Skip to main content

'पल भर के लिये कोई मुझे प्यार कर ले...'

काल लई वर्षांनी टीव्हीचा रिमोट हातात मिळाला. सर्फता सर्फता ’दिल है के मानता नही’ दिसलं. थांबले.

त्यात शेवटच्या कडव्यापूर्वी पूजा भट आणि आमीर खानचा बागेतला प्रसंग आहे. कलिंगड खातानाचा प्रसंग. आमीर ते कलिंगड तस्सं एका बुक्कीत फोडून खातो आहे. पूजा भट त्याच्याकडे पाहतेय. तो तंद्रीत कलिंगडात मग्न. त्याच्या गालावर चिकटलेली बी. न राहवून पूजा भट ती बी काढते आणि मग - स्वप्नातून जागी होते. मग जाते नि तिरीमिरीत कलिंगड हिसकावून घेते! आमीर बिचारा एकदा घेऊ बघतो, नाही. दुसर्‍यांदा घेऊ बघतो, नाहीच देत. मग फिस्कारून हात उडवतो नि जातो झोपायला. ’डोण्ट टच मी!’ची पाटी लावून. काय फणकारा! अविश्वासानं बघत राहिलेली पूजा भट.

आख्खं गाणं बघितलं नि मग माझ्या लक्षात आलं, गाण्याचं चित्रीकरण किती काळ लक्षात राहिलं होतं ते.

मग अशीच गाणी आठवत गेली. एरवी कवायतीमास्टर नाहीतर पडदेमास्टर असलेल्या शामक दावरच्या नृत्यदिग्दर्शनाखालचं ’दिल तो पागल है’मधल शाहरुख-माधुरीचं एक गाणं आठवतंय? शाहरुख आणि माधुरीची एक जोडी कथानकातल्या वास्तवातली. एक जोडी त्या जोडीला न्याहाळणारी. पहिली जोडी भांडतेय, दुसरी त्या भांडणातली गोडी जाणवून मनापासून खुशाललेली. पहिली जोडी एकमेकांच्या पानातलं पळवून खाण्यात मग्न, दुसरी प्रेमभरानं त्यांना न्याहाळणारी. ते पाहून मला तेव्हा ’चार दिवस प्रेमाचे’ नामक मराठी नाटकातल्या नायक+नायकाचं मन आणि नायिका+नायिकेचं मन अशा अशक्य चलाख क्लृप्तीची आठवण झाली होती.

तुम्हांला आवडतात - आठवतात अशी गाणी निव्वळ चित्रीकरणामुळे लक्षात राहिलेली? असणारच.

गुरुवर्य विजय आनंद यांच्या सिनेमातली बहुतेक गाणी त्यात हजेरी लावून जातील. खिडक्या-फेम 'पलभर के लिये...'त्यात असेलच. ग्लासात बर्फाचा तुकडा टाकल्यावर गारठलेली नूतन असलेलं ’इक घर बनाउंगा तेरे घर के सामने’ही नक्की असेल. काही केवळ थोर मुद्राभिनयामुळे अजरामर झालेली निघतील. ’जाती हूं मै, जल्दी है क्या’सारखी काही निव्वळ आचरट नि बीभत्स नाचामुळे लक्षात राहिलेली असतील. हिरवा-हिरविणींनी एकमेकांना खुन्नस देत म्हटलेली अनेक पार्टी-सॉंग्स असतील. काहींशी तुमच्या एखाद्या खास आठवणीचा धागा जुळलेला असेल...

सांगा ना, तुम्हांला कुठली गाणी चित्रीकरणामुळे आवडतात-आठवतात, नि त्यांत काय आहे असं विशेष?

"मुझे जाँ ना कहो मेरी जान" - अत्यंत सुश्राव्य, आणि एक ठहराव असलेलं गाणं आहे. प्रश्नच नाही.

.शुचि. Wed, 01/07/2015 - 16:37

या गाण्याने माझ्या अंगावर काटा आणलेला आहे- त्या मुलाची (आईच बहुतेक) नाचणारी आहे. ती नाचते आहे अन मुलगा बाहेर बसला आहे. गिर्‍हाइकं येतात अन आपले बूट फेकून जातात व तो बूट पॉलीश करत रहातो. त्याचा जो षंढ्/अगतिक राग दाखविला आहे, अन गिर्‍हाइकांचा माजुर्डेपणा. एकदकम चटका बसतो.

https://www.youtube.com/watch?v=QiP1UatNrVQ&index=3&list=PL0N5Xw9ii8--E…

राज कपूर चे डायरेक्शन पॉइन्ट्स क्या केहेने.

मनमानसी Thu, 09/07/2015 - 15:31

In reply to by .शुचि.

बूट पॉलीश मधलंच 'चली कौनसे देस गुजरिया तू सज धज के'पण सुंदर गाणे आहे. इतकुशी छोटुशी पोरगी आपला घागरा पकडुन 'जाउ पिया के देस' म्हणताना नकळत अस्वस्थ करुन गेली.

घाटावरचे भट Wed, 01/07/2015 - 17:29

अंगूर सिनेमातलं 'प्रीतम आन मिलो' त्याच्या गाण्यातील आशयाशी अतिशय विरुद्ध अर्थाच्या विनोदाकडे घेऊन जाणार्‍या चित्रीकरणामुळे लक्षात आहे (आणि झकास वापरलेल्या साध्यासुध्या यमनमुळे सुद्धा). आणि गायकाच्या आवाजामुळेही, कोण बरं आहे गायक? कोणास ठाऊक आहे काय?

चिंतातुर जंतू Wed, 01/07/2015 - 17:36

In reply to by घाटावरचे भट

मूळ गाणं सी. एच. आत्माच्या आवाजात -

हे गीता दत्तच्या आवाजातलं -

अंगूरमधलं सपन चक्रवर्तींच्या आवाजात आहे.

अनुप ढेरे Wed, 01/07/2015 - 17:43

अन्नु मलिकचा वर उल्लेख आला आहेच. नुकत्याच आलेल्या त्याच्या सिनेमातलं हे गाणं मला बेहद्द आवडलं. साधारण विसेक वर्षापूर्वी सर्रास दिसणारी गाणी होती तसं गाणं.


ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे भूमी पेडणेकरचं सहजपणे नाचणं. जाडजुड असून आयुषमान खुरानापेक्षा तिचं नाचणं खूप सहज वाटतं.

ऋषिकेश Wed, 01/07/2015 - 19:32

गल्लन गुडीया हे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'दिल धडकने दो' या चित्रपटातील गाणं मला चित्रीकरणासाठी आवडलं.
दावरछाप मॉब इथे आहे पण त्या कवायतींना सरावलेल्या डोळ्यांना इथे धक्का बसतो तो गाण्यातील मॉब ओळखीचा असण्याचे. मॉबमध्ये दिसणारे बहुतांश चेहरे हे नुसते चेहरे नसून त्या चित्रपटात बर्‍यापैकी उभी राहिलेली पात्रे आहेत. (अर्थात चित्रपटात खूऽऽऽप पात्रे आहेत)

शिवाय इथे क्यामेरा एका अँगलला लाऊन पात्रे त्याच्या समोर नाचत नाहीत तर अनेकदा पात्रे आपल्याच जागी नाचत असतात क्यामेरा ती पार्टी सर्वत्र फिरत कव्हर करत असतो. शिवाय नाचणार्‍या व्यक्तींना स्वभाव आधीच चिकटलेले असल्याने हा मॉब बघणे खूप जिवंत अनुभव देतो. मोठ्या पडद्यावर तर हा नाच बघुन खूपच मजा आलेली

जाता जाता: हा चित्रपटही एकुणात आवडणार्‍या अल्पसंख्यांपैकी मी आहे.

मनमानसी Thu, 09/07/2015 - 15:46

In reply to by ऋषिकेश

गाणं आणि चित्रपट दोन्हीही आवडले. फरहान अख्तर आणि रणवीर सिंगसोबत प्रियांकाही तेवढ्याच ताकदीने नाचताना बघुन उगाच वाटले, मुद्दामच त्यांच्यातले नाते आणखी ठळकपणे दाखवण्यासाठीच तिला त्या दोघांच्या मधे नाचायला सांगितले कि काय. नाहीतरी प्रियांकाच्या capabilities वर फक्त त्या दोघांचाच भरवसा दिसतोय.

सानिया Thu, 09/07/2015 - 17:46

In reply to by ऋषिकेश

खरंतर नाचणार्‍याभोवती प्रचंड चकचकाट, मोठ्ठा ताफा आणि नको तेवढा व नको तेव्हा गर-गर फिरणारा कॅमेरा याची मला चीड आहे, पण हे चित्रीकरण आवडलं. चित्रपट बघण्याचा कधी योग येतोय ते बघायचं.

अजो१२३ Thu, 02/07/2015 - 00:03

तुम्हांला कुठली गाणी चित्रीकरणामुळे आवडतात-आठवतात, नि त्यांत काय आहे असं विशेष?

---- लहानपणी नोकरीतल्या कज्ज्यांमुळे वडील वर्ष वर्ष गायब असत तेव्हा आईची जी मनोवस्था असे ती या गाण्यात नर्गिस हुबेहुब दाखवते. गाणं आर्ततेचा उच्चांक आहे. ग्रामीण द्रारिद्र्याचं जे चित्रिकरण झालं आहे त्यात किंचिंतही कृत्रिमता भासत नाही.

मनात यायला देखिल परवानगी घ्यायची? या गाण्यात बरंच मिस्टिक मिस्टिक असं काही आहे. राज कपूर आणि नववारीतली अमराठी अभिनेत्री यांची केमिस्ट्री काय आहे गाणं कितींदा पाहूनही कळलं नाही.

हे मी सर्वात अधिकदा ऐकलेलं गाणं असावं. याचं नि माझं एक भावविश्व आहे. याचं एकदा सवडीनं रसग्रहण करायचं आहे. कोणतंही गीत २-४ पेक्षाजास्त वेळा ऐकलं तर तात्पुरता वीट येतो. हे गाणं विशेषतः एकांताच्या रात्री जितकं घोटावं तितकं जास्त गोड लागतं.

वडीलांना मी नेटचा जमाना आल्यावर जुनी गाणी ऐकायला मिळताहेत तुम्ही फर्माईश करा असे म्हणालेलो. तेव्हा त्यांनी "तुम तो प्यार हो" ऐकायची दशकांपासूनची इच्छा आहे असे सांगीतले. ऐकल्यानंतर मीही गाण्याचा फॅन झालो. यातल्या प्रदीपला आम्ही जितेंद्र समजायचो अगोदर.

अभी न जाओ छोडकर? रुसलास? रियली?

मेघना भुस्कुटे Thu, 02/07/2015 - 08:06

In reply to by अजो१२३

हे मी सर्वात अधिकदा ऐकलेलं गाणं असावं. याचं नि माझं एक भावविश्व आहे. याचं एकदा सवडीनं रसग्रहण करायचं आहे.

प्लीज, करा की. मलाही फार आवडतं ते गाणं.

चिंतातुर जंतू Thu, 02/07/2015 - 14:15

गाण्याच्या चित्रीकरणात चेतन आनंद हा आणखी एक दादा. उदा. हे पाहा -

कलंदर पण गरीब टॅक्सी ड्रायव्हर नायक अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर दिसतो, तर श्रीमंत नायिका बंगल्याच्या पार्श्वभूमीवर. दोघांमधलं अंतर दाखवणारा रस्ता मध्ये आहे.

किंवा ही गाडीच्या प्रवासात खालच्या बर्थवरून वरच्या बर्थवरच्या पोरीची केलेली मनधरणी -

चिंतातुर जंतू Thu, 02/07/2015 - 14:38

बिमल रॉय हे असेच गाण्यांचं उत्कृष्ट चित्रीकरण करणारे आणखी एक दिग्दर्शक -

माहेरची सय आणणारी पारंपरिक रचना, तीही जात्यावर बसलेल्या बाईच्या तोंडी घातली आहे, पण ह्या सुपरिचित घाटाचा वापर तुरुंगातल्या महिला कैद्यांची स्वातंत्र्याची आस दाखवण्यासाठी करणं हा ब्रिलियंट बिमल रॉय टच आहे. शिवाय, तुरुंगाच्या उंचचउंच उभ्या सपाट भिंती, उभे खांब, खिडक्यांचे गज, दरवाजे, महिला कैद्यांच्या गणवेषावरच्या रेषा असे सगळे घटक एकत्रित आणले आहेत आणि त्यातून बायकांना बंदिस्त ठेवणाऱ्या विविध (लक्ष्मण?)रेषा सूचित केल्या आहेत. नायिकेवर गाणं चित्रित नाही. त्यामुळे त्या सगळ्याच स्त्रियांची वेदना ते दाखवतं; तिची एकटीची नाही.

रोचना Fri, 03/07/2015 - 11:56

In reply to by चिंतातुर जंतू

"मोरा गोरा अंग लै ले" साठी बिमल राय आणि सचिन देव बर्मनांशी झालेल्या दीर्घ चर्चेबद्दल गुलजार ने लिहीलंय. प्रत्येक वाक्य, दृश्य आणि चाल किती विचारपूर्वक ठरवली जात असे याची कल्पना येते.

"जलते हैं जिसके लिये" बाबत सुद्धा सचिन दा आणि बिमल रायांमध्ये झालेल्या वादाबद्दल कुठे तरी वाचलंय. सुनील दत्त ला गाणं टेलिफोन वरून म्हणताना दाखवायची आइडिया सचिनदांची होती, आणि त्याचा अट्टाहास धरला. शेवटी बिमल दा विरघळले.

रुची Mon, 06/07/2015 - 22:26

In reply to by चिंतातुर जंतू

अतिशय सहमत. बिमल रॉयंचच दिग्दर्शन असलेलं 'परख' मधलं हे एक नितांतसुंदर गाणं,

चौकटीमागून दिसणारा साधनाचा गोडमिट्ट चेहरा, पावसाचे सुंदर चित्रण, दूरून न्याहाळणारा मोतीलाल वगैरे सारेच अविस्मरणीय! हे चित्रण पहाताना, अशा हळूवार, तरल प्रेमभावना आताशा 'आउट ऑफ फॅशन' झाल्या आहेत याबद्दल किंचित हुरहूर वाटणं हे मात्र वय झाल्याचं हमखास लक्षण असावं :-).

प्रसन्ना१६११ Thu, 02/07/2015 - 16:29

गाणं अन चित्रीकरण दोन्ही मस्त आहे! (अभिनय वगैरे जाऊ द्या हो..गालावरच्या खळीसाठी आणि गाण्यात येणार्‍या 'इशश्..' साठी हे पहायलाच पाहीजे!

मेघना भुस्कुटे Fri, 03/07/2015 - 09:22

अनेक भारदस्त आणि दुर्मीळ लेखकांकडून मोलाचे प्रतिसाद आल्यामुळे, काही लोकांना या धाग्यातून युतीचे मांगल्य दिसल्यामुळे आणि वर अनपेक्षितपणे शंभरी गाठल्यामुळे - जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यावर भारावलेल्या पण बावचळलेल्या जितेंद्रच्या चेहर्‍याप्रमाणे हा धागा उजळून निघाला आहे, इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवीत आहे.

फारएण्ड Sun, 05/07/2015 - 08:31

In reply to by मेघना भुस्कुटे

मी गेला आठवडाभर येथून ऑफलाईन होतो. माझी ही गाणी टाकू द्या. म्हणजे मला आवडलेली. :)

आत्ता फक्त वाचतो आहे. मस्त धागा आहे.

घनु Fri, 03/07/2015 - 11:05

"घर" सिनेमातील बरीचशी गाणी चित्रीकरणामुळे लक्षात रहातात. विशेष म्हणजे कुठलेच निसर्गसौंदर्य त्या चित्रीकरणात नसुनही केवळ अभिनय आणि रेखा-विनोद च्या केमीस्ट्री मुळे फारच रोमँटिक वाटतात आणि म्हणून लक्षात रहातात.
१. आप की आंखो मे कुछ (त्यात लता ते मधेच हसते ते फार गोड आहे. पण आमची आशा असती तर अजून कमाल हसली असती, असो! )
२. तेरे बिना जिया जाये ना (ह्या गाण्यात रेखा गाण्यात मग्न असते आणि विनोद घरात येऊन भिंतीमागे लपून गाणं ऐकत असतो, रेखा विनोदला पहाते आणि एक छान रोमँटिक लुक देते, मग गाण्यात थोडा पॉ़ज आणि पुन्हा सुरू, खतरनाक रोमँटिक प्रकरण आहे ते सगळंच :).

नाहीतर त्या काळातल्या शिणेमात, असा हिरो लपून आपल्याला पहातोय असं दिसलं की हिरॉईनी लगेच अय्या,इश्श किंवा तोंडात कलिंगड जाईल एवढा आश्चर्याचा 'आ' करत असत किंवा घाईची लागल्यासारखी बाथरूम सॉरी बेडरुम कडे पळत जात आणि लाजत आपल्या शरीराचा डोलारा बिछान्यावर आदळत...अर्रे क्काय!!!!

बॅटमॅन Fri, 03/07/2015 - 12:15

In reply to by घनु

नाहीतर त्या काळातल्या शिणेमात, असा हिरो लपून आपल्याला पहातोय असं दिसलं की हिरॉईनी लगेच अय्या,इश्श किंवा तोंडात कलिंगड जाईल एवढा आश्चर्याचा 'आ' करत असत किंवा घाईची लागल्यासारखी बाथरूम सॉरी बेडरुम कडे पळत जात आणि लाजत आपल्या शरीराचा डोलारा बिछान्यावर आदळत...अर्रे क्काय!!!!

अतिनेमके!

अमुक Sat, 04/07/2015 - 15:57

नासिर हुसेनच्या 'जो जीता वही सिकंदर'मधील 'पहला नशा पहला खुमार' -

अतिशय प्रसन्न, उत्साही चित्रिकरण. जवळपास संपूर्ण गाणे मंद गतीत सादर करण्याचा हिंदीतला बहुधा पहिलाच ‌प्रयत्न. त्यापूर्वी मणिरत्नमने तमिऴमध्ये हा प्रयोग 'थलपती'मध्ये 'काट्टुकुयिलं' या होळीच्या गाण्यात केला आहे.

हिंदीत हे गाणं 'होली आयी मस्ती छायी' म्हणून प्रदर्शित. मणिरत्नमच्या त्या काळच्या अनेक चित्रपटांत (उदा. अंजली, गीतांजली, इ.) गाण्यांच्या आणि दृश्यांच्या चित्रिकरणासाठी माणसांच्या पाठीमागून प्रखर पांढरा प्रकाश सोडून चेहर्‍यावरील भावांऐवजी फक्त आकृतीकडांनी वेगळा दृश्यपरिणाम साधण्याचा प्रयत्न.

----

बिजॉय नांबियार दिग्दर्शित 'शैतान' चित्रपटातले 'खोया खोया चाँद' हे गाणे अनेक बाबींमुळे लक्षात राहिले आहे. मुस्लिम वस्तीतल्या जुन्या चाळीतला एक चिंचोळा बोळ, आवाजाची बटने गरागरा फिरवणारा मुलगा, मंद गतीत खाली पडून ग्लास फुटताना सुरू होणारे पार्श्वसंगीत, दोन इन्स्पेक्टर नि केनियाचे कोकेन विकणारे गुंड यांचा गोळीबार, खाटेला बांधलेली एक जर्मन मुलगी, बुरखे घेतलेला सैरावैरा धावणारा कंपू, गच्चीवर नमाज पढणारे मुस्लिम, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर कापसाच्या ढिगार्‍यात मंद गतीत उडी मारताना दिसणारी कल्की, आपण काय करत आहोत नि काय करणार आहोत याची सुतराम कल्पना नसलेले ढिगार्‍यात विसावलेले तरुण/तरूणी नि या सर्वांसोबत जाणारा 'सुमन श्रीधर'चा पार वेगळा आवाज. इतक्या सगळ्या असंबद्ध घटकांना बांधून कथानक पुढे नेणारे हे गाणे चित्रपटगृहात पाहणे हा एक जबरदस्त अनुभव होता. मंद गतीतल्या दृश्यांच्या प्रभावी वापराचे एक उदाहरण.

(मंद दृश्य दाखवताना गाण्याची गतीही त्यासोबत अचानक मंद करण्याचे उदाहरण म्हणजे 'सामना'मधील 'कुणीतरी अशी पटापट गंमत आम्हां सांगील काय' )

अनुप ढेरे Sun, 05/07/2015 - 10:37

In reply to by अमुक

त्याच सिनेमातलं अजून एक गाणं, पाठलागाचं

बि़जॉय नंबियारचे दोन सिनेमे मी पाहिलेत शैतान आणि डेविड. दोन्ही सिनेमांमध्ये काही गाणी विवक्षित ठिकाणी आहेत. एकदम अनपेक्षित ठिकाणी गाणं वेगळाच फील देतं.

डेविडमधलं मारिया पिताशे गाणं.

सानिया Sat, 04/07/2015 - 21:51

माझी अनेक आवडती गाणी प्रतिसादांमध्ये आली आहेत. याशिवाय पटकन आठवलेली म्हणजे,

१. मन आनंद आनंद
https://www.youtube.com/watch?v=_Trk-dB34a8
२. कौन आया कौन आया
https://www.youtube.com/watch?v=_Trk-dB34a8
३. रात भी है कुछ भीनी भीनी
https://www.youtube.com/watch?v=6jHCOLUsW6I

मन Sun, 05/07/2015 - 17:08

राजकपूरचे प्रमुख पिच्चर जे आहेत अनाडी, श्री ४२० वगैरे ; त्यावरुन राज कपूर म्हणजे सालस, सज्जन ,भोळसट किंवा चिंतित अशाच पात्रांच्या भूमिकेत असतो असा माझा समज होता. मी पूर्वी एक मस्त गाणं ऐकायचो; ते प्रथमच पाहण्यात आलं; तेव्हा पडद्यावरची टवाळ,टारगट हावभाव करणारी व्यक्ती राज कपूर आहे; ह्यावर विश्वास बसेना. अगदि डिक्टो शम्मी कपूरसारखेच एक्स्प्रेशन्स, हालचालित तो तसलाच वाह्यातपणा. राज कपूरना अशा अवतारात प्रथमच पाह्यलं. मला ती व्यक्ती शम्मी कपूरच असावी असा डौट आहे.
आणि हो, गाणंही मस्तय. बहुतेक भैरवी आहे सुरेख.
https://www.youtube.com/watch?v=uD5Pe4k3myI
.
.
जनुकांच्या ताकतीला सलाम.

मन Sun, 05/07/2015 - 17:18

https://www.youtube.com/watch?v=HRhc_rBp4rk
.
.
आणि हो, त्यावेळी रंगून इतर पूर्व भारतापेक्षा बरच बरं होतं. लहान गावातले लोकं मोठ्या शहरात जातात तसं शेजारच्या म्यानमारची राजधानी 'रंगून'ला जायचे वाट्टं.
(स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पाकिस्तान,म्यानमार हे भारतापेक्षा तुलनेनं जरा चांगल्याच आर्थिक स्थितीत होते म्हणतात. विशेषतः पाकिस्तानात सुपीक समृद्ध शेतीयोग्य भाग खूपच गेला पंजाब आणि बंगालकडचा; आणि म्यानमारचं इन्फ्रास्ट्रक्चर,सरासरी म्रुत्यूदर वगैरे भारताहून चांगला होता म्हणतात. )
ते खरं असेल तर त्या सामाजिक वास्तवाचा उल्लेख असलेलं लोकसंगीत म्हणता येइल की गाण्याला.
.
.
आणी ते तसं नसलं तरी माझं आवडतं आहेच. साधी माणसं, साध्या लोकांच्या साध्या भावना, हल्का हल्का डान्स (कमरतोड डान्स म्हणावं असं ह्यात असं काहिच नाही; सहजतेने केलेल्या स्टेप्स आहेत.)
.
.
एकूणात तुमचा संसार बरा चाल्ला असेल; आणि घरच्यांपासून जरा दूर कुठंतरी रहायला लागत असेल; अशावेळी ऐकलं तर अजूनच भावतं.
दूर असलेल्या जोडिदाराला "काय चाल्लय, कसं चाल्लय" ह्या प्रश्नाचं मिश्किल उत्तर म्हणून फोनवर ऐकवावं. :)

मन Sun, 05/07/2015 - 17:22

https://www.youtube.com/watch?v=VVOs_ATjikQ
.
.
ह्या गाण्यातले नायक-नायिका अजिबात परिचित वगैरे नाहित. गाणंही कोणत्या पिच्चरातलं ठौक नै.
पण गाणं सुपरहिट आहे. लोकांना ठाउक आहे. एकदा ऐकलं की दिवसभर तोंडात येत राहतं; कानात घुमत राहतं.
कानात वाजणार्‍या टेपला बंद करण्याचं बटन तर नसतच.
मूळ धून , ठेका कुठून्तरी ढापला असावा असा मला डौट आहे.

मन Sun, 05/07/2015 - 17:27

पन्नासच्या दशकातल्या टिपिकल हावभावांचा अभ्यास करायचा; तर हे गाणं आवर्जून 'पहावं'.
ऐकायला तर मस्त आहेच. 'चली चली रे पतंग मेरी चली रे'...मस्त.
.
.

https://www.youtube.com/watch?v=UOPkIpYEWlA

मन Sun, 05/07/2015 - 17:31

https://www.youtube.com/watch?v=XXoxYcO77b0
.
.
"हम्ये तो लुट्ट लिया म्यिल्के उस्न वालों ने "
.
.
गाण्यातलं मुख्य पात्र -- ज्यानं लांब फडकं बांधलय डोक्याला अरबस्टाइल, त्याचे एक्स्प्रेशन्स मस्त आहेत. गाण्याचे बोल, आशय जो आहे; ज्यात कळवळून शिव्या दिल्यात; तक्रार केलिये; त्यास चपखल असे त्याचे (बर्रेचसे नाटकी का असेना) हावभाव आहेत. मस्तच.

मन Sun, 05/07/2015 - 17:38

https://www.youtube.com/watch?v=M0BOplp0SGc
.
.
"ऊ ला ला..." हे आधी पाहिल्यावर अगदिच विचित्र्,भडक्क,बटबटित वाटलं.पंण त्या पिच्चरच्या ("डर्टी पिक्चर"च्या) संदर्भात पाहिल्यास हे खूपच परिनामकारक, नेमकं वाटतं. थोराड नसीरचं हिरो असणं; चेहर्‍यावर बेफिकिरी, थुलथुलीत विद्याचा ड्यान्सरुपी थयथयाट, पब्लिकचं हपापल्यासारखं करणं; सगळच भडक्क.

रुची Mon, 06/07/2015 - 22:46

रेहमानचे संगीत आणि प्रभूदेवाचे अशक्य छपरी चाळे यामुळे 'हमसे है मुकाबला'ची पट्टीरॅप आणि 'ऊर्वसी' ही गाणी अतिशय लक्षात राहिलेली आहेत. एवढा कळस पण तरी हसू आणणारा छपरीपणा इतरत्र पाहिल्याचे आठवत नाही.

त्याचबरोबर हे चावट गाणे आणि त्यातले खट्याळ आज्या-काकवांचे चित्रिकरणही भारी आहे.

या गाण्यांच्या यशात संगीताचा वाटा चित्रिकरणापेक्षा अधिक जास्त आहे हे मान्य पण तरी त्यातल्या वेगळेपणामुळे ती लक्षात रहातात.

बॅटमॅन Tue, 07/07/2015 - 11:53

In reply to by रुची

ते "मुक्काला मुक्काबला" विसरलात काय? मला आठवते त्यानुसार तेव्हा आम्ही यत्ता पैलीदुशली मध्ये असू. त्या गाण्याने इतका धुमाकूळ घातला होता की बस. पोरं वह्यांमध्ये चित्रंसुद्धा त्याचीच काढायची. तो 'बिनडोक्या' चा डान्स इतका खतरनाक, तुफ्फान हिट्ट होता की बस तेच्यायला. कैक वर्षांनी पुढे त्याची हिंदी लिरिक्स ऐकली तेव्हाही हसून पुरेवाट झाली होती. "काऊबॉय देखे मुझे, प्लेबॉय छेडे मुझे, सेक्स मेरे तनमे हैं" इ.इ. "पिकासो की पेंटिंग मेरे पीछे पकड के, टेक्सास में नाचें मिलके" वगैरे...

मनीषा Tue, 07/07/2015 - 21:35

इथे उल्लेखलेली बरीचशी गाणी माझ्याही फेव्हरीट लिस्ट मधे आहेत. परत सगळी ऐकते आहे.
आणखी काही --

१) https://m.youtube.com/watch?v=pueoTXV6FLY

चित्रलेखा चित्रपटातील -- संसारसे भागे फिरते हो ...
स्वर. लता आणि अभिनेत्री -- मीना कुमारी

२) https://m.youtube.com/watch?v=-6TTKHBiT6Y
दीवाने हम -दिवाने तुम -- यात अगदी वेगळ्या रूपातली हेलन दिसते आहे.

३) https://m.youtube.com/watch?v=UC3F3zByL3I
ठाडे रहियो .. यातील संगीत , अभिनय, चित्रीकरण सारे काही अविस्मरणीय आहे.

मनमानसी Wed, 08/07/2015 - 15:39

अशोका मधलं 'ओ रे कांची कांच कि पुडिया', गाण्याची चाल, न्रुत्य आणि बोल यामुळे खूप आवडलं. कधीही, कितीही वेळा ऐकलं तरी बराच वेळ ठेका डोक्यात घोळत राहतो.
https://www.youtube.com/watch?v=JcD6cdHmiiU

मनमानसी Wed, 08/07/2015 - 16:08

शायनी अहूजा आणि सोहा अली खान यांच्या खोया खोया चांद मधली -
'खोया खोया चांद'-
https://www.youtube.com/watch?v=2zf_gRe3yWk

'ये निगाहे'- https://www.youtube.com/watch?v=-WZzuFhX4Z4

'थिरक थिरक'- https://www.youtube.com/watch?v=N-XL-CBc2-s

या तिनही गाण्यांचे चित्रीकरण, बोल आणि ठेका जाम आवडतो.

मेघना भुस्कुटे Wed, 08/07/2015 - 17:21

चक्क 'मुगल-ए-आझम'मधलं 'प्यार किया तो डरना क्या' कसं काय नाही आठवलं कुणालाच?

त्यातल्या त्या आरशांचं कौतुक मी इतका काळ ऐकलं होतं, की प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर रंगीत आरसे पाहिले तेव्हा मला काहीच वाटलं नाही.

अवांतरः
पुढे बसलेले एक गृहस्थ उत्तेजित होऊन सगळा सिनेमा आधीच म्हणून टाकायच्या प्रयत्नात होते. त्यांना आवरणार तरी कितीदा? मला मजाच वाटायला लागली. नंतर नंतर सलीम आणि अकबराचे संवाद म्हणताना त्यांची तारांबळ होत होती, तेव्हा तर अजूनच मजा. शेवटी 'सिनेमा परत बघू आपण. याचं होऊ दे.' असं म्हणून मी पडद्यावरची गोष्ट दुय्यम ठरवून काकांचा आनंदच बघायला घेतला!

गब्बर सिंग Fri, 10/07/2015 - 11:12

In reply to by मेघना भुस्कुटे

प्यार किया तो डरना क्या - अगदी अगदी.

गाण्यादरम्यान बाई (मुमताज दहेलवी) अकबराच्या पुढ्यात खंजर नेऊन ठेवतात आणि त्याला "इष्क मे जीना इष्क मे मरना और हमे अब करना क्या" असं म्हणत - (तुला काय करायचं ते कर) - ठणकावतात ते एकदम जानलेवा. कलिजा खल्लास.

मनीषा Thu, 09/07/2015 - 12:48

आणखी एक सदाबहार गीत

चित्रपट ज्वेल थीफ

https://m.youtube.com/watch?v=YnfJ-dEmdaM

श्रवणीय आणी तितकच दर्शनीय सुद्धा

याच चित्रपटातील "होटों पे ऐसी बात मै .. " देखील छान आहे.

वैजयंतीमालाची बरोबरी करू शकतील अशा नृत्यंगना , हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच असाव्यात.

अनु राव Thu, 09/07/2015 - 16:12

In reply to by मनीषा

"होटों पे ऐसी बात मै .. " ह्या गाण्यात हिंदी सिनेमातले सर्वात(?) मोठ्ठे नृत्याचे आणि गाण्याचे शॉट आहेत. १-२ शॉट ४५-५० सेकंदाचे आहेत. आणि ह्यात शॉट्स मधे वैजयंतीमाला, बाकीचे नाचणारे, देवानंद आणि मुख्य म्हणजे कॅमेरा हे सर्व एका जागेवर नाहीयेत, १५-२० मिटरच्या वर्तुळात हलवले आहेत.

अवांतर : आराधना मधले "रूप तेरा मस्ताना" हे गाणे एका च शॉट मधे ( जवळजवळ ३ मिनिटे ) चित्रीत केलेले आहे. ह्यात सुद्धा नट नटी आणि कॅमेरा एक जागेवर स्थिर नाहीये. कधी कोणाला जाणवले आहे का ते गाणे बघताना?

मनीषा Thu, 09/07/2015 - 16:50

In reply to by अनु राव

"रूप तेरा ..." बद्दल ऐकलं होतं .

त्याच चित्रपटातील " मेरे सपनोंकी रानी .." बद्दलही असं ऐकलं आहे, की त्या गाण्यासाठी राजेश खन्ना आणि. शर्मिलाचे वेगवेगळे शुटींग घेतले होते. आणि नंतर त्या दोन फ्रेम्स एकत्रं केल्या आहेत. पडद्यावर ते दोघे एकमेकांकडे बघत अभिनय करताना दिसतात. परंतु प्रत्यक्षात त्या पूर्ण गाण्याच्या शुटींग दरम्यान ते कधीच एकत्रं नव्हते म्हणतात.

अमरप्रेम मधील "चिंगारी ... " बद्दलही असच काहीसं ऐकलं आहे , पण आत्ता नक्की आठवत नाहीये.

गब्बर सिंग Fri, 10/07/2015 - 13:32

.

हे गाणं (थोडंसं चित्रीकरण काळपट आहे) दिलीप व मधुबाला च्या पडद्यावरच्या रोमँटिक "फूल खिले चमन चमन" साठी आवडतं. (यालाच ऑन स्क्रीन केमिस्ट्री म्हणतात का ?? ) गाणं असं चढत जातं जशी एखादी पिनो न्युआर चढत जावी तसं. सज्जाद सारख्या मनस्वी कलाकाराने दिलेले संगीत, तलत ने लताबाईंच्या तारसप्तकाशी जमवून घेतलेले आहे असे स्पष्ट जाणवते. पण गाणं लाजव्वाब. याची चांगली हाय-डेफिनिशन ऑडिओ+व्हिडिओ मी अनेक वर्षे शोधतोय.

---------------

.

या गाण्यात नूतन च्या अदा एकदम कातिलाना. "तुम अगर मेरी नही तो परायी भी नही" असं तो म्हणतो त्यानंतर ती गुच्छाने आपला चेहरा झाकते ते घायल करून टाकणारे. दिल पे छुरिया चलाती है वोह. "तुम हसीं हो तुम्हे सब प्यार करते होंगे" या दुसर्‍या कडव्यात व नंतर "फूल की तरहा हंसों" या तिसर्‍या कडव्यात सुद्धा तिच्या अदा "हुआ जो तीर कोई नीमकश तो क्या हासिल" ची आठवण करून देणार्‍या.

एकुणात हे गाणं पडद्यावरील नूतन व राज यांच्या "आदानप्रदानां" बद्दल लक्षात रहावे. मुकेश व रोशन दोघांनी आपापले काम चोख केलेले असले तरी.

प्रथमेश नामजोशी Tue, 14/07/2015 - 11:47

लक्षात राहिलेली बरीचशी वर येऊन गेल्येत. ही अजून काही.

'चलो दिलदार चलो' आणि 'अजीब दास्तां है ये' त्यातल्या नदी आणि होडीमुळे.

जब वी मेटमधलं 'आओगे जब तुम साजना'.

'कजरारे'.

'एकदोतीन चारपाचछे..', लज्जामधलं 'बडी मुश्कील', अंजाममधलं 'चनेके खेतमें' माधुरीमुळे.

आपके है कौनमधील 'ये मौसम का जादू है मितवा' -दीक्षितच्या लाल ड्रेसमुळे आणि शेतात बसल्याबसल्या मासिकंबिसीकं आवरून ठेवत असल्याचं दाखवलंय त्यामुळे.

ऋषिकेशच्या घुसळकुमारीचं ( :p ) 'अरे जारे हट नटखट' आणि 'तुम्हावर केली मी मर्जी बहाल'.

अंतराआनंद Fri, 17/07/2015 - 15:23

मेघना, या धाग्याबद्द्ल परत परत शतशः कौतुक. काही नविन गाणी कळली. कितीतरी गाणी नव्याने कळली. आठवणीतली काही गाणी ताजी झाली.

सामो Tue, 19/03/2019 - 18:07

https://www.youtube.com/watch?v=xxjvz-WGhaE&t=0s&index=34&list=PLo4u5b2…
या गाण्याच्या सादरीकरणाइतके उत्तम सादरीकरण मला आठवत नाही.

'आज फिर जीनेकी तमन्ना है' .................... अतिशय सुंदर सादरीकरण. जितकं गोड गाणं वहीदाचा तितकाच सुंदर, खळखळत्या झऱ्यासारखा अभिनय.
https://www.youtube.com/watch?v=BpLyDTEw3Z4
____________
मेघनाने परत यावे.

भटकभवानी Sun, 24/03/2019 - 20:30

चुपके चुपके चित्रपततील अब तो सजन सावन मे गाणे . शर्मिला टागोर आणि सगळ्याऺचाच उत्तम अभिनय!

आणि प्यासा!!! ये दुनिया अगर मिल भि जाये तो क्या है म्हणणारा उध्वस्त गुरु दत्त . तो जेव्हा ख्रिस्ता सारखा दोन हात दाराच्या चौकटीवर ठेवून उभा रहातो तेव्हा आईशप्पथ अंगावर काटा येतो. हम आपकी आखोंमें इस दिल्को बिछादे तो गाण्याचे चित्रिकरण पण अप्रतिम आहे.

फूलनामशिरोमणी Thu, 28/03/2019 - 22:34

Love Per Square Foot हा सिनेमाच खूप गोड होता. त्याचं शीर्षकगीत एकदाच ऐका - एकदम डोक्यात फिट्ट बसेल!
https://youtu.be/ES7eGJXLNe4

ह्याची कोरिओग्राफी इतकी सहज वाटते! ऐकलं की उत्साह येतो
https://youtu.be/6vKucgAeF_Q

October सिनेमातलं 'मनवा रुआ सा' हे अगदी 'गेहरा दर्द' कॅटेगरीतलं
https://youtu.be/KHIJmehK5OA

फूलनामशिरोमणी Thu, 28/03/2019 - 22:38

मला वाटतं आजकाल जग जवळ आलंय तितकंच, कामा निमित्त प्रवास, नवरा बायकोंनी करियर साठी वेगवेगळ्या शहरात राहणं, हे पण बरेचदा दिसतं ... कदाचित अनिवासी भारतीय म्हणूनपण असेल, हे गाणं खूप म्हणजे खूपच सेंटी करून जातं
https://youtu.be/3EfX3kAM1Ks