Skip to main content

गेंझट

#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

गेंझट

- आदूबाळ

वीस वर्षं झाली असतील इथं शेवटचं येऊन. इथून शेवटचं निघून. गाव बदललं. देश हिंडलो, पण या गावी मुद्दाम आलो नाही. नारायणसोद्या डोक्यावर बसला असता. पहिली वीस वर्षं बसलाच होता म्हणा - बाप म्हणून. त्याचे छिनाल चाळे बघून वांती यायला लागली होती. नाच्या साला.

मेला असेल का आत्तापर्यंत?

निघालो तेव्हा त्याच्या खात्यात चार बायका होत्या. लग्नाची बाईल माझी माय. चारात ती नाय. कधीच मरून गेली होती. एक पुजार्‍याची संपी. नारायणसोद्यापेक्षा दहा वर्षं लहान असेल. तरणी झाली तशी सोद्याने घेतली अंगाखाली. तिथेच पडून राहिली मठात. आयुष्यभर. नाचाच्या सप्त्यात हिरोईनच. दुसर्‍या तिसर्‍या नाचाच्या कार्यक्रमातल्या गोपिका. चौथी, माझी बायको. लग्नाची.

निघालो तेव्हा बाळ्या तिच्या पोटात होता. रस्ते लहान होते. दिवे पिवळे होते. दुकानं पत्र्याची होती. रात कुत्र्याची होती.

वीस वर्षं झाली असतील.
***

पुजारी शिंतर्‍याचा पोर. चाळे करत बसायचा. देवडीच्या कोपर्‍यात, दिसेल न दिसेल असा. हात कायम चड्डीत. कधी स्वत:च्या, कधी आमच्यासारख्या पोरांच्या.

मठात रीघ. धान्याची शीग. नारायणसोद्या हात उंचावून बसलेला. आला बाप्या, दे आशीर्वाद. आली मैना, हातावर साखर. आला थेरडा, रुद्राक्ष त्रिमुखी. नाव पसरलं उगाच नव्हतं. बोलणं कमी. सोलणं जास्त. नजरेनं. समोर धुनी.
शिंतर्‍याचा पुतण्या मात्र शेळी. थुका उडवत 'स' म्हणणार. तोथरा शिंथरा म्हणायचो त्याला आम्ही. गुरूगुरू खेळणार. भुरूभुरू पळणार. पुजारणीचा जीव टांगलेला. देवडीत चढंल, की लेकरू पडंल. गेला झोक, की डोकीला खोक. सुपात कापूस घालून जपायची. पोरापेक्षा पुतण्या जवळचा. तेही बरोबरच.

वीस वर्षांनंतरही तसाच होता. शेळी.

मठही तसाच होता. जरा पडका. आतून किडका. पण नारायणसोद्याचा कुबट वास नव्हता. कुठे गेला? मेला?
उजव्या सोप्यात जुना पुजारी शिंतरा फोटोत. त्याजागी आता तोथरा शिंतरा. मळकी कॉट आणि खुंटीवरचे अंगे. तसेच. कोपर्‍यात वह्यांची चवड. तशीच. एक पुजारी शिंतरा मरतो, दुसरा तोपर्यंत तयार झालेला असतो.
ओळखलं, त्याने. हाताला धरून बसवलं. गोष्टी सांगितल्या.

पुजारी शिंतरा मेला. त्याची म्हातारी शिंतरी मेली. दहावर वर्षं झाली. शिंतर्‍याचा पोर हरामखोर - तोपण जांघा घासत मेला. पुतण्या मालक. मठात स्वतःची गादी केली आता.

मी विचारणार नव्हतो नारायणसोद्याबद्दल. त्याच्या खात्यातल्या तीन बायांबद्दल. चौथ्या, माझ्या बायकोबद्दल.
पण बाळ्या तिच्या पोटात होता, आणि त्यालाच तर शोधत या गावात आलो होतो.

"रंगा, तुला खूप शोधलं रे आम्ही. नारायणस्वामींनी, सरूवैनीने - सगळ्यांनी. असा कसा निघून गेलास? आणि ही भगवी वस्त्रं? परत तरी कशाला आलास?" तोथरा शिंथरा कळवळून म्हणाला.

बसल्या जागी मी पायांची जुडी आवळली. वीस वर्षांपूर्वीच्या आठवणी पिंजल्या. नारायणसोद्याचे नाच आठवले. बेरात्रीचे. त्याला येणार्‍या त्याच्या भक्तिणींचे अवतार आठवले. एकेक. सुरुवातीला लांब राहणारी सरला नारायणसोद्याच्या नाचातून आल्यावर कशी दिसायची ते आठवलं. दमलेली. गाभुळलेली.

बघत राहिलो. बघत राहिलो.

आयुष्यावर तपोमूर्ति नारायणस्वामींची सावली धरून राहिली होती. मठाधिपती. त्यांच्या आध्यात्मिक अधिकारापुढे त्यांच्या कार्कुंड्या पोराला कोण विचारतो. राहायची जागा शिंतर्‍याचा मठ. तो जणू धुनीसकट नारायणसोद्याला वापरायला दिलेला. माझ्या लहानपणापासून तिथेच. मोठा झालो.

कळायला लागल्यापासून पेटती धुनी आणि नारायणसोद्याचे साप्ताहिक नाच. अध्यात्म माझ्या जवळपासही फिरकेना. नारायणसोद्याने सगळं करून झालं. त्याच्या चिलमीतला घासही देऊन पाहिला. नाहीच. सोद्या बघायचा, मुंडी हलवायचा, निघून जायचा. मी दिसायला आईवर गेलेला. नारायणसोद्यासारखा बघता बघता बाई नादाला लावायचा अंगजोर जवळ नाही. बुद्धी बळवत्तर म्हणावी तर तसंही नाही.

शेवटी तपोमूर्ति नारायणस्वामींच्या नावावर टिंबर मार्केटमध्ये एका शेटीने हिशोब लिहायला ठेवून घेतला. तपोमूर्ति नारायणस्वामींचा मुलगा रंग्या कारकून झाला. नारायणसोद्याच्या कृपेने. पुढे लग्न लावून दिलं. सोयरीक तेही तपोमूर्ति नारायणस्वामींच्या तपोबळाने तापलेले लोक. मुलगा कारकून असला तरी नारायणस्वामींचा मुलगा आहे, म्हणाले. घराण्याचा अधिकार मोठा, म्हणे.

सरला घरी आली. दिवसभर म्हातार्‍या शिंतरीला मदत करू लागली. मठाची व्यवस्था ठेवू लागली. आलागेला बघू लागली. कोर अन्नातलं घास अन्न नवर्‍यासंगे खाऊ लागली. रंगा कारकुनाला राजा झाल्यागत वाटू लागलं.
महिना गेला, दोन गेले, चार-पाच-सहा गेले. एक दिवस तपोमूर्ति नारायणस्वामींनी नव्या सुनेला आपल्या सत्संगात बोलावलं. आधी आठवड्यांतून एकदा, सर्वांसंगे; मग आठवड्यात दुसर्‍यांदा, विशेष अनुग्रह. लहानपणापासून नारायणसोद्यासमोर माझं तोंड उचकटत नसे. तरुणपणीही नाही.

दोन महिन्यांतच नारायणसोद्याचा सत्संग पावला. पोटात बाळ्या आला.

मी नेहमीप्रमाणे बघत राहिलो.

"बाळ्या." मी तोथर्‍याला म्हणालो. "बाळ्या?"

तोथरा शिंथरा करुणेने पाहात राहिला.

"कोण बाळ्या, रंगा? तू गेल्यानंतर वर्ष सहा महिन्यांत नारायणस्वामी आणि सरूवैनी निघून गेले इथून. कुठे - माहीत नाही. एक दिवस अचानक गेले. आम्हाला वाटलं तुला शोधून परत घेऊन येतील."

पण बाळ्या? मी जुडी गच्च आवळून घेतली.

"कुठे होतास इतकी वर्षं? कुठून आलास?"

मी जुडी आणखी गच्च आवळून घेतली. तोथरा विचारत राहिला. मी काहीच बोललो नाही. काय सांगणार वीस वर्षांचा जोखा?

म्हणाला,
"नारायणस्वामी इथून गेल्यानंतर धुनी कोणी पेटवली नाही. येणारे लोक कमी कमी होत गेले. संपले. चौथर्‍यात आता लोक निर्माल्य टाकतात."

मला गुदगुल्या झाल्या. साला एके काळी काय थाट नारायणसोद्याच्या धुनीचा. चंदन काय नि तूप काय नि राळ काय. झाली ना कचराकुंडी?

माझ्या चेहर्‍यात काही हललं असावं. तोथर्‍या शिंथर्‍याने चुकीचा अर्थ काढला.

"हांगाश्शी! आता बघशील ना धुनीकडे? तुला सांगू, मला कायम वाटे की नारायणस्वामींचा वंशज येईलच परत!" तो स्वत:वरच खूश होत म्हणाला. "आगं ए, आयकलं का? हे राहतील आता इथेच. यांच्या स्नानाची व्यवस्था कर..."
धुनीबिनी मला नको होती, पण शिंथरा गळ्यातच पडला. नारायणस्वामीच्या काळातली मठाची शान त्याला परत आलेली दिसत असावी.

मी त्याला थुकरवून उठणार होतो. फुकटचोट धुनीची झेंगटं कुठे गळ्यात घ्यायची? भगवी वस्त्रं आता अंगासरशी झाली होती, पण त्याने मी नारायणस्वामी होणार नव्हतो.

पण मला आठवलं - बाळ्या. त्याला शोधायलाच हवं होतं. मी निघून गेलो तेव्हा सरूच्या पोटात होता. आता विशीत आला असेल.

जुडी सोडून टेकलो. तोथरा शिंथरा माझ्याकडे बघून, पण स्वतःशीच हसला.

***

वस्त्या म्हणायचा, आपला जम बसवायचा असेल तर कमी बोल. बोलूच नकोस. तोंडाने कायम काहीतरी पुटपुटत राहा, म्हणजे लोकांना वाटतं जप चालू आहे. कोणी शिधा दिला तर घे. पैसे दिले तर ठेव. पावलाच्या वर कोणाचा स्पर्श होऊ देऊ नकोस. आलेल्या प्रत्येकाला काही दे. एखादं नाणं. नाहीतर फळ. अगदीच काही नाही तर चुलीतली राख दिलीस तरी ठीक. संन्याशाने देत राहावं. लोकांना मदत करावी. जडीबुटी द्यावी, जमलं तर.

वस्त्या वर्ष-वर्ष एकेका ठिकाणी राहायचा. मी दोनतीन महिन्यांत पुढे निघायचो. तेही जास्तीत जास्त. परत घुमून त्या ठिकाणी आलो तरी वस्त्या तिथेच आहे!

बाळ्या सापडेपर्यंत वस्त्या व्हायचं ठरवलं. धुनीची जागा साफसूफ केली. तिकडेच पडशी टाकली. तोथरा घरात राहा म्हणत होता, पण फारतर पावसापाण्याला जाईन पडवीत. नाहीतर आपला तरुतळवास.

जुना खदिरवृक्ष होताच. लहानपणापासून ऐकत होतो - तरुण नारायणसोद्या बायकोसोबत भिरीभिरी वेगळाली तीर्थं फिरत होता. इथे आला तेव्हा हे साधं देऊळ होतं - कोणा भाविकाने उत्तरपेशवाईत बांधलेलं, आणि पेशवाई बुडाल्यावर लोकांच्या नाण्यातांदळावर रुटुखुटू चाललेलं. शिंतर्‍यांच्या पिढ्यांच्या पोटाला घास घालण्यापलीकडे या देवाचा फारसा उपयोग कोणालाच नव्हता. नारायणसोद्याने अंगणातला हा खदिरवृक्ष पाहिला आणि साक्षात्काराची भावना झाली म्हणे. आणि मग इथेच राहिला म्हणे. धुनी पेटवली. तेवती ठेवली. देवळाचा मठ केला.

साक्षात्कार न व्हायला काय झालांय? व्यापाराची पेठ, लहानसं देऊळ, ऐसपैस अंगण, खैराचाफ्याची झाडं. रुजला इथे नारायणसोद्या. बायका जमवून सत्संग केले. त्या नावाखाली नाच केले. स्वत: परकर नेसला, चोळ्या घातल्या. पण नाव कमावलं, नारायणसोद्याने. रुजला.

मीही रुजतो.

तरुतळवासाबरोबर करतळभिक्षेची सोय काहीतरी करायला हवी. थोडे दिवस शिंथरा ठीक आहे, पण कायम नको. इथून बाहेर पडल्यापासून अन्नासाठी कोणावर अवलंबून राहावं लागलं नाही. उपास पडले तर काढतो, पण अन्नासाठी हात आठुरला नाही. आताही नाही लागणार.

उद्यापासून बाहेर पडावं. पेठेत हिंडावं. जुन्या खुणा शोधून पाहाव्यात. नारायणसोद्याच्या प्रेमातले जुने लोक शोधावेत. त्याच्या नाचातल्या बायका त्याच्याइतक्याच थेरड्या झाल्या असतील. मेल्याही असतील कुणीकुणी. नारायणसोद्याचा, आणि सरूचा पत्ता तिथूनच लागेल. नाहीतर इतक्या मोठ्या प्रिथवीवर शोधू कुठे बाळ्याला?

खदिरवृक्षाखाली धुनी उसासत होती. तोथर्‍या शिंथर्‍याच्या बायकोने काटक्यांचा भारा आणून टाकला होता. धुनी सकाळपासून पेटवून ठेवली होती. गंगावनी धुपाच्या दोन कांड्या झोळीतून त्यात सारल्या. सुवासिक धूर पसरला होता. त्याच्या आडून देवळातली ये-जा दिसत होती. धूर तिथपर्यंत पोचत होता, लोक आडून आडून बघत होते, पण भगव्या कपड्यातला गच्च दाढीवाला अनोळखी संन्यासी बघून कोणी जवळ येत नव्हतं. शेवटी रंग्या कारकून तो रंग्या कारकून. त्याला तपोमूर्ति नारायणस्वामींची सर कशी येणार? आपल्याभोवती लोक गोळा करणं हाच तो आध्यात्मिक अधिकार असणार. माझं आयुष्य लोकांपासून दूर पळण्यात गेलेलं! वस्त्याच्या हसण्याचा आवाज आल्यासारखा वाटला.

उन्हं तापली. झापड आली. बसल्या बसल्याच पेंगलो.

थंडगार स्पर्शाने दचकून जाग आली.

एक स्वस्तशी निळी साडी नेसलेली बाई पायांना शिवत होती. चटका बसल्यागत मी पाय मागे घेतले. बाई बिचकली, मागे सरू लागली. वस्त्या आठवला - कोणाला विन्मुख पाठवू नकोस. पेटत्या धुनीच्या कडेला राख आली होती, तिथून चिमूटभर उचलली आणि बाईच्या हातावर ठेवली. राखेबरोबर बारीकसा निखारा आला असावा - तिने हात झाडायचा प्रयत्न केला, पण मी तिचं मनगट घट्ट धरलं.

"बिभुती. फेकू नको. अंगारे में अंगार होता ही है..." तोंडाला येईल ते बोललो.

तिच्या हाताची थरथर थांबली. तळहातातच निखारा विझला होता. निव्वळ राख राहिली होती. मूठ मिटून तिने माझ्या पायांवर डोकं ठेवलं. मागे उभ्या नवर्‍यालाही पाया पडायला लावलं.

आधी तिच्या काटकुळ्या नवर्‍याकडे लक्ष गेलं नव्हतं. पण त्याने पायांवर ठेवलेलं डोकं उचलून थेट माझ्या डोळ्यांत पाहिलं. तेव्हा मला दिसले ते त्याचे डोळे - करडे. थंड. नारायणसोद्यासारखे.

***

भिरीभिरी गावात फिरायला लागलो. इथेच लहानाचा मोठा झालो. बारका होतो तरणा झालो. गल्लीन् गल्ली, बोळन् बोळ पायाखालचा आहे.

होता.

वीस वर्षांत बदलून गेलं. जुनकट वाडे पाडून नव्या इमारती बांधल्या. त्याही आता जुनकट दिसायला लागल्यात. या गावाच्या पाण्यातच काहीतरी गुण आहे - भिंतीला भेगा पडतात. मग लोक चुनाशिमिट मारून भेगा बुजवतात. वरती मूळ भिंतीसारखा रंग लावतात. कोपरापाशी हाताला फुटलेल्या नसांच्या जाळ्यासारखं दिसत राहतं.

नदी. पहिल्यापासूनच घाणेरडी. वास मारायचे. डास जगायचे. बदल नाही. आता कसलीशी रसायनं सोडतात वाटतं. पुलाशेजारून उतरून पाहिलं - पाणी हिरवंनिळं पडलं आहे. उभा होतो तितक्यात पुरुषभर उंचीच्या पायपातून सांडपाण्याचा धोदाणा बदबदत आला. नष्ट वास.

पूल मात्र तोच जुना. पुलाच्या सुरुवातीला उभं राहायचं. उजव्या हाताला स्टेशनचा रस्ता. काल तिथूनच आलो. मागे गावाच्या आतली, पेठेकडे जाणारी वाट. नारायणसोद्याच्या शेठाण्या राहायच्या त्या बाजूला. डावीकडे उभी भिंत. त्या मागे काय आठवत नाही. समोर बस स्टॅंड.

बस अजून तशाच. अंग लाल, धूर काळा. पाट्या मात्र बदललेल्या. आकडे पूर्वी दोनात संपायचे. आता तीन. नावं आठवणीतली नाहीत. गाव वाढलं असणार. वस्ती लांबवर गेली असणार.

परवाच्या त्या बाईसारखे लोक त्या लांबच्या गावात राहात असणार. गावाबाहेरनं आलेले, पण गावावर जगणारे लोक. इथल्यासारख्याच नसा फुटलेल्या इमारती तिथेही असणार. ती, तिचा हाडक्या नवरा पेठेत पोटाला येत असणार - लाल अंगाच्या काळ्या धुराच्या बसमधून. रस्त्यावर दुकान मांडून बसलेल्या माणसाकडून कपडे घेणार. घेताना ताणून ओढून बघणार. भेळ खाणार रस पिणार. एखादा सिनेमा. महिन्यातून एकदा. परवडेपोतर.

तरी त्या दिवशी जाताना बाईने जाताना पायाशी पन्नास रुपये ठेवले. नको म्हणत असताना ठेवले. तिला वेगळंच वाटलं - पूर्ण आकड्यातलं दान स्वामी घेत नाहीत की काय! नवर्‍याला सांगून वरती एक रुपया ठेवला.

एक्कावन रुपये. वीस वर्षांपूर्वी या गावातून निघालो तेव्हा बरोबर इतकेच रुपये होते. मनमाडपर्यंत पुरले.
करड्या डोळ्यांच्या त्या नवर्‍याने रुपया लगेच ठेवला. क्षणभर त्याच्या भुवया एकमेकांजवळ आल्या. डोळ्यांच्या भोवती जाळं पडलं. परत नारायणसोद्याची आठवण झाली.

***

वस्त्याकडे जडीबुटी असायच्या. बियाही. कुठे शिकला होता विद्या कधी बोलला नाही. तशाही जुन्या आठवणी काढत नसतात आमच्यात. घाटावर स्वत:चं श्राद्ध केल्यावर उरतं काय? विचारायचं नसतं, सांगायचं नसतं. पण आधीच्या आयुष्यात शिकलेलं जात नाही. जगायला कामी येतं.

वस्त्या चालता-फिरता टिपत राहायचा. पानं मुळं फळं. जे उपयोगी ते झोळीत जाऊन पडायचं. कुठेच काही जमलं नाही तर वस्त्या गावातल्या वैद्याला किंवा तंबूतल्या वैदूला मुळंफळं देऊन पोटाला मिळवायचा. वस्त्यासोबत फाके पडायचे नाहीत कधीच.

बाळ्याला शोधायला परत निघालो तेव्हा वस्त्याची भेट घेतली. मला वाटलं तो मला अडवेल. मूर्खपणा करू नकोस, म्हणेल. जन्मालाही न आलेल्या मुलाला वीस वर्षांनी शोधत कोण जातो, विचारेल. 'भेटलाच पोरगा तर काय करणार आहेस?' विचारेल. 'जन्मालाही न आलेलं मूल मुलगाच कशावरून असेल', विचारेल. काही नाही तर 'आत्ताच का चाललास?' विचारेल.

यातलं काहीच तो बोलला नाही. आपली स्थिर नजर माझ्या कपाळावर बराच वेळ रोखून पाहात राहिला. शोधत राहिला. पापणीही न हलवता. शेवटी सुस्कारा सोडून नजर दुसरीकडे वळवली. तोंड वगाळून खाकरला, थुकला.

"गेंझट हाईस. जाव."

जाताना हातात पुडी दिली एक.

"पाच मनी आहेत. चार लोकाकरता, एक तुझ्याकरता. काईच जमलं नय तर. परत ये."
पुडी घेतली. झोळीत घातली. काय आहे नीट कळलं नाही. पण कळेल. घाई काय आहे? वस्त्याचं बोलणं पहिल्या खेपेला कळतंच असं नाही.

गेंझट म्हणला ते मात्र पटलं. दडपलेली इच्छा वीस वर्षांनी वर यावी? मन चामट आहे खरं. बाळ्याचा विचार मनातून कधीच गेला नाही. नारायणसोद्या, ती छिनाल सरला, कोणाचा विचार फार काळ टिकला नाही. ती पाहिलेली माणसं होती. बरेवाईट रंग दाखवलेली. बाळ्या अजून जगात यायचा होता. त्याआधीच मी निघून गेलो. बीज कोणाचं होतं? माझं की नारायणसोद्याचं? तेव्हा मला खात्री होती - नारायणसोद्याचंच. पण कागदावर मीच बाप ठरणार होतो. पण प्रत्यक्षात नारायणसोद्याच्या सावलीत तोही वाढणार होता. तिथेच डोकं फिरलं. निघून गेलो. मागे पाहिलं नाही. परत जायची इच्छा झाली नाही. तिरमिरलो होतो. एकदा भगवं अंगावर घेतल्यावर तर रस्ता बंदच झाला. परत गेलो असतो तरी नारायणसोद्याच्या नजरेनी भाजून काढलं असतं. नाही.

काळ गेला. वर्षं. भगवं जुनं झालं. पोट जळत राहिलं. शांत होत गेलो.

कधीतरी वाटलं - माझंच बीज असेल तर?

मनात आलेला विचार जात नाही. रुजला.

कोणाचंही बीज असो - त्या पोराला पाहायला हवं. परत जायला हवं.

आलो.

***

तोथरा शिंथरा म्हणे : धुनीजवळ बसून राहावं. आल्यागेल्याला दिसत राहावं. जवळ आले तर ठीक, नाहीतर लांबून हात उंचावावेत. आशीर्वादात.

"नाहीतर लोकांना कळणार कसं की नारायणस्वामींचे उत्तराधिकारी श्रीरंगस्वामी परत आलेत ते?"
तोथर्‍याला काही कळत नाही. माहीत नाही. माझं नाव श्रीरंग कधीच नव्हतं. रंगनाथ होतं. लहानपणापासून त्याने रंगा रंगा ऐकलेलं. मला काय फरक पडत होता? घाटावर नाव सोडलं होतं. मग रंगनाथ काय नि श्रीरंग काय.

पण बसून राहणं जमेना. वीस वर्षांत पायाला गती आलेली. जागी सडायचं नाही. रस्ता धरायचा. वाट काढायची.
मग उपाय काढला. पहाटे उठून धुनी लावायची. स्नान करायचं. उगीमुगी डोळे मिटून बसून राहायचं. सकाळी मठात येणार्‍या म्हातार्‍याकोतार्‍यांना तपस्वी स्वामींचं दर्शन घडवायला. उन्ह तापलं की निघायचं. संध्याकाळपर्यंत फिरायचं. संध्याकाळी परत सकाळसारखंच. धुनी आणि ध्यान. रात्री चिलीम.

लोक गोळा व्हायला लागले होते. एकदोन म्हातारी रोज बसून जायची. मठात आलेली तरणी पोरं पाया पडून जायची. प्रत्येकाला धुनीतली राख देत जायचो.

पहिल्या दिवशी आलेलं कुटुंब परत आलं नाही. म्हणजे एकत्र आलं नाही. बाई रोज सकाळ-संध्याकाळ यायची. जवळच कुठेतरी कामाला असावी. नाक रगडून जायची. दिलेली राख गळ्याकपाळाला लावायची. कागदात बांधून न्यायची. बोलायचा प्रयत्न करायची. मार्ग दाखवा म्हणायची. मी गालातल्या गालात हसून दुसरीकडे बघायचो. कधी आणखी थोडी राख द्यायचो. वस्त्याचं आठवून सगळं चालू ठेवलं होतं.

एकदा भटकता भटकता बाईचा नवरा दिसला. नारायणसोद्यासारखे डोळे असलेला. ज्या गल्लीतून बाहेर येत होता तसल्या गल्लीत नारायणसोद्या पडीक र्‍हायला असता. पण गल्लीच नारायणसोद्याकडे येत होती म्हणा. मी झट्कन आडबाजूला झालो. बाईच्या नवर्‍याला पुढे जाऊ दिलं, आणि गुपचूप मागे गेलो. पेठेतल्या एका कापडदुकानात कामाला होता.

मग रोज मी तिथून चक्कर मारायला लागलो. सकाळी दुकानात यायचा. शेठजीच्या विश्वासातला नसावा. अडलीपडली कामं करणारा असावा. सकाळच्या वेळात दुकानाच्या आतबाहेर करत राहायचा. दुपारी शेठजी त्याला बाहेरच्या कामांवर पाठवायचे. कधी दुसर्‍या जातभाईच्या दुकानात, कधी बिलं भरायला, कधी कुठे, कधी कुठे. याच वेळात जाता येता त्या गल्लीत जाऊन तोंड मारून यायचा. त्याची बैठक ठरलेली असावी. संध्याकाळी शेठजीला एकदा तोंड दाखवून मग बसस्टॅंडकडे. दोनशेचौदा नंबर पकडून घरी.

बाळ्याच्याच वयाचा असेल.

बाई शोधायला थोडा वेळ लागला. दोघे सकाळी बरोबर यायचे तेव्हा स्वामी मठात बसलेला असे. दुपारी बाईचा नवरा जागेवर सापडायचा, पण संध्याकाळी ते दोघे एकत्र परत जात नसत.

शेवटी दोनतीन महिन्यांनंतर एकदा दिसलीच. नवर्‍याला भेटायला दुकानावर आली होती. दोघे जोडीने एका दवाखान्यात गेले. मग एका देवळात. मग बाई परत आपल्या कामाच्या ठिकाणी गेली. मी मागे होतोच. मोठ्या रस्त्याआतल्या गल्लीतल्या एका कारखान्यात कामाला होती.

ठरवलं होतं त्याप्रमाणे नारायणसोद्याच्या जुन्या शेठांना भेटलो नाही.

***

"रंगा, असं नाही म्हणून कसं चालेल?" तोथरा शिंथरा प्रत्येक 'स'बरोबर थुका उडवत म्हणाला. "असं फटकून राहिलं तर भक्त कसे येणार, सांग बरं? ते काही नाही. जा तू त्यांच्याकडे. एवढे बोलावतायत तर."

शिंथरा आता डोक्यातच जायला लागला होता. एकदा दुपारी मी बाहेर गेलो असताना ती बाई आली. श्रीरंगस्वामींनी आपल्या घरी यावं अशी तिची इच्छा दिसली. थेट स्वामींना विचारायची तिची हिंमत झाली नाही म्हणे. 'स्वामी कोपिष्ट वाटतात,' म्हणाली. तिने शिंथर्‍याला गळ घातली. काही पैसेही दिले असावेत, पण शिंथरा हे सांगणार नाही.

मी उठून धुनीकडे गेलो. शिंथरा मागोमाग आला. बडबड बडबड करत बसला. आग्रहच होता त्याचा. त्याला वीस वर्षांपूर्वीचा मठ परत पाहिजे होता. तपोमूर्ति नारायणस्वामींच्या तपाबद्दल कोणालाच फारशी माहिती नव्हती. शिवाय तोथरा तेव्हा लहानही होता. आता संन्यस्त श्री श्रीरंगमहाराज आले होते. भगवी वस्त्रं होती. धुनी होती. झोळी होती. परत मठ वर येणार, शिंथर्‍याच्या तोंडाला पाणी आलं होतं.

झोळी. वस्त्याची आठवण झाली. लोचट कोणी मागे यायला लागलं की वस्त्या झोळीतून न बघता काहीतरी काढून हातावर ठेवायचा. याचं सेवन कर, म्हणायचा.

"काय दिलं ते? खाऊन कुणी मेलं तर?" एकदा मी विचारलं होतं.

"उसका नसीब. आपल्याला काय..." वस्त्या म्हणाला, आणि पिवळे दात दाखवत हसला होता.
मी शिंथर्‍याकडे रोखून पाहिलं. तो अजूनही काहीतरी तेच तेच बोलत आर्जव करत होता. आपण कबूल केल्याशिवाय हा इथून उठणार नाही.

"हां हां ठीक. जाएंगे." मी आवाज चढवून म्हणालो.

तोथरा हसला. खुशी झाली त्याला.

"आता कसं. उद्याच जा. हा पत्ता." त्याने खिशातून चिठ्ठी काढली. पण घुटमळला. "हे बघ."

"दोनशेचौदा नंबर. शेवटचा स्टॉप. चालत जाईन." मी म्हणालो.

तोथरा बघतच राहिला.

***

घरात शिरताना गरम पाण्याच्या थाळीत पाय धुतले. थाळी कडेला ठेवली. नंतर कदाचित तीर्थ म्हणून पितील. किंवा विकतील. सात मैलांच्या अनवाणी प्रवासाची धूळ लोकांच्या पोटात जाईल. मरो.

घर लहान होतं. दोन खोल्या. त्यात नवरा बायको. घरची दोन म्हातारी होती. एकीच्या डोळ्यांवर काळा चष्मा. दुसरा म्हातारा दिवसाला दहाबारा तरी गोळ्या खाऊन जगत असावा. दोनपैकी एका कॉटवर म्हातारी जुडी करून बसली होती.

वस्त्या व्हायचं ठरवलं होतं आज. चेहरा कोरा ठेवून दोन्ही हात उंचावले. तसेच खाली आणून म्हातार्‍यांच्या पायाला स्पर्श केल्यागत केलं. म्हातारी हरखली. पाय आत ओढून घ्यायला लागली. मी हसून त्यांच्याजवळ सरकून बसलो.
आतल्या खोलीतून बाई बाहेर आली. हातात पूजेचं साहित्य. मी पाय खाली सोडले. गंधबिंध लावून पाद्यपूजा करून घेतली. बाईच्या डोकीवर हात ठेवला, आशीर्वादाचा. हाताखाली बाई शहारली. नवरा मागे उभा होता. करडेशार डोळे माझ्यावर रोखले होते. उलटा हात वर करून मध्यमा-अनामिका हलवत त्याला जवळ बोलावला. बाईने शर्ट ओढून त्याला खाली बसवला. मी त्याच्याही डोक्यावर हात ठेवला. काही निरर्थक पुटपुटलो. झोळीत हात घालून राख काढली, दोघांच्या कपाळी लावली. एक सफरचंद बाईच्या ओटीत घातलं. काल कोणी दिलं होतं.

फळ बघताच बाईच्या डोळ्यांतून पाणी पडायला लागलं. पाऊल भिजवू लागली. नवरा मागे सरकला होता. मागेमागे जात आपली खुंटं खाजवत भिंतीला टेकून उभा होता. नारायणसोद्याचे करडे डोळे माझ्याकडेच रोखलेले.

"बाई - नामस्मरण चालू ठेवा." मी म्हणालो. बाई पाय सोडीना.

सांगायला लागली - नारायणबळी. नागबळी. वैकल्यं. हवनं. पारायणं.

तसबिरी. पोथ्या. तांत्रिक यंत्रांची चित्रं. आणखी तसबिरी. कुंडल्या.

उबलो.

नवर्‍याकडे नजर गेली. अजूनही तसाच टेकून उभा होता, पण नजरेत एक ग्लानी आली होती. ऐकू येऊन ऐकल्यासारखं वाटत नव्हतं. त्याच्या नजरेला नजर भिडवताना काय ते कळलंच.

ताड्कन उठलो. बाईच्या हाताला हिसडा देऊन पाय मोकळे केले नि चालू पडलो.

***

तडातडा चालत राहिलो. गावाकडे. परत.

ओटीत फळं टाकून अन् राखेचे अंगारे फासून पोरं होत नसतात. बाईला हे मी सांगणार नव्हतो. तिला दुसरा साधू शोधू दे. पण मला हे माझ्या माथी नको होतं.

माझ्यामागून कोणी धावत येत होतं. वळून पाहिलं तर तो नवरा. नारायणसोद्याच्या डोळ्यांचा.
बराच लांब आलो होतो. थांबलो. मागे त्याची बायकोही दिसत नव्हती. धापा टाकत तो समोर येऊन थांबला.
"स्वामीजी... काहीतरी... काही औषध...?" तो लवत म्हणाला.

खांद्याला धरून त्याला सरळ उभा केला. करड्या डोळ्यांत खोल खोल पाहिलं. नारायणसोद्याचा नपुंसक कारकून मुलगा. वीस वर्षं पळत राहिलेला बाजीराव. कधीच न पाहिलेल्या बाळ्याचा बाप. असल्यांच्या औषधाने कोणाला पोरं होतात?

वस्त्या आठवला.

संन्याशाने देत राहावं. लोकांना मदत करावी. जडीबुटी द्यावी.

"पाच मनी आहेत... काईच जमलं नय तर."

झोळीत हात घालून वस्त्याची पुडी काढली. एक मणी बाईच्या नवर्‍याच्या हातात ठेवला.

"दुधातून."

"मी घ्यायचे... का तिने...?" न कळून त्याने विचारलं.

काय उत्तर द्यावं मला सुचलं नाही.

"तू ठरव," मी म्हणालो, "गेंझट कोण आहे?"

(समाप्त)

विशेषांक प्रकार

तिरशिंगराव Sat, 14/11/2020 - 12:56

जबरदस्त! एखादा जळजळीत चित्रपट बघितल्यासारखं वाटलं !

'न'वी बाजू Sun, 15/11/2020 - 08:06

In reply to by तिरशिंगराव

'जळजळीत' is the right word.

+, flow जबरदस्त आहे.

अस्वल Sat, 14/11/2020 - 22:34

:)
======
तिमा म्हणतात तशी जळजळीत कथा आहे.
जियो आबा!

गवि Sun, 15/11/2020 - 19:38

आबाशेट. उत्तम. पण यावेळी आकारात आणि शैलीत जास्त गुरफटलात. ( कसं अभ्यासपूर्ण मत वाटतं ना. ;) जोक्स अपार्ट.. विचार करा.. )

राजन बापट Mon, 16/11/2020 - 09:53

मला आवडलेली, उत्कृष्ट वाटलेली कथा.

कथाविषय आणि वातावरण हे सर्व मी वैयक्तिक आयुष्यात एकेकाळी जवळून पाहिलेलं आहे. त्यातलं लैंगिक शोषण वगळतां. ते घडलं तरी नाही किंवा मी फारच अंड्यात होतो. कथेतलं चित्रण अत्यंत ऑर्गॅनिक रीत्या झालं आहे. वातावरण निर्मिती, पात्रांचे मनोव्यापार आणि त्यांची बोलण्यावागण्याची ढब, त्यांची भाषा या सर्वातून हे सगळं जिवंतपणाने उलगडलेलं आहे.

सन्जोप राव Mon, 16/11/2020 - 18:32

कथा वाचून खानोलकर आठवले, जीए आठवले असे म्हणू नये. प्रत्येक लेखक आपले प्राक्तन घेऊन येतो.
कथा फार आवडली.

चिमणराव Mon, 16/11/2020 - 22:18

In reply to by सन्जोप राव

चुकलं.
--------
गूढता आणि सामाजिक अगतिकपणा चांगला गुरफटवला आहे आणि गोष्ट जेवढी लांबवायला हवी त्यापेक्षा अधिक ताणली नाही.
--------
आता ठीक?

नील Wed, 18/11/2020 - 01:19

शब्दकळा अर्थातच छान
कथेनी थोडा 'के. एल. पी. डी.' दिल्यासारखं वाटलं.
म्हणजे उदाहरणार्थ पाच मणी आल्यावर त्यांचे पाच किस्से / प्रकरणं येणार अशी ओल्ड स्कूल अपेक्षा मी करू लागलो...
पण मे बी दॅट्स ऑन मी हे मान्य :)
हाच कदचित योग्य लॉजीकल आणि (ऑर्गॅनिकसुद्धा) शेवट असावा!

बिटकॉइनजी बाळा Fri, 27/11/2020 - 09:19

जबरदस्त कथा आबा. निवांत वेळ मिळताच लगेच वाचून काढली. फुसफुसत धुमसत पुटपुटल्यासारखी/विचार केल्यासारखी लहान लहान एका दमात म्हणता येतील अशी वाक्यं. शैली एकदम फिट आहे कथानकाला. _/\_. एकच शंका : खदिरवृक्ष म्हणजे कोणता वृक्ष?

गवि Sat, 28/11/2020 - 04:52

In reply to by 'न'वी बाजू

ज्यापासून पानात घालण्याचा कात काढतात ते झाड. इतरही काही उत्पादन घेत असल्यास माहीत नाही. कोंकणात मुबलक असतात.

धनंजय Mon, 30/11/2020 - 07:10

"भकास" रस ही लेखकाचे वैशिष्ट्य.

धर्मराजमुटके Sun, 06/12/2020 - 12:57

अप्रतिम कथा. आवडली. दिवाळी टु दिवाळीच लिहिण्याऐवजी अधून मधून देखील असे लिहित रहा !