भूतकाळाची भुते अर्थात इतिहासतपस्व्यांचा ट्रॅश

#संकल्पना #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

भूतकाळाची भुते अर्थात इतिहासतपस्व्यांचा ट्रॅश

- शैलेन

गेल्या काही वर्षांत व्हॉट्सॲपसारख्या माध्यमांतून अनेक प्रकारचे 'इतिहास' आपल्याला वाचायला मिळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. डॉक्टरांना वैद्यकीतले शहाणपण थेट शिकवायला कोणी जात नाही, तीच गोष्ट वकिलांची किंवा इंजिनियरांची. पण इतिहासकारांचे भाग्य एवढे थोर नाही. त्यांच्या विषयात प्रत्येकालाच गम्य असते, मत असते आणि ते खरेच आहे असा ठाम विश्वासही असतो! इतिहासाबद्दल एवढी प्रचंड आस्था आपल्या समाजात एकंदरीतच कशी काय निर्माण झाली याचा शोध घेताना या घटिताची एक बाजू प्रकर्षाने जाणवायला लागली – ती बाजू म्हणजे 'ट्रॅश' इतिहासाची निर्मिती आणि अभिसरण. या लेखात अशाच इतिहासलेखनाचा आणि ते करणाऱ्या एका प्रख्यात इतिहासतपस्व्यांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीलाच हे सांगणे प्राप्त आहे की, या आढाव्यामुळे सदर इतिहासतपस्व्यांचा अधिक्षेप करायचा हेतू अजिबात नाही – पण त्याचबरोबर हेही खरे आहे की, 'इतिहासतपस्वी' अगर 'महर्षी' अशा पदव्यांनी अलंकृत अशा व्यक्तीने अशा प्रकारचे इतिहासलेखनही केले होते. ही व्यक्ती म्हणजे विश्वनाथ काशिनाथ राजवाडे!

पण राजवाड्यांनी वेळप्रसंगी 'ट्रॅश' इतिहास लिहिला असे म्हणण्याआधी 'ट्रॅश' म्हणजे काय याची व्याख्या करता येते का ते पाहू. या अंकाच्या ओळखपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे 'ट्रॅश' कल्पनेचा थेट संबंध अभिरुची आणि आस्वादाशी असतो. तो लोकप्रियतेशी असेलच असे नाही – किंबहुना नसतोच कारण 'ट्रॅश' हे लोकप्रिय असल्याची कित्येक उदाहरणे आपल्यापुढे आहेत. विशेषतः संगीत, नाटक, चित्रकला इत्यादी इंद्रियगोचर विषयांत आपल्याला लोकप्रिय 'ट्रॅश' सामावलेला दिसतो. इतिहास हा अर्थातच असा इंद्रियगोचर विशेष नाही – पण 'ट्रॅश'ची व्याख्या वेबस्टर शब्दकोशाप्रमाणे "inferior or worthless writing or artistic matter (such as a television show) especially : such matter intended purely for sensational entertainment" अशी केलेली आहे. या व्याख्येनुसार पाहिले असता 'सेन्सेशनल' करमणूक हा 'ट्रॅश'चा कणा असायला हवा. अलीकडच्या म्हणजे विशेषतः 'पोस्ट-ट्रुथ' काळात इतिहासाने घेतलेली वळणे बघता 'सेन्सेशनलिझम' हा जनावकाशात अभिसरित होत असणाऱ्या इतिहासाचा प्राण बनू लागला आहे असे आपल्याला दिसेल. अगदीच काही नाही तर किमान 'गूढ' अशी एखादी बाजू आपल्याला कळू देण्याच्या आवेशात तो अवतरतो. त्याचबरोबर धादांत असत्य असलेल्या गोष्टी याही ऐतिहासिक आहेत असे भासवून देणे हे या माहिती-तुकड्यांचे वैशिष्ट्य असते. त्यातला 'ट्रॅश' कुठला आणि 'छद्म' किंवा स्यूडो कुठला यातल्या सीमारेषा धूसर आहेत. पण तरीही, 'नेहरू आणि शेख अब्दुल्ला हे भाऊ असून दोघांचेही वडील काश्मिरी मुसलमान होते' किंवा 'संभाजी महाराज आठ फूट उंच असून चाळीस भाकऱ्या खात', यासारख्या आगा ना पिछा असलेल्या 'ऐतिहासिक सत्यां'चा समावेश आपण स्यूडो-इतिहासात करू शकतो. मग 'ट्रॅश' इतिहास नक्की कशाला म्हणावे?

या व्याख्येसाठी आपल्याला थोडे तपशिलांत शिरणे भाग आहे. 'पुराव्यांचा शोध, कालसुसंगत मांडणी आणि समजावणी' ही इतिहासाची अगदी बेसिक आणि ढोबळ अशी व्याख्या म्हणायला हरकत नाही. तेव्हा अशी मांडणी केल्याचे वरकरणी तरी दाखवून त्यातून आपण 'सत्य' काय ते परिष्कारत आहोत असा आव आणणाऱ्या इतिहासाला 'ट्रॅश' म्हणता येईल. राजवाड्यांनी इतिहास-लेखनाची काही 'सोपी' पथ्ये सांगितली आहेत, ती अशी –

१. कोणताही पूर्वग्रह घेऊन लिखाण करू नये.
२. भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय लिहायचा खटाटोप करू नये.
३. आपल्याला कोणती माहिती नाही, ते स्पष्ट लिहावे.
४. पूर्वग्रहांप्रमाणेच पश्चाद्ग्रहही टाळावेत.
५. उपमान प्रमाणावर कोणताही सिद्धांत ठरवू नये.

या कसोट्या वापरून लिहिलेला इतिहास प्रमाण म्हणायला हरकत नाही. पण या कसोट्या वापरल्यासारखे दाखवून 'ट्रॅश' इतिहासही निर्माण करता येतो (आणि तो राजवाड्यांनीच कसा केला आहे ते पुढे पाहूच). 'मीमांसाशास्त्र' (epistemology) किंवा पद्धतिशास्त्र (methodology) यांची वरकरणी अंमलबजावणी करूनही 'ट्रॅश' इतिहास लिहिला गेल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात. यातून वेळप्रसंगी उत्तम विनोदनिर्मितीही झालेली आहे – विशेषतः राजवाड्यांची लेखणी या बाबतीत अनेकदा इतके बोचरे आणि कुत्सित रूप धारण करते की वाचकाला हसू आल्याखेरीज राहवत नाही. इतिहास लेखनासाठी प्रमाणभूत मानल्या गेलेल्या अशा कुठल्या संशोधक / विश्लेषक पद्धती 'ट्रॅश' इतिहास निर्माण करण्यासाठी वापरल्या गेल्या आहेत, याचा आढावा घेतला तर आपल्याला असे दिसेल की, व्युत्पत्तिशास्त्राचा नंबर यात फार वरचा लागतो. त्याच्या मागोमाग साधनांचे परिष्करण किंवा अर्थनिर्णयन विशिष्ट हेतू मनात धरून किंवा जाणूनबुजून चुकीचे करणे, हा प्रकार दिसतो. तिसरी बाब म्हणजे साधनांचे किंवा पुराव्यांचे 'ओव्हर-इंटरप्रिटेशन' – ज्याला राजवाड्यांनीच त्यांच्या एका सुप्रसिद्ध निबंधात वापरलेला 'आतिशायन' हा शब्द चोख ठरेल. 'आतिशयना'त इतिहास लेखकाचे पाय जमिनीवरून सुटतात आणि तो कल्पनाविश्वात भराऱ्या मारू लागतो. 'सुतावरून स्वर्ग गाठणे' हा मराठीतला परिचयाचा वाक्प्रचार आहे – पण इथे 'कल्पनाबीजा'तून बहुशाखीय वृक्ष निर्माण करणे हे रूपक कदाचित अधिक योग्य ठरेल. कारण 'सुतावरून स्वर्गा'त 'एकरेषीयता' आहे, पण वास्तविक उदाहरणे पाहिल्यावर अशा इतिहासलेखनाच्या उदाहरणांत लेखकाच्या प्रतिभेला बहुशाखीय बहर आलेला दिसतो! तर या तीन मार्गांनी उत्पन्न झालेल्या 'ट्रॅश' इतिहासाची उदाहरणे आपण आता बघू.

व्युत्पत्तीशास्त्राचे ट्रॅश

माणूस हा 'भाषां'त बोलू शकणारा एकमेव प्राणी आहे. लिखाण, बोल आणि हावभाव यांच्याद्वारे शब्दांचा सुरचित आणि सुनियोजित असा वापर करून परस्परसंवाद साधणारी ती भाषा, अशी भाषेची व्याख्या केली जाते. पृथ्वीतलावर हजारो भाषा बोलल्या जातात. हे शब्द आले कुठून, त्यांची उत्पत्ती कशी झाली हे त्यांची फोड करून दाखवणारे शास्त्र प्राचीन आहे. यास्क किंवा पाणिनीसारखे संस्कृत व्याकरणकार अशा पद्धतीचा वापर करतात. क्वचित प्रसंगी प्राचीन काव्यांत विनोद किंवा शाब्दिक 'खेळ' निर्माण करायलाही अशा मार्गाचा उपयोग केलेला आढळतो. पण तुलनात्मकदृष्ट्या, वेगवेगळ्या भाषा आणि त्यांच्यातील शब्द-साधर्म्य, यांच्या उत्पत्ती आणि सांस्कृतिकतेच्या अंगाने विचार करणारे शास्त्र युरोपात 'एन्लायटनमेन्ट' किंवा 'ज्ञानप्रकाश' पसरू लागला त्या काळात (सुमारे १८व्या शतकाच्या आसपास) विकसित होऊ लागले. या काळातच युरोपात औद्योगिक क्रांतीचेही वारे वाहू लागले आणि 'यंत्रयुगा'ला सुरुवात झाली. यांत्रिकीकरणातून येणारा एकसुरीपणा, शास्त्रीय विचारांची कठोरता आणि कसोटी किंवा प्रयोगपद्धतीचे विचारवर्चस्व यांचा परिणाम पारंपरिक – भाषा, कला, साहित्य इत्यादी – विषयांची भक्ती करणाऱ्या अभिजनांवर होऊ लागला आणि त्यातूनच या वर्गात 'प्रणयवाद' किंवा 'रोमँटिसिझम' बळावू लागला. व्यक्तिकेंद्रित आणि मानवताकेंद्रित विचार हे या वर्गाच्या चिंतनाचे मुख्य विषय झाले. भाषेच्या बाबतीत ती मानवी जीवनाचा स्थायीभाव असून संपूर्ण मानवजातीत पसरण्याचे घटित भाषेला कसे साध्य झाले असेल या दृष्टीने विचार मांडले जाऊ लागले. विल्यम जोन्ससारख्या भाषातज्ज्ञांनी संस्कृत, ग्रीक आणि लॅटिन या अभिजात भाषांतली साम्यस्थळे दाखवून या सर्व भाषा एका अज्ञात भाषामूलातून निर्माण झालेल्या वृक्षाच्या शाखा आहेत हे मत हिरीरीने मांडले. हे मूळ नक्की कुठे होते आणि त्या मुळापासून या भाषांचा प्रसार आणि विस्तार कसा काय झाला या प्रश्नाचे उत्तर जोन्सने 'मानवकेंद्रित' पद्धतीने दिले – भाषा बोलतात ती माणसे जसजशी 'पसरत' गेली तसतश्या या भाषाही त्यांच्याबरोबर पसरल्या. पसरता पसरता हे मानवसमूह जिथे स्थायिक होत गेले तिथे, त्यांच्यात त्या काळात प्रचलित असलेल्या भाषेने आपली मुळे सोडली आणि एखाद्या वटवृक्षाप्रमाणे तिथे त्या भाषेची आधी शाखा, आणि मग वेगळे, पण जुन्या झाडाशी संलग्न असे झाड उभे राहिले, असे जोन्सचे प्रतिपादन. या प्रतिपादनामुळे भाषेची मानवी स्थलांतरासारख्या मानववंशकेंद्री विषयाशी सांगड घातली गेली, आणि त्यातूनच पुढे इतिहास आणि संस्कृती यांसारख्या विषयांत भाषिक साम्याचा 'पुरावा' देण्याची खोड बळावली. 'वंशा'सारखी जैविक बाब आणि आणि 'भाषे'सारखी सांस्कृतिक बाब यांचे एकमेकांवर रोपण झाले. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे 'आर्य वंश' ही कल्पना, जिच्यामुळे जोन्सनंतर दीडशे वर्षांनी युरोपात वंशसंहार झाला. भारतापुरते बोलायचे झाले तर आजही जोन्सच्या या वांशिक भुताने आपल्याला पूर्णपणे सोडले आहे असे दिसत नाही.

शब्दांचे मूळ आणि त्यातून डोकावणाऱ्या सांस्कृतिक जोडणीसारख्या बाबी, यातून एक 'संरचनावादी' पद्धत उभी राहत गेली. वेगवेगळ्या भाषांतल्या शब्दांचे तुलनात्मक 'अन्वय-साम्य' असले की त्या भाषिक संस्कृतींमध्येही देवाणघेवाण झाली असावी, त्यांच्यात परस्पर नातेसंबंध असावा आणि ते शाब्दिक अन्वय-साम्य हाच त्याचा पुरावा अशा प्रकारची ही ऐतिहासिक मांडणी होती. अलीकडच्या काळात पु. ना. ओकांनी या पद्धतीचा वापर करून 'भारतीय इतिहासातली खिंडारे' उघडकीला आणण्याचे महत्कार्य केले! लँकेशर म्हणजेच 'लंकेश्वर', व्हॅटिकन हा शब्द 'विठू-कान्ह'वरून आला, इटली देश म्हणजेच 'विठ्ठली' या आणि अशाच अनेक तऱ्हेवाईक व्युत्पत्ती त्यांनी मांडल्या आणि सगळ्याचे निष्कर्षमय फलित काय, तर जगभर हिंदू संस्कृती पसरलेली होती हे!

पु.ल. देशपांड्यांसारख्या विनोदकाराला या मांडणीने भरपूर खाद्य पुरवले. ऑस्ट्रिया उर्फ 'आस्त्रिया' शब्दाचे मूळ संस्कृत 'स्त्री' हा शब्द, आणि 'प्रशिया' उर्फ 'पुरुषीया' म्हणजे पुरुष हे कोणाचे तरी व्युत्पत्तिज्ञान ऐकून "म्हणूनच त्यांच्या आजूबाजूच्या लहान देशांना 'बालकन' म्हणतात" हा खास पुलं-धाटणीचा विनोद ओकांच्या विक्षिप्त व्युत्पत्ती-आधारित प्रमेयकल्पनांवरच आधारला आहे. "जादूगाराने हॅटमधून ससा काढावा तसे या शास्त्रातून काहीही काढता येते" अशी मल्लिनाथी पुलं करतात. पण वास्तविक पाहता या पद्धतीने उत्तर-एकोणिसाव्या आणि पूर्व-विसाव्या शतकातल्या अनेक संशोधकांना झपाटले होते. राजवाड्यांनी या पद्धतीचा वापर कित्येक ठिकाणी केला आणि त्यातून 'ट्रॅश' म्हणता येतील असे निष्कर्षही काढले. त्यांची तुलना अर्थातच ओकांच्या ट्रॅशशी करता येणार नाही. पण त्र्यं. शं. शेजवलकरांनी म्हटल्याप्रमाणे राजवाडे हे 'विकारी संशोधक' कशा प्रकारे होते हे समजून घेण्यासाठी या व्युत्पत्तीजन्य निष्कर्षांचा पुष्कळच उपयोग होतो. या 'विकारा'ची पूर्वपीठिका म्हणजे राजवाड्यांचा अहंमन्य स्वभाव आणि कडवी ब्राह्मणवादी आणि सनातन मनोवृत्ती. ओक आणि राजवाडे यांच्यात 'पद्धतिशास्त्रीय' साम्य म्हणावे तर ते हेच आहे की दोघांचेही निष्कर्ष त्यांच्या मनात आधीच काढून तयार असलेले आपल्याला स्पष्ट जाणवते. या निष्कर्षांच्या पाठराखणीसाठी मग ते व्युत्पत्तींच्या संरचनेची मांडणी करतात आणि त्यातून आपल्या निष्कर्षांना बळ पुरवतात. 'उपमान प्रमाणांवर कोणताही सिद्धांत रचू नये' असे आवर्जून सांगणाऱ्या राजवाड्यांचा हा विरोधाभास फार मजेदार वाटतो.

राजवाड्यांनी व्युत्पत्तीच्या आधारे कशा कोलांट्या मारल्या आहेत त्याचे उत्तम 'ट्रॅश' उदाहरण म्हणजे त्यांचे 'छत्रपति पदाविषयीचे काही शंकाकार' हा छोटा लेख. हा मुद्दामच इथे निवडला कारण बाकीचीही पुष्कळ उदाहरणे देता येतील पण विस्तारभयास्तव ती सोडून द्यावी लागतात. दुसरे कारण म्हणजे या लेखाच्या मुळाशी खरोखरच एक महत्त्वाचा ऐतिहासिक प्रश्न आहे – तो प्रश्न म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःला 'छत्रपति' ही पदवी नक्की कधीपासून वापरायला सुरुवात केली, हा होय. शिवाजी आणि महाराष्ट्रधर्म दोघांचेही राजवाडे हे जाज्वल्य अभिमानी आणि शिवाजी महाराजांना कायावाचामनेकरून महाराष्ट्रधर्माने प्रेरित करण्याचे काम समर्थ रामदासांनी केले या प्रमेयावर राजवाड्यांची नितांत श्रद्धा. पण या श्रद्धेत एक अडचण अशी येते की, महाराज आणि रामदास यांचा सर्वात पहिला थेट संबंध आल्याचे दर्शवणारी जी हकिकत आहे, त्यावरून असे प्रतीत होते की हा संबंध राज्याभिषेकाच्या म्हणजे १६७४ सालाच्या विशेष आधी आला नसावा. तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या चरित्रात अनेक मोठमोठ्या घडामोडी होऊन गेल्या होत्या. म्हणजे त्यांना त्यांचे राजकीय श्रेष्ठत्व ठसवण्यास रामदासांची तशी गरज पडलेली दिसत नाही. या सगळ्या घडामोडीनंतर रामदास स्वामींनी त्यांना 'प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे' अशा समाप्तीचे एक काव्यमय पत्र पाठवले आणि त्यानंतर महाराजांनी समर्थांचा परामर्श घेतला, आणि यातून त्या दोघांचे संबंध पुढे महाराजांच्या निधनापर्यंत चालू राहिले.

'छत्रपति' हे पद महाराजांनी राज्याभिषेकाच्या आधी वापरल्याची काही उदाहरणे दाखवता येतात पण त्यांचे ऐतिहासिक मूल्य अतिशय क्षीण आहे. तुकारामांच्या नावावर सांगितला जाणारा एक अभंग, एकदोन तुरळक महजरांतले उल्लेख (ज्यांचे अस्सलपण संशयास्पद आहे) अशा थोडक्या उदाहरणांपलीकडे हा उल्लेख जात नाही. याउलट राज्याभिषेकोत्तर काळात महाराज 'छत्रपति' हे पद त्यांच्या सरकारी कागदपत्रांत अधिकृतपणे लावताना दिसतात. या रिवाजाबरोबर सभासद बखरीतील "मऱ्हाठा राजा छत्रपति व्हावा ऐसे चित्तांत आणले", "मऱ्हाठा पातशहा येवढा छत्रपति जाला ही काही सामान्य गोष्ट जाली नाहीं" अशा उल्लेखांवरून राज्याभिषेकानंतरच छत्रपतिपद धारण केले गेले असे वाटते. पण अर्थातच राजवाड्यांना ही तथ्ये मान्य नव्हती, कारण शिवाजीचे राजकीय थोरपण त्यांना 'स्वयंभू' वाटत होते तेव्हा राज्याभिषेकासारख्या विधीची त्यासाठी आवश्यकता असावी असा त्यांच्या मनाचा कौल निश्चित नव्हता. राज्याभिषेकाच्या खटल्यामागे बाळाजी आवजी या कायस्थाचे वजन होते आणि त्यामुळे राजवाड्यांच्या मनातल्या ब्रह्मश्रेष्ठत्वालाही कुठेतरी छेद जात असल्यास न कळे! त्यांचे 'शंकाकार' (हे श्री. देऊसकर नामक एक गृहस्थ होते) ज्या काही शंका उपस्थित करत होते त्यांचा त्यांनी एक एक करून समाचार घेतला आहे.

राजवाड्यांच्या मते 'छत्रपति' ही प्राचीन उपाधी होती आणि त्यासाठी त्यांनी चिनी प्रवासी ह्श्वेनझान्गपर्यंतचे दाखले दिले आहेत. तुकारामाच्या अभंगात जो उल्लेख येतो तो त्यांना विश्वसनीय वाटत होता. तुकारामाच्या सल्ल्यावरून शिवाजी महाराज रामदासांकडे वळले, रामदास-शिवाजी भेट १६७४च्या पुष्कळच आधी झाली होती आणि त्यामुळे राज्याभिषेक आणि छत्रपतिपदाचा विशेष काही संबंध नाही, हे पद रामदास-तुकारामासारखे 'त्रिकालज्ञानी' लोक शिवाजी महाराजांना आधीपासूनच लावत होते, असे राजवाड्यांचे ठाम मत असलेले दिसते. पण त्याच्या सिद्धतेसाठी त्यांनी दोन षट्कार लगावले आहेत! एक म्हणजे रामदासांचे 'नरपती, हयपती, गजपती, गडपती' इत्यादी 'छत्रपती'ला साजेश्या उपाध्या असणारे प्रख्यात कवितापत्र – जे 'निश्चयाचा महामेरू' नावानेही प्रसिद्ध आहे – ते त्यांनी महाराजांना १६४९ सालीच पाठवले होते हे विधान! हे वर्ष जमेस धरल्यास तुकाराम-रामदास-शिवाजी हा त्रिकोण जमवणे साध्य होते हा त्याच्यामागचा उद्देश आहे. या विधानाला पुरावा काय, तर या काव्यात येणारा 'शिवकल्याण राजा' हा उल्लेख. याची फोड राजवाडे 'शिवाजी हा कल्याणचा राजा' अशी करतात – कारण १६४९ साली शिवाजीराजांनी कल्याण काबीज केले होते! दुसरा षट्कार म्हणजे खुद्द 'छत्रपति' या संज्ञेचा 'छत्र' या बाह्य अवडंबराशी काही संबंधच नाही हे विधान, आणि इथे त्यांनी हाती धरली आहे ती छत्रपति या संज्ञेची – अर्थातच त्यांनी उलगडून दाखवलेली – व्युत्पत्ती! राजवाड्यांच्या मते 'छत्रपति' हे अतिप्राचीन 'क्षत्र-पति' या शब्दाचे अपभ्रष्ट रूप आहे. 'क्षत्र' ही कल्पना वेद आणि अवेस्त्यासारख्या प्राचीन ग्रंथात येते आणि तिचा संबंध बलोपयोगी कर्तव्यपालनशी आहे – अर्थातच युद्धमन्य आणि 'योधाजीवी' असे जे 'क्षत्रिय' लोक हे 'क्षत्रा'शी संबंधित असतात. तेव्हा राजवाड्यांच्या मते 'छत्रपति' म्हणजे 'क्षत्र-पति' अर्थात क्षत्रियांचा प्रमुख. या वैचारिक कसरती करताना त्यांनी ग्रीक, प्राचीन इराणी, अपभ्रंश अशा अनेक भाषांतून व्युत्पत्तिशास्त्राचा वारेमाप आधार घेतला आहे. पण अर्थातच तो सगळा फोल असल्याचे कुठल्याही साक्षेपी वाचकांना अगदी उघड कळून येईल. शिवाजी महाराजांचे वडील आणि काका यांची शहाजी आणि शरीफजी ही नावे अहमदनगरच्या शाह-शरीफ पीराला केलेल्या नवसावरून दिलेली नव्हती हे सिद्ध करण्यासाठी राजवाड्यांनी अशाच व्युत्पत्तीजन्य कसरती केल्या आहेत. नहपान या पश्चिमी क्षत्रप राजाचे 'खखराट' हे कुलनाम चुकीचे वाचून (कारण ते वस्तुतः प्राकृतमध्ये 'खखरात' असे लिहिले आहे – त्यात 'ट' नसून 'त' हे अक्षर आहे) त्याची व्युत्पत्ती राजवाडे 'षाह्+राट' अशी लावतात आणि एक भलताच निष्कर्ष डोंगर तयार करतात. थोडक्यात, वरकरणी पद्धतिशास्त्राला अनुसरून, पण वास्तविक काढायचे निष्कर्ष आधीच मनात धरून राजवाड्यांनी हे जे काही ऐतिहासिक जादूकाम केले आहे ते आपल्या 'ट्रॅश'च्या व्याख्येत सहज सामावणारे आहे.

साधनवापराच्या चुकीचे 'ट्रॅश'

राजवाड्यांनी ऐतिहासिक साधने केवळ गोळाच केली असं नाही, तर त्यांचा वापर कसा करावा, त्या साधनातील तथ्ये कशी उलगडावीत, साधनांचे पुरावा म्हणून मूल्य कसे ओळखावे, त्याची श्रेणी कशी लावावी अशा मूलभूत बाबींविषयीही वेळोवेळी मते व्यक्त केली. समग्र राजवाडे वाङ्मयाच्या 'प्रस्तावना खंड'नामक खंडाला उपोद्घात लिहिताना सदानंद मोरे यांनी राजवाड्यांच्या 'इतिहास-दृष्टी'चा उत्तम आढावा घेतला आहे. त्यात राजवाड्यांचे विचारविश्व युरोपातल्या ऑग्युस्त कोम्त, लिओपोल्ड फॉन रांकं, हेगेल इत्यादी तत्त्वज्ञांच्या मांडणीने कसे प्रभावित झाले होते याबद्दल उत्तम माहिती मिळते. "गोष्टी खरोखर कशा होत्या / झाल्या" (how things actually were) हे मांडणे म्हणजे इतिहास अशी रांकंने इतिहासलेखनाची व्याख्या केली. मूळ जर्मन भाषेत हे तत्त्व कसे लिहिले जाते यावरून त्याचा अर्थ नक्की कसा लावावा याबद्दल इतिहास-भाष्यकारांत वेगवेगळी मते आहेत. पण रांकं हा 'एम्पीरिसिस्ट' म्हणजे तथ्यानुभववादी इतिहासकार होता – साधनांचे परिष्करण करून त्यातून दिसतो तितका आणि तितकाच घटनाप्रवाह 'इतिहास' म्हणवायला लायक असतो असे त्याचे मत होते. राजवाड्यांनी हेच तत्त्व पाळलेले दिसते. पण अनेकदा असेही होते की, त्यांनी स्वतःच जी पथ्ये या बाबतीत पाळायला हवीत असे म्हटले, त्यांचा त्यांनाच विसर पडलेला दिसतो. यामागेही अर्थातच त्यांचा 'आधी अनुमान - मग प्रमाण' असा उलट्या प्रकारे वाहणारा 'विकारी' प्रवाह कारणीभूत होता असे दिसते.

अशा कारणांमुळे राजवाड्यांचे ऐतिहासिक लेखक म्हणून भान सुटण्याचे आणि त्यातून 'ट्रॅश'निर्मिती होण्याचे चांगले उदाहरण म्हणजे ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर या अध्यात्मिक गुरूचे मराठ्यांच्या राजकारणात नक्की काय स्थान होते यावरून त्यांचा आणि मराठेशाहीचे दुसरे एक महत्त्वाचे इतिहासकार दत्तात्रय बळवंत पारसनीस याचा झालेला वाद. राजवाडे आणि पारसनीस यांच्या इतिहासकार म्हणून असलेल्या स्थानात मुळातच एक फरक असा होता की, पारसनीस हे 'एलीट', श्रीमंत आणि इंग्रजी नोकरशाहीला धार्जिणे असे गृहस्थ होते. त्यांना त्याबद्दल रावबहादुरीही मिळाली होती. राजवाड्यांची परिस्थिती याच्या नेमकी उलट – "इतिहास संशोधन करायचे तर ॐ भवति भिक्षांदेही या मंत्राला सतत स्मरावे आणि पैशाचा मोह सर्वथा टाळावा" हे त्यांचे तत्त्व. साधने शोधताना त्यांना यामुळे पुष्कळ हालअपेष्टा सहन कराव्या लागत. पारसनिसांच्या सत्ताधाऱ्यांशी जवळच्या असलेल्या स्थानामुळे त्यांना सरकारी साधने त्या मानाने सहज उपलब्ध होत. पेशवे आणि सातारकर राजांच्या रोजनिश्या प्रसिद्ध करण्याच्या कामात रावबहादूर गणेश चिमणाजी वाड यांच्याबरोबरच पारसनिसांचाही हात होता. सरकारकडून दप्तरे धुंडाळण्याची अधिकृत परवानगी मिळवून केले गेलेले असे हे पहिलेच साधन-प्रसिद्धीचे काम. अशा फरकामुळे पारसनिसांच्या बाबतीत राजवाड्यांच्या खांद्यावर आधीपासूनच एक प्रकारची chip असावी असे वाटते. त्यातून पारसनिसांनी अक्षम्य अपराध – अर्थात राजवाड्यांच्या मते – जो केला, तो असा की त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामींची तुलना थेट समर्थ रामदासांबरोबर केली! रामदास आणि शिवाजी या दोन गुरूशिष्यांत जसे नाते होते, तसे नाते ब्रह्मेंद्र आणि बाजीराव या गुरूशिष्यांत होते, आणि मराठी साम्राज्याचा आणि सांस्कृतिक आधिभौतिकतेचा जो फायदा रामदास-शिवाजी जोडगोळीमुळे झाला तसाच तो ब्रह्मेंद्र-बाजीराव जोडीमुळेही झाला असे पारसनिसांनी सूचित केले. वास्तविक पाहता ब्रह्मेंद्रस्वामींचे चरित्र पाहिले तर हा माणूस आजच्या परिभाषेत एक उत्तम 'फिक्सर' होता असे दिसते! शाहू छत्रपती, बाजीराव पेशवा, जंजिऱ्याचा सिद्दी, कान्होजी आंग्रे, श्रीपतराव प्रतिनिधी, बारामतीकर सावकार इत्यादी राजकारणी धेंडांशी त्याचे जवळचे संबंध होते. तो व्याजबट्ट्याचा धंदा करी. खुद्द पेशवे त्याचे मोठे ऋणको होते. "कर्जदारांच्या पायी पडून माझ्या कपाळाचे कातडे छिनले आहे" अशा काकळूत करणारे एक पत्र बाजीरावाने स्वामींना लिहिलेले प्रसिद्ध आहे. स्वामींचे उद्योग कान्होजी आंग्रेंसारखे बेरकी लोक उत्तम जाणून असत. "भटाला दिली वोसरी तो भट हातपाय पसरी" असे कान्होजीने छद्मीपणे स्वामीला लिहिले आहे!

तर अशा माणसाची तुलना खुद्द रामदासांशी झालेली पाहून राजवाडे भडकले. त्यांनी रामदास आणि ब्रह्मेंद्र यांच्यात काय फरक होते त्याची बारा कलमी यादी तयार करून ती पारसनिसांच्या तोंडावर मारली! ही पूर्ण यादी म्हणजे ऐतिहासिक 'ट्रॅश'चा उत्तम नमुना आहे. तिच्या शब्दा-शब्दातून राजवाड्यांचा संताप व्यक्त होतो. अनेकदा ते ब्रह्मेंद्रस्वामींचे कर्तृत्व कमीत कमी शब्दांत निकालात काढतात. रामदासांनी स्वधर्मप्रेरणेचे व्रत निर्माण करताना स्वतःचा पंथ काढला आणि जागोजागी मठपरंपरा निर्माण केली, याउलट "ब्रह्मेंद्राचा पंथही नाही आणि मठही नाही"; "रामदास हे मराठी सारस्वताचे उस्ताद आहेत" तर ब्रह्मेंद्राच्या नावावरचे एक अक्षरही कोणाला माहीत नाही; रामदासांचे चालणे-बोलणे ऋजू होते याउलट "ब्रह्मेंद्राला पुण्यातल्या काळूबोवासारखी अचकट-विचकट शिव्या द्यायची सवय होती". रामदासांची कौपिनधारी संन्यस्त मूर्ती सगळ्यांना परिचित आहे, पण ब्रह्मेंद्र "मलमली झगा आणि पुरभय्यी टोपी लेई" (ब्रह्मेंद्रस्वामींचे हे चित्र पारसनिसांच्याच चित्रसंग्रहात होते.) असे मुद्दे नोंदवत ही यादी पुढे जाते. पण या यादीतला सगळ्यात कहर भाग म्हणजे शेवटचे कलम – "रामदासाच्या शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली होती", उलटपक्षी "यवनी ठेवणारा बाजीराव ब्रह्मेंद्रचा पट्टशिष्य होता"!! ही यादी अनेकदा वाचली तरी या शेवटच्या कलमापर्यंत आल्यावर हसू आल्याखेरीज राहत नाही. साधनपरिष्करणाचा दुरुपयोग यात उघड आहे कारण 'शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली" या घटनेला बखरजन्य पुराव्याखेरीज इतर पुरावा नाही. राजवाड्यांनी स्वतःच बखरीतली वर्णने ही 'इतिहास' म्हणून घ्यायच्या लायकीची कशी नसतात यावर पुष्कळ ऊहापोह केला आहे. "अस्सल कागदाचे एक चिटोरे तमाम बखरीच्या प्रामाण्याला हाणून पाडायला पुरेसे आहे" हे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. बखरींमध्ये स्थलविपर्यास, कालविपर्यास आणि व्यक्तिविपर्यास हे मोठे दोष असून त्यामुळे ऐतिहासिक साधन म्हणून बखरींचे मूल्य शून्य नसले तरी पुष्कळच कमतर असते हे त्यांनीच लिहिले आहे. "शिवाजीने सुंदर यवनी मातुःश्री म्हणून परत पाठवली" ही उघड दंतकथा आहे. ही 'सुंदर यवनी' म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून होती आणि महाराजांनी कल्याण काबीज केले, ती त्यांच्या हाती सापडली तेव्हा "अशीच आमुची आई असती, वदले छत्रपती" म्हणून त्यांनी तिला साडीचोळीचे वाण देऊन परत पाठवले हा तपशील महाराष्ट्राच्या 'जनावकाशा'त (public sphere) सामावलेला आहे. पण त्याला काही ऐतिहासिक मूल्य देता येत नाही हे राजवाडे इथे पूर्णपणे विसरलेले दिसतात. कारण त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी पारसनीस हे ब्रह्मेंद्रस्वामींच्या श्रेष्ठत्वाच्या भ्रमाने ग्रासलेले कसे होते हे ठासून सांगायचे होते.

'आतिशायन'-जन्य ऐतिहासिक 'ट्रॅश'

इतिहास आणि कल्पित यांचे सांधे कुठे जुळतात आणि कुठे तुटतात याबद्दल इतिहासलेखकांना अतिशय संवेदनशील असणे आवश्यक आहे. भूतकाळ हा इतिहासाचा स्थायीभाव असल्याने अर्थातच त्याचे पूर्णपणे 'सत्य' असे वर्णन – कितीही इच्छा असली तरी – शक्य नसते. पुराव्यांनी दाखवून दिलेल्या दिशेने गेले तरी त्यात पुष्कळ 'गाळलेल्या जागा' असतात. जसजसे काळात मागे जावे तसतशा या जागा अधिकच गोचर होऊ लागतात. त्यामुळे या जागा भरायच्या झाल्या तर थोड्याफार प्रमाणात कल्पनाशक्तीवर अवलंबून राहणे इतिहासलेखकाला भाग असते. असा अवलंब करताना मूळ प्रमाणांच्या चौकटीचे भान ठेवून, तार्किकतेवर आणि अनुमानाच्या मांडणीवर भर देऊन त्या कल्पनेचे आपण प्रमाणाबाहेर उपयोजन तर करत नाही आहोत ना, हा विवेक इतिहासलेखकाने सतत बाळगणे आवश्यक असते. पुराव्यांच्या चौकटबद्धतेची नितांत आवश्यकता प्रतिपादन करणारा जो रांकं, त्याचे शिष्यत्व सांगणाऱ्या राजवाड्यांच्या बाबतीत तर हे अजूनच खरे असायला हवे होते. पण अनेकदा तसे झालेले दिसत नाही. विशेषतः काही काही विषयांबद्दल जेव्हा राजवाडे लिहितात तेव्हा ते कल्पनेच्या भराऱ्या मारत आहेत असे स्पष्टपणे जाणवते. हे विषय बहुतांशी माणसांचा वंश, जाती, अभिसरण, भाषा, संस्कृती यांच्याशी संबंधित आहेत आणि अनेकदा त्यांची पार्श्वभूमी म्हणजे अतिप्राचीन (राजवाड्यांचा लाडका शब्द 'आर्ष') असा काळ जे वैदिक वाङ्मय किंवा अवेस्त्यासारखे इतर भाषांतले प्राचीन ग्रंथ यांच्यातल्या उल्लेखांशी निगडित असतो. उपरोक्त उदाहरणांप्रमाणेच इथेही अनेक वेळा राजवाडे त्यांची मते आधीच घडवून बसले आहेत आणि त्या मतांच्या समर्थनार्थ 'कथिते' रचत आहेत हे स्पष्ट दिसते.

महाराष्ट्र आणि मराठे हा राजवाड्यांच्या अतीव अभिमानाचा विषय आणि त्यातही ब्राह्मणी, सनातनी विचारसरणीचे ते खंदे पुरस्कर्ते. त्यामुळे या विषयांची तोंडमिळवणी जिथे होते तिथे त्यांच्या कल्पनासृष्टीला अधिक बहर आलेला दिसतो. राजवाड्यांच्या काळात भारतीय पुरातत्त्वशास्त्र बाल्यावस्थेत होते. पण तरीही, हेनरी कझेन्स, जेम्स फर्गसन, जेम्स बर्जेस यांच्यासारखे पाश्चात्त्य, किंवा भाऊ दाजी, न्यायमूर्ती तेलंग, राजेंद्रलाल मित्र यांच्यासारखे भारतीय 'भारतविद्या अभ्यासक' प्राचीन भारतीय इतिहासाची भौतिक साधने – अभिलेख, पुरातत्व, नाणी इत्यादी – उजेडात आणत होतेच. इतिहासाच्या साहित्यिक साधनांबरोबरच याही साधनांचा विचार प्राचीन भारतीय इतिहासाचे कथानक घडवताना व्हिन्सेंट स्मिथ किंवा रा. गो. भांडारकरांसारखे संशोधक घेत होते. पण काही थोडे अपवाद वगळता राजवाड्यांचे लक्ष ह्या साधनांकडे वेधले गेलेले दिसत नाही. त्यामुळे अतिप्राचीन काळापासून 'महाराष्ट्राच्या वसाहती'सारख्या विस्तृत पटलाच्या विषयावर जेव्हा ते भाष्य करतात तेव्हा ते अनेकदा पूर्णपणे एकांगी आणि केवळ वाङ्मयीन साधनांचाच वापर करून केलेले होते. वाङ्मयीन तपशील, व्युत्पत्ती आणि त्यातून वरकरणी तर्कसुसंगत वाटणारा पण प्रत्यक्षात पोकळ असा विमर्श ते घडवतात. 'राधामाधवविलासचंपु' किंवा 'महिकावतीची बखर' या ग्रंथांना प्रस्तावना लिहिताना आणि 'महाराष्ट्राचा वसाहतकाळ' हा लेख लिहिताना त्यांनी हा दोनेक हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्राच्या वसाहतीचा जो पट निर्माण केला आहे तो या गुणांमुळे 'ट्रॅश' म्हणण्याच्या लायकीचा झाला आहे. हे लेखन करताना त्यांनी 'आतिशयन' म्हणजेच exaggeration या गुणाचा भरपूर वापर केलेला दिसतो. या लिखाणाच्या पार्श्वभूमीसाठी ज्यांना आता पूर्णपणे 'वासाहतिक' म्हणता येईल असे काही निष्कर्ष राजवाडे ग्राह्य मानतात. भारताच्या वसणुकीत 'उत्तर ते दक्षिण' असा 'सांस्कृतिक मार्ग' कार्यरत होता, 'आर्य' किंवा चातुर्वर्ण्य मानणारे लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकले, त्यांनी दक्षिणेच्या नाग, कातोडी वगैरे निकृष्ट जमातींना संस्कृतीचे धडे दिले, भाषेच्या आधारे दक्खनमधल्या जनसमूहांच्या हजारो वर्षांपूर्वी झालेल्या अभिसरणाचा माग आज लावता येतो, सत्ता कोणाची का असेना गावांत राहणाऱ्या लोकांना त्याचे काहीही पडलेले नसे, भारतीय समाज हा स्थितिप्रिय असून प्राचीन काळापासून त्याच्यात विशेष बदल असे काही झालेले नाहीत या आणि अशा अनेक कल्पना राजवाड्यांनी स्वीकारलेल्या दिसतात. त्यात 'आतिशायना'द्वारे ते स्वतःची भरही टाकतात. कोकणातले लोक आळशी आणि राजकीय बदलाबाबत उदास असे का याचे उत्तर तिथे 'अन्नधान्याची अतीव सुबत्ता होती' असे चमत्कृतिजन्य त्यांनी दिले आहे! महाराष्ट्राची वसाहत 'राष्ट्रिक', 'वैराष्ट्रीक' आणि 'महाराष्ट्रिक' अशा तीन उत्तर जनसमूहांनी – ज्यांचे मूलस्थान हिमालयाच्या पलीकडे होते – उत्तरेकडून दक्षिणेत येऊन केली असे त्यांचे मत आहे. हे लोक कोण, कुठून आले, कुठली भाषा आणि कशी बोलत असत, वगैरे बाबींना त्यांनी जे पुरावे दिले आहेत ते व्युत्पत्ती आणि तपशीलजन्य 'आतिशयना'चा उत्तम नमुना आहेत. हे लोक उत्तर भारतातून दक्षिणेत मुळात आलेच का याचे उत्तर त्यांनी कसबी कल्पितसाहित्यकारासारखी भाषा वापरून दिले आहे – "… जैनबौद्धांच्या करामतीने व सनातनधर्मी आणि पाखंडी यांच्यामधील यादवीने धार्मिक, राजकीय व सामाजिक असा भयंकर उत्पात सुरु होऊन देशांत अस्वास्थ्य माजले. ब्राह्मणांचे पुढारपण सावित्रीपतित व्रात्य कबूल करीतनासे झाले आणि शुद्ध क्षत्रियांचा हुकूम धर्मलंड शूद्र मानीतनासे झाले, आर्यस्त्रिया शूद्रस्त्रियांच्या पंगतीला जाऊन बसल्या आणि बिडालवृत्तीने संन्याशांचे सोंग घेतले… अश्या अराजक, अधार्मिक व असत्य राज्यात व राष्ट्रात राहण्यात शोभा नाही हे उत्कटत्वाने ज्यांच्या प्रत्ययास आले अशा नर्मदोत्तरप्रदेशांतील अनेक चातुर्वर्णीकांनी दक्षिणारण्यात वसाहती करण्याच्या मिषाने देशांतर केले". या लिखाणाला 'पुरावा' म्हणाल तर थोडाबहुत पुराणांत सापडतो. पण त्या पुराव्याच्या क्षीण आधारावर राजवाड्यांनी हे आणि अशाच प्रकारचे जे अवडंबर प्रवाही आणि अभिनिवेशयुक्त भाषेने रचले आहे त्याला खरोखरच तोड नाही! पण दुर्दैवाने अशा प्रणयवादी आणि अनेक प्रकारे अतिरंजित लिखाणाची खोड महाराष्ट्र्रातल्या अनेक भाष्यकारांना जडली. कॉ. शरद पाटील यांनी केलेले प्राचीन गणव्यवस्थेबाबतचे लिखाण हा त्याचा अलीकडचा नमुना.

याच अतिशयित विचाराचा धागा पुढे अपरंपार ओढून घेताना राजवाड्यांनी त्यांच्या लेखनातला सर्वोत्कृष्ट 'ट्रॅश' लिहिला आहे. स्थितिप्रिय आणि उदासीन अशा समाजावर वर्चस्व गाजवणे हे कुठल्याही राज्यकर्त्यांना सहज शक्य असे आणि प्रत्यक्ष सत्तांतर होताना या उदासीन जनसमूहाचा त्यात काहीएक हात नसे; मुख्य राजा आणि त्याच्या आजूबाजूचे शेपाचशे सरदार, यांना कंठस्नान घातले की नवीन राजा सहजपणे या राजकीयदृष्ट्या उदासीन लोकांवर आपली सत्ता बसवू शके, हे प्रमेय राजवाड्यांनी मांडले. या प्रमेयाची पाठराखण करताना त्यांनी एक अचाट कथानक रंगवले आहे. उपरोक्त स्थिती राज्यकर्ता वर्ग उत्तमपणे जाणून असे म्हणूनच राजेलोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी सदा उत्सुक असत. असे एकमेकांवर सतत टपलेले दोन राजे म्हणजे औरंगजेब आणि शिवाजी. पैकी शिवाजी म्हणजे राजवाड्यांच्या भक्तीचा विषय – तेव्हा त्यांनी त्यांच्या डोक्यात एक महान कल्पना पेरली! औरंगजेबाचा काही ना काही मार्गाने खून केल्याशिवाय 'दिल्लींद्रपद लिप्सवः' हे शिवाजीराजांचे ध्येय साध्य होणार नव्हते, आणि म्हणूनच त्याला सामोरे जाण्याचा मार्ग ते शोधत होते. ही संधी त्यांना पुरंदरच्या तहाने साध्य झाली. त्या तहाप्रमाणे जयसिंगाने महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीस जावयाची अट घातली. त्याप्रमाणे 'अगदी गाय होऊन' बादशाहपुढे हात बांधून यायला शिवाजीराजे तयार झाले. आग्र्याच्या दरबारात पोचल्यावर "प्रथम भेटीच्या प्रसंगी कुरनीस करण्याच्या वेळी पातशाहाची आणि आपली जी लगट होईल त्या लगटीत सिंहासनावर उडी मारून पातशाहाचा निकाल लावावा आणि दरबारांत जमा झालेल्या उमरावांची कत्तल करून तेथल्या तेथे हिंदुपदपातशाहीची स्थापना करावी, असा शिवाजीचा बूट होता". हे गुपित राजवाड्यांना महाराजांनी कुठून सांगितले आणि कसे, ते राजवाडेच जाणोत! आणि हे इथेच संपत नाही. हा प्रकार साध्य झाला नाही कारण "शिवाजीचे बारसे जेवलेल्या औरंगजेबाला त्याचे दैव थोर म्हणून दरबारात शिवाजी आपल्यापासून शंभर हात दूर उभे करण्याची बुद्धी आयत्या वेळी झाली म्हणून निभावले; नाही पक्षीं चकत्यांच्या पातशाहीचा रामबोलो त्याच समयी होण्याचा प्रसंग बहुतेक ठेपल्यासारखाच होता". यावर आणखी काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही, इतका हा 'आतिशयन'-ग्रस्त 'ट्रॅश' बोलका आहे. साधनांच्या प्रमाणावर अतोनात भर ठेवणारे आणि तो दिला नाही म्हणून इतर इतिहास-अभ्यासकांना आपल्या बोचऱ्या लेखणीने फटकारणारे राजवाडे स्वतःच कल्पनेच्या अशा भन्नाट भराऱ्या मारू लागतात तेव्हा आश्चर्याखेरीज अन्य भावना मनी येत नाहीत. हा पूर्ण प्रसंग त्यांनी ज्या ताकदीने वर्णन केला आहे ('महिकावतीची बखर'च्या प्रस्तावनेत) ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. इथे सर्व तपशील विस्तारभयास्तव अर्थातच देता येत नाहीत. इतका प्रचंड आत्मविश्वास क्वचितच एखाद्याच्या ठायी दृष्टीस पडतो.

उपसंहार

ऐतिहासिक 'ट्रॅश' म्हणजे काय याची एक व्याख्या करून त्या व्याख्येअंतर्गत राजवाड्यांच्या लेखनाचा हा आढावा मांडलेला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे राजवाड्यांचा अधिक्षेप करण्याचा हेतू नाही, तर 'ट्रॅश' इतिहास कसा ओळखावा याची काही मानके आणि उदाहरणे देण्याचा आहे. राजवाड्यांचे लिखाण हे त्यासाठी उत्तम वाहन ठरते. एक तर त्यांनी पुष्कळ लिहिले आहे हे त्यांच्या निवडीमागचे एक कारण आणि त्यांचे लिखाण हा पुढच्या अनेक लेखकांसाठी मानदंड झाला हे दुसरे कारण. दुर्दैवाने त्यांचा कित्ता 'ट्रॅश'च्या बाबतीत गिरवणारे अन्य लेखकही तयार झाले पण राजवाड्यांची प्रतिभा आणि इतिहाससंग्रहासाठी आयुष्य झोकून देण्याची वृत्ती अर्थातच त्यांच्याकडे नव्हती. राजवाड्यांनी जरी वेगवेगळ्या लोकांच्या विरुद्ध लिहिले, प्रसंगी अत्यंत जहाल आणि ताशेरे ओढणारे लिहिले तरी त्याचा परिणाम त्यांनी त्यांच्या वैयक्तिक नात्यांवर होऊ दिला नाही. ज्या पारसनीसांवर त्यांनी ब्रह्मेंद्र-प्रकरणी हल्ला चढवला त्यांच्याबरोबर दर दिवसाला एक पत्र लिहिण्याइतका त्यांचा बौद्धिक व्यवहार होता. कायस्थ प्रभूंवर राजवाड्यांनी सोडलेले वाग्बाण सहन न होऊन केशव सीताराम ठाकरे ('प्रबोधनकार') यांनी त्यांचा चोख प्रतिवाद केला. त्यानंतर त्यांच्या इतिहासविषयक लिखाणाचे राजवाड्यांनी कौतुक केल्याचे त्यांनीच नोंदवले आहे. आजच्या ध्रुवीकृत जगात आपण इतके जरी लक्षात ठेवले तरी पुरे आहे!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

संपूर्ण लेख अत्यंत मननीय आहे. इतिहासाबद्दल एकांगी आणि ठाम मते असलेली अनेक माणसे आपल्या मराठी समाजातही आहेत. दोन्ही बाजुचे अतिरेकी विचार हे चुकीचेच असतात. फक्त पुराव्यावरच विश्वास ठेवून लिहिलेल्या वस्तुनिष्ठ इतिहासावरच विश्वास ठेवणे योग्य असते.
अशाच प्रकारची वृत्ती अनेकदा शास्त्रज्ञांमध्येही दिसते. आपली आवडती थिअरी शास्त्रमान्य व्हावी यासाठी तशाच पुराव्यांची मांडणी करुन प्रतिष्ठित जर्नल्समध्ये पेपर छापला जातो. यथावकाश कोणीतरी तो खोडून काढेपर्यंत तोच ग्राह्य धरला जातो
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0