मातृभाषा : समज, गैरसमज.

मातृभाषा या शब्दाबद्दल जगभरातील बहुतेक लोकांचे गैरसमज आहेत. अनेकदा मातृभाषा हा शब्द आईने बोललेल्या भाषेला सूचित करतो. अलीकडे आमच्या कुटुंबातही हा वाद सुरू होता.( इथल्याच एका लेखावरून प्रेरणा घेऊन). मुद्दा असा होता की, मातृभाषा म्हणजे आईकडून मिळालेली भाषा. हा दृष्टिकोन मला चुकीचा वाटतो. ज्या समाजात आपण लहानपणापासून वाढलो तिथली भाषा हीच आपली मूळ भाषा किंवा मातृभाषा. खरं म्हणजे मूल ज्या वातावरणात बालपण घालवते, ज्या वातावरणात त्याचे पालनपोषण होते, ज्या भाषेतून मूल इतर भाषा शिकते , त्याचा विकास आणि भरभराट होतो , किंवा त्याला इतर अनके भाषा शिकण्यासाठी जी भाषा माध्यम म्हणून काम करते ते माध्यम म्हणजे मातृभाषा.

मुद्दा तसा फारसा गुंतागुंतीचा नाही. केवळ "मातृ " या शब्दामुळे मातृभाषेचा खरा अर्थ समजण्यात गोंधळ होतोय. मातृभाषा हा शब्दही फार जुना नाही, पण त्याचा अर्थ मात्र खूप प्राचीन आहे असे समजून त्याचा जो अर्थ लावण्यात येतो तिथेच गोची होते. मातृभाषा हा शब्द प्रत्यक्षात "मदरटंग" या इंग्रजी शब्दाचा स्वैर अनुवाद आहे. संदर्भ बंगाली भाषा आणि बंगाली वातावरणाचा होता असे म्हणायला वाव आहे. ब्रिटीश राजवटीत ज्याला पुनर्जागरण म्हणतात तो काळ बंगालच्या भूमीतून आला. इंग्रजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांसारख्या उदारमतवादी लोकांना हाताशी धरले. भारतीयांनी पारंपारिक अरबी-फारसी शिक्षणाऐवजी इंग्रजी शिकण्याची गरज मॅकॉले यांना वाटली जेणेकरून भारतीय लोकांना जगभर वाहणाऱ्या नवजागरणाचे वारेही जाणवतील. प्रत्येक कालखंडात सत्ताधारी वर्गाची भाषा हे शिक्षण आणि राज्यकारभाराचे माध्यम राहिले आहे. मुस्लिम काळात अरबी-फारसी हे शिक्षणाचे माध्यम होते, परंतु या दोन भाषांमधील ज्ञान संपादन केल्याने सर्वसामान्य भारतीयांच्या जागतिक दृष्टिकोनात आणि संकुचित विचारसरणीत कोणताही बदल झाला नाही. कारण अरबी-फारसीची व्याप्ती मुळातच मर्यादित होती. अरबी-पर्शियनच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेले भारतीय प्राचीन भारत, पर्शिया आणि अरबस्तान इत्यादींच्या ज्ञानपरंपरेशी जोडले जात होते, परंतु सुदूर पश्चिमेला होत असलेली वैचारिक क्रांती भारतात आणण्यास अरबी-पर्शियन भाषेचा काडी इतका उपयोग नव्हता.त्यामुळे भारतीयांनीही इंग्रजी भाषा शिकली पाहिजे हा विचार पुढे आला परंतु इंग्रजी केवळ एक भाषा म्हणूनच शिकावी आणि इतर ज्ञान मात्र भारतीयांना त्यांच्याच भाषेत मिळावे असा विचार ठाम पणे मांडला गेला. बंगाली विचारकांनी मदरटंगचा मातृभाषा असा बंगाली अनुवाद करून सामान्य माणसाला त्याच्या मातृभाषेत (बांगला भाषेत) आधुनिक शिक्षण मिळावे असे मत मांडले. मुस्लिमांचे “मदरसे” देखील त्यामुळे बंगालमधूनच उगम पावलेले आहेत.

मरिअम वेब्स्टरच्या डिक्शनरीत मदरटंगची व्याख्या अशी आहे: (1) a language from which another language derives.(2) The language one first learned; the language one grew up with; one's native language.
विकिपीडियाच्या म्हणण्यानुसार:A first language (L1), native language, native tongue, or mother tongue is the first language or dialect that a person has been exposed to from birth

आई जी भाषा बोलते ती मातृभाषा असे मानणे गैर आहे हे नक्की. आईच मुलाच्या वाढीसाठी जबाबदार असते आणि लहानपणापासून तीच आपली पाल्याचे संगोपन करते म्हणून आईला मातृभाषेशी जोडणे हा एक प्रकारचा बादरायण संबंध. मुलाच्या भाषेसाठी फक्त आईच जबाबदार मानली, तर भिन्न भाषिक पार्श्वभूमी असलेल्या जोडप्यांमध्ये, जिथे पालकत्वाची जबाबदारी अर्धी अर्धी वाटून घेतली जाते तिथे मातृपितृभाषा असा शब्दप्रयोग का योजला जात नाही?. मातृसत्ताक व्यवस्थेत मातृभाषा असा शब्दप्रयोग केला आहे असे समजून चालले तर पितृसत्ताक व्यवस्थेत त्याला काय म्हणावे? प्रत्येकाला आपल्या भाषेचा वारसा आपल्या आईकडूनच मिळतो हा विश्वास खोटा असून मातृभाषा या शब्दाचा तो एक सोपा पण कमकुवत अर्थ काढला आहे हे निश्चित. आईच्या भौतिक अर्थाशी किंवा स्वरूपाशी त्याचा संबंध शोधणे व्यर्थ ठरेल.

भिन्न भिन्न वातावरणात वाढताना मूल अनेक भाषा शिकत जाते आणि मग भाषेची सरमिसळ होत जाते. शब्दांची आयात निर्यात होते आणि मूळ भाषेत इतर भाषेतील शब्द बेमालूमपणे मिसळून जातात. म्हणूनच वर म्हंटल्याप्रमाणे मूल ज्या वातावरणात बालपण घालवते, ज्या वातावरणात त्याचे पालनपोषण होते, ज्या भाषेतून मूल इतर भाषा शिकते , त्याचा विकास आणि भरभराट होतो , किंवा त्याला इतर अनके भाषा शिकण्यासाठी जी भाषा माध्यम म्हणून काम करते ते माध्यम म्हणजे मातृभाषा.
………………….

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आई जी भाषा बोलते ती मातृभाषा असे मानणे गैर आहे हे नक्की. आईच मुलाच्या वाढीसाठी जबाबदार असते आणि लहानपणापासून तीच आपली पाल्याचे संगोपन करते म्हणून आईला मातृभाषेशी जोडणे हा एक प्रकारचा बादरायण संबंध. मुलाच्या भाषेसाठी फक्त आईच जबाबदार मानली, तर भिन्न भाषिक पार्श्वभूमी असलेल्या जोडप्यांमध्ये, जिथे पालकत्वाची जबाबदारी अर्धी अर्धी वाटून घेतली जाते तिथे मातृपितृभाषा असा शब्दप्रयोग का योजला जात नाही?. मातृसत्ताक व्यवस्थेत मातृभाषा असा शब्दप्रयोग केला आहे असे समजून चालले तर पितृसत्ताक व्यवस्थेत त्याला काय म्हणावे? प्रत्येकाला आपल्या भाषेचा वारसा आपल्या आईकडूनच मिळतो हा विश्वास खोटा असून मातृभाषा या शब्दाचा तो एक सोपा पण कमकुवत अर्थ काढला आहे हे निश्चित. आईच्या भौतिक अर्थाशी किंवा स्वरूपाशी त्याचा संबंध शोधणे व्यर्थ ठरेल.

ते तर सोडा. भिन्नभाषक पालकत्वाची वगैरे काही भानगड नाहीये. आईवडील दोघेही मराठी आहेत, घरात एकमेकांशी मराठीतूनच बोलतात, आणि घरात एकंदरीत मराठीच बोलली जाते. मात्र, घराबाहेरचे वातावरण पूर्णपणे अमेरिकन आहे.

अशा वेळेस, मूल जोवर शाळेत जाण्याइतपत मोठे नसते, तोवर (आईवडिलांचे ऐकून) छान मराठी बोलायला शिकत असते. मात्र, एकदा शाळेत जाऊ लागले, की अमेरिकन इंग्रजीचा प्रभाव बलवत्तर ठरतो. मग घरातसुद्धा, मराठीतून विचारलेल्या प्रश्नांना अमेरिकन इंग्रजीतून उत्तरे देणे वगैरे प्रकार सुरू होतात, नि एकंदरीत मराठी मागच्या शेगडीवर (बॅकबर्नर) जाऊन बसते.

अशा मुलांना मराठी जुजबी का होईना, परंतु (व्यवहारापुरती) बऱ्यापैकी समजते. मात्र, बोलायला (मराठीतून) तोंड उघडले, की ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत (मार्गे लोकमान्य टिळक) तमाम मराठी दिग्गजांना ते ऐकून फेफरे यावे, अशी परिस्थिती असते. आणि, चार मराठी कुटुंबे समारंभाकरिता एकत्र जमली, तर आईबापे स्वच्छ मराठीतून बोलताहेत, आणि पुढची पिढी अमेरिकन इंग्रजीतून, असे चित्र सामान्यत: आढळते. (आणि, मराठीव्यतिरिक्त इतर कोठल्याही भारतीय भाषेचा – विशेषेकरून हिंदीचा – गंधही नसतो. गंध असण्याचे कारणही नसते.)

दोष या मुलांचा नाही. मराठी बोलण्याची वेळ ही केवळ भारतातल्या आजीआजोबांना केलेल्या साप्ताहिक/द्विसाप्ताहिक कॉल्सपुरती येत असताना, आणि इतर वेळेस घरात आईवडील जे मराठी बोलतात, तेवढेच कानावर पडत असताना, या मुलांना फाडफाड मराठी बोलायला येईल कशी? (का यावी, हा फार पुढचा प्रश्न.) आणि, मुलाला मराठीतून बोलायला सक्ती करायची, जोवर मराठीतून उत्तर मिळत नाही, तोवर बोलायचे नाही/खायला द्यायचे नाही/ते एक उत्तर मराठीतून मिळेपर्यंत पुढचा संवाद रोखून धरायचा/ते एक उत्तर मराठीतून व्यवस्थित कसे द्यायचे, ते मुलाकडून घोटून वदवून घ्यायचे, वगैरे प्रकार मुलाची मराठी 'सुधारायच्या'/'पक्की करायच्या'/'मराठीचे संवर्धन' वगैरे करायच्या दृष्टीने किती प्रभावी जरी असले, तरीही, ते अघोरी आहेत, हे माझे वैयक्तिक मत. हे मुलावर अत्याचार आहेत; भाषा ही माणसाकरिता असते, माणूस भाषेकरिता (झुंडवाद) नव्हे, वगैरे वगैरे. (आणि, ते मुलाकरिता तर fair नाहीच, परंतु मराठी भाषेकरितासुद्धा fair नाही, ही आणखीच वेगळी गोष्ट.)

असो. मुद्दा तो नाही. तांत्रिकदृष्ट्या अशा मुलांची 'मातृभाषा' मराठीच म्हणावी लागेल. मात्र, मराठी मोडकीतोडकी आणि अमेरिकन इंग्रजी अस्खलित, अशा परिस्थितीत, अमेरिकन इंग्रजीला नक्की काय म्हणावे? शाळाभाषा? की समाजभाषा?

(तसे, शाळा ही alma mater मानली जात असल्याकारणाने, तिला 'मातृभाषा' म्हणणे अगदीच चुकीचे ठरू नये बहुधा...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत!
त्यामुळे मुलाला निरनिराळ्या भाषांबद्दल कुतुहल वाटेल, भाषांची गोडी वाटेल आणि कुठली एखादी भाषा- बोली तिरस्करणीय वाटणार नाही एवढे पाहता आले तर पहावे असे वाटते.

बाकी, सध्या मराठी उच्चमध्यमवर्गात मराठी बोलणे गावंढळ समजले जाते आणि प्रॅक्टिकलपणाच्या नावाखाली मुलांना भाषा निम्न दर्जाची मानून केवळ इतर विषय महत्वाचे असे पालकच शिकवत असतात. थर्ड क्लास भाषीक बुद्धीमत्ता ही मिरवण्याची गोष्ट मानणारेच बहुत असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आई जी भाषा बोलते ती मातृभाषा असे मानणे गैर आहे हे नक्की. आईच मुलाच्या वाढीसाठी जबाबदार असते आणि लहानपणापासून तीच आपली पाल्याचे संगोपन करते म्हणून आईला मातृभाषेशी जोडणे हा एक प्रकारचा बादरायण संबंध. मुलाच्या भाषेसाठी फक्त आईच जबाबदार मानली, तर भिन्न भाषिक पार्श्वभूमी असलेल्या जोडप्यांमध्ये, जिथे पालकत्वाची जबाबदारी अर्धी अर्धी वाटून घेतली जाते तिथे मातृपितृभाषा असा शब्दप्रयोग का योजला जात नाही?. मातृसत्ताक व्यवस्थेत मातृभाषा असा शब्दप्रयोग केला आहे असे समजून चालले तर पितृसत्ताक व्यवस्थेत त्याला काय म्हणावे? प्रत्येकाला आपल्या भाषेचा वारसा आपल्या आईकडूनच मिळतो हा विश्वास खोटा असून मातृभाषा या शब्दाचा तो एक सोपा पण कमकुवत अर्थ काढला आहे हे निश्चित. आईच्या भौतिक अर्थाशी किंवा स्वरूपाशी त्याचा संबंध शोधणे व्यर्थ ठरेल.

मी तरी असा अर्थ कधीच लावला नाही.
तुम्ही डिक्शनरी आणि विकी.. मधला अर्थ म्हणत आहात तोच अर्थ (निदान मलातरी) माहिती आहे.

मातृभूमी, मातृभाषा म्हणजे स्वदेश आणि स्वभाषा असाच अर्थ प्रचलीत आहे.

भाषा हे एक संवादाचे, संपर्क साधण्याचे साधन आहे हेच नेहमी लक्षात ठेवायला हवे.. वृथा अभिमान वगैरे बाळगु नये.
शुद्ध स्वरूपातील भाषा नेहमीच ऐकायला चांगली वाटते परंतु व्यवहारात काहीवेळा तडजोड करावी लागते.
मी राष्ट्रभाषा हिंदीच्या अनेक परिक्षा दिलेल्या आहेत. अभ्यासक्रमात उत्तमोत्तम साहित्यिकांचे लेखन असे. त्यामुळे माझी हिंदी भाषा अगदी शुद्ध तुपातलीच होती. त्यावेळेला तसेही बोलीभाषेचा सराव नव्हता. पण नंतर हिंदीभाषिक सहध्यायींबरोबर बोलताना लक्षात आले की भाषेत भेसळ केली तरच संवाद साधणे सोपे होईल.

माझ्या सासरची मंडळी ३० पेक्षा जास्त वर्षे भिलई येथे वास्त्व्यास होती. त्यांच्या संपर्कातील लोक देखिल नागपूर, रायपूर, जबलपूर, विलासपूर इत्यादी हिंदीभाषिक शहरांमधली. त्यांचे काही शब्द ऐकताना जरा गोंधळायला व्हायचे, जसे "अलमारी" "बरबट्टीची भाजी" "टमाटर" "मटर" "पत्ताकोबी" किंवा बाई नीट पोछा लावत नाही हं, किंवा नारळ मागवून घेउया, तो असाच चाल्ला गेला वगैरे. काहींच्या तोंडून 'अब्बे ए ..' वगैरे ऐकायची देखिल सवय झाली होती. आणखीही बरेच आहेत.
माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत होता. त्यांच्या शिक्षिका बाई मला म्हणाल्या तुम्ही त्याच्याबरोबर इंग्लीश भाषेत बोला. मी (मनातच) म्हणले, कशाला? त्याची आहे ती इंग्रजीसुद्धा बिघडायची.
पण त्याची मराठी देखिल अजबच आहे. "मला भाजी नको हवी होती, किंवा मला साडे एक किंवा साडे दोन वाजता जायचे आहे, वगैरे. मराठी भाषेच्या उत्तर पत्रिकेत त्याने सुंदर चा उलट अर्थी शब्द घाण असा लिहिला होता.. आता काय सांगायचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

(१) आई जन्मतःच मुकी असणाऱ्या मुलामुलींची मातृभाषा काय असेल? (२) जन्मत:च आई गमावलेल्या मुलाची मातृभाषा काय ? (३ )अनाथाश्रमात वाढणारी मुले, ज्यांना त्यांच्या पालकांची नावेही माहित नाहीत, त्यांची मातृभाषा काय असावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याची एका वाक्यात व्याख्या .

जी पहिली बोलता येते आणि नंतर वाचता येते..

मातृ भाषे व्यतिरिक्त कोणतीच जगातील भाषा अशी आधी कळस मग पाया अशी शिकता येत नाही.
भाषेची समज वयाच्या पहिल्या पाच वर्षात च तीव्र असते.
नुकतेच मराठी कुटुंबात जन्म झालेले मुल जगातील कोणत्या ही भाषिक घरात पहिले पाच वर्ष वाढवले तर ते मूल ती भाषा सहज आत्मसात करेल पण तीच परकीय भाषा मराठी व्यक्ती ल शिकण्यास किती तरी वर्ष जातील पण नीट ती भाषा समजणार नाही.
भाषा ही फक्त संवादाचे साधन नाही भाषेबरोबर संस्कृती पण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मातृभाषा कशाला म्हणायचं असा प्रश्न मला कधीमधी पडतो. मी भौतिकशास्त्राचं शिक्षण घेतलं; आता सांख्यिकी आणि कंप्युटर सायन्स वापरते. भौतिकशास्त्रातच काम करायचे तेव्हा त्यातले जोक्स करायचे, उपमा वापरायचे. हल्ली स्टॅस्ट्स, कंप्युटर सायन्सी जोक्स जास्त करते. समीकरणं लिहिताना अजूनही भौतिकशास्त्रानुसार वाचते.

शिवाय, बरा अर्धा आणि माझी अशी स्वतंत्र बोली तयार झाली आहे. कधी खाणाखुणाही. हे तर अनेकांच्या घरांत होत असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गंमतीशीर लेख आणि प्रतिसाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- अहिरावण

काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...

मराठी भाषेच्या उत्तर पत्रिकेत त्याने सुंदर चा उलट अर्थी शब्द घाण असा लिहिला होता.. आता काय सांगायचे? hasun hasun purwat

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0