तुम्ही जंटलमन क्लबात जाऊन आलात का

तर तसे माझ्या लंडन च्या ट्रिप ला आता 4 वर्ष झाली. एक आठवड्याची ऑफिस ट्रिप म्हणजे काही फार मोठी ट्रिप नाही खरंतर पण तरीही त्यातल्या काही गोष्टी , आठवणी अधूनमधून उफाळून वर येतात आणि चेहऱ्यावर तजेला आणतात अगदी "इंग्लिश मॉर्निंग टी" सारख्या.
आजही ठळकपणे आठवतं ते म्हणजे प्रिन्सेस डायनाच्या स्मरणार्थ बांधलेल्या कारंज्याची सफर आणि तो जगप्रसिद्ध प्रिन्सेस डायना मेमोरियल वॉक. त्यावर कोरलेली गुलाबफुलं आणि कानात रुंजी घालणारे एल्टन जॉनच्या गुडबाय इंग्लंडस रोज चे शब्द.
तसाच एक चेहऱ्यावर अचानक तजेला आणणारा अनुभव म्हणजे स्ट्रीपर क्लब चा . तारुण्य सुलभ कुतूहलाने "टॉप 10 स्ट्रीपर क्लब इन सेंट्रल लंडन" असं आधीच सर्च करून ठेवलं होतं. एकूणच ट्रिप ला जाण्यापूर्वीची धावपळ यात कुठेतरी ते मागे पडलं पण लक्षात होतंच. २-३ दिवसात स्थिरस्थावर झाल्यानंतर आणि वीकेंडला रूढार्थाने जी पर्यटनस्थळं बघावी असं सांगतात ती बघून झाल्यावर मात्र या ऑफ बिट डेस्टिनेशन चे वेध लागले. आत्ता या क्षणाला
आपली खर्च करण्याची कुवत, कम्पनीने रोजच्या खर्चाला दिलेले पौंड आणि त्याची रुपायातली किंमत असा सगळा हिशोब लावून झाला आणि आपोआपच "टॉप 10 स्ट्रीपर क्लब" हे मागे पडलं आणि "नियरेस्ट अँड चीप स्ट्रीपर क्लब" असा सर्च करून , एक ठिकाण हेरून ठेवलं.
दुसऱ्या दिवशी ऑफिस वगैरे आटोपल्यानंतर ट्यूब पकडली आणि इच्छित स्टेशन ला उतरून स्ट्रीपर क्लब चा रस्ता पकडला. तुम्हाला सांगतो , गुगल मॅप हा किती क्रांतिकारी शोध आहे याची जाणीव मला त्या क्षणाला झाली. अन्यथा एक भारतीय माणूस, लंडन च्या रस्त्यांवर ते इथलं जवळचं "जंटलमन क्लब" कुठे ओ असं किती जणांना विचारत फिरला असता याची कल्पनाच न केलेली बरी.
बरं , विषय असा की इंग्रजाला सभ्यतेचा इतका लळा की स्ट्रीपर क्लब ला तिथलं जनमानस जंटलमन क्लब वगैरे म्हणतंय. म्हणजे अमच्याकडचे नगरसेवक किंवा आमदार कसे सांस्कृतिक महोत्सव किंवा लोक कलेचा जागर या नावाने गौतमी पाटीलच्या नाचाचा कार्यक्रम ठेवतात अगदी तसंच.
आत्ता या क्षणाला ते ट्यूब स्टेशन कुठलं, त्या स्ट्रीपर क्लब चं नाव काय अशा छोट्या छोट्या गोष्टी अजिबात आठवत नाहीत बघा. मॅप वर दाखवलेल्या रस्त्याने सरळ चालत गेलो आणि अगदी सहज फूटपाथ ला लागून असलेल्या एका दारापाशी आलो. बाऊन्सर बाहेर होताच. जगाच्या पाठीवर कुठल्याही क्लबत जा, बाऊन्सर सगळीकडे सारखेच दिसतात आणि सारखेच काळे कपडे घालतात. त्याने एक नजरेत मला जोखलं आणि एवढंच म्हणला, "फर्स्ट टाइम"? "डु यु हाव कॅश" ? मी फक्त मानेने होकार दिला. तसा तो म्हणाला, "बी गुड" आणि दरवाजा उघडून मी आत शिरलो.
एखाद्या स्टॅंडर्ड पब सारखा सेट अप, फक्त डान्स फ्लोर च्या ऐवजी साधारणपणे सगळ्यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित दिसेल आशा ठिकाणी लावलेलं स्टेज आणि त्याला लावलेला एक पोल आणि त्याच पोल वर डान्स करणाऱ्या तरुणी. आजूबाजूला दोन चार मखमली सोफे. ते खास लॅप डान्स घेण्यासाठी / देण्यासाठी, प्रशस्त बार काउंटर आणि दोन चार टेबल एखाद दोन जण बसतील इतके (शक्यतो आंबट शौकीन म्हाताऱ्यांसाठी कदाचित) असा सगळा तो माहोल.
बार काउंटर च्या बाजूलाच मोक्याची जागा हेरून मी उभा राहिलो, एक पाइंट बियर मागवली उभ्या उभ्याच एक चौफेर नजर टाकली. तिथल्या तरुणी, तिथे मजा करायला आलेले तरुण, तिथलं संगीत , नुकतेच डोळे शेकायला आलेले म्हातारे या सगळ्यांपेक्षा माझं लक्ष वेधून घेतलं ते तिथल्या ,"ग्राहकांना सूचना" या मथळ्याखाली लिहिलेल्या किमान 10 सूचनांनी. अगदी "Do's and Dont's".
त्यांना सूचना म्हणण्यापेक्षा नियम म्हटलेलं अधिक योग्य ठरेल. उगाच स्ट्रीपर क्लबात आलात म्हणून संयम विसरू नका असा सज्जड दम सोज्ज्वळ शब्दांत देण्याचं काम त्या सूचना करत होत्या.
मी अगदी काळजीपूर्वक सगळ्या सूचना वाचल्या. "लॅप डान्स " घेताना तरुणींच्या अंगाला न विचारता स्पर्श करू नका, आशा सूचना घोकून घेतल्या आणि बियर चा एक घोट पोटात जातो न जातो तोच माझ्यासमोर एक ललना सुहास्य वदनाने समोर उभी राहिली.
तिच्या हातात एक नक्षीदार भांडं होतं आणि माझ्यामते ती त्याच्यात तिचं इनाम गोळा करत होती. मी फार विचार न करता एक पौंडचं नाणं तिच्या भांड्यात घातलं. ( वर म्हटल्याप्रमाणे खूप सारे हिशेब करून मी खास 10 पाउंडाचे सुट्टे करून आणले होते) ती हसली आणि पूढे गेली. पुढचा परफॉर्मन्स तिचाच होता.
माझ्या पुढे उभ्या असलेल्या इंग्लिश तरुणांच्या घोळक्याने एकत्रीतच काही नोटा तिच्या हातात ठेवल्या. पुढच्या काही क्षणात ती पोल जवळ पोहोचली आणि मग सुरू झालं नृत्य आणि नृत्यासह स्ट्रीपिंग.
गाण्याच्या ठेक्यावर अदाकारी आणि अंगावरून उतरत जाणाऱ्या प्रत्येक कपड्यासोबत वाढत जाणारा ठेका.
वाढणाऱ्या प्रत्येक ठेक्यासोबत त्या तरुणीकडे वळणाऱ्या नजराही वाढायच्या. मी तर टक लावून बघत होतोच म्हणा (आ वासून असं म्हणणं जास्त योग्य ठरेल पण अर्थातच आ मनात वासलेला) .
बाजूचे इंग्लिश तरुणही वाढत्या संगीताच्या ठेक्यासोबत (उतरणाऱ्या एकेक कपड्या सोबत असं वाचा) तरुणीकडे बघू लागले. बाजूच्या दोन सोफ्यावर बसून लॅप डान्स घेणारे दोन शौकीन पण मांडीवर बसलेल्या लालनांचा मोह चुकवून हळूच एखादी नजर पोल डान्स करणाऱ्या तरुणीकडे टाकू लागले (इथं मी ह्याच्या मांडीवर बसलेय आणि हा त्या नाचऱ्या नटवी कडे बघतोय असा विचार करून लॅप डान्स देणारी तरुणी अधिकच मादकतेने तिचं काम करू लागली). संगीत टिपेला पोचलं, पोल डान्स करणाऱ्या तरुणीच्या अंगावर कपड्याचा एकही अंश उरला नाही आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा त्या नर्तिकेकडे लागल्या. अगदी मगाचपासून कोपऱ्यात खुर्चीवर बसून "डेली मेल" (डेली मेल म्हणजे इंग्लंडचा संध्यानंद असं म्हणायला हरकत नाही) वाचणाऱ्या म्हाताऱ्यानेही त्यातून डोकं वर काढलं आणि डोळ्यावरचा चष्मा सावरत , नेमक्या योग्य वेळी तरुणीकडे कटाक्ष टाकला. मादकतेचं अत्युच्च टोक गाठून ती तरुणी बाजूला झाली आणि तिची जागा घेण्यासाठी दुसरी तरुणी सज्ज झाली. तिथला माहौल, मादक ललना , त्यांचं नेत्रदीपक नृत्य यांचा मनापासून आनंद घेत आणि अजून दोन चार पाइंट रिचवून मी तिथून बाहेर पडलो. तसं तर मुंबईतही मी डान्स बार अनुभवलेत. पण अर्थातच दोन्हींची तुलना करून इथल्या बार बालांचं आयुष्य कसं खडतर वगैरे टेप मी लावणार नाही.
चूक काय बरोबर काय, नैतिक काय अनैतिक काय ह्या गोष्टींचा किस काढायला मला आवडत नाही.
पण एक नक्कीच सांगेन की लंडनला गेलात तर स्ट्रीप क्लब ला नक्की जा.

अभिषेक राऊत
30/९/2023

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अच्छा, तुम्हीपण 'सोहो'कर झालात तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीतरी सस्पेन्स थ्रिलर , चमचमीत वाचायला मिळेल म्हणून सुरवात केली पण लेख अगदीच पुळकावणी निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0