डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो : खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश

 #जोबुर्ग #जोहानसबर्ग #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो : खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश

- - अबापट

काँगो (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) हा मध्य आफ्रिकेतील एक मोठा देश (आकाराने आफ्रिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा, सर्वात मोठा अल्जीरिया). साधारण १८८५पासून या देशातील लोकांचे जे हाल सुरू आहेत ते अजूनही संपण्याची शक्यता दिसत नाहीये. याची सुरुवात कुठून झाली याबद्दल फार पाल्हाळ न लावता संक्षिप्त लिहितो.

काँगोचा नकाशा

साधारण या काळापर्यंत (म्हणजे १८७०-१८८०) आफ्रिकेच्या या भागात नक्की काय आहे याबद्दल युरोपातील सत्तांना फारशी माहिती नव्हती.

हेन्री मॉर्टन स्टॅनली नावाच्या पत्रकार/ एक्सप्लोररने (तोच तो "Dr. Livingstone, I presume." हे कथित वाक्य उच्चारणारा) १८७४-७७ या काळात आपली पहिली ट्रान्स आफ्रिका मोहीम केली. यात आफ्रिका खंडाच्या पूर्वेला झांजिबारमध्ये उतरून काँगो नदीचा उगम शोधून पश्चिमेकडे काँगो नदी जिथे अटलांटिक महासागराला मिळते तिथपर्यंतचा मार्ग शोधून काढला. (तोपर्यंत या भागाबद्दल पाश्चिमात्य देशांमध्ये काहीही माहिती नव्हती.)

स्टॅन्लीने वृत्तपत्रांमध्ये या शोधाबद्दल भरपूर प्रसिद्धी घडवून आणली, युरोप व अमेरिकेत भरपूर व्याख्याने दिली. एकीकडे बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याला (इतर सर्व युरोपीय सत्तांकडे वसाहती आहेत, त्यातून ते अमाप धन गोळा करत आहेत हे बघून) आपल्याकडे एकही वसाहत नाही याची खंत होती. स्टॅन्लीचे रिपोर्ट वाचून त्याने स्टॅन्लीला काँगोमध्ये आपली वसाहत करण्यासाठी नेमले. हे करण्यासाठी त्याला साधनसामुग्री, आर्थिक बळ दिले.

स्टॅन्लीने काँगो खोऱ्यात जाऊन तिथल्या सर्व भूभागांमध्ये स्थानिक टोळीप्रमुखांशी कधी तह करून, बहुतांश वेळा जोरजबरदस्ती करून राजा लिओपोल्ड दुसरा याची खाजगी वसाहत स्थापली (१८७७). याचे नाव 'काँगो फ्री स्टेट'. स्थानिक लोकांवर जुलूम करून आधी हस्तिदंत, लाकूड आणि नंतर नैसर्गिक रबर अशी साधनसंपत्ती तिथून लुटायला सुरुवात केली. काँगो नदीचे पात्र खूप मोठे आहे. त्यातून जलवाहतूक सहज शक्य होती. लिओपोल्डच्या सैन्याने वाफेवर चालणारी जहाजे आणून ही सामुग्री अटलांटिक समुद्रापर्यंत सुरळीत पाठवण्याची व्यवस्था निर्माण केली. यानंतर रस्त्यांचे जाळेही तयार करण्यात आले. या वस्तू अतिशय किमती असल्याने आणि जवळजवळ फुकट मिळत असल्यामुळे यातून लिओपोल्ड दुसरा याने अमाप धन कमावले. १९००च्या सुमाराला लिओपोल्डचे एजंट करत असलेले भयानक अत्याचार आणि जुलूम यांबद्दल युरोपातील इतर देशांमध्ये माहिती पसरू लागली. मग त्याच्यावर दबाव आणून त्याची ही खाजगी वसाहत बेल्जियमने ताब्यात घेतली आणि त्याचे नाव बदलून बेल्जियन काँगो झाले. अत्याचार आणि (अधिकृत) लुटालूट काही कमी झाले नाही. (उदा : रबर गोळा करण्याचा कोटा पूर्ण केला नाही, तर थेट हात तोडून टाकणे.)

१९६० साली बेल्जियन अधिपत्याखाली असलेल्या या देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु बेल्जियन लोकांचा प्रभाव पूर्णपणे गेला नव्हता.

स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान होते पॅट्रिस लुमुम्बा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही महिन्यांतच राजकीय लाथाळी सुरू झाली आणि लष्करप्रमुख मोबुटूने (जोसेफ मोबुटू उर्फ मोबुटू सेसे सेको) सत्ता काबीज केली. पॅट्रिस लुमुम्बा यांना पकडून काटांगा राज्यात नेऊन हालहाल करून अतिशय निर्घृण पद्धतीने मारून टाकण्यात आले. (आधी गोळ्या घालून, मग शरीराचे तुकडे करून ते ॲसिडच्या पिंपांमध्ये विरघळवून टाकले.)


अमेरिका आणि बेल्जियमच्या मते पॅट्रिस लुमुम्बा रशियाकडे झुकत होता. एवढे कारण त्याला मारून टाकायला त्यांना पुरेसे वाटले. २००१मध्ये उघड (declassify) झालेल्या कागदपत्रांमधून हे पुढे आले की लुमुम्बाला मारण्याचा कट सीआयएने एकापेक्षा जास्त वेळा रचला होता.
ब्रिटनलाही लुमुम्बा धोकादायक वाटत होता. ब्रिटनच्या काँगोमधील खाणउद्योगांच्या बाबतीत लुमुम्बा अडचणीचा ठरला असता असे मत होते.

अखेर लुमुम्बा यांना कुणी आणि कसे मारले याबद्दल विविध माहिती उपलब्ध आहे, परंतु बेल्जियन सरकारचा हे सगळे घडवून आणण्यात मोठा हात होता हे नक्की आहे.

सुरुवातीची राजकीय लठ्ठालठ्ठी काही वर्षे सुरू राहिली आणि अखेर १९६५मध्ये मोबुटू या लष्करप्रमुखाने सत्ता हातात घेतली. १९९७पर्यंत डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशात हुकूमशाही सत्ता राहिली. (मधल्या काळात त्याने देशाचे नाव बदलून झाईर (Zaire) केले, त्याच्या मृत्यूपर्यंत देशाचे नाव तेच राहिले.)

लिओपोल्ड दुसरा आणि बेल्जियमच्या वसाहतीच्या काळात काँगोमधून हस्तिदंत आणि रबर हे जमिनीवर मिळणारे किमती ऐवज लुटण्यात आले. वसाहतीच्या शेवटच्या काळापासून आजपर्यंत काँगोमधील खनिज संपत्तीवर विविध परकीय देश व काँगोमधील हुकूमशहा यांनी डल्ला मारला आहे आणि अजूनही ते काम सुरूच आहे.

काँगोमध्ये हिरे आणि सोन्याच्या खाणी आहेतच परंतु त्याहून महत्त्वाची खनिजे म्हणजे आधी टिन आणि तांबे, आणि नंतर कोबाल्ट, लिथियम, कोलटन (नायोबियन आणि टँटलियम यांचे खनिज) याचे मोठे साठे आहेत. युरेनियमही काही प्रमाणात आहे. (ओपनहायमरच्या पहिल्या अणुबाँबमध्ये वापरले गेलेले युरेनियमही काँगोमधूनच आणलेले होते.) काँगोच्या जमिनीत अजूनही सुमारे २४ हजार अब्ज अमेरिकी डॉलर इतकी किंमत होईल इतकी खनिज संपत्ती आहे.

मोबुटूनंतर यादवीतून पुढे आला लॉरेन्ट कबिला (१९९७ ते २००१). २००१मध्ये लॉरेन्ट कबिलाचा खून झाल्यावर त्याचा मुलगा जोसेफ कबिला (२००१-२०१८) आणि २०१८मध्ये निवडून आलेला फेलिक्स शिसेकेडी. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत आलेल्या प्रत्येक हुकूमशहाने या ना त्या मार्गाने प्रचंड वैयक्तिक संपत्ती जमवली. (मोबुटू : किमान ५ अब्ज डॉलर्स)

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक यादवी युद्धे झाली. या युद्धांमधील खर्च खनिज संपत्तीतूनच भागत असे आणि बऱ्याच वेळा युद्धांचा उद्देश खनिज संपत्तीवर ताबा मिळवणे असा असे.

काँगो हा तसा विशाल देश आहे. त्याच्या पूर्व भागात सर्वांत जास्त खनिज संपत्ती आहे. हा पूर्व भाग राजधानी किन्शासापासून दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे. चांगल्या रस्त्यांचा अभाव आणि दुर्गम प्रदेश यामुळे किन्शासातील सत्ताधाऱ्यांना खनिजसमृद्ध पूर्व भागावर संपूर्ण असा ताबा फारसा कधी मिळवता आला नाही. या भागावर सर्वसाधारणपणे लोकल मिलिशिया आणि परदेशी खाण कंपन्या (यांची हातमिळवणी सत्ताधाऱ्यांशीही असे) यांच्याकडे जास्त काळ राहिला. काही पूर्वेकडचे शेजारचे देश म्हणजे रवांडा, बुरुंडी आणि युगांडा वेगवेगळ्या तथाकथित बंडखोरांना पाठिंबा देत, अजूनही देतात.

आजच्या जगाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचे खनिज म्हणजे कोबाल्ट. गेल्या वर्षी जगातील ४१ टक्के कोबाल्ट काँगोमधून आले. एवढे सर्व असूनही या सर्व संपत्तीचा स्थानिक लोकांना काहीही उपयोग होत नाही. कायमचे राजकीय अस्थैर्य, बंडाळ्या, यादवी युद्धे इत्यादीने पिचलेली स्थानिक जनता खंक गरिबीत जगत राहते.

आफ्रिकेतील दुसरे खनिजसमृद्ध देशाचे उदाहरण म्हणजे बोत्सवाना. इथल्या जमिनीखालच्या संपत्तीची माहिती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कळली. आज या देशांत लोकशाही आहे, प्रगती आहे, समृद्धी आहे. शिक्षण, उत्पन्न आणि विकास या तिन्हींबाबत हा देश प्रगत म्हणावा असा आहे. या देशाला आफ्रिकेतील अपवाद असं म्हणले जाते.

वसाहतकाळात काँगोमधील नैसर्गिक समृद्धीचा शोध लागला, म्हणून की काय माहीत नाही, काँगोलीज जनतेचे हे असे हाल सुरू आहेत, संपण्याची लक्षणे नाहीत.

ही सर्व झाली पार्श्वभूमी.

काँगोमधील खाण उद्योगात आज काय, कसे, आणि का सुरू आहे वाचण्यासाठी काही दुवे –

१. Adam Hoschild या पत्रकार लेखकाने "Object of Plunder: The Congo through the Centuries" २०१४ साली दिलेल्या व्याख्यानाची युट्यूब लिंक. काँगोच्या नैसर्गिक संपत्ती कशी ओरबाडली गेली याविषयी हे व्याख्यान आहे. (यूट्यूबचा दुवा)
याच लेखकाचे 'किंग लिओपोल्डज गोस्ट' नावाचे याच विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध आहे. जरूर वाचावे असे.

२. सिद्धार्थ कारा नावाच्या लेखकाने लिहिलेल्या, आज आपण वापरतो ते स्मार्टफोन, कम्प्युटर्स, इलेक्ट्रिक कार्स यांच्यासाठी लागणाऱ्या रिचार्जेबल बॅटरीजना आवश्यक असणारे कोबाल्ट काँगोमधील खाणींमधून कशा अमानवी पद्धतीने काढले जाते, लेखाचा दुवा.
सिद्धार्थ कारा यांचे 'Cobalt Red : How the blood of Congo powers our lives' हे याच विषयावर लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे.

३. ओपनहायमर हा पहिल्या अणुबाँबविषयीचा चित्रपट या वर्षी गाजला. चित्रपटात न दाखवलेला भाग म्हणजे या अणुबाँबकरिता लागणारे मुख्य खनिज युरेनियम अमेरिकेत कुठून आणि कसे पोचले. हे खनिज आले होते काँगोमधून आणि काय परिस्थितीत, याबद्दल सखोल माहिती देणारा लेख इथे>.

४.कोबाल्ट या सध्याच्या काळात जगभर अत्यावश्यक झालेल्या खनिजाचे काँगोमधील उत्खननाबद्दल माहिती देणारा हा लेख वाचा.

५. काँगोमध्ये वारंवार स्थानिक बंडाळ्या, त्यात रवांडा, बुरूंडी आणि युगांडा या शेजारी देशांकडून होत असलेला हस्तक्षेप, हे सगळं खनिज संपत्तीवर डोळा ठेवून! या बंडाळ्यांविषयी BBCची एक छोटी क्लिप बघा इथे.

याच विषयाशी संबंधित अजून काही युट्यूब व्हिडिओ इथे बघा –
व्हिडिओ - १
व्हिडिओ - २

काँगोविषयी काही चांगली पुस्तके –

१. ब्लड रिव्हर : अ जर्नी टू आफ्रिकाज ब्रोकन हार्ट
टीम बुचर नावाच्या पत्रकाराने काँगोमध्ये २००० सालानंतर प्रवास करून त्यावर लिहिलेले पुस्तक फार चांगले आहे.

२. जोसेफ कॉनरॅड या लेखकाने १८९९ साली लिहिलेले 'हार्ट ऑफ डार्कनेस' हे फिक्शन प्रसिद्ध आहे. (पुस्तक जरी फिक्शन असले तरी या पूर्वीच्या काळात जोसेफ कॉनरॅड हा दुसऱ्या लिओपोल्डच्या 'काँगो फ्री स्टेट'मध्ये काही काळ कार्यरत होता, त्या अनुभवावर हि काल्पनिक दीर्घकथा त्याने लिहिली होती.)

३. हेन्री मॉर्टन स्टॅन्लीची या भागावर लिहिलेली बरीच पुस्तके आहेत, पण बहुतांश फार दुर्मीळ आहेत. त्यातील 'द काँगो अँड द फाऊंडिंग ऑफ इट्स फ्री स्टेट' हे पुस्तक रोचक असू शकेल. (मी वाचलेले नाही.)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तेथील जनतेला ह्या संकटा मधुन लवकर बाहेर पडण्याचा मार्ग सापडू दे.
खूप वाईट वाटत आहे तेथील जनतेचे हाल बघून.
स्वार्थ साठी माणूस माणूसपण पण विसरून जातो .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0