तेर येथे पुढची उत्खनन मोहीम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि संग्रहालये विभागाने 1987-88 मध्ये हातात घेतली. या वेळेस हे उत्खनन सर्व्हे नं. 142/2 या ठिकाणी असलेल्या एका भूखंडावर केले गेले. हा भूखंड तेरणा नदीच्या उत्तरेकडच्या तीरापासून सुमारे 250 मीटरवर होता. याच ठिकाणी उत्खनन हातात घेण्याचे कारण असे होते की काही कामासाठी खड्डा खणत असताना येथे भूपृष्ठाखाली, विटांनी बांधलेला एक पाणी साठवण्याचा तलाव होता असे अचानक रितीने निदर्शनास आले होते. उत्खनन केल्यावर असे आढळले की हा तलाव 12 मी X 12 मी X 3 मी या आकारमानाचा होता व त्याचे बांधकाम भाजलेल्या विटा आणि मड मॉर्टर ( चिखल, पांढरी माती आणि रेती यांचे मिश्रण) वापरून केलेले होते. तलावात उतरण्यासाठी दक्षिण आणि पूर्वेच्या बाजूस पायर्यांचे बांधकाम केलेले होते. तलावात पाणी घेण्यासाठी निरनिराळ्या पातळ्यांवर इन्लेट्सची व्यवस्था तलावाच्या भिंतींमधून केलेली होती व तलावाचा तळ विटांनी बांधून काढलेला होता. तलावाच्या उत्तरेला, विटांनी बांधलेली व एका बाजूची भिंत लंबवर्तुळाकार आकाराची असलेली, एक पूर्वाभिमुख वास्तू बांधलेली होती असे आढळले. तेरणा नदीच्या काठावर तेर वसलेले असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आला की वाहणारे अतिरिक्त पाणी या तलावात साठवून ते वर्षभर वापरले जात होते असा निष्कर्ष यावरून काढता येतो.
या तलावाच्या पूर्वेला काही लंबवर्तुळाकार आकाराचे खड्डे असल्याचे सापडले. हे खड्डे कोळसा व राख यांनी भरलेले होते. खड्ड्यांच्या बाजू लालसर रंगाच्या बनलेल्या होत्या. यापैकी एका खड्ड्यात घाव घातल्याच्या खुणा असलेली दोन हाडे आणि एक दगड मिळाला. उत्खनन केले गेले होते त्या चरात, चिखलाचे पेलेट्स आणि 'लज्जागौरीची' एक तुटलेली मूर्ती सापडली. (मस्तकविरहित स्त्री शरिराच्या मूर्तीला या नावाने अजूनही संबोधले जाते. ती प्रजननक्षमतेची देवता असल्याचे मानले जात असे.)
पुरातत्त्व खात्याचे एक अधिकारी बी.एन.चाफेकर आपल्या 1959 मधील अहवालात म्हणतात.
" उत्खननात सापडलेल्या छोट्या मूर्तींवरून (The figurines) तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीच्या अवस्थेची कल्पना आपल्याला उत्तम रितीने करता येते. काही स्त्री मूर्तींच्या केसात भांग मधोमध पाडलेला आढळतो. काही मूर्तींमध्ये केस डोक्याच्या मागील बाजूस एखाद्या पंख्याप्रमाणे पसरून बांधलेले दाखवलेले आढळतात..... ....नग्न आणि चेहर्यावरचे नाक-कान या सारखे अवयव न दाखवलेल्या सपाट चेहेर्यांच्या मूर्तींमध्ये अशा केश-रचना विशेष करून केलेल्या आढळतात. आणखी एका केश-रचनेत केसांना डोक्यापासून खाली येताना 3 ठिकाणी रिबन किंवा बॅन्ड्ने बांधून नंतर केस वर उचललेले असल्याचे दाखवलेले आढळते..... पुरुष व स्त्री हे दोन्ही आभूषणे वापरत होते..... नग्न स्त्री मूर्तींच्या अंगावर बहुतेक वेळा कोणतीच आभूषणे दाखवलेली नसतात. या वैशिष्ट्यांमुळे या मूर्ती कोणत्यातरी पंथाच्या उपासना मूर्ती असाव्या असा अंदाज बांधता येतो.
पश्चिमेच्या बाजूस, एका चौरस आकाराच्या वास्तूचे भग्नावशेष उत्खननामध्ये आढळून आले. या भग्नावशेषावर पांढर्या रंगाच्या कोणत्यातरी पदार्थाची पुटे चढलेली होती. या वास्तूच्या आत, 55 x 55 x 70 सेमी. या आकारमानाचे एक कुंड आढळले. या कुंडात मोठ्या तोंडाच्या पसरट आकाराच्या मातीच्या भांड्यांचे (bowls) तळ सापडले. ही भांडी वस्त्रांना लाल रंग देतात त्या प्रकारची मध्यम गडद रंगछटा असलेली होती. सांडपाणी वाहून जावे म्हणून बनवलेले एक विटांचे गटारही वास्तुच्या पश्चिमेस असल्याचे आढळले. वास्तू व हे गटार यामधे मिळून बोल्स प्रकारच्या भांड्यांचे एकूण 352 तळ सापडले त्यापैकी 78 तळ या गटारात मिळाले. उत्तरेकडे खणलेल्या चरात 10-50 x 10-50 मीटर आकारमानाच्या एका वास्तूचे अवशेष मिळाले.
या सर्व वर्णनावरून, आंध्र प्रदेशातील कोंडापूर येथे पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेल्या वास्तूंचे अवशेष व इतर वस्तू यांचे तेर उत्खननात सापडलेल्या गोष्टींशी कमालीचे साधर्म्य असल्याचे सहजपणे जाणवते. कोंडापूर मधे पुरातत्त्व विभागाला काय मिळाले होते ते पाहूया.
"इ.सनाच्या प्रारंभ कालात दख्खनच्या पठारावर वास्तव्य करणार्या लोकांच्या धार्मिक परंपरा आणि रुढी, कोंडापूर येथे केल्या गेलेल्या उत्खननामुळे प्रकाशात येऊ शकल्या आहेत. जी. महेश्वरी, सुपरिटेंडिंग आर्किऑलॉजिस्ट यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यांच्या एका गटाने हे उत्खनन सुरू केलेले असून सुमारे 45 मजूर या कामावर भग्नावशेषांना धक्का न लागू देता खणण्याचे कार्य अत्यंत काळजीपूर्वक करत आहेत. येथे पश्चिमेस सापडलेल्या आणि विटांमध्ये बांधकाम केलेल्या वास्तूमुळे येथे वैदिक किंवा अग्नीपूजक पंथाच्या लोकांचे वास्तव्य होते हे स्पष्ट होते. ही वास्तू म्हणजे एक मोठा कॉम्लेक्स होता. यात एक दक्षिणाभिमुख वर्तुळाकार आकाराचे मंदीर होते. या मंदिराला एकच प्रवेशद्वार होते. या मध्यवर्ती मंदिराच्या चहुबाजूस आयताकृती आकारांचे कक्ष आणि त्याच्या मागे साधारण 3 मीटर खोलीची व 37 विटा वापरून बांधलेली यज्ञकुंडे होती. त्यांचे बांधकाम अनेक प्रकारच्या आकाराच्या भाजलेल्या विटांनी (त्रिकोणी, डमरू) केलेले होते. यज्ञकुंडात अग्नी पेटवला गेला असल्याच्या अनेक खुणा होत्या व त्रिशुळाचे चित्र रेखलेले 5 घट होते. या शिवाय या सर्व कॉम्प्लेक्स मध्ये पशुंच्या हाडांचे तुकडे (बहुधा बली दिलेल्या) व या बलीदान विधींसाठी वापरली जाणारी भाजलेल्या मातीची बोल्स, झार्या, किटल्या, लोखंडी सुरे आणि भाल्याची अग्रे या सारखी उपकरणे सापडली. यावरून राजे मंडळी येथे पुत्रकामेष्टी सारखे किंवा देवतांना प्रसन्न करण्यासाठीचे यज्ञ समारंभ करून पशूंचे बली देत असावेत असा निष्कर्ष काढता येतो. याशिवाय येथे चुनखडीच्या दगडातून बनवलेली, राजाला आलिंगन देत असणार्या व जानवे घातलेल्या राजगुरूची मूर्ती, रोमन सम्राट टायबेरियस याच्या प्रतिमेसारखी दिसणारी प्रतिमा उमटवलेली, चांदी व सुवर्ण लेप दिलेली नाणी व भाजलेल्या मातीची सील्स येथे सापडली. ब्राम्हण पुजार्यांच्या समाजातील स्थानाची यावरून चांगली कल्पना येते."
यज्ञविधी करणे व त्या वेळी पशूंचे बली देणे या शिवाय सातवाहन कालातील समाज धार्मिक विधी म्हणून मूर्तिपूजा करत होता का? या प्रश्नाचे उत्तर कोंडापूर उत्खननातून स्पष्ट रितीने मिळते. वर वर्णन केलेल्या वर्तुळाकार मंदिराच्या परिसरात लज्जागौरीच्या ( प्रजननक्षमतेची देवता) अलंकार भूषित अनेक नग्न मूर्ती मिळाल्या. या बरोबरच लोखंडात बनवलेली काही पूजेची उपकरणेही सापडली. या शोधामुळे येथे लज्जागौरीची पूजा केली जात होती याचा स्पष्ट पुरावा मिळाला होता.
थोड्या विषयांतराचा धोका पत्करूनही मी कोंडापूर उत्खननाबद्दलची ही माहिती येथे देण्याचे कारण, मला तेर आणि कोंडापूर येथे पुरातत्त्व विभागाला सापडलेल्या वास्तू आणि वस्तू यात किती साम्य आणि साधर्म्य आहे ही बाब ठळकपणे वाचकांना दर्शवून देणे आवश्यक वाटते. त्याचबरोबर हेही लक्षात येते की या दोन्ही ठिकाणचे समाज तशाच आणि त्याच धार्मिक परंपरा आणि रुढी पाळत होते. 1959 मध्ये लिहिलेल्या आपल्या अहवालात श्री. बी.एन.चाफेकर या बद्दल लिहितात:
" तेर आणि कोंडापूर या दोन्ही जागांवर सापडलेल्या मूर्तींची शैली आणि तंत्र या मध्ये दिसणार्या कमालीच्या साम्यामुळे असे खात्रीपूर्वक म्हणता येते की या दोन्ही ठिकाणी भाजलेल्या मातीच्या वस्तू बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होते आणि या उद्योगांमध्ये सततची व्यापारी देवघेव आणि संबंध, ही दोन्ही ठिकाणे भौगोलिक दृष्टीने नजीक असल्याने, राखले जात होते. किंवा अशीही शक्यता वाटते की या दोन्ही ठिकाणी उत्पादन झालेल्या वस्तू एका निराळ्या व बाहेरच्या बाजारपेठेस निर्यात होत होत्या. "
तेर येथील उत्खननाकडे परत वळूया. येथे मिळालेल्या इतर पुरातन वस्तुंमध्ये मौल्यवान खड्यांचे मणी, शिंपल्यामधून बनवलेली कंकणे, नक्षीकाम केलेले अस्थींचे तुकडे, हस्तीदंत तुकडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एका बाजूला उभ्या असलेल्या दासी, दुसर्या बाजूस लक्ष्मीची आकृती आणि मध्यभागी एक शाही जोडपे असे चित्र कोरलेला एक हस्तिदंती कंगवा येथे सापडला. शैलीवरून हे कोरीव काम इ.स. पहिल्या शतकातील असावे असे म्हणता येते.
पुरातत्त्व विभागाच्या अहवालाप्रमाणे, तेर येथील उत्खननात सापडलेला, इ,स,पहिल्या शतकामधील आणि धार्मिक कार्यासाठी वापरला जाणारा कॉम्प्लेक्स आणि त्याच जागी तीर्थकुंड, यज्ञवेदी, यज्ञात वापरावयाची भांडी आणि लंबवर्तुळाकार आकाराची एक भिंत असलेली वास्तू हे सर्व सापडणे हे महत्त्वपूर्ण मानले पाहिजे. तसेच इतिहास पूर्व कालातील (protohistoric), अग्नी दिलेल्या शवाची रक्षा परत जमिनीत पुरणे (secondary burial), या सारख्या आधीच्या परंपरा आणि रुढी, ज्ञात इतिहासाच्या अगदी सुरवातीच्या कालात (early historical level,) आधीच्या कालाप्रमाणेच चालू राहिल्या होत्या ही गोष्ट सर्व प्रथम तेर उत्खननाच्या अहवालातून सांगितली गेली आहे.
यानंतर 1988-89 मधील उत्खननाकडे वळूया. या ठिकाणी आधी 1986 मध्ये, सर्व्हे नम्बर 406/1 आणि 406/2 या ठिकाणची जमीन नांगरत असताना, शिलालेख कोरलेला एक स्तंभ मिळाला असल्याने, येथे उत्खनन सुरू केले गेले. ही जागा तेर गावाच्या नैऋत्येला सुमारे अडीच किमी वर असून तेरणा नदीच्या उत्तरेला 1875 मीटर अंतरावर नदीपात्रापासून सुमारे 20 मीटर उंचीवर आहे. येथे सापडलेल्या वास्तूचा अचूक आराखडा जरी सांगता येत नसला तरी ही वास्तू एक भिंत लंबवर्तुळाकार असलेली असावी. स्तंभ उभे करण्यासाठी म्हणून घेतलेले अंडाकृती आकाराचे काही खड्डे आढळून आले. चुनखडीच्या पाषाणामधे (limestone) कोरलेले पुरुषाचे एक 34 X 17 X 10 सेमी आकारमानाचे पूर्णरूप (full relief) शिल्प येथे सापडले. या शिल्पामधील पुरुष धोतर नेसलेला असून कंबरेला त्याने चौकोनांचे डिझाइन असलेला पट्टा बांधलेला आहे. त्याच्या गळ्यात एक सुवर्णहार असून कानात कर्णभूषणे आणि पगडीवजा सपाट शिरस्त्राण वापरलेले आहे. उजवा हात कंबरेवर ठेवलेला असून डावा हात कपाळाजवळ असलेल्या पगडीच्या टोकाला स्पर्श करतो आहे. पगडीच्या या टोकावर बहुधा हिरे भरतकाम करून बसवलेले आहेत. हे शिल्प एका 3 सेमी उंचीच्या चौथर्यावर उभे आहे. मात्र एकूण शिल्प ओबड-धोबड वाटते. याच प्रकारचे, चिनी मातीत व भाजलेल्या मातीत बनवलेले अनेक पुतळे या स्थानावर सापडले आहेत. 44 X 34 सेमी आयताकृती आकाराचा व 1.10 मीटर उंचीचा एक तुटलेला स्तंभ एका खड्यात गाडलेला सापडला. या स्तंभाच्या एका बाजूस अर्धे कमल पुष्प आणि जाळीचे डिझाइन ( हिनयान कालातील अगदी सर्वसामान्य कोरीवकाम) कोरलेले आहे. एक विटांनी बांधलेली चौरस वास्तू येथे सापडली मात्र या वास्तूचे प्रयोजन काय असावे हे समजू शकले नाही.
तेर येथील उत्खननात सापडलेल्या गोष्टींचे वर्णन एवढ्या बारकाईने मी वर केले आहे याचे कारण म्हणजे वाचकांना, रोम बरोबर चालू असलेल्या सातवाहन साम्राज्याच्या व्यापारामध्ये तेर गावाचे असलेले महत्त्व विशद व्हावे. तेर येथे पुरातत्त्व विभागाने बांधलेले एक संग्रहालय आहे त्यात थोड्या थोडक्या नाहीत तर तब्बल 23852 पुरातन वस्तू सांभाळून ठेवण्यात आलेल्या आहेत. या संग्रहालयाला भेट दिली असता तेर आणि रोम या मधील व्यापारी संबंधांची उत्तम कल्पना येऊ शकेल.
तेर येथील संग्रहालयात ठेवलेल्या पुरातन वस्तूंपैकी अनेक, या गावात वाण्याचा व्यवसाय करत असलेले कै. रामलिंगप्पा लामतुरे यांनी संग्रहित केलेल्या आहेत. कै रामलिंगप्पा यांना गाव आणि परिसर यांच्या इतिहासाबद्दल प्रचंड कुतुहल होते, गावातील मुले पटांगणावर खेळत असताना जमीन खोदून बघत असत. असे करत असताना त्यांना मधून मधून अचानकपणे पुरातन वस्तू सापडत असत. अशा वस्तू लामतुरे संग्रहित करून त्यांची व्यवस्थितपणे राखण करत असत. लामतुरे यांच्या मदतीमुळेच पुरातत्त्व विभागाला तेर संग्रहालयाची स्थापना करता आली. रामलिंगप्पा यांनी आपला सर्व पुरातन वस्तूंचा संग्रह तर या संग्रहालयाला भेट दिलाच पण त्यांनी इतर गावकर्यांचेही मन वळवले व त्यांच्याकडील, ज्यांची किंमत सुद्धा करता करता येणार नाही अशा पुरातन वस्तू आणि नाणी संग्रहालयाला भेट देण्यास भाग पाडले. या संग्रहालयाला कै. लामतुरे यांचेच नाव देण्यात आलेले आहे. संग्रहालयातील संग्रहाच्या व्यतिरिक्त, रामलिंगप्पा यांचे नातू श्री रेवणसिद्ध लामतुरे यांचेकडे त्यांचा वैयक्तिक संग्रह अजूनही आहे.
तेर येथे सापडलेल्या प्राचीन वास्तू आणि वस्तू यावरून हे स्पष्ट होते की येथील गावकर्यांमध्ये बौद्ध व वैदिक अशा दोन्ही धर्मांचे अनुयायी होते आणि या शिवाय प्रजननक्षमतेची देवी किंवा माता देवीची आराधना सुद्धा केली जात होती. तेर आणि कोंडापूर येथे सापडलेल्या मूर्तींमध्ये कमालीचे साम्य दिसून येते व यावरून या दोन्ही स्थानांमध्ये उत्तम दळणवळण सतत चालू होते असे म्हणणे योग्य ठरावे.
वर वर्णन केलेल्या उत्खननाला 40 वर्षे लोटल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाने परत एकदा तेर यथे उत्खनन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेला भारतीय पुरातत्त्व विभागाचा परवाना त्यांना जानेवारी 2015 मध्ये प्राप्त झालेला आहे. तेर येथील चार जागा उत्खननासाठी निश्चित केल्या गेल्या आहेत व कार्य लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. वाचकांना आतापर्यंत कल्पना आली असेलच की सातवाहन काल आणि दख्खनच्या पठाराच्या इतिहासाच्या आकलनाच्या दृष्टीने तेर येथील उत्खननांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढील पिढ्यांसाठी तेर येथील पुरातन वास्तू, भग्नावशेष आणि उत्खनन होणार्या जागांचे संरक्षण करणे हे यामुळेच अनिवार्य व अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
(समाप्त)
31 मार्च 2015
मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली चित्रे पाहण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.
आवडली ही पण लेखमाला. हे नवं
आवडली ही पण लेखमाला.
हे नवं उत्खनन साधारण किती दिवस चालेल?
तेर
उत्खनन किती दिवस चालेल हे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाला किती पैसे मंजूर झाले आहेत त्यावर अवलंबून राहील. तरी २ वर्षे तरी चालावे असे वाटते. (उत्खनन वर्षभर केले जात नाही.) बहुधा हिवाळ्यात केले जाते.
धन्यवाद!
धन्यवाद!
माहितीपूर्ण लेखमाला.
माहितीपूर्ण लेखमाला.
तेरणा आणि तगर
तेर हे नाव तेरणा नदीवरून आले आहे का? किंवा, उलट बाजूने, तेरणा नदीला तेरणा हे नाव तेर शहरावरून मिळाले आहे का?
असे काही नसेल तर माझा पुढील प्रश्न निरर्थक आहे. पण जर या दोन्हींचा काही संबंध असेल तर तेरचे जुने नाव तगर कसे? आणि (अवांतर,) तेरणा ही कोणे एके काळी तीर्णा होती असेल का?
लेखमाला नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
तेर का तगर
रोचक प्रश्न आहे. अंडे आधी का कोंबडी या प्रकारचा. माझ्या मताने तेरणा ही नदी आणि तिच्या काठी असलेले गाव म्हणून ते तेर अशीच नावे प्राचीन कालीही असावीत. तगर हे नाव पेरिप्लस आणि टॉलेमी याचा इतिहास-भूगोल, या प्राचीन ग्रंथांमधून आलेले आहे व ते अर्थातच मूळ तेर या नावाचा अपभ्रंश ग्रीक भाषेत भाषांतर करताना झालेले आहे. कल्याण, सोपारा, चोल या सारख्या अनेक गावांची अपभ्रंश झालेली ग्रीक ग्रंथांमधील नावे मी आधीच्या भागात दिलेली आहेत.