Skip to main content

नारळाच्या शाईनमारू वड्या.

सर्वप्रथम या पाककृतीविषयी - इतर सगळ्यांना माझ्यापेक्षा चांगल्या नारळाच्या वड्या करता येतात आणि ती पाककृती माहीत आहे, याची जाणीव मला आहे. पण ही पाककृती शाईनमारू वड्यांची आहे, पारंपरिक पाककृती नव्हे.

पाककृतीसाठी लागणारं साहित्य : याचे दोन प्रकार करता येतील.
१. अत्यावश्यक :
परदेशी वास्तव्य, हे नसल्यास किमानपक्षी महाराष्ट्राबाहेर वास्तव्य
अमराठी आणि शक्यतोवर पाश्चात्य लोकांमध्ये उठबस
स्वयंपाकाचा कंटाळा
इंटरनेट आणि फोनची उपलब्धता, टेक्नोमंदपणाचा अभाव
चांगलं खाण्यापेक्षाही आरोग्यविघातक गोष्टी न खाण्याची हौस

२. पर्यायी (म्हणजे एका ओळीत लिहिलेल्या पदार्थांपैकी एक किंवा अधिक
नारळ, खोबरं, नारळाचा कीस (डेसिकेटेड कोकोनट), खोबऱ्याची वाळवलेली भुकटी - २
दूध, दुधाची भुकटी, पाणी ~ ०.५
बदाम, बदामाची पूड, बदामाचे काप, काजू, काजूची पूड, काजूचे काप - १
उकडून चुरलेला किंवा किसलेला बटाटा - ०.५
साखर, सॅक्रीन, स्टीव्हीया - ०.३
वेलची, जायफळ, केशर - झेपेल तेवढं
तूप, तेल, लोणी, लार्ड - उलुसं

यांतल्या अत्यावश्यक पदार्थांचं प्रमाण मोजता येण्यासारखं नाही. ते आपापल्या रुची आणि कुवतीनुसार वापरायचं आहे. परदेशी वास्तव्य, स्वयंपाकाचा कंटाळा, पाश्चात्य-परदेशी लोकांमधली उठबस, कॅलऱ्या मोजूनमापून खाणं आणि त्यासाठी प्रसंगी पारंपरिक लोकांना आवडणाऱ्या चवींना नावं ठेवणं, अशा गोष्टी आपापल्या आवडीनिवडीनुसार कराव्यात.

सर्वप्रथम एखाद्या परदेशात राहायला जावं. तिथे दिवाळी साजरी करण्यासाठीही विशेष स्वयंपाक करत नसल्यास उत्तम. पण आजूबाजूच्या परदेशी-पाश्चात्य लोकांसोबत उठबस वाढवावी. सगळेच परदेशी पाश्चात्य नसतात; पाश्चात्यांपैकी बहुतेकांना वेगवेगळ्या देशांतले पदार्थ चाखण्याची हौस असते. चिनी, थाई किंवा भारतीय लोक इतर देशांमधल्या पाककृतींबद्दल हळवे होऊन बोलताना बघितले आहेत का कधी? उलट ब्रिटिशांकडे पाहा! त्यांचा राष्ट्रीय अन्नपदार्थ चिकन टिक्का मसाला होता. तेव्हा आपल्या पाककृतीसाठी प्रेरणा म्हणून हे असे पाश्चात्य लोकच अत्यावश्यक आहेत. स्वयंपाकाचा कंटाळा, पारंपरिक पदार्थांमधला गूळ-साखरेचं प्रमाण पाहून डोळे फिरणं आणि पाश्चात्य या गोष्टी एकत्र केल्यास व्यवस्थित मिळून येतात, चांगल्या भिजलेल्या कणकेसारख्या! यांपैकी एकही घटक कमी असल्यास ते नासलेल्या दुधासारखे वेगवेगळे होतात.

तर अशा परदेशात राहायला गेल्यावर हौशी स्त्रियांचा वा पुरुषांचा वा माणसांचा गट शोधावा. हौशी माणसं कशी ओळखावीत - शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र येणं, त्यासाठी कारपूलिंगची व्यवस्था करणं, भेटल्यावर अपेयपान करणं, भेटून जुगार खेळणं, जोरजोरात हसणं, असे गुणधर्म दिसल्यास ही माणसं हौशी आहेत, असं समजावं. अशा माणसांबरोबर पाककृती केल्यास चांगली होती.

त्यांच्या पारंपरिक सणाची वाट बघावी. मी सध्या अमेरिकेत राहते; इथे ख्रिश्चन फार माजल धर्माचे लोक बरेच असल्यामुळे ख्रिसमस हा सण जोरदार साजरा होतो. सणासुदीच्या वेळेस लोकांना निरनिराळ्या गोड गोष्टी (पांससा यांच्या नव्हे) खाव्याशा वाटतात. म्हणून लोक एकत्र भेटून विकत आणलेल्या वा स्वतः बनवलेल्या गोड वस्तूंची देवाणघेवाण करतात. असा मुहूर्त शोधावा. मुहुर्ताच्या एक आठवडा आधी, चाचणी म्हणून पाककृती करून पाहावी.

पर्यायी वस्तू कशा वापराव्यात -
सर्वप्रथम 'नारळाच्या वड्या' असे शब्द गुगलला द्यावेत. त्यातली पहिली पाककृती उघडून वाचावी आणि साखरेचं प्रमाण वाचून मनातल्या मनात परंपरांना (पुन्हा एकदा) नावं ठे‌वावीत. पर्यायी वस्तूंच्या यादीत जिन्नस वापरण्याचं प्रमाण आकारमानानुसार दिलेलं आहे. ते फार काटेकोरपणे वापरण्याची गरज नाही; मोजमापांत साधारण १०% त्रुटी असल्यासही पुरेशी शाईन मारता येईल.

पर्यायी सामान मावेल असं एखादं जाड बुडाचं भांडं घ्यावं. त्यात उलुसं तूप, (तेल, बटर, लार्ड) घालून बाकी सर्व पर्यायी सामान कढईत घालावं. गॅस लावावा. वेलची, जायफळ, केशर असले पदार्थ उशीरा घातले तरीही चालतात. हे सगळं मिश्रण मोठ्या प्रमाणावर असेल तर बराच वेळ ढवळत बसावं लागतं. तेव्हा एका हाताने ढवळताना दुसऱ्या हातात नियतकालिक किंवा फोन घेऊन वाचन सुरू करावं. अजूनही पायांना उभं राहणं यापलीकडे काहीही काम नाही; तेव्हा एकीकडे उड्या माराव्यात किंवा डावीकडे-उजवीकडे एकेक पाऊल टाकत, हातावर बांधलेल्या फिटनेस ट्रॅकरलाही कामाला बसवावं. उड्या मारणं पाककृतीसाठी उत्तम, कारण पायाचे स्नायू अधिक ताकदवान असतात, ते वापरून मोठ्या प्रमाणावर असलेलं मिश्रण हाताने ढवळणं सोपं जातं; पायाने संपूर्ण शरीर हलवायचं, पर्यायाने हात कमी कष्टांत हलतात.

मध्येच गॅस बारीक करावा आणि बेकिंग ट्रेला आणखी उलुसं तूप (तेल, बटर, लार्ड) लावून घ्यावं. पातेल्यातलं मिश्रण संतापून आपल्या अंगावर उडून यायला लागलं की त्यात वेलची, केशर, जायफळ घालता येईल. ते आधीच घातलेलं असेल तर हे मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये पसरून द्यावं. मिश्रणाच्या वड्या पाडण्याचा क्षीण आणि पहिला प्रयत्न करावा. 'बघा, बघा, आमच्याकडे बदाम आहेत' अशी जाहिरात करायची असल्यास वड्यांवर बदामाचे काप पसरावेत. परदेशात लोकांना 'नट्सची अॅलर्जी'(!) असते. वड्यांवर भस्सकन बदामाचे काप सांडले की अशा लोकांना आपसूक वॉर्निंग मिळेल असा स्वतःचा समज करून घेता येतो. बेकिंग ट्रे अव्हनमध्ये सारून द्यावा. आता नारळाचा वास येणारे कपडे बदलावेत आणि दोन तास बाहेर जाऊन चालून यावं. याला पर्याय असतो की दोन तासांत आंघोळ करावी आणि खुशाल पाय ताणून देऊन उरलेलं नियतकालिक वाचावं.

दोन तासांनी येऊन ट्रेच्या मधोमध असणाऱ्या वड्यांपैकी एखादी उचलण्याचा प्रयत्न करावा. जिच्यामुळे वजन आणि अनारोग्य वारेमाप वाढतं अशी साखर कमी केली माणसांचा गुटगुटीतपणा आणि वड्यांचा खुटखुटीतपणा कमी होतो, याचा व्यावहारिक अनुभव लगेच येईल. असा अनुभव घेतल्यावर ओव्हनमध्ये बेकिंग सुरू करावं. १००सेल्सियसवर २०-२५ मिनीटं बेक करून ट्रे तिथेच सोडून द्यावा. तोवर जेवणाची वेळ झालेली असेलच. मी जवळच्या 'टॉर्चीज'मधून टाको घेऊन आले. तुम्ही तुमच्या आवडत्या 'मेक्सिकन', 'पाकिस्तानी' किंवा कोणत्या दुकानातून जेवण घेऊन या. जेवणानंतर पुन्हा नियतकालिक किंवा टीव्ही.

पार्टीला जाण्याआधी घाईघाईत वड्यांचा ट्रे बाहेर काढावा. त्यांचा फोटो काढावा, हा असा.
नारळाच्या वड्या

मगाशी पाडलेल्या वड्या पुन्हा एकदा पाडाव्यात. वड्या हाताला किंचित लिबलिबीतच लागतात. पार्टीत इतरांनी आणलेल्या मिठाया आणि बिस्किटं कोरडी असतात. तिथे जाऊन यजमानांना "मी विसरले; माझ्या वड्यांवर 'फ्रीजात ठेवा' अशी चिठ्ठी लावायची आहे", असं म्हणावं. ती साटोपचंद्रिका स्वतःच्या हाताने अशी चिठ्ठी लिहेल. आपण लगेचच गटात एकट्या पडू नये म्हणून "मी स्वतः बनवल्यात वड्या" असं जाहीर करावं. पार्टीतल्या साटोपचंद्रिका पाश्चात्य असल्यामुळे आपल्यावर खूष होतात. आपल्या वड्या खायला आल्या की आपण मख्ख चेहऱ्याने जाहीर करावं, "ही तशी पारंपरिक पाककृतीच आहे, पण साखर कमी घालायची म्हणून मी थोडा मॉडर्नपणा केला. नाही तर मी नाही त्यातली!" मग सगळ्या आपल्या दिशेने बघतात; आपलं वजन, आकारमान सगळंच कमी झालेलं आहे हे लक्षात घेतात आणि विचारतात, "काय काय आहे यात?" मग आपण धोरणीपणाने फक्त पर्यायी साहित्याची यादीच द्यावी. मजबूत हाडापेराची एखादी गोरी स्त्री कॉमेंट करेल, "अय्या, म्हणजे हेल्थीच म्हणायच्या की या वड्या! आणि साखर कमी आहे का? मग मी दोन वड्या घेते."

"जरूर," असं म्हणताना आपण चेहरा निर्विकार ठेवण्याच्या प्रयत्नात असतो; पण तसं न करता समोरच्या सोफ्यावरच्या, ख्रिसमसी लाल-हिरव्या आनंदात बुडालेल्या, मेकपधारी स्त्रीच्या चेहऱ्यावर असलेला तुपाळ आनंद आपल्या चेहऱ्यावर चोप्य-पस्ते करण्याची पराकाष्ठा करावी. आपल्याला ते जमलं नाही तरी हरकत नाही; प्रयत्न करणं महत्त्वाचं.

ख्रिसमस असतो, पार्टी असते, सगळ्यांनी थोडथोडी घेतलेली असतेच.

१. या भिकार न-विनोदाबद्दल माझ्याकडे काहीही सबब नाही. सॉरी.

आवड/नावड

सामो Thu, 15/12/2016 - 03:08

Shoot!! आज जाऊन स्टारबक्स चा ब्लुबेरी स्कोन खाणं आलं आज. कशाला दाखवतेस असले फोटो????? :(
___
किंवा बेटर "रेड मग कॅफे"(http://www.redmugcoffee.com/) मधील आलमंड कुकी किंवा तत्सम. आज जातेच. खूप दिवसात निवांत वेळच काढला नाहीय स्वतःसाठी :(
____
बाय द वे, हे लार्ड कधी ऐकलं नाही. गुगलून पहाते लार्ड काय असतं ते.
सापडलं - Lard is pig fat in both its rendered and unrendered forms. It is obtained from any part of the pig where there is a high proportion of adipose tissue.
___
रेड मग कॅफे ने तुला धन्यवाद द्यायला हवे आज त्यांना एक गिर्‍हाईक जास्त मिळालं. :)
http://explorationvacation.net/wp-content/uploads/2009/07/2009_07_15-08_49_07.jpg
____
मी काल मस्त जर्म ऑफ व्हीट दूधात घोटून आटवलं, त्यात साखर व क्रॅनबेरीज घालून खीरीसारखं बनवलं. चवीला ती खीर अतिशय मस्त लागली.

पिवळा डांबिस Thu, 15/12/2016 - 03:16

आरोग्यविघातक गोष्टी न खाण्याची हौस

हे वाचलं आणि 'गड्या, हे तो आपुले काम नोहे' असं म्हणून उरलेला धागा वाईड बॉल असल्यागत सोडून दिला!!!
;)

चिंतातुर जंतू Thu, 15/12/2016 - 14:45

In reply to by पिवळा डांबिस

+१ टू पिडां!
माझ्या मनातला छोटा प्रश्न किंवा विचार #१ : पुरोगामी होण्याची किंमत अश्या वड्या करून, इतरांना खायला घालून आणि स्वतः खाऊन चुकवण्यापेक्षा प्रतिगामीच बनून राहा.
- आज्जीच्या हातच्या, सढळ हातानं घातलेल्या साजुक तुपातल्या, भरपूर खवा घालून केलेल्या नारळाच्या वड्यांचा चाहता प्रतिगामी जंतू ;-)

माझ्या मनातला छोटा प्रश्न किंवा विचार #२ : हा धागा काढण्यामागे संस्थळचालकांचा पुरोगामी कावा आहे : आपण हेल्दी खाऊन स्वतःचं आयुर्मान वाढवायचं; उलट, पुरोगाम्यांना विरोध करायचा म्हणून आरोग्यासाठी हानिकारक वड्या खायला प्रतिगाम्यांना उद्युक्त करायचं. मग ते लवकर मरतील आणि जगात पुरोगाम्यांचं राज्य येईल. ह्या कावेबाज पुरोगाम्यांचा निषेध करावा तेव्हढा थोडाच!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/12/2016 - 21:36

In reply to by चिंतातुर जंतू

ही पाककृती यशस्वी होण्यासाठी पाश्चात्य लोकांची आवश्यकता आहे हे सिद्ध करण्याबद्दल मंडळ आभारी आहे. मला परंपरा वगैरे शिकवण्याची हौस तुम्हांला असल्यास मी तुमची मनं मोडणार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी.

अबापट Thu, 15/12/2016 - 15:13

अभिनंदन , उत्तम पाककृती , पाककृती करण्यामागचा उद्देश हि उत्तम .
आता मोदक , करंज्या वगैरे शरीरास अत्यंत पोषक अशा पाककृती कधी लिहिताय ? ( बरोबर दिवेकर बाईंचा या पदार्थांच्या न्यूट्रीशनल व्हॅल्यू बद्दल चा दुवा देण्यास विसरू नये)
. न विनोद हि उत्तम !!
"तर अशा परदेशात राहायला गेल्यावर हौशी स्त्रियांचा वा पुरुषांचा वा माणसांचा गट शोधावा. हौशी माणसं कशी ओळखावीत - शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र येणं, त्यासाठी कारपूलिंगची व्यवस्था करणं, भेटल्यावर अपेयपान करणं, भेटून जुगार खेळणं, जोरजोरात हसणं, असे गुणधर्म दिसल्यास ही माणसं हौशी आहेत, असं समजावं. अशा माणसांबरोबर पाककृती केल्यास चांगली होती."
हा पॅरा रुचीपूर्ण

आपण आष्टीनाच्या महाराष्ट्र मंडळाच्या मेंबर वगैरे असालच ना ?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/12/2016 - 21:29

In reply to by अबापट

महाराष्ट्र मंडळात बाईने अपेयपान करणे आणि जुगार खेळणे! शांतम् पापम्, अण्णा.

अमेरिकेत पहिल्याच ख्रिसमसच्या वेळेस माझ्या एका भल्या मित्रानं मला त्याच्या घरी बोलावलं. मित्र मराठी आंजावरचाच, त्या निरागसाला जपण्यासाठी त्याचं नाव सांगत नाही. तर त्यांचा ३१ डिसेंबरसाठी त्यांच्या मराठी मित्रमंडळासोबत काही कार्यक्रम ठरलेला होता; तिथे आमचीही वरात नेण्यात आली. तरी बरं, मित्र मुंबई-परिसरात वाढलेला. (माझ्यावर अशी वेळ आली तेव्हा मी पाहुण्यांना आधीच सांगितलं होतं, "मला जेवणाचं आमंत्रण आहे. जेवण बनवणारी काकू आता तशी वयस्कर आहे. मी मदतीला जाऊन उपयोग नाही; मी थोडीच पुरणपोळ्या करणारे! तेव्हा तुमच्या जेवणाची सोय माझ्या घरी करून देते आणि मी पुरणपोळ्यांचा पुख्खा झोडायला जाते." ते असो.)

आमची गाड्याबरोबर नळ्याची यात्रा त्या 'हौशी' मराठी लोकांमध्ये गेली. आम्ही बरेच लोक असल्यामुळे दोन गाड्यांमधून तिथे जाणं झालं. आम्ही तिथे पोहोचलो तर मित्र आणि त्यांची उत्तम अर्धी तिथे पोहोचले होते. आम्ही गेल्यावर "या, या, बसा, बसा" झालं. मला एकदम माझ्या खगोलशास्त्राच्या कॉन्फरन्समध्ये गेल्यासारखं वाटलं. समोर सगळे बाप्येच बसलेले. मग समजलं की बायका आतल्या खोलीत होत्या. मित्राची उत्तम अर्धी तिथेच होती, तिला हाय करायला आत गेले. तर समोर एका उभट तसराळ्यात निळ्या रंगाचं पेय आणि आमटी वाढायचा डाव होता. शेजारी प्लास्टिकच्या पेल्यांची चवड. त्याकडे बोट दाखवून एक 'हौशी' ललना वदली, "आकाशी रंगामुळे घाबरायची गरज नाही. दारू नाहीये त्यात. खास आपण बायकांसाठी बनवलंय ते!"

मला कधीमधी चष्मा वापरण्याचा आनंद होतो. डोळे मोठे झाले तरी सहज दिसत नाहीत, भुवया माफक प्रमाणात उंचावल्या तरी कळत नाही. पण त्या वेळेस मी पापण्यांची पिटपिटपिटपिट ;;) केली आणि "मला आत्ता तहान नाही लागली" म्हणून तिथून सटकले.

त्या रम्य संध्याकाळच्या फार आठवणी आता शिल्लक नाहीत. पण एक आठवण मनावर ओरखडा काढून गेली होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास एक घटोत्कच "चला, चला, बॉल ड्रॉपिंगची वेळ झाली" करत हाकारे करत आला. झोपलेल्या बाळगोपाळांना उठवून "चला बॉल ड्रॉप बघायला" सांगितलं गेलं. मला लगेच मानवी शरीररचनाशास्त्र आठवलं; आणखी काय बॉल ड्रॉप व्हायचे! (तरी नुकताच 'नॉटिंग हिल' बघितलेला नसल्यामुळे ".... I'm going to tell you a story that will make your balls shrink to the size of raisins." हे आठवलं नाही.) पण कुतूहल चाळवलं. खरं तर, ती माझी अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांबद्दल असलेली व्हर्जिनिटीच म्हणायची, बॉल ड्रॉप म्हटल्यावर काही रोचक गोष्ट घडेल असं मला वाटलं. तर सगळे लगबगीनं मोठ्या टीव्हीसमोर जाऊन बसले. एका उंच आणि जाडगेल्या मनोऱ्याच्या टोकावर एक गोल-गरगरीत चेंडू ओवला होता. त्या परिसरात आणि टीव्हीसमोरही लोक फार उत्फुल्लावस्थेत होते. आकडे उलट क्रमानं म्हणायला सुरुवात झाली. तो ओवलेला चेंडू हळूहळू खाली घसरायला लागला; सुईत धागा ओवताना नेढ्यातून भर्रकन सरकेल, एवढ्या कूर्मगतीनं हे सगळं सुरू होतं. तो गोल-गरगरीत बॉल जसा खाली यायला लागला तसे लोक आनंदानं आणखी बेभान होत होते. मला वाटलं होतं, बॉल खाली येऊन खळ्ळकन फुटेल आणि बॉलच्या आतल्या गोष्टी बाहेर सांडून आतषबाजी होईल.

तो बॉल हळूहळू खाली आला आणि नवं वर्षं सुरू झालं. अमेरिकेच्या त्या विवक्षित टाईमझोनमध्ये. पण त्यानंतर आणखी सहाएक वर्षं मी किती अपरिपक्व असणार आहे, याची जाणीव मला तेव्हा झाली नव्हती. अचानक एकाच आठवड्यात काही गोष्टी घडल्या. त्याच त्या नारळवड्या-पार्टीत मला एकीनं विचारलं, "तू ३१ डिसेंबरच्या रात्री जागून बॉल-ड्रॉप बघतेस का?" मी शंकातुर चेहऱ्यानं म्हटलं, "कशाला जागायचं? १ जानेवारीच्या सकाळी बातम्यांमध्ये तेच पुन्हा दाखवतात. त्यासाठी आपण आपली झोप का बर्बाद करायची?" त्या पोक्त स्त्रीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, "मुली, तू लहान आहेस. माझ्याएवढी मोठी झालीस की समजेल." मी तरीही आपल्याच माजात, "बॉल ड्रॉपण्यात काय ते नवीन. गेली किती लाख वर्षं निसर्गात हेच होत असेल. दररोज! तुम्हां ख्रिश्चनांना उत्क्रांतीची गंमत काय करणार" वगैरे विचार मनात करत त्यांना जोखत होते.

पार्टीच्या दुसऱ्याच दिवशी 'द अफेअर'च्या तिसऱ्या सीझनचा दुसरा भाग बघितला. त्यात मध्यकालीन, युरोपीय इतिहासाची अभ्यासक असणारी फ्रेंच प्राध्यापिका म्हणते, "पुरुषाला आपल्या बिछान्यावर बोलवायचं पण त्याने त्या स्त्रीच्या शरीराला स्पर्शही करायचा नाही, यासारखं रोमँटिक आणि डॉमिनेट्रिक्स असूच शकत नाही." आणि अचानक माझ्या आयुष्यातला युरेका क्षण आला. बाळगोपाळांना झोपेतून उठवून बॉलड्रॉप दाखवणारे, विस्थापित मराठी अमेरिकावासी लोक अतिशय प्रगत आणि थोर आहेत. मनातल्या मनात मी ख्रिस्ताची करुणा भाकली आणि दारू न पिताच गमतीशीर बोलणाऱ्या त्या मराठी स्त्रियांबद्दल मला अपार आदर वाटला.

माझ्याकडे त्यांच्यात मिसळण्याची पात्रता नाही, अण्णा! पात्रता नाही!!

अबापट Thu, 15/12/2016 - 22:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वाटलेच !!! मी पण एकदा शुचि मामींच्या राज्यातल्या महाराष्ट्र मंडळात जाऊन ओली डाळ , पन्हे असा मेन्यू खाऊन आलो आहे ( हे काय विचारल्यावर चैत्र आहे ना वगैरे उत्तर मिळाले होते) साधारण माहोल लक्षात आलं होता. बरीच आबालवृद्ध मंडळी आपापल्या वेळचा महाराष्ट्र घेऊन आली होती असे दिसले.वावगे वगैरे काही नाही त्यात . To each his own..विस्मयकारक वाटले होते खरे

सामो Thu, 15/12/2016 - 22:36

In reply to by अबापट

वावगे वगैरे काही नाही त्यात . To each his own..

अगदी हेच. झिरो टॉलरन्स आणि व्हेरी लो टोलरन्स हा मी फार कमी गोष्टींकरता राखून ठेवला आहे. बाकी सर्व "To each his own.." कॅटॅगरीत मोडतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 15/12/2016 - 23:32

In reply to by अबापट

गरीबांच्या टेक्सासात, भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना अनेकदा ओली डाळ बनते आणि फ्रिजमध्ये स्थानापन्न होते. दुपारी चारच्या सुमारास भूक लागल्यावर "बघ, बघ, आठ अमिनो आम्लं आहेत," म्हणताना ती डाळ जठरगामिनी होते. भारतात मात्र तेव्हा वर्षा ऋतू, आषाढ महिना वगैरे असतात.

सामो Thu, 15/12/2016 - 23:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वा! कैरी मिळते का तुमच्याकडे? ओली डाळ करायला? इथे आमच्या गावात कैरी मिळत नाही. त्याकरता मिनेपोलिसला जावे लागते.

राजेश घासकडवी Thu, 15/12/2016 - 18:33

माझ्यापेक्षा चांगल्या नारळाच्या वड्या करता येतात

तुमच्यापेक्षा जास्त चांगला नारळ कुठून सापडायला आलाय?

चिमणराव Thu, 15/12/2016 - 20:43

तिकडे कुठल्याही पदार्थाचे क्यलरी,फॅट्स,सॅाल्टस कित वगैरे विचारून हैराण करतात का? इकडे साखर नसलेले हे एक नवीन फ्याड आले आहे. जिलबी ,बासुंदीसुद्धा.मिठाइवाले {पदार्थाला}शाइनिंगसाठी जिलेटिन घालतात.
लेख विनोदी आहे पण हे उगाच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 17/12/2016 - 05:29

In reply to by चिमणराव

अमेरिकेत क्यालऱ्या, फ्याट्स, सॉल्ट्स किती हे विचारावं लागत नाहीत. खाण्यासाठी तयार असलेल्या प्रत्येक पदार्थाच्या वेष्टनावर ते छापलेलं असतंच. ते वाचून, मोजून-मापून खाणंच योग्य. नाही तर माझा हत्ती बनायला वेळ लागत नाही.

मी घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवते याचं एकमेव कारण, विकतच्या पदार्थांमध्ये वारेमाप साखर असते. ती अंगावरून उतरवण्यासाठी आपल्यालाच कष्ट करावे लागतात. घरी नावापुरती साखर घालून पदार्थ बनवता येतात, शिवाय कॉफी, ब्रँडी, चीज, चॉकलेट, नारळ, बदाम असे जे काही इतर आणि मुख्य घटकपदार्थ असतात त्यांची चव जिभेला लागते हा आणखी फायदा. थंडीच्या दिवसांत मी अनेकदा घरी बासुंदी बनवते, म्हणजे दूध आटवते आणि त्यात केशर, बदाम वगैरे घालून ओरपते. आटवलेल्या दुधात साखरेची गरजच वाटत नाही. कमी गोड खाऊन जिभेलाही तशीच सवय झालेली आहे; आता पदार्थात गोडाचं प्रमाण जरा जरी जास्त असेल तर जीभ सॅच्युरेट होऊन बधीर होऊन जाते.

आमचा लाडका मिलिंद सोमण म्हणतो की साखर सोडून बाकी सगळ्या गोष्टी खा. तोच खरा, बाकीचे सगळे झूट!

पल्लवी०८ Mon, 13/02/2017 - 14:33

नारळाच्या वड्यांची हि रेसिपी आहे अप्रतिम पण शाईनमारू म्हणजे काय ते मात्र समजलं नाही. बाकी पाककृती उत्तम! आणि हो वड्यांचा फोटो खरंच टेम्पटिंग आलाय...

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/02/2017 - 22:29

शाईनमारू शब्दाबद्दल पृच्छा दिसल्या म्हणून - नारळाच्या वड्यांची पाककृती नव्यानं, त्यातून मी, लिहिण्याची काही गरज नव्हती. दुसरं, जिथे त्या वड्या घेऊन गेले होते तिथे विकतची बिस्किटं ठेवली असती तरी काही फरक पडला नसता. पण मुळात वड्या बनवणं आणि पाककृती लिहिणं या दोन्ही गोष्टी पिसारा फुलवून नाचण्यासाठीच केल्यामुळे शाईनमारू या शब्दाचं प्रयोजन.

मृदुला Fri, 17/02/2017 - 18:53

पाककृती उपयुक्त वाटली. योग्य वेळी वापरण्यात येईल.