नका आणि कधी ना कधी तुम्हाला संधी मिळेलच" असे सांगितले. अत्यंत अनौपचारिक, उपदेश नसणारं परंतु उमेद देणारं असं ते छोटेखानी छान भाषण होतं. त्याला खरंतर या अनोळखी गर्दीसमोर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातलं इतकं काही सांगायची गरज नव्हती. ते प्रमोशन गिमिक किंवा स्टंट वाटू नये इतपत प्रांजळ वाटलं. नंतर अर्थातच त्याने काही मुखडे, काही पूर्ण गाणी असं करत दहाएक गाणी म्हटली असावीत. नंतर प्राचीला गच्ची जोडत एक शेरही ऐकवलाच. यश राज फिल्म्समध्ये काम करण्यासाठी तो म्हणे गेली दहा वर्षे धडपडत होता आणि आता त्याला ही संधी मिळालीय. त्याने अर्थाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय हेही सांगितलं. हा पूर्णवेळ त्याच्यासोबत असलेला मित्र किंवा असिस्टंट जो कुणी असेल तो हे सगळं चित्रित करत होता. शेवटी शेवटी तर एक कॅमेरा अनूवर आणि दुसरा मिळणार्‍या प्रतिसादांवर असं तो दोन फोन्समध्ये शूट करत होता. तात्पर्य पुन्हा हेच की हे सगळं आता त्या लोकांची गरज झाली आहे.

'हे ब्रो' हे प्रकरण काय आहे हे मला गणेश आचार्य आणि कंपनी येईपर्यंत ठाऊक नव्हतं. त्यांची टीम बर्‍यापैकी नवीन आहे. नायिका नुपूर, नायक मनजित(किंवा मनपासून सुरू होणारं काहीतरी पंजाबी नांव) होणा, अँटीहिरो/खलनायक हनीफ, दोन कोरिओग्राफर्स, निर्मात अशोक चांडक आणि मागे नाचण्यासाठी दहा-पंधरा लोक अशी मोठी जंत्री होती. चित्रपटाचा ट्रेलर, नायक-नायिकेचे एक, नायिकेचे एक, नायिका-खलनायकाचे एक आणि दिनेश आचार्यची दोन इतकी नृत्ये सादर करण्यात आली. सगळ्या प्रमोशन्समधलं पकाऊ हेच होतं. दिनेशला बोलता येत नाही. स्वतःच्याच बोलण्यावर हसण्याचे हास्यास्पद प्रयोग त्याने केले. इतकं नाचकाम होणार हे बहुधा आधीच ठरलेलं असावं पण ते करण्यासाठी खूप भाव खाल्ला. प्रत्येक वेळेला प्रत्येकाने येऊन चार-चार वेळा त्यांची फिल्म कधे रिलीज होणार आहे हे सांगणं आणि पहा अशा मिनवार्‍या करणं जरा अतिच झालं. बाकीचे सुशांत आणि अनू मलिक पब्लिक त्यामानाने खूपच ग्रेसफुल होते. ट्रेलरवरून 'हे ब्रो' टिपिकल सौदिडिंयन मूव्ही वाटतो. कदाचित त्या लोकांना आपला सिनेमा आपटणार आहे याची खात्री असल्याने इतकं सगळं करावं लागत असेल पण त्यातही त्यांच्या प्रमोशन तस्ट्रॅटेजीमध्ये सुधारणेस बराच वाव आहे असं वाटतं.

हे इतकं सगळं पाहता आणखी पुढच्या वर्षांमध्ये काय होऊ शकेल असा विचार करते आहे.

जाता जाता : संपादक-चालक-मालक जे कुणी असाल त्यांच्यासाठी- इथे चर्चाविषयात कला ही कॅटेगरी खूप स्थूल वाटते, चित्रपट हा उपवर्ग असायला काही हरकत नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हे इतकं सगळं पाहता आणखी पुढच्या वर्षांमध्ये काय होऊ शकेल असा विचार करते आहे.

Smile खरय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ब्योमकेश बक्षीच्या ट्रेलर्सने उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. कधी रिलीज होणाराय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक लिखाण. रामदासांनी शिवाजी महाराजांच्या थोरवीचं वर्णन करताना "शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे" असं म्हण्टलं आहे. तर इथे मुद्दा महाराजांची कुणाशी तुलना करणं वगैरे नसून, त्यातला "सलगी देणे" या भागाकडे निर्देश करावासा वाटतो. अमिताभ बच्चन यांच्या टीव्हीवरचा कार्यक्रम अधूनमधून काही मिनिटं पहायला मिळतो. त्यात हा "सलगी देणे" भाग येतोसं जाणवलं. शारुखखान या घटकामधे कमी पडला आणि पर्यायाने त्याला या कार्यक्रमाच्या संदर्भात यश मिळालं नाही अशा स्वरूपाचं मत ऐकलं आहे.

असो. कलेच्या लोकशाहीकरणाच्या/लोकाभिमुख होण्याच्या प्रक्रियेचा हा भाग म्हणू शकतो का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

येत्या काही वर्षात ही सेलिब्रीटी मंडळी ऐसी अक्षरे वर आयडी काढून , कट्ट्यांना सुद्धा हजेरी लावतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0