कथा

       निर्णय
      ======

सावीने लगबगीने सर्व  सकाळची कामे आटोपलीे.ती आॅफिसला जाण्यास निघाली इतक्यात........
'ट्रिंग ,ट्रिंग 'करत फोनची बेल वाजली. नापसंतीचा कटाक्ष टाकुन तरिही चडपडत उशीर होत असतांनाही तीने फोन घेतला.
" हॅलो"
"मिसेस सावी जनार्दन का?"
" होय ,बोलते ."
" मी इन्सेपेक्टर कदम बोलतोय, सिटी हाॅस्पीटल मधून. पहाटे एक अक्सीडेंटची केस आली इथे, त्यातल्या एका इसमाच्या खिशात पत्ता आणि हा फोन नंबर मिळाला . कुणी राघव जनार्दन  आहेत. ओळखता का तुम्ही  त्यांना."
राघवचे नाव ऐकताच तिला गरगरायला झाले,तिने  आपली  फोनवरची  पकड  घट्ट केली,सोफ्याचा आधाराने ती कशीबशी उभी राहिेली.
"हॅलो,हॅलो, तुम्ही  ओळखता ह्या इसमाला" . तिकडून फोनवर विचारना होत होती.
"हो ,ओळखते. काय .... काय झाले त्यांना. बरे आहेत न ते." मनात हिम्मत एकवटुन तिने  विचारले
" त्यांच्या गाडीचा अपघात झाला ,त्यांना खूप लागलें  .तुम्ही ताबडतोब सिटी हाॅस्पीटल ला या ." तो इन्पेक्टर सांगत होता पण क्षणभर सावीच्या डोक्यात काहिही  शिरले नाही . ती नुसती  फोन कानाला लावून स्तब्ध बसली .आईची चाहूल लागली म्हणून ,"ए आई तुला सांगायचे राहुन गेले आमची  आज रात्री काॅलेजची   educational trip जाणार आहे . मी परस्पर मित्रा कडे जाणार आणि तिथूनच आम्ही दोघे जाणार . दोन तिन दिवसांनी परत  येईन. काळजी करू नकोस ." असे सांगतच अनिकेत हाॅल मधे आला. सावीची ती अविचल मुद्रा पाहुन तो तिच्या जवळ गेला. तिच्या हातातून फोन काढुन घेतला . कानाला लावून ,'हॅलो हँलो' म्हटले पण समोरच्या व्यक्तिने फोन ठेवून दिला होता. रिसीवर जागेवर ठेवून त्याने ,सावीला हालवून काय झाले म्हणून विचारले. अनिकेत कडे शुन्य दृष्टिने तिने पाहिलें . तो खरतर सावीची ही अवस्था पाहून घाबरलाच होता  . पण ती अनिकेतच्या स्पर्शाने भानावर आली. तिला त्याचा भयभीत चेहरा दिसला व तिनेही स्वतःला सावरले .
काही  नाही म्हणत तिने पर्स घेतली व तडक हाॅस्पीटल ला आली.
" इन्सपेक्टर कदम ." खाकी वर्दीतल्या इसमाला तिने  विचारले. 
"ICU च्या बाहेर आहेत ते."
" ओके" म्हणत ती तिकडे गेली.त्याच्याशी बोलून तिने काचेतुन डोकावून पाहिलें, एका बेडवर  हात- पाय व चेहरा पट्यात लपेटलेला ,नाकात  आॅक्सीजन लावलेले ,छातीला  कसल्या तरी रबरी नळ्या आणि हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत एक व्यक्ति होती. जीवंतपणाचे लक्षण म्हणजे माॅनिटर बीप -बीप करत  चालणारी ती हिरवी रेष, बस्स. ती व्यक्ति म्हणजेच  राघव आहे हे ऐकून तिला गलबलून आले.  कसेबसे भावनांवर  ताबा  मिळवून कागदपत्रावर  सह्या केल्या व ती डाॅक्टरांना भेटायला गेली.
"७८ तासा नंतरच काही  सांगता  येईल तोपर्यत काही सांगता येत नाही", असे तिला सांगितले  गेले.  वेट अॅड वाॅच करण्याशिवाय कुणाच्याच   हातात  काही  नव्हते. तिने परत  एकदा डोकावून पाहिलें, निर्जीव शांतते शिवाय तिथे  काहिही नव्हते. ती बाकावर बसली . मन थोडे स्थिर झाल्यावर  तिने आॅफिस मध्ये फोन करून चार दिवस येणार नसल्याचे कळविले. अनिकेत परस्पर educational trip ला जाणार होता आणि जुईली training ला गेली होती त्यामुळे घरी कुणी  वाट पाहणारे नव्हतेच   . " हे काय होऊन बसले ! " तिच्या मनात विचार आला.एकेकाळी  राजबिंडा चेहर्याचा  ,रूबाबदार राघव ,पट्याच्या जंजाळात निपचित पहुडला होता .नाही म्हटले तरी राघव बद्दल त तिच्या  मनात थोडी कणव दाटून आलीच. राघवचे विविध रूप आठवता आठवता  तिच्या नजरें समोर संपूर्ण भूतकाळच तरवळून गेला.
राघव तिच्या मामाचा मुलगा  . लहानपणी दोघेही एकत्र खेळलेले. जसे जसे वय वाढलें ,अभ्यास वाढला . सहाजिकच येणे जाणे कमी झाले . राघव, ती सहावी आणि तो दहावीला असतांना आला होता . त्यानंतर बरोबर दहा वर्षानिच  ती TYला असतांना परत  आला . तारूण्यातला रूबाबदारपणा त्याच्या चेहर्यावर ओसंडून वहात होता. हातानेच सेट केलेले केस आणि नजर रोखून पाहण्याची लबक ,सारेच मोहक वाटत होते तिला . ती ही आकर्षक तरूणी मध्ये परिवर्तित झाली होती. तरूणच वय ते! सहाजिकच दोघेही एकमेकांडे आकर्षली गेली. तरिही मनात कुठे तरी सामाजिक रूढीवादी परंपरेचा पगडा होता, म्हणूच मामाच्या मुलाशी कसेे लग्न करावे अशी शंका तिच्या मनात येत असे. तो मात्र बिनधास्त ,बेदारक होता . त्याच्या मनात असल्या शंका यायच्याही नाही अन् तो मानायचाही नाही. तो तिलाही समजावून सांगायचा की असे काही नसते ते. हळूहळू तिची ही समजूत पटली व ती त्याच्या प्रेमात अखंड बुडाली . तिचे शिक्षण पूर्ण होई पर्यत घरच्यांन पासुन लपवायचे असे दोघांनी ठरविले. तो एका पेपर मध्ये एडिटींगचे काम करायचा. भाषेवर त्याचे कमालीचे प्रभुत्व होते. तो बोलत असला की सगळे मंत्रमुग्ध होउन ऐकत राहायचे. तिलातर त्याची  प्रत्येक गोष्ट खरी  वाटायची.
काही दिवस गेल्यावर  तिच्या घरी तिच्या लग्नाची  चर्चा सुरू झाली, पण ती  गप्प  बसत  असे . त्याच्या  कडेही  हिच  स्थिति होती. त्यानेही  मुली पाहण्याचा  कार्यक्रमाला  संमति दिली.. होता  होता  सावीची TYची परिक्षा झाली व त्यांनी घरात प्रेमा बद्दल सांगीतले. दोघांच्याही घरात एकच गदारोळ माजला. कडकडून विरोध करत धमकी  ही देऊन झाली. तिच्या आईनेही समजावून सांगतांना म्हटले कि त्याच्या नुसत्या बाह्य रूपावर भाळू नकोस. भोळ्या व सुंदर चेहर्याच्या पाठीमागे चंचल वृत्ती आणि  स्वार्थी स्वभाव ही लपलेला आहे. तो आपल्या  बोलण्याने आणि आकर्षक चेहर्याने सर्वाना अपलेसे करतो अन् गरज समताच वेगळें पाडतो, पण ती त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. दोघांनी पळून जाऊन लग्न केले.
दोघेही संसारात रमले वर्षातच जुईलीचा जन्म झाला व दिड वर्षानी अनिकेतचा. मुलांच्या  जन्मा नंतर  दोघाचेही परिवार  राग विसरून जवळ आले. तो ही नोकरित वर  वर  चढत गेला. सगळे कसे दृष्ट लागण्या सारखे  चालू होते. दोन्ही परिवारातले लोकही समाधानी होते. आपला मुलगा स्थिर झाला म्हणून ते निश्चिंत झालेे. राघव ही आता  चिफ एडिटर झाल्यामुळें खूष होता. पण इथुनच त्याचे आयुष्य बदलण्यास सुरवात झाली. त्या पोस्ट मुळें विविध राजकारणी लोकांसोबत उठणे  बसणेे  चालू झाले. भाषेवर तर त्याचे प्रभुत्व होतेच त्यामुळें  सुरुवातिला भाषणे लिहुन देण्यात नंतर प्रतिनिधि म्हणून सेमिनार साठी जाण्यास सांगण्यात येऊ लागले. मानपान व अलिशान चैनी सुविधा ही त्याला मिळू लागल्या . त्यालाही ते सर्व आवडू लागले. तो त्या चैनीच्या आहारी कधी गेला त्याचे  त्यालाच कळलें नाही . घरादाराकडे संपूर्ण दुर्लक्ष होऊ  लागले. घरात तो पैसेही देईनासा झाला .मूलं ही मोठी होत होती . गरजाही वाढत होत्या . त्याचे असे वागणे तिला पसंत नव्हतें .त्यामुळे ती त्याला टोकायची . ते त्याला अजिबात आवडत नव्हतें मग भांडणे व्हायची. ह्यात  त्याची नौकरी  ही गेली .  मग तर तो अजुनच बेताल झाला.
तुच माझा श्वास ,स्पंदन ही फक्त तुझ्याच साठी म्हणणारा राघव कुठे व केव्हा तिच्या पासुन दुरावला  हे ही तिला खूप उशीरा लक्षात  आले. ती मात्र त्याच्या  गुण - दोषा  सह त्याच्यावर भरभरून प्रेम करत  होती.वेळ निसटली होती आणि तिच्या हातात वाट पाहण्या शिवाय काहिच उरलें नव्हते  . आपल्या मुलाच्या वागणूकीचा त्याच्या वडिलांना जबरदस्त धक्का  बसला. आपल्या बहिनीच्या मुलीचे आयुष्य आपल्या मूला मूळें बरबाद झालेले ते सहन करू शकले नाही . त्यांनी आपलें जीवितकार्य आटोपते घेतले. त्यांच्या जाण्याने ती एकटी पडली. वाढतां खर्च आणि तुटपूंजी  कमाईची  सांगड घालता घालता तिच्या नाकीनऊ येऊ लागले, पण ह्या गोष्टीचे त्याला काहींच वाटत नव्हते. त्याचे दैनंदिन खर्च परस्पर भागले जात  होते,त्यामुळे त्याला कसलीच फिकिर नव्हती . सावीला आपल्या आईने सांगीतलेला त्याचा स्वार्थी चेहरा पहिल्यांदाज दृष्टिस  पडला. ती हतबल झाली . आपल्या मुलांचे हिरमुसलेले चेहरे पाहुन तिला गहिवरून यायचे. ती हे समजून चुकली होती की, हातावर हात ठेऊन व रडत बसल्याने काहीच साध्य होणार नाही . तिने नोकरी  करण्याचा निर्णय घेतला. 
तिला नोकरी लागल्यामुळे राघवचे चांगलेच पावले . तो आता आपल्या मर्जीला येईल तसे वागू लागला. सुरुवातीला तो सांगून दोन तिन दिवसासाठी  जात  असे व मनाला वाटले तर घरी  पैसे देई. कालांतराने त्याने ते ही बंद  केले. वाटले तर  घरी  येई ,नाहीतर   व्याख्यान देत गावोगावी  फिरत असे. त्याला मिळणार्या   प्रसिद्धि  मध्येच तो मश्गुल राहू  लागला . एकदा  तर  खूप दिवस घरी  आलाच नाही . तिला काळजी  वाटू लागली  ,थोडे  दिवस वाट पाहुन तिने ज्या ज्या ठिकाणाहून माहिती  मिळू शकत होती  तिथे तिने चौकशी  केली  पण कुठून  ही  काही  कळलें नाही  . सहा  महिन्या नंतर  तो  आला. खुश  दिसत  होता  तो . आपल्याच धूंदीत तो जगत  होता पण पहिल्या सारख  आता  काहिच  राहिले नव्हते . ती मूळची  सोशिक होती त्यात तो तिच्या  मुलांचा  पिता  होता  म्हणून  ती त्याचे वागणे सहन करत होती. ह्या परिस्थितीत  त्याच्या सहवासात राहत  असतांना  क्षणभर तिला  जाणवले कि  प्रत्येक नात्याचे   आयुष्य ठरलेले  असते. ते जगुन झाले की ते दुरावते तरी किंवा कायमचे संपते तरी. पण ह्यावर  तिला  विचार करण्यासाठी वेळच  नव्हता .
सहा सात महिने राहिल्या  नंतर  तो अचानक नाहिसा  झाला . मुलांना  ही त्याच्या  बद्दल काही  वाटेनासे झाले होते आणि हिच्या जवळ तर  वेळ नव्हता  त्यामूळे  तिने त्याची  जास्त  चौकशी  केली  नाही . एकदा  समाचारपत्रात  त्याचा  अग्रलेख वाचण्यात  आला  . तिने तिथे चौकशी  केली  तर  तो विदेशात  आहे असे  कळले. कुठेही  असला  तरी  सुरक्षित आणि आनंदात  आहे न मग  बस्स , हा विचार करून  जास्त  खोलात  न जाण्याचा  निर्णय तिने घेतला. ह्या घटनेला बरोबर  आज आठ- नऊ वर्ष झाली  होती  अन्  आता  हा  असा  अचानक समोर  आला.
"तुम्हींच  मिसेस सावी  का ? " तिच्या  पुढ्यातली  नर्स  तिला  विचारत होती . तिच्या आवाजाने तिची  तंद्री  भंग पावली.
" हो मीच सावी," गडबडीने  ती  म्हणाली .
"ही  औषधे आणुन  द्या," हातात तिने चिठ्ठी पकडवली  व बुटांचा टाॅक टाॅक आवाज करत  निघुन गेली. दुसरे दिवशी  तो शुध्दीवर  आला. त्याच्यात   सुधारनाही  होत  होती . तिचे मनही समाधानाने भरलें . त्याला वाॅर्ड  मध्ये शिफ्ट केले. त्याची प्रकृति झपाट्याने सुधारत होती . तिच्या चेहर्यावरचे प्रेमळ,सात्वीक भाव पाहुन त्यालाही बरे वाटे. तो ही हक्काने सर्व करून घेत असे. त्याच्या चेहर्यावर कधीच अपराधी भाव तिला दिसले नाही.
अनिकेत व जुईली परत आले होते. तिला माहित होते कि राघव बद्दल काही बोललेले,माहिती सांगितलेली दोघांनाही आवडत नसे . तरीही तिने एकदा बोलता बोलता विषय काढलाच पण दोघानिही लक्ष दिले नाही. त्यांच्या चेहर्यावरच्या हावभावावरून तिने ताडले कि ते तिच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाहित पण साथही देणार नाही. ती नियमित पणे हाॅस्पीटल मधे जात होती. राघव आता बराच नोर्मल झाला होता. तो तिला स्वतःच्या कर्तबगारीच्या गोष्टी सांगत असे ,ती पण शांतपणे ऐकुन घेई. त्याच्या बोलण्यात स्वतः व्यतरित अन्य कुणीही नव्हते. तिच्या चेहर्यावरचा सोशिक भाव व प्रेमाने केलेली त्याची शश्रृषा पाहुन त्याला खात्री पटली कि ही अजूनही आपल्यावर प्रेम करते . तिच्या कडून सेवा करून घेणे हा त्याचा हक्कच आहे . त्याचा हा भ्रम काही दिवसातच दूर झाला.
राघवला दोन दिवसानी डिसचार्ज मिळणार होता . तो आनंदात आणि ती समाधानात होती . बोलता बोलता घरी जाण्या बद्दल बोलणे निघाले तेव्हा नेहमी प्रमाणे तो बोलत होता. त्याचे सगळे बोलणे झाल्यावर ती शांतपणे त्याला म्हणाली," राघव तू माझ्या सोबत घरी येणार नाहियेस . मी तुझी व्यवस्था आजारी माणसांची काळजी घेणार्या संस्थेत केली आहे." तो मध्येच तीला थांबवत बोलू पाहत होता. तीने त्याला हातानेच न बोलण्याविषयी सांगीतले. तरीही तो बोलण्याचा प्रयत्न करत होता पण तिच्या चेहर्याकडे लक्ष जाताच तो गप्पच झाला . तिच्या डोळ्यात निश्चय आणि चेहर्यावर निग्रही भाव होते.  ती त्याला ठामपणे सांगत होती." तुझी काळजी घेतली,सेवा केली म्हणजे अजूनही मी तुला वाटेल तसे माझ्या व मुलांच्या आयुष्याशी खेळू देईल असे वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. तू आम्हाला सोडून गेल्यावर आम्ही कसे सावरलो,समाजाशी कसे लढलो ते फक्त आम्हालाच माहित. परत मला विषाची परिक्षा नाही घ्यायची. " ती बोलत होती . तो काही विचारणार हे ओळखुन ती म्हणाली," हं,तुला प्रश्न पडला असेल कि घरी न्यायचे नव्हते तर हिने काळजी का घेतली.? माणूसकीच्या नात्याने.  अजूनही माणूसकी माझ्यात शिल्लक आहे. शिवाय कितिही नाकारले तरी तू माझ्या मुलांचा पिता आहेस. हाॅस्पीटलचे बिल चुकते केले आहे. ही तुझी फाईल आणि वर खर्चा साठी काही पैसे . उद्या त्या संस्थेची गाडी येईल तुला न्यायला. आता ह्या नंतर तुझा व माझा काहीही संबंध नाही. " एवढे बोलून तिने पैश्याचे पाकिट व फाईल त्याच्या हातात दिली. ह्या आधी त्याने  तिचे हे रूप कधीच पाहिले नव्हते . तो अवाक होऊन पाहतच राहिला . तीने हात हलवला व निर्धराने झपाझप गेलेली त्याला कळले देखिल नाही. त्याच्या डोळ्या समोरून तिचा निश्चयी चेहरा काही केल्या हलता हलेना.

संगीता देशपांडे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुटली? छे.भूत होऊन मानगुटीवर बसेल थोड्याच दिवसांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0