मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस - एक ललित लेखसंग्रह

युद्धस्य कथा रम्यः अशी एक सर्वमान्य समजूत असल्याने असेल, लष्करी आयुष्याबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे.
खुद्द लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे हा एक मुख्य प्रकार. अर्थात मराठीत आतापर्यंत असले लिखाण कमीच. १९६२ च्या चीन युद्धात बंदी होण्याचे भोग भोगलेल्या ले. कर्नल चव्हाण यांचे आत्मचरित्र हा एक अपवाद. जनरल एस एस पी थोरात यांचे आत्मचरित्र वाचल्याचे पुसटसे आठवते, पण खात्री देता येत नाही.
दुसरा प्रकार म्हणजे लष्करी कथानकावर आधारित कथा/कादंबरी. मराठीत या प्रकारातही बऱ्यापैकी दुष्काळच आहे. पण प्रभाकर पेंढारकरांच्या 'रारंग ढांग' चा उल्लेख केल्याशिवाय या प्रकारातून पुढे गेलो तर पापच!
तिसरा प्रकार, जो अप्राप्यच म्हणावा लागेल, तो म्हणजे लष्कराबद्दल सैनिकाच्या (यात अधिकारीही आले; पदांचा फरक सोडल्यास मूलतः सर्व सैनिकच) आप्तांनी केलेले लिखाण. वैदेही देशपांडे यांचे "मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस" हे पुस्तक या प्रकारात मोडते.
बऱ्याच वेळेला असे जाणवते की आपण जे लिखाण करत आहोत त्या प्रकारचे लिखाण फारसे कोणी केलेले नाही हे लेखकाला/लेखिकेला चांगलेच कळलेले असते. त्या विशिष्ट क्षेत्रातील परिभाषा वापरून अथवा तेथील जीवनाचे सांगोपांग वर्णन करून वाचकांना गुंग करून टाकण्याचा प्रयत्नात मूळ कथानकाला मात्र सोयिस्कररीत्या विश्रांती मिळते. अर्थात त्या कथानकात जीवच कमी असल्याने त्याला असल्या 'कृत्रिम जीवन आधारा'ची गरजच असते. (इथे विषय बदलण्याचा धोका पत्करून लिहितो की अनंत सामंतांचे "एम टी आयवा मारू" आणी "के फाईव" हे मला तरी या प्रकारचे लिखाण वाटले.)
वैदेही देशपांड्यांनी हा धोका/मोह टाळला आहे, अगदी ते लिखाण मध्येच थोडे नीरस होण्याचा दोष पत्करून. याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे.
आता मूळ पुस्तकाकडे. लष्करातल्या सैनिकाचा पत्ता देण्याची रोखठोक पद्धत म्हणजे 'तुकडीचे नाव' आणि '५६ ए पी ओ' अथवा '९९ ए पी ओ'. एवढ्याशा पत्त्यावर पत्रे व्यवस्थित पोचतात आणि त्यांची उत्तरेही येतात. मग ती तुकडी अंदमानात असो, नेफात असो, कारगिलला असो वा पुण्याला. पण या अशा, जवळजवळ बिनपत्त्याच्या (सदनिका क्रमांक अ, मजला क्रमांक ब, इमारत क्रमांक क, अमुकच्या मागे, तमुकच्या शेजारी, अमका रस्ता, तमक्या क्रमांकाची गल्ली अशा आपल्या सविस्तर पत्त्यांकडे पाहिले तर हे लष्करातले पत्ते 'नाहीत' या सदरातच टाकायला हवेत) ठिकाणी राहणाऱ्या, तुमच्या-आमच्यासारख्या हाडामांसाच्या लोकांबद्दल, त्यांच्या आनंदाच्या क्षणांबद्दल, त्यांच्या दुःखाच्या आवेगाबद्दल, त्यांच्या करमणुकीच्या प्रकारांबद्दल.... थोडक्यात, त्यांच्या जीवनाबद्दल त्या विलक्षण उमाळ्याने लिहितात. आणि तो उमाळा म्हणजे 'मोले घातले रडाया' असा प्रकार नाही हे जाणवते. आयुष्याची बावीस वर्षे अशा वातावरणात काढल्यामुळे त्यांचे अनुभव हे आतड्याचेच अनुभव आहेत. परंतु हे पुस्तक म्हणजे केवळ लष्कराचे वर्णन या सदरात घालता येत नाही, याचे कारण म्हणजे बरेचसे लेख हे 'लष्कर एके लष्कर' या पाढ्यात न गुंतता एकंदर जीवनावरच भाष्य करतात.
देशपांड्यांच्या माहेरी कुणी सैन्यात नव्हते. लग्न झाल्यावरच त्यांच्या 'लष्करी जीवनाला' सुरुवात झाली. त्याचा (अती) थोडक्यात आढावा म्हणून 'भ्रमंती' हा लेख छान आहे. 'हत्ती आले' या लेखात आसाममध्ये तिश्ता नदीच्या पात्राजवळ सैन्याचा मुक्काम असताना हत्तींनी घातलेला धुमाकूळ, आणी प्रामुख्याने बिन-हत्तींच्या वातावरणात वाढलेल्या सर्वांना बसलेला भीतीचा एक हबका याचे सुरेख वर्णन आहे. 'ऋण' हा लेख बराचसा ललित अंगाने जातो. त्यात 'लष्करी' असे, पार्श्वभूमीच्या वर्णनाखेरीज काही फारसे नाही. 'हे चक्र कोण थांबवणार' हा लेखही लष्कराचे पार्श्वभूमी अगदीच 'तोंडी लावण्यापुरती' असलेला, पण 'स्त्री-पुरुष समानता' या विषयाला नव्याने तोंड फोडणारा आहे. 'निळे निळे आकाश' हा अंदमानच्या पार्श्वभूमीवर लिहिलेला ललित लेख.
मराठी माणूस बाहेर कुठेही पोचला की मधूनच 'आपण खरेच किती मराठी उरलो आहोत' (आणी तो विचार पुढे ताणत 'या पुढच्या पिढीला मराठी का म्हणावे, त्यांना ना धड मराठी बोलता येत, ना मराठी वाचायची सवय') असा विचार उमटून जाणे हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल. त्या दृष्टीने 'सल' हा लेख छान आहे. थोडासा याच लेखाचा धागा पकडून 'ग्यानबा तुकाराम' पुढे जातो. एखादी भिडलेली गोष्ट (विशेषतः कुणी अडचणीच्या प्रसंगी मदत केली असेल तर) कबूल करण्यात आपण मराठी लोक मागे पडतो का? आणी उत्तर भारतीय लोक या बाबतीत जास्त दिलखुलास असतात, त्यांना आपण 'चापलुसी' म्हणून हेटाळतो का? या मूलभूत प्रश्नांना त्या हसत-खेळत हात घालतात.
'दोन ओंडक्यांची' मध्ये योगायोगाने होणाऱ्या भेटी आणी त्यातील 'काही हसू आणी काही आसू' अशा अनुभवांचे मजेदार वर्णन आहे.
कुठेही असंतोष निर्माण झाला की आपला पोलिस आणी तत्सम दलांबद्दलचा अविश्वास उफाळून येतो. आणी 'सैन्याला बोलवा' असा घोष सुरू होतो. 'सैन्याला बोलविण्यात येते तेव्हा...' मध्ये त्याच्या दुसऱ्या बाजूचे भिडणारे वर्णन आहे. त्याचा शेवटही चांगलाच 'बोचणारा' आहे. हाच धागा 'देवा असं कसं मन' मध्ये पुढे जातो. किल्लारी भागात झालेल्या भूकंपात मदतीला गेलेल्या तुकड्यांचे अनुभव हे तसे वेगळे नाहीत, पण या संदर्भात ते परत एकदा वाचावेसे वाटतात. मनुष्यस्वभावाचे असेही नमुने असतात हे कितीही वेळा वाचले तरी अचंबा वाटतोच.
या पुस्तकात लष्कराचे असे 'खास' अनुभव वाचायला मिळतील अशी अपेक्षा ठेवून कुणी पुस्तक घेतले असेल तर अशा मंडळींना 'पैसा वसूल' अनुभव देणारे 'किस्सा युनिफॉर्म का' हे दोन भागात लिहिलेले लेख. इथे अस्सल लष्करी म्हणी (जे स्थिर आहे त्याला रंग द्या, जे हलतंय त्याला सॅल्यूट ठोका), वरिष्ठांची बडदास्त ठेवण्याच्या लष्करातील पद्धती, त्याचा कधी कधी होणारा अनपेक्षित त्रास (जंगली प्राणी 'बघण्यासाठी' एक वन्यजीवप्रेमी जनरल एकदा जंगलात डाक बंगल्यात मुक्कामाला गेले, तर रात्रभर एकही प्राणी नाही. पहाटे पहाटे दोन-तीन बार वाजले. हे काय? तर तयारीसाठी पाठवलेल्या जेसीओच्याच काकुळलेल्या शब्दात, "सर, काल रात्री आलो तर पाहिलं की जंगली जनावरं फार येतात. बार्किंग डिअर व हायनाच्या आवाजानं झोप येत नाही. तुम्ही येथे आराम करावयाला येणार, तर तुम्हाला त्रास होणार म्हणून आजूबाजूला मशाली पेटवून (हाताखालच्या माणसांना) उभे राहायला सांगितले. आता त्या मशालींचे तेल संपल्यावर दोन कोल्हे आले तर हवेत बार केले. आता परत काही येणार नाही सर!" तसेच 'आर्मी मेस', 'बॅटमन' अशा खास लष्करी गोष्टींचे बहारदार वर्णन आहे.
'एक प्रसंग' हा मात्र हेलावून टाकणारा लेख. दिवंगत झालेल्या सहकाऱ्यांबद्दल लिहिताना येणारा उमाळा आपल्याला कुठेतरी हलवून जातो. घरी युनिटचा सर्वात वरिष्ठ अधिकारी येणे म्हणजे लष्करातील कुणाही व्यक्तीच्या आप्तांना धडकी भरवणारा प्रसंग. कारण लष्करातील पद्धतीप्रमाणे वाईट बातमी सांगायला सर्वात वरिष्ठ अधिकारी जातो. अर्थात याचे वर्णन दोन्ही बाजूंनी आलेले आहे, कारण शेवटी शेवटी दिलीप देशपांडे हे त्यांच्या युनिटचे मुख्य अधिकारी झाले होते. आणी ते नसताना अशी बातमी सांगायची जबाबदारी वैदेही देशपांड्यांची असे. 'मृत्यू हा अटळ आहे' हे वापरून निरर्थक झालेले वाक्य. पण अशा 'अटळ' गोष्टीसुद्धा नेहमीच सहजी उडवून नाही लावता येत.
'रि-युनियन/ पुनर्भेट' हा लेख या पुस्तकाला एक संपूर्णपणाची भावना देऊन पूर्णविराम देतो.
यातील काही लेख 'स्त्री', 'तरुण भारत' यात प्रसिद्ध झाले होते. मात्र कुठला लेख कुठे प्रसिद्ध झाला होता याची संपूर्ण अशी यादी नाही (दोन-तीन लेखांचे उल्लेख प्रस्तावनेत आहेत).
फार थोडे अपवाद वगळता लेखिकेने कुठेही भाषेला भावनेवर वरचढ होऊ दिलेले नाही. त्यामुळे अनेक अनुभव थेट भिडतात, भरजरी भाषेत त्यांचा जीव घोटला जात नाही. तसेच कुठेही 'म्हणून असे करा' असा उपदेशाचा सूर नाही. अन्यथा 'लष्करात मराठी टक्का कमी का', 'लष्कराच्या माणसांना समाजात मान कमी का', 'लष्कराच्या कितितरीपट भ्रष्ट असणाऱ्यांनी लष्करातील भ्रष्टाचाराबद्दल बोलावे का' अशा अनेक खऱ्याखोट्या मुद्द्यांवरून उपदेशामृत पाजून शेवटी 'आम्ही आहोत म्हणून समाज सुस्थितीत आहे' असे भरतवाक्य म्हणण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही हे आपण सभा, वृत्तपत्रे, दूरदर्शनवरील कार्यक्रम यांतून पहातच असतो.
युद्धस्य कथा रम्यः हे माहीत असल्याने काहीतरी करून आघाडीवरच्या समरप्रसंगांचे वर्णन करून नवऱ्याचा (आणी पर्यायाने आपला) उदोउदो करण्याचा मोहही त्यांनी अत्यंत सजगपणे टाळला आहे. हे ललित लेख आहेत आणी ते तसेच राहिले पाहिजेत याची त्यांना स्वच्छ जाणीव आहे. अधून मधून विनोदाचा शिडकावा आहे, पण तो फारच कमी. 'विनोदी' लिहिण्याच्या नादात हास्यास्पद होण्याचा धोकाही त्यामुळे टळला आहे.
ललित लेखन वाचायची आवड असणाऱ्यांना सुखद अनुभव देणारे हे पुस्तक आहे.
प्रकाशक: राजहंस प्रकाशन
प्रथम आवृत्ती: जान्युआरी २००५

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान ओळख!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान ओळख. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त. ओळख आवडली. आता मिळवून वाचेन.

"आयवा मारू" विषयी बराचसा असहमत, पण पसंद अपनी अपनी.

जनरल एस एस पी थोरात यांच्या आत्मचरित्राचे काही तपशील आठवताहेत का? मनोहर माळगांवकरांच्या लेखनात जनरल थोरातांबद्दल बरंच वाचायला मिळतं. त्यांच्या "डिस्टंट ड्रम्स" या कादंबरीतलं एक पात्रही थोरातांवर आधारित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेच लहायचे होते. एम टी.आय्वा मारू आवडली होती.
परीक्षण छानच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयवा मारूवर स्वतंत्र धागा काढनार काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छान ओळख.पुस्तक परिचय सदर मला आवडते.काम सोपे होते.
फक्त 'आणी' सुधारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0