--- "शेक्सपिअरच्या नाटकांचं वाचन" ---

नाट्यक्षेत्रातील आणि फेसबुकवरील दोन ज्येष्ठ -- चं. प्र. देशपांडे आणि रविन्द्र दामोदर लाखे

चंप्रसरांची नाटकं वाचणं आणि लाखेसरांच्या पोस्टमुळे शरद भुताडियांचा ठाण्यात सादर होणारा ‘किंग लिअर’ हा नाट्यप्रयोग बघायला मिळणं ह्या दोन गोष्टींमुळे काय घडलं त्याची ही कहाणी ---

--- "शेक्सपिअरच्या नाटकांचं वाचन" ---

आपल्या जगण्यात काही वळणे अनपेक्षितपणे येतात. आपल्याला ती समजली आणि त्या वळणांवर चालत राहिलं की ती अशा एखाद्या मुक्कामी नेतात की तिथून परतीची वाट तर नसतेच. उलट, समोर भव्य-दिव्य अवकाश पसरलेलं असतं, आपल्या आवाक्यात न सामावण्याइतकं अवाढव्य आणि विस्तीर्ण! आपण फक्त इतकंच करायचं, की दडपून न जाता त्या भव्यतेला सामोरं जायचं. शक्य असतील त्या सर्व मार्गांनी तिच्यात स्वत:ला सामावून घेत पुढे चालायचं!

काही वर्षांपूर्वी, सांसारिक जबाबदारी सांभाळून, स्वत:साठी वेळ काढू शकत होते म्हणून आणि घरपोच वाचनालयातून पुस्तकं आयती घरबसल्या मिळत होती म्हणून अवचितपणे माझ्या वाचनछंदाला नव्याने सुरूवात झाली. कथा-कादंबरी-कविता-समीक्षा-चरित्रं-आत्मचरित्रं असे कोणतेही कप्पे न पाडता अक्षरशः अभ्यास केल्याप्रमाणे एक संपलं की दुसरं अशी पुस्तकं वाचता वाचता मी त्यात गुंतत गेले. त्यातून माझी स्वत:शी होणारी ओळख वाढायला लागली. स्वत:तील अनोखेपण आवडायला लागलं. तसंच स्वत:च्या व इतरांच्याही जगण्याविषयीचं भान-आकलन नव्याने येऊ लागलं.
वाचता-वाचता मनातल्या मनात सुरू झालेलं लेखन कागदावर उतरवायला सुरूवात झाली आणि वाचन-लेखन हे जगण्याचा अविभाज्य भाग झालं.
पुस्तकांच्या माध्यमातून ‘आतल्या मी’ची भेट वारंवार घडू लागल्यानंतर वेगळंच काही दिसू लागलं. स्वत:चं घडणं, विचार करणं, कौटुंबिक व्यवस्था-परंपरेत खोलवर रुजवून घेणं किती गच्चपणे झालंय हे जाणवलं. आणि मग सुरू झाली धडपड, स्वत:तून ‘मोकळं’ होण्याची!

वाचनाच्या ह्या भरात नवीन ओळखीही होत राहिल्या. त्यातील एक नाव, लेखिका अंबिका सरकार. आम्हांला कॉलेजमधे इकॉनॉमिक्स शिकवणार्‍या प्राध्यापिका! जेव्हा समजलं की त्या मराठीतील कथा-कादंबरीकार आहेत तेव्हा काहीसं आश्चर्य वाटलं. त्यांची पुस्तकं वाचली आणि कॉलेज संपल्यानंतर जवळजवळ २५ वर्षांनंतर सुरु झालेल्या भेटी वरचेवर होऊ लागल्या. एकदा गप्पांच्या ओघात त्या म्हणाल्या, "शेक्सपिअरचं `किंग लिअर' मी दोन्ही पुस्तकं शेजारी-शेजारी ठेवून वाचलं, मूळ इंग्रजी किंडलवर आणि विंदा करंदीकरांनी केलेला मराठी अनुवाद!"
त्यावेळी समजलं नाही पण तो विषय गप्पांपुरताच संपणार नव्हता तर आम्ही दोघी एकत्रितपणे शेक्सपिअरच्या नाटकांचं वाचन करणार याची ती नांदीच होती.

मधल्या काळात मी माझ्या नोकरीच्या व्यापात गुरफटले, बाईंकडे नियमित जाणं, फोनवर बोलणं कमी झालं. पण वाचन-लेखन तर सुरू होतंच. त्याचाच एक भाग म्हणजे आभासी-विश्वातील फेसबुक हेही वाचनाचा अपरिहार्य भाग बनलं. साहित्याच्या बरोबरीने चित्रं, चित्रपट, नाटय, नृत्य अशा इतर ‘कला’विश्वाची ओळख होऊ लागली. हातात एकतर पुस्तक धरून वा कीबोर्ड-माऊस धरून, वाचन घडू लागलं. त्यातच, सुप्रसिध्द नाटककार चं. प्र. देशपांडे यांचं सगळच्या सगळं लेखन उपलब्ध असलेली त्यांची वेबसाईट (www.champralekhan.com) दिसली आणि त्यांची नाटकं वाचता येण्याचा पर्याय खुला झाला. ‘नाटक’ हे निव्वळ बघण्याचं नसून वाचण्याचंही असतं हे लक्षात आल्यानंतर एक एक करत नाटकं वाचत गेले. ‘नातं’, ‘सामसूम’, ‘ए आपण चहा घ्यायचा’, ‘प्रेमच म्हणू याला हवं तर’, ‘बुध्दीबळ आणि झब्बू’, ‘ढोलताशे’...

ह्यापैकी ‘ए आपण चहा घ्यायचा!’ हा नाट्यप्रयोग बघण्याची संधी मिळाली. नातं निभावता-निभावता दमछाक झालेले नवरा-बायको, तुझं-माझं जमेना अशा कात्रीत अडकलेले! ना सोडता येत आणि धरून ठेवून फक्त दु:खच देत राहतंय. काय करायचं ह्या असल्या नात्याचं? अशा पेचात सापडलेल्या दोन जोडप्यांची कथा आणि व्यथा मांडणारं हे नाटक. आपल्या मनाप्रमाणेच सारे नातेसंबंध असणे कदापि शक्य नाही याचं भान जागं करणारं आणि अमक्या गोष्टीचं अमुक एकच उत्तर वा तमक्या प्रश्नावर तमुकच उतारा असं नसतं तर यापेक्षा काही वेगळं सुचवणारं हे नाटक... ज्याने त्याने वाचून-बघून आपापल्या परिने अनुभवावं असं....
नाटकं ‘बघावीत’ आणि ‘वाचावीत’सुध्दा..... असा दुतर्फा अनुभव ह्या नाटकाने दिला.
साहित्य-वाचनात ‘नाटक’ही आपोआप समाविष्ट झालं. जगण्यातील बंधांबरोबर वाचनातील अमुकच साहित्यप्रकार असे बंधही गळून पडले.

फेसबुकवरच समजलं की डॉ. शरद भुताडिया साकारत असलेल्या, विंदांनी भाषांतरित केलेल्या ‘किंग लिअर’चे मोजके प्रयोग होणार आहेत आणि त्यातील एक आपल्या शहरातही असणार आहे. तो प्रयोग बघितला. त्याचं सादरीकरण उत्तम झालं. नाटकातील संवाद किती काव्यमय असू शकतात! पाठांतर करून साभिनय सादरीकरण झालेल्या त्या संवादांनी मी भारावून गेले.
त्यानंतरच्या काळात नोकरी सोडल्याने जरा जास्त वेळ मिळू लागला आणि पहिली आठवण झाली ‘किंग लिअर’ची आणि अंबिका सरकारबाईंची! तडक बाईंना गाठून विचारलं, "आपण दोघींनी एकत्र ‘दोन्ही किंग लिअर’ वाचायचे का?" वाचनप्रेमी बाईंनी लगेचच होकार दिला.
विंदांच्या ‘राजा लिअर’ आणि `No Fear Shakespeare' ह्या मालिकेतील ‘किंग लिअर’, दोन्ही पुस्तकांची लगेचच खरेदी झाली आणि आठवड्यातून एक दिवस आमचा एकत्रित वाचन-परिपाठ सुरू झाला. विंदांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना, चांगली ७० पानांची! शेक्सपिअरच्या नाटकांच्या आधीचा, सांस्कृतिक
पुनरुज्जीवनाचा - रेनेझन्सचा काळ, त्याने नाटकं लिहिली तो काळ आणि त्याच्या नाटकांचा निरनिराळ्या अभ्यासकांनी घेतलेला मागोवा हे वाचताना सुरूवातीला आपण हे नक्की काय वाचतोय ते समजेना. आजवर जे वाचत आलोय त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे आणि हे वेगळेपण काय आहे हे समजून घेण्यासाठी ती प्रस्तावना पुन्हा-पुन्हा वाचावी लागली. एकीकडे नाटकही वाचायला सुरुवात केली. ते वाचताना काही भाग अडला की पुन्हा प्रस्तावना-वाचन, पुस्तकाच्या शेवटच्या ८१ पानांतील ‘भाष्य’वाचन असं करत गेलो.
‘किंग लिअर’ वाचून पूर्ण होत आल्यानंतर वाटू लागलं, आता ह्यानंतर काय? दर आठवड्याला नियमित भेटींची, अभ्यासपूर्ण वाचनाची अंगवळणी पडलेली सवय मोडता येणं अशक्य आहे हे आम्हां दोघींनाही जाणवलं. मग सलगपणे शेक्सपिअरचं एकेक नाटक वाचायचं ठरवलं. शेक्सपिअरच्या नाटकांची पुस्तकं शोधताना ‘No Fear Shakespeare’ ह्या मालिकेतील पुस्तकांची ओळख झाली. डाव्या पानावर शेक्सपिअरने लिहिलेलं मूळ नाटक आणि उजव्या पानावर प्रचलित इंग्रजी भाषेतील त्याचं रूपांतर अशा स्वरूपात शेक्सपिअरची अनेक नाटकं उपलब्ध आहेत हे समजलं.

म्हणतात ना, एकदा का तुमच्या मनाची संपूर्ण तयारी झाली की अवघं विश्वच तुमचं सहाय्यकारी बनतं... ह्याचा प्रत्यय येत राहिला. ‘किंग लिअर’, ‘हॅम्लेट’, ‘मॅकबेथ’, ‘ऑथेल्लो’, ह्या प्रमुख चार शोकांतिका, ‘ज्युलिअस सीझर’, ‘टेम्पेस्ट’, आधीच्या कोणत्याही नाटकावर न बेतलेलं, केवळ शेक्सपिअरने लिहिलेलं ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ (‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’)... ह्या इंग्रजी पुस्तकांसोबत मराठी अनुवादही मिळत गेले.
ज्या नाटकांचे मराठी अनुवाद नाहीत, जसं की ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’, ‘रोमिओ ॲण्ड ज्युलिएट’ त्यांच्या ‘No Fear Shakespear’ मालिकेतील पुस्तकांनी साथ दिली. त्यांच्यामुळे शेक्सपिअरचं इंग्रजी समजून घेता आलं.
तसंच, ए. सी. ब्रॅडले, चार्ल्स व मेरी लॅंब ह्यांच्या इंग्रजीतील पुस्तकांसोबतच मराठीत शेक्सपिअरविषयी काय काय साहित्य उपलब्ध आहे हे शोधताना कै. नाना जोग,
कै. वि. वा. शिरवाडकर, कै. के. रं. शिरवाडकर, अरूण नाईक, राजीव नाईक, परशुराम देशपांडे, यांची पुस्तकं मिळाली. ‘शेक्सपिअर आणि सिनेमा’ ह्या विजय पाडळकरांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचीही ह्यात भर पडली.
नसिरुद्दीन शहाची वाचनीय प्रस्तावना असलेल्या इ. नेसबिटच्या, लहान मुलांसाठी लिहिलेल्या ‘ब्युटीफूल स्टोरीज फ्रॉम शेक्सपिअर’ ह्या पुस्तकातील ग्लोब थिएटरच्या नकाशामुळे तर त्या काळात नाटकं कशी सादर होत असावीत ह्याची कल्पना आली.
बाईंचा इंग्रजी साहित्याप्रमाणे इंग्रजी सिनेमांचाही व्यासंग असल्याने आणि वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची संगणक, इंटरनेट यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे यूट्युबरून शेक्सपिअरचे काही इंग्रजी चित्रपटही आम्ही डाऊनलोड करून घेतले आणि एकत्र बघितले. त्यापैकी `शेक्सपिअर इन लव्ह’ ह्या सिनेमामुळे तर ग्लोब थिएटर खरंच कसं असेल, पिटातील प्रेक्षक म्हणजे काय, राणीचा दरबार, दरबारातील उमराव, त्यांचं रहाणीमान, अशा गोष्टींचीही कल्पना आली. नाटक नजरेसमोर जणू प्रत्यक्ष घडतंय याची कल्पना करत वाचन होऊ लागलं.

फक्त शेक्सपिअरची नाटकं लागोपाठ वाचत असल्याने त्या नाटकांतील वैशिष्ट्यं दिसू लागली. कामकरी ते उच्चभ्रू-अभिजन अशा सर्व थरांतील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी तसेच विलक्षण सुरुवात होऊन आणि उत्तरोत्तर रंगत जाऊन उत्कंठा वाढवणारी ही नाट्यसंपदा!
पहिल्या अंकाच्या पहिल्याच प्रवेशात रंगमंचावर येणारं `हॅम्लेट'च्या बापाचं भूत, `मॅकबेथ'मधील चेटकिणी, `किंग लिअर'ने केलेली साम्राज्याची वाटणी, ‘टेम्पेस्ट’मधील वादळात सापडलेलं, हेलकावणारं जहाज असे प्रवेश बघता-बघता प्रेक्षक `आता पुढे काय घडणार' ह्या उत्सुकतेने शेवटपर्यंत नाटकाला खिळलेले राहत असणार हे लक्षात येत गेलं. तसंच, शेक्सपिअरने रंगवलेली ही पात्रं नक्की आहेत तरी कशी हेही समजून घेणं उद्बोधक ठरलं.

खोट्या अहंकाराच्या आहारी जाऊन आपली सगळी संपत्ती मुलींना वाटून देऊन देशोधडीला लागलेला राजा लिअर--
स्वत:ची काहीही चूक नसताना निव्वळ सख्ख्या काकाच्या दुष्टाव्याने आयुष्यातून उठलेला आणि शेवटी जीव गमवावा लागणारा निष्पाप हॅम्लेट--
आपली सदसद्विवेक बुध्दी न वापरता, दुष्ट चेटकिणींच्या आणि मूर्ख पत्नीच्या सल्ल्याने आपलंच जगणं विनाशाकडे नेणारा मॅकबेथ--
मनात दुष्टाव्याचा कणही नसणारी परंतु इयागोसारख्या दुष्ट-कारस्थानी माणसांच्या सल्ला ऐकल्याने उध्वस्त झालेली ऑथेल्लो-डेस्डिमोना--
अंतर्गत राजकारणाचा बळी ठरलेला आणि आपल्याच जिवलग मित्राच्या, ब्रूटसच्या हातून मारला गेलेला ज्युलिअस सीझर--
फादरचा निरोप वेळेवर न पोचल्याने खचून जाऊन जीव देणारा रोमिओ आणि ते सहन न होऊन त्याच्यापाठोपाठ आत्महत्या करणारी ज्युलिएट ---
ह्या व्यक्तिरेखांनी मनात कायमचं घर केलं. निरपराध, निरुपद्रवी माणसांच्या वाट्याला अशी अवहेलना, दु:खं आणि शेवटी अकाली जीव गमावण्याची वेळ का यावी अशा विचारांनी आम्हां दोघींचा जीवही हळहळत राहिला.

शेक्सपिअरची नाटकं आणि त्या वाचनाच्या ओघात संदर्भासाठी संबंधित इंग्रजी-मराठी साहित्य एकत्र वाचण्याने आमचा दोघींचाही फायदा झाला. मराठीत शेक्सपिअरच्या नाटकांवर लिहिली गेलेली इतकी उत्तम पुस्तकं एरवी वाचली गेली असती की नाही कुणास ठाऊक! बाईंकडून आणि ‘नो फिअर शेक्सपिअर’ पुस्तकांतून शेक्सपिअरच्या इंग्रजीची ओळख झाल्यामुळे नवीन शिकायला मिळण्याच्या आनंदात मी आणि दुसर्‍या-तिसर्‍यांदा होणार्‍या पुनर्वाचनाने ह्या नाटकांचा अधिक सखोल अभ्यास होत राहिला त्या आनंदात बाईही!
त्याचप्रमाणे, नाटक ह्या माध्यमाची ओळख घडली. शेक्सपिअरकालीन दिवसा-उजेडी रंगणारे, विना-नेपथ्याचे, विना-प्रकाशयोजनेचे, निव्वळ शब्दांच्या माध्यमातून वातावरण-निर्मिती करणारे पाचअंकी नाट्यप्रयोग आणि आजच्या धावपळीच्या युगात घडणारे मोजक्या अंकांचे, थोडक्या काळात, व्यवस्थित (प्रसंगी भपकेबाजदेखील) नेपथ्य-प्रकाशयोजना यांनी देखणे होणारे नाट्यप्रयोग ह्यात काय फरक आहे हेही समजून घेणे आवडू लागले.

स्थल-कालाच्या पलिकडे असणारी, अंधार-उजेडाने व्यापलेली जीवनसमावेशकता म्हणजे काय, जगण्यातील बाह्य आणि आंतरिक संघर्ष काय आणि कसे असतात, माणसाच्या मनाच्या कप्पांच्या किती-कायकाय तर्‍हा असतात, मनांची दुर्बलता विनाशाकडे कशा प्रकारे खेचत नेते, तसेच विचार आणि वर्तन यांची सांगड न घालता आल्याने काय काय अनर्थ ओढवतात, माणसाच्या व्यक्तिगत वृत्तींवर त्याच्या सांस्कृतिक समजुतींचा प्रभाव किती खोलवर रुजलेला असतो....
अशा, जगण्यातील स्पष्टता आणून देणार्‍या अनेक गोष्टी सोदाहरण स्पष्ट होत राहिल्या.

वाचनछंदामुळे जसा कलेच्या सान्निध्यातील वावर वाढला तशीच शेक्सपिअरच्या चिरकालीन साहित्याची तोंडओळख झाली, जी माणूसपणाच्या मुख्य वाटेवर नेणारी ठरली...

चित्रा राजेन्द्र जोशी...
पूर्वप्रकाशित: शब्दमल्हार - मे २०१९

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचनानुभव चांगला शब्दांकीत केलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बालु की भित, पवन का खंबा |
देवल देख भया अचंबा ||
भोला मन जाने - अमर मेरी काया ||

धन्यवाद, मनीषा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅनडातल्या माझ्या राहत्या गावी Shakespeare in the Ruins नावाचा एक प्रकार दरवर्षी असतो. इथे एक शंभरेक वर्षांपूर्वीची मोनॅस्टरी आहे. काही वर्षांपूर्वी तिला आग लागून अंतर्भाग बराचसा जळाला, पण कवच शिल्लक आहे. त्या परिसरात स्थलनाट्य म्हणून दरवर्षी शेक्सपियरच्या एखाद्या नाटकाचा प्रयोग करतात. यावर्षी हॅम्लेट होतं. सगळे प्रवेश एकाच ठिकाणी नसतात. उदाहरणार्थ, मोनॅस्टरीचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोर घडीच्या खुर्च्या टाकलेल्या होत्या. तिथे एल्सिनॉरच्या किल्ल्यातला बापाच्या भुताचा प्रसंग होता. तो झाल्यानंतर एका स्वयंसेवकाने आम्हाला पुढे कुठे जायचं ते सांगितलं. मग प्रत्येकाने आपापली खुर्ची उचलून त्याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी जायचं की तिथे दुसरा प्रसंग. अशी ती पद्धत होती. छान अनुभव असतो. अर्थात प्रेक्षकांना प्रमाणाबाहेर नाचवणं शक्य नसल्यामुळे संहितेत काटछाट करावी लागते, पण ते ठीक आहे.

उत्तर अमेरिकेत हा प्रकार रुळलेला आहे. शेक्सपियरच पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ, कित्येक ठिकाणी इब्सेनच्या नाटकांचे प्रयोग जुन्या घरांच्या दिवाणखान्यात केले जातात. पुण्यामुंबईत असे प्रयोग कितपत होतात ते ठाऊक नाही.

ह्या चं.प्र. देशपांड्यांच्या वेबसाईटची लिंक दिलीत तर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे जे फेसबुक वापरू शकत नाहीत अशा माझ्यासारख्यांची सोय होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जयदीप चिपलकट्टी,
तुम्ही योग्य ते सुचवलेत. चंप्र देशपांडे यांच्या लेखनाची लिंक वरील लेखात घातली.
उत्तर अमेरिकेतला हा उपक्रम मस्त आहे. आणि अशी जागा बदलण्याची पद्धतही अनोखी आहे. माहितीबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0