प्रवासनोंदी : (काही) पोलिश अनुभव

काही वर्षांपूर्वी ( बहुधा २०१५/१६)हा लेख टाईप करून ठेवला होता. नंतर विसरून गेलो. आज सापडला तर सहज डकवतो आहे ( २०२३)

पृथ्वी नावाच्या भटक्या ग्रहावर गेली लाखो वर्षे वस्ती करून असलेल्या मनुष्यप्राण्यामध्ये स्थिर आणि भटकी अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात. काहीजण आपलं गाव , शहर , कुटुंब सोडून फारसे कुठे बाहेर जात नाहीत , तर काही लोकांच्या पायाला भिंगरी लागलेली असते. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत आज प्रवासाच्या खूपच संधी उपलब्ध आहेत आणि दिवसेंदिवस प्रवास करणाऱ्यांची आणि त्यातही वेगळ्या वाटा चोखाळून पाहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे असं चित्र दिसत आहे. आजच्या प्रवास करणाऱ्यांमध्ये सुद्धा नेहमीच्या ठिकाणांपेक्षा नवी आजवर अज्ञात असलेली ठिकाणे पाहण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. आज मी आपल्याला बऱ्यापैकी अज्ञात असलेल्या पोलंड देशाविषयी आणि माझ्या काही प्रवासी अनुभवांविषयी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

उत्तर :
पोलंड देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्रापेक्षा किंचित मोठा आहे. याची भौगोलिक वैशिष्ट्ये म्हणजे उत्तरेला असलेला साधारण ४५० किमीचा बाल्टिक समुद्र किनारा. बाल्टिक समुद्र हा इतर समुद्राच्या तुलनेत ‘जवान’ समुद्र आहे , हा फारसा खोल नाही - याची सर्वसाधारण खोली आहे ५२ मीटर ( स्वीडिश बाजूला सर्वात खोल म्हणजे ४५९ मीटर ) आणि याचं पाणी देखील फार खारट नाही परंतु खूप थंड आहे. उन्हाळ्याच्या काळात देखील दिवसा याचं तापमान १५ ते १७ सेंटीग्रेड असतं. तरीही अनेक लोक आणि विशेषतः मुले या समुद्रात मनसोक्त पोहताना दिसतात. बाल्टिक समुद्राला काहीजण मोठं सरोवर असं देखील म्हणतात. समुद्रावर सुट्टी घालवणे हा सर्वसाधारण पोलिश ( आणि एकूणच युरोपियन ) लोकांचा अत्यंत आवडता छंद आहे. इथले समुद्र किनारे स्वच्छ आहेत आणि सुट्टीच्या गर्दीच्या काळात पोहणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी लाईफ गार्डची एक खास टीमदेखील जय्यत तयार असते. समुद्राच्या पाण्याच्या तापमानाची, एकूण वातावरणाची, धोक्यांची लाईव्ह माहिती देणे, धोक्याच्या लाईनच्या पुढे जाऊन पोहणाऱ्यांना बोटीने पुन्हा आणणे अशी अनेक कामे ही तरुण लोकांची टीम उत्साहाने करीत असते. यासाठी या तरुण लोकांना पैसे देखील मिळतात. मी अनेक वेळा कोकणात सुट्टी घालवली आहे आणि समुद्रात पोहायला सुद्धा गेलो आहे. आपल्या देशाला जवळजवळ ७५०० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या देशात अनेक सुंदर बीचेस आहेत परंतु तिथे कोणत्याच प्रकारची व्यवस्था नाही आणि आपण रोजगाराच्या , पर्यटनाच्या संधी देखील निर्माण करीत नाही ही फार खेदाची गोष्ट आहे. पोलिश समुद्र किनाऱ्यावर काही महत्वाची शहरे आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे: म्येन्झझ्द्रोये , सोपोत-गडांस्क-गदिनिया ही तीन संयुक्त शहरे, कोऊओबजेग. या शहरांमधले किनारे हे सुट्टीच्या म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात बऱ्यापैकी गजबजलेले असतात परंतु याबरोबरच किनाऱ्यांवर अनेक छोटी छोटी गावे विखुरलेली आहेत. इथे तुलनेने कमी गर्दी असते आणि राहण्याची व्यवस्था देखील बऱ्यापैकी स्वस्त असू शकते. कोऊओबजेग शहरात आमची एक शेजारीण , मैत्रीण माग्दा राहते. तिच्या जुन्या घरी आमची राहण्याची व्यवस्था कमी खर्चात झाल्यामुळे आम्ही २-३ वेळा कोऊओबजेग ला जाऊन आलो. समुद्र असल्याने अर्थातच इथे काही जुनी लाईट हाउसेस अर्थात दीपस्तंभ आहेत. त्यातलं गौंस्की या गावातलं लाईट हाऊस पाहायला आम्हाला फार मजा आली होती. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १०० मीटर अंतरावर हा एकोणिसाव्या शतकातला दीपस्तंभ दिमाखात उभा आहे. सॅन १८७६ मध्ये याचं बांधकाम सुरु झालं आणि दोन वर्षे चाललं. ४१. २ मीटर उंचीचा हा दीपस्तंभ म्हणजे पक्क्या विटांचे अत्यंत आकर्षक बांधकाम आहे. अर्थातच पूर्वी यामध्ये केरोसीनचा दिवा असे. १९२७ साली त्या ठिकाणी विजेचा दिवा आला. आज नवीन काळातील तंत्रज्ञानानुसार इथल्या दिव्याची रेंज जवळजवळ ४४ किमी इतकी आहे. या दीपस्तंभाच्या एकदम वरच्या मजल्यावर जाता येऊ शकते आणि मुलांसाठी हा एकदम खास अनुभव होऊ शकतो. आम्ही सहकुटुंब ही सहल केल्याने आमच्या मुलांना या निमित्ताने दीपस्तंभ , त्याचं महत्व , त्याचं काम याबद्दल पुष्कळ माहिती झाली. सोबत काही फोटो जोडतो आहे. Lighthouse Gąski

दक्षिण :

पोलंडच्या उत्तरेला समुद्र आहे तर दक्षिण भाग हा पहाडी आहे. इथे कार्पाथियन पहाडांची शृंखला आहे. दक्षिण सीमेवर चेक आणि स्लोव्हाकिया ( १९९० पर्यंत हा भाग एक संपूर्ण देश अर्थात चेकोस्लोव्हाकिया होता हे आपल्याला माहित आहेच). दक्षिण पोलंडमधील काही महत्वाची शहरे म्हणजे : क्राकाउ , चेनस्तोखोवा , काटोवितसे , झेषुव, व्रोत्सुआफ. यातलं व्रोत्सुआफ हे शहर आम्हाला बऱ्यापैकी जवळ असल्याने तिथे आम्ही काही वेळा जाऊन आलो आहोत. व्रोत्सुआफ शहरातील प्रमुख आकर्षणे; अर्थात मुलांच्या दृष्टीने पाहता; हायड्रोपोलीस संस्था , जुन्या शहरातला उंचचउंच असा ऑबसेर्व्हशन टॉवर, आणि संपूर्ण शहरभर विखुरलेले क्रासनाल अर्थात बुटके.

हायड्रोपोलीस : हायड्रो म्हणजे प्राचीन ग्रीक भाषेत -पाणी. हायड्रोपोलीस हे पोलंड मधील एकमेव “वॉटर नॉलेज सेंटर” आहे. जगभरात अशा प्रकारची पाण्याबद्दलची शास्त्रीय माहिती देणारी जी खूप कमी सेंटर्स आहेत त्यात हायड्रोपोलीस येते. व्रोत्सुआफ शहरात मध्यभागी हे सेंटर आहे. २०११ पर्यंत इथे एक जुना म्हणजे १९व्या शतकातील भूमिगत पाण्याचा टॅंक होता; याचं क्षेत्रफळ ४००० स्क्वेमी आहे. त्यामध्ये बदल करून आता हायड्रोपोलीसची निर्मिती करण्यात आली आहे. डिसेम्बर २०१५ पासून हे सेंटर सर्व लोकांसाठी खुलं करण्यात आलं. इमारतीच्या प्रवेशद्वारापाशीच ४० मीटर पेक्षाही लांब असा पाण्याचा पडदा आहे, हा पडदा प्रोग्रामिंगने नियंत्रित केला जातो आणि यावर काही नक्षी तसेच हायड्रोपोलीस अशी अक्षरेही उमटतात. लहान मुलांसाठी हे खास आकर्षण आहे. आत जाताच ६५ मीटर लांबीच्या पडद्यावर ३D फिल्ममधून पाण्याची आणि पाण्याच्या ग्रहाची कहाणी दाखवली जाते. यातून पृथ्वीचं एकमेवत्व आणि पाण्याचं , त्याच्या संवर्धनाचं महत्व सर्वांच्याच मनावर ठसतं. नंतरच्या विभागात खोल समुद्रातील जगाची, तिथल्या प्राणिजगताची , माशांची जवळून ओळख होते. इथली इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स तुम्हाला कितीही वेळ पाहता येतात आणि मनसोक्त माहिती घेता येते, तसेच खोल पाण्यातल्या फोटोग्राफीचा आस्वाद घेता येतो. नंतरच्या विभागात पाण्यात बुडालेल्या अनेक जहाजांच्या कहाण्या , त्यांचे फोटो, त्यांचा इतिहास आदी गोष्टींची सविस्तर माहिती घेता येते. नंतर एका मोठ्या विभागामध्ये वॉटर इंजिनिअरिंग अर्थात पाटबंधारे , वेस्ट वॉटर मॅनेजमेंट याविषयी अत्यंत सविस्तर माहिती मोठ्या इंटरॅक्टिव्ह पॅनल मधून सांगितली जाते, यात खुद्द व्रोत्सुआफ शहराच्या पाणीवाटप मॉडेलचा ही अंतर्भाव होतो. मुलांसाठी काही प्ले झोन्स आहेत आणि मोठ्यांसाठी एक कृत्रिम जंगल म्हणजे एक रिलॅक्सेशन झोन. हायड्रोपोलीस मध्ये एकदा आम्ही गेलो की आमची मुलं पाच तास बाहेर येणारच नाहीत याची आम्हाला खात्री असते.

व्रोत्सुआफचे बुटके : बुटके अर्थात पोलिश भाषेत क्रासनाल किंवा इंग्रजी मध्ये ड्वार्फ! या बुटक्यांचा इतिहास प्राचीन रोम पर्यंत जातो. बागेमध्ये शोभेच्या वस्तू, शकुनाच्या वस्तू म्हणून असे दगडी बुटके ठेवण्याची ही जुनी रोमन प्रथा १७ व्या शतकाच्या सुरुवातीला झपाट्याने इंग्लंड , जर्मनी देशांत पसरली आणि हळू हळू इथलीच होऊन गेली. आधी हे बुटके जास्तकरून घरे सुशोभित करत असत. या बुटक्यांना मग साहित्यातदेखील काहीएक स्थान मिळाल्याचं दिसतं. जेम्स स्टीफन्स याच्या १९१२ मध्ये प्रकाशित झालेल्या “क्रोक ऑफ गोल्ड” चं जीए कुलकर्णी यांनी “सोन्याचे मडके” नावाने जे भाषांतर प्रकाशित केलं आहे, त्याची कहाणी या बुटक्यांभोवतीच फिरते. व्रोत्सुआफ मध्ये ८०च्या दशकात कम्युनिझमला विरोध म्हणून या बुटक्यांची इमेज वापरली गेली. याची सुरुवात एका छोट्या स्केच किंवा ग्राफिटी ने झाली ( फोटो पहावा ). याला अँटी ऑरेंज मुव्हमेंट म्हणतात. ३० आणि ३१ ऑगस्ट १९८२ मध्ये पहिल्या दोन बुटक्यांची चित्रे/ग्राफिटी तयार झाली आणि पुढच्या एका वर्षातच यांची संख्या हजारावर गेली. हे बुटके एका सामाजिक-राजकीय विद्रोहाचे प्रतीक आहेत. सन २००१ मध्ये या घटनेचं स्मरण करण्यासाठी म्हणून 'पापा क्रासनाल’ ची पहिली ब्रॉन्झ मूर्ती बनवली गेली. यानंतर आजपर्यंत नवे नवे बुटके शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बनवले गेले आणि आज त्यांची संख्या ३०० पेक्षाही जास्त आहे. आज हे बुटके पाहायला जगभरातील लोक येतात. आपल्याला यांचा एक नकाशा सुद्धा मिळतो. बुटके शोधण्याच्या निमित्ताने मुलांना पायी शहरात भटकंती करता येते. पुन्हा या बुटक्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जीवनातल्या अनेक दररोजच्या कामांना, पेशांना दाखवणाऱ्या या मूर्ती त्या त्या ठिकाणी आहेत. उदा : नॅशनल फिलहार्मोनिक म्हणजे प्रचंड मोठ्या कन्सर्ट हॉलसमोरच एक बुटक्यांचा ऑर्केस्ट्रावृंद आहे , तसेच एका ग्रंथालयासमोर वाचनमग्न असा बुटका आहे, जुन्या जेलच्या खिडकीत एक अडकलेला कैदी बुटका दिसतो. अशा रीतीने ही मूळची सामाजिक-राजकीय विद्रोहाची कल्पना आज शहर सुशोभीकरण आणि पर्यटन आकर्षण म्हणून व्रोत्सुआफ शहर फार क्रिएटिव्हली वापरते आहे.

Filharmonic Gnomes

नॅशनल फिलहार्मोनिक ( अर्थात मोठा कन्सर्ट हॉल ) च्या समोर बुटक्यांचा ऑर्केस्ट्रावृंद!

मोटारसायकल प्रवासाचा आनंद घेणारा बुटका !Wrocław Gnomes

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चित्रांच्या लिंक्स राहिल्या आहेत.
बुटके म्हणजे तीन फुटी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे पोलंडविषयक लेख आणि अनुभव हे बहुधा एकमेवाद्वितीय आहेत (मराठी माणूस + पोलिश अनुभव + ऐसीवर लिखाण)
---
बुटके म्हणजे garden gnomes ना? फोटो दिसत नाहीत पण त्यामुळे शेवटल्या पाच ओळींची आपसूक एक कविता होऊन गेलीये Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप प्रयत्न करूनही मला माझे फोटो डकवता आले नाहीत Sad त्यामुळे बाहेरच्या लिंक्स दिल्या आहेत. बुटके म्हणजे garden gnome ! बरोबर ! काहीच वर्षांपूर्वी हरिवंशराय बच्चन या हिंदी कवितेत एक विशिष्ट उंची गाठलेल्या मोठ्या कवीचा देखील ग्नोम इथे झालेला आहे म्हणजे बघा ! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

नॅशनल फिलहार्मोनिक ( अर्थात मोठा कन्सर्ट हॉल ) च्या समोर बुटक्यांचा ऑर्केस्ट्रावृंद!

http://marzapol.pl/wp-content/uploads/krasnale-filharmonii-wroclaw-768x313.jpg

मोटारसायकल प्रवासाचा आनंद घेणारा बुटका !
Wrocław Gnomes

कसे आणायचे - ते पेज उघडल्यावर
१)इमेज वर क्लिक करून 'open in new tab ' करायचे.
२) नवीन tab मध्ये फक्त चित्र दिसते म्हणजे address bar मध्ये आलेली लिंक ही आपल्याला हवी असलेली direct image link आहे. ती इकडे वापरायची.
३)तरीही चित्र कापलेले दिसले तर
width="100%" किंवा width="80%" हे चित्र आडवे /उभे आहे ते समजून जोडायचे.

नोंद
पहिल्या चित्रांची लिंक साइट सिक्युअर नाही त्यामुळे ते डकवता येत नाही. लिंक दिली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ! लेखात मला माझ्या कम्प्युटरवरून फोटो अपलोड करायचे होते. पण त्यासाठीची नुसती इन्सर्ट इमेज वाली सोय नाही बहुतेक Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

ते इतर इमेज शेअरिंग साइटसवर अपलोड करून लिंक मिळवून इथे आणता येतात. (गूगल फोटोज् शिवाय imgur, postimagesवगैरे options आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज हे बुटके पाहायला जगभरातील लोक येतात. आपल्याला यांचा एक नकाशा सुद्धा मिळतो.
मानवजातीचे खरं म्युझियम? अंदमानमध्ये आदिवासी दाखवण्याचं आता बंद केलंय असं ऐकलं.
सर्कशितल्या काम करणाऱ्या बुटक्यांना ' midget ' म्हणतात, 'dwarf' म्हणत नाहीत. त्यातला कोणता शब्द कमी लेखणारा?

यावरून आठवलं की डहाणू भागात एक बुटकी आदिवासी जमात आहे. त्यातला एक शाळेतल्या वर्गमित्राच्या ( चुरी नाव)घरी कामाला होता. त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा कळलं की त्यांना बोलायला गप्पा मारायला आवडतं. शिकार,लग्न हे आवडते विषय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" यावरून आठवलं की डहाणू भागात एक बुटकी आदिवासी जमात आहे. त्यातला एक शाळेतल्या वर्गमित्राच्या ( चुरी नाव)घरी कामाला होता. त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा कळलं की त्यांना बोलायला गप्पा मारायला आवडतं. शिकार,लग्न हे आवडते विषय"- आयला भारी आणि इंटरेस्टिंग ! माझ्या वरच्या खुलाशामुळे तुमच्या लक्षात आलं असेल, की हे बुटके म्हणजे ग्नोम आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

हे बुटके स्वतःला बुटके समजत नाहीत आणि आनंदी असतात,हसतात खूप. चित्रातले बुटके पाहून ते snow white and seven dwarfs मधले आठवले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाच कीलबासांची किंमत किती झ्लोटी?

(हे उगाच!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किमती आता वाढल्या आहेत Sad किएउबासा मी खात नसल्याने माहित नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

(आमच्या वार्ताहराकडून.)

कीलबासाचा (किएउबासा?) भाव प्रत्येकी दहा झ्लोटी (पावासकट). (गेला बाजार, क्राकाउमध्ये तरी. टू बी मोअर स्पेसिफिक, क्राकाउमधील एका विशिष्ट रस्त्याशेजारी उभ्या केलेल्या विशिष्ट मोटारीतील कीलबासा-स्टँडवर.) म्हणजे, त्या हिशेबाने, पाच कीलबासांची किंमत साधारणतः पन्नास झ्लोटी मानायला हरकत नसावी. (चूभूद्याघ्या.)

(अवांतर: एक झ्लोटी म्हणजे साधारणतः एक यूएस चवन्नी. किंवा, सुमारे वीस भारतीय रुपये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पोलिश भाषेत, एलवर आडवी रेघ असेल तर त्याचा उच्चार व होतो. झुवोती, किंवा झ्वोती. झ्लोटी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Kielbasa Stand Krakow

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील हिशेबाने, (रस्त्यावरचे) एक (पावासहित) किएउबासा (आमच्या अमेरिकेतल्या हॉटडॉगच्या समतुल्य?) बोले तो सुमारे अडीच डॉलर…

नाही म्हणजे, किमती पूर्वीच्या मानाने वाढल्या असतीलही कदाचित. (पूर्वी काय किमती होत्या, मला कल्पना नाही. तसेही, कोव्हिडनंतर मला वाटते जगात सगळीकडेच किमती वाढल्या – सप्लाय चेन इश्यूज़, वगैरे (चूभूद्याघ्या.)) परंतु… पोलंड खाण्यापिण्याच्या बाबतीत एकंदरीतच (आमच्या यूएसएच्या तुलनेत) स्वस्त आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(निदान, महाग तरी नाही...)