हौसा कथा
हौसा कथा
किशोर मासिकातून पुनर्मुद्रित
- प्र. श्री. नेरुरकर
किशोर संपादकीय
काळ्या आफ्रिका खंडाची हौसा ही प्रमुख भाषा आहे. स्वाहिली भाषेच्या खालोखाल तिचे स्थान आहे. हौसा भाषा बोलणारे लोक आफ्रिकेत दूरवर पसरलेले आहेत. त्यांतील बहुसंख्य लोक उत्तर नायजेरियात व नायजर प्रजासत्ताकाच्या आसपास राहतात. हा सर्व प्रदेश मिळून 'हौसा लँड' किंवा हौसा भूमी होते. उत्तरेला सहारा वाळवंट आणि दक्षिणेला बारमाही पाऊस पडणारी दाट अरण्ये यांच्यामध्ये ही हौसा लँड बसली आहे. अनेक जाती व वंशांचे मिश्रण होऊन ही हौसा जमात तयार झाली आहे. हौसा भूमीतच राहणारी फुलाणी ही जमात शरीराच्या बांध्यावरून एकाच वंशाची वाटते. फुलाणी माणूस हा इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान असतो. हे फुलाणी हौसा लोकांशी व भूमीशी पूर्णपणे समरस झालेले आहेत.
चौदाव्या शतकात या प्रदेशावर पूर्व व पश्चिमेकडून झालेल्या मुसलमानांच्या स्वाऱ्यांमुळे येथील लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. हे लोक बहुशः शेतकरी आहेत. पण त्यांच्यामधील काही व्यापारी, कारागीर व 'मासलम'ही आहेत. मासलम म्हणजे पंडित, धर्मगुरू व न्यायवेत्ते. हौसा-कथा सांगोवांगी व तोंडी चालत आल्या. म्हणजे त्या खऱ्याखुऱ्या लोककथा आहेत. काही युरोपियन संशोधकांनी अशा कित्येक हजार कथा गोळा करून त्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या आहेत. आफ्रिकी कथांतील पात्रे मानवसमाजातील इतर लोककथांतील पात्रांशी मिळतीजुळती आहेत. उदाहरणार्थः लबाड कोल्हा, अचाट बुद्धीची लहान मुले, मंद बुद्धीचा राक्षस वगैरे, हौसा कथांतले कोळी, ससा, कोल्हा हे तिन्ही प्राणी धूर्त व युक्तिबाज आहेत. कोळी हा बहुधा सूडबुद्धीने भरलेला व कसलीच नैतिक चाड नसलेला असतो. ससा आनंदी व खोडकर असतो; तर तरस हा खलनायक असतो. या प्रत्येक प्राण्याला नाव असते. इतर देशातील कथांप्रमाणेच हौसा-कथांमध्ये भुते, समंध, चेटकिणी यांसारखी अतिमानुष पात्रेही येतात.
निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या या साध्यासुध्या लोकांचे मन या कथांमध्ये व्यक्त झाले आहे. या दृष्टीने त्या मनोरंजक तर आहेतच; शिवाय उद्बोधकही आहेत. 'किशोर'च्या या व पुढील अंकात दोन हप्त्यांत आम्ही त्या देत आहोत. श्री. प्र. श्री. नेरूरकर यांनी त्या सांगितल्या आहेत.
- संपादक
---
हौसा-कथा : १
जनावरांचे शेत
हत्तीने एकदा इतर प्राण्यांना गोळा केले आणि तो त्यांना म्हणाला, "आता तुम्ही सगळेजण - जे जे कुणी तुम्ही असाल ते इथे या. कारण आपण एक शेत तयार करणार आहोत."
"फार छान!" प्राणी म्हणाले.
"या कामधंद्यावर तुम्ही जगायचं," हत्ती म्हणाला, "आणि आठवड्याभराचं काम करायचं."
"फार छान!" प्राणी म्हणाले. उरलेल्या सर्व प्राण्यांबरोबर तरस शेतावर गेला आणि ते सगळेजण शेतजमीन स्वच्छ करू लागले.
त्या सर्वांनी एकदिलाने काम केले. आठवडा पूर्ण झाला तसा हत्ती म्हणाला, की मी जाईन आणि त्यांनी काय काम केलंय ते पाहीन. परंतु तो जेव्हा त्या जागेवर आला तेव्हा त्याला आढळून आले की त्या जनावरांनी काही फार मोठी जमीन स्वच्छ केली नव्हती. एखादा माणूस दोन तासांच्या वाटचालीत जेवढी जमीन ओलांडू शकेल यापेक्षा अधिक जमीन स्वच्छ झाली नव्हती. ते पाहून त्याला खूप राग आला आणि तो स्वतः त्या जमिनीवरून झाडे ओढून नेऊ लागला. तो झाडे ओढू लागला - झाडे ओढू लागला आणि एकदाची, कोणत्याही दिशेने वाटचाल करुन एक माणूस एक दिवसात जेवढी जमीन ओलांडेल तेवदी जमीन स्वच्छ झाली.
पाऊस सुरू झाला तेव्हा प्राणी पुन्हा बाहेर पडले आणि बी पेरण्यासाठी त्यांनी खड्डे खणायला सुरवात केली. शेतउंदीर जमिनीवरून चालताना त्या खड्ड्यांत पडू लागला आणि त्यातून त्याला बाहेर पडता येईना. तो ओरडायला लागला, "हो, हो, हो! अरे कुणी आहे का वर? अरे, हे खड्डे खणायचे बंद करा. मागच्या मागे आम्हांला त्या खड्ड्यांत पडायला होतंय." परंतु इतर जनावरे आपली कामे करीतच राहिली. सगळ्या शेतात बी पेरण्यात आल्यावर ती आपापल्या घरी निघून गेली.
मग नडणी करण्याची वेळ आली तेव्हा सर्व प्राणी बाहेर पडले आणि त्यांनी सगळ्या शेताची नडणी पार पाडली. त्यानंतर, धान्य पिकून पिवळे झाले तेव्हा ते प्राणी पुन्हा बाहेर पडले आणि त्यांनी त्याची कापणी केली. त्यांनी एक धान्याचे कोठार बांधले आणि आपले धान्य साफसुफ करून ते कोठार बंद केले.
"आता प्राण्यांनो! " हत्ती म्हणाला, "माझ्याभोवती गोळा व्हा - म्हणजे मला तुम्हांला काही सांगायचं आहे ते सांगता येईल. आत्तापुरतं म्हणाल तर आपण पालापाचोळ्याचं खाणं चालू ठेवू या आणि उन्हाळा सुरू होईपर्यंत आपलं धान्य तसंच धान्यकोठारात साठवून ठेवू या." "फार छान!" प्राणी म्हणाले आणि आपापल्या वाटेने निघून गेले.
परंतु ससा स्वतःशी म्हणाला की, मी एका ठेंगण्याश्या झुडुपात जाईन आणि तिथे हे सगळे प्राणी निघून जाईपर्यंत मान खाली करून पडून राहीन. त्या समुद्रकिनाऱ्यावर सामसूम झाल्यावर तो परत त्या धान्यकोठाराकडे गेला आणि त्याला हवे तितके पोटभर धान्य त्याने खाल्ले. त्यानंतर तो गेला आणि तरसाच्या काही लेंड्या त्याने गोळा केल्या. त्या त्याने कोठारात टाकल्या. इतर सर्व प्राण्यांची परत येण्याची वेळ होईपर्यंत तो तसे करीत राहिला.
आपली उन्हाळी कामे झटपट आटपून इतर प्राणी परत आले आणि सगळेजण पुनः गोळा झाले. ह्या प्राण्यांत एकच प्राणी आला नव्हता आणि तो होता ससा. तो होता झुइुपात डोके टेकून, त्या सर्व प्राण्यांनी त्याला हाका मारल्या, मोठमोठ्याने ओरडले, 'हो झोमो!' ' हो झोमो!' तेव्हा त्याने फक्त क्षीण आवाजात उत्तर दिले.
"झोमो खूप दूरवर चालत गेला असला पाहिजे." ते प्राणी पुन्हा एकमेकाला म्हणाले, "बघा ना, तो किती दुबळेपणाने आपल्या हाकेला उत्तर देतोय." प्रत्येक वेळी ते त्याला ओरडून हाका मारीत होते - 'हो झोमो!' 'हो झोमो!' आणि तो फक्त क्षीण आवाजात उत्तर देत होता. पण सरतेशेवटी तो हडबडून बाहेर पडला. त्याने अंग झाडले तेव्हा सर्व प्राण्यांच्या अंगावर मातीचा आणि धुळीचा वर्षाव झाला. सर्व प्राण्यांनी पाहिले. तो इतक्या धापा टाकीत होता की त्यामुळे त्याची जीभ बाहेर लोंबकळत होती.
"तर मग आता..." हत्ती म्हणाला, "आपण सर्वजण हजर आहोत का?"
"सगळे हजर!" उंट म्हणाला.
प्राणी म्हणाले, "सशाने जावे आणि धान्यकोठारातील धान्य पाहून यावे." परंतु तरस म्हणाला, "मी जातो." म्हणून तो वर चढला. परंतु त्याने जेव्हा आत डोकावून पाहिले तेव्हा त्याला आत काहीच आढळून आले नाही. फक्त त्याच्या स्वतःच्या लेंड्या तेवढ्या त्याला दिसल्या. तेव्हा तो म्हणाला, "आऽऽ! आऽऽ!! आऽऽऽ!!!"
"काय, झालं काय?" प्राण्यांनी विचारले.
"मी शपथ येऊन सांगतो की तो मी नाही." तरस म्हणाला. प्राणी म्हणाले, "सशाने जावे आणि आत पाहून यावे."
म्हणून ससा धान्य कोठारावर चढला आणि त्याने आत डोकावून पाहिले. मग तो म्हणाला, "हे सगळं धान्य कोठार तरसाच्या लेंड्यांनी भरून गेलंय."
ते ऐकून हत्ती भयंकर रागावला. तो स्वतः ते कोठार उघडायला गेला, परंतु त्याच्या धक्क्याने त्याला भगदाड तेवढे पडले.
"मी शपथ घेऊन सांगतो की तो मी नव्हतो." तरस पुन्हा म्हणाला.
"अच्छा. तो जो कुणी असेल…" हत्ती म्हणाला, "त्याला मी शोधून काढणार आहे. प्रत्येकजण जा आणि अंगावर गोणपाट घालून या."
मग सर्व प्राणी गेले आणि त्यांनी गोणपाट तयार केले. तरसाचा गोणपाट साधा होता. परंतु सशाने अननसाचे दोर काढून आपला गोणपाट रंगीढंगी असा तयार केला. तो त्याने अंगावर घातला व चालत गेला. तरसाच्या पुढ्यात व सभोवार तो नाच नाच नाचला. "काही लोकांच्या नशिबात सगळं काही असतं." तरस म्हणाला, " अदलाबदल करतोस का?"
"तेच मला म्हणायचं होतं." ससा म्हणाला. त्याने आपला रंगीढंगी गोणपाट तरसाला दिला आणि तरसाचा साधा गोणपाट स्वतःला घेतला.
"आता जा आणि लाकूडफाटा गोळा करा." हत्ती म्हणाला. म्हणून ते प्राणी दूर गेले आणि त्यांनी लाकूडफाटा गोळा केला. मग त्यांनी एक अग्निकुंड तयार करून त्या लाकडांना आग लावली.
आग भडकली तशी हत्तीने तिच्यावरून उडी मारली, "जो कुणी या आगीवरून उडी मारणार नाही…" तो म्हणाला, "तोच धान्यचोर असला पाहिजे."
नंतर सर्व प्राण्यांनी त्या आगीवरून उड्या मारल्या. जिराफाने उडी मारली. वनगाईने उडी मारली. सशाने उडी मारली. परंतु जेव्हा तरसाची उडी मारण्याची पाळी आली तेव्हा त्याच्या गोणपाटाला आग लागली.
"झोडा त्याला! मारा त्याला." सगळे प्राणी ओरडले. असे म्हणून ते सगळे त्याच्यावर तुटून पडले.
हत्तीने तर त्याला असा तडाखा मारला की त्याचा कमरेखालचा भाग खचून गेला. म्हणूनच तरस जरी उभा राहिला तरी खाली बैठक मारून बसल्यासारखा दिसतो.
—--
हौसा-कथा : २
गाढव, तरस आणि फुलाणी
एकदा काही फुलाणी लोकांना एक तरस फार त्रास देत होता. तो नेहमी त्यांची गुरे पळवायचा. त्या लोकांनी तरसाला पकडण्यासाठी एक सापळा तयार केला. परंतु तरसाने तो सापळा पाहिला आणि तो त्याच्या वाटेला गेला नाही. लवकरच त्यानंतर त्या फुलाणी लोकांच्या वसाहतीत एक गाढव योगायोगाने गेले. ते लोक आपले गुरांचे कळप तरस कसा फस्त करीत आहे याबद्दल बोलत होते. "तुम्ही मला काय द्याल, जर मी तरसाला पकडून तुमच्याकडे दिला तर!" गाढवाने विचारले, "जाकी," फुलाणी लोक म्हणाले, "तू जर आमच्यासाठी त्या तरसाला पकडलेस तर आम्ही नेहमी तुला धान्य आणि कडबा खायला घालू आणि तुला कधीच पुनः विकणार नाही किंवा कामालाही लावणार नाही."
"खरंच?" गाढवाने विचारले.
"अगदी खरं", फुलाणी लोक म्हणाले.
"फार छान", गाढव म्हणाला, "मी थेट तुमच्या या वसाहतीत त्या तरसाला आणून तुमच्या स्वाधीन करतो."
"छान!" फुलाणी म्हणाले, "तू तसं करच."
म्हणून गाढव मग तरसाच्या गुहेत गेला. आता तरसाने आपल्या कुटुंबातील मंडळींना सांगून ठेवले होते की जर कुणी दारात येऊन त्याची चौकशी करू लागला तर, त्याला सर्वांनी नेहमी सांगायचे की तो बाहेर गेलाय. गाढवाने जेव्हा तरसाची चौकशी केली तेव्हा त्याचे सगळे बछडे म्हणाले की तो घरात नाहीय. "अरेरे!" गाढव म्हणाला, "त्याचा हिस्सा त्याला मिळणार नाही."
"हे, थोडा वेळ थांब", ते शब्द ऐकल्याबरोबर तरस ओरडला. "कसला हिस्सा म्हणालास तू?"
"ओ, तू आहेस तर!" गाढव म्हणाला, "मी तुला मांसाबद्दल सांगायला आलो होतो -- इतकं काही मांस तिथे आहे की जर कुणी आलं नाही आणि त्याने ते मांस खाल्लं नाही तर ते सगळं नासून जाणार आहे." "खरंच?" तरसाने विचारले. "होय तर!" गाढव म्हणाले, "अंगुलु गिधाड आता तिथे आहे. आणि तसेच माईकी ग्रिफॉन .... आणि हंकाका कावळा आहे."
"हे बघ...." तो बोलू लागला, "तुला काही जोरात पळता येत नाही म्हणून तुला वाटलं तर तू माझ्या पाठीवर बस. म्हणजे मी दौडत जाईन आणि हां-हां म्हणता मी तुला तिथे नेईन."
मग तो तरस गाढवाच्या पाठीवर स्वार झाला. परंतु गाढवाने दौडायला सुरुवात करताच तो जवळ जवळ खाली कोसळला.
"थांब जाकी", तो ओरडला, "मी जवळ जवळ खालीच कोसळत होतो बघ; परंतु मला एक कल्पना सुचली आहे." असे म्हणून त्याने आपल्या बछड्यांना झाडाच्या सालीचे काही दोर आणायला सांगितले आणि गाढवाच्या पाठीवर आपल्याला घट्ट बांधून ठेवायला सांगितले. त्यांनी तसे करताच त्याला आढळून आले की अजून तो थोडा डळमळत होता. म्हणून त्याने बछड्यांना गाठी अधिक घट्ट बांधायला सांगितल्या. त्यांनी तसे केले आणि तो आपल्या बैठकीवर पक्का घट्ट बसून राहिला. यानंतर गाढव पुनः निघाला. यावेळी तो नुसता चालत होता.
"ए, जोराने चाल! "तरस म्हणाला, "दौडत जाईन असं तू म्हणालास आणि आता तू नुसता सरपटत चालला आहेस. तू जोरात चालला नाहीस तर मी तुला चावेन."
"खरंच?" गाढवाने विचाले, "होय, खरंच." तरस म्हणाला.
आपली चाल न वाढवता गाढव तसाच चालत राहिला. तेव्हा तरस पुढे वाकला आणि गाढवाची मान त्याने आपल्या दातात पकडली. तरसाचे दात आपल्या मानेत घुसलेले गाढवाला कळताच गाढवाने जोराने दौडायला सुरुवात केली. तो वाटेत कुठेच थांबला नाही. तो फुलाणी लोकांच्या वसाहतीत मधोमध येऊन मगच उभा राहिला. तरसाला गाढवाने फुलाणी लोकांच्या स्वाधीन केल्यावर, त्या फुलाणी लोकांनी आगीत लोखंडी सळ्या तापत ठेवल्या. त्या तापून लाल भडक होताच त्यांनी तरसाला डाग द्यायला सुरुवात केली. तरस ओरडला, किंचाळला, परंतु त्याची कोणीच सुटका केली नाही. शेवटी तो बेशुद्ध पडला. संध्याकाळ झाली तेव्हा तो शुद्धीवर आला. मग तो सरपटत सरपटत कसाबसा घरी गेला. लोक म्हणतात की त्या डागांच्या खुणा म्हणजेच त्याच्या अंगावरचे ठिपके होत. तरसाचा काटा काढल्यावर फुलाणी लोकांनी धान्य आणि कडबा आणला आणि त्या गाढवाला दिला. "आम्ही फुलाणी लोक …" ते गाढवाला म्हणाले, " तुला कधीच विकणार नाही किंवा तुला कामालाही लावणार नाही." आणि हे वचन त्यांनी नेहमीच पाळले आहे. परंतु तरस बरा झाला आणि त्याला खूप बरे वाटल्यानंतर तो म्हणाला, " जर का माझ्या तावडीत गाढव सापडले तर त्याला मी ठारच मारीन आणि कच्चा खाईन." तेव्हापासून तरस त्याने म्हटल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच कारणामुळे त्या दोघांत वैर निर्माण झाले आहे.
—--
हौसा-कथा: ३
पशुपक्ष्यांमधील लढाई
एक कोंबडा आणि एक हत्ती एकदा एकत्र एकाच घरात होते. एके दिवशी हत्तीने कोंबड्याच्या झोपडीच्या दाराचा खांब सोंडेत धरला आणि त्याचे दोन तुकडे केले. सूडबुद्धीने कोंबड्याने झाडून कितीतरी कचरा गोळा केला आणि तो हत्तीच्या झोपडीत टाकला. ते पाहिल्यावर हत्ती म्हणाला, "झकारा, तू आणि मी लढाई करून याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे."
"खूप छान", कोंबडा म्हणाला, "आपण दोघेजण आपल्या नातेवाईकांना तशी सूचना देऊ या."
म्हणून मग हत्ती दूर गेला आणि सर्व पशूंना काय घडले ते त्याने सांगितले. इकडे कोंबड्याने सर्व पक्ष्यांना सांगितले. दोन्ही बाजूच्या लोकांनी मग लढाईची तयारी केली.
पशूंमध्ये तरसाला सेनापती करण्यात आले आणि तो आपले लोक कसे गोळा होतात ते लक्षपूर्वक पाहू लागला. पक्ष्यांमध्ये जो ससाणा होता तो कोंबड्याकडे गेला आणि म्हणाला, "मला तुमचा सेनापती होऊ द्या." कोंबडा कबूल झाला आणि त्यांनी पशूंचे सैन्य गोळा झाले आहे का याचे निरीक्षण करण्यासाठी शहामृगाला दूर पाठवले.
आता घडले ते असे की तरसानेसुद्धा पक्ष्यांच्या सैन्याचे संचलन कसे चालले आहे हे पाहायचे ठरवले होते आणि म्हणून शहामृग आणि तरस समोरासमोर आले.
"हॅलो जिमिना!" तरस म्हणाला, "अजून तुमची युद्धरेषा आखून तयार झली नाही का?"
"होय." शहामृग म्हणाला, "तुमचं कसं काय?"
"आमची सुद्धा." तरस म्हणाला.
"ठीक आहे." तरस म्हणाला, "तू परत जा आणि तुझ्या लोकांना सांग आणि मी परत जातो आणि माझ्या लोकांना सांगेन."
शहामृग जायला निघाला तेव्हा तरसाने त्याच्या पायावर किती मांस होते ते पाहिले आणि ते पाहून त्याला भूक लागली.
"थांब, जिमिना!" तो म्हणाला, "आपण प्रथम लढाई केली तर कसे काय? फक्त तू आणि मी?"
"ठीक आहे." शहामृग म्हणाला, "तू माझ्यावर तीनदा प्रहार कर आणि मग मी तुझ्यावर तीनदा प्रहार करीन."
म्हणून तरस उठला आणि त्याने शहामृगावर तीनदा प्रहार केले.
"आता माझी पाळी," शहामृग म्हणाला आणि त्याने आपल्या चोचीने तरसाला टोचले, आपल्या पंखांनी त्याला झोडपले आणि आपल्या पंजाने ओरबाडून काढले.
"झाले की तीन प्रहार." तरस म्हणाला.
"ओह, नाही-तसं नाही!" शहामृग म्हणाला, "तो तर फक्त एकच प्रहार झाला." असे म्हणून त्याने आपल्या चोचीने त्याच्यावर पुनः हल्ला केला आणि त्याचे दोन्ही डोळे बाहेर काढले. त्यानंतर ते दोघे आपापल्या सैन्याकडे परतले.
"काय, झालं तरी काय?" डोळे बाहेर पडलेला तरस परत येताना पाहिला तेव्हा सगळे पशू ओरडले.
"ते आपल्याला खूपच भारी होतील." तरस म्हणाला, "बघा त्यांनी माझं काय केलं ते."
तथापि पुढे चालून जाण्याचा हुकूम सुटला आणि दोन्ही बाजूंच्या लोकांनी लढाई करण्यासाठी आगेकूच केली.
ससाणा पक्ष्यांचा सेनापती म्हणून कोंबड्याजवळ गेला व त्याने त्याला सलाम केला. त्यानंतर त्याने थोडी कोंबडीची अंडी घेतली. आणि ती हत्तीच्या डोक्यावर टाकली आणि ओरडला, "बघा, हत्तीचं डोकं फुटलं." हत्तीने ते ऐकले तेव्हा जाणून घेण्यासाठी त्याने आपली सोंड कपाळाला लावली आणि म्हणाला, "अरे देवा! खरंच की."
नंतर ससाण्याने एक लांब दोरीचे वेटोळे हत्तीच्या जवळ टाकले. "बघा!" तो ओरडला, "हत्तीची सोंड निखळून बाहेर पडली." पशूंनी जेव्हा ते ऐकले आणि दोरीचे वेटोळे खाली जमिनीवर पडलेले पाहिले तेव्हा पोटाला पाय लावून ते सगळे धूम पळून गेले.
लढाईनंतर कोंबड्या परत आपल्या घरी गेला आणि त्याने ससाण्याला बोलावणे पाठविले. "शाफो", तो म्हणाला, "तू लढाईत जी कामगिरी केलीस त्याबद्दल मी तुला बक्षीस देणार आहे. आता यापुढे, जेव्हा जेव्हा माझ्या बायका पिल्लांना जन्म देतील तेव्हा तू ये आणि प्रत्येक पिल्लावळीतून एक पिल्लू घेऊन जा. ते तुझं बक्षीस!"
—--
हौसा-कथा : ४
कोंबडा आणि रानमांजर
एक कोंबडा एकदा प्रवासाला निघाला होता. तेव्हा वाटेत त्याला एक रानमांजर भेटले. "कुठं निघालास इतक्या दूर, झकारा?" रानमांजराने विचारले. "कुणाच्या तरी घरी मर्तिक झालंय आणि मी त्यांचं सांत्वन करायला जातोय."
"खरंच?" रानमांजर म्हणाले, "तर मग आपण दोघे मिळून. एकत्र जाऊ या."
"म्हणजे तुला म्हणायचंय आपण तिघेजण, होय ना मुझुरू? आपण दोघेजण नव्हे." कोंबडा म्हणाला, "असं पाहा मी अगोदरच कुत्र्याला बरोबर घेऊन निघालो आहे."
"तू बिलंदर आहेस. आणि कधी चुकणार नाहीस. " रानमांजर म्हणाले, "तू माणसाला इतकं हसवतोस, इतकं हसवतोस की तो रस्त्यातच गडबडा लोळतो आणि मग हत्तीच्या गवतात हरवून जातो."
—--
हौसा कथा: ५
एक कोळी आणि माल्लम
कोणे एके काळी गिझो, एक कोळी, माल्लमकडे गेला आणि म्हणाला, "मला लबाडपणा कसा करावा याचे धडे द्या."
ठीक आहे तर मग, "माल्लम म्हणाला, "जा आणि माझ्यासाठी एक हत्तीचा दात घेऊन ये."
"फारच छान," कोळी म्हणाला.
"आणि सिंहाचे अश्रू," माल्लम म्हणाला.
"फारच छान," कोळी म्हणाला.
"आणि तरसाच्या डोक्यावरची कातडी," माल्लम म्हणाला.
"फारच छान," कोळी म्हणाला.
म्हणून कोळी हत्तीचा शोध करू लागला. "आह गिवा", हत्ती सापडताच कोळी म्हणाला, "मी नुकतंच ऐकलंय की उद्या या झाडाझुडपांच्या भागात शिकार होणार आहे आणि म्हणून तुला लपूनछपून राहता येईल अशी जागा दाखवण्यासाठी मी आलो आहे. तुला पूर्णपणे निमूट पडून राहावे लागेल तिथे."
"ठीक आहे, गिझो," हत्ती म्हणाला, "मी कुठं जायला हवं?"
"अच्छा," कोळी म्हणाला, "शिकारी लोक म्हणतात की ते 'जुजू' वनराईत जाणार नाहीत."
"फारच छान," हत्ती म्हणाला, "मला तिथे घेऊन चल तर." तो कोळी त्या हत्तीला 'जुजू' वनराईत घेऊन गेल्यावर म्हणाला, "आता, गिबा, मला तुला, या झाडांना बांधून ठेवावं लागेल. मी आता जाऊन येतो व झाडांच्या थोड्या साली घेऊन येतो." हत्ती कबूल झाला. मग कोळ्याने 'काल्गो' झाडाच्या काही साली ओरबडून काढल्या आणि त्या हत्तीला त्याच्या दातांसकट त्याने 'जुजू' वनराईतील झाडांना बांधून ठेवले.
"तुझं डोकं हालव पाहू", तो हत्तीला म्हणाला, "बघू या ते भरपूर घट्ट बांधलं गेलंय का." हत्तीने आपले डोके हलवले आणि म्हणाला, "आणखी." त्या कोळ्याने गाठी अधिकच घट्ट बांधल्या आणि हत्तीने पुनः प्रयत्न केला. "गिझो", तो म्हणाला, "सुंदर".
त्यानंतर तो कोळी दूर निघून गेला आणि स्वतःसाठी त्याने एक ढोल तयार केला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे त्याने आपला ढोल घेतला आणि 'जुजू ' वनराईकडे तो जायला निघाला. चालता चालता तो ढोल बडवीत होता आणि ओरडत होता, "वनराईत जायची तयारी करा. वनराईत जायची तयारी करा." हे ऐकून तो हत्ती घाबराघुबरा झाला. धडपड करून त्याने स्वतःची सुटका करुन घेतली आणि तो धूम पळाला, पळता पळता त्याचा एक दात मागे राहिला. कोळ्याने तो दात घेतला आणि लपवून ठेवला.
नंतर तो कोळी परत माघारी परतला आणि त्याला तो हत्ती दिसला. तो जमिनीवर पडला होता व त्याचे तोंड सगळे सुजून गेले होते. "आह्, जंगलाचे महाराज", तो म्हणाला, "आपल्याला कळत नाही माणसांशी आजकाल कसं वागावं ते. ही माणसं सकाळी जे म्हणतील ते संध्याकाळ होण्यापूर्वी बदलून टाकतील आणि संध्याकाळी जे म्हणतील ते सकाळ होण्यापूर्वी बदलून टाकतील."
त्या कोळ्याने नंतर त्या हत्तीला तिथेच सोडून दिले आणि तो निघून गेला. त्याला सिंह भेटला. "झाकी", तो सिंहाला म्हणाला, "गिबाला मुळीच बरं वाटत नाहीय्.. इतर सगळी जनावरं त्याला भेटून गेलीत आणि तुला सांगायला आलोय. तुझ्या कानावर अजून आलेलं दिसत नाही."
"कुठे आहे तो, गिझो?" सिंहाने विचारले, "तो जमिनीवर पडून राहिलाय,' तो कोळी म्हणाला, "चल, मी तुला घेऊन जातो." तिथे गेल्यावर तो सिंह ओक्साबोक्सी रडू लागला. किंचाळू लागला. ते बघून त्या कोळ्याने आपली पाण्याची बाटली बाहेर काढली. "प्रबळाचे अश्रू कुणी जमिनीवर पडू देऊ नयेत," तो म्हणाला आणि एकामागून एक ते सगळे अश्रू त्याने पकडले.
त्यानंतर लवकरच तो कोळी तिथून निसटला आणि दूर निघून गेला. त्याला तरस भेटले. "मी म्हणतोय, कुरा", तो तरसाला म्हणाला, "आपला दुसरा दात हत्तीने काढून घेतलाय, सगळेजण त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले आहेत. तू कसा नाही अजून गेलास?"
ते ऐकल्यावर तो तरस धावत पळत व ओरडत निघाला, "हूर्रा! महामहाराजांनी आपला दात काढून घेतला." परंतु सिंहाने त्याचे शब्द ऐकले आणि तो रागाने लालीलाल झाला. "इकडे ये कुरा", तो रागाने ओरडला, "इथे तू मोठमोठ्याने हसत आणि गाणी गात येतोस याचा अर्थ काय! आम्ही इथे सगळेजण गिबाचे सांत्वन करतो आहोत आणि तू?" असे म्हणून त्याने तरसावर झेप घातली आणि त्याला ठार केले.
"अरेरे! हाय हाय!' कोळी म्हणाला, "मी तो देह दूर ओढून नेतो, मन्यान दाबा त्याची घाण पसरून तुला राग येण्यापूर्वी."
"घेऊन जा," सिंह म्हणाला. मग त्या कोळ्याने तो तरसाचा देह थोड्या दूरवर ओढून नेला आणि त्याच्या डोक्याचे कातडे त्याने सोलून काढले.
त्यानंतर कोळयाने हत्तीचा दात आणि सिंहाचे अश्रू गोळा केले आणि तरसाच्या डोक्यावरील कातडीबरोबर ते घेऊन तो माल्लमकडे गेला. "देव तुला क्षमा करण्याची बुद्धी देवो, माल्लम, तो म्हणाला, "तू मला आणायला सांगितल्या त्या वस्तू या पहा मी आणल्या आहेत."
"ठीक आहे, गिझो", माल्लम म्हणाला, "तुला हवंय् तितकं लबाडपण तू नीट दाखवलंस, आता इथून चालता हो – तुला आणखी लबाड होण्याचं काही कारण नाही."
१. माल्लम म्हणजे विद्वान माणूस. माल्लम हा हौसा भाषेतील शब्द आहे.
२. फार फार वर्षांपूर्वी कोळी (spider) हा आफ्रिकेतील अरण्यात सिंह, हत्ती, कोल्हा या प्राण्यांसारखा एक प्राणी होता. नंतर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तो आज दिसतो तसा "कोळी ' झाला.
३. 'जुजू'--पश्चिम आफ्रिकन भाषेतील शब्द. 'जू जू ' म्हणजे चेटूक केले जाते ती जागा.
४. कोल्गा - आफ्रिकेतील एक झाड.
—--
हौसा कथा : ६
तरस, कोळी आणि माल्लम
एकदा एक माल्लम राहत होता. तो खूप श्रीमंत होता. त्याच्या मालकीची खूप खूप गुरे, घोडे, मेंढे आणि बकरे होते. एके दिवशी कोळी त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याला मुजरा केला व म्हणाला, "मला तुझा मेंढपाळ व्हायचं आहे आणि मला तू स्वीकारलंस तर मी तुझा मेंढवाडा देखील झाडून पुसून स्वच्छ ठेवीन."
"फारच छान", माल्लम म्हणाला.
त्यानंतर तो कोळी दररोज सकाळी यायचा आणि जनावरांचे शेणमूत काढायचा आणि गोठा साफ करायचा. तो नेहमी बरोबर एक मोठ्ठी टोपली घेऊन यायचा. तो म्हणायचा की ती टोपली शेणमूत वाहून नेण्यासाठी तो आणीत असे. परंतु खरोखर तो काय करायचा की एक बकरी ठार मारायचा. ती टोपलीत ठेवायचा. आणि झाडलोट कचऱ्याने ती झाकून टाकायचा, मग तो ती दूर झुडुपात घेऊन जायचा आणि खायचा.
काही दिवसांनंतर माल्लमने पाहिले की आपला बकऱ्यांचा तांडा हळूहळू लहान होत चाललाय. "ताज्जुब आहे. तो कोळी तर मला फसवत नाही ना," तो स्वतःशीच म्हणाला. "मला त्याच्यावर पाळत ठेवायला हवी." दुसऱ्या दिवशी सकाळी कोळ्याने एक मोठ्ठा बोकड ठार मारला आणि तो त्याने टोपलीत घालून ठेवला. पण मग त्याला कळले की, तो त्याला उचलता येत नव्हता. माल्लमने ते पाहिले आणि म्हणून तो पुढे आला. त्याने कोळ्याला मदतीचा हात देऊ केला. पण त्याला कळले की ती टोपली फार जड आहे. तेव्हा त्याने कोळ्याला काही शेणकचरा बाहेर काढायला सांगितला. "नको, नको", कोळी म्हणाला, "मी नेईन",
"ते तुझ्या शक्तीपलीकडचं आहे", माल्लम म्हणाला. असे बोलून तो स्वतः काही शेणकचरा बाहेर काढू लागला. असे करता करता त्याचा हात बोकडाला लागला आणि त्याने त्याला टोपलीबाहेर खेचून काढले.
"ओ हो",माल्लम म्हणाला, "तर मग अशी तू माझी सेवा-चाकरी करतोयस, होय ना?" असे म्हणून त्याने त्या कोळयाला पकडले आणि गोठ्याच्या खांबाला घट्ट बांधून ठेवले. मग त्याला बदड बदड बदडले. त्या रात्री, जेव्हा तो कोळी गोठ्याच्या खांबाला तसाच बांधलेला होता, त्या वाटेने तरस आला. 'हल्लो गिझो",तो म्हणाला, "तुला असं का बांधलंय् कुणी?"
"अच्छा - त्याचं असं आहे, एका माल्लमचा मेंढपाळ म्हणून मी काम करीत होतो." कोळी म्हणाला, "आणि प्रत्येक दिवशी त्याच्या बकऱ्यांपैकी एक तरी बकरी मला जेवणात खायला मिळत असे. मला त्याचा आता कंटाळा आलाय. तरी मी त्याला सांगितलं मी निघून जातो. पण त्याने मनावरच घेतलं नाही आणि मला इकडे बांधून ठेवलंय."
"अरे देवा!" तरस म्हणाला. "तुला असं म्हणायचं आहे का की या घरात विपुल खायला मिळतं आणि मग त्या अन्नाचा आपल्याला कंटाळा येतो? थेट असलं काही असलेलं ठिकाण मला आवडेल बघ."
"अच्छा" कोळी म्हणाला, "त्याबद्दल कसलीच अडचण नाहीये. फक्त जवळ ये आणि मला मोकळं कर. मग मी तुला माझ्या जागी बांधून ठेवीन."
अशा रीतीने तरसाने कोळ्याला मुक्त केले आणि कोळ्याने तरसाला आपल्या जागेवर घट्ट बांधून ठेवले. "ठीक आहे", कोळी म्हणाला, "मी निघतो तर आता". आणि असे म्हणून तो दूर एका झुडुपात शिरला.
दुसऱ्या दिवशी सकाळी माल्लम परत आला आणि त्याने तरसाला पाहिले. त्याने त्याला बदडले, बदडले, बदडले. तो अर्धमेला झाला. पण सरतेशेवटी तरसाने पळवाट काढली आणि तो दूर पळून गेला. मग तो कोळ्याचा शोध करू लागला.
—--
हौसा कथा : ७
कोल्हा आणि रानटी माणूस
एक रानटी माणूस एकदा काही कोंबड्या घेऊन रस्त्याने जात होता. त्याला पाहून एक कोल्हा त्याच्या पुढे धावत गेला आणि त्याच्या वाटेत जणू मेल्यासारखा पडून राहिला. तो रानटी माणूस त्या ठिकाणावर जाऊन पोचला आणि थांबला. त्याने त्या कोल्ह्याला वरखाली करून पाहिले. कुठे एखादी जखम दिसत नव्हती वा शरीराला कुठे सुजही आलेली नव्हती.
"गंमतच आहे", तो रानटी माणूस स्वतःशीच म्हणाला, "ताज्जुब आहे. कुणी याला ठार मारलं असावं बरं!" परंतु तो घाईत असल्यामुळे त्याने कोल्ह्याला जिथे तो सापडला तिथे तसाच पडलेला ठेवला आणि तो पुढे गेला.
तो निघताक्षणीच कोल्ह्याने उडी मारली आणि झुडुपांतून तो पळत गेला. तो त्या रानटी माणसाच्या पुढे गेला आणि पुनः तो वाटेत पडून राहिला आणि त्याने मेल्याचे सोंग केले.
"अच्छा. मी नव्हतं पाहिलं कधी असं!" तो रानटी माणूस जवळ येताच म्हणाला. "ताज्जुब आहे! कोण ठार मारतंय या सगळा प्राण्यांना!, थांब हं." तो स्वतःशीच पुटपुटला. "क्षणभर या कोंबड्या मी खाली ठेवतो आणि मागे जातो. त्या दुसऱ्या कोल्ह्याला मी उचलून आणतो. मग मला स्वतःला थोडं मांस खायला मिळेल." म्हणून तो रानटी माणूस त्या वाटेने परत मागे गेला. परंतु त्याला कोल्हा काही सापडला नाही. तो परत येण्यापूर्वी कोल्हयाने उडी मारली. कोंबड्या तोंडात घट्ट पकडल्या आणि तो दूर झुडपात पळत गेला. तो रानटी माणूस परत आला तेव्हा पुनः तिथे कोल्हा नव्हता आणि या वेळी कोंबड्या पण नव्हत्या.
---
हौसा कथा : ८
कोल्हा आणि माल्लम
एकदा एक कोल्हा माल्लमकडे गेला. त्याने त्याच्याकडे स्वतःसाठी प्रार्थना म्हणण्याची याचना केली. म्हणजे मग तो अधिक लबाड होणार होता.
"ते काय सोपं आहे, डिला," माल्लम म्हणाला, "पण पहिल्यांदा तू जा आणि माझ्यासाठी फुलाणी बाईची दुधाची हंडी घेऊन ये."
"काम झालंच की," कोल्हा म्हणाला. माल्लमच्या घरून तो निघाला आणि रस्त्यावर आला. तिथे तो दात पेचून जणू मेल्यासारखा पडून राहिला. लवकरच एक फुलाणी बाई तिथे आली. त्याला पाहिल्यावर ती स्वतःशीच म्हणाली, "बघा आता – ते जनावर मेलंय."
ती पुढे निघून गेली तशी कोल्ह्याने उडी मारली. तो तिच्या पुढे गेला. मग तिच्या वाटेत पुनः पडून राहिला. ती फुलाणी बाई तिथे आली तेव्हा स्वतःशीच म्हणाली, "अच्छा! मी असं कधी पाहिलं नव्हतं! इथे पुनः एक मेलेला कोल्हा पडलाय. मला वाटतं मी माझी दूध हंडी उतरुन खाली ठेवावी आणि मागे जावं. त्या दुसऱ्या कोल्ह्याला उचलून घेऊन यावं. मग या दोघांची जोडी मांसासाठी मला विकता येईल."
ती निघून गेल्यावर कोल्ह्याने आपल्याला हवे तेवढे दूध पिऊन घेतले आणि उरलेले दूध फेकून दिले. मग ती दूधहंडी घेऊन तो माल्लमकडे परत गेला.
"परमेश्वर! परमेश्वर!", माल्लम म्हणाला. "आता डिला, तुझी दुसरी कामगिरी, तू वनगाईचं दूध मला आणून दे."
"फारच छान!" कोल्हा म्हणाला आणि पुनः तो दूर पळत गेला. खूप खोल झाड झुडुपात गेल्यावर तो स्वतःशीच बडबडायला लागला,"मी सांगतो तुला की ते तोडता येईल." आणि "मी सांगतो तुला ते तोडता येणार नाही...." वाटेने चालता चालता तो हे बडबडत होता. सरते शेवटी त्याला एक वनगाय भेटली. "आह बावना," तो म्हणाला, "आम्ही आत्ताच तुझ्याबद्दल भांडत होतो. माझा दोस्त सांगत होता की तुला तुझ्या शिंगांनी बावबाब झाड तोडता येणार नाही."
"ओह, अस्सं तो म्हणत होता....तो?" वनगाईने विचारले, "आपल्याला त्याचा बंदोबस्त केला पाहिजे." म्हणून मग ती वनगाय त्या कोल्ह्याबरोबर बावबाब झाडाचा शोध करण्यासाठी रानात गेली. लवकरच त्यांना एक मोठे झाड दिसले. मागे मागे जाऊन वनगाईने खूप जोराची धाव घेतली आणि आपली सगळी शक्ती खर्च करून त्या झाडाला धडक दिली. तिची शिंगे झाडाच्या खोडात थेट मुळापर्यंत रुतली. तेव्हा कोल्हा पुढे आला आणि वनगाय जिथे उभी होती तिथेच त्याने तिचे दूध पिळले. मग तिला तिथे सोडून तो माल्लमकडे परत गेला.
"ठीक आहे, डिला," माल्लम म्हणाला, "तुझं आता एकच काम करायचं बाकी राहिलंय्."
"कोणते ते?" कोल्हयाने विचारले,
"माझ्यासाठी एक काळ्या फणीचा नागोबा घेऊन येणे," माल्लम म्हणाला.
"झालंच म्हणून समजा ते काम," कोल्हा म्हणाला. पहिल्यांदा कोल्ह्याने एक बकऱ्याच्या कातडीची पिशवी शिवली. मग तो नागाच्या बिळाकडे गेला. बिळाजवळ जाता जाता तो स्वतःशीच बडबडत होता, "मी सांगतो तुला की तो ती भरून टाकील" आणि "मी सांगतो तुला तो ती नाही भरून टाकणार," नागोबाला पाहताच तो म्हणाला, "आह्, कुमुर्चि, आम्ही आत्ताच तुझ्याबद्दल भांडत होतो. माझा दोस्त सांगत होता की ही पिशवी भरून जाईल एवढा मोठा काही तू नाहीस."
"ओह, अस्सं तो म्हणाला....तो?" नागोबाने विचारले. "अच्छा, मला प्रयत्न तर करून बघू दे." आणि फार वटवट न करता त्या पिशवीत स्वतःचं वेटोळे करीत तो शिरला. तो आत गेलेला पाहताच कोल्ह्याने त्या पिशवीचे तोंड घट्ट बांधून कले. मग तो ती पिशवी घेऊन माल्लमकडे परत गेला.
"ठीक आहे, डिला," माल्लम म्हणाला. "आता तुला थोडा लबाडपणा शिकवायला मी सुरुवात करतो. क्षणभर त्या हंडीत मला मजेत बसून दाखव पाहू. दाखवशील?"
"फारच छान." कोल्हा म्हणाला. ती हंडी घेऊन तो झाडाच्या एका ओंडक्यावरून पलिकडे गेला. तिथे त्याने आपण त्या हंडीत गेल्यासारखे सोंग केले. पण प्रत्यक्षात तो त्या ओंडक्याआड दडून राहिला. कोल्ह्याची आपल्याकडे पाठ झालेली पाहून इकडे माल्लमने एक मोठा दगड उचलून घेतला आणि अकस्मात त्याने तो त्या हंडीच्या तोंडावर धाडकन आपटला.
"ओ हो," ओंडक्याआडून कोल्हा म्हणाला, "म्हणजे तुझी ही लबाडी अशा प्रकारची आहे, होय ना? माझाच काटा काढायचा प्रयत्न करतोयस तू."
"ठीक आहे, डिला," माल्लम म्हणाला, "तू आहेस तेवढाच लबाड पुरेसा आहेस. तुला आणखी लबाडी कुणी शिकवली तर तू जगाचा छळ मांडशील. देवाने तुला जे काही दिलं आहे ते घेऊन आता इथून चालता हो. फूट – तुला फक्त तेवढ्याचीच गरज आहे."
---
हौसा कथा : ९
कोल्हा
ही आहे गोष्ट मालामिन दावाची. एका कोल्ह्याची. कोणे एके काळी त्या कोल्ह्याची पोरे उपाशी राहू लागली. तेव्हा तो पैसे उसने घेण्यासाठी बाहेर पडला. म्हणजे मग त्याला आपल्या पोरांचे पोट भरता येणार होते.
तो पहिल्यांदा कोंबड्याच्या घरी गेला. एकमेकांचे आगत स्वागत झाल्यावर तो कोल्हा म्हणाला, "मी तुझ्याकडे कर्ज मागायला आलोय, झकारा – मला तुझ्याकडून दहा हजार पाहिजेत दुसरा महिना येईपर्यंत, म्हणजे मला माझ्या कुटुंबासाठी धान्य विकत घेता येईल." तो कोंबडा कबूल झाला. त्याने हजार कवड्या आणल्या आणि कोल्होबाच्या हातावर ठेवल्या.
कोंबड्याच्या घरून कोल्हा रानमांजराच्या घरी गेला. "मी तुझ्याकडे कर्ज मागायला आलोय्. मुझुरु" तो म्हणाला 'दहा हजार, दुसरा महिना येईपर्यंत." रानमांजर तयार झाले आणि त्याने त्याला पैसे दिले.
तिथून तो गेला कुत्र्याकडे, तरसाकडे, चित्त्याकडे, सिंहाकडे आणि सर्वांत शेवटी शिकाऱ्याकडे. प्रत्येकाकडून त्याला दहा हजार कवड्यांचे कर्ज मिळाले होते. ते पैसे सगळे गोळा करून त्याला जे काही हवे होते ते त्याने खरेदी केले.
दुसा महिना येण्यापूर्वी काही दिवस अगोदर कोल्ह्याने झुडुपातील जागा स्वच्छ केली. त्याला तिथून, कोणत्याही दिशेने, कुणीही, त्याच्याकडे येणारा पाहता येईल एवढी ती मोठी होती. त्या जागेच्या मधोमध त्याने एक गवताची झोपडी बांधली. तिला पुढच्या बाजूने एक दरवाजा होता आणि एक लहानसा रस्ता मागील बाजूने होता.
दुसरा महिना उजाडताच कोल्हा त्या झोपडीत गेला. तिथे कोंबडा त्याला भेटला. कोंबडा आपले कर्ज वसूल करण्यासाठी आला होता. दोघांनी एकमेकांचे आगत स्वागत केले आणि ते संपतंय तोच त्यांना रानमांजर झोपडीकडे येताना दिसले.
"झटकन बोल," कोंबडा म्हणाला, "मागे एखादा दरवाजा आहे काय?"
"अच्छा, एक वाट आहे बाहेर पडायला मागील बाजूने," कोल्हा म्हणाला, "परंतु हे बघ, ती वाट तयार केलीय् माझ्या मुलांनी. दुसऱ्या कुणाला ती वापरायची असेल तर त्याला वीस हजार द्यावे लागतील तिच्या वापरासाठी."
"ठीक आहे," कोंबडा म्हणाला. "म्हणजे त्याचा एवढाच अर्थ की आता तू मला देण्याऐवजी मी तुझे दहा हजार देणे लागतो. दुसऱ्या वेळी जेव्हा तू माझ्या घरी येशील तेव्हा ते पैसे मी तुला देईन," असे बोलून घाईघाईने तो मागच्या बाजूने बाहेर पडला.
रानमांजर त्या झोपडीत आले न आले तोच त्याला कुत्रा येताना दिसला.
"झटकन् बोल," रानमांजर म्हणाले, "मागे एखादा दरवाजा आहे काय?"
"अच्छा एक वाट आहे. बाहरे पडायला मागील बाजूने," कोल्हा पुनः म्हणाला, "पण जो कुणी तिचा उपयोग करील त्याला वीस हजार द्यावे लागतील."
"ठीक आहे," रानमांजर म्हणाले, "म्हणजे त्याचा अर्थ एवढाच की आता मी तुझे दहा हजार देणे लागतो." असे म्हणून घाईघाईने तोही मागील बाजूने बाहेर पडला.
अशा रीतीने कुत्रा, तरस, चित्ता सर्वजण आले आणि गेले. प्रत्येकजण जाताना कोल्ह्याचे दहा हजार कवड्या देणे लागत होता. सरते शेवटी जेव्हा सिंह त्या झोपडीत आला, त्याच वेळी शिकारी त्या झोपडीच्या आवारात आला.
"ए," सिंहाने आश्चर्याने विचारले, " तुला ठाऊक होतं का शिकारी येणार आहे ते?"
"तुला बघून तो तुझ्या मागून आला असावा," कोल्हा म्हणाला.
"ठीक आहे डिला," सिंह म्हणाला, "पण मी कुठे लपू सांग."
"तू इथेच लपून रहा," कोल्हा म्हणाला, "आणि तो निघून जाईपर्यंत इथेच थांब." म्हणून मग सिंह त्या झोपडीत लपून राहिला.
शिकारी झोपडीत आला आणि कोल्ह्याला म्हणाला, "हं, मी हजर आहे – माझ्या पैशासाठी आलो आहे."
"खाली बस," कोल्हा म्हणाला, "तोपर्यंत मी तुझ्यासाठी पैसे मोजून ठेवतो." पैसे मोजता मोजता कोल्ह्याने खुणेने शिकाऱ्याला सिंह झोपडीत लपून राहिला होता ते दाखवले. ते पाहून शिकाऱ्याने आपल्या भात्यातून एक बाण काढला. तो त्याने धनुष्याला लावला आणि सिंहाला ठार केले.
कोल्ह्याविषयी म्हणाल तर त्याने शिकाऱ्याचे कर्ज फेडले आणि मग तो त्या सिंहाच्या शरीरावर आणि सर्व जनावरे जो पैसा त्याचे देणे लागत होते त्यावर आनंदात राहिला.
—--
हौसा कथा : १०
ससा, हत्ती आणि जिराफ
सशाने एकदा हत्तीला सुचविले की त्या दोघांनी मिळून भागीदारीत शेती करावी.
"तू झुडुपं साफ कर," ससा हत्तीला म्हणाला, "आणि तू झाडे लोटून इथवर आणल्यानंतर मी त्यांना आग लावीन."
हत्ती कबूल झाला आणि जमीन स्वच्छ करण्यासाठी तो झाडे ओढीत आणू लागला.
ससा नंतर जिराफाकडे गेला आणि त्यालासुद्धा त्याने सुचविले की आपण दोघांनी मिळून शेती करू या.
"मी झाडे ओढून आणीन," तो जिराफाला म्हणाला, "आणि तू मग ती जाळून टाक."
जिराफ कबूल झाला आणि जिथे हत्तीने अगोदरच झाडे ओढून आणली होती तिथे तो गेला आणि ती सगळी झाडे त्याने जाळून टाकली. सशाविषयी म्हणाल तर, त्याने एवढीच काळजी घेतली, की हत्तीला कळता कामा नये जिराफ काय करतो ते आणि जिराफला कळता नये की हत्ती काय करतोय.
पहिला पाऊस पडला तसा ससा गेला आणि हत्तीला भेटला. "गिबा," तो हत्तीला म्हणाला, "तू पेरणी कर आणि मी करीन नडणी."
नंतर तो गेला आणि जिराफाला भेटला.
"रकुमिन दावा," तो जिराफाला म्हणाला, "मी पेरणी केलीय आणि आता तुझी पाळी आहे नडणी करण्याची."
त्यानंतर धान्य पिकून पिवळे झाल्यावर तो परत गेला हत्तीकडे,
"आता गिबा," तो हत्तीला म्हणाला, "तू जा आणि धान्य काप. मग मी ते गोळा करीन."
सरतेशेवटी, हत्तीने कापणी केल्यावर, तो परत जिराफाकडे गेला.
"मी कापणी पुरी केली आहे" तो म्हणाला "आता तू ते गोळा कर. सगळं काही तयार आहे."
सगळी कामे पुरी झाल्यावर ससा पुनः हत्तीला भेटायला गेला.
"अच्छा गिबा," तो म्हणाला, "धान्य सगळं गोळा झालंय. तर उद्या ते आपण आत आणून ठेवूया. परंतु थोडीशी एक अडचण आहे," तो बोलू लागला, "मी ऐकलंय की जिराफ नावाचा कुणी प्राणी आपले धान्य लुबाडण्याचा प्रयत्न करणार आहे."
"कोण आहे हा जिराफ?" हत्तीने विचारले. "अच्छा, जाऊ दे. उदया आपण त्याचा विचार करू. आता तू सटक बघू इथून."
हत्तीकडून ससा गेला जिराफाकडे. "मला तुला काही सांगायचं आहे, रकुमिन दावा," तो म्हणाला. "मी नुकतंच ऐकलंय की हत्ती नावाचा एक प्राणी आपले धान्य लुबाडून नेण्याचा प्रयत्न करणार आहे."
"कोण आहे हा हत्ती?" जिराफाने विचारले. "अच्छा, जाऊ दे. आपण उद्या त्याचा विचार करू."
दुसऱ्या दिवशी जिराफ सर्वात लवकर उठला आणि शेतावर गेला. ससा त्याला येऊन मिळाला तेव्हा तो सशाला म्हणाला, "ए झोमो, कुठे आहे तो हत्ती? तू म्हणाला होतास ना तो आपलं धान्य लुटायला येणार म्हणून?"
"तो लवकरच इथे येईल अशी माझी अपेक्षा आहे," ससा म्हणाला. "बघ – तो आलाच आता."
हत्तीला समोरून येताना पाहून ससा म्हणाला. 'तुला दिसतोय का तो?"
"कुठे?" जिराफाने विचारले. "कुठेतरी त्या टेकडीजवळ?" "ती काही टेकडी नाहीय," ससा म्हणाला, "तो आहे हत्ती."
"अरे देवा!" जिराफ म्हणाला, मला त्याच्यावर मात करता येणार नाही."
"ठीक आहे." ससा म्हणाला, "नाही येणार ना? तर मग तू खाली पडून रहा आणि मान वर काढून ठेव."
जिराफाने सांगितल्याप्रमाणे केले. ससा हत्तीकडे गेला.
"ए झोमो," हत्ती म्हणाला, "कुठे आहे तो जिराफ? तू म्हणाला होतास ना तो आपलं धान्य लुटणार आहे म्हणून?"
"तो सकाळी इथे तुझी वाट पहात होता, ससा म्हणाला, "पण तो आंघोळ करायला गेला आहे. ते पहा त्याचं गिटार तिथे पडलंय." जिराफाच्या उंचावलेल्या मानकडे बोट दाखवीत ससा म्हणाला.
"अरे देवा!" हत्ती म्हणाला, "असलं भलं मोठं गिटार जवळ असलेला प्राणी म्हणजे मला हाताळता येण्यापलिकडचा आहे."
"ठीक आहे, गिबा," ससा म्हणाला, "तुला तसं वाटतंय ना? तर मग तू पळ काढशील तर बरे होईल." तसा हत्ती दूर पूर्वेकडे धूम पळाला.
ससा मग परत जिराफाकडे गेला, तो त्याला म्हणाला, "पळता येण्यासारखं आहे तोवर तू पळून जाशील तर फार बरं रकुमिन दावा; नाहीतर तो हत्ती परत येईल आणि तुला पकडील." ते ऐकून जिराफाने उंच उडी मारली आणि दौडत दौडत तो पश्चिमेला दूर पळाला.
अशा रीतीने ते सगळे धान्य सशाला मिळाले. ते त्याने आपल्या घरात नेले आणि त्यानंतर तो मजेत राहू लागला.
---
'किशोर' मासिकातून पुनर्मुद्रित. शुद्धलेखन मुळाबरहुकूम.