संपादकीय : आफ्रिका खंड: इतिहास, वर्तमान आणि अजून बरेच काही

 #संपादकीय #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

आफ्रिका खंड: इतिहास, वर्तमान आणि अजून बरेच काही

- - रोचना

आफ्रिका हा विषय मराठीत, मराठी लोकांत बराचसा दुर्लक्षित आहे. आफ्रिकेशी आपला बहुतेक संबंध येतो तो ठाशीव कल्पनांच्या स्वरूपात : दुष्काळी भागातले, कुपोषित लोक. (जोडीला आपला प्रच्छन्न वंशवाद.) आफ्रिकेतल्या विविध भागांबद्दलही आपल्याला साचेबद्ध माहिती असते. पूर्वेकडे मसाई मारा अभयारण्य, दक्षिणेकडे महात्मा गांधींची पहिली कर्मभूमी आणि अलीकडे मोक्याच्या क्षणाला हरणारी क्रिकेटची टीम. पश्चिमेकडे गुलामगिरीच्या युरोपीय व्यवसायाला बळी पडलेले देश आणि उत्तरेकडे वाळवंट.

नोकरीच्या संधींसाठी मराठी लोक पाश्चात्त्य जगात जातात. भारतीय लोक गेल्या दीडेक दशकात पूर्व आशियात पर्यटनासाठी जायला लागले. जे कोणी थोडे लोक आफ्रिकेत कामासाठी, पर्यटनासाठी जातात त्यांची वर्णनं आहेत, पण वरवरची… आफ्रिका खंडाच्याच बहुविधतेचा तर सोडून द्या, तिथल्या भारतीय लोकांच्या इतिहासाचाही व्यवस्थित आढावा घेतला गेलेला नाही. ही उणीव एकाच अंकात भरून काढणं अशक्य आहे, पण आफ्रिका खंडाच्या इतिहासावर, वर्तमान स्थितीवर, आणि भविष्याबद्दल काही माहितीपर आणि काही ललित लेख एकत्र आणून या दुर्लक्षित विषयाबद्दल मराठी वाचकांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढेल, या आशेने आम्ही हा दिवाळी अंक वाचकांसमोर ठेवत आहोत.

भारतीय लोक गुजरातमधून आणि सिंधमधून पूर्व आणि इशान्य आफ्रिकेत अनेक शतकं व्यापारासाठी जात होते. आधुनिक काळातही ब्रिटिश साम्राज्याच्या छत्रछायेत ते युगांडात, टांझानियात आणि केनियात गेले; तिथे व्यवसाय केला; पैसा मिळवला. तरीही स्थानिकांपासून ते फटकूनच राहिले. इदी अमीनने भारतीयांची हकालपट्टी केली हे अनेकांना ठाऊक असेल. यातून झालेल्या गुंतागुंतीबद्दलचा आढावा अंकात प्रा. महमूद ममदानी यांच्या युगांडाबद्दलच्या भाषांतरित लेखात आहे. ममदानी आफ्रिकेच्या इतिहासाचे आणि राज्यशास्त्राचे आघाडीचे अभ्यासक आहेत, तसेच ते स्वतः भारतीय वंशाचे युगांडन नागरिक आहेत, आणि या लेखात त्यांच्या व्यक्तिगत अनुभवाचा धागादेखील गोवलेला आहे.

उत्तर आफ्रिकेतल्या सुदान देशाचा परिसर अधूनमधून दरफुर भागात होणार्‍या भीषण हिंसाचाराच्या बातम्यांतूनच आपल्यासमोर येतो. ब्रिटिशांनी तिथेही ‌वेगवेगळ्या समुदायांची सुसंस्कृत आणि असंस्कृत अशी अनभ्यस्त विभागणी केली, आणि भांडणं लागली. प्रा. महमूद ममदानींच्या या विषयांवरच्या पुस्तकांचा आढावा रोचनानं एका लेखात घेतला आहे. दुसऱ्या टोकाला, दक्षिण आफ्रिकेत, अनेक दशकं 'अपार्थाइड' ही वर्णविद्वेषाची व्यवस्था होती. भारतानं त्याविरुद्ध तत्कालीन दक्षिण आफ्रिकेवर आंतरराष्ट्रीय बहिष्कार टाकून तिथल्या सरकारवर दबाव आणण्यात पुढाकार घेतला होता, आणि मुत्सद्देगिरी बजावली होती. अपार्थाइड व्यवस्थेचा १९९४मध्ये पाडाव झाला, आणि काळ्या लोकांनी आपल्या देशात लोकशाही मूल्यं रुजवायला सुरुवात केली. पण वर्णविद्वेषाचे परिणाम अजूनही दक्षिण आफ्रिकी समाजात भोगले जात आहेत. गेल्या काही वर्षांत याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विद्यापीठांमध्ये काही महत्त्वपूर्ण विद्यार्थी चळवळी झाल्या. त्या चळवळींचा, आफ्रिकेतल्या शिक्षणव्यवस्थेच्या इतिहासाचा आणि भवितव्याचा आढावा रुची चतुर्वेदी यांच्या लेखातून दिसेल. आफ्रिकेच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावरच्या लायबेरिया देशात १९८०पासून सुमारे तीन दशक भीषण यादवी युद्ध चालू होतं. लायबेरियाचं वैशिष्ट्य असं, की भारत स्वतंत्र होण्याआधी शंभर वर्षं तो स्वतंत्र होता, आणि त्याची मुळं आफ्रिकेत नसून अमेरिकेत आहेत. एकोणिसाव्या शतकातल्या अमेरिकेत गुलामगिरीतून मुक्त झालेल्या माणसांसाठी स्वतंत्र देश म्हणून हा देश निर्माण केला गेला. तेव्हापासून अलीकडच्या काळातल्या संघर्षापर्यंतच्या घडामोडींचा आढावा अवधूत बापट यांनी घेतला आहे. त्याच लेखात उल्लेखलेल्या, लायबेरियाच्या एकाच मार्गावरच्या तीन निरनिराळ्या प्रवासवर्णनांचा धावता आढावा नंदन यांनी घेतला आहे. तसंच, डेमोक्रटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशाचाही वसाहतकालापासून आजपर्यंतचा रक्तरंजित इतिहास बापट यांनी 'खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश' या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखात रेखाटला आहे. कॉंगोच्याच शेजारी छोट्याश्या रवांडा या देशातील हुतु व तुत्सी जमातींमधली तेढ वाढत जाऊन १९९४मध्ये त्याचं पर्यवसान तुत्सी जमातीच्या शिरकाणामध्ये झालं. या घटनेचा आढावा पीडितांच्याच शब्दांत सांगणाऱ्या एका पुस्तकाचा परिचय उज्ज्वला यांनी करून दिला आहे. एकूण, आफ्रिका सातत्यानं आर्थिक दारिद्र्यात राहिला आहे; तो वसाहतकालात, शीतयुद्धात आणि आणि आता खनिजांमागच्या साठमारीसाठी श्रीमंत देशांच्या हातात बाहुलं झालेला खंड आहे; आणि यातून आफ्रिकेत लोकशाही फार रुजली नाही, किंबहुना रुजू दिली गेली नाही, ही वस्तुस्थिती असली, तरी या सरसकट विधांनांपलीकडे जाऊन हे सर्व लेख सद्य परिस्थितीला महत्त्वाची, आणि गुंतागुंतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी देतात.

शैलेन भांडारे यांचा निबंध आफ्रिकेतल्या चलनावर वसाहतवादाचा काय परिणाम झाला त्याचा इतिहास सांगतो. त्यासाठी इतर अभ्यासकांच्या लेखनाबरोबरच खुद्द वसाहतकालीन चलनांच्या दृश्यमय पुराव्यांचा आधार त्यांनी घेतला आहे. अशा प्रकारचं लेखन अन्यत्र झालेलं नाही. कौस्तुभ नाईक यांचा निबंध गोवा, पोर्तुगाल आणि मोझांबिक ह्यांच्या एकमेकांशी असलेल्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश पाडतो. अंगोला आणि मोझांबिक या गोव्यासारख्या पोर्तुगीज वसाहती होत्या. पोर्तुगीज साम्राज्यात नोकर्‍यांसाठी अनेक गोवेकर आफ्रिकेत स्थायिक झाले. तिथल्या व्यवस्थापनासाठी गोव्यातून मराठी सैनिकांनाही पाठवलं जाई. त्याविरुद्ध गोव्यात सैनिकांनी बंडही पुकारलं होतं. ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या पूर्व आफ्रिकेतल्या देशांतही गोवेकर मोठ्या प्रमाणात जात – आज ब्रिटनच्या केंद्रीय गृहमंत्री, आणि कट्टर उजव्या पंथाच्या, वादग्रस्त विधानं करणार्‍या राजकारणी सुएला ब्रेवरमन, यांचे वडीलही त्यांच्यापैकी एक होते. असे अनेक रोचक धागे जुळवणारा कौस्तुभ यांचा निबंध जरूर वाचा.

मापुतो मोझांबिक
मापुतो मोझांबिक

आरोग्याच्या कारणास्तव आजच्या काळात साखर या नुसत्या शब्दाचंही आपल्याला वावडं झालं आहे हे खरंच आहे. तरीही जागतिक इतिहासाला आकार देणारी ही सर्वांत महत्त्वाची वस्तू आहे हे आपण नाकारू शकत नाही. साखर ह्या वस्तूचे परिणाम केवळ आपल्या सर्वांच्या रक्तातल्या HbA1c चाचणी निकालांवरच नव्हे तर समस्त आफ्रिका, कॅरिबियन आणि युरोपच्या इतिहासातही जाणवतात. साखरेची स्वस्त उपलब्धता आणि तिची लोकप्रियता यांच्याशी आफ्रिकन लोकांच्या शतकानुशतकांच्या गुलामगिरीचा फार जवळचा संबंध आहे. साखरेचं रसायनशास्त्र, तिचा इतिहास आणि त्याभोवतीच्या राजकीय अर्थव्यवस्थेची सुबकपणे सांगड घालणारी कडू-गोड कहाणी सई केसकरने तिच्या व्यापक लेखात मांडली आहे. अमेरिका आणि इतरत्र गुलाम बनवल्या गेलेल्या काळ्या आफ्रिकन लोकांबद्दल इतिहासामध्ये बरंच काही लिहून ठेवलेलं आहे, परंतु बॅटमॅन यांचा निबंध दक्षिण आफ्रिकेतील युरोपियन राजवटीखाली गुलाम झालेल्या भारतीयांवर प्रकाश टाकतो. भारताच्या काही भागांतून मॉरिशसमध्ये बळजबरीच्या मजूरकामावर गेलेल्या लोकांना गिरमिटिया असं संबोधण्यात येतं. कागदोपत्री जरी गुलामगिरी संपुष्टात आलेली असली तरी अस्तित्वात असलेल्या ह्या सक्तीच्या गुलामांची कहाणी आदूबाळ यांच्या लेखात आलेली आहे. शोषणावर आधारित व्यवस्थेत त्यांच्या पिढ्या खर्ची पडल्या आणि त्यांनी ज्या देशांत स्थलांतर केले त्यांच्या इतिहासाच्या घडणीमधे त्यांचा मोठा वाटा आहे.

आफ्रिकेतल्या देशांना साठ-सत्तरच्या दशकांत स्वातंत्र्य मिळायला सुरुवात झाली. तरी आजही भांडवलशाहीची चक्रं फिरवत राहण्यासाठी आफ्रिकेला नाडलं जात आहेच. उत्तर आफ्रिकेतल्या अनेक देशांत खनिजसमृद्धी आहे. त्या स्रोतांमागे जगातले सगळेच प्रगत देश आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून विजेवर चालणाऱ्या गाड्या, ते हा दिवाळी अंक लिहिण्या-वाचण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांत बॅटऱ्या वापरल्या जातात. त्या बॅटऱ्यांमध्ये कोबाल्ट वापरलं जातं; त्यासाठी आजही काँगो देशात अस्थिरता टिकवून धरण्याचा प्रयत्न होत आहे. दुसऱ्या बाजूला कार्बन क्रेडिट ही नवी संकल्पना राबवली जात आहे. या संकल्पनांमागचा विचार, त्यांतल्या त्रुटी आणि त्याचा आफ्रिकेवर होणारा परिणाम याबद्दल उमेश घोडकेंचा लेख आहे.

लुआंडा नॅशनल असेंब्ली पॅट्रिस लुमुंबा
लुआंडा, अंगोला - नॅशनल असेंब्ली किन्शासा, काँगोमधला पॅट्रिस लुमुंबाचा पुतळा पाहणारे पर्यटक

नायजेरियाई कादंबरीकार चिमामांडा नगोझी अडिचीचं एक टेड टॉक आहे, "द डेंजर ऑफ ए सिंगल स्टोरी". त्यात ती म्हणते, तिच्या गोष्टींमध्ये नायजेरियाई मध्यमवर्गाचं वर्णन होतं, तर ते तिच्या अमेरिकी प्राध्यापकांना भावलं नाही. आफ्रिका म्हणजे गरीब, भुकेकंगाल समाजच, हा ठरीव साचा काही फक्त भारतीयांबद्दलचा नाही, आफ्रिकेबद्दलचाही आहेच. किंबहुना, अनेक भारतीयांचीही अशीच समजूत असते. अशा सरधोपट समजुतींना छेद देणारे अनेक लेख वाचकांना अंकात सापडतील. "आफ्रिकेकडे अपयशाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून पाहिले जाते," हे वाक्य 'आफ्रिका हा देश नव्हे' या इवोर चिपकिन यांच्या लेखात आहे. चिपकिन आफ्रिकेतल्या भ्रष्टाचाराच्या कारणांचं बारीक विश्लेषण तर करतातच, पण 'आफ्रिका' या बृहत-संकल्पनेचादेखील नव्याने धांडोळा घेतात. प्रेरणा कुलकर्णी यांचा लेख M-Pesa या सेवेबद्दल आहे. ही सेवा पूर्व आफ्रिकेत अलीकडे फोफावली आहे. आफ्रिकी लोकांच्या दैनंदिन आयुष्यांबद्दलच्या आपल्या घडीव कल्पनाही त्यातून मोडीत निघतात. धनंजयचा माहितीपूर्ण लेख आफ्रिकेतल्या मध्यमवर्गीय रोगांबद्दल आहे. एड्स, इबोलासारख्या साथींनी, आणि मलेरियासारख्या साध्या वाटणाऱ्या आजारानेही आफ्रिकेत थैमान घातलं आहे हे एक वेळ माहीत असतं. पण हा लेख आफ्रिकेची पांढरपेशा बाजू दाखवणारा आहे. दक्षिण आफ्रिकेतले शास्त्रज्ञ अँथनी अ‍ॅलिसन यांनी सिकल सेल अ‍ॅनिमिया या जनुकीय आजारावर केलेल्या संशोधनाबद्दल सत्यजित सलगरकर यांचा लेख प्रकाश टाकतो. सिकल सेल अ‍ॅनिमिया असलेल्या रुग्णांमध्ये मलेरिया या प्राणघातक रोगाची प्रतिकारशक्ती सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे हे केनियातल्या व्हिक्टोरिया लेकच्या आसपासच्या प्रदेशातल्या लोकांवर केलेल्या संशोधनाद्वारे अ‍ॅलिसन हे दाखवू शकला. या लेखात हे सर्व रोमहर्षक पद्धतीने उलगडण्यात आलेलं आहे.

ऐसी अक्षरेमध्ये यंदा लिहिणाऱ्या आमच्या काही लेखकांनी आफ्रिकेच्या विविध पैलूंबद्दल नेमकी, अचूक माहिती देणारे, टोकदार वाटावेत असे दृष्टीकोन आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कामामुळे हे लोक आफ्रिकेच्या त्या त्या भागांमधे गेले; त्यांनी तिथले प्रत्यक्ष अनुभव घेतले. उदाहरणार्थ शैलेश मुळे – ते त्यांच्या कामाच्या दरम्यान फ्रेंचभाषक आफ्रिकन लोकांच्या संपर्कात आले. फ्रेंचांच्या वसाहती असलेल्या आफ्रिकी देशांशी त्यांनी ओळख करून दिली आहे आणि त्या देशांचे फ्रान्सशी आजच्या काळात संबंध कसे आहेत त्याबद्दल विवेचन केलं आहे. ह्या फ्रेंच वसाहतींपैकी काही देशांतल्या अलीकडच्या घडामोडींकडे बारकाईने पाहिलं, तर ते एका नवीन जागतिक लष्करी आणि मुत्सद्देगिरीच्या जाळ्यात कसे अडकले आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्या राजकीय पटलावर चिंतातुर जंतू यांनी आपल्या लेखाद्वारे प्रकाश टाकलेला आहे. एकीकडे फ्रान्स तर दुसरीकडे चीन आणि रशिया अशा कैचीत सापडलेले हे देश आणि त्यांच्यातल्या काहींवर पडलेला इस्लामिक धर्मांधतेचा प्रभाव हे रसायन आपल्याला त्या लिखाणातून मिळेल.

दाकार,सेनेगाल
दाकार, सेनेगालमधला एंगोर बीच

टिंबक्टूदेखील या फ्रेंच वसाहतींमध्ये येतं. देवकी एरंडे यांनी आपल्या लेखात विषद केल्याप्रमाणे या शहराच्या इतिहासाला, भूगोलाला, आणि वास्तवाला एखाद्या दंतकथेतल्या नगरीसारखी बाजू आहे. आपल्याकडे रेडियोच्या फर्माईशींमधे कसं झुमरीतलैय्या नावाचं गाव येतं, तसं एरवी साध्यासहज वाटणार्‍या टिंबक्टुला कसं परीकथांचं वलय मिळत गेलं, ते देवकी एरंडे यांच्या लिखाणाद्वारे आलेलं आहे. देवकी इंटरनॅशनल कमिटी फॉर द रेडक्रॉसमध्ये काम करतात आणि त्यांनी आपल्याला एकाच वेळी पुरातन टिंबक्टू आणि त्याचं आजचं स्वरूप अशी दुहेरी सफर घडवलेली आहे.

विजुभाऊ नोकरीसाठी जोहानसबर्गमध्ये काही साचेबद्ध विचार मनात घेऊनच गेले. तिथे गेल्यावर ठरीव साचे मोडून ते त्या शहराच्या प्रेमात कसे पडले, त्याबद्दल ते लिहितात. शिल्पा केळकर यांचा लेख केन्यामधल्या मसाई जमातीच्या गोपालांबद्दल आहे. जगात गोसंवर्धनाच्या किती विविध प्रथा आहेत, याची त्यातून कल्पना येते. प्रीति छत्रे यांचा लेख आफ्रिकेत आपली मुळं शोधायला गेलेल्या मारियो रिग्बी या कॅनडाच्या रहिवाश्याबद्दल आहे. मारियोलाही आपल्या, आणि त्याच्यासारख्या कृष्णवर्णीयांच्या तरुण पिढीच्या ठरावीक कोषांतून बाहेर पडायचं होतं. त्यानं दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनपासून इजिप्तच्या कैरोपर्यंत बारा हजार किलोमीटर हा प्रवास जमेल तितका पायी, आणि जमेल तितका यांत्रिक वाहनाचा वापर न करता केला. तो वाटेत असंख्य लोकांना भेटला, त्यांच्याशी बोलला. छत्रेंचा लेख मारियो रिग्बीच्या या दीर्घ, साहसी प्रवासाची, यात्रेची ओळख करून देतात.

याउलट, देवदत्त आपल्या विलक्षण विनोदी शैलीत सिंधुआज्जी या त्यांच्या अत्यंत धाडसी पात्राला टारझनच्या काल्पनिक प्राणिजगताच्या शोधात एका निराळ्याच यात्रेवर पाठवतो. १९८९मध्ये विख्यात विज्ञानकथालेखक डग्लस ॲडम्स आणि जीवशास्त्रज्ञ मार्क कारवारडीन यांना बी. बी. सी.नं आफ्रिकेतल्या काही लुप्तप्राय प्रजातींच्या संशोधनासाठी पाठवलं. त्यातून बी. बी. सी.वर एक रेडियो मालिका निघाली, आणि ॲडम्स यांचं प्रवासवर्णन. ॲडम्स यांची खास, विनोदी शैली आदुबाळ यांनी अत्यंत रसाळ मराठीत उतरवली आहे. तुम्ही लहानपणी किशोर मासिक वाचलं होतं का? त्यात अधूनमधून जगाच्या विविध भागांबद्दल रंगीबेरंगी माहिती दिलेली असायची. किशोर अंकात १९७६ साली छापून आलेल्या आफ्रिकेतल्या हौसा भाषेतल्या काही लोककथा आम्ही ह्या आफ्रिका विशेषांकात पुनर्मुद्रित केल्या आहेत.

ऐसीचा हा दिवाळी अंक चाळताना तुम्ही कॉफी पीत आहात का? आफ्रिकेपासून उगम पावून जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या आपल्या आवडत्या पेयाच्या उत्पत्तीबद्दल आणि प्रसाराबद्दल एक संक्षिप्त, माहितीपूर्ण पार्श्वभूमी अवंतीने दिली आहे. आपण कुणी निराळे आहोत, आपली संस्कृतीच जगात थोर आहे; आपल्या पाककृतींसारखं इतर काही जगात असूच शकत नाही; ही भावना भारतीयांसाठी नवीन नाही. चवीचवीनं खाणाऱ्या आणि हौशीनं स्वयंपाक करणाऱ्या रुचीचा लेख त्या कल्पनेला धक्का लावतो. येमिसी अरीबिसला या नायजेरियन लेखिकेच्या 'लाँगथ्रोट मेम्वार्स' (Longthroat Memoirs) या पुस्तकावर हा लेख आधारित आहे. 'लॉंगथ्रोट मेम्वार्स'ला २०१६मध्ये 'आंद्रे सायमन फूड अँड ड्रिंक अवॉर्डस्‌'मध्ये 'जॉन एव्हरी' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रूचीचा लेख पुस्तकाचा अनुवाद नव्हे, भाषांतर नव्हे किंवा स्वैर रूपांतरही नव्हे. तर एका रसाळ 'फॅनफिक्शन'च्या स्वरूपातलं हे पुस्तकाचं रसग्रहण आहे. शिरीन म्हाडेश्वरांचा लेख 'दाकाराई सुमन ओकोये' ह्या अनोख्या नावाच्या, आफ्रिकन-मराठी फ्यूजन रेस्तराँ चालवणार्‍या इसमाशी गप्पांच्या स्वरूपात आहे. ही मुलाखत वाचल्यावर तुम्हाला लगेचच हे रेस्तराँ कुठे आहे हे गुगलून शोधण्याची इच्छा होईल. त्याचं रहस्य लेखातच दडलेलं आहे, त्यामुळे मॅपवर लगेच पत्ता सापडला नाही, तर पुन्हा एकदा लेख नीट वाचावा, अशी आम्ही नम्र विनंती करतो.

सुरेन पिल्ले यांचा लेख दक्षिण आफ्रिकेतल्या जॅझ संगीताच्या विश्वाची आणि गेल्या काही दशकांतल्या आफ्रिकन आणि आफ्रिकन-अमेरिकन संगीतकारांमधल्या जवळच्या संबंधांची ओळख करून देतो. या लेखावर नजर टाकता टाकता काही क्लासिक आणि नवी जॅझ रेकॉर्डिंग ऐकण्याची सोयदेखील काही दुव्यांमधून आम्ही दिलेली आहे. अपार्थाइडच्या वर्णभेदाच्या कायद्यांमुळे तयार झालेल्या गौरेतर लोकांच्या वस्त्यांमध्ये जॅझसारखे संगीतप्रकार बहरले खरे, पण याच कायद्यांमुळे अनेक गुणी क्रीडापटूंना राष्ट्रीय पातळीवर खेळायची संधी मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा दोन्ही पातळीच्या स्पर्धांपासून त्यांना वंचित ठेवले गेले. संजीव साठे यांचा लेख क्रिकेटपटू क्रोम हेंड्रिक्स आणि गोल्फपटू शिवशंकर (पापवा) शिवगुलाम या दोन खेळाडूंची ओळख करून देतो.

प्रिटोरिया
प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका

निवडलेल्या विषयाव्यतिरिक्त काही लिखाण नेहमीप्रमाणे याही अंकात सापडेल. हृषीकेश गुप्ते यांनी याआधीही ऐसी अक्षरेसाठी लिहिलं होतं. 'कानविंदे हरवले' ह्या त्यांच्या ताज्या कादंबरीचा अंश दिवाळी अंकात वाचता येईल. माधुरी पुरंदरे यांच्या 'धाकट्या मामाच्या बारा गोष्टी' म्हणजे तर वाचकांना पर्वणीच आहे. याशिवाय झंपुराव तंबुवाले आणि नील यांच्या कथा दिवाळी अंकात काही वेगळेच ट्विस्ट आणतात. मराठीतली निबंधांची परंपरा समृद्ध करणाऱ्या अरुण खोपकर यांच्या कालकल्लोळ आणि अनुनाद या दोन पुस्तकांचं रसग्रहण भूषण निगळे यांनी केलं आहे, तर रविंद्रनाथ टागोरांच्या काव्यरचनेमागची एक प्रेरणा असणाऱ्या पण महाराष्ट्राच्या विस्मृतीत गेलेल्या अन्नपूर्णा तर्खड (ॲना लिट्लडेल) यांची नव्यानं ओळख करून देऊन मृगेंद्र कुंतल यांनी एक मोठं काम केलं आहे. कॉफी आणि साखरेवरचे लेख अंकात आहेतच; शिवाय चहा-बिस्किटांवरच्या भारतीय माणसांच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली त्या गोष्टीला प्रभाकर नानावटी यांनी उजाळा दिला आहे.

एकंदरीत ऐसी अक्षरेचा हा दिवाळी अंक जगभरातल्या मराठी वाचकांसमोर ठेवताना त्यांच्या मेंदूला मेजवानी मिळेल आणि त्यांच्या कानांना, डोळ्यांना आणि जिभेलाही त्यात काही तरी रुचकर मिळेल अशी आशा आहे. नेहमीप्रमाणे वाचकांचा भरघोस प्रतिसाद येऊ लागला आहेच. अंक वाचत राहा, शेअर करत राहा आणि प्रतिक्रियाही देत राहा.

सर्व फोटो विकिपीडियावरून

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

प्रथम हा अंक जमला नाही वाचायला. जरा विकी छाप माहीतीवाले लेख वाटले. परदेश गमन नसल्याने तीही एक अडचण होतीच. एखादा मनुष्य स्वतंत्रपणे परदेशी गेल्यास आणि तिकडे मोकळेपणी फिरल्यास त्यास विविध अडचणी येतात. मग त्याच विस्तारल्या की समजू लागते. मारिशसवरून साखर येत असे म्हणून गुजराती भाषेत साखरेला मोरस हा शब्द आला. धीरुभाई अंबानी यांचे नातेवाईक तिकडे होते. त्यामुळे तरुणपणी ते तिकडे गेले व्यापारासाठी. पण भारत आणि आफ्रिका हे ब्रिटिशांच्या ताब्यात असल्याने काही अडचण नव्हती. पण पुढे येणार हे ओळखून ते आफ्रिका सोडून मायदेशी परतले. आता एक दातार तिकडचे (खाडी देशात)मसाला किंग झाले आहेत.

अंकातल्या लेखांपेक्षा ही हे लेखन अधिक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनोदी शेरा मी दिलाय बरं, आचरटबाबा.
खरं तर चालायचंच असा देणार होतो.
पण म्हंटलं नको.
बाकी ठीक ना सर्व ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार अबापट.कसे आहात?
आता 'चालायचंच' ही श्रेणीसुद्धा हवी. पकाऊ'ला काढून टाकावी. निरर्थक म्हणजे लेखाला गैरलागू. तो अर्थ अवातंर'मध्ये आहेच. माझ्याबाबतीत पूर्वी ऑफिसचे सहकारी म्हणत "you are not unfit, only misfit. " प्रतिसादांचंही असंच होतं. misfit असतात.

मराठी लोक फिरतात बरेच ठिकाणी परदेशी पण आयोजित यात्रेतून( tour). त्यातून स्थानिक लोकांशी संपर्क, देवाणघेवाण वाद काहीच होत नाही. ते इथेही होते. भारतात फिरताना भाषेची अडचण नसते मग स्वतंत्रपणे फिरायला काहीच हरकत नसते. मी कधी आफ्रिकेत( किंवा इतर देशांत)गेलोच तर बराच भाग एकट्यानेच फिरून पाहीन. माइक्रो सिंदबाद. माणूस स्वतःच्याच देशातही उपरा गणला जातो. Better living through birding - Christian Cooper या पुस्तकाच्या लेखकाला वर्णभेदाला सामोरं जावं लागलं . आफ्रिकेत आहेच पण वेगळा. उपरे लोक स्थानिकांना हेटाळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळीसकाळी पिसाळलेला चॅटजीपीटी चावला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चॅटजीपीटी चावला काय?
नुसता बाजूने गेला. चावला असता तर मी आणखी कुणाला चालणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम संपादकीय. लेख हळुहळू वाचतोय.

नायजेरियाई

इथे किंचित अडखळलो. -इया देशातल्या लोकांसाठी -इयाई अशा प्रकारचं रूप मराठीत प्रचलित आहे का? इतर उदारहणांमध्ये (रशिया-रशियन, कोलंबिया-कोलंबियन, अल्जेरिया-अल्जेरियन) -इयन हे रूप ओळखीचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0