फ्रेंच बोलणारा आफ्रिका
फ्रेंच बोलणारा आफ्रिका
- - शैलेश मुळे
आफ्रिका म्हणल्यावर काही ठरावीक देश पटकन आपल्या नजरेसमोर येतात. गांधीजींच्या जीवनामुळे माहीत झालेला दक्षिण आफ्रिका, पुरातन इतिहास आणि पिरॅमिड यांच्यामुळे ज्ञात असलेला इजिप्त, कॉफीची मातृभूमी इथिओपिया, विविध जंगली श्वापदांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेला टांझानिया, त्याचबरोबर समुद्री चाच्यांच्या उपद्रवामुळे माहीत झालेला सोमालिया हे देश बहुतेकांच्या ऐकण्यातले असतात. एका बाजूला जगातील सर्वात मोठा वाळवंट असूनही दुसरीकडे सदाहरित निबीड अरण्य असलेला प्रदेश अशा विरोधाभासाचा खंड म्हणून आफ्रिकेची ओळख आहे. या महाकाय खंडात विविध प्रकारच्या भौगोलिक रचना, निसर्ग सौंदर्य, विविध प्राचीन संस्कृती आणि अनेक भाषा यांचा सुंदर मिलाफ झालेला दिसून येतो. नैसर्गिक साधन संपत्तीने गर्भश्रीमंत असलेल्या या खंडाकडे व्यापाराच्या नव्या संधी शोधणाऱ्या मध्ययुगीन युरोपीय देशांचे लक्ष जाणे साहजिकच होते.
आफ्रिकेचे वसाहतीकरण
पंधराव्या शतकात युरोपातून पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी जलमार्ग शोधण्याच्या प्रयत्नातून आफ्रिका खंडाला वळसा घालून जाणारा समुद्री मार्ग पोर्तुगिजांनी शोधला. लवकरच त्या मार्गावरून आलेल्या विविध युरोपीय सत्तांनी भारताशी आणि आशिया खंडाशी व्यापार करण्याबरोबरच आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांवर आपले अधिपत्य स्थापन केले. आफ्रिकेपुरते बोलायचे झाले तर तिथे असलेल्या अनेक स्थानिक जमातींच्या आपापसांतल्या भांडणांमुळे युरोपीय सत्तांना तेथे स्थिरावणे शक्य झाले. सुरुवातीला या सत्तांचा आफ्रिकेतील उद्योग म्हणजे स्थानिकांना पकडून गुलाम म्हणून युरोप-अमेरिकेत विकणे, आणि आफ्रिकन मौल्यवान वस्तू आणि शेतमाल गोळा करणे असा 'मर्यादित' स्वरूपाचा होता.
एकोणिसाव्या शतकातील नव-साम्राज्यवाद आणि युरोपात घडलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे आफ्रिकेतील युरोपीय सत्तांच्या या 'व्यापारी' केंद्रांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या नव्या गतिमान यांत्रिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरेसा आणि अखंडित पुरवठा करू शकणारा, तसेच विविध मौल्यवान साधनांचा स्त्रोत असलेला आफ्रिका म्हणूनच महत्त्वाचा ठरला. तेथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली विविध खनिजे, उत्तम प्रतीचे जंगली लाकूड, हस्तिदंत इत्यादींच्या जोडीने तेथे शेती वाढवून रबर, कॉफी, ऊस, कोको, तंबाखू अशी नगदी पिके घेणे युरोपीय देशांना जरुरीचे वाटू लागले. त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळही बळजबरीने फुकटात जमवलेल्या गुलामांच्या स्वरूपात उपलब्ध होते. आफ्रिकेतील जमीन मिळवल्यास व्यापारापेक्षा जास्त फायदा होईल हे त्यांच्या ध्यानात आले. यातूनच आफ्रिकेतील जास्तीत जास्त भूभाग ताब्यात घेऊन आपली वसाहत वाढवण्यासाठी विविध युरोपियन देशांचा सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यासाठी स्थानिक जनतेला नाडले जाऊ लागले. नव-साम्राज्यवादाच्या या काळात आफ्रिकेवर झालेली आक्रमणे, अत्याचार आणि तेथल्या युरोपीयांच्या वसाहतवादाला इतिहासात "स्क्रॅम्बल फॉर आफ्रिका" म्हणले जाते. आफ्रिकेत वसाहतविस्तारासाठी अनेक लढाया होत. तसेच युरोपात दोन सत्तांमध्ये युद्ध भडकले की त्यांच्या आफ्रिकेतील वसाहतीमध्येसुद्धा लढाई होत असे. या सततच्या युद्धांमुळे अस्थिरता निर्माण होऊन औद्योगिक उत्पन्नामध्ये घट होऊ लागली आणि सर्वांचेच त्यामध्ये नुकसान होऊ लागले. त्यामुळे सामंजस्याचा करार करण्यासाठी पोर्तुगालने जर्मनीला गळ घातली आणि १८८४मध्ये जर्मन चान्सलर ऑटो फान बिस्मार्क यांनी त्यासाठी 'बर्लिन कॉन्फरन्स' आयोजित केली. तीन महिने चाललेल्या या सभेत "लूट का माल सब मिल बांट के खायेंगे" अशा प्रकारचा एक सामंजस्य करार करण्यात आला. तेथे आफ्रिकेतील कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसताना युरोपातील सात सत्तांनी संपूर्ण आफ्रिका खंड ५० वसाहतींमध्ये विभागून आपापसांत सामंजस्याने वाटून घेतला आणि एका तऱ्हेने आपला वसाहतवाद समर्थनीय केला. या सात युरोपीय सत्तांपैकी ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांमुळे त्या दोघांकडे सर्वात जास्त भूभाग आला. तर त्यांच्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी होता. पुढील काळात या सर्वच युरोपीय सत्तांनी आपापल्या वसाहतींमध्ये शाळांच्या माध्यमातून युरोपीय इतिहास, संस्कृती, प्रथा व भाषा तेथील स्थानिक जनतेच्या गळी उतरवल्या.
आफ्रिकेशी माझी पहिली ओळख
अनेक भाषांचे माहेर असलेल्या या आफ्रिकेशी माझा संबंध भाषेच्याच मार्गाने आला. फ्रेंच-इंग्रजी अनुवाद करण्याचे माझे पहिले मोठे काम मी मुंबईतल्या एका प्लास्टिकच्या वस्तू बनवणाऱ्या कंपनीसाठी केले. भारतातून विविध प्रकारच्या दैनंदिन जीवनातील वस्तू आयात करण्याच्या दृष्टीने आफ्रिकेतील काही देशांचे प्रतिनिधी १९९६ साली मुंबईत आले होते. त्यांपैकी सेनेगाल या देशाचे उद्योजक (त्यांत स्त्रिया जास्त होत्या) भारतात बनलेल्या प्लास्टिकच्या वस्तू आयात करण्यासाठी आणि तशा वस्तू बनवणारे कारखाने आपल्या देशात उभारता येतील का त्याची पाहणी करण्यासाठी येथे आले होते. भारतीय उद्योगपतींशी चर्चा, विविध कंपन्यांच्या कारखान्यांना भेटी देणे, निर्मिती प्रक्रिया समजून घेणे, नमुन्याच्या वस्तू पाहणे, वाजवी भावासाठी घासाघीस, विशेष खानपान असा आठवड्याभराचा भरगच्च कार्यक्रम होता. सेनेगालच्या त्या प्रतिनिधी मंडळाबरोबर काम करताना अवांतर गप्पाही झाल्या आणि त्यांच्या संस्कृतीची ओळख झाली. एक तर आफ्रिकन लोकांबरोबर काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग. त्यांच्याशी प्रथमच गप्पा केल्यावर फ्रान्सच्या फ्रेंचमध्ये आणि आफ्रिकन फ्रेंचमध्ये फरक असल्याचे जाणवले. भाषा, शब्द आणि व्याकरण तेच असले तरी त्यांपैकी अनेकांच्या फ्रेंच उच्चारांवर त्यांच्या आफ्रिकन मातृभाषेचा प्रभाव स्पष्ट दिसला. थोडे जाडेभरडे उच्चार, फ्रेंच "र"शी अजिबात संबंध नसलेला त्यांचा ठासून पूर्ण उच्चार केलेला "र", अनुनासिक उच्चारांमधील वेगळेपण, बोलताना येणारा विशिष्ट प्रकारचा हेल आणि वेगळ्याच ठिकाणी दाब देऊन उच्चारलेले शब्द असा प्रकार असला तरी ती बोली समजायला विशेष कठीण वाटली नाही. अगदी क्वचितच त्यांच्या बोलण्यात मातृभाषेतील एखादा शब्द येई आणि तोही अवांतर गप्पा चालू असताना. दुसरे म्हणजे त्यातील अधिकारी वर्गातील लोकांच्या फ्रेंचवर आफ्रिकन प्रभाव अगदीच नगण्य होता. कदाचित त्यांचा संपर्क युरोपीय फ्रेंच लोकांशी जास्त येत असावा. त्या तुलनेत आपण भारतीय लोक बोलताना बऱ्याचदा दोन किंवा अधिक भाषांमधील शब्द (तांत्रिक नसलेले शब्दसुद्धा) सरमिसळ करून वापरतो आणि त्यामुळे त्या भाषा समजणाऱ्यांनाच तो संवाद पूर्णपणे समजू शकतो. असो! त्या प्रतिनिधी मंडळाच्या अनेक गोष्टी मला भावल्या. त्यांच्या वागण्यातील आत्मीयता, मी नवखा असल्याने अडलेल्या शब्दांसाठी मला सांभाळून घेण्याचा समजूतदारपणा, उद्योगांमध्ये जरुरी असलेली मुत्सद्देगिरी, त्याचबरोबर स्वतःच्या देशाचे पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण रंगीत कपडे भारतातही रोज घालण्याचा अभिमान अशा अनेक गोष्टी मला नवीन होत्या. सांस्कृतिक प्रथा पाळण्याची त्यांची परंपरा पाहता त्यांच्यात आणि भारतीय लोकांत साम्य वाटले.
फ्रेंचांची आफ्रिका
आफ्रिकेत फ्रेंच बोलले जाते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सामान्य माहितीतील आफ्रिकन देश मुख्यत्वे इंग्रजी भाषिक असतात. आजच्या आफ्रिकन देशांत अरबी, स्वाहिली, योरूबा, इग्बो अशा अनेक स्थानिक भाषांच्या जोडीने इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश, इटालियन, व जर्मन या युरोपियन भाषा आणि आफ्रिकान्स ही डच भाषेतून जन्मलेली भाषा या सर्व रोजच्या वापरात आहेत. त्यांपैकी फ्रेंच भाषा आणि संस्कृती आफ्रिकेत कशी आणि कुठे कुठे पोचली त्याची थोडी माहिती करून घेऊ.
फ्रेंच आफ्रिकेत सतराव्या शतकातच आले होते. पूर्वेकडे जाणाऱ्या आपल्या सागरी व्यापाराच्या मार्गावरील मुख्य ठाणी म्हणून त्यांनी सर्वप्रथम सेनेगाल आणि मदागास्कर ताब्यात घेतले होते. परंतु १८१४पर्यंत युद्धातील पराजय आणि जमीनविक्री यांमुळे त्यांचा त्यांच्या आफ्रिकेतील जवळजवळ सर्व ठाण्यांवरील ताबा नाहीसा झाला होता. १८३०नंतर युद्धात अल्जेरिया जिंकून फ्रेंचांनी पुन्हा नव्या जोमाने आफ्रिकेत वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस आफ्रिकेत फ्रान्सच्या वसाहतींचे वेगवेगळे 'समूह' बनलेले दिसतात. आफ्रिकेच्या पश्चिमेला असलेल्या त्यांच्या वसाहती 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' या सामूहिक नावाने ओळखल्या जात. त्यात आजचे आयव्हरी कोस्ट, बेनिन, बुर्किना फासो, गिनी, मॉरीटानिया, नायजर, माली, आणि सेनेगाल हे आठ देश येतात. यांच्या बरोबरच आजचा टोगो हा देश आणि कॅमेरून देशाचा मोठा भाग हेही फ्रेंच वसाहतीत होते, आणि काही ठिकाणी या भूभागांना 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' गटाशी जोडले गेलेले दिसले तरी अधिकृतरीत्या हे दोन भूभाग 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' समूहात धरले जात नसत. त्यालगतच्या 'फ्रेंच नॉर्थ आफ्रिका' नावाच्या समूहात आजचे मोरक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया हे तीन देश येतात. त्यांना आजही 'माग्रेब' असे म्हणले जाते आणि तेथून येऊन फ्रान्समध्ये स्थिरावलेल्या लोकांना व त्यांच्या वंशजांना 'माग्रेबँ' (माग्रेबी) अशी संज्ञा आहे. 'फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिका' नावाच्या वसाहत-समूहात आजचे रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबोन, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, आणि चाड हे देश येतात.
या तीन मुख्य समूहांव्यतिरिक्त आफ्रिकेच्या पूर्व आणि आग्नेयेकडेही फ्रेंचांच्या वसाहती होत्या. इथिओपियाला खेटून असलेला आजचा जिबूती हा देश वसाहतकाळात 'फ्रेंच सोमाली लँड' किंवा 'ओबोक टेरिटरी' या नावाने ओळखला जात असे. आफ्रिकेच्या आग्नेयेकडील फ्रेंचांच्या बेटांपैकी मॉरिशस आणि सेशेल्स ही बेटे एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ब्रिटिशांनी जिंकून घेतली. परंतु तेथील मदागास्कार बेट आणि त्याच्या आजूबाजूला असलेले मायोत द्वीपसमूह, कोमोरेस द्वीपसमूह, आणि रियूनिअन बेट ह्या फ्रेंच वसाहती होत्या. यातील मदागास्कार आणि जिबूती आज स्वतंत्र देश आहेत तर इतर द्वीपसमूह आजही फ्रान्सचीच भूमी आहे.
आजच्या आफ्रिकेतील २९ देश फ्रेंच भाषिक आहेत. त्यातील ११ देशांमध्ये फ्रेंच ही एकमात्र अधिकृत भाषा आहे तर १० देशांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा आहे. उर्वरित ८ देशांमध्ये फ्रेंच ही मुख्य भाषांपैकी एक आहे. गमतीची गोष्ट म्हणजे या फ्रेंच भाषिक देशांपैकी 'डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो' हा आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा देश फ्रेंचांची नव्हे तर चक्क बेल्जियनांची वसाहत होता!
भारतात ज्याप्रमाणे ब्रिटिश, पोर्तुगीज, आणि फ्रेंचांनी आपापली भाषा आणि संस्कृती आणून त्याचा प्रसार केला, त्याचप्रमाणे आफ्रिकन देशांतही युरोपीय देशांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपापल्या भाषा व संस्कृती प्रचलित केल्या. या बाबतीत भारतातील आणि आफ्रिकेतील वसाहतींच्या व्यवस्थापनेत बरेच साम्य दिसते. मुख्य फरक हा की ब्रिटिश वसाहतीत स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्यावर बंदी नव्हती. तसे पाहता फ्रेंचांच्या आफ्रिकन ठाण्यांमध्ये सतराव्या शतकापासूनच फ्रेंच भाषा आली होती, परंतु भाषा व संस्कृती रीतसर शिकवण्यासाठी पहिली शाळा सेनेगालच्या सेंट लुई येथे १८१७ साली उघडल्याची नोंद मिळते. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून फ्रेंच वसाहतींमध्ये फ्रेंच भाषा शिकणे सक्तीचे झाले आणि स्थानिक भाषांच्या वापरावर मर्यादा घातल्या गेल्या. याचा एक परिणाम असा झाला की फ्रेंच वसाहतींतील विविध जमातींच्या आफ्रिकन लोकांना आपापसात बोलण्यासाठी सामाईक भाषा मिळाली आणि स्थानिक फ्रेंच सरकारी व्यवस्थापनात व व्यापारात नोकरीच्या संधी मिळू लागल्या, तर दुसऱ्या बाजूला वसाहतीतील लोक आपल्याच भाषा व संस्कृतीपासून दुरावले आणि युरोपीय संस्कृतीच्या जवळ गेले. या वसाहती दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू जसजशा स्वतंत्र होत गेल्या तसतसे त्यांच्यात आपल्या भाषा आणि संस्कृतीचा अभिमान पुन्हा निर्माण झाल्याचे दिसते.
भारतात जशा प्रकारे अनेक व्यक्तींच्या मातृभाषेचा प्रभाव त्यांच्या इंग्रजी बोलण्यावर दिसतो तसेच आफ्रिकेतही फ्रेंच भाषेवर स्थानिक आफ्रिकन भाषेचे संस्करण झालेले दिसते. फ्रान्समध्ये याला फ्रेंचचे 'आफ्रिकीकरण' म्हणतात. अनेक आफ्रिकन वंशाच्या नामवंत फ्रेंच लेखकांनी अशा मिश्र फ्रेंचचा आपल्या लिखाणात वापर केला आहे. मजेची गोष्ट अशी आहे की २०५०पर्यंत जगातील फ्रेंच बोलणाऱ्या लोकांपैकी ८०% लोक आफ्रिकेतील असतील, त्यामुळे बहुतांश बोली-फ्रेंचचे स्वरूप जास्त आफ्रिकी झालेले असेल असा अंदाज आहे.
फ्रेंच वसाहतींचे व्यवस्थापन व त्याचा परिणाम
आफ्रिकन वसाहतींच्या काही अभ्यासकांच्या मते आफ्रिकेतील विविध युरोपीय वसाहतींच्या व्यवस्थापनामध्ये बरीच तफावत दिसून येते. या वसाहतींपैकी बेल्जियन, फ्रेंच, जर्मन, इटालियन, पोर्तुगीज, आणि स्पॅनिश वसाहतींमध्ये प्रत्यक्ष सत्ता (डायरेक्ट रूल) राबवली गेली तर ब्रिटिश वसाहतींमध्ये अप्रत्यक्ष सत्ता राबवली गेल्याचे दिसून येते. फ्रेंच वसाहतींमध्ये स्थानिक जनतेच्या भावना, त्यांच्या गरजा, त्यांची संस्कृती, यांकडे विशेष लक्ष न देता फ्रान्समध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांना जे जे योग्य वाटेल ते ते आफ्रिकन वसाहतीमध्ये राबवण्याकडे विशेष लक्ष दिले गेले. याउलट ब्रिटिशांनी आपल्या वसाहतींमधील स्थानिक राजकीय चौकट मोडली नाही आणि ब्रिटिशांचे अधिपत्य, नियम व आज्ञा मान्य करून स्थानिकांनीच वसाहतींच्या व्यवस्थापनामध्ये भाग घ्यावा यावर भर देण्यात आला (इंडायरेक्ट रूल). तुलनात्मक दृष्ट्या असेही म्हणले जाते की विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रेंच वसाहतींपेक्षा ब्रिटिश वसाहतींमध्ये जास्त प्रगती झालेली होती.
वसाहत असल्याने फ्रेंच आफ्रिकेमध्ये कल्पनेतील रामराज्य अजिबात नव्हते. मनमानी कारभार, भ्रष्टाचार, विविध जमातीतील आपापसातले बेबनाव व हाणामाऱ्या, त्यात आपली पोळी भाजून घेणारे संधीसाधू अधिकारी या सगळ्यांची रेलचेल होती. असे असले तरी आफ्रिकेतील कला, इतिहास, संस्कृती यांच्याबद्दल फ्रेंचांना आकर्षण होते. १८४८मध्ये 'फेब्रुवारी क्रांती'च्या प्रभावात असलेल्या फ्रेंच रिपब्लिकने त्यांच्या 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका' या वसाहतीत स्थानिक लोकांना राजकीय हक्क आणि फ्रेंच नागरिकत्व दिले होते. या सुधारित स्थितीमुळे आफ्रिकन वंशाच्या नागरिकांचे फ्रान्सबरोबरचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध अधिक दृढ झाले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या आणि फ्रेंच सरकारशी प्रामाणिक असलेल्या 'फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशन'चे अस्तित्व १९५८पर्यंत टिकून होते. पुढे १९६०मध्ये या वसाहतीचे विभाजन होऊन स्वतंत्र देश निर्माण झाले असले तरी त्यांचे फ्रान्सशी असलेले संबंध आजही दृढ आहेत. वर उल्लेखलेल्या सेनेगाल देशातील सेंट लुईस आणि दाकार ही मुख्य शहरे १८९५पासून १९६०पर्यंत या फ्रेंच वेस्ट आफ्रिका फेडरेशनच्या राजधानीची शहरे होती.
'फ्रेंच नॉर्थ आफ्रिका' किंवा 'माग्रेब' म्हणजेच आजचे मोरोक्को, ट्युनिशिया आणि अल्जेरिया हे वर आले आहेच. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ऑटोमन साम्राज्याच्या कमकुवतपणाचा फायदा घेत फ्रेंच सैन्याने अल्जेरियाचा ताबा घेतला. फ्रान्सच्या दक्षिणेचा भूमध्य समुद्र पार केला की नैर्ऋत्य दिशेला अल्जेरियाचा किनारा लागतो. त्यामुळे फ्रेंच सरकारने अल्जेरिया ही फ्रान्सचीच भूमी असल्याचा जाहीरनामाच दिला. लवकरच फ्रान्समधील अनेक लोक तेथे कामासाठी किंवा जमीनदार म्हणून येऊन राहू लागले. परंतु अल्जेरियातील अरब, तुर्की आणि स्थानिक वंशाच्या नागरिकांशी त्यांचा सतत सांस्कृतिक आणि राजकीय संघर्ष होत राहिला. अनेकदा या संघर्षाचे रूपांतर रक्तपातात झाले. अल्जेरियाला १९६२ साली स्वातंत्र्य मिळाले, पण तेही एका भीषण युद्धानंतरच. आपल्या या क्षेत्राचा विस्तार वाढवण्यासाठी फ्रान्सने अल्जेरियाच्या पूर्व आणि पश्चिमेला वसलेल्या व समुद्र किनारा लाभलेल्या ट्युनिशिया आणि मोरोक्को या दोन देशांना आपल्या अधिपत्याखाली आणले. अल्जेरियाच्या तुलनेत हे दोन्ही देश फार कमी काळ फ्रेंचांच्या अधिपत्याखाली राहिले; आणि १९५६मध्ये स्वतंत्रही झाले. परंतु १९६२मधले अल्जेरियाचे युद्धोत्तर स्वातंत्र्य हा फ्रेंचांवर त्यांच्या वसाहतीकडून केला गेलेला सर्वांत प्रखर आघात असल्याचे मानले जाते. माग्रेबमधील बराचशा लोकांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मूळ फ्रान्समध्ये जाऊन राहायला सुरुवात केली होती. त्यातील बरेचसे लोक दोन्ही जागतिक महायुद्धांमध्ये फ्रान्सच्या बाजूने लढले होते. आजही फ्रान्समध्ये स्थलांतरित होणाऱ्या लोकांपैकी सर्वात जास्त संख्या माग्रेबींची आहे. पॅरिस, मार्सेई (मार्सेलिस), लियाँ यांसारख्या महानगरांत आणि दक्षिण फ्रान्सच्या इतर भागांत माग्रेबी लोकसंख्या मोठी आहे.
फ्रेंच नॉर्थ आफ्रिका आणि फ्रेंच वेस्ट आफ्रिका या दोन गटांव्यतिरिक्त इतर फ्रेंच वसाहतींमधील आजच्या देशांचे संबंध आजच्या फ्रान्सशी तितकेसे दृढ नसले तरी सौहार्दपूर्ण नक्कीच आहेत.
वसाहतींचे स्वातंत्र्य आणि नव्या समस्या
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात युरोप आणि आफ्रिकेत बरेच राजकीय बदल झालेले दिसतात. दोन जागतिक महायुद्धे, युरोपातील विविध राजेशाहींचा अंत, तसेच युद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेल्या कामगार वर्गाची कमतरता ह्या युरोपच्या मुख्य समस्या होत्या. याचा एक परिणाम म्हणून असे दिसते की दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेल्या वसाहतकर्त्या देशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आफ्रिकेत जोम धरू लागली, तसेच वसाहतवादात भरडल्या गेलेल्या सर्वच आफ्रिकन लोकांमध्ये बंधुत्वाची, आपण सर्व एक असल्याची भावना वाढली. १९५०नंतर बऱ्याच आफ्रिकन वसाहती हळूहळू स्वतंत्र होऊ लागल्या. परंतु त्याचबरोबर काही नवीन समस्याही निर्माण झाल्या. शीतयुद्धाच्या काळात दोन जागतिक महासत्तांनी कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी विविध आफ्रिकन देशांना आपल्या प्रभावक्षेत्रात घेतले आणि त्यामुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आफ्रिकन देशांचे पुन्हा आपापसांत पटेनासे झाले. वसाहतींच्या काळात आफ्रिका निव्वळ कच्च्या मालाचा स्रोत असल्याने तेथे कारखाने, उद्योगधंदे फारसे वाढले नव्हते. याच्या जोडीने विविध जमातींतील युद्धे, आर्थिक आणि नैसर्गिक संकटे व त्यामुळे निर्माण झालेली अन्नधान्याची कमतरता, उपासमारी, बेरोजगारी ह्या आफ्रिकेतील वसाहतींच्या मुख्य समस्या बनल्या होत्या.
यावर उपाय म्हणून आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींमधून तसेच नंतर स्वतंत्र झालेल्या देशांमधून अनेक लोक युरोप आणि फ्रान्समध्ये स्थलांतरित झाले. छोट्या प्रमाणावरील स्थलांतरे सतत होत होती, परंतु मोठ्या प्रमाणावर एकत्रितरीत्या स्थलांतर होण्याच्या तीन मुख्य घटना फ्रेंच इतिहासात दिसून येतात. त्या सन १९००, १९२०चे दशक आणि १९६० ते ७०-७५ या कालावधीत झाल्या. त्यांना 'स्थलांतराच्या मोठ्या लाटा' अशा अर्थाचे संबोधन आहे. या आफ्रिकन स्थलांतरित लोकांबद्दल फ्रेंच सरकारने 'बंधुत्व आणि समता' ही धोरणे सुयोग्यरीत्या राबवली असली तरी 'समावेश' ही संकल्पना सांस्कृतिक आणि धार्मिक मर्यांदांमुळे नीटशी राबवता आली नाही असे दिसते. समावेश होण्यासाठी करावे लागणारे व्यक्तिगत प्रयत्न दोन्ही बाजूंच्या सर्व लोकांकडून संपूर्णपणे झालेले दिसत नाहीत. याचमुळे बरेचसे आफ्रिकन वंशाचे फ्रेंच लोक युरोपीय फ्रेंच लोकांशी आणि त्यांच्या संस्कृतीशी एकसंध होऊ शकले नाहीत. याचे परिणाम थोड्याफार प्रमाणात फ्रान्समध्ये अधून मधून घडणाऱ्या अशांततेच्या विविध घटनांमधून आजही दिसून येतात.
आज फ्रान्समध्ये त्यांच्या आफ्रिकेतील वसाहतींतून स्थलांतरित झालेल्या लोकांची आणि त्यांच्या वंशजांची स्वतंत्र ओळख आहे. त्यातील बहुसंख्य अजूनही फ्रान्सच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले दिसत नाहीत. असे बरेच लोक आजही बेरोजगार असून सरकारने दिलेल्या बेरोजगारी भत्त्यावर आपली गुजराण करतात. असेही म्हणले जाते की हा बेरोजगार भत्ता खर्च चालवायला पुरेसा असल्यानेच हे बेरोजगार लोक काम शोधण्याचा प्रयत्नही करत नाहीत. हे बहुसंख्य आफ्रिकन-फ्रेंच आजही 'अल्पसंख्यांक वस्त्यां'मध्ये (ghetto) वा आजूबाजूच्या जागांत एकत्र राहतात आणि फार कमी लोक संमिश्र लोकवस्तीत राहतात. याच्या दुसऱ्या बाजूला पहिले तर आयुष्यात यशस्वी वाटचाल करून समाजात मोठे स्थान मिळवलेले आफ्रिकन-फ्रेंचही अनेक आहेत. त्यातील सर्वांत जास्त लोक विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले आहेत. त्याखालोखाल राजकारणात आणि त्यानंतर मनोरंजन आणि साहित्य या क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा दिसून येते. फ्रेंच भाषिक आफ्रिका आणि फ्रान्समध्ये आजही अनेक रेडिओ चॅनल्स असून त्यावर स्थानिक आणि जगातील बातम्या तसेच मनोरंजक कार्यक्रम फ्रेंच भाषेत सादर केले जातात.
'ए व्हेरी सीक्रेट सर्व्हिस' या इंग्रजी नावाची २ सीझन्सची एक फ्रेंच, विनोदी मालिका २०१६मध्ये नेटफ्लिक्सवर आली. त्यात १९६० सालच्या फ्रेंच आफ्रिकन वसाहतींमध्ये घडणाऱ्या विविध अर्धसत्य घटना, त्यांची खबर काढायला नेमलेले गुप्तहेर, डबल एजंट आणि स्थानिक सहकारी यांची धमाल कॉमेडी होती. त्या मालिकेद्वारे निर्मात्याने विडंबन आणि आदर यांचा समन्वय साधत फ्रेंच आफ्रिकन इतिहास अर्ध-काल्पनिक आणि मनोरंजक पद्धतीत मांडला होता.
वैयक्तिक अनुभव
आमच्या दुभाष्याच्या कामामध्ये आम्हाला आमची भूमिका तटस्थ ठेवावी लागते आणि त्यात कस लागतो. एकाने काय म्हणले आहे ते दुसऱ्याला जसेच्या तसे आणि स्वतःचे विचार/ मत न मिसळता सांगायचे असते. बऱ्याचदा एक बाजू आपल्याला पटत नसली तरी ती तशीच दुसऱ्याला सांगणे महत्त्वाचे असते. काही वेळा एकाचे म्हणणे काय आहे ते दुसऱ्याला विस्ताराने समजावून सांगावे लागते, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गुप्तता पाळावी लागते. पण कामानिमित्त भेटलेल्या भारताबाहेरील लोकांची विचारसरणी, वैयक्तिक जीवन, समस्या आणि मर्यादा अशा अनेक गोष्टींचे आकलन होत जाते, आणि स्वतःचे त्यांच्याबद्दल मतही बनत जाते. चांगलेवाईट अनुभव तर खूप येतात.
सेनेगालच्या उद्योजकांबरोबर केलेल्या माझ्या पहिल्यावहिल्या अनुवाद कामानंतर मी फार्मा, खाद्यतेल, कागद, कापड इत्यादी क्षेत्रांतून आफ्रिकेत होणाऱ्या निर्यातीसंदर्भात अनेक वेळा दुभाष्याचे काम केले, परंतु तो पहिला अनुभव केवळ अविस्मरणीय आहे. मला कामानिमित्त भेटलेल्या कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि सरकारी जगातील आफ्रिकन व्यक्ती आणि तशाच स्तरातील युरोपीय व्यक्ती यांच्यात पेहेराव आणि शारीरिक फरक सोडल्यास विशेष फरक जाणवला नाही. व्यवसायाचे आकलन, संघटना कौशल्य, वाटाघाटी करतानाची मुत्सद्देगिरी सर्वच कोणत्याही तरबेज व्यवसायिकाप्रमाणे करणारे व्यावसायिक, गप्पिष्ट वाटल्या तरी अघळपघळ आणि अनावश्यक असं न बोलणाऱ्या राजकारणी व्यक्ती, कामाच्या जोडीने भारतीय संस्कृती आणि कला यांच्याबद्दल कुतूहल असणारे कॉर्पोरेट जगातले लोक सगळे तसेच. सुशिक्षित आफ्रिकन व्यक्ती बऱ्याचदा सुशिक्षित भारतीय किंवा युरोपीय व्यक्तींसारख्याच भासतात. तरी आफ्रिकन व्यक्ती थोड्या जवळच्या वाटल्या कारण त्यांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन बरेचसे भारतीयांप्रमाणे वाटले.
एकदा एका यशस्वी वाटाघाटीनंतर विशेष डिनर आखले होते. काम संपले असल्याने सर्वच आरामात होते. जेवणादरम्यान अवांतर गप्पा झाल्या. जेवणानंतर अचानक यजमानाने मला एक हिंदी वात्रटिका ऐकवून "आता हे फ्रेंचमध्ये त्याला सांग" असं सांगितलं. मामला गडबडला कारण 'साहित्यिक' भाषांतर आणि त्यातही काव्य भाषांतरित करण्यावर अनेक मर्यादा येतात. त्यात आफ्रिकन पाहुणा सरकारी अधिकारी होता. तरी त्याचं गद्य-पद्य करत अन्वयार्थ सांगून मी फळी सांभाळली. नशिबाने वारुणीने सर्वांवर कृपा केली असल्याने कोणी विशेष मनावर घेतले नाही. अशा प्रकारचे मोकळे वर्तन कोणत्याही भारतीय यजमानाने युरेपीय पाहुण्याबरोबर केलेले कधीच पहिले नाही. कदाचित आपले आफ्रिकन लोकांबरोबर जास्त जुळत असावे.
एकदा एक आफ्रिकन व्यवसायिक काही यंत्रं भारतातून आयात करण्याच्या दृष्टीने आला होता. तो विविध विक्रेत्यांना भेटी देणार होता आणि मुंबईत ३-४ दिवस राहणार होता. मला ज्या भारतीय कंपनीने अनुवादासाठी बोलावले होते त्यांनी त्याचे चांगले स्वागत केले. कंपनीने आपणहून पाहुण्याला ने-आण करण्यासाठी गाडी व जेवणाची व्यवस्था केली होती. पण जेव्हा कंपनीला पहिल्या दोन मीटिंगनंतर वाटले की ऑर्डर मिळणार नाही, तेव्हा या सर्व सोयी बंद केल्या व त्याला स्वतःची व्यवस्था स्वतः करायला सांगितले. आफ्रिकन व्यावसायिकाला ते अयोग्य वाटलं. यात कोण बरोबर कोण चूक हे सोडले तरी तो व्यवसायिक मला जे म्हणाला ते अजून आठवते. त्याने सांगितले की आफ्रिकेत जेव्हा कोणी आमच्याकडे येतो तेव्हा त्याचा पाहुणचार करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. वेळ पडल्यास त्याला आम्ही आमच्या ताटातलेही काढून देतो, त्याचा मान ठेवतो. त्याच्याकडून फायदा होईल की नाही यावर आमची वर्तणूक अवलंबून नसते. आपल्या आणि आफ्रिकन संस्कृतीमध्ये किती साम्य आहे!
समारोप
एकट्याने आपण भरभर चालतो, पण एकत्रितरीत्या दूरवर चालतो. – आफ्रिकन म्हण
आज आफ्रिकेतील बरेच देश प्रगतीपथावर आहेत. एका बाजूला हुकुमशाही, भ्रष्टाचार, बेकारी, नैसर्गिक आपत्ती, अन्नटंचाई, रोगराई यांच्याशी झुंजत असताना दुसऱ्या बाजूला पर्यटन, कच्चा माल, खनिजे, तेल इत्यादींचे उत्पादन यांच्याद्वारे स्वतःचे आर्थिक बळ वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. आफ्रिकेतील ५५ देशांची 'आफ्रिकन युनियन' ही सर्वांत मोठी संघटना असून शाश्वत विकास, सामंजस्य, तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती, मानवी हक्क अशा अनेक मुद्द्यांवर आपापसात समन्वय साधण्याचे कार्य ती करत असते. फ्रेंचच्या जोडीने स्वाहिली, अरबी, इंग्रजी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश या मुख्य भाषांमध्ये या संघटनेचा व्यवहार चालतो.
भारतात नुकत्याच संपन्न झालेल्या G20 परिषदेत सुसंघटित अशा 'आफ्रिकन युनियन'ला कायमस्वरूपी सभासदत्व देण्यात आले आहे. याचा आफ्रिकेतील समाजाच्या आणि तेथील उद्योगधंद्याच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लागेल असा विश्वास अनेक देशांनी व्यक्त केला आहे. भारत-आफ्रिका आयात निर्यातीला यातून फायदा होईलच, पण त्याच जोडीने विविध भाषा जाणणाऱ्यांसाठी कामाची नवी दालने उघडतील अशी अशा आहे. या मार्गाने फ्रेंच भाषिक आफ्रिका आणि भारत यांचे चांगले संबंध अधिक वृद्धिंगत होवोत हीच सदिच्छा!
प्रतिक्रिया
लेख आवडला
चांगला आढावा घेतला आहे. शिवाय वैयक्तिक अनुभवांमुळे अधिक संपन्न झाला आहे.
धन्यवाद.
धन्यवाद.
लेख आवडला. आणखी रंजक माहीती
लेख आवडला. आणखी रंजक माहीती येऊद्या.
आफ्रिका विषयी एक सॉफ्ट कॉर्नर आहे
खनिज संपत्ती भरपूर,निसर्ग संपत्ती भरपूर, शारीरिक क्षमता भरपूर.
पण ह्या राष्ट्रांना अगदी हतबल करून ठेवले आहे.
आफ्रिकन लोक हो कोणती ही भाषा बोला पण तुमच्या प्रदेशात तुमचीच सत्ता असली पाहिजे हे कधी विसरु नका
.
आफ्रिकेतील तमाम देशांपैकी ज्याज्या देशांच्या वकिलाती अथवा कॉन्सुलाती भारतात असतील, त्यात्या तमाम वकिलाती तथा कॉन्सुलाती यांमधील तमाम संबंधित अधिकारी प्रस्तुत आवाहनाची दखल घेऊन ते आपापल्या सरकारांस पुढे पाठवू शकतील काय?
(आफ्रिकेतील ज्या देशांच्या वकिलाती अथवा कॉन्सुलाती भारतात नाहीत, त्यांच्या सरकारांना हा निरोप आफ्रिकेतील ज्या देशांच्या वकिलाती अथवा कॉन्सुलाती भारतात आहेत, अशा देशांपैकी एका अथवा अनेक देशांच्या भारतातील वकिलाती अथवा कॉन्सुलाती यांतील संबंधित अधिकाऱ्यांनी पोहोचता केला, तरीही हरकत नाही. अखेरीस, सांगोवांगीच्या (वर्ड ऑफ माउथ) प्रसाराइतका प्रभावी प्रसार अन्य कोणता नसावा. (चूभूद्याघ्या.))