काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९

ही शनिवारची सकाळ माझ्या चांगलीच लक्षात आहे.

सक्काळी सक्काळी परत आर टी ओ ला गेलो.

१० नंबर खिडकीवर रांग लावली.

केतनला झोल समजावून सांगितला.

केतननी नीट सगळं ऐकून घेतलं.

माझी काहीच चूक नसताना सॉफ्टवेअरच्या चूकीमुळे मी हेलपांडतोय हे त्याला पटत होतंच.

पण त्याचाही नाईलाज होता.

तो म्हणाला, "एकदम पहिल्या लायसन्सचा काही रेकॉर्ड आहे का?"

आता घरी कुठेतरी असेलही झेरॉक्स.

मी आपला चुपचाप ते शोधण्यासाठी घरी जायची तयारी करायला लागलो.

पण केतनला माझी दया आली असावी.

अचानक तो म्हणाला,

"एक काम करा दुसऱ्या मजल्यावरच्या मोठ्या पाटील साहेबांना भेटा.

त्यांना तुमची केस तुम्हीच समजावून सांगा.

हे घ्या तुमचे पेपर्स."

त्यानं एक लहानशी चळत माझ्या हातात दिली.

त्यांनी सही केली की तुमचं काम होऊन झाईल लोखंडे जरा जा त्यांच्या बरोबर.

बाजूला एक सावळे किरकोळ यष्टीचे लोखंडे क्लार्क बसलेले होते.

द. मा. मिरासदारांच्या गोष्टीतले एकाच वेळी प्रेमळ आणि बेरकी गावकरी असतात ना तसे दिसत होते ते.

ते आणि मी पायऱ्या चढायला लागलो.

हेच ते दुसऱ्या मजल्यावरचं सुप्रीम कोर्ट.

आधीच सांगितल्याप्रमाणे इकडे असिस्टंट कमिशनर लेव्हलचे ऑफीसर बसतात.

पाटील साहेबांच्या केबीनमध्ये गेलो तर ते आज सुट्टीवर!

माझा चेहेरा परत पडायला लागलेला.

लोखंडे म्हणाले थांबा शेटे सायबांकडे जाऊया.

शेटे अजूनच मोठे साहेब...

आम्ही त्यांच्या ऑफीसमध्ये घुसलो टिपिकल बड्या सरकारी ऑफिसरची केबीन.

मोठ्ठं टेबल, त्याच्यावर शुभ्र टेबल क्लॉथ, कोपऱ्यात चकचकीत पितळी अशोक स्तंभाची मूर्ती वगैरे वगैरे...

त्यांना लोखंडेंनी केस समजावून सांगितली.

ते थोडे त्रासलेले दिसले...

ऑलमोस्ट आम्हाला उडवून लावायच्या बेतात...

...

...

...

कसं आहे ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण येतात.

वर्षं किंवा महिने किंवा आठवडे किंवा तास नव्हे...

इट फकिंग बॉइल्स डाऊन टू अ सेकंड!

त्या सेकंदात तुम्ही काय करताय ह्यावर पुढच्या सगळ्या गोष्टींची माळ बनते किंवा बिघडते.

शूट-आउटवर मारलेला गोल,

क्युबा क्रायसिसमध्ये न्यूक्लिअरच्या बटणावर ठेवलेलं बोट,

बायकोनी अफेअर पकडल्यावर म्हटलेलं नाय / हो...

इट फकिंग बॉइल्स डाऊन टू अ सेकंड!

हा सेकंद माझा होता.

मी पुन्हा एक मोठ्ठा श्वास घेतला...

आणि म्हणालो, "सर मी जरा तुम्हाला थोडी बॅकग्राउंड सांगू का?"

मला माहिती होतं की माझ्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या आत्ताच रिकाम्या करायच्यात... पुन्हा संधी मिळणार नाही.

भडाभडा मी काहीच राखून न ठेवता सगळं सांगून टाकलं सरांना...

माझा नवस,

टॅक्सीवाल्यांना, मुंबईला जाणून घ्यायची इच्छा,

ब्लॉग लिहायचा प्लॅन,

अजिबात झोल न करता बॅज काढायचाय... सगळं सगळं.

जरा जास्तच बोलल्यासारखं वाटलं मला...

पण ठीक आहे मेलेलं कोंबडं... वगैरे...

त्यांचे चष्म्याआडचे भेदक डोळे किंचित निवळल्यासारखे वाटले.

"तुम्ही सध्या काय करता?", त्यांनी विचारलं.

"सर मी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे."

"पगार चांगला असेलच"

"हो सर मस्त आहे पण टॅक्सी आपल्याला पैशासाठी चालवायचीच नाही आहे."

माझा धीर चेपलेला, मी जरा जास्तच फ्री झालो.

त्यांना बहुधा जवळ जवळ मी आवडायला लागलेलो एव्हाना.

खेळकर हसत त्यांनी हिरव्या पेनानी लफ्फेदार सही मारली पेपर्सवर.

"जा तुम्ही झालं तुमचं काम."

त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मारून आम्ही खाली आलो.

लोखंडेंचा एक गालगुच्चा घ्यावासा वाटत होता मला पण कंट्रोल केलं.

कागद फडकावत परत केतनकडे आलो.

तो ही हसला. बोलला प्लीज बसणार का थोडा वेळ बाकीची कामं उरकायचीयत.

मी बोललो धावेल.

एक खुर्ची घेऊन शांतपणे पेपर वाचत बसलो दोन एक तास.

ऐलतीरी... जगड्व्याळ सरकारी प्राण्याच्या पोटात... मधून मधून आजुबाजूला बघत.

एक लक्षात आलं की हे लोकही प्रचंड बिझी असतात.

बऱ्याच विनोदी सिरीज/ चित्रपटांत आरामात डुलत डुलत चालणारी सरकारी ऑफिसेस दाखवतात...

पण इकडे प्रचंड काम चालू होतं... आतले लोकं बाहेरच्या लोकांचे किचकट प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न खरंच करत होते.

बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्या हे अल्टिमेटली चांगलं असलं तरी सध्या मात्र त्याच्यात माझयासारखेच अनेक लोकांचे घोळ होते.

केतन प्रचंड एफिशियंटली लोकांच्या प्रॉब्लेम्सचा फडशा पाडत होता.

बो#$र काका आणि लोखंडे सुद्धा कोणत्यातरी अर्जंट आर. टी. आय. ऍप्लिकेशनला उत्तर देण्याची डेस्परेट तयारी करत होते.

मला एकदम किरण गुरवांचा अल्टिमेट कथासंग्रह आहे "राखीव सावल्यांचा खेळ" म्हणून त्यातली "भूमी" कथा आठवली.

एकंदरीत राईट टू इन्फर्मेशनमुळे सरकारी ऑफीसेसची अकाऊंटेबिलिटी निश्चितच वाढलीय हे नक्की!

मला बराच वेळ शांत विनातक्रार बसलेला बघून केतननी कॉफीही मागवली...

खरंतर पोटात सकाळपासून काही नसल्यामुळे प्रचंड ऍसिडिटी झालेली. पण त्यांचं मन मोडवेना.

एकंदरीतच केतन, बो#$र काका आणि लोखंडे ह्यांनी नियमाची चौकट कुठेही न तोडता खूपच सहकार्य केलं.

सो एकंदरीत वसवस करणाऱ्या खडूस आणि स्लो सरकारी ऑफिसेसचा स्टिरिओटाइप हळूहळू का होईना पण चेंज होतोय हे मी फर्स्ट हॅन्ड सांगू शकतो.

फायनली तीन वाजता लोखंडे म्हणाले की साहेब तुम्ही गेलात तरी चालेले मी करतो तुमचं करेक्शन!

मी पोटात भूक आणि दिलात आशा घेऊन घरी आलो.

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मीटर थोडं हललंय. पण पडायच्या बेतात आहे.

अब दिल्ली दूर नही! (Or is it Lol