बोलींचं स्वायत्त क्षेत्र : दक्खनवरील भाषांचं साहचर्य

#संकीर्ण #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

बोलींचं स्वायत्त क्षेत्र : दक्खनवरील भाषांचं साहचर्य

- चिन्मय धारूरकर

१. उस्मानाबाद-सोलापूर मराठीचे काही विशेष

(१.१) "का कर्‌लालाव्‌?" – काय करताय?
(१.२) "पोरं खाल्ली?" – पोरांनी खाल्लं?

आजच्या महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांत (आणि इतरत्रही अनेक ठिकाणी) अशी वाक्यं रोजच्या बोलण्यात सर्रास वापरली जातात. कथित प्रमाण मराठीच्या वळणाचं मराठी बोलणाऱ्यांना कदाचित ही वाक्यं खटकतील किंवा गैरही वाटतील, पण अशा वाक्यांची देवाणघेवाण करून सार्थ संवाद साधणारे लोक आहेत. वर या वाक्यांच्या शेजारी मराठीत अर्थ दिला आहे. त्याची संगती लागेल अशी काही आपण फोड करू शकतो का? 'का करलालाव्‌' यामागे कुठेतरी 'काय करू लागला आहात' अशी रचना असावी का? आधी आपण या क्रियापदाची काय रूपं होतात ती पाहू –

एकवचन अनेकवचन
प्रथम पुरुष कर्‌लालो (पुं)
कर्‌लाले (स्त्री.)
कर्‌लालाव (पुं, स्त्री.)
द्वितीय पुरुष कर्‌लालास (पुं)
कर्‌लालीस (स्त्री.)
कर्‌लालाव (पुं, स्त्री.)/
कर्‌लालात (पुं, स्त्री.)
तृतीय पुरुष कर्‌लाला (पुं)
कर्‌लाली (स्त्री)
कर्‌लालेत (पुं)
कर्‌लाल्यात (स्त्री)

तक्ता १. रूपतालिका कर्‌ चालू वर्तमानकाळ. (उस्मानाबाद-सोलापूर)

रूपाच्या (शब्दाच्या आकाराच्या) पातळीवर जरी ही रूपं दिसताना 'करू लागणे'ची रूपं म्हणून संबंधित वाटत असली तरी अर्थाच्या पातळीवर तरी ती 'करत असणे' या चालू वर्तमानकाळी रूपांना तुल्य आहेत1. अशा प्रकारची रूप-अर्थ यांमधील तफावत काळाच्या संदर्भात बोलीबोलींमध्ये सर्रास दिसून येते. तळटिपेत परभणीच्या बोलीतील या आशयाची रूपं कशी होतात ते दिलं आहे. या प्रत्ययांचा, रूपांचा वेगळा विचार होणं आवश्यक आहे; तो का ते आपण या लेखात पाहणार आहोत. शिवाय ही आहेत ती रूपं तशी का आहेत याचं काही स्थळकाळांत उत्तर सापडतं का तेही पाहणार आहोत. आणि शेवटी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालणार आहोत – शब्दरूप जरी मराठीचं असलं तरी अर्थाच्या संरचनेचं स्वरूप वेगळ्या स्वरूपाचं दिसत असल्यास यांना मराठीच्या बोली म्हणता येईल का, हा तो प्रश्न होय. यांना सरसकट शेजारच्या एखाद्या भाषेच्या बोली ठरवणं तरी तितकं सहजसोपं आहे का, यावरही विचार करणं हादेखील या लेखाचा एक हेतू होय.

वर दिलेल्या 'पोरं खाल्ली?' या वाक्याचा अर्थ प्रमाण मराठीच्या नजरेतून पाहता 'कोणीतरी पोरं खाल्ली?' असा भयानक अर्थ हाती लागतो. अर्थात वापराच्या दैनंदिन सहजतेच्या चढ-उतारातून हे पोरांना खाण्याबाबत नसून 'पोरांनी खाल्लं का' याबाबतचं विचारणं आहे हे स्पष्ट होतं खरं, पण दुसऱ्या बोलींच्या (ज्यात प्रमाण मराठीदेखील मोडते) नजरेतून रूपांकडे पाहिल्यास हा प्रश्न अनर्थकारकच वाटतो खरा! मराठीच्या अनेक बोलींमध्ये साध्या भूतकाळी वाक्यरचनेत खाणाऱ्यांच्या पुढे ने, नी किंवा नं असं काहीतरी लावलं जातं आणि क्रियापद हे जे खाल्लं गेलं त्याच्या लिंग, वचन यांची नोंद ठेवत असतं. उदाहरणार्थ – 'त्याने चिंच खाल्ली'. यात क्रियापद 'खाल्ली' हे चिंचेशी नातं सांगतं. चिंच एक आहे आणि ती आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून खाल्ली. 'चिंचा' असत्या तर 'खाल्ल्या' असत्या, 'खाल्ली' नव्हे. तसंच 'आंबे' असते तर 'खाल्ले' असते आणि 'फळ' असतं तर 'खाल्लं' असतं. अर्थात प्रमाणीकृत मराठी आणि काही बोलींमध्ये असं होतं, पण इतर अनेक बोलींमध्ये 'पोरं खाल्ली'प्रमाणे वाक्यं होतात. तिथे 'मिलिंद आंबा खाल्ला', 'तुळजा आंबा खाल्ली' अशी साध्या भूतकाळाची वाक्यं होताना दिसतात. हा विशेष आपण इथे नोंदवून ठेवू आणि पुढे याची सविस्तर चर्चा करू.

२. गुलबर्गा-बिदर कानडीचे काही विशेष

(२.१) “येन्‌ माड्लिकत्तिरि?” – काय करताय?
(२.२) “मक्कळ्‌ तिन्ड्रा?” – पोरांनी खाल्लं?

आजच्या कर्नाटकात प्रामुख्याने गुलबर्गा-बिदर जिल्ह्यांत (आणि इतरत्रही अनेक ठिकाणी) अशी वाक्यं रोजच्या बोलण्यात सर्रास वापरली जातात. कथित प्रमाण कानडीच्या वळणाचं कानडी बोलणाऱ्यांना कदाचित वाक्यं खटकतील किंवा गैरही वाटतील, पण अशा वाक्यांची देवाणघेवाण करून सार्थ संवाद साधणारे लोक आहेत. वर या वाक्यांच्या शेजारी मराठीत अर्थ दिला आहे. वरच्या मराठी उदाहरणांची फोड करताना 'काय करू लागला आहात' याच्याशी संबंध असावा का, असा प्रश्न आपण विचारला. तोच इथेही विचारता येईल. कारण प्रमाण कानडीतही 'येन्‌ माडलिकि हत्तिरि' याचा अर्थ 'काय करू लागला आहात' असा होतो खरा. परंतु गुलबर्गा-बिदर कानडीमध्ये मात्र याचा अर्थ 'काय करताय' असाच होतो. म्हणजेच शब्दरूपं म्हणून जरी प्रमाणीकृत कानडीच्या रूपांशी या रूपांचं साम्य असलं तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा होतो. आणि सुरस बाब ही की 'करू-लागणे' हाच रूपांचा सांगाडा उस्मानाबाद-सोलापूर मराठी आणि गुलबर्गा-बिदर कानडी वापरत आहेत. हे साम्य विलक्षण आहे. ते का ते पुढे पाहू, त्याचबरोबर अशा रचना कशा विकसित झाल्या असाव्यात याचा सामाजिक, ऐतिहासिक, भाषिक अर्थ काय हेदेखील पुढे पाहू. आत्ता मात्र हे साम्य विलक्षण आहे एवढंच लक्षात घेऊ.

(१.२) मध्ये बोलीचं वेगळेपण होतं तसं (२.२) मध्ये मात्र दिसत नाही. कारण प्रमाणीकृत कानडीतही खाणाऱ्यांच्या पुढे साध्या भूतकाळात किंवा कोणत्याही काळात ने, नी किंवा नं (अर्थात यांची कानडी तुल्य रूपं) ही अजिबात लागत नाहीत. त्यातल्या त्यात वेगळेपण इतकंच की प्रमाणीकृत कानडीत 'तिन्दरा' असं रूप होतं. 'तिंड्रा' मध्ये मात्र मधला स्वर गळाला आहे. पण तरी ते रूप प्रमाणीकृत रूपाच्या बऱ्यापैकी जवळचं आहे. थोडक्यात, मराठीप्रमाणे कानडीत याबाबतीत काही बोलीवैविध्य नाही. अर्थात याच धर्तीवर उस्मानाबाद-सोलापूर मराठीतलं रूप सिद्ध होतं का, हा प्रश्न मात्र आपण नक्कीच विचारू शकतो. किंबहुना 'पोरं खाल्ली' यामागे 'मक्कळु तिन्दरा' ही धाटणीच असण्याची शक्यता आहे.

(२.२.१) जाता जाता हेही नोंदवून ठेवू की तेलंगण्याच्या तेलुगूतही 'मक्कळ्‌ तिंड्रा'प्रमाणेच (हा कानडी प्रयोग, याप्रमाणेच) 'पिल्ललु तिन्न्रा/तिन्नारा' असाच प्रयोग सापडतो. एव्हाना हे स्पष्ट झालंच असेल की 'पोरं खाल्ली', 'मक्कळ्‌ तिंड्रा' आणि 'पिल्ललु तिन्न्रा/तिन्नारा' ही वाक्यं एकाच धर्तीवरची आहेत.

३. माळेतला आणखी एक मणी – दक्खनी

(३.१) क्या कर्रें? – 'काय करताय'
(३.२) बच्चे खाये? – 'पोरांनी खाल्लं?'

(३.१) मध्ये जरी 'करू-लागणे'शी थेट संबंध नसला म्हणजेच 'करने-लगना' या खड़ीच्या क्रियापदमालिकेशी संबंध नसला तरी 'कर रहे हैं' याचं एक आकुंचित रूप 'कर्रें' दिसतंय. (३.२) 'बच्चे खाये?' हा प्रश्न मात्र अगदीच (१.२) आणि (२.२) यांच्याशी मेळ खाणारा आहे. इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हिन्दीतलं (म्हणजे खड़ीबोलीतलं) 'बच्चों ने खाया?' हे वाक्य काही दक्खनीभाषकांच्या वापरातलं नाही. किंबहुना दक्खनीच्या व्याकरणात, प्रयोगात अशी वाक्यं संभवत नाहीत2. आणि म्हणूनच प्रमाणीकृत मराठीप्रयोगाला 'पोरं खाल्ली?' याचं जसं अप्रूप वाटतं तसंच खड़ीभाषकाला 'बच्चे खाये?' याचं वाटतं. 'किसी ने तो बच्चे खाये?' (कोणीतरी पोरं खाल्ली) असं वाटून त्यांनाही धस्स व्हायला होत असावंच. पण खड़ीच्या पूर्वेला, 'पूरबी युपी', बिहार आणि पार आसामपर्यंत पूर्वेकडच्या भाषांमध्ये 'ने' असं काही नसतंच त्यामुळे 'उस ने बात की' ऐवजी 'वो बात किया' हे त्यांना ऐकायला मिळत असतंच. त्याबाबतीत दक्खनी ही खड़ीच्या पूर्वेकडच्या बोलींसारखी आहे हे नक्कीच.

४. आणखी काही साम्यं आणि विस्तार

तो, ती ही सर्वनामं उस्मानाबाद-सोलापूर मराठीत केवळ दर्शक सर्वनामं म्हणून वापरात आहेत. एखाद्या वाक्याचा कर्ता म्हणून येताना ती वापरली जात नाहीत. तर 'त्यानं', 'तिनं' हीच रूपं अवतरतात. ही इतकी सर्रास वापरली जातात की 'त्यानं आला', 'तिनी आली', 'तिनं प्रश्न विचारली' इत्यादी प्रयोग सहजरीत्या वारंवार होतात. दक्खनीतही अशाच प्रकारचे प्रयोग दिसतात. तिथे वह, वो असं काही सर्वनाम दिसत नाही. दर्शक सर्वनामाच्या रूपातच आढळतं.3 त्यामुळे 'उनो आये', 'उनो आया', 'उनो आयी', 'उनो कामां करा' (अर्थ – त्याने कामं केली) इत्यादी प्रयोग होतात. या अंगाने दक्खनी आणि उस्मानाबाद-सोलापूर मराठी कशा सारख्या आहेत हे समजून घेण्याआधी आपण हिन्दी, मराठी, गुजराती इत्यादी भाषांत दिसून येणाऱ्या प्रेरकरचना (ergative constructions) म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊ.

४.१ प्रेरकरचना म्हणजे काय

४.१.१ मराठीतील प्रेरकरचना

मराठीतली ही वाक्यं पाहा –

नदीम येतो. नदीम चिंच खातो
नदीम आला. नदीमने चिंच खाल्ली.
नदीम येईल. नदीम चिंच खाईल.

दोन्ही तक्त्यांमध्ये तीन काळांतली (तिन्ही साधे काळ) वाक्यं आहेत. (अ)मध्ये 'येणे' हे अकर्मक क्रियापद आहे तर (आ)मध्ये 'खाणे' हे सकर्मक. (अ)मधल्या वाक्यांत कर्ता 'नदीम' हा जशास तसाच राहिला आहे. तर (आ)मधला कर्ता हा साध्या भूतकाळात 'नदीमने' असा झालाय. यात 'खाल्ली' हे क्रियापदाचं रूप 'चिंच' या स्त्रीलिंगी एकवचनी नामाशी मिळतंजुळतं आहे. 'चिंच' हे कर्म आहे. 'नदीम' हा कर्ता आहे. म्हणजे कर्म जर वेगळ्या स्वरूपाचं असतं, तर वाक्यातलं क्रियापद बदललं असतं. जसं की 'नदीमने चिंचा खाल्ल्या' – यात 'चिंचा' हे अनेकवचन असल्याने 'खाल्ल्या' असं रूप झालं. किंवा 'नदीमने आंबे खाल्ले' – यात 'आंबे' हे पुल्लिंगी अनेकवचन असल्याने 'खाल्ले' असं रूप झालं. आणि जर 'फळ' हे नपुंसकलिंगी एकवचनी कर्म असतं तर 'नदीमने फळ खाल्लं' असं वाक्य झालं असतं. हे असं केवळ आणि केवळ साध्या भूतकाळी रचनेपुरतंच होतं. इतर काळांतल्या वाक्यांत मात्र क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं. 'नदीम'ऐवजी आपण एखादा स्त्रीलिंगी अनेकवचनी कर्ता घेतला तर – 'मुली चिंच खातात', 'मुली चिंच खातील' अशी वाक्यं होतील. मात्र साध्या भूतकाळातलं वाक्य 'मुलींनी चिंच खाल्ली' असंच राहील, कारण इथे क्रियापद हे 'चिंच' या कर्माप्रमाणे चालवावं लागेल. असं का? तर मराठीत असंच असतं. साध्या भूतकाळातली रचना करताना त्यातलं क्रियापद हे कर्माप्रमाणेच चालवलं जातं. अपूर्ण भूतकाळी वाक्यांच्या रचनेतही क्रियापद हे कर्त्याप्रमाणेच चालतं – 'नदीम चिंच खात होता' – यात 'खात होता' हे 'नदीम' म्हणजेच कर्त्यानुसार चालणारं क्रियापद आहे. आणि त्यातही असं फक्त सकर्मक क्रियापदांच्याच बाबतीत होतं. कारण (अ) मध्ये मात्र 'नदीमने आला' असं काही वाक्य झालं नाही, होत नाही. अजून कोणत्याच काळात असं होत नाही का? तर, नाही. हे असं फक्त आणि फक्त साध्या भूतकाळातच होतं. इतर कोणत्या रचनांत असं होतं का? तर, हो. काळ नाही परंतु विध्यर्थ रचनेत4 असं होतं. आणि त्यात मात्र अकर्मक-सकर्मक असं काही बंधन दिसत नाही म्हणून 'नदीमने यावं', 'नदीमने चिंच खावी', 'नदीमने अभ्यास करावा' इत्यादी वाक्यांत क्रियापदाचं विध्यर्थ रूप हे कर्मवाचक ठरतं. थोडक्यात एरवी सर्व काळांत (आणि काळांच्या भेदांत) कर्त्याप्रमाणे चालणारं क्रियापद (सकर्मक धातूंच्या संदर्भात) साध्या भूतकाळात कर्माप्रमाणे चालवावं लागणं याला प्रेरकरचना म्हणतात5. तसंच, विध्यर्थक रचनादेखील प्रेरकरचनांत मोडतात.

४.१.२ प्रेरकरचना असणाऱ्या इतर भाषा

वरील परिच्छेदातील प्रेरकरचनांची तोंड-ओळख आपल्याला या लेखातील तुलना, म्हणणं समजून घ्यायला पुरेशी आहे. तरी काही थोडके तपशील आणि पार्श्वभूमी जाणून घेऊ आणि मग मुख्य प्रतिपाद्य तुलनेकडे येऊ. भारतीय उपखंडातील पश्चिम इंडो-आर्य (कोंकणी, मराठी, गुजराती, राजस्थानी, मारवाडी, पंजाबी, सिन्धी इत्यादी) मध्य इंडो आर्य (खड़ी, ब्रज बुन्देली, नेपाळी इत्यादी) या भाषांमध्ये प्रेरकरचना सापडतात. तर द्रविड आणि पूर्वेकडच्या इंडो-आर्य भाषांमध्ये (अवधी, भोजपुरी, मैथिली, ओडिया, बांगला, आहोमिया, नागामी इत्यादी) प्रेरकरचना नाहीयेत. वर दिलेली व्याख्या ही केवळ मराठी आणि तत्सम भाषांना लागू पडते. या भाषांत प्रेरकरचनांच्या विकासाबाबत भाषाअभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत6. भारतीय भाषांमध्ये या रचनांचा विकास प्राकृतांमधील कर्मणि रचनांमधून झाला असा एक सिद्धान्तवजा कयास आहे. संस्कृतातील कर्मणि प्रयोग हा काही काळ आणि अभिवृत्तींसाठी प्राकृतात स्थिरावला आणि त्याचाच एक आविष्कार हा उपखंडातील प्रेरकरचनांत दिसतो7. यासंबंधी आपल्याला हे माहीत हवं की प्रेरकरचना असणाऱ्या भाषांचे दोन प्रकार आहेत. मराठीसारख्या, ज्यांत एखाद्याच कालभेदात किंवा अभिवृत्तीत अशा रचना होतात, त्यांना अंशतः प्रेरकरचना असणाऱ्या भाषा म्हणतात. याशिवाय जगात अनेक भाषा अशा असतात ज्या पूर्णतः प्रेरकरचनांचाच वापर करत असतात. मग कोणताही काळ किंवा काळाचा भेद किंवा अभिवृत्ती असो. अशा काही भाषा म्हणजे बास्क (युरोपातली एक स्वयंकुलीय भाषा – जिची वर्गवारी कोणत्याही ज्ञात कुळात लावता येत नाही त्यामुळे तिच्या कुळातली ती एकच भाषा असते), ग्रीनलॅन्डिक भाषा इत्यादी.

४.२ दक्खनी आणि मराठी – काही साम्यं

४ या छेदकाच्या सुरुवातीला आपण 'तिनं आली', 'तिनं प्रश्न विचारली', 'उनो कामां करा' ही वाक्यं पाहिली. आता ही वाक्यं पुन्हा शिस्तीत पाहू आणि वरच्या प्रेरकरचनांच्या आकलनाच्या पार्श्वभूमीवर इथे काय घडत आहे, या रचना कशा समजून घेता येतील ते पाहू.

मराठी उस्मानाबाद-सोलापूर मराठी हिन्दी-उर्दू दक्खनी तेलुगू (तेलंगणा)
तो आला त्यानं आला वो आया उनो आया वाडु वच्चिण्डु
तो गेला8
ती गेली तिनं गेली वो गई उनो गई आमे पोयिन्दि
ती गेली
तिने प्रश्न विचारला तिनं प्रश्न विचारली उस ने सवाल पूछा उनो सवाल पूछी आमे प्रश्नम्‌ अडगिन्दि
ती प्रश्न विचारली

आपल्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न तो असा - उस्मानाबाद-सोलापूर मराठी किंवा दक्खनीमध्ये हे विशिष्ट प्रयोग संभवले ते कसे, त्यांची संगती कशी लावायची?

१. तो, ती ही सर्वनामं उपलब्ध नसल्याने तिनं, त्यानं अशी सुरुवात होणं साहजिक आहे. अर्थात हे केवळ या सर्वनामांपुरतंच आहे. (पाहा अन्त्यटीप ii). बाकी नामांच्या बाबतीतही ती अप्रत्ययी प्रेरकविभक्तीतच वावरताना दिसतात. आपण मुद्दाम नामांचा संदर्भ टाळला, कारण सर्वनामांच्या निवडीमुळे भाषकांच्या मनातील व्याकरणिक रचना अधिक स्पष्टपणे आपल्याला दिसतात. मुळात इथे तिनं, त्यानं ही रूपं तरी का यावीत? बरं येतात तर येतात, अकर्मक क्रियापदांच्या आधीही का यावीत? याचं एक कारण उपमिती (analogy) असू शकेल. त्याने केलं, तिने म्हंटलं इत्यादी अन्यबोलीतील रचना वारंवार वापरल्या जात असल्याने त्यानं, तिनं हीच रूपं सरसकट वापरण्याकडे कल निर्माण झाला असावा. एका परीने हा वारंवार येणाऱ्या रूपाची व्याप्ती, विस्तार (extension) वाढवण्याचा भाग म्हणूनही पाहता येईल.

२. मराठी, हिन्दी या आणि यांसारख्या काही भाषांत क्रियापदाच्या रूपांवर कर्त्याचं लिंग (वचन, पुरुष यांसहच) व्यक्त होत असतं. मी गातो, मी गाते, तू गातोस, तू गातेस इत्यादी. या विशेषाची संगती लावण्यासाठी किंवा हे कुठून आलं हे स्पष्ट करताना पेगी मोहन म्हणतात –

संस्कृत आणि प्राकृत या भाषांत क्रियापदाच्या रूपाचं आणि लिंगाचं काहीएक देणंघेणं नसतं. संस्कृतातल्या 'खादति'मधून वचन आणि पुरुष व्यक्त होतात पण लिंग नाही. परंतु हिन्दीत, 'खाता हूँ', 'खाती हूँ'; मराठीत 'खातो', 'खाते' यातून लिंग व्यक्त होतं. क्रियापदाला कुठे लिंग असतं का!? या रूपांची घडण कशी झाली हे पाहू जाता असं लक्षात येतं की हिन्दी, मराठीतील ही रूपं संस्कृत 'खादत्‌' या धातुसाधित विशेषणाशी संबंधित आहेत. याचा अर्थ 'तो खाणारा आहे', 'तो खात असलेला आहे'. ही धातुसाधित विशेषणं एखाद्या नामाप्रमाणेच वावरत असतात. म्हणून त्यांतून लिंग व्यक्त होऊ शकतं.
[भाषांतर माझं. मोहन (२०२१: १०७-१०८)]

मोहन यांच्या या अवतरणाचा आपल्या प्रश्नाशी काय संबंध? तर आपल्याला उस्मानाबाद-सोलापूर मराठीमधील क्रियापदाच्या रूपांवर दिसणाऱ्या लिंगाची संगती लावायची आहे. यासाठी आपण मोहन यांचं म्हणणं आपल्या प्रश्नाला कितपत लागू होतं ते पाहू. उस्मानाबाद-सोलापूर मराठी किंवा दक्खनी यांचं इंडो-आर्य अंग क्रियापदाच्या रूपांतील लिंगाच्या अंकावरून दिसून येतं. ते असं9

पुरुष / वचन एक अनेक
प्रथम मी प्रश्न विचारलो
मी प्रश्न विचारले
आम्ही प्रश्न विचारलाव
द्वितीय तू प्रश्न विचारलास
तू प्रश्न विचारलीस
तुम्ही प्रश्न विचारलात
तृतीय त्यानं प्रश्न विचारला
तिनी प्रश्न विचारली
त्यांनी प्रश्न विचारलेत
त्यांनी प्रश्न विचारल्या
पुरुष / वचन एक अनेक
प्रथम मी आलो
मी आले"
आम्ही आलाव
आम्ही आलाव
द्वितीय तू आलास
तू आलीस
तुम्ही आला/आलाव
तृतीय त्यानं आला
तिनी आली
त्यांनी आले
त्यांनी आल्या

या तक्त्यांमध्ये 'येणे' या अकर्मक आणि 'विचारणे' या सकर्मक क्रियापदांची साध्या भूतकाळातली रूपं दिली आहेत. सर्वनामांची रूपंही मुद्दाम नोंदवली आहेत. कारण काही ठिकाणी प्रेरकविभक्तीचा प्रत्यय दिसेनासा झालेला आहे. पुल्लिंगी-स्त्रीलिंगी रूपं एकानंतर एक नोंदवलेली आहेत. यातली महत्त्वाची निरीक्षणं अशी –

३. प्रथम आणि द्वितीय पुरुषांमध्ये 'ने' हा प्रेरकविभक्तिप्रत्यय पार अदृश्य झालेला आहे. अर्थात असं प्रमाणीकृत मराठीतही झालेलं आहेच. पण असं हिन्दीत, कोंकणीत किंवा गुजरातीत झालेलं नाही.

४. क्रियापद सर्वत्र कर्त्याशी नातं सांगणारं आहे. 'प्रश्न' या कर्माचं वाचन क्रियापद करताना दिसत नाही.

५. 'त्यानं आला', 'तिनं आली' यात प्रेरकविभक्ती प्रत्यय दिसतो खरा. पण इथे या रचनेला प्रेरक या कोटीत न टाकता वेगळ्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल.

याच्या जोडीला कानडीत ही रूपं कशी होतात ते पाहू. तीन रांगांमध्ये अनुक्रमे पुं, स्त्री, आणि नपुं अशी रूपं समजावीत. कानडीतलं 'बरु' – येणेची साध्या भूतकाळातली रूपं -

पुरुष / वचन एक अनेक
प्रथम नानु बंदेनु नावु बंदेवु
द्वितीय नीनु बंदि नीवु बंदिरि
तृतीय अवनु बंदनु
अवळु बंदळु
अदु बंतु
अवरु बंदरु
अवरु बंदरु
अवु बंदवु

'केळि' विचारणे या क्रियापदाची रूपं –

पुरुष / वचन एक अनेक
प्रथम नानु केळिदेनु नावु केळिदेवु
द्वितीय नीनु केळिदि नीवु केळिदिरि
तृतीय अवनु केळिदनु
अवळु केळिदळु
अदु केळिदु
अवरु केळिदरु
अवरु केळिदरु
अवु केळिदवु

६. बहुतेक द्रविड भाषांत अशाच प्रकारची रूपं होतात. केवळ तृतीय पुरुषांतच लिंगशः तीन वेगळी रूपं होतात. बाकी प्रथम आणि द्वितीय पुरुषांत लिंगाचं अंकन क्रियापदावर नसतं. या अंगाने या छेदकातील (२)मध्ये आपण उद्धृत केलेलं मोहन यांचं निरीक्षण पाहता लिंगाचं अंकन क्रियापदावर करण्याबाबतीत मध्य आणि पश्चिमेच्या इंडो-आर्य भाषा पुढे आहेत, हे स्पष्ट आहे.

५. पहिल्या दोन छेदकातील ऐवजाचं पुनरवलोकन

छेदक १ आणि २ मध्ये आपण जे पाहिलं ते तक्त्याच्या रूपात असं मांडता येईल -

वाक्य
उस्मानाबाद-सोलापूर मराठी का करलालात
बिदर-गुलबर्गा कानडी येन माड्लिकत्तिरि
प्रमाणीकृत मराठी काय करताय
प्रमाणीकृत कानडी येन माड्तिदिरि
अर्थ तुम्ही काय करत आहात?

'काय करताय' हे वाक्य चालू वर्तमानकाळातलं आहे. त्याचं समानार्थी वाक्यं 'का करलालात' असं आहे. 'करलालात' याची फोड आपण 'करू लागला आहात' अशी करू शकतो. पण तशी करून हाती काही फार लागत नाही. कारण 'करू लागला आहात' याचा प्रमाण मराठीतला अर्थ आणि 'करलालात'चा अर्थ यांचा काही मेळ बसत नाही. थोडक्यात, प्रत्येक बोलीची स्वतःची स्वायत्त अशी काल-, कालभेद- किंवा क्रियाव्याप्तिभेद- व्यवस्था (tense and aspect system) असते. आणि ती व्यक्त होत असताना शब्दाच्या पातळीवर काही घटक (जसे इथे 'करलालात' आणि 'करू लागले आहात' हे) संबंधित वाटले तरी अर्थाच्या पातळीवर ते तुल्य असतीलच असं नाही.

बिदर-गुलबर्गा येथील कानडीतल्या वाक्यातही याच स्वरूपाची रचना दिसते. 'माड्लिकत्तिरि' (करलालात) आणि प्रमाणीकृत कानडीतील 'माडलिकि हत्तिरि' (करू लागलात) यांचा शब्दाच्या पातळीवर मेळ बसतो, पण अर्थाच्या दृष्टीने ते समान नव्हेत. 'करू लागणे' यात अमुक कृतीला सुरुवात करणे, आधी ती करत नसताना ती करू लागणे असा अर्थ आहे. असा अर्थ मात्र बिदर-गुलबर्ग्याचा कानडीत 'माड्लिकत्तिरि'मधून व्यक्त होत नाही. त्यामुळे हादेखील काल आणि क्रियाव्याप्तीच्या स्वायत्ततेचाच भाग आहे.

यातली सगळ्यात सुरस बाब हीच, की रूढार्थाने आपण ज्यांना दोन वेगळ्या भाषांच्या (मराठी आणि कानडी) बोली म्हणून ओळखतो त्यांची व्याकरणाच्या दृष्टीने तार्किक रचना ही काही बाबतीत तंतोतंत मिळतीजुळती आहे. आपण लेखात आत्तापर्यंत काळ, क्रियाव्याप्ती याच अंगाने पाहिलंय पण इतर अनेक असे विशेष सामाईक असू शकतील, आहेत. आणि केवळ कानडी, मराठीच नव्हे तर तेलंगण्याची तेलुगू आणि दक्खनीसुद्धा याच माळेत बसतील. अर्थात सगळ्यांची तार्किक व्याकरणिक रचना तंतोतंत जुळेल किंवा एकाच विशेषाच्या बाबतीत जुळेल असं नाही. पण थोड्याबहुत जुळल्या तरी त्यांच्यातील आंतरिक एकरूपता समजून घेणं उद्बोधक ठरेल.

माझा भर हा अशा रचना शोधण्यावर आहे. शब्दांवर नव्हे10. रचनात्मक साम्यं ही अधिक गहिरा असा सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक बंध सांगत असतात, तर शाब्दिक साम्यं ही त्यामानाने वरवरची असतात.

६. फलित : निरीक्षणं आणि प्रश्न

६.१ व्यापक भाषिक क्षेत्र नव्हे, छोटी-छोटी स्वायत्त प्रादेशिक भाषिक क्षेत्रं

एरवी आपला असा ग्रह असतो की सीमावर्ती बोली प्रमाणीकृत बोलींपेक्षा वेगळ्या असतात, कारण त्या सीमेपलीकडच्या दुसऱ्या एका भाषेच्या प्रभावाखाली असतात. समजा हा ग्रह आपण मराठी भाषक लोक उस्मानाबाद-सोलापूरच्या बोलींबाबत बाळगून आहोत. आपल्याला वाटतं या बोलींचा हेल, यांतील शब्द, वाक्यं ही अशी अशी आहेत कारण यांच्यावर कानडीचा प्रभाव आहे. पण आता उलट विचार करून बघा. मैसूर-बेंगळूरमध्ये राहणाऱ्या कानडीजनांनाही असं वाटतं की बिदर-गुलबर्ग्याची कानडी जशी आहे तशी आहे, कारण तिच्यावर मराठीचा प्रभाव आहे. मग आता सांगा कोण कोणासारखं असल्यामुळे तसं आहे?!

इथे हे लक्षात घ्यायला हवं, की सीमावर्ती भागांतील बोलींचं, भाषांचं प्रदीर्घ साहचर्य असल्यामुळे त्या दोन्ही एकमेकींसारख्या झालेल्या असतात. हा प्रभाव अन्योन्य असतो, दोन्ही भाषा एकमेकींना समानप्रकारे प्रभावित करत असतात. या प्रदीर्घ साहचर्यातून त्यांची त्यांची अशी एक स्वायत्त व्याकरणिक व्यवस्थाच आकाराला आलेली असते. आणि यात कोणतं वैशिष्ट्य कोणाच्या प्रभावामुळे याचं विश्लेषण करणं अगदी अप्रस्तुत नसलं, तरी त्यातून फार काही मर्म हाती येतं असं नाही. आपल्या हाती आलेलं अत्यंत मोलाचं निरीक्षण किंवा मर्म हे, की संरचनात्मक पातळीवर या सीमावर्ती बोली खूपच सारख्या आणि एकमेकींसारख्या आहेत. यांच्यातला हा संबंध ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. त्यातून सामाजिक-ऐतिहासिक-सांस्कृतिक घटितांचा उलगडाही होतोच. आपण जर 'कानडीचा मराठीवर प्रभाव' हेच करत बसलो असतो तर या स्वायत्तपणे वावरणाऱ्या बोलींच्या संरचनेचा उलगडा आपल्याला झाला नसता11. यांना आपण स्वायत्त म्हणतोय, कारण आपण पाहिलेलं 'करलालाव' आणि 'माड्लिकत्तिरि' या उदाहरणाद्वारे आपण क्रियाव्याप्तीचा एका प्रकार पाहिला, जो खासच या बोलींचा आहे. अशा अनेक बारीकसारीक वैशिष्ट्यांचा संच यांच्या व्याकरणांमध्ये असणार आणि तो खासच या प्रदेशाची भाषिक एकरूपता अधोरेखित करणारा ठरतो. अर्थातच, दक्खनचा प्रदेश अनेकच बाबतीत स्वायत्त आणि स्वतंत्र आहे; त्याच्यात्याच्या चालीरीती, सांस्कृतिक विशेष इत्यादी गोष्टी समान आणि व्यवच्छेदक आहेतच. यासंबंधीचं दुर्गा भागवतांचं मत जाणून घेण्यासाठी पाहा रानडे (२००५: ५७-५८).

या स्वायत्त व्यवस्थेचा एक अर्थ असाही निघतो की एखाद्या बोलीतल्या एखाद्या विशेषाची संगती लावायची झाल्यास ती रूढार्थाने जिची बोली समजली जाते त्या भाषेकडे वळण्यापेक्षा किंवा शेजारच्या राज्यातील भाषेकडे वळण्याऐवजी तिथल्या बोलीकडे पाहिलं तर अधिक स्पष्ट आणि लक्ख असं चित्र उभं राहतं. आजवर आपण संस्कृत किंवा प्राकृत किंवा द्रविड या व्यापक चौकटींकडे डोळे लावून बसत होतो. परंतु, शेजारची बोली हीदेखील तितकीच, किंबहुना त्याहून अधिक मार्मिक, नेमकी अशी माहितीची आणि मर्मदृष्टीची खाण असू शकते. अर्थात, असं म्हणत असताना संस्कृत, प्राकृत, द्रविड यांचं ज्ञानही आवश्यक आहेच, ते नाकारणं हा हेतू नव्हे. तर स्वायत्त, प्रादेशिक क्षेत्राचं सकस आकलन कसं होईल या दिशेने हा एक मार्ग आहे.

६.२ प्रेरकरचनांचं काय

क्रियापदावर कर्त्याचं लिंग काय ते नोंदवणं हे एक खास असं वैशिष्ट्य मध्य आणि पश्चिमेच्या इंडो-आर्य भाषांचं आहे. पेगी मोहन यांचं उद्धृत आपण वर पाहिलं. प्रमाणीकृत मराठीत प्रेरकरचना या केवळ साध्या भूतकाळी आणि विध्यर्थरचनांतच होतात हेही समजून घेतलं. मराठीत आणि इतर मध्य आणि पश्चिमी भाषांत सकर्मक क्रियापदांच्या साध्या भूतकाळी रचनांत क्रियापदाच्या रूपावर कर्त्याचं लिंग, वचन, पुरुष अंकित न होता कर्माचं लिंग, वचन, पुरुष अंकित होताना दिसतात. हे केवळ साध्या भूतकाळी रचना आणि विध्यर्थ यांपुरतंच सीमित असल्याने ते संगतिछेदक (marked)12 ठरतं. या भाषांना प्रेरकरचनांचे अभ्यासक अंशतः प्रेरक रचना असणाऱ्या भाषा असं म्हणतात ते या संगतिछेदकतेमुळेच. भारतीय इंडो-आर्य भाषांतील प्रेरकरचनांच्या घडणीमागे ऐतिहासिकदृष्ट्या कर्मणि भूतकालवाचक धातुसाधित विशेषणं असावीत, असा कयास अभ्यासकांनी नोंदवलाय हे आपण वरच्या छेदकामध्ये पाहिलं. पण हे वैशिष्ट्य कार्यरत होतं तेव्हा नेमकं काय घडतं? रूप आणि अर्थाच्या पातळीवर कोणती उलथापालथ होते? तर कर्त्यावर प्रेरकविभक्तिप्रत्यय लागतो 'ने', 'नी' इत्यादी. यामुळे कर्तृपद हे त्याचं महत्त्व गमावून बसतं व त्यामुळे क्रियापदावर अंकन होत नाही. आपोआपच कर्मपद महत्त्वाचं उरतं आणि त्याचं अंकन क्रियापदावर होतं. हे सगळं अनेक बोलींत घडतं. प्रमाण मराठी त्यांत मोडते.

आपण हेही नोंदवलेलं आहेच की मराठीत प्रथम आणि द्वितीय पुरुष सर्वनामांचा प्रेरकविभक्तिप्रत्यय दिसत नाही. त्याला अप्रत्ययी प्रेरक म्हणता येईल. या एका प्रत्ययाच्या लोपामुळे अनेक बोलींमधील वेगळ्या पद्धतीच्या प्रेरकरचनांची संगती लावता येईल. ती अशी – एकदा का एखाद्या कर्त्यावर प्रेरकविभक्तीचा दृश्य प्रत्ययच नाहीये म्हंटल्यावर आपोआपच हा कर्ता क्रियापदावर अंकन करायला मोकळा होत असावा, आणि म्हणून 'मी गोष्ट सांगितलो', 'तू शंका विचारलास' अशी वाक्यं शक्य होतात. कदाचित आपण पाहिलेली उस्मानाबाद-सोलापूर मराठीतील प्रेरकरचनांची संगती यातून लागू शकते. म्हणजे या बोलीत अशा स्वरूपाच्या रचना का निर्माण झाल्या असाव्यात? याला हे अंतर्गत उपमितीचं कारण असावं – म्हणजे दुसऱ्या एखाद्या भाषेतून काही प्रभावित होऊन हे विशेष अवतरले नाहीत तर अंतर्गत संरचनात्मक विकासातूनच अशी वाक्यं होऊ लागली. आणि नंतर सरसकटच – कर्तृपदावर 'ने' सारखा प्रत्यय असो वा नसो, त्याचं अंकन क्रियापदाच्या रूपावर होऊ लागलं.13

'तिनं आली', 'त्यानं आला' यांत मात्र अकर्मक क्रियापदांतही प्रेरकविभक्तीचा सांगाडा तरी दिसतो. याला पूर्णपणे प्रेरकरचना म्हणता येणं कठीण आहे. कारण यात कर्मच नाहीये. त्यामुळे जे काही आहे – कर्ता, मग तो कोणत्या का स्वरूपात असेना त्याचं अंकन करणं हे तर इंडो-आर्य भाषांत होतंच, आहेच. मग प्रदीर्घ द्रविडभाषक साहचर्याचं यात देणं ते काय, असा प्रश्न पडूच शकतो. ते देणं इतकंच, की सातत्याने आपल्याभोवती अशा भाषा बोलल्या जात असल्या, किंवा आपण खुद्द (द्वैभाषिक असल्यास) अशा भाषा बोलणारे असलो, की कर्त्याप्रमाणे क्रियापद चालवायचं हे पक्कंच होत जायला मदत झाली असावी. थोडक्यात, अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही प्रेरणा या प्रेरकरचनांच्या वैविध्यामागे असाव्यात असं वाटतं.

वरच्या परिच्छेदात आपण मुद्दामच द्रविडी अन्तःस्तर (substrate/substratum) हा शब्द टाळला आहे. कारण यामुळे विनाकारण जित-जेते असा भोंगळ इतिहास जागा होतो. शिवाय ही संकल्पना पिजिन आणि क्रियॉलांच्या विकासाला जशी बोलकेपणाने लागू होते14 तशी प्रदीर्घ साहचर्य, सौहार्दपूर्ण मिसळण, रोटी-बेटी व्यवहार असं मैत्रीचं वातावरण असताना शोषक-शोषित असं कथन उभं करण्यात काही शहाणपणा नाही.

याचाच एक निष्कर्ष असाही निघूच शकतो की मराठीच्या किंवा तेलुगूच्या किंवा कानडीच्या सीमावर्ती बोली किंवा दक्खनीच्या भाषिक वैशिष्ट्यांची संगती लावण्यासाठी त्या त्या भाषेच्या कथित प्रमाणीकृत बोलीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा किंवा सरसकट शेजारच्या प्रांतातील बोलीचा प्रभाव हा झटपट कारण म्हणून पुढे करण्यापेक्षा या सीमावर्ती बोलींचंच एक स्वायत्त जग कसं आकाराला आलं आहे आणि ते किती जिवंतपणे वावरतं आहे हे लक्षात घेणं अधिक उद्बोधक ठरतं. एका परीने भाषिक कुळांच्या ठरीव संकल्पनांचा पुनर्विचार करावा असंच जणू या बोलींच्या प्रदीर्घ साहचर्यातून तयार झालेल्या बोलीक्षेत्रामुळे वाटावं अशी परिस्थिती आहे.

संदर्भ

रानडे, प्रतिभा (२००५) ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी. पुणे: राजहंस प्रकाशन.
Dahl, E and Stronski, K. (2016) (Ed.) Indo-Aryan Ergativity in Typological and Diachronic Perspective. Amsterdam / Philadelphia: John Benjamins Publishing Company.

Deo, A. & Sharma, D. (2006). Typological variation in the ergative morphology of Indo-Aryan languages. , 10(3), 369-418. https://doi.org/10.1515/LINGTY.2006.012

Hook, P. E. (1991) On identifying the conceptual restructuring of passive as ergative in Indo-Aryan. In Pāṇinian Studies. Professor S. D. Joshi Felicitation Volume, Madhav M. Deshpande & Saroja Bhate (eds), 177–199. Ann Arbor MI: Center for South and Southeast Asian Studies, University of Michigan.

Heine, B. and Kuteva, T. (2005) Language Contact and Grammatical Change. Cambridge: CUP.

Kulkarni-Joshi, S. (2016). Forty years of language contact and change in Kupwar: A critical assessment of the intertranslatability model. Journal of South Asian Languages and Linguistics, 3(2), 147-174. https://doi.org/10.1515/jsall-2016-0008

Mesthrie R et al. (2009) Introducing Linguistics. 2nd Edition. Edinburgh: Edinburgh University Press.

Mohan Peggy (2021) Wanderers, Kings, Merchants. Gurgaon: Penguin Random House.

तळटिपा

1

प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष
एकवचन करायलो (पुं) करायलास (पुं) करायला (पुं)
करायली (स्त्री)
अनेकवचन करायले (स्त्री.) करायलीस (स्त्री.) करायलेत (पुं)
करायलो (पुं, स्त्री.) करायलात (पुं, स्त्री.) करायल्यात (स्त्री)

तक्ता १*. रूपतालिका कर्‌ चालू वर्तमानकाळ. (परभणी)

2 'संभवत नाहीत' असं म्हणत असताना या बोलीतल्या भाषकांच्या वापरात दिसत नाहीत, तसे प्रयोग हे भाषक उत्स्फूर्तपणे करताना दिसत नाहीत असा अर्थ अभिप्रेत आहे. अर्थातच बोली किंवा भाषा, उपभाषा या बंदिस्त स्वरूपाच्या नसतात. भाषा बोलणारे विविध मार्गांनी संपर्कात असतात. मराठीच्या बोलींचाही विचार करताना हे लक्षात घ्यायला हवं की या बोली बंदिस्त नाहीत. देवाणघेवाण, दुसऱ्या बोली समजू शकणं, त्याबाबतीत द्वैभाषिक असणं हे अपवादाने नाही तर नियमानेच दिसत असतं. तेव्हा 'संभवत नाही' याचा अर्थ या बोलीचे भाषक आपापसात बोलतात तेव्हा संभवत नाही, असं म्हणणं आहे.

3 इथे हे लक्षात घ्यायला हवं की 'त्यानं', 'तिनं' ही रूपं केवळ तृतीयपुरुषातच सापडतात. प्रथम आणि द्वितीय पुरुषांत 'मी', 'आम्ही', 'आपण', 'तू', 'तुम्ही' अशीच दिसतात. अर्थात त्यांचं दृश्यरूप जरी प्रथमेचं असलं तरी त्यांच्या वाक्यातल्या कार्यावरून त्यांत अप्रत्ययी प्रेरकविभक्ती (ergative case) असते असं म्हणायला लागेल. काही बोलींमध्ये 'मीनी' 'तूनी' अशा रचना दिसतात त्यांत मात्र ही प्रेरकविभक्ती प्रत्ययासह दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण बोलींतलं 'म्या' हे याच विभक्तीचं. दक्खनीतही 'उनो' हे दिसतं ते तृतीय पुरुषांतच. प्रथम आणि द्वितीय पुरुषांत मात्र 'मैं', 'तू', 'तुम' अशीच रूपं होतात.

4 आज्ञार्थ, विध्यर्थ यांना इंग्लिशमध्ये mood म्हणतात. लेखात त्यासाठी अभिवृत्ती हा मराठी पारिभाषिक शब्द वापरला आहे.

5 शालेय व्याकरणांमधून या रचनांना सरसकट कर्मणी ठरवलं जातं. क्रियापदातून कर्माचं वाचन होत असलं, ते अभिहित होत असलं तरी प्रेरकरचना या सैद्धान्तिक चौकटीतून आपण उस्मानाबाद-सोलापूरमधील मराठीची संगती लावू शकतो. कारण आपण या प्रकाराला कर्मणी ठरवून मोकळे झालो तर नेपाळी, कोंकणी, उस्मानाबाद-सोलापूर मराठी यांतील रचनांना कर्तरी म्हणण्याची आफत येईल!

6 याबाबत मराठीतून काही फार उद्बोधक लेखन नाही. परंतु इंग्लिशमधील आकादमिक थाटाचा अलीकडचा संदर्भ म्हणजे डाल आणि स्ट्रोन्स्की [Dahl and Stronski (2016)]

7 पाहा Hook (1991).

8 तेलुगू किंवा कानडी वाक्यरचनांची घडण कोणत्या स्वरूपाची आहे याची कल्पना येण्यासाठी तिरप्या टंकात शब्दशः अर्थ किंवा तुल्य शब्द, प्रत्यय इत्यादी लिहिलेलं आहे. हे तंतोतंत छायालेखन (ग्लॉस) नव्हे. अर्थ पुन्हा दिलेला नाही कारण मराठी वाक्याचा अर्थ तोच अर्थ सर्व रकान्यातील वाक्यांचा आहे. बाकी प्रत्ययार्थांमधील साम्यभेद चर्चेच्या ओघात आणले आहेत.

9 इथे 'ते' हे तृतीय पुरुष नपुंसकलिंगी सर्वनाम हेतुतः टाळलं आहे. त्याचं वितरण आणि तपशील वेगळे आहेत. आपल्या प्रस्तुत समस्येशी त्याचा थेट संबंध नाही.

10 शब्दांवर भर देणारं काम संमत सिद्धान्त मांडणाऱ्या खैरे यांनी केलं आहे. अर्थात भाषिक साम्यं शोधत असताना रचनात्मक साम्य हे अधिक गहिरा संबंध दाखवतात. कारण शब्दांच्या उसनवाऱ्यांवरून काही ठरवायचंच झालं तर मल्याळमला संस्कृतोद्भव किंवा उर्दूला फ़ारसीजनित किंवा अरबीजनित म्हणण्याची आपत्ती येईल.

11 या दिशेने अधिक वाचण्यासाठी पाहा Heine and Kuteva (2005), त्यात पान १७७पासून पुढे. मराठीच्या संदर्भात पाहा Kulkarni-Joshi (2016).

12 Markedसाठी भाषाविज्ञान आणि वाङ्मयविद्या परिभाषा कोशात प्रस्तुत अर्थाने 'वरित, वांछित' असे पर्याय दिलेले आहेत. ते पुरेसे व्याप्त न वाटल्याने संगतिछेदक असा शब्द वापरला आहे.

13 या व याखालील परिच्छेदातले विचार स्पष्ट होण्यासाठी डॉ० ऋता पराडकर यांच्याशी झालेली चर्चा उद्बोधक ठरली. त्यांनी सुचवलेले संदर्भ आणि प्रदीर्घ भाषिक साहचर्य या दिशेने विचार करण्यास दिशा देणं याबद्दल त्यांचे आभार.

14याचं रसाळ विवेचन वाचण्यासाठी पाहा Mestrei, Swan et. al (2009: 271-308). या पाठ्यपुस्तकातील नववं प्रकरण : Language Contact 2: Pidgins, Creoles and 'New Englishes'.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माझ्या समजुतीप्रमाणे लेखातला मुख्य मुद्दा इथे कुठेतरी आहे:

यातली सगळ्यात सुरस बाब हीच, की रूढार्थाने आपण ज्यांना दोन वेगळ्या भाषांच्या… बोली म्हणून ओळखतो त्यांची व्याकरणाच्या दृष्टीने रचना ही काही बाबतीत तंतोतंत मिळतीजुळती आहे. … आणि केवळ कानडी, मराठीच नव्हे तर तेलंगण्याची तेलुगू आणि दक्खनीसुद्धा याच माळेत बसतील. अर्थात सगळ्यांची … व्याकरणिक रचना तंतोतंत जुळेल किंवा एकाच विशेषाच्या बाबतीत जुळेल असं नाही. पण थोड्याबहुत जुळल्या तरी त्यांच्यातील आंतरिक एकरूपता समजून घेणं उद्बोधक ठरेल.

माझी अंमळ तक्रार अशी की ह्या मुद्द्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाचकाला फार अमानुष जंगलतोड करावी लागते. त्यातली काही झाडं आधीच कमी केली असती तर रस्ता सोपा झाला असता. पण असो. मुद्दा अतिशय रोचक आहे.
-------

या सीमावर्ती बोलींचंच एक स्वायत्त जग कसं आकाराला आलं आहे आणि ते किती जिवंतपणे वावरतं आहे हे लक्षात घेणं अधिक उद्बोधक ठरतं. 

ठीक. पण हे स्वायत्त जग अजून किती वर्षं आणि कितपत टिकेल याबद्दल शंका वाटते. प्रमाण भाषांची सामाजिक-आर्थिक ताकद खूप मोठी असते. त्यांच्या रेट्यामुळे स्थानिक बोलींची वैशिष्ट्यं हरवून जाण्याची शक्यता आहे. (त्यातसुद्धा भारतातल्या प्रमाण भाषांवरच इंग्रजीचा दबाव इतका प्रचंड आहे तिथे बोलीभाषांचं काय घेऊन बसलात वगैरे शोकसंगीत वातावरणात नेहमी असतंच.) तेव्हा हा अभ्यास लवकर उरकून घ्यायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

बोली भाषा प्रयोग
1.कन्नड भाषेत शब्दप्रयोगात अगदी किरकोळ बदल करून वेगवेगळे अर्थ ध्वनित केले जातात.
उदाहरणार्थः
ಏನು ಮಾಡ್ತಿರಿ?.... येनु माड्तिरी? .... काय करता?
ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕ್ಹತ್ತಿರಿ?.... येनु माडलिक्क्हत्तिरी?.... काय करत आहात?
ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಿರ್ರಿ?.... येनु माड्तिद्दिरी ?.... काय करत होता?.
ಏನು ಮಾಡುವವರಿದ್ದಿರಿ?.... येनु माडुववरिद्दिरी?.... काय करणार आहात?
ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ?.... येनु माडिद्री? .... काय केला?

2. बोली भाषा व प्रमाण भाषा यात नेहमीच काहीना काही फरक कित्येक भाषेत जाणवत असतो. विशेषकरून दोन (वा तीन-चार) भाषा बोलणाऱ्या (व/वा समजू शकणाऱ्या) सीमा प्रदेशात भाषेचे मिश्रण होत असल्यास त्यात कुणालाही (प्रमाण भाषेच्या खंदे पुरस्कर्त्यांचा अपवाद वगळता) त्याचे सुख-दुःख नसते.
उदाः
अड्ड हादी (ಅಡ್ಡ ಹಾದಿ – आडवा रस्ता) ) पर उद्द हाव (ಉದ್ದ ಹಾವು – लांब साप) पड्या था (पडले होते). दो (दोन) कल्ल (ಕಲ್ಲು दगड) वग्या ( ಒಗೆದೆ- फेकले) , एक लग्या (लागले), एक नाबळ्ळमे (ನಾಬಳ್ಳು-चारबोटाच्या अतराने) चुक्या (चुकले)
मळी-माराचे (ಮಳೀ ಮಾರಿನ -पाऊस-पाण्याचे) दिवस, तग्गा-दिन्नीचे (ತಗ್ಗು-ದಿನ್ನಿ - चढ-उतार)वाट, हेण्णु पोरीचे (ಹೆಣ್ಣು ಹುಡುಗಿ- मुलगी) काम, हचगुड हचगुड (ಹಚಗುಡ- पाठव) म्हटल्यास कस हचगुडायच?
3. आता तर इतर भाषेबरोबर इंग्रजी भाषेतील शब्दांचा प्रयोग कन्नड भाषेतील शब्दाप्रमाणे हेल काढून बोलण्याची फॅशन रूढ होत आहे. (कदाचित हे लोण मराठी भाषिकापर्यंत पोचलेली नसावी)
उदाः
ನಮ್ಮ ಸನ್ನು ಲಾಲಟೆನ ಮುಂದೆ ಕೂತು ರೀಡೆ ರೀಡು. ಆದರೆ ಕೊನೆಗೆ ಫೇಲ್ಡರೀ
नम्म सन्नु लालटेन मुंदे कूतु रीडे रीडू आदरे कोनेगे फेल्डरी
आमचा मुलगा लालटेनसमोर बसून वाचतच होता. शेवटी नपासच झाला हो

ಡಾಗೂ ಬಾರ್ಕೇ ಬಾರ್ಕು. ನಾನು ರನ್ನೇ ರನ್ನು
डागू हार्के बार्कु नानु रन्ने रन्नु
कुत्रा जोरजोराने भुंकत होता व मी पळतच होतो.
ಮುಖವನ್ನು ಸ್ಕ್ವೀಜಿಸಿ (sqeeze) , ನಡವನ್ನು ಬೆಂಡಿಸಿ (bend), ಕರವನ್ನು ಫೋಲ್ಡಿಸಿ (fold) ಆತ ನಮಸ್ಕರಿಸಿದನು.
मुखवन्नु स्क्वीजिसि, नडवन्नु बेंडिसि, करवन्नु फोल्ड्सि आत नमस्करिसिदनु.
तोंड पिळून(?), कमरेत वाकून, हात जोडून त्याने नमस्कार केला.

4. बेळगाव सारख्या सीमाभागातील मराठी बोली भाषेत करायलोय, जायलोय, नाहीये असे (प्रमाण भाषेत वर्ज्य असलेले) शब्दप्रयोग वापरले जातात.
या प्रकारच्या बोली भाषेची गंमतच निराळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

…अशासारखा प्रकार (मुले खाण्याच्या बाबतीत नव्हे, कदाचित, परंतु अन्य संदर्भात) दख्खनीतच नव्हे, परंतु ‘प्रमाण हिंदी’तसुद्धा होतच नसावा काय?

पुढील (बाळबोध) संवाद पाहा:

‘डाकिया डाक लाया।’

‘क्या लाया?’

‘डाक लाया।’

‘कौन लाया?’

‘डाकिया लाया।’

यातील शेवटच्या वाक्याचे (‘डाकिया लाया।’) ‘बच्चे खाये?’शी काही साधर्म्य आढळते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0