शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?

शिवशक्तिसंगम – काय गवसले, काय राहिले?
.
मारूंजीच्याजवळ परवा संघाचा पश्चिम महाराष्ट्र पातळीवरचा खूप मोठा मेळावा झाला.

एका दिवसाच्या काय, चार तासांच्या मेळाव्यातील कार्यक्रमाकरता उभा केलेला भव्यपणा हा मुख्यमंत्र्यांच्या स्टेडियममध्ये केलेल्या शपथविधीच्या पंधरा मिनिटाच्या झगमगीत कार्यक्रमासारखा वाटला. प्रचंड अनाठायी खर्च. भव्यतेवरचा हा खर्च दुष्काळनिधीकरता देता आला असता का? व्यासपीठ सर्वांपासून इतके दूर होते की नितीन देसाईंनी केलेली कलाकुसर जणु काही फक्त व्यासपीठावरील मोठ्या नेत्यांसाठीच होती.

नेहमीप्रमाणेच सगळीकडे शिस्त.

बंदोबस्तावरील पोलिस हवालदाराला विचारले की अशा कार्यक्रमांचा फार ताण पडत असेल तुमच्यावर. तो म्हणाला, तसे नाही. आमची ड्युटी दुस-या कुठल्या सभेसाठी लावली असती तर आमचे खूप हाल झाले असते. इथे खूप शिस्त असल्यामुळे काही त्रास होत नाही. तोंड बंद ठेवले तरी चालते. शिस्तीत येतात, शिस्तीत जातात. ह्यांचे हेच ब-याचशा गोष्टी मॅनेज करतात.

प्रत्यक्ष कार्यक्रम दिमाखदार झाला. हा दिमाखदारपणा होता तो त्यातल्या शिस्तीमुळे. बॅंडची शिस्त वाखाणण्याजोगी. समुहगीताचे गायन करणा-यांचा आवाज फारच गोड व शब्दही अर्थपूर्ण. आमच्या मागे काही पत्रकार बसले होते. त्यांची सतत टकळी चालली होती. उदाहरणार्थ, माईकवर सुत्रधारांनी ‘आसनस्थ’ असे म्हटले की यांनी त्याची फोड ‘असं नस्तं’ अशी करायची. हा प्रकार काही वेळ चालू होता. पण गंमत म्हणजे नंतर त्यांनी समुहगीतही अगदी खड्या आवाजात म्हटले. एवढेच नव्हे तर ‘नमस्ते सदा वत्सले मातृभुमे’ ही पूर्ण प्रार्थनाही त्यांनी खड्या आवाजात म्हणली. बॅंडवर वाजवलेले जयोस्तुते फार सुंदर.

ध्वजारोहण झाले तेही फार सुंदर.

प्रस्तावनेतला भैय्युजीमहाराजांचा राष्ट्रसंत हा उल्लेख फार खटकला. राजकीय संतांची नवी मांदियाळी झालेली आहे त्यांचे हे शिरोमणी दिसतात. बरेचसे हपभ, हे महाराज, ते महाराज, असे हिंदू धर्माचे बरेचसे स्वयंघोषित पाईक बसलेले होते. तुरूंगात आहे म्हणून, अन्यथा तो आसारामही आसारामबापू म्हणून तिथे दिसला असता की काय असे वाटले.

सरसंघचालकांनी त्यांना अभिप्रेत असलेली धर्माची व्याख्या त्यांच्या भाषणात सांगितली ती यांच्यापैकी किती जणांना मान्य आहे कल्पना नाही. वेळ पडली तर कोणी वारक-यांचा माफिया करते, कोणी राजकीय साठमारीत गुंतलेले दिसते, कोणी ठराविक संतांवर आपला मालकी हक्क सांगते. शिवाय कोणाच्या धार्मिक अस्मिता कशामुळे उफाळून येतील याचा नेम नसतो. यांच्यातल्याच काहींनी आनंद यादवांसारख्या निखळ सज्जन माणसालाही जीणे नकोसे केले होते.

इतकी धार्मिक मंडळी या देशाच्या भल्यासाठी व मानवतेच्या कल्याणासाठी झटत असती तर या देशाचे पन्नास वर्षांपूर्वीच काय, कधीच कल्याण व्हायला हवे होते. मात्र यांच्यापैकी कितीजण दलित समाजातले आहेत हा प्रश्न विचारला तर सर्वांना पळती भुई होईल. आणि म्हणे हे सगळ्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करतात!. यांच्यातल्या प्रत्येकाला खासगीत विचारले तर चातुर्वर्ण्याबद्दल यांच्यापैकी कोण कसा बोलेल याची खात्री देता येईल? तेव्हा या धर्ममार्तंडांचा एवढा उल्लेख पुरे. यांच्या निमित्ताने एक सूचना करावीशी वाटते की रूढी-परंपरांच्या दृष्टीने धर्ममार्तंडांच्या हिंदुत्वाच्या कल्पना नक्की काय आहेत हे विचारून घ्यावे व यावर त्यांच्यात जाहिर चर्चा घडवून आणावी. याचे कारण म्हणजे नुकतेच कोल्हापूर पिठाच्या शंकराचार्यांनी संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांबद्दल जे उद्गार काढले त्यावरून या सर्वांच्याच मानसिकतेबद्दल शंका निर्माण होते. ते प्रकरण अगदी ताजे आहे.

शिवाय या धर्ममार्तंडापैकी अनेक जण हे विविध देवस्थानांचे विश्वस्त वगैरे आहेत व ही देवस्थाने म्हणजे लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेण्याची केंद्रे झालेली आहेत याकडे दुर्लक्ष कसे करता येईल?

बाकी विविध खेड्यांमधील ग्रामसेवक, उपसरपंच, सरपंच यांच्यासह काही लोकप्रतिनिधींचीही नावे घेतली गेली. मुख्यमंत्री फडणवीसही आल्याचे सांगितले गेले, पण ते व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यांचे भाषण वगैरे तर नाहीच.

प्रस्तावनेत संघाने वेळोवेळी केलेल्या मदतकार्याचा उल्लेख करण्यात आला. अलीकडे चांगल्याला चांगले म्हणण्याचीही सोय राहिलेली नाही. चेन्नईच्या पुरामध्ये एक स्वयंसेवक पुरग्रस्ताकडील काही किंमती वस्तु चोरतो आहे असे दाखवणारे बनावट छायाचित्र प्रसारित झाले होते. ते अनेकांनी फॉरवर्ड करत, शेअर करत एक प्रकारचे समाधान मिळवलेले होते. आता एक नवीन प्रतिवाद दिसतो, तो म्हणजे अशा संकंटांच्यावेळी इतर संघटना, विशेषत: गैरसरकारी संघटनाही असे मदतकार्य करतात, तेव्हा संघाचे कार्यकर्ते तसे करतात त्यात काही विशेष नाही. संघ आपल्या मदतीच्या कामाचे मार्केटिंग करतो. येथे बहुतेक ठिकाणी फोटो-ऑपवालेच पुढे असतात, असे वातावरण असताना प्रत्यक्ष काम केल्यानंतर जर कोणी आम्ही खरोखरच अमुक केले म्हणून सांगत असेल तर यालाही यांचा आक्षेप. आता तर स्वयंसेवकांना पठाणकोटला मदतीसाठी पाठवा असा खोडसाळपणा झालेला पाहण्यात आला.

वर म्हटल्याप्रमाणे समुहगीत म्हणणा-यांचा आवाज खरोखर गोड होता. प्रार्थनेचेही तसेच. प्रत्येक शब्द व्यवस्थित कळेल असा व कोठेही सूर सोडणार नाही असा आवाज. काही कडव्यांमधील काही शब्द वगळता अर्थ व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने.

ज्यांना ही प्रार्थना माहितच नव्हती ते कधी हात छातीवर ठेवून तर थोड्या वेळाने खाली ठेवून पुढच्या-मागच्या-शेजारच्यांकडे कुतुहलाने पहात होते. एक मात्र खरे, की प्रार्थना संपेपर्यंत ती कळो वा ना कळो, ती माहीत असो वा नसो, कोणीही काही इतर बडबड केली नाही.

सरसंघचालकांचे भाषण हा या कार्यक्रमाचा सर्वांसाठी अर्थात परमोच्च बिंदू (क्लायमॅक्स) होता. त्याच्या भाषणात काही वादग्रस्त होईल असे काही वाटले नाही. पण बिहार निवडणुकीच्यावेळी त्यांच्या आरक्षणाच्या फेरविचाराबद्दलच्या विधानाचा जसा जाणूनबुजून विपर्यास केला गेला तसे यावेळीही नक्कीच होईल.

त्यांना अभिप्रेत असलेली धर्माची व्याख्या त्यांनी सांगितली. किंबहुना धर्म म्हणजे काय नाही हेही सांगितले. धर्म म्हणजे पूजा-अर्चा, हळद-कुंकू नव्हे. धर्म म्हणजे धारणा. सर्वांना एकत्र धरून ठेवतो तो धर्म. परकियांनी भारतीयांना आपल्या पराक्रमाने हरवल्याची उदाहरणे तुरळक. त्यामानाने आपल्यातल्या दुहीचा फायदा घेऊनच भारतीयांना अनेकदा हरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा देश बलवान झाला, तरच जगातील इतर सत्ता भारताचे म्हणणे ऐकतील असे ते म्हणाले. आज बलवान देशांची चुकीची कामेही झाकली जातात. तेव्हा ही ताकद म्हणजे शक्ती ही इतर कोणाचे शोषण न करता आलेली असली तर तिला आदरयुक्त दरा-याचे स्वरूप मिळते. मानवामानवातील भेद हे त्यामुळेच त्याज्य असल्याचे ते म्हणाले.

या संदर्भात त्यांनी नोबेल पारितोषिक मिळाल्यावर रविन्द्रनाथ टागोरांना जपानमध्ये बोलावल्याची आठवण त्यांनी सांगितली. टागोर जपानला गेले खरे, पण त्यांच्या व्याख्यानाला हजर राहण्यास तेथील विद्य़ार्थ्यांनी नकार दिला. आपलीच काही चूक झाली की काय असे टागोरांना वाटले. पण तिथले प्राध्यापक म्हणाले, की तसे काही नाही. पण विद्यार्थ्यांचे म्हणणे असे आहे की जो देश गुलामगिरीत आहे, तेथील विद्वानाचे व्याख्यान ऐकण्याची वेळ अजून तरी आमच्यावर आलेली नाही.

भागवतांनी महात्मा फुले व त्यातही डॉ. आंबेडकरांचा उल्लेख अनेक वेळा केला. सावित्रीबाईंचाही उल्लेख त्यांनी अगदी गौरवाने केला. सामाजिक समरसतेचाही उल्लेख त्यांनी केला. सामाजिक एकता ही केवळ कायदे करून प्रत्यक्षात येणार नाही, ती मनामनातूनच व्हायला हवी हे त्यांचे विधान तर अतिशय महत्त्वाचे म्हणावे लागेल. मात्र त्यातून दलितांच्या संघाबद्दल ज्या शंका आहेत याला त्यांनी हात घातलेला दिसला नाही. खरे तर अशा मोठ्या मेळाव्याला इतर राजकीय विचारसरणीच्या नेत्यांनाही बोलावले असते, तर एकमेकांमधली कटुता कमी होण्यास मदतच झाली असती. मात्र गेल्या दीड वर्षातील याबाबतचा अनुभव पाहता ज्यांनी ज्यांनी संघाच्या व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या समाजाकडून दगलबाज वगैरे संबोधले गेले, हे पाहता त्या बाबतीत आस्ते कदमचे धोरण अवलंबलेले असावे की काय असे वाटले. अर्थात असे उपक्रम करायचे तर त्याला अशा पद्धतीचा तीन-चार तासांचा कार्यक्रम पुरेसा नाही हे नक्की.

काही महिन्यांपूर्वी सरसंघचालकांनी हिंदू धर्मामधील अनिष्ट रूढी-परंपरांचे उच्चाटन केले पाहिजे असे जवळजवळ क्रांतिकारक पण त्रोटकविधान केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचे पुरेसे स्पष्टीकरण केले नाही किंवा त्याचा पाठपुरावाही केलेला दिसला नाही. या भाषणातही त्यांनी त्याचा उल्लेख पूर्णपणे टाळला. असे कळीचे मुद्दे फार काळ टाळता येतील असे दिसत नाही. जेवढे लवकर ते त्यांना भिडतील तेवढे चांगले होईल असे म्हणायला जागा आहे. तसे लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा.

राहता राहिला देशातील हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मियांचा उल्लेख, पण या मेळाव्याचे प्रयोजन पाहता त्याचा उल्लेख करावासा वाटला नसावा. अर्थात हिंदुत्वाची संकल्पना स्पष्ट करण्याचेच आव्हान एवढे मोठे आहे की सर्व धर्मियांचे सहजीवन हा पूर्णपणे वेगळा मुद्दा ठरावा. पण तोही महत्त्वाचा आहे हे विसरता कामा नये.

एकूणच काही माध्यमांनी याला शक्तिप्रदर्शन असे म्हटले तरी केवळ मोजक्याच व्यक्ती व्यासपीठावर असल्यामुळे त्याला शक्तीप्रदर्शन कसे म्हणावे? येथे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाचे स्थान नव्हते.

काही जणांना बोलताना ऐकले की हे तर फक्त पश्चिम महाराष्ट्राचे संमेलन आहे. पूर्ण महाराष्ट्र पातळीवरचे संमेलन असते तर आताचे मैदानही पुरले नसते. इतर राजकीय पक्षांच्या सभांना पैसे देऊन गर्दी जमवली जाते त्याप्रमाणे संघाच्या मेळाव्यांच्याबाबतीतही बोलले गेलेले काल प्रथमच ऐकले. प्रत्येकी पाचशे ते दोन हजार रूपये देऊन लोकांना बोलावण्यात आले होते अशा आशयाच्या पोस्ट्स वाचल्या. माझा विश्वास बसला नाही कारण या आधी असे कधीही झाल्याचे ऐकिवात नाही. पण नागरिकांचा प्रतिसाद म्हणावा तेवढा मिळाला नसल्याचे दिसले. हा कार्यक्रम शहरापासून ब-याच दुरच्या ठिकाणी झाल्यामुळे असे झाले असावे.

एकूण ज्यांनी ज्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली त्यांना या भव्य-दिव्यतेचा अनुभव नक्कीच मिळाला असेल. विशेषत: अराजकीय कार्यक्रम कसा असावा याचे हा मेळावा म्हणजे उत्तम उदाहरण म्हणावे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

संघामुळे संपूर्ण ब्राह्मण समाज ब्राह्मणेतरांत बदनाम झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरूवात छान आहे... नविन पाॅइंट ऑफ व्यु

पण पुढचा मजकुर हा हल्ली व्हाॅट्स अॅप येणाऱ्या संघी संदेशां सारखा वाटला..

लोकसत्ताचा या बद्द्लचा अग्रलेख वाचनीय आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0