दक्षिण आफ्रिकी जॅझ : अन्यायाची रूपांतरं

#जॅझ #भाषांतर #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

दक्षिण आफ्रिकी जॅझ : अन्यायाची रूपांतरं

मूळ लेखक - सुरेन पिल्ले

- अनुवाद -सई केसकर

येत्या शनिवार-रविवारी केप टाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय जॅझ महोत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्तानं, 'जॅझ' या संगीत प्रकारचं या देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय प्रवासात काय स्थान आहे याकडे मागे वळून बघावंसं वाटलं. या देशात, जॅझ फक्त जॅझ नाही; या संगीताला अनेक आयाम आहेत. 'केप फ्लॅट्स'वर राहणाऱ्या कुटुंबांच्या अनेक पिढ्यांच्या रोजच्या आयुष्यात 'जॅझ नृत्य' हा नृत्यप्रकार अजूनही टिकून आहे. लॅटिन अमेरिकी लोकांसाठी जसा 'साल्सा' आहे, तशीच 'जॅझिंग'ची परंपरा केप फ्लॅट्सवरच्या समुदायांमध्ये आहे. १९५० नंतर दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णभेदासाठी म्हणून भौगोलिक सीमारेषा कायदेशीररीत्या आखल्या गेल्या. याला इंग्रजीत 'अपारटाइड' (apartheid) असा शब्द वापरला जातो. या फाळणीनंतर केप टाऊनमधल्या कृष्णवर्णीय वसाहतींना स्थानिक भाषेत 'केप फ्लॅट्स' असं संबोधलं जाऊ लागलं. डोंगरदऱ्यांचे, आणि केप द्वीपकल्पाजवळचे निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचे भाग गोऱ्या युरोपीय वंशांच्या लोकांसाठी राखून ठेवले गेले. तिथून कृष्णवर्णीयांना हुसकावून लावलं. 'केप फ्लॅट्स'मधल्या भागांचीही 'मिश्रवर्णीय', 'आफ्रिकी कृष्णवर्णीय' आणि 'भारतीय वंशा'च्या लोकांमध्ये विभागणी झाली. या अशा करकचून आवळलेल्या भेदभावातून मुक्तपणे वाहू शकणारी एकच सांस्कृतिक परंपरा होती: 'केप जॅझ' किंवा 'दक्षिण आफ्रिकी जॅझ' संगीत. मी 'परंपरा' हा शब्द विशेष जागरूकतेनं वापरला आहे. परंपरा म्हणजे आधुनिकतेच्या आधीचं काही, असा रूढ अर्थ घेतला जातो. पण इथे परंपरेचा प्रवाहीपणा मला अधोरेखित करायचा आहे. एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे जाणारी म्हणून ती परंपरा आहे. पण असं हस्तांतरण होत असताना, मोडली जाणारी आणि पुन्हा नव्यानं जन्म घेणारीही आहे!

दक्षिण आफ्रिकेत मात्र, 'ही दक्षिण आफ्रिकी परंपरा' अशा एकाच कुठल्यातरी परंपरेचं उदाहरण देणं अवघड आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही असतीलही, पण जो समाज लोकांना एकमेकांपासून प्रयत्नपूर्वक विभागलेले ठेवून तयार झाला आहे, त्या समाजातल्या परंपरादेखील विखंडित, विभक्तपणे पुढे जाणाऱ्या आहेत. जिथे वेगवेगळ्या वंशांच्या लोकांचं जगणं, त्यांची कला, त्यांचे प्रेमसंबंध, त्यांचे खेळ, इतकंच नव्हे तर त्यांचे विचारही वेगळे ठेवण्याची सक्ती होती; तिथे एकसंध अशी सामायिक परंपरा रुजणं अवघडच. अशा वातावरणात, लोकांना या सीमा ओलांडायला लावणारा असा एक सांस्कृतिक वारसा जॅझ संगीतामुळे मिळाला.

विसाव्या शतकात, गोऱ्या भांडवलदारांनी आफ्रिकी लोकांचं आफ्रिकेतल्या इतर देशांतून दक्षिण आफ्रिकेत सक्तीनं स्थलांतर घडवून आणलं. अशा स्थलांतरामुळे आलेलं तुटलेपण घेऊनच लोक या शहरी वस्त्यांमध्ये राहू लागले. त्यांच्या मूळ देशांपेक्षा अधिक शहरी, अनेक वंशांच्या लोकांची सरमिसळ असलेला हा देश होता. इथे रुजल्यावर, त्यांच्या मायदेशांतल्या परंपरांचंही शहरीकरण झालं; त्या बदलल्या, पुन्हा जन्माला आल्या आणि त्यांना नवीन आयाम मिळाले. 'मराबी'सारखं नवीन जॅझ उदयाला येऊ लागलं. मराबीची प्रेरणा अमेरिकेतल्या आफ्रिकी जॅझमधून, स्विंग आणि बीबॉपमधून आली होती असं त्या काळातले संगीतकार सांगतात. सुरुवातीला जे बँड मराबी संगीत वाजवायचे ते सगळेच अमेरिकी जॅझचं अनुकरण करत असायचे. अमेरिकी संगीताच्या किती जवळ जाणारं आहे हा त्या बँडच्या यशस्वी असण्याचा निकष असायचा. नुसतं संगीतच नाही, तर बँडच्या सदस्यांच्या वेशभूषादेखील अमेरिकी असायच्या. त्याचबरोबर हे बँड 'मॅनहॅटन ब्रदर्स' (Manhattan Brothers), 'जॅझ एपिसल्स' (Jazz Epistles) अशी अमेरिकी वाटणारी नावंही घ्यायचे. सुरुवातीला जरी हे संगीत नक्कल करून जन्माला आलं असलं, तरी कालांतरानं या संगीतावर एक आफ्रिकी प्रभाव पडला. ह्यू मॅसकेलं (Hugh Masekela) अशी एक सुंदर आठवण सांगतो. मरियम मकेबा आणि हॅरी बेलाफॉन्टे यांच्या प्रयत्नांनी ह्यूला न्यूयॉर्कमध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. अमेरिकी जॅझ संगीताचं मानक असलेलं 'अमेरिकन साँग बुक' त्यानं लगेच आत्मसात केलं (https://en.wikipedia.org/wiki/Great_American_Songbook). पण देश सोडल्यानंतर आलेल्या निर्वासितपणात, अमेरिकी किंवा युरोपीय जॅझ संगीत वाजवणाऱ्या असंख्य संगीतकारांमध्ये दिसेनासं होण्याची शक्यता त्याला स्पष्ट दिसू लागली. आपल्याला, आपली ओळख टिकून राहील असं काही वेगळं या संगीतात आणायला हवं या जाणिवेतून 'मराबी' संगीतात असलेले आफ्रिकी घटक त्यानं खुलवले. यामुळे जॅझला आलेलं सरसकटपणही काहीसं कमी झालं.


निर्वासित असण्याच्या या दुःखातून अनपेक्षितपणे निपजलेली एक चांगली गोष्ट अशी की या तुटलेल्या भूतकाळातून भविष्याकडे घेऊन जाणारा आधुनिक 'दक्षिण आफ्रिके'चा सूर जॅझमध्ये सापडतो. १९८०च्या दशकात देशात आणीबाणी लागलेली असताना, काही संगीत क्लबांत सगळे वर्ण निर्भीडपणे एकत्र येत असत आणि जॅझ ऐकत असत. जॅझ संगीताच्या नावाखाली या क्लबांतून अपारटाइडविरोधी कारवाया चालायच्या. राजकीय भेटीगाठींवर बंदी असतानाच्या या दिवसांत अनेक जॅझ संगीतकार अशा भेटींसाठी आनंदानं त्यांच्या संगीताचं निमित्त पुरवायचे.

बॅझल कोत्झी (Basil Coetzee) आणि रॉबी जॅनसेनसारखे (Robbie Jansen) संगीतकार केप टाऊनमध्ये अशा क्लबांतून त्यांचं संगीत पेश करायचे. या दोघांनी मायदेशातच राहायचा निर्णय घेतला. दोघेही जॅझ 'जिनियस' समजल्या जाणाऱ्या अब्दुल्ला इब्राहिममुळे देशात आणि देशाबाहेरही प्रसिद्धीच्या झोतात आले होते. दोघेही अब्दुल्लांकडे, वेगवेगळ्या काळांत, सॅक्सोफोन वाजवायचे. पैकी, बॅझलला लोक बॅझल 'मॅनेनबर्ग' कोत्झी या टोपणनावानं ओळखू लागले. याचं कारण, मॅनेनबर्ग असं शीर्षक असलेल्या अल्बममध्ये, त्याच नावाच्या अब्दुल्लांच्या रचनेत त्यानं सॅक्सोफोनवर एक अप्रतिम तुकडा वाजवला होता. मॅनेनबर्ग ही केप फ्लॅट्सवरची एक कामगार वस्ती. अपारटाइड लागू होण्याआधी डिस्ट्रिक्ट सिक्स यासारख्या भागांमध्ये सगळ्या वर्णांचे लोक राहत असत. 'डिस्ट्रिक्ट सिक्स' हे श्वेतवर्णीयांसाठी राखीव केल्यानंतर तिकडचे इतर वर्णांचे बरेच लोक मॅनेनबर्गमध्ये येऊन वसले.

बॅझिल मॅननबर्ग
बॅझल 'मॅनेनबर्ग' कोत्झी सादरीकरणादरम्यान, छायाचित्र : सुरेन पिल्ले

कोत्झी आणि जॅनसेन दोघेही प्रतिभावंत कलाकार होते पण देश सोडून न जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या नशिबी अनेक आर्थिक चढ-उतार आले. कोत्झी अनेक वर्षं जोडे दुरुस्त करायचं काम करत असे. कृष्णवर्णीय जॅझ संगीतकारांसाठी दक्षिण आफ्रिकेत राहणं ही एक मोठीच आर्थिक जोखीम होती. श्वेतवर्णीय संगीतकारांना जशी रेडिओवर, क्लबांमधून संधी मिळायची आणि अधिकृत मान्यता असायची, तशी त्या काळात कृष्णवर्णीय संगीतकारांना कधीच मिळाली नाही. त्यांचा उदरनिर्वाह चालेल इतकीही मिळकत संगीतातून व्हायची नाही. ते कसेतरी तग धरून राहिले असले, तरी त्यांचं आयुष्य एक तारेवरची अखंड कसरतच होती.

आता कोत्झी आणि जॅनसेन हयात नाहीत. त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास चिवट जगण्यानं आणि अशा जगण्यातल्या लहानसहान आनंदाच्या क्षणांनी सुसह्य केला असावा. अब्दुल्ला इब्राहिम यांनी १९७० च्या दशकात सुफ़ी इस्लाम स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं. योगासनं आणि मार्शल आर्ट्सचा सराव करता करता, त्यातलं काही त्यांच्या संगीतातही उतरलं. आपल्याच देशात हद्दपार होण्याचं दुःख ते शिस्तबद्ध आयुष्य जगून सोसू शकले. हातातला वेळ आणि संगीताचा ध्वनी - दोन्ही एका लयीत ते बसवू शकले. केप फ्लॅट्सवर राहणाऱ्या लोकांबद्दल एक सरसकटीकरण केलं जातं: ते भरभर बोलतात; अशा घाईत बोलतात की समोरच्या कुणी त्यांचं वाक्य तोडायच्या आत ते संपवलं पाहिजे असा त्यांनी चंग बांधलेला असावा. जलदही बोलतात आणि मोठ्या आवाजातही. इब्राहिम मात्र याला अपवाद आहेत. हळुवार, विचारी आणि शांत. ते कधीच जाहीर बोलत नाहीत. प्रचार करत नाहीत किंवा आपली मतं कर्कश्यपणे व्यक्त करत नाहीत. त्यांच्या भोवती एक गूढतेचं वलय आहे. कुणालाही न समजणारे, आणि त्यांच्या साधेपणामुळे एखाद्या कोड्यासारखे भासणारे!

अब्दुल्ला इब्राहिम
अब्दुल्ला इब्राहिम (केप टाऊन, १९९८) छायाचित्र : सुरेन पिल्ले

म्हणूनच त्यांचा मी घेतलेला एक फोटो इथे दिला आहे. मागच्या प्रकाशामुळे काहीसा धूसर भासणारा, पण ओळखीचा, ओळखू येणारा. समोर असूनही काहीसे दुर्बोध, काहीसे अलिप्त – त्यांच्याबरोबर कधीच एकरूप होता येणार नाही असं वाटायला लावणारे. त्यांच्या मनात काय चालू असेल आणि ते त्यांच्या बोटांतून पियानोवर कसं उतरेल, हे सांगता येत नाही. जलश्यांत, मैफिलींतून गाताना ते आल्या आल्या सगळ्यांना सलाम करतात, एखादा तास अविश्रांत वाजवतात आणि सलाम करून निघून जातात.

त्यांच्या हातात वेळ बांधून ठेवण्याचीही कला आहे, त्यांच्या संगीतातले विरामही सुरांइतकेच योजून वापरलेले असतात. योगसाधनेमुळे श्वासावर ताबा आलेला आहे. जॅझ संगीत कधीकधी गोंगाटाकडे झुकणारं असतं. हे सगळं कुठे चाललं आहे असं वाटेपर्यंत एकदम जुळून येणारं अशी त्याची रचना असते. या रचनेतूनच जॅझ संगीतकार उत्स्फूर्ततेचा (आ?)भास निर्माण करतात. पण या सगळ्या प्रांतांत सारख्या भासणाऱ्या रचनांचं स्थळ-काळाची आठवण करून देणारं नातं असतं. नावं नेहमीच कशाचीतरी आठवण करून देणारी असतात. मध्येच गुलामगिरीतून मुक्त झालेल्या मलय वंशाच्या लोकांचे गोमा ड्रम कानावर पडतात. पण अब्दुल्लांच्या संगीतात गोमा ड्रमचा आवाजही हलका असतो, तरल असतो आणि त्याच्या आदिम, सोप्या स्वरूपात ऐकू येतो. अशा रचनांतून ते परिचित आणि अपरिचित एकमेकांत गुंफत जातात आणि आपणही आपल्याला जे माहिती आहे त्यात अडकत जातो, आणि जे माहीत नाहीत त्याबद्दल आपलं कुतूहल जागृत होतं.

या तिघांबद्दलच लिहून थांबलो, तर हे संगीत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसं उलगडत, उमलत गेलं हे सांगायचं राहून जाईल. अब्दुल्ला, कोत्झी आणि जॅनसेन हे या परंपरेतले बुजुर्ग. पुढच्या पिढ्यांच्या जॅझला या तिघांचा वारसा नक्कीच आहे. तरीही, प्रत्येक पिढीनं त्यात त्यांची अशी काही भरही घातली आहे. सध्याच्या पिढीतले काही संगीतकार बघितले, उदाहरणार्थ एन्डुतो माकातिनी (Nduduzo Makhatini), बोकानी डायर (Bokani Dyer), काइल शेपर्ड (Kyle Shepherd), आफ्रिका एमकीझे (Afrika Mkhize) यांसारख्या कलाकारांचं जॅझ ऐकलं की अब्दुल्ला इब्राहिम – हिल्टन शिल्डर (Hilton Schilder) – तैवा मोलेलेक्वा (Taiwa Molelekwa) ते झिम इंग्कावाना (Zim Ngqawana) या सगळ्या प्रतिभावंत कलाकारांचा प्रवास ऐकू येतो. यात पुढे जर बेस (गिटार), ट्रम्बोन, सॅक्सोफोन, ट्रम्पेट वाजवणाऱ्या कलाकारांची नावं घ्यायला सुरुवात केली तर ती यादी कधी संपणारच नाही. पण आताची पिढी परंपरेला पुनरावृत्तीत अडकवून न ठेवता, तिच्याकडे एखाद्या कोऱ्या कॅनव्हाससारखं बघू शकते, ज्या कॅनव्हासवर आधीच्या पिढीकडून मिळालेलं सगळं आत्मसात करून काही नवीन निर्माण होऊ शकेल. ही पिढी दक्षिण आफ्रिकेतल्या स्थानिक ध्वनींना वैश्विक आवाज देते आहे.

ज्या सामाजिक परिस्थितीतून हे संगीत जन्माला आलं तिचा विचार केला तर कदाचित हे वर्णन अतिरम्य वाटेल. पण एखाद्या जॅझ-जलश्याच्या गर्दीत शिरल्यावर, अन्यायातून, अंधारातूनही काहीतरी सुरेल, स्वप्नील जन्माला येऊ शकतं यावर विश्वास बसतो. अपारटाइड काळातला अन्याय आणि अपारटाइड संपल्यानंतरच्या दिशाहीनतेमधला जॅझ हा लहानसा कवडसा आहे. परंपरेतही नवीन काहीतरी जन्माला घालण्याची ताकद असते या एका शक्यतेतूनच अशा रम्य, भाबड्या आशावादाचा जन्म होतो.

Kyle Shepherd Trio "Coline's Rose" [Jazz Audio - South Africa]

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अंकात हा लेख घेतल्याबद्दल आभार! दक्षिण आफ्रिकेतल्या जॅझ परंपरेबद्दल माहीत नव्हते. "मराबी" विडियोतला तुकडा आवडला, आणि कैल शेपर्डचा भन्नाट आहे! लेख अजून विस्तृत असायला हवा होता असं वाटलं, पण विडियोंमुळे जास्त प्रभावी झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0