चांद्रयान मोहीम, उत्सवी जनमानस आणि विज्ञान विषयक चळवळ

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर एकूणातच समाज माध्यमातून, वृत्तवाहिन्यातून आणि वर्तमान पत्रात जो काही न भूतो न भविष्यति असा बातम्यांचा, माहितीचा आणि शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक वगैरेंचा प्रेरणादायी प्रवासाचा जो महापूर आला आहे तो नक्कीच सुखावह आहे. फक्त अतिरेकी प्रसार आणि प्रचार टाळावा. कारण मोहिमेतील एखाद्या इस्रोच्या शास्त्रज्ञाचा भव्य रोड शो, क्रेनवरुन भलेमोठे हार घालून जंगी मिरवणूक वगैरे बद्दल अजून वाचनात आले नाही. (शास्त्रज्ञांची जातपातधर्म मीमांसा झाल्यावर असे बाष्कळ प्रकार होतीलच) मोहीमेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निगडित असलेल्या लोकांबद्दल भरपूर छापलं जातंय. सर्वसामान्य जनतेला समजण्यासाठी अशा गोष्टींचा प्रचार प्रसार व्हावा. त्यामुळे शिक्षण, संशोधन क्षेत्रातील अनेक पर्याय उपलब्ध होतात.

एखाद्या यशस्वी मोहिमेमुळे जर देशात विज्ञान विषयक जनजागृती वाढत असेल तर स्वागतार्ह. सामाजिक राजकीय चळवळी या देशात खूप झाल्या. तशी विज्ञानाच्या बाबतीत चळवळ सार्वजनिक जीवनात खूप फोफावली नाही. जनमानसात रुजलेली नाही. ही एक खूप मोठी संधी आहे. विज्ञानविषयक संस्था, संशोधन केंद्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध विद्यापीठे आणि त्यांच्या अभ्यासक्रमाची जनमानसात बरीच चर्चा होत आहे. ह्याची गरज होतीच. फक्त चांद्रयान मोहीम हा एक ट्रीगर पॉइंट ठरला. (याबरोबरच विरोध, टिका करणारे, श्रेय अपश्रेयाबद्दल खिल्ली उडवणारे आणि त्रोटक माहितीवर टेंभा मिरवणाऱ्या लोकांना पण वेगळा मुद्दा मिळाला.) ही चळवळ आणि उत्सुकतेचा पिंड भरकटू नये हीच इच्छा. प्रचार आणि प्रसार यांना योग्य दिशा मिळाली नाही की‌ संधीसाधू लोकांचं फावतं. मग याच हर्षोल्हासित लोकसहभागाचं आणि लोकांच्या औत्सुक्याचा फायदा घेण्यासाठी खाजगी क्लासेस घेणाऱ्या धंदेवाईक लोकांना नवी बाजारपेठ मिळते. अशी बाजारपेठ एमपीएससी, यूपीएससी वाल्या क्लासेसनी कधीकाळी बहरली होती आणि आता त्याला उतरती कळा लागली आहे. तशीच बाजारपेठ संरक्षण विषयक परिक्षा, स्पर्धा परीक्षा वगैरेंची कधीकाळी जोमात होती. मध्यंतरी एआय, एम.एल. डेटा सायन्स वगैरे कोर्सेस बद्दल पण शैक्षणिक सूज आली होती.

यंदा मात्र चांद्रयान मोहिमेमुळे जी मोठी लाट तयार झाली आहे त्याचा फायदा घेण्यासाठी अवकाश संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान विषयक कोर्सेस आणि वर्कशॉप्स वगैरेंचा सुळसुळाट होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे. विशेषतः अवकाश संशोधन क्षेत्रातील दिग्गजांनी व्याख्याने देताना, मुलाखती देताना टू द पॉईंट आणि ग्राउंड रिएलिटी वर फोकस ठेवावा. उगाचंच पंचतारांकित मोटीव्हेशनल स्पीकर्स होऊन आणि इस्पीरेशनल भाषणे ठोकून विज्ञान विषयक चळवळीचे बाजकारीकरण होऊ देऊ नये. अवकाश तंत्रज्ञान, मूलभूत विज्ञान संशोधन वगैरे विषयांवर अगदी खेडोपाड्यात, तालुक्यातील शाळा, महाविद्यालयात व्याख्याने दिली जावीत जेणेकरून जिज्ञासू जनमानस तयार होईल.

फक्त सरकार दरबारी अनुदान मिळवून साहित्य संमेलनाचा जो काही वैचारिक पोपट झाला आहे तसा वैज्ञानिक पोपट सरकार दरबारच्या योजना, अनुदान पदरी पाडून विज्ञान विषयक चळवळीचा होऊ नये. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, संघटना आणि जागरूक लोकांनी पुढाकार घ्यावा. नाहीतर भविष्यात २७ फेब्रुवारीचा राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि २३ ऑगस्टचा राष्ट्रीय अवकाश दिवस फक्त पोकळ उत्सवाचे भपकेबाज महोत्सव होतील.

©भूषण वर्धेकर
पुणे

field_vote: 
0
No votes yet

जो पर्यंत मोदींचे नेतृत्व आहे,२३ ऑगस्ट पोकळ दिवस राहणार नाही. गेल्या पाच वर्षांत दुसऱ्यांचे उपग्रह सोडून ISRO ने ११०० कोटी कमविले आहे. आता ISRO ची पत आणिक वाढणार. पुढील पाच वर्षांत ISRO आपल्या रोजच्या खर्च पगार इत्यादीसाठी पायावर उभी राहणार. सरकारी मदत कमी लागेल. अनेक निजी भारतीय कंपन्या या क्षेत्रांत उतरतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समाज माध्यमावर फक्त ढकला ढकली असते येथून आले तिकडे पाठव असेच असते.
चांद्रयान चंद्रावर गेल्या मुळे भारतात कशाचीच लाट आलेली नाही.
फक्त मूर्ख राजकीय पक्ष आणि त्यांचे हरकामे ह्यांना मात्र काम मिळाले आहे.

53 वर्ष पूर्वी माणूस जावून आला आहे चंद्रावर.
मानव विरहित यान चंद्रावर उतरवणे हे नॉर्मल आहे.
गरीब माणसाला वडापाव मिळाला तरी तो खूश होतों
तशी स्वतःची अवस्था करून घेवु नका.
आणि भारताची तशी प्रतिमा जगात निर्माण पण करू नका.
जग हसेल भारतावर
चार च देश चंद्रावर यान पाठवू शकले हे वाक्य च चुकीचं आहे.
बाकी सर्व देश पण पाठवू शकतात ..
जपान, जर्मनी,ऑस्ट्रेलिया, कॅनडा खूप देश आहेत त्यांनी ठरवले तर ते पण चंद्रावर यान पाठवू शकतात
पण त्यांची इच्छा नाही म्हणून पाठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0