चीनच्या अर्थव्यवस्थेत काय गडबड आहे?
चीनच्या अर्थव्यवस्थेत काय गडबड आहे?
डॉ. अविनाश गोडबोले
सहयोगी प्राध्यापक आणि सहयोगी शैक्षणिक डीन, Jindal School of Liberal Arts and Humanities (JSLH), Jindal Global University (JGU)
चीनमधल्या आर्थिक मंदीच्या अलीकडच्या बातम्यांमुळे जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंदी आणि जनसामान्यांच्या सरासरी उत्पन्नात वाढ न होण्याच्या समस्येच्या भीतीनं चीन चिंतेत होता. आता, चलनघटीची भीती आहे आणि ती केवळ चीनसाठीच नाही तर जगासाठी वाईट बातमी असू शकते. ह्या लेखात चीनसमोर असणाऱ्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीसंबंधातली आकडेवारी आणि त्यामागची कारणमीमांसा मांडण्याचा प्रयत्न आहे.
२००७मध्ये चीनच्या संसदेत (नॅशनल पीपल्स काँग्रेस — NPCमध्ये) बोलताना तत्कालीन पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी इशारा दिला होता : "चीनच्या अर्थव्यवस्थेसमोरची सर्वांत मोठी समस्या ही आहे की अर्थव्यवस्थेची वाढ अस्थिर आणि असंतुलित आहे, आणि एकंदर अर्थव्यवस्थेमधे सुसूत्रतेचा आणि टिकावूपणाचा अभाव आहे." यानुसार पुढच्या काळात काही सुधारणा होणं अपेक्षित होतं. पण २००८मध्ये जागतिक आर्थिक मंदी आल्यानंतर चीननं रेल्वे, महामार्ग, ऊर्जा, आणि बांधकाम क्षेत्रांमध्ये, म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचं धोरण निवडलं. विकासदर दहापेक्षा जास्त राखण्याकरता त्यांच्या खऱ्या समस्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं (त्या समस्या म्हणजे देशांतर्गत ग्राहकवर्गाने करण्याच्या खरेदीमधली /उपभोगामधली कमतरता, प्रादेशिक असमानता, सामाजिक सुरक्षिततेचा अभाव). असं धोरण अंगिकारण्यामागचं कारण साधं आहे – चीनमध्ये सत्ता टिकवून धरायची तर सतत समृद्धी निर्माण करणं आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत ती समृद्धी सातत्यानं पोहोचवत राहणं गरजेचं असतं. काही काळ सरकारपुरस्कृत अशा कृत्रिम उपचारांमुळे अर्थव्यवस्थेची आकडेवारी उंचावर राखणं निभावून गेलं, पण शी जिनपिंग सत्तेवर येईपर्यंतच्या काळापर्यंत परिस्थिती पालटलेली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेची पुढची वाटचाल कठीण झाली. त्यातच चिनी अर्थव्यवस्थेत नियमनाचा अभाव होता. साध्या शब्दांत सांगायचं तर वशिलेबाजी - म्हणजे ज्याला चीनमध्ये ग्वांक्षी (Guanxi) म्हणतात — गटबाजी, मित्रवर्तुळं, नातेसंबंध वगैरे जाळ्यांतली जवळीक – तो व्यावसायिक कर्ज देण्याचा निकष होता.
शी जिनपिंग जेव्हा असं म्हणतात की चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, तेव्हा ते योग्यच असतं. जेव्हा ते म्हणतात की चीन हा जगातील सर्वात मोठा विकसनशील देश आहे, तेव्हाही त्यांचं बरोबरच असतं. कम्युनिस्ट पार्टीच्या एकोणिसाव्या अधिवेशनादरम्यान (२०१७) शी जिनपिंग यांनी घोषणा केली होती की आतापासून पुढे जनसामान्यांच्या जगण्याचा स्तर उंचावणं या बाबीवर आर्थिक विकासाच्या धोरणांचा भाग म्हणून लक्ष केंद्रित केलं जाईल. लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांमधे झालेल्या बदलाची त्यांनी घेतलेली ही नोंद होती हे खरंच, पण निर्यात, पायाभूत सुविधांवरचा खर्च आणि मोठमोठ्या गुंतवणुकी यांमुळे सातत्यानं आर्थिक वाढ होत राहण्याचा काळ संपला असल्याची जणू कबुली त्यांनी दिली. चीनने याला ‘न्यू नॉर्मल’ युग म्हटलं आहे; यात देशाची अर्थव्यवस्था दर वर्षाला १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढण्याची गेल्या पंचवीस वर्षांतली सवय सोडावी लागेल असा इशारा अंतर्भूत आहे. वाढीच्या मोठ्या दरामुळे जास्त नोकऱ्या तयार झाल्या होत्या, लोकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला होता. आता वाढीचा दर कमी झाल्यामुळे नवीन नोकऱ्या तयार होण्याचं प्रमाण कमी होत आहे. त्यातच दर वर्षी पदवीधरांचा आणखी एक ताफा बाहेर पडतो आहे. यातून नोकऱ्या शोधणाऱ्या लोकांत मोठी भर पडत आहे आणि बेरोजगारांची संख्या वाढत आहे. म्हणून सरकार विद्यार्थ्यांना अधिकचे कोर्सेस घेऊन पदवी घेणं लांबवायचा सल्ला देत आहे.
शी जिनपिंग यांच्या पहिल्या कार्यकाळात (२०१२-१७) निर्यातीमधल्या वाढीचा दर लक्षणीयरीत्या कमी झाला होता. कामगारांचे पगार वाढल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षितता गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे चीनच्या उत्पादनखर्चात वाढ होत असल्याचे संकेत त्यातून मिळाले होते. २०१०-११ साली फॉक्सकॉन सिटी ह्या औद्योगिक केंद्रात घडलेल्या आत्महत्या गाजल्या होत्या. कमी पगार आणि निर्घृण परिस्थितीत काम करायला लागणं यांसारखे घटक त्यामागे कारणीभूत होते. अशा घटनांचे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटल्यामुळे शासनयंत्रणेला हे बदल (पगारवाढ आणि सामाजिक सुरक्षितता गुंतवणुकीत वाढ) करावे लागले. मात्र त्याचवेळी, अयोग्य गुंतवणुकी आणि कर्जांची सहज उपलब्धता यांमुळे गृहनिर्माण, ऊर्जा आणि बांधकाम या क्षेत्रांना तात्कालिक, अपेक्षित मागणीच्या मानानं प्रचंड अधिक प्रमाणात उत्पादन करत राहण्याची वाईट सवय लागलेली आहे. परिणामी, ही क्षेत्रं मागणीविना पडून राहिलेल्या मालसाठ्याच्या दुष्टचक्रात अडकलेली दिसतात. खरं तर, पुरवठादारांच्या तपासणीच्या पद्धतींमध्ये सुधारणा झाल्यामुळे कमी कामगिरी करणाऱ्या अनेक कंपन्या बंद पडल्या आणि कमॉडिटी बाजारातही नियमन आलं हे खरं आहे. पण तरीही मागणीविना पडून राहिलेल्या मालसाठ्याची ही परिस्थिती अजिबात आटोक्यात आलेली नाही.
इतर कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था चीनइतकी राजकीय नाही. सध्याच्या आर्थिक आव्हानांवर चीन कितपत मात करू शकेल हे सर्वस्वी तिथल्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. शी जिनपिंग यांनी डिसेंबर २०२०मध्ये "भांडवलाचा बेशिस्त विस्तार" (Disorderly expansion of capital) हा शब्दप्रयोग वापरला होता. जिनपिंग किंवा इतर कुणीही ह्या शब्दप्रयोगाचं स्पष्टीकरण दिलं नाही; मात्र ह्या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वीच जॅक मा यांच्या अँट कॉर्पचा आयपीओ मागे घेतला गेला होता ह्या पार्श्वभूमीवर ही घटना बोलकी आहे. (अधिक माहितीसाठी इथे पाहा) भांडवलदारांनी नक्की काय करावं आणि करू नये यावर कम्युनिस्ट पक्ष नियंत्रण राखू पाहतो. अशा परिस्थितीमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं नवोन्मेष होऊ शकण्याबद्दल चीनच्या बहुतांश अभ्यासकांना जबरदस्त शंकाच आहे.
२०१३मधल्या १८व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तिसऱ्या बैठकीत देशाच्या संसाधनांच्या वाटपाचे निर्णय घेण्यात बाजाराला अधिकाधिक मोकळीक देण्याचं वचन शी जिनपिंग यांनी दिलं होतं खरं; मात्र तेव्हा दिलेली अशी अनेक आश्वासनं मागे घेतली गेलेली आहेत. कर्जवाटप आणि गुंतवणुकींच्या निर्णयांमधला राजकीय हस्तक्षेप कमी होईल अशी आशा एके काळी व्यक्त करण्यात येत होती. मात्र, २०१५मध्ये शेअर बाजार कोसळला तेव्हा सरकारनं हस्तक्षेप केलाच आणि कूर्मगतीनं वाढणारे शेअर्स — थोडक्यात, खराब कामगिरी असलेल्या कंपन्यांचे शेअर्स — विकत घेण्यासाठी बँकांना भाग पाडलं. चिनी युआनची परिवर्तनीयताही सरकारनं कमी केली आहे. चिनी लोक आपल्या ६५% उत्पन्नाची बचत करतात. काही मोजक्या सट्टेबाज लोकांच्या अंदाजांमुळे आपला पैसा अधिक काळ अडकून राहणार हे लोकांना आवडलं नाही, आणि या निर्णयाविरोधात निदर्शनंही झाली. ही बचतीची वृत्ती कमी करण्यासाठी — पर्यायाने ग्राहकराजाने आपला खर्च वाढवावा आणि अर्थव्यवस्थेचं इंजिन तापवून चालवावं याकरता — चीननं अनेक सामाजिक सुरक्षितता योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजनांची कार्यक्षमता अगदी मंद आहे. विकासाची गंगा आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी "सामान्यांची समृद्धी" हे धोरण (“Common Prosperity”) राबवलं गेलं. शिवाय, देशांतर्गत उपभोग वाढवणं, देशांतर्गत बाजारपेठेची स्पर्धात्मकता वाढवणं आणि आंतरप्रांतीय आर्थिक व्यवहारांमधली लाल फीत कमी करणं या उद्देशानं "ड्युअल सर्क्युलेशन”चं धोरण राबवलं गेलं. मात्र, राजकीय नेतृत्वाला अपेक्षित होतं तितकं यश अशा धोरणांना मिळालेलं नाही.
चीनची आर्थिक पीछेहाट खऱ्या अर्थानं २०१५मध्ये सुरू झाली होती, पण शहरीकरणासारख्या प्रकल्पांवर केलेल्या सरकारी खर्चामुळे ती नियंत्रणात राहिली, असा एक समज आहे. अमेरिका आणि चीनमधलं व्यापारयुद्ध, प्रगत देशांनी राबवलेली पुरवठा साखळ्यांमधलं चीनवरचं अवलंबित्व कमी करून जोखीम कमी करण्याची (de-risking) आणि निर्मिती क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी चीनला पर्याय शोधण्याची (चायना प्लस वन) धोरणं यांसारख्या घटकांमुळे ही पीछेहाट अधिक वेगानं होऊ लागली. ह्या शिवाय, चीनचे कोव्हिडविषयक आत्यंतिक कडक धोरण — झीरो कोव्हिड पॉलिसी — अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारी शेवटची काडी होती असं मानता येईल. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी असं सूचित करते की सामान्य लोकच नव्हे तर कंपन्याही रोकड पैशांबद्दल अधिक सतर्क होऊन रोकड आपल्याकडे बचत म्हणून ठेवत आहेत. अगदी शहरी भागांतही अन्नपुरवठा अचानक संपल्याच्या कोव्हिडकाळातल्या अनुभवांतून लोक बाहेर पडू शकलेले नाहीत. गुंतवणूकदारांना आणखी मोठ्या मंदीची भीती आहे, त्यामुळे ते अर्थव्यवस्था नीचतम पातळी कधी गाठेल याची वाट पाहत आहेत.
सरतेशेवटी, सरकारी मालकीचे उद्योग किंवा SoEs ही राजकीय नेतृत्वासमोर असणारी आणखी एक समस्या आहे. त्यांना खात्रीशीर मिळणारी कंत्राटं आणि त्यांचे राजकीय लागेबांधे बघता ते राजकीय सौदेबाजी करून — किंवा राजकीय वरदहस्त मिळवून — त्यांच्या भ्रष्ट किंवा अकार्यक्षम कार्यपद्धती न बदलतासुद्धा टिकून राहतात. शिवाय, हीच सरकारी संस्थानं अखेर सध्या कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या कोट्यवधी कामगारांना सामाजिक सुरक्षितता देतात. याचा अर्थ त्यांना हात लावणं हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे.
२०२१च्या एव्हरग्लेड संकटामुळे गृहनिर्माण क्षेत्रामधला बुडबुडा उघडकीला आला. चुकीच्या नियमन धोरणांमधून उद्भवलेलं हे लक्षण होतं. त्याच त्या चुकीच्या मार्गांवर अवलंबून असणं हे सर्वसाधारणपणे चिनी अर्थव्यवस्थेला झालेल्या आजाराचंच लक्षण मानलं जाऊ शकतं. पथ अवलंबित्व (Path dependence) अर्थव्यवस्थेच्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकतं ही भीती जवळपास दशकभरापासून व्यक्त केली जात आहे आणि नेतृत्वालाही याची जाणीव आहे. जनसामान्यांच्या सरासरी उत्पन्नात वाढ न होण्याचा सापळा (Middle-income trap) हा दीर्घकालीन चिंतेचा आणखी एक विषय आहे. आपण केवळ स्वस्त उत्पादनं बनवतो इतक्याच मर्यादित स्वरूपामधे असलेलं आपलं स्थान बदलण्याच्या दृष्टीने — पर्यायाने मूल्य साखळीमधे वर चढण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे खरी; परंतु त्याकरता उत्पादनांचं डिझाईन चीनमध्ये करणं हे सध्या तरी एक दूरचं स्वप्नच आहे.
आणि तरीही, अर्थव्यवस्थांच्या आकारांतला फरक पाहता, २०२३मध्ये भारताच्या ६.१% विकासदराच्या तुलनेत ५% दरानं वाढणारी चीनची अर्थव्यवस्था अधिक मूल्य निर्माण करेलच. भारताच्या संदर्भात याचा अर्थ कच्च्या तेलाच्या, सिमेंट आणि स्टीलसारख्या इतर वस्तूंच्या किमती कमी होणं असा होऊ शकतो. या मालासाठी चीन ही एक मोठी बाजारपेठ आहे. आर्थिक अस्थिरतेमुळे चीनची जोखीम घेण्याची भूक आणि त्याचं सीमेवरचं वर्तन बदलेल का, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकडे लक्ष ठेवायला हवं.
इंग्रजीत पूर्वप्रकाशित - China’s economic slowdown, its ripple effect, The Hindu, September 02, 2023
वाचतोय.
वाचतोय.
सर्व चानेलसवर हेच सांगत आहेत. बेकारीची दरवर्षी सवा कोटी तरुणांची भर पडत आहे .
राहणीमान स्तर वाढवला आहे. आता चीनची अर्थव्यवस्था समाजवादी विचारांची पण भांडवलशाहीला ना न म्हणणारी आहे. ती २०५० ला नावापुरती कॉम्युनिस्ट (म्हणजे राजकीय सत्ता ताब्यात ठेवण्यासठी कॉम्युनिस्ट नावाचा पक्ष असणारी) भांडवलशाहीला हो म्हणणारी असेल.
प्रत्येक राज्य आणि अर्थ व्यवस्थेत दुखणी आणि विरोधक आहेतच. आर्थिक मंदी भांडवलशाहीचाच एक गुप्त भाग असतो. काही ठरावीक लोक गुप्तपणे धनाढ्य होतात, गरजेच्या वस्तू घेऊनही पैसे उरतात. तर खूप मोठ्या वर्गाकडे तशा वस्तू घेणेही परवडत नाही. किंवा घेतलेल्या वस्तू अधिक काळ चालवण्याची प्रवृत्ती वाढते. चीन अशा मंदीतून जाणे हे साहजिकच आहे.
(वाचिक माहितीवर आधारित मत.)
द हिंदू पत्रातला लेख वरवर चाळला.
अर्थव्यवस्था हा खूप खोल विषय
अर्थ व्यवस्था हा खूप खोल विषय आहे .ह्या विषयाच्या जाणकार व्यक्ती च्या पोस्ट वर कमेंट करणे च चूक आहे कारण मला त्या मधील काही कळत नाही.
पण व्यवहारात दिसणारे उदाहरण.
टोमॅटो चे भाव २०० रुपये किलो वर काय जातात आणि एका महिन्याच्या आत तेच टोमॅटो दहा वीस रुपये किलो होतात.
३० दिवसात टोकाची वाढ आणि टोकाची घसरान दिसून आली.
आवक वाढली की भाव वाढतात आवक कमी झाली की भाव कमी होतात .
हे तत्त्व टोमॅटो बाबत लगुच होवू शकत नाही.
एका महिन्यात इतका उत्पादनात फरक पडू च शकत नाही.
म्हणजे ह्या व्यतिरिक्त खूप अज्ञात घटक कार्यान्वित असतात .
देशांची अर्थव्यवस्था त्या देशात किती भ्रष्टाचार आहे ह्याच्या शी डायरेक्ट संबंधित आहे.
आणि त्या देशाची धोरण योग्य आखण्यास तेथील सरकार किती सक्षम आहे त्याच्याशी डायरेक्ट संबंधित आहे.
बाकी घटक नंतर .
मला व्यवहार ज्ञान मधून इतकेच अर्थ व्यवस्थेचे आकलन आहे
परंतु त्याकरता उत्पादनांचं
परंतु त्याकरता उत्पादनांचं डिझाईन चीनमध्ये करणं हे सध्या तरी एक दूरचं स्वप्नच आहे.
म्हणजे आपण जी यंत्रसामुग्री ( स्वस्त ) चीनमधून आयात करतो त्याची डिजाईन चीन विकत घेत असल्यास स्वस्तात विकणे कसे परवडते?
ॲपल
उदा. आयफोन पाहा. डिझाईन अमेरिकी कंपनीचे, ती कंपनी केवळ उत्पादन चीनमधून घेते. त्यांना ते स्वस्त पडते. मूळ इनोव्हेशन अमेरिकी असल्याने अमेरिकी कंपनी गब्बर होते. त्या मानाने चिनी उत्पादक तितके गब्बर होत नाहीत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भ्रष्टाचार
भ्रष्टाचार कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करतो तर याबाबतीत आपण चीनच्या दोन पावलं पुढे आहोत की मागे ?
तसेच, चुकीच्या पद्धतीने विकासाचे कार्यक्रम राबवले तर तेही धोकादायक आहे. तर आपल्या देशांत, आधीच्या मेट्रो तोट्यांत असताना, प्रत्येक शहरांत इतक्या भरमसाठ मेट्रोंचे जाळे करणे कितपत शहाणपणाचे आहे ? पूर्वी मुंबईत प्रचंड खर्च करुन प्रत्येक उपनगरी स्टेशनच्या बाहेर शहराला विद्रुप करणारे पादचारी पुल बांधले. ते कोणीही वापरत नाही. त्यातले काही मेट्रोच्या मार्गात आल्यावर पाडून टाकले. थोडक्यांत, आपणही चीनच्याच मार्गाने चाललो आहोत किंवा कसे, यावर लेखक मार्गदर्शन करतील का ?
गिरिश कुबेरांचे काय म्हणणे
गिरिश कुबेरांचे काय म्हणणे आहे यावर? नाही म्हणजे हे आहे असे त्यांना माहित आहे का की यामधे संघाचा काही हात असल्याचा त्यांचा दावा आहे?
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...
चायना प्लस वन
"सिंगल सप्लायर रिस्क" ही संकल्पना काही मॅनेजमेंटला नवीन नाही. अॅपलच्या सप्लाय चैनची साखळी पाहिली तर त्याचा अंदाज येईल. "चायना प्लस वन" या किवर्डचा मूळ कुठे आहे याची माहिती मिळेल का? कुठल्या युएस कंपनीने केला आहे का? (अॅनलिस्ट कॉन कॉल, मॅनेजमेंटच्या इंटरव्ह्यूज). मी खूप सर्च केले की, कुठल्या युएस कंपनीने हा की वर्ड प्रथम वापरला असेल. पण मला काही मिळाले नाही. युएस मिडियामध्ये पण हा किवर्ड नाही सापडला.
माझा एक अंदाज आहे की, हा किवर्ड सरकारच्या थिंक टँकमधून जन्माला आला असावा. हा किवर्ड इंडीयन मिडिया आणि अॅनालिस्ट कॉल मध्ये गेले काही वर्ष ऐकत आलो आहे. एक गोष्ट ठळकपणे दिसते. असे किवर्ड सरकारच्या थिंक टँक किंवा लिडरशीप मधून प्रथम येतात, मग ते मिडिया उचलते, मग पुढे मॅनेजमेंट, एनालिस्ट कॉल, अॅन्युअल रिपोर्ट्स मध्ये असे शब्द हमखास सापडतात. उदा. मेक इन इंडिया, या आत्मनिर्भर, अमृतकाळ इ.. तुम्ही रँडम लिस्टेड कंपनीचे अॅन्युअल रिपोर्ट, अॅनालिस्ट कॉन कॉल काढलेत तर हे शब्द मिळायची शक्यता जास्त आहे.
चायना प्लस वन
चायना प्लस वन कधी सुरु झालं हे नक्की सांगणं कठीण आहे पण २०१४ पासून चीन मध्ये कामगार कायदे बदलल्यामुळे तिथले पगार वाढले आणि कॉस्ट वाढली आणि डेटा लोकलायझेशन नंतर IPR चे वाद वाढले. Made in China २०२५ स्ट्रॅटेजी २०१५ मध्ये सुरु केली गेली. तेंव्हापासून चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरु झाले.
चायना प्लस वन हि एक आर्थिक संकल्पना आहे. स्ट्रॅटेजिक पातळीवर आता डी-रिस्किंग चा प्लॅन आहे.
चायना प्लस वन चे फायदे खाली मांडले आहेत आणि ह्या लिंक मध्ये डी-रिस्किंग सोप्या प्रकारे सांगितलं आहे. https://www.thehindu.com/news/international/explained-why-is-the-us-shif...
डी-रिस्किंग थोडक्यात सांगायचं म्हणजे, व्यापाराचे weaponisation करता येईल इतकं अवलंबून राहायचं नाही आणि सप्लाय चेन चे डिव्हर्सिफिकेशन करायचं
Risk Diversification – Having production spread across several countries makes companies less susceptible to problems and shields them from supply chain disruptions caused due to issues such as tariffs, currency fluctuations, tax policies, wages and political uncertainties.
Opportunities to lower costs - As discussed earlier, China is no longer considered a low-cost labour market for several products and services. The shortage of skilled workforce coupled with wage issues is making China lose its cost advantage. In response to this companies are setting up manufacturing in countries with lower labour costs. For example, Hanes brands a leading undergarments manufacturer has set up a minimally automated plant in Vietnam and two in Thailand owing to lower labour costs whilst they have a heavily automated factory in Nanjing, China. Lower cost benefits can also be realised by moving manufacturing in closer proximity to the final markets which companies are coming to realise.
Knowledge transfer – The diversification strategy offers scope for learning from new markets for organizations and using their core competencies for growth prospects. Companies can utilize their experience in transferring knowledge to the partnering economies where they can grow beyond merely a production location.
Access to new markets – Having a burgeoning middle class offers a great opportunity for companies to manufacture and sell their products. Where China was once seen as just a low-cost production site has evolved into one of the important markets in the world, likewise, the alternate Plus-One countries can be seen beyond just diversification or cost-saving strategies to penetration into the next group of emerging markets.
धन्यवाद!
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद. तुमचे हिंदू मधले लेख आवडले.
अर्थव्यवस्था तात्पुरती झूम करणे
2003 ते 2006 दरम्यान होम लोण वरील व्याज 8% पर्यंत कमी आणले गेले t
आणि ह्या तीन चार वर्षात रिॲलिटी क्षेत्र नी उंच भरारी मारल
1996 chya दरम्यान होमलोन वरील व्याज अगदी 17 ते 18% होते.
मुंबई मध्ये prime locations मध्ये 80 हजार ते 2 लाख हाच भाव होता 225 वर्ग फीट च .
( हा पण जास्त च सांगत आहे)
जसे घर कर्ज स्वस्त झाले म्हणजे फक्त ८% व्याज.
तारण म्हणून जी प्रॉपर्टी विकत घेणार आहात तीच.
तुम्ही किती महिन्याला किती कमावता हा प्रश्न विचारत घेणे बंद
8 ते 10 हजार महिन्याला कमावणाऱ्या लोकांना पण 2 ते 3 लाख कर्ज दिले .
80 हजारात मिळणारी जागा ,काहीच दिवसात 5 लाखावर गेली . आता 50 ते 70 लाखावर आहे.
सर्व च खुश.
बँक,बिल्डर,ग्राहक .सिमेंट कंपन्या,कामगार, सर्व बांधकामाचे साहित्य पुरवणारे उद्योग तेजीत .
पण पैसा कोणाचा बाजारात आला.
सामान्य लोकांचा..
काही वर्षासाठी तेजी आली.
तात्पुरती.
पण बँकांनी ज्यांना कर्ज दिले होते ते फेडण्यास सक्षम नव्हते,जी प्रॉपर्टी तारण ठेवली होती.
ती फुगीर किंमत होती.
ती विकून पण बँका पैसे वसूल करूच शकले नसते.
काही दिवसांनी हा भर ओसरला.
बँका बुडाल्या.
City Bank hya मुळेच बुडाली.
जगात अनेक देश ह्या विषयाशी संबंधित प्रकरण मुळे बुडाले.
फास्ट रिझल्ट चे असे परिणाम होतात
शाश्वत विकास होण्यास वेळ लागतो पण तो पक्का असतो.
पण हल्ली सर्व देशातील सरकार शॉर्ट कट मारतात.
अर्थव्यवस्था खूप उंचीवर जाते आणि काहीच वर्षात धाडकन कोसळते. कारण सर्व च बोगस असते,फक्त फुगा असतो तो
ब्राझील हे उदाहरण आहेच.
खूप उदाहरणें आहेत जगात.
चीन हेच मोठे उदाहरण होवू नये म्हणजे झाले
विकास हा शस्वत च हवा. हळू हळू पण भक्कम.
भारत नेहमीच ह्या झडक्यातून वाचतो कारण बहुसंख्य भारतीय लोकांची खास वृत्ती.
बचत करणे.
सबसे तेज होण्याच्या नादात देश बुडाले आहेत
श्रीलंका ह्याचे ताजे उदाहरण
शास्वत विकास
शाश्वत विकास कसा होईल ह्या वर च राज्य कर्त्यानी लक्ष केंद्रित करावे.
मोठी अर्थ व्यवस्था दाखवण्याचा नादात चड्डी पण अंगावरील निघून जाईल आणि आपली खरी लायकी जगाला दिसेल असे बिनडोक निर्णय बिलकुल घेवु नयेत
दहा वर्षांपूर्वी चीनने
दहा वर्षांपूर्वी चीनने समाजवाद सोडायला सुरुवात केली आणि घौडदौड सुरू झाली. बीजिंग ओलिंपिकमध्ये जगाला कळलं.
आता यामध्ये आर्थिक घडी वरखाली होणारच. पण ती जगातील इतर देशांच्या तुलनेत मोठीच असणार हे नक्की.
त्या वेळचे काही विडिओ पाहिले आहेत.
दहा वर्षांपूर्वी नाही. ८०च्या
दहा वर्षांपूर्वी नाही. ८०च्या दशकातच सोडला. डेन्ग जाओपिन्ग सत्तेवर आल्यानन्तर. सामुहिक शेती बन्द करणे, खासगी उद्योग, परकीय भान्ड्वलाला आमन्त्रण देणे वगैरे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
अतिशय उत्तम लेख.
अतिशय उत्तम लेख.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
देशाची अर्थव्यवस्था हा किचकट विषय आहे
देशाची अर्थ व्यवस्था समजून घायची असेल तर आपल्या घराची अर्थ व्यवस्था हे लहान मॉडेल उत्तम आहे.
1) घरात इन्कम चे किती सोर्स आहेत.
दोघे नोकरी करणारे आहेत .
असे असेल तर कोणाची ही नोकरी कधी ही जावू शकते ही शक्यता गृहीत असावीच लागते.
तिसरे उत्पादन चे साधन..व्यवसाय, रिअल इस्टेट,शेती असेल तर तुम्ही भक्कम आहात सहज बुडणार नाही.
२) घरात होणारे खर्च इन्कम च्या किती प्रमाणात आहेत,घरात होणारे खर्च उपयोगी वस्तू वर किती, चैनी च्या वस्तू वर किती ,आणि गुंतवणूक किती.
ह्या वर तुमचे घर आर्थिक बाबतीत सक्षम आहे की नाही ते समजते.
३) घरात फुकट खाणारी लोक किती आहेत,तरुण लोक किती आहेत,वयस्कर लोक किती आहेत.
कमावती लोक किती आहेत .
व्यसनी लोक किती आहेत
ह्या वर..घराचे बाहेरील संकट पासून रक्षण,आर्थिक सक्षम पना, सुरक्षितता हे अवलंबून असते.
३) शेजारी राहणाऱ्या लोकांशी तुमचे प्रेमाचे संबंध आहेत का?
प्रेमाचे संबंध नसतील तरी शत्रुत्व नाही ना.
हे घटक पण महत्वाचे आहेत.
नाहीतर शेजारी तुमची प्रतेक कमजोरी हेरून तुम्हाला त्रास देईल.
खोटे वाद निर्माण करून तुम्हाला हैराण करतील.
तुम्ही ह्या झगड्यात अडकून राहाल आणि तुमची प्रगती थांबेल.
आता ह्या उदाहरणन शी चीन ची तुलना करा.
चीन इतर देशांत मोठे मोठे
चीन इतर देशांत मोठे मोठे प्रकल्प राबवतो. त्यासाठी इतर देशाना कर्ज देतो. पण ज्या वेळेस वस्तु निर्मीती होते त्या वेळेस कच्चा माल आयात करावा लागतो.
चीन आत्तापर्यंत आपल्या स्वस्त मालामुळे इतर देशांमधील लघु उद्योग बंद पाडले आहेत.
चीनकडे हे सगळे करण्यासाठी म्हणजे निर्यात करण्यासाठी कच्चामाल पाहिजे. त्यासाठी भांडवल पाहिजे. ते कोठून येते?
तसेच मोठे मोठे प्रकप्ल राबवण्यासाठी इतर रीसोर्स कसे उपलब्ध होतात?
सरकारी स्तरावर केले जाते.
सरकारी स्तरावर केले जाते.
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...