बनारस – विविध काळांत एकाच वेळी जगणारं शहर
बनारस – विविध काळांत एकाच वेळी जगणारं शहर
'गुगल पे'कडून मला आज एक नोटिफिकेशन आलं. 'तुमच्या जिओ मोबाईलचं रिचार्ज आज संपलाय', म्हणून. माझ्याकडे जिओचा कोणताही नंबर नाही. मग हे नोटिफिकेशन कसं काय? गुगल पे उघडून पाहिलं तर मी खरंच जिओच्या एका नंबरला रिचार्ज मारलं होतं. मग थोडासा डोक्याला ताण दिल्यावर आठवला तो माझा वाराणसीतील पहिला दिवस.
फ्लाईट वाराणसीत उतरलं तेव्हा सकाळचे सहा-साडेसहा वाजले होते. बाहेर वातावरण थोडसं कुंद पावसाळी दिसत होतं. एअरपोर्टमधून बाहेर आलो तर सर्व एअरपोर्टवर जे दृश्य दिसतं तसंच ते इथेही होतं. टॅक्सीवाले सर्व प्रवाशांवर तूटून पडत होते. मग एका टॅक्सीवाल्यानं सांगितलं की त्याची शेअर टॅक्सी आहे. ५०० रूपयांत वाराणसीत पोहचवतो. मी त्याच्यासोबत टॅक्सी स्टँंडच्या दिशेनं चालायला लागलो. टॅक्सीच्या पुढच्या सीटवर बसलो. मागे अजून तीन लोक होते. टॅक्सी एअरपोर्टमधून बाहेर पडली तसं त्या ड्रायव्हरनं खिशातून गुटख्याची दोन पाकीटं काढली. गाडी चालवतानाच त्यानं ती फोडली आणि तोंडात टाकली. हे कमी की काय म्हणून मग त्याला एक फोन आला. भरधाव वेगात गाडी चालवत, हा गडी फोन स्पीकरवर टाकून फोनवर बोलत होता. अध्येमध्ये गुटखा थुंकत होता. काही वेळानं माझ्या लक्षात आलं की फोन त्याच्या गर्लफ्रेंडचा आहे. तिला तो समजावत होता की तो वाराणसीत आहे, आणि ड्यूटीवर आहे. ती काही मानायला तयार नव्हती. ती हट्टाला पेटून बसली होती की व्हिडिओ कॉल करून पुरावा दाखव. पण याचं इंटरनेट पॅक संपलेलं. मग यानं फोन ठेवला आणि मला विचारलं, "साब, आप के पास गुगल पे है क्या?" मला वाटलं भाड्याचे पैेसे त्याला गुगल पेनं हवे असावेत. मी म्हटलं हो आहे. त्यावर मला म्हणतो, "एक काम किजेय. मेरा जिओका रिचार्ज मार दिजीये". आधी मी थोडासा विरोध दाखवला. थातुरमातुर कारणं दिली. मला भीती हीच की माझाही नंबर याच्याकडे जाणार. आणि कोण जाणे, या भानगडीत काही स्कॅम वगैरे असावा. पण शेवटी माझा नाईलाज झाला. मी रिचार्ज मारून दिलं. मग याने तिला व्हिडिओ कॉल लावला. आणि व्हिडिओ कॉलवर प्रेमाच्या गुजगोष्टी करत, अध्येमध्ये गुटखा थुंकत त्यानं मला वाराणसीत पोहोचवलं. मी मनात म्हटलं "वेलकम टू बनारस."
आता वाराणसीच्या पाच-सहा दिवसांच्या वास्तव्यात आलेल्या शेकडो अनुभवांपैकी नेमकं काय लिहायचं हा माझ्यापुढे मोठा प्रश्न आहे. वाराणसी हे शहर आणि तिथलं जनजीवन हे इतके अनुभव देणारं आहे की ते लिहायला आणि वाचायला मोठा दमसास हवा. कारण इथं सतत काहीनाकाही घडत असतं. इथले घाट, गल्ल्या आणि त्यातील दुकानं आणि माणसं हा मोठ्या पुस्तकाचा विषय आहे. तरीही काही मोजक्या गोष्टींबद्दल मी इथं लिहिणार आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बनारसची पान संस्कृती.
बनारस पान
बनारस पान म्हणलं की "खै के पान बनारस वाला, खुल जाय बंद अकल का ताला" हे गाणं डोक्यात येतंच येतं. पण खरं सांगयचं तर बनारस पान खाऊन अकलेचं कुलूप काही उघडत वगैरे नाही. कारण हे पान अतिशय सौम्य असतं. अगदी स्थानिक लोकांच्या भाषेत बोलायचं तर हे "ये पान मुँह बिगाड़ता नहीं, मुँह बना देता है." बनारसी पानाबाबत जास्त जाणून घ्यायचं असेल तर आधी इतर ठिकाणी मिळणारं पान आणि बनारसमध्ये मिळणारं पान यांत काय फरक आहे हे जाणून घ्यायला हवं.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात कुठेही जा. मग तो पश्चिम महाराष्ट्र असू दे किंवा मराठवाडा, विदर्भ, किंवा मुंबई, पुणे, नागपूरसारखी शहरं. इथं पानटपऱ्यांच्या बाहेर जबडा लालभडक रंगवून पानाची पिंक टाकत बसलेली मंडळी हमखास दिसतात. एकदा का पान तोंडात टाकलं की तासभर त्याचे लाल फवारे मारत ही मंडळी टाईमपास करतात, गप्पा मारतात. पण बनारस पानाची रीत थोडी वेगळी आहे. बनारस पान एकदा का तोंडात टाकलं की थेट एकदाच ते थुंकायचं. मग ते तासाभराने असूदे किंवा दोन तासांनी. महाराष्ट्रातल्या पानासारखं दर पाच मिनिटांनी पिंक उडवायची तऱ्हा या पानाची नाही. याचं कारण समजून घेण्यासाठी मुळात बनारसमध्ये मिळणारं पान इतर ठिकाणी मिळणाऱ्या पानापेक्षा वेगळं कसं ते समजून घ्यायला हवं.
महाराष्ट्रात मिळणारं पानात कोणते जिन्नस असतात? तर एक भलं मोठं कलकत्ता पान. मग त्याला चुना, कात, किमाम लावले जातात. जोडीला एक सोनेरी रंगाचा कसलासा पदार्थ टाकतात. मग त्यात सुक्या सुपारीची सात-आठ खांडं टाकली जातात. किमाम हा जिन्नस असा असतो की जो तोंड भाजून काढतो. हे कमी म्हणून लवंग आणि वेलचीही टाकतात. नंतर येतो तंबाखू. मग कुणी चेतना, तर कुणी १२०-३०० टाकायला सांगतो. हे तंबाखू फार कडक असतात. डोकं गरगरून टाकतात. सुक्या सुपारीची सात-आठ खांडं चावून चोथा करायला तासभर जातो. आणि म्हणूनच हे पान खाऊन तासनतास पिचकाऱ्या मारत बसलेली मंडळी सर्रास दिसतात. पण बनासरचं पान मात्र फार वेगळं आहे.
बनासरच्या पानात मोजून पाच जिन्नस असतात आणि तेही अगदी मर्यादित स्वरूपात. एक मध्यम आकाराचं कलकत्ता पान. प्रथम त्या पानाला चुना आणि ओला, पातळ कात लावला जातो. नंतर ओल्या सुपारीचं एकच किंवा लहान असेल तर दोन खांडं. शेवटी जर्दा, म्हणजेच तंबाखू. आता यांत मुख्य फरक आहे तो सुपारीचा आणि तंबाखूचा. ही ओली सुपारी फार नरम असते. दाताखाली आली की सेकंदात तिचा लगदा होतो. आणि पानातला काळा तंबाखू हा इथं भिजवून घेतात. आपण पोहे कसे भिजवून घेतो अगदी तसाच. त्यामुळे होतं काय की तंबाखूचा उग्रपणा वाहून जातो आणि राहातो तो अगदी हलका नशा. मग एकदा का हे पान तोंडात टाकलं की मिनीटभरात त्याचा चोथा होतो. मग थुंकलात की संपलं पान. परत चोथा होणार नाही. त्यामुळे इथं होतं काय की या पानाची पिंक तोंडात ठेऊन तासनतास गुडगुडत बोलत बसलेले लोक तुम्हांला पावलोपावली दिसतील. तुम्ही त्यांना काही विचारलात तर ते तोंडातलं पान न थुंकता तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. तोंडातलं पान थुंकून उत्तर देण्याइतके तुम्ही महत्त्वाचे नसता. तुमच्यापेक्षा महत्त्वाचं असतं ते तोंडातलं पान. यावरून काय ते समजा.
वाराणसीच्या संस्कृतीमध्ये पान या गोष्टीला फार महत्त्वाचं स्थान आहे. या गल्ल्यांमध्ये फिरताना पावलोपावली तुम्हाला हे पानाचे ठेले दिसतील. या ठेल्यांमध्ये फक्त पान विकतात.
आपल्याकडे असतं तसं किराणा मालापासून, बिस्कीट-गोळ्यांसहित पानही विकणारी दुकानं इथं फार कमी. पान म्हणजे फक्त पान. पानासोबत इतर वस्तू विकणं म्हणजे पानवाल्याच्या पान बनवण्याच्या कौशल्यावर संशय घेतल्यासारखं आहे. या गल्ल्यांमधली जी गटारं आहेत ती सांडपाण्यासाठी नाहीत तर पानाची पिंक वाहून नेण्यासाठी बनवली असावीत असं वाटत रहातं. एका अशाच ठेल्यावर मी पान विकत घेत होतो. पानवाल्यानं सुपारीचं एकच खांड टाकलं. मग मी स्वतःहून एक-दोन खांडं उचलली आणि पानात टाकायला गेलो. पानवाल्यानं मला लगेच अडवलं. म्हणला "साब, जादा सुपारी मत डालो. मजा नाही आयेगा और पान गड़बड़ा जायेगा. बरसों से हम पान बना रहे है और हम को पता है की कौणसी चीज कितनी होनी चाहिये". मग मी उचललेली सुपारी परत जागेवर ठेवली. मग त्या पानवाल्याशी गप्पा मारत बसलो. त्याच्याकडून कळलं की पान दरिबा नावाची एक जागा आहे जिथं या पानांचा आणि तत्सम जिनसांचा मोठा बाजार आहे. गुगल केलं तर दिसलं की नयां पान दरिबा आणि पुराना पान दरिबा अशी दोन ठिकाणं आहेत. मला जुना पानबाजार पहायचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी तिथं जायचं ठरवलं.
गुगलची मदत घेत पुराना पान दरिबामध्ये पोहचलो तर तिथं काहीच हलचल नव्हती. सकाळचे साडेसात वाजले होते आणि रस्त्यांवर फार तुरळक लोकं दिसत होती. इतक्यात एक चाळीशीचा इसम मोटरसायकलवरून आला आणि त्यांने रस्त्यालगत गाडी उभी केली. "भाईसाब, ये पुराना पान दरिबा कहाँ है?" मी विचारलं. त्यावर तो म्हणला "ये जो पुराना पान बजार है वहाँ अब कुछ नही रहा. आपको नया पान दरिबा जाना चाहिये". मग त्याने मला रस्ता समजावून सांगितला आणि मी गल्ल्यांमधून चालायला सुरुवात केली. काहीच पावलं चाललो असेल तर तोच इसम मोटरसायकलवरून हॉर्न वाजवत मागे आला. मला म्हणाला, "चलो मै आपको वहाँ छोड देतां हूँ." मी म्हटलं कशाला उगाच. तुमच्या वेळ वाया जाईल. त्यावर तो फक्त हसला आणि म्हणाला, "बैठो पिछे". मीसुद्धा बसलो. मग गाडीवर गप्पा सुरू झाल्या. त्या गृहस्थांचं नांव होतं राजेश चौरसिया. अलाहाबाद हायकोर्टात ते वकिली करतात आणि दोन दिवसांच्या सुट्टीसाठी गावी आली होते. मग मी सहजच म्हटलं की दिपक चौरासिया नावाचे एक प्रसिद्ध पत्रकारही आहेत. त्यावर ते गृहस्थ तातडीने म्हणाले, "अरे वो तो हमारे फुफाजी हैे. पहले आज तक मे थे अब खुदका यूट्यूब चैनेल चलाते है."
पाच-सात मिनिटांत आम्ही नया पान दरिबामध्ये आलो. राजेश चौरासियांचा निरोप घेऊन मी पानबाजाराच्या गल्लीतून चालायला लागलो. बनारसी पान बांधून देण्यासाठी इथं मोहाच्या पानांचा वापर केला जातो. महाराष्ट्रातल्यासारखं रद्दीच्या पानात पान गुंडाळून हे लोक पानाचा अपमान करत नाहीत. ही मोहाची पानं.
मिर्जापूरच्या आजूबाजूचे आदिवासी इथं घेऊन येतात. साधारण १०० रूपये शेकडा म्हणजे १ रूपयाला एक मोहाचं पान या भावानं ते ही पानं विकतात. हे आदिवासी रस्त्याच्या दुतर्फा ही पानं विकायला बसतात आणि व्यापारी ती त्यांच्याकडून घेऊन जातात. पाच-सात रूपयांचं बनारसी पान बांधून द्यायला १ रूपयाचं मोहाचं पान हा जरा शाही थाट वाटतो. आणि तसा तो आहेच. पानवाला काय करतो की पान तयार झालं की ते मोहाच्या पानात बांधताना त्या मोहाच्या पनाला थोडा जास्तीचा चुना लावतो. एखादं सुपारीचं खांड त्यात टाकतो आणि बांधून देतो. म्हणजे जेव्हा पान खायचं असतं तेव्हा जर तुम्हाला जास्तीचा चुना-सुपारी हवी असेल तर ती स्वतःहून टाकायची आणि पान खायचं. तर हे आदिवासी सहकुटुंब रात्रभर फूटपाथवर झोपतात आणि सकाळीच ही मोहाची पानं विकून तिथून निघून जातात.
या पानबाजारात घुसलो तर तिथं इतर कुठल्याही होलसेल भाजीमार्केटसारखी दृश्यं होती.
शेतकरी आपला माल घेऊन आलेले होते आणि दलाल लिलाव पुकारत होते. काही शेतकऱ्यांशी मी बोलायचा प्रयत्न केला. हा व्यवसाय नेमका कसा चालतो ते मला जाणून घ्यायचं होतं. गेल्या काही वर्षांत ही पानांची शेती आणि व्यवसाय दोन्हीही धोक्यात आल्येत. आणि त्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे गुटखा. सात ते आठ आणि दहा रूपयांना मिळणाऱ्या पानापेक्षा तीन ते पाच रूपयांत मिळणारा गुटखा इथं फार चालतो. त्याचा परिणाम पान व्यवसायावर झालाय. एक शेतकरी म्हणाला की सरकार गुटख्यावर बंदी आणत नाहीये. सरकारने गुटख्यावर बंदी आणली तर पानाचा व्यवसाय पुन्हा तेजीत येईल. शिवाय पान हे गुटख्यासारखं कॅन्सर पसरवणारं नाहीये. पण सरकार गुटख्यावर कधीच बंदी आणणार नाही. याचं कारण, सरकारला कराच्या रूपान मिळणारं उत्पन्न. गुटखा कंपन्या या सरकारला कोट्यावधी रूपये कर स्वरूपात देतात. पण पानाचा व्यापार हा असंघटित आहे. त्यावर सरकारचं नियंत्रण नाही आणि त्यातून कर मिळण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे सरकारलाही गुटखा कंपन्यांना मोकळा हात देणं परवडतं. या भागात गुटखा, पान खाणाऱ्यांचं प्रमाण फार विलक्षण आहे. सर्व वयोगटांतील माणसं इथं पान-गुटखा खाताना दिसतात. आणि हेच कारण आहे की बॉलीवूडमधील मोठमोठी स्टार मंडळी गुटख्याची जाहिरात करतात. ही सर्व हिंदी भाषिक राज्यं, त्यांत चालणारे हिंदी चित्रपट आणि गुटख्याला असलेली मान्यता या तिन्ही कारणांमुळे या गुटख्याच्या जाहिराती नटमंडळींना कराव्या लागतात. तो त्यांचा व्यावसायिक निर्णय असतो.
बनारसच्या गल्ल्या आणि त्यांतली खाद्यसंस्कृती
पहिल्याच दिवशी जेव्हा मी एका गल्लीत शिरलो तेव्हा एका स्थानिकाला मी विचारलं की या गल्लीतल्या रस्त्यांमधून मणिकर्णिका घाटापर्यंत जाता येतं का. त्यावर तो स्थानिक म्हणाला की, तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही या गल्ल्यांमध्ये हरवून जाल. मी मनात म्हणालो, मला कुठेही पोहचायची घाई नाही. या गल्ल्यांमध्ये जरा हरवण्याची मजा घेऊ या.
तर वाराणसीच्या या गल्ल्या, त्यांतली घरं, दुकानं, गल्ल्यांमधली वीजव्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था हा सर्व देवभरोसे चाललेला कारभार आहे.
सर्व गल्ल्यांमधलं जनजीवन पाहात असतना हे विनाअडथळा कसं चालतं हा प्रश्न पडत राहातो. विजेच्या तारांचा जो काही गुंता इथं पाहायला मिळतो त्यावरून प्रश्न पडतो की खरंच जर कुणाच्या घरातली वीज गेली तर ते लोक कसं काय दुरूस्त करत असतील? अगदी त्या वायर्सच्या गुंत्याप्रमाणेच इथली सर्व व्यवस्था आहे. गुंता आहे तरीही सर्व काही चालू आहे.
तर इथल्या गल्ल्या या वाराणसीच्या घाटांना जोडलेल्या आहेत. या गल्लीत रिक्षासारखं वाहन जाऊ शकत नाही. जास्तीतजास्त मोटरसायकल. आणि त्यातही, समोरासमोर दोन मोटरसायकल आल्या की वाहतूकीचा खोळंबा!. आपल्या समोर जर दोन माणसं गप्पा मारत बाजूबाजूनं चालत असतील तर त्यांना ओलांडून, वाट काढून त्यांना ओव्हरटेकही करू शकत नाही, इतक्या या गल्ल्या चिंचोळ्या आहेत. त्यात भरीला गलेलठ्ठ गुरं चालत असतात.
या गल्ल्यांमध्ये काही मिळत नाही असं नाही. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं इथं आहेत. अगदी थोडक्या जागेत वसलेली आणि जागेचं मॅनेजमेंट कसं करायचं याचे धडे देणारी अशी ही दुकानं.
आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे या गल्ल्यांमधली खाद्यसंस्कृती.
मुंबई आणि इतर महानगरांमध्ये युपी-बिहारवरून आलेले पाणीपुरी, आलूचाट विकणारे भैया लोक आपल्याला हमखास दिसतात. पण या पदार्थांचा खरा आस्वाद घ्यायचा तर तो वाराणसीच्या गल्ल्यांमध्ये! वाराणसीच्या खाद्यसंस्कृतीतले काही महत्त्वाचे पदार्थ म्हणजे समोसा, कचोरी, पुरी भाजी, आलू चाट, जलेबी, रबडी आणि लस्सी. जोडीला गुलाबजामून आणि रसगुल्ल्यासारखे पदार्थही आहेत. या गल्ल्यांमध्ये पावलापावलांवर हे पदार्थ मिळतात. अतिशय तोकड्या जागेत ही मंडळी आपलं दुकान थाटून बसलेली असतात.
बऱ्याच दुकानदारांचं अर्धं शरीर दुकानाबाहेर असतं, कारण जागाच कमी. त्यामुळे दुकानात माल आणि मालक दुकानाच्या बाहेर! निवांत बसून हे पदार्थ खायची सोय इथं नाही. कागदी द्रोणांमध्ये हे पदार्थ घ्यायचे आणि उभं राहून खायचे. पण आश्चर्याचा भाग म्हणजे भरपेट राईसप्लेट किंवा भाजी-भाकरीसारखे पदार्थ देणारी हॉटेलं इथं फार कमी. मुळात इथं असं काही भरपेट दोन वेळा जेवण्यापेक्षा असले नाश्त्याचे पदार्थ खायची प्रथा जास्त दिसते. २० रूपयांत दोन समोसे खायचे आणि नंतर एक पान जमवायचं. मग परत भूक लागली की कचोरी आणि परत पान, असा प्रकार सर्रास दिसतो. लस्सी इथली खास. मोठ्या परातीमध्ये दही आणि मलई घेऊन हे लस्सीवाले बसलेले असतात. ४० रूपयांत मोठा, मातीचा वाडगा भरून लस्सी मिळते. लस्सीची ऑर्डर दिली की एका मोठ्या भांड्यात दही टाकून रवीने घुसळतात. मग त्यात चवीप्रमाणे साखर टाकतात आणि साखर एकजीव झाली की लस्सी तयार. एकदा का ती मातीच्या वाडग्यात ओतली की सर्वांत वर मलईचा एक पापुद्रा टाकला जातो. आपल्याकडे दुधावर जशी जाड साय असते तसाच पापुद्रा. ही लस्सी खायला एक लाकडी चमचा दिला जातो. आईस्क्रीम खायला मिळतो तसा. अशीच जरा वेगळी तऱ्हा कचोरी आणि समोशाची. समोसा, कचोरी द्रोणात कुस्करली जाते आणि वर चण्याची पातळ उसळ टाकली जाते. त्यावर पुदिन्याची चटणी आणि चिरलेला कांदा घालून, लिंबू पिळला जातो. पंधरा-वीस रुपयांत मिळणाऱ्या या पदार्थांची चव अविस्मरणीय असते. माझ्या पाच दिवसांच्या वास्तव्यात मी फक्त दोनदाच जेवलो असेन. नाहीतर सतत असे चटरफटर पदार्थ खाऊनच मला आनंद मिळाला.
या गल्लीत फिरताना ब्लू लस्सी नावाचं एक मजेदार दुकान मिळालं. या दुकानाची खासियत म्हणजे इथं तुम्ही प्यायल्यावर स्वतःचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो भिंतीवर चिटकवता येतो. या दुकानातल्या लस्सीची आठवण म्हणून. या दुकानाचा कानाकोपरा अशा फोटोंनी आणि ग्राहकांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या संदेशांनी भरलेला आहे.
हे दुकान साधारण ९० वर्षं जुनं आहे. अशी वैशिष्ट्यं असलेली अनेक दुकानं इथं दिसतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी. या सर्वांसोबत चहा तर हवाच. पानाची जी गत तीच इथं चहाची. इथं फक्त चहा विकणारी दुकानं तुम्हाला दिसतील. ज्या हॉटेल्समध्ये समोसा, कचोरी मिळती तिथं चहा मिळत नाही. चहासाठी प्रसिद्ध अशा टपऱ्या इथं आहेत, जिथं बाकी काही विकत नाहीत. मातीच्या कुल्हडमधून हा चहा दिला जातो. चहासोबत जी मातीची चव लागते ती चहाचा आनंद द्विगुणित करते. थोडक्यात समोसा, मग चहा, नंतर पान, नंतर कचोरी, चहा, मग जलेबी, जलेबीवर पान आणि नंतर चहा असं आलटून पालटून तुम्ही दिवसभर इथं टाईमपास करत फिरू शकता.
बनारस घाट आणि या घाटांवरचे लोक
सकाळी सातच्या सुमारास मी वाराणसीत पोहचलो असेन. हॉटेल हे तुलसी घाटापासून दोन मिनिटांवर होतं. रात्रभर झोप झाली नव्हती पण तरीही या घाटांवर कधी एकदा जातो असं झालं होतं. सामान रूमवर टाकलं आणि थेट तुलसी घाट गाठला. घाटावर गंगाआरती चालू होती. लोकं गंगेत डुबक्या मारत होती.
बाजूलाच उंचावर एक मारूतीचं मंदिर दिसलं. मी मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरूवात केली. जसजसं मंदिर जवळ येत होतं तसतसं कुणाच्यातरी बोलण्याचे स्वर कानावर पडत होते. मग जरा जवळ गेल्यावर एक गृहस्थ तावातावाने आपल्या कौटुंबिक समस्या कुणालातरी सांगताना दिसले. जरा पुढे गेलो तर आश्चर्यच. हे गृहस्थ कुणा माणसाशी नव्हे तर चक्क हनुमानाशी बोलत होते. मग लक्षात आलं की इथं देवाशी बोलायची पद्धतच आहे. बरं, हे बोलताना या लोकांचा स्वर आणि आवेश अगदी आपल्या जवळच्या मित्राशी बोलतो तसा असतो. हा गृहस्थ अगदी हनुमानाला बोट दाखवत, दटावणीच्या स्वरात स्वतःची गाऱ्हाणी सांगत होता. तीच तऱ्हा इतर देवळांमध्येही. इथं लोक देवालाच सकाळी ठणकावून उठवतात.
"अरे ओ भोलेनाथ, उठ जाओ यार, सुबह हुई की नही तुम्हारी?" किंवा काहीवेळा देवालाच "खुश रहो" असा आशीर्वादही देऊन टाकतात. सगळंच गमतीशीर.
तर या देवळाच्या एका खिडकीतून मी खाली पहात होतो. गंगेच्या पात्रात लोकं डुबक्या मारत होती आणि एक धक्कादायक गोष्ट मला दिसली. गंगेतून दूरवरून एक प्रेत वाहत येत होतं. टम्म फुगलेलं आणि त्याच्या पाठीवर कावळे बसून मांस खात होते. हळूहळू ते प्रेत काठावर, जिथं भाविक गंगास्नान करत होते, तिथं सरकू लागलं आणि काही वेळात ते चक्क १५-२० फूटांवर येऊन एका होडीला येऊन अडकलं. पण कमालीची गोष्ट ही होती की त्या स्नान करणाऱ्या लोकांना याचं काही नव्हतं. सुरुवातीला मला वाटलं की कुणाच्या लक्षात नाही आलं असेल. मी उंचावर उभा आहे म्हणून मला दिसलं असेल आणि कदाचित या गंगास्नान करणाऱ्यांना नसेल दिसलं. मग मी धडधड पायऱ्या उतरत घाटावर गेलो. मला जाणून घ्यायचं होतं की या सर्व प्रकारावर स्थानिकांची प्रतिक्रिया काय असेल. एका मिनिटात घाटावर पोहचलो तर लक्षात आलं की त्या प्रेताची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. मग एक बुजुर्ग म्हातारा म्हणाला, "नाँव में फस गया है. कोई बात नही. चला जायेगा." याउपर कुणाचीही काहीही प्रतिक्रिया नाही. कारण हे इथलं नेहमीचं दृश्य आहे. नंतर अधिक माहिती काढली तेव्हा कळलं की काही लोकं हे मृत्युपश्चात आपलं शरीर गंगेला दान करतात. हा प्रकार बेकायदेशीर आहे पण तरीही इथं काही स्थानिक लोक आहेत जे हे काम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन करतात. नंतर ही प्रेतं कधी ना कधी काठावर जाऊन लागतातच. मग यावर टपलेले असतात ते अघोरी साधू. ते या प्रेतांची हाडं काढतात; कवटी काढतात; आणि याचा वापर नंतर काळ्या जादूसारख्या गोष्टींसाठी केला जातो. सगळंच विचित्र!
तर या गंगेच्या किनाऱ्यानं हे सर्व पुरातन घाट आहेत. अस्सी घाट हा पहिला. तिथून एकएक करत शेवटच्या घाटापर्यंत जाता येतं. प्रत्येक घाटाचं वेगळं वैशिष्ट्य. यातील अस्सी घाट, तुलसी घाट, दशाश्वमेध घाट यांसारखे घाट पर्यटकांमध्ये आणि भाविकांमध्ये प्रसिद्ध आहेत. इथं स्थानिक फार कमी दिसतात. बाकी उरलेले जे लहान-मोठे घाट आहेत तिथं सकाळच्या वेळी स्थानिक मंडळी गंगास्नानासाठी जमा होतात. पुण्या-मुंबईत जसं साठीला पोहोचलेले आणि आयु्ष्यात थोडे निवांत झालेले पुरुष गटागटाने मॉर्निंग वॉकला जातात तसंच. समूहानं या घाटांवर सकाळी जमायचं आणि गंगापूजा आणि आंघोळ करून मग पुढच्या कामाला लागायचं हा यांचा नियमित क्रम. यांच्या गप्पा ऐकणं हासुद्धा मजेशीर अनुभव. जसे हे माणसांचे समूह तसेच या प्रत्येक घाटावर कुत्र्यांच्या टोळ्या. त्यांच्यातही टोळीयुद्ध दिवसभर चालू असतात.
या घाटाच्या काठाने सर्व मच्छिमार समूहाची घरं आहेत. या मच्छिमारांची मुलं कधी पतंग उडवताना तर कधी पकडापकडीचे खेळ खेळताना दिसतात.
गेल्या काही वर्षांमध्ये या घाटांवर पर्यटकांची संख्या इतकी वाढलीय की मच्छिमारी करण्यापेक्षा, पर्यटकांना बोटीनं फिरवण्याच्या व्यवसायात या मच्छिमारांना जास्त फायदा मिळायला लागला. त्यामुळे या लाकडी बोटी सोडून, मच्छिमारीच्या फारच कमी खुणा इथं दिसतात. एका घाटावर असेच काही मच्छिमार पत्त्यांचा डाव टाकून बसेलेले दिसले.
मग त्यांचा खेळ उरकल्यावर त्यांच्याशी गप्पा मारत बसलो आणि त्यातून बऱ्याच गोष्टी कळत गेल्या. वाढत्या पर्यटनामुळे पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय कसा नष्ट होत गेला याची माहिती मिळाली.
हे घाट आणि त्यांवरचं जनजीवन हा एका कादंबरीचा विषय आहे. या घाटावर स्थानिकांपासून देशभरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून आलेले लोक दिसतील. हे घाट म्हणजे भारत देशाचं आणि त्यातील विविधतेचं एक मिनी मॉडेल आहे असं म्हणता येईल. अगदी राजस्थान असू दे किंवा आसाम, आणि दक्षिणेकडील राज्यं, या सर्व भागांतून आलेले लोक इथं दिसतात.
या सर्वांचं येण्याचं मुख्य कारण असतं ते पूर्वजांचं श्राद्ध आणि तत्सम विधी उरकणं. एकाचवेळी चाळीस-पन्नास लोकं हाकणारे पुजारी इथं दिसतील. असे चाळीस-पन्नास लोकांचे किमान दहा गट एकाचवेळी पूजा उरकत असतात.
या पुजाऱ्यांच्या एकंदरीत स्वभावाचं निरीक्षण करणं फार मजेदार अनुभव होता. मग त्यात एखादा उच्चशिक्षित आणि मालदार ग्राहक असेल तर त्याला वागणूक वेगळी आणि खेडोपाड्यातून आलेल्या गरीब बहुजनांना वेगळी वागणूक हे इथं सर्रास दिसतं. हे पुजारी बरेचदा करवादलेले असतात. प्रचंड गर्दी आणि त्याच जोडीला असेलेली स्पर्धा या दोन्हीच्या मिश्रणातून त्यांची चिडचिड होते. यांच्या पूजा सांगण्याच्या तऱ्हासुद्धा औरच. त्यांच्यासाठी हा नित्याचाच खेळ. एका ठिकाणी मी पाहिलं की एक पुजारी एका मठाच्या पहिल्या मजल्यावर उभा राहून निवांतपैकी पूजासांगत होता.
सर्व भाविक होते गंगेत उभे आणि हा पहिल्या मजल्यावर. बरेचदा पूजा सांगतासांगता ग्राहकासोबत पैशाबाबत हुज्जत सुरू असते. एक मंत्र उच्चारून संपला की मध्येच बिदागीचा विषय काढला जातो. मग ग्राहक आणि पुजारी यांच्यात घासाघीस करत ही कर्मकांडं पुढे सरकत रहातात. हे सर्व पाहायला फार गमतीशीर वाटतं. गंगास्नान आणि विधी उरकल्यावर तिथचं कपडे बदलणारे बाया आणि पुरूष दिसतात.
या प्रत्येक घाटावरच्या जनजीवनात वैविध्य आहे. या सर्वांबद्दल लिहायला इथं जागा कमी पडेल पण काही महत्त्वाच्या घाटांबद्दल मी नक्कीच लिहीणार आहे. त्यांतला सर्वांत विलक्षण घाट म्हणजे मणिकर्णिका घाट.
हा घाट प्रसिद्ध आहे तो अंत्यविधींसाठी. मणिकर्णिका घाटाला जोडणाऱ्या सर्व गल्ल्यांमधून सतत 'राम नाम सत्य है'चा आवाज येत राहातो. प्रत्येक पाच-दहा मिनिटांनी इथं प्रेतं येत रहातात. या सर्व गल्ल्यांमध्ये अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सामानाची दुकानं दिसतात. जसजसा घाट जवळ येतो तसतसं प्रेतं जळल्याचा वास यायला लागतो. सर्व वातावरणात धूर भरून राहिलेला असतो; त्यामुळे डोळ्यांची जळजळ होते. असं म्हणतात की ही आग गेल्या तीन हजार वर्षांत कधीही विझलेली नाही. खरं असावं ते. इथं सतत चिता पेटत असतात. घाटाच्या सुरुवातीला लाकडांच्या मोठमोठ्या वखारी आहेत. इथं सतत लाकडं येऊन पडत असतात. त्यात या लाकडांचे विविध प्रकार. अगदी चंदनासारखी महागडी लाकडंसुद्धा इथं असतात. त्याचप्रमाणे नदीमार्गे होड्यांमधूनही लाकडं येत असतात. या घाटावर सगळी जत्रा भरलेली असते. इथं माणसं रडत असतात; मुलं खेळण्यात रमलेली असतात; कचोरी, समोसा, चहा यांची दुकानं ओसंडून वहात असतात. हे सर्व एकाचवेळी घडत असतं. प्रेतांवरचे फुलांचे हार खाऊन गलेलठ्ठ झालेले बैल, गाई संथ गतीनं फिरत असतात. त्यांच्या जोडीला देवाला सोडलेले कोंबडे, बकरे. लोक जथ्याजथ्याने या घाटांवर येत असतात आणि एकाचवेळी शेकडो लोकांसोबत विविध विधी इथं पार पडतात.
वाराणसीतल्या माणसांचे किस्से
कोणत्याही ठिकाणची स्थानिक माणसं आणि त्यांचे स्वभाव हे त्या जागेला एक रूप देत असतात. वाराणसीतही मला माणसांचे विविध अनुभव आले. काही अनुभव मजेदार तर काही त्रासदायकही. वाराणसीचे घाट हे फोटोग्राफीसाठी नंदनवन मानले जातात. जगभरातून फोटोग्राफर्स या ठिकाणी येतात, फोटो काढून घेऊन जातात. आणि या सगळ्याची जाणीव या घाटालगत रहाणाऱ्या लोकांना आहे. त्यामुळे काही वेळा स्थानिकांकडून फोटोला विरोधही केला जातो. एका घाटावर मी काही मुलांना कागदी होडी बनवून होडीशी खेळताना बघितलं. साहजिकच मला त्या कागदी होड्या आणि गंगेतील खऱ्याखुऱ्या होड्या यांचं कॉम्बिनेशन दिसायला लागलं. मी त्या मुलांचे आणि त्यांच्या कागदी होड्यांचे फोटो काढत असतानाच त्या मुलांच्या बापानं अडवायला सुरुवात केली आणि पैसे मागायला लागला. मी फोटो काढण्यासाठी कधीही कुणाला पैसे दिले नाहीत. मुळात पर्यटनस्थळावर फोटो काढण्याची माझी ही पहिलीच वेळ असावी. तरीही मला वाटतं की पैसे देऊन फोटो काढणं सोप्पं असतं. पण आपला दृष्टीकोन समोरच्याला समजावून एक विश्वास तयार करणं फार अवघड. त्या मुलांच्या बापाने माझ्याकडे पैसे मागितले. "हर एक बच्चे का पाचसो रूपयां" असे २००० रूपये द्या. मी म्हणाले, मी नाही देणार. त्यावर तो म्हणाला की, "आप इन बच्चों की गरीबी का मजाक उडांं रहे हो." मग मी त्याला प्रतिप्रश्न केला. "दो हजार देकर मजाक उडाया तो चलेगा क्या?"
त्यावर तो निरुत्तर झाला. मग मी त्याला माझ्या कॅमेऱ्यातील काही फोटो दाखवले. त्यात त्यांच्या कागदी होड्या आणि गंगेतल्या होड्या यांचा संबंध टिपायचा मी प्रयत्न करतोय असं सांगितलं. मग तो जास्त हुज्जत न घालता निघून गेला.
मोहनां सराय हे गाव बनारसी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथं घराघरात हातमाग आहेत; त्यांवर या साड्या तयार होतात. मी फिरतफिरत या गावात पोहचलो. एका घरात गेलो तर त्यांनी आधीच मला सांगितलं की फोटो काढायचे असतील तर पैसे द्यावे लागतील. मी म्हणालो, नाही मी फोटो नाही काढणार. मग मी गप्पा मारायला सुरुवात केली. या लोकांना मुंबईबद्दल फार आकर्षण. पंधरा-वीस मिनिटं गप्पा मारल्यावर सर्वजण मोकळे झाले. मी कॅमेरा बाहेर काढला आणि फोटो काढायला सुरुवात केली. कुणीही मला अडवलं नाही, कारण तोपर्यंत आमच्यांत एक चांगली मैत्री झाली होती.
या गावात देश-विदेशातून पर्यटक येतात. गावात काही एजंट आहेत जे या पर्यटकांना घरोघरी फिरवतात आणि पैसेही मिळवतात. त्याची जाणीव या स्थानिकांना आहे त्यामुळे फोटो काढायला यांचा विरोध असतो. पैसे द्या आणि फोटो काढा असा सगळा प्रकार. पण मी कधीही कुठेही पैसे दिले नाहीत.
या गावातून बाहेर पडलो आणि मुख्य रस्त्यावर आलो. तिथं एक सुंदर बालवाडी दिसली. खरं तर ते एक आंबेडकर भवन होतं. त्यातच शेतकऱ्यांनी बकऱ्या, गुरं बांधली होती आणि तिथंच पंधरा-वीस मुलांसाठी बालवाडी भरते.
शाळा सुटली होती. दोन-पाच मुलं आपल्या पालकांची वाट बघत बसली होती. तिथल्या शिक्षिकेसोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि बाहेर पडलो. शाळेच्या दारात येऊन सँडल चढवत होतो तर रस्त्यापलीकडून एका पन्नाशीच्या माणसानं हाक मारली. मी रस्ता ओलांडून त्या इसमापर्यंत गेलो. तो इसम प्रचंड बेरकी दिसत होता. मला न्याहाळत तो म्हणाला,
"ये कॅमेरा बहुत महंगा होगा?"
मी म्हणालो, फार नाही.
मग त्यानं विचारलं, "आप चष्मा कब सें पहनते हो?"
मी म्हणालो, वर्ष झालं.
मग तो हसला आणि म्हणाला "अगर मै आपको कुछ ऐसी बांत बताऊँ जिससे आप का चष्मा हट जायगां तो आप मुझे क्या देंगे?"
मी सावध झालो. मी म्हणालो, मला चष्मा आवडतो. मला काही अडचण नाहीये आणि मी तिथून कलटी मारायचा प्रयत्न करायला लागलो तसा तो गळ्यातच पडला. त्यानं माझा हात पकडला आणि मला खुर्चीवर बसवलं.
"देखिये. मेरे पास आयुर्वेदिक दवा है. कोई साईड इफेक्ट नहीं होगा. सिर्फ एक एक बूंद आँंखोंमे डालनी है ओर दस मिनीट बाद आप इफेक्ट देखिए।" मी आता सावध झालो. डोळ्यात काही औषध घालून घ्यायचा संबंधच नव्हता. मी उठलो आणि त्याला म्हणालो, "मै मेरी आँखों के साथ किसी भी तरह की रिस्क नही ले सकता" असं म्हणून थेट रस्ता पकडला.
त्यावर तो तिथून ओरडून सांगायला लागला. "भाईसाब, कोई रिस्क नही है. आयुर्वेदिक है. चलो आँखों का छोडीये। कोई लैंगिक समस्या. दिलकी बीमारी, हड्डी के दर्द का, बाल झडनां सबका इलाज है मेरे पास. सोचिये. ये मौक़ा दुबारा नहीं आयेगा" हे सर्व कानांवर पडत होतं आणि मी न ऐकल्यासारखं भासवत वेगानं चालायला सुरुवात केली आणि त्या गल्लीतून बाहेर पडलो. आणखी एक गंमत.
पर्यटकांसाठी प्रसिद्ध नसलेल्या काही घाटांवर मी सतत जात राहिलो. त्यामुळे तिथल्या मच्छिमार समाजासोबत चांगली मैत्री झाली. त्यांच्याकडून काही राजकीय वातावरणाविषयी माहिती मिळाली. मायावतीबद्दल त्यांना अजून आदर आहे. मायावती सरकार चांगलं होतं, पण नंतर सर्वत्र पुतळे बांधण्यासाठी जो भरमसाठ खर्च झाला त्यातून कसा आकस तयार झाला, याबद्दल हे लोकं बोलले. मुलायम सरकारमध्ये यादवराज होतं. कोणत्याही यादवांविरुद्ध पोलीस स्टेशनवर तक्रारही नोंदवून घेतली जात नव्हती. योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात गुंडागर्दीला आळा बसलाय. वाराणसीतही पावलोपावली पोलीस बंदोबस्त दिसतो. परंतु काशी विश्वनाथ मंदिरासाठी जो कॉरीडोर तयार करण्यात आला त्यासाठी जवळपास ५०० पुरातन घरं तोडली गेली. त्याबद्दल काहीशी नाराजी दिसते. या कॉरीडोरमुळे वाराणसीचं पुरातन रूप काही अंशी नाहीसं झालं. हा मंदिराचा संपूर्ण भाग फार हायटेक वाटतो. आपण मंदिराच्या गेटजवळ नसून एखाद्या मॉलच्या गेटचं स्वरूप इथं आलेलं दिसतं.
एका घाटांवर राजू यादव नावाचे एक गृहस्थ चिमण्यांना दाणे टाकताना दिसले. त्यांच्याशी सहज गप्पा मारल्या. त्यांना विचारलं की बिस्मिल्ला खां साहेबांचं घर कुठे आहे. तर ते म्हणाले, अगदी माझ्या घरापासून पाचशे मीटरवर. तो मला म्हणाला, मी पटकन गंगा स्नान उरकून घेतो आणि तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला त्यांच्या घराजवळ सोडतो. मग मी त्यांच्या मोटरसायकलवर मागे बसून त्यांच्यासोबत गेलो. अशाच एका गल्लीत त्यांच्या इलेक्ट्रिक सामानाचं दुकान होतं. त्यांनी मला दुकानाजवळ सोडलं आणि तिथून मी चालत जायचं ठरवलं. पत्ता विचारत विचारत घरापर्यंत पोहोचलो. बाहेर बिस्मिल्ला खां यांच्या नावाची पाटी होती. मी दार वाजवलं. पण दहा मिनिटं वाट पाहूनही कुणी दार उघडलं नाही. मग मी फक्त त्यांच्या नावाच्या पाटीचा फोटो काढून परतलो.
एकंदरीत वाराणसीबद्दल लिहिण्यासारखं फार आहे. पण काही गोष्टींची उत्सुकता मला राखून ठेवायची आहे. त्यामुळे मी इथेच थांबतोय. या घाटांवरील जे जीवन आहे ते इतक वैविध्यपूर्ण आहे की त्याबद्दल लिहायला वेळ आणि शब्द अपुरे पडतील.
पण या लेखाच्या शेवटी इतकंच म्हणेन की हे शहर नक्की पाहायला हवं. परतपरत जाऊन पाहायला हवं. या गल्यांमधल्या लोकांप्रमाणे जगून पाहात हे शहर फिरण्यासारखं आहे.
या वाराणसीच्या गल्ल्याच मुळात हरवण्यासाठी तयार झाल्यात. थोडक्यात जर तुम्हाला स्वतःला हरवून टाकण्यात आनंद वाटत असेल तर वाराणसी हे शहर तुमच्यासाठी आहे. स्वतःला हरवल्याचा आणि काहीतरी नवीन सापडल्याचा, दोन्हीही आनंद एकाचवेळी या शहरात अनुभवता येतो.
प्रतिक्रिया
झकास सैर
लै भारी. फोटो तर उत्तम आहेतच, पण सोबत शहराची प्रकृती उलगडून ऐसपैस केलेल्या गप्पा टाईप जे वर्णन आहे त्यासाठी 100 लाईक
==================
भूतकाळातील आस्वल्य.
शहराची व्याख्या भारतात जगा वेगळी असावी
शहर म्हणजे काय?
नियोजन बद्ध रस्ते,नियोजन बद्ध सर्व व्यवस्था,इंडस्ट्रिअल area तो पण नियोजन बद्ध.
हाउसिंग सोसायटी,पाणी वितरण,वीज वितरण. सर्व सुविधा
आरोग्य ,शिक्षण पासून सर्व
ह्याला शहर म्हणतात.
बनारस हे अस्ताव्यस्त वाढलेले गाव आहे त्याला शहर म्हणता येणार नाही
फक्त लाखो लोकसंख्या म्हणजे शहर नव्हे
भारतात शहर असतील तर मोजकीच दहा बारा असतील बाकी सर्व अस्ताव्यस्त वाढलेली गाव आहेत
.
लेख फार आवडला. अशा गावात जाण्याचं धाडस माझ्याकडून होण्यासारखं नसल्यामुळे उत्सुकता आणि निधडी छाती इतकी पुंजी घेऊन तिथे जाणाऱ्यांचं विशेष कौतुक आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
गावात जाण्याचं धाडस
बनारसला जायला धाडस नाही लागत, मोकळं मन लागतं. मी पाचसहा वेळा गेलेय, एकटी, नातलगांसोबत, मैत्रिणींसोबत, म्हणून हे लिहितेय. म्हणून इतकं नक्की म्हणेन की एकदा हे जे काही धाडस करायचंय ते कर, आणि जाच.
This too shall pass!
.
लेख आवडला !
अनेक वर्षांपूर्वी वाराणसीत तीन महीने राहीलो होतो, पण कामातून रिकामपण झाले नाही आणि दोनेक वेळाच घाटावर गेलो.
अस्सी घाट यावर 'मोहल्ला अस्सी' हा सनी देवलचा चित्रपट नुकताच पाहीला. मच्छिमार, पंडित, दुकाने, पर्यटक, एजंट यांचे चांगले चित्रण आहे.
मोहल्ला अस्सी
मी सिनेमा पाहिलेला नाही पण मूळ पुस्तक वाचलंय. ज ब र द स्त आहे. बनारसला पाचसहा वेळा गेलेय, त्यामुळे ते अधिक भिडतं पुस्तक.
This too shall pass!
कालप्रवास झाला.बनारसला जाऊन
कालप्रवास झाला.बनारसला जाऊन आलो वाचता वाचता.मस्त.
लेख आवडला; पण मोहल्ला अस्सी
लेख आवडला; पण मोहल्ला अस्सी या चित्रपटात जास्त चांगल्या प्रकारे वाराणसीचे चित्रण व सामाजिक / खाजगी आयुष्याचे कंगोरे समजले.
बराच काळ भारतापासून दूर असल्याने घाणीबद्दलची सहनशक्ती कमी झाली आहे त्यामुळे असेच दर्शन पुरे.