लोकप्रिय माध्यमांतला वर्ण्य-विषय

#लोकप्रिय #माध्यमं #कृष्णवर्णीय #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

लोकप्रिय माध्यमांतला वर्ण्य-विषय

- - अपौरुषेय

पूर्वपीठिका

शेकडो वर्षं समाजमनात रुजलेला वंशवाद, क्रांतिकारी बदलांतून दोनचार दशकांत नाहीसा होईल अशी अपेक्षा अवास्तव आहे याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बऱ्याच स्वरूपातला वंशवाद अतिशय छुपा असतो किंवा नकळत होणारा असतो आणि त्यातलं राजकारण म्हणावं तितकं स्पष्ट नसतं. अनेक काळ समाजात रुळलेल्या सगळ्या व्यवस्था, समजुती आणि त्यावर आधारित सरसकटीकरण हे सगळं भेदभावाच्या राजकारणावरच बेतलेलं असेल तर त्यातून आपली पूर्णतः सोडवणूक करून घ्यायला अनेक पिढ्या जाव्या लागतील. पण हे बदल वेगाने व्हायला हवे असतील तर मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतील अश्या समाजमाध्यमांतून दिसणारं एखाद्या समाजाचं प्रतिबिंब बदलण्याचा प्रयत्न करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुस्तकं, सिनेमे, टीव्ही यातल्या पात्रांच्या गोष्टींनी आपल्यावर कळतनकळत पण दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत असतो त्यामुळे अश्या माध्यमांतून वेगवेगळ्या वंशांच्या व्यक्तींना मिळणारं प्रतिनिधित्व वाढावं म्हणून गेली अनेक वर्षें लढा चालू आहे आणि त्यातूनच अकॅडेमी अवोर्डस सारख्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकणं, राष्ट्रीय तसंच स्थानिक पातळीवरही माध्यमांतून गौरवर्णीयांपलीकडे इतर वंशांच्या व्यक्तींना प्राधान्य मिळण्यासाठी निदर्शनं करणं वगैरे गोष्टी घडत आहेत. अर्थात मग त्यावर उपाय म्हणून गौरेतरांना नावापुरती दुय्यम कामं देणं, नायिकेची मैत्रीण किंवा नायकाचा साथीदार म्हणून तोंडी लावण्यापुरता कृष्णवर्णीय चेहरा मिळवणं वगैरे करणं माध्यमांना सोयीचं पडलं पण त्यातून कृष्णवर्णीय समाजाबद्दल रुळलेले समज आणि सरसकटीकरण कमी व्हायला काहीच हातभार लागणं शक्य नव्हतं. कृष्णवर्णीय व्यक्ती म्हणजे वंचित, अशिक्षित, शरीराने चपळ, संगीतात प्रवीण पण बौद्धिक क्षेत्रांत दुर्बल अश्या समजुतींवर आधारित पात्रं पाहून आपल्याला इतकी सवय झालेली असते की त्यामागचा वंशवाद आपल्याला लक्षातही येत नाही. याला याला अर्थातच काही सन्माननीय अपवाद आहेत. काही आवडत्या पुस्तकांतून, सिनेमांतून, टीव्हीवरच्या मालिकांतून अश्या समजांना आव्हान देणारी आपली आवडती पात्रं हा बदल आपसूकपणे घडवत असतात; अश्याच काही महत्त्वाच्या भूमिकांबद्दल आणि त्याच्या प्रभावीपणाद्दल काही सभासद आपले अनुभव मांडत आहेत.

'रिव्हर्स ऑफ लंडन' आणि पीटर ग्रॅन्ट

रिव्हर्स ऑफ लंडन

लंडनच्या ट्यूबच्या भुयारांत अगदी आत्ताआत्तापर्यंत मोबाईल नेटवर्क नसे. त्यामुळे की काय, ट्यूबमधून रोजचा प्रवास करणारे अनेक प्रवासी पुस्तकं वाचताना दिसतात. आता एखादा किंडलच वाचत असेल तर इलाज नाही, पण कागदी पुस्तकं वाचणारे लोक दिसले की ते काय वाचताहेत हे डोकं वाकडं वाकडं करून टिपायचा मोह आवरता येत नाही. बरं, असे चोरटे कटाक्ष टाकणारा मी एकटाच असतो असंही नाही. याला मी 'ट्यूब रीडिंग क्लब' असं नाव दिलं आहे. या रीडिंग क्लबातून भलतीच रोचक पुस्तकं मिळून जातात. या पुस्तकांना एरवी मी हातदेखील लावला नसता, किंवा असा कोणी लेखक अस्तित्वात असल्याचं मला कळलंदेखील नसतं. बेन अरोनोविच या लेखकाचं 'रिव्हर्स ऑफ लंडन' हे असंच सापडलेलं एक पुस्तक. सतत लोकांच्या हातात बघून बघून मुखपृष्ठ परिचित होतं. शेवटी लायब्ररीतून शोधून आणलं, आणि त्या जगात जो अडकलो तो अजून तसाच आहे.

पीटर ग्रॅन्ट हा पंचविशीचा तरुण लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलीस खात्यात नुकताच कॉन्स्टेबल म्हणून नोकरीला लागतो. नव्या रंगरूटाला देतात तसली कष्टप्रद कंटाळवाणी कामं याच्याही वाट्याला येतात. अशाच एका कामाच्या संदर्भात तो कॉव्हेन्ट गार्डन या सुप्रसिद्ध भागात गस्तीच्या कामावर नेमला जातो. तिथे काही अतर्क्य, जादुई गोष्टी घडतात, आणि त्याचा परिपाक म्हणून त्याला मेट्रोपॉलिटन पोलीसांच्या जादू खात्यात भरती व्हायची संधी मिळते. (त्याला सुरुवातीला जादूबिदू काही येत नसते, पण हळूहळू शिकण्याच्या बोलीवर तो शिरकाव करून घेतो.) 'रिव्हर्स ऑफ लंडन' हे पहिलं पुस्तक, आणि पुढची जवळजवळ सात-आठ पुस्तकं हा पीटर, त्याचा बॉस नायटिंगेल, त्यांचे जादुई उद्योग, लंडनमधली जादुई प्राण्यांची दुनिया, अशी अनेक रोमहर्षक वळणं घेत अद्याप सुरू आहे.

पण इथे त्यातल्या एका विशिष्ट भागाकडे लक्ष वेधण्याचा इथे प्रयत्न आहे. पीटर ग्रॅन्ट मिश्रवंशीय आहे. त्याची आई पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लिओन देशातली 'फुला' वंशाची आहे. त्याच्या आईचे अनेक नातेवाईक अद्यापही सिएरा लिओनमध्ये आहेत, आणि काही या कादंबरीमालिकेत अधूनमधून डोकावून जातात.

पीटरचं मिश्रवंशीय असणं हे कादंबरीत दिखाऊपणे येत नाही. म्हणजे - 'बघा बघा मी गौरवर्णीय लेखक असूनही कसं एका मिश्रवंशीयाला माझ्या कादंबरीचं नायक केलं' असं अरोनोविच ठासून सांगायचा प्रयत्न करत नाही. त्याचं मिश्रवंशीय असणं तपशिलांतून साटल्याने उलगडत जातं. सिएरा लिओनीय संस्कृतीचे उल्लेख येतात. 'सहजपणे केला गेलेला वर्णभेद' (casual racism) या कादंबऱ्यांमध्ये अनेकदा दिसतो. उदाहरणार्थ, एकदा साध्या वेशात पीटर आणि त्याची सोमाली वंशाची सहकारी सहारा गुलीद एका संशयिताची मुलाखत घ्यायला जातात. जेव्हा त्या संशयिताला हे पोलीस आहेत हे कळतं तेव्हा त्याला महदाश्चर्य वाटतं - कारण 'पोलीस असे दिसत नाहीत, नाही का!'

पुस्तकांचा सूर विनोदी आहेच, आणि हा विनोद पीटरच्या निवेदनशैलीतून येतो. ही निवेदनशैली अरोनोविचने विचारांती घडवलेली आहे. त्यात हे casual racism गमतीशीरपणे उलटं फिरवलं आहे. म्हणजे : एक casual racismजन्य संकेत असा आहे की वाचकाला नव्याने ओळख होणारं एखादं पात्र गोरं असेल तर त्याचा रंग उद्मेखून सांगितला जात नाही. पण जर ते पात्र गौरेतर असेल तर सांगितला जातो. (A character's race is assumed to be white unless otherwise mentioned.) पण इथे पीटर 'the bus was driven by a white guy' वगैरेसारखी निरीक्षणं मांडतो, पण एखादं पात्र गौरेतर असेल तर तसं लिहीलच असं नाही!

अरोनोविचने पीटर ग्रॅन्टचा 'आवाज' अचूक पकडला आहे याची आणखी एक गमतीशीर सामक्षा आहे. कोणी आफ्रिकन वंशाचं पात्र असेल तर पीटर त्याच्या चेहेऱ्यातील बारकाव्यांचं तपशीलवार वर्णन करतो. ते पात्र सेनेगाली, लायबेरीय, सिएरा लिओनीय वगैरे पश्चिम आफ्रिकी पट्ट्यातलं असेल तर आणखीच तपशिलात. पण ते पात्र गौरवर्णीय असेल तर चेहेरेपट्टीचे तपशील फारसे येत नाहीत. याचं कारण असं की आपण ज्या वंशाचे असतो त्या वंशातल्या चेहेऱ्यांचे सूक्ष्म तपशील आपल्या ध्यानात राहतात – इतर वंशीय चेहेरे एकमेकांत मिसळून जातात! (याची अनेक उदाहरणं सापडतील. पुलंनी एका लेखात एका शीख सैनिकी अधिकाऱ्याला टॅक्सीवाला समजल्याचा उल्लेख आहे. ब्रिटिश सैन्याधिकारी मद्रास रेजिमेंटच्या सैनिकांना एकजात 'रॅमसॅमी' म्हणत असत.)

असं असलं तरी 'मिश्रवंशीय असणे' हा पीटरच्या स्वत्वाचा एक भाग आहे. तो पक्का ब्रिटिश, त्यातही लंडनर आहे. पोलीस असणं हीदेखील त्याच्या अस्तित्वाची खूण आहे.

लेडी टाय

आमच्या शहरात एक फ्रेंच बेकरी आपलं बुलॉन्जरी आहे, फ्रेंच असल्याने ती अर्थातच उच्चभ्रू आहे आणि शहराच्या श्रीमंत भागात आहे. तिथे मिळणारे ताजे पाव, पेस्ट्रीज, इतर जिन्नस अतिशय उत्तम प्रतीचे असल्याने तिथल्या अव्वाच्या सव्वा किंमतींकडे दुर्लक्ष्य करत आम्ही वाकडी वाट करून अनेकदा तिकडे चक्कर मारतो. एकदा मी आणि माझी मुलगी तिथे उभारून काय विकत घ्यायचं याचा खल करत असताना एक भारदस्त स्त्री दुकानात प्रवेशली. सुंदर तुकतुकीत त्वचा, एकसमान काळ्याभोर कातळासारखा वर्ण, चेहऱ्याभोवती अगदी ताणून काळजीपूर्वक उंच बांधलेला केसांचा फुलोरा, नेटका माफक मेकअप, सिल्कचा सुंदर कुर्ता, फिक्या रंगाची विजार, पायात 'जिमी च्यू' किंवा तत्सम डिझायनर कंपनीचे जोडे, हातात उंची बॅग, अंगावर मोजके पण ठळक आणि पोषाखाच्या रंगसंगतीला शोभून दिसतील असे दागिने. चेहऱ्यावर स्मिताचा पूर्ण अभाव असलेल्या या स्त्रीच्या चालण्याबोलण्यातला इतका जबरदस्त आत्मविश्वास होता की सगळ्यांनी तिच्याकडे माना वळवून पाहावं! आम्ही आधी येऊनही बावळ्यासारखे काय घ्यायचं हे न ठरवता आल्याने खोळंबलो होतो म्हणून तिने आमच्याकडे प्रश्नार्थक नजर टाकली आणि आम्ही निमूटपणे तिला रांगेत पुढची जागा दिली. तिने अगदी अधिकारवाणीने आणि पदार्थांच्या नावांचे अचूक फ्रेंच उच्चार करत भलीमोठ्ठी खरेदी केली आणि दुकानदाराने तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या दिल्या. ती दरवाजापाशी आल्यावर शेजारच्या एका माणसाने लगबगीने तिच्यासाठी दरवाजा उघडून धरला तेव्हा तिने त्याला एक अस्पष्ट स्मित देऊन तिने त्याचे औपचारिक आभार मानले आणि ताठ मानेने ती आपल्या मर्सिडीजकडे निघाली. ती दुकानाबाहेर पडल्याक्षणी मी आणि माझ्या मुलीने एकमेकींकडे हसून पाहिलं आणि आम्ही दोघी एकदमच पुटपुटलो "लेडी टाय!"

मित्राने मोठ्ठी शिफारस करून माझ्या मुलीला 'रिव्हर्स ऑफ लंडन' पुस्तकाच्या मालिकेतलं पहिलं पुस्तक भेट दिलं तेव्हापासून आमचं पूर्ण कुटुंब या मालिकेच्या प्रेमात पडलं. पोलिसी रहस्यकथा, जादुई दुनिया, लंडनच्या वेगवेगळ्या भागांचा इतिहास, खुसखुशीत आणि विनोदाची झालर असलेली शैली याचं इतकं अफलातून मिश्रण या पुस्तकांत आहे की आम्ही चातकासारखी या मालिकेच्या पुढच्या भागाची वाट पाहत असतो. या मालिकेचं वैशिष्ट्य असं की कथानक इंग्लंडात घडत असलं तरी यातली सत्ताकेंद्रं असलेली अनेक पात्रं कृष्णवर्णीय आहेत. या मालिकेचा नायक पीटर, ज्याचा उल्लेख आधी आलेला आहेच, मिश्रवंशाचा आहेच पण त्याच्यापेक्षाही अनेक पटींनी अधिक जादुई सामर्थ्य असलेल्या, वेगवेगळ्या नद्यांच्या आत्मा असलेल्या देवता, या सर्व कृष्णवर्णीय स्त्रिया आहेत. आपल्या नेहमीच्या सामान्य, मानवी आयुष्यातही या स्त्रिया कर्तृत्ववान आहेतच पण त्यांना आपल्या जादुई सामर्थ्याचीही पूर्ण कल्पना आहे आणि त्यांच्या मार्गात कोणी अडथळे आणण्याचा मूर्खपणा केलाच तर आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करून शत्रूचा पूर्ण विध्वंस करण्याची त्यांची तयारीही आहे. त्यांच्याशी वाकड्यात शिरणं हे अगदी मुरलेल्या, कसबी जादूगारालाही परवडण्यासारखं नाही.

यातली 'टायबर्न' नदीचा आत्मा असलेली देवता म्हणजे 'लेडी सिसिलिया टायबर्न थेम्स'. लेडी टाय अतिशय महत्त्वाकांक्षी, हुशार, उच्चभ्रू आणि शिष्ट आहे. तिने इतिहास आणि इटालियन या दोन विषयांत प्रतिष्ठित ऑक्सफर्ड महाविद्यालयाच्या, सेंट हिल्डा कॉलेजमधून, पहिल्या श्रेणीतून शिक्षण पूर्ण केलंय. लेडी टायचं नाव पाच वेगळ्या संस्थांच्या बिगर कार्यकारी संचालक मंडळांवर आहे. तिच्याकडे भरपूर मालमत्ता आहे आणि आणि अनेक राजकीय नेत्यांशी तिचे निकटचे संबंध आहेत. तिचं वर्णन खरंतर इंग्लंडमधल्या कोणत्याही उच्चभ्रू कुटुंबात जन्मलेल्या, वारशाने सत्ता मिळालेल्या धनाढ्य, फटकळ आणि महत्त्वाकांक्षी व्यक्तीचंच आहे पण तिचं कृष्णवर्णीय असणं हे मात्र हटकून निराळं आहे. एरवी जेव्हा अश्या प्रकारची पात्रं इंग्रजी पुस्तकांत भेटतात तेव्हा आपण मनातल्या मनात साहजिकपणे त्याला (मॅगी स्मिथसारखा) एक गौरवर्णीय चेहेरा देऊन मोकळे होतो पण जेव्हा असं एखादं पात्र आपला कृष्णवर्ण जेव्हा तितक्याच दिमाखाने मिरवतं तेव्हा मनातल्या कृष्णवर्णीय व्यक्तींबद्दलच्या सरसकटीकरण केलेल्या कल्पना बदलायला आपोआप चालना मिळते. फ्रेंच बेकरीत भेटलेली ही स्त्री आम्हां मायलेकींनी इतकी 'लार्जर दॅन लाईफ' वाटली आणि आम्ही तिच्याकडे ज्या भीतीयुक्त आदराने पाहिलं त्याचं मुख्य कारण 'लेडी टाय'चं हे रंगतदार पात्र होतं. अशीच साच्यापासून हटकून निराळी आणि रंगतदार पात्रं आफ्रिकन वंशाच्या व्यक्तींना मिळत राहावीत म्हणजे ती आपल्याला प्रत्यक्ष्य आयुष्यातही भेटत राहतील!

ममा थेम्स

'सेक्स एज्युकेशन'मधला एरिक एफिआँग

'सेक्स एज्युकेशन'मधला एरिक एफीआँग कसला 'रंगीला' आहे! त्याचे तडकफडक कपडे आणि चमकदार मेकप, आणि त्याचं इलेक्ट्रिक हास्य, आणि हजार निराळ्या भावना व्यक्त करणारा त्याचा चेहरा. एरिक आपल्याला पहिल्यांदा दिसतो तो मुख्य पात्र ओटिसबरोबर; ते दोघे रोज सकाळी आपल्या कुटुंबाबद्दल आणि प्रेमप्रकरणांबद्दल बोलत सायकल हाकत शाळेत जातात. सगळी मालिकाच विनोदी, बोल्ड आहे; टीनेजर आपल्या शारीर आणि भावनिक विश्वाचा शोध घेतात त्याकडे प्रेमानं, आपुलकीनं बघणारी आहे.

एरिक एफिआँग

मला आधी वाटलं की एरिकचं पात्र टिपिकल 'काळा मित्र' किंवा 'गे मित्र' अशा साच्यातलं, गेपणाचा स्टिरिओटाईप निघेल किंवा बऱ्यापैकी 'नॉर्मल' असलेल्या, गोऱ्या ओटिसचा साईडहिरो निघेल असं असेल. पण प्रत्यक्षात हे पात्र आणि त्याचं वयात येताना होणारं परिवर्तन, 'कमिंग ऑफ एज' प्रकारच्या कथाप्रकारातली एक अतिशय सुंदर रंगवलेली भूमिका आहे. एरिक काळा, गे, आणि नायजेरिया-घानामधून ब्रिटनमध्ये आलेल्या स्थलांतरितांचा मुलगा आहे. त्याचं कुटुंब धार्मिक, ख्रिश्चन आहे. त्याच्या आईवडलांनी त्याची लैंगिकता मोठ्या कष्टानं स्वीकारली आहे. त्यांना वाटतं, चांगल्या घरातल्या नायजेरियन मुलासारखं एरिकनं चर्चमध्ये जावं, घरच्यांचं ऐकावं, आणि उगाच स्वतःकडे फार लक्ष वेधून घेऊ नये. पण एरिक म्हणजे कुठलंसं, निनावी रानफूल नाही; तो एक सुगंधी, रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ आहे! आपल्या लैंगिकतेबद्दल त्याला अजिबात गंड नाही, हे मला फारच आवडलं. तो ब्राईट रंगांचे आफ्रिकी आणि पाश्चात्त्य कपडे आणि चमकदार ॲक्सेसरीज घालून अगदी सहज वावरतो. आपली स्टाईल आणि आपली ओळख अशी दाखवल्यामुळे त्याला शाळेेत आणि बाहेरही मार खावा लागतो. आपली लैंगिकता आणि आपल्या क्विअर व्यक्तिमत्वाचे सर्व रंगबिरंगी कंगोरे उघड करण्याचा निर्णय त्याच्यासाठी सोपा नाहीय. पण त्याची सगळी एंक्झायटी आणि स्वतःबद्दल शंका असूनही तो त्याच्या काळ्या आणि क्विअर अस्तित्वाबद्दल समाधानी आहे. त्याचं हसू पाहा!

एरिक जेव्हा आपल्या कुटुंबियांसोबत आजी-आजोबांकडे नायजेरियात जातो तेव्हा त्याला त्याचं 'रंगीलं" व्यक्तिमत्व आणि समलैंगिकता लपवावी लागते. त्यातून त्याला कानकोंडलेपणा येतो. त्याला नायजेरियन आणि ख्रिश्चन राहायचं आहे, पण त्या दोन साच्यांमध्ये राहताना त्याच्या लैंगिकतेच्या, त्यातलं सत्य जगण्याला कुठेच जागा नाही. या दोन जगांमध्ये एकाच वेळेस जागा शोधताना त्याला बरेच कष्ट होतात. तरीही त्याच नायजेरिया-ट्रिपमध्ये त्याला नायजेरियाचा आणखी एक कोपरा सापडतो. 'चांगल्या घरातल्या' त्याच्या नातेवाईकांच्या पलीकडचं समाजातलं वैविध्यही त्याला दिसतं. तो आपल्या परिचित जगाच्या जरा बाहेर जातो आणि त्याल नायजेरियन आणि क्विअर समुदायही सापडतो. आता त्याच्याच दोन जगांमध्ये ताळमेळ बसवणं त्याला थोडं सोपं वाटायला लागतं.

शेवटच्या सीझनमध्ये एरिकच्या आईला वाटत असतं की त्यानं बाप्तिस्मा घ्यावा; इतरांना मदत करण्याचं ख्रिश्चन मूल्य एरिकलाही आपलंसं वाटतं. प्रामाणिकपणे जगता यावं म्हणून आपल्या अभिव्यक्तीचा हा लैंगिकतेचा भाग तो उघड करतो. चर्च आणि तिथला स्थलांतरित ख्रिश्चन समाज त्याला त्याच्या गेपणामुळे नाकारतो, तेव्हा तो धैर्यानं आपल्या मूल्यांसह, चर्चशिवाय आपली वाट शोधू बघतो.

नकुटी गाटवाला एरिक एफिआँग म्हणून बघणं निव्वळ आनंदाचं आहे. टीव्हीवरच्या खुल्या दिलाच्या, प्रवाही आणि प्रेरणादायक टीनेजर पात्रांपैकी तो एक आहे. त्या मालिकेतच कित्येक पात्रं आहेत. गाटवा स्वतः रवांडाचा आहे. डॉ. हू नामक मालिकेत तो पूर्णतया निराळ्या भूमिकेत आहे. कालप्रवाश्याच्या भूमिकेतही तो एरिकसारखा उठून दिसतो. आपल्याला जे बनायचं असतं ते बनता येतं, असा विचार करायला तो भाग पाडतो.

'द गुड प्लेस'मधला चिडी आनागोनिये

हल्ली कुणासमोर आपला उच्चभ्रूपणा मिरवावासा वाटला, की मी 'द गुड प्लेस'ची शिफारस करते. "त्यातल्या एका पात्राचं दुःस्वप्न दाखवलेलं आहे ते असं – 'न्यू यॉर्कर' नियतकालिकांची रास आहे; ती त्यानं वाचलेली नाही. आणि दर आठवड्याला 'न्यू यॉर्कर' येतच राहतो." हेही मी वर सांगते. (हल्ली माझ्या आवडत्या 'न्यू यॉर्कर'नं अभिवाचन केलेल्या लेखांची संख्या कमी केल्यावर माझी ही भीती वाढतच चाललेली आहे; माझ्या उशीच्या शेजारी नियतकालिकांची चळत झालेली आहे.)

दिवस सुरू होतो, आणि अधूनमधून, कामातून ब्रेक घेऊन लिंक्डिन उघडलं की 'कॉर्पोरेट अमेरिके'त कसं बोलावं, आपला मुद्दा कसा मांडावा, कुठले शब्दप्रयोग टाळले की आपण 'पावरफुल' वाटतो, संभाषणाचा ताबा आपल्याकडे राहतो, वगैरे सांगणारे लेख डोळ्यांसमोर नाचवले जातात. यांतले महत्त्वाचे मुद्दे असतात – 'मला असं वाटतं' असं म्हणू नका; काही झालं तरी आपलं मत पक्कं ठरलेलं नाही, असं कधीही म्हणू नका, वगैरे. या लेखांमध्ये 'fake it till you make it', असं थेट म्हणत नाहीत; पण मुद्दा तोच असतो असं मला वाटत राहतं. त्यातून, विशेषतः, तंत्रज्ञान कंपन्यांमधला (अ)लिखित नियम असा असतो की काय हवं ते करा, वाटेल ते प्रोडक्ट बनवा; आणि त्यातून काही नुकसान झाल्याचं नंतर समजलं तर माफी मागा. परवानगी मागण्यापेक्षा माफी मागणं सोपं.

यांतले कुठलेही सल्ले मला पटत नाही. पुरावे असल्याशिवाय कसे, कुणी, काही दावे करतात, हे मला समजत नाही. शिक्षणातून समजलेली, आत्मसात केलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रीय पद्धतीचं पालन करावं, एकही चुकीचा समज आपण पसरवू नये, वगैरे. ह्याबद्दल मी एकदा मॅनेजरशी बोलत होते. घाईघाईत काही काम करताना माझ्या हातून चूक झाली होती; ती मला अर्ध्या तासात लक्षात आली. चूक दुरुस्त करणारी इमेलं पाठवून झाल्यावर मॅनेजर मला सांगत होता, "आपण पुरावे गोळा करतो आणि त्यातून निष्कर्ष काढतो. आपण बिझनेसच्या लोकांना जे काही सांगतो, ते बहुतेकदा भरतवाक्य म्हणून वापरलं जातं. ते भरतवाक्य ४ वर्षं जुनं झालेलं असतं; त्यातल्या संदर्भांना काही अर्थ राहिलेला नसतो. पण ते भरतवाक्य लोकांच्या डोक्यांतून जात नाही. पुरावे काही का म्हणेना!" पुढे तो स्वतःच म्हणाला, "मला वाईट सवय आहे, 'मला असं वाटतं' असं म्हणायची." मी थोडी हसले, आणि त्याच्यासमोरही उच्चभ्रूपणा करत 'आंखो देखी'चा डायलॉग मारत म्हणाले, "सत्य आपापलं नसतं का? आता हे तुझ्या स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत तुला सांगता येईल का? माझ्याकडे सबब आहे, माझ्याकडे स्टॅट्सची पीएचडी नाही!"

'द गुड प्लेस' बघताना मला कायम हे आणि असे संवाद आठवतात. स्वतःबद्दलच्या शंका घेणाऱ्या, संशोधनवृत्तीच्या लोकांची टिंगल करायलाच चिडी आनागोनिये (विल्यम जॅक्सन हार्पर) हे पात्र रचलेलं आहे. तो खूप वाचन करतो; विचार करतो. बदामाचं दूध प्यायल्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी, आणि रास्पबेऱ्या (का स्ट्रॉबेऱ्या?) मिळवण्यासाठी लोकांना वेठबिगारासारखं राबवून घेतलेलं आहे, अशा गोष्टीही त्याला माहीत असतात; तो अशा वस्तू वापरतो, त्या बेऱ्या खातो पण त्यात त्याला खूप अपराधगंड येतो. (तो मॅनेजर कुणी भीक मागायला आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, त्यांना स्पष्ट शब्दांत नकार देतो. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर असाच चिडीसारखा अपराधगंड असतो.)

चिडीला कुठलाही निर्णय घेता येत नाही. चिडी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञानात प्रसिद्ध असणाऱ्या 'ट्रॉलीचिकित्से'बद्दल कुठला तत्त्वज्ञ काय म्हणाला आहे, हे त्याला फक्त पाठ आहे असं नाही; ते त्यानं आत्मसातही केलं आहे. पण प्रत्यक्षात अशा परिस्थितीत नैतिक निर्णय काय असेल याचा निर्णय त्याला घेता येत नाही. कल्पना करा की, एका गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा केली तर त्याचे अवयव वापरून अनेक निष्पाप लोकांचे जीव वाचवता येतील, असा प्रश्न त्याच्या समोर येतो तेव्हा तो निर्णय घेऊ शकत नाही. 'मला असं वाटतं', असंही म्हणायला तो बिचकतो. हा निर्णय घेणं त्याला टॉर्चरसम वाटतं.

शास्त्रीय संशोधनात लोक गृहीतच धरतात की आपल्या हयातीत किंवा थोडं नंतर कुणी तरी आपला पीएचडी थिसीस चूक होता हे दाखवून देणार. चिडी मेल्यानंतर 'द गुड प्लेस'मध्ये गेला आहे. तिथे 'सर्वशक्तीमान' मायकल (टेड डॅन्सन) त्याचा थिसीस वाचायला घेतो. एका दिवसात हजारो पुस्तकं वाचू शकतो, असा दावा करणारा मायकल चिडीच्या दहा हजार पानी थिसीससमोर मान टाकतो. थिसीसला थोडी कात्री लाव, असं तो चिडीला सांगतो. चिडीला मायकलचा राग येत नाहीच, वर तो मायकललाच आपला थिसीस ॲडव्हाजर बनण्याची विनंती करतो.

कोव्हिडच्या लशी वगैरे झाल्य‌ावर आम्ही कामासाठी चार दिवस दुसऱ्या शहरातल्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तेव्हा आमची मीटिंग त्याला लवकर संपवायची होती, कारण त्याचं जेवण झालं नव्हतं; जेवणावरून आमचं "भांडण" झालं. (मी त्याला जेवणाबद्दल विचारायला गेले तेव्हा तो मीटिंगीत होता, आणि त्यानं मला हातानंच खूण करून 'नंतर बोलू' असं सुचवलं होतं.) तो नंतर म्हणाला, "We are acting like work husband and wife." तोवर हे माझ्या डोक्यात आलंच नव्हतं. तोवर मी 'याच्याबरोबर काम करायला मजा येते; याच्याबरोबर गप्पा मारायलाही मजा येते', यापुढे काही विचारच केला नव्हता.

चिडीमध्ये मी स्वतःला, माझ्या मित्रमैत्रिणींना बघत होते. अकादमिक क्षेत्रात काही काळ घालवल्यानंतर अमेरिकी कॉर्पोरेटचा मानसिक त्रास होणारे मित्रमैत्रिणी मला चिडीकडे बघताना आठवायचे.

एक मैत्रीण आणि मी या मालिकेबद्दल बोलत होतो. मी मालिकेतला कायतरी 'या बेसिक' वगैरे भरतवाक्यं मारत होते. ती म्हणाली, "त्या एका सीनमध्ये चिडीचं डोकं पूर्ण फिरतं आणि तो शर्ट काढून स्प्रिंकलरसमोर उभा राहतो कसला दिसतो तो! तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आणि ही अशी बॉडी! मी आणि माझी मुलगी दोघींनी शिट्या मारल्या."

चिडी स्प्रिंकलर

हल्लीच चिमामांडा नगोझी अडिचीचं 'Half of a Yellow Sun' वाचत होते. कादंबरीच्या केंद्रस्थानी असलेलं जोडपं – ओलान्ना आणि ओडेनिग्बो – नायजेरियामधल्या (आणि बायाफ्रा) नसुक्का विद्यापीठात संशोधन आणि अध्यापन करणारे असतं. ओलान्ना त्यात ओडेनिग्बोच्या शरीराचं वर्णन करते. रुंद खांद्यांचा, पुष्ट पार्श्वभाग असणारा असं ती म्हणते. चिडी असा दिसत नाही हा विषय पुन्हा काढून मी मैत्रिणीला हे तपशील पुरवले.

मी आत्तापर्यंत चिडीकडे फक्त माझं कॅरिकेचर म्हणूनच बघत होते. आता माझ्यावर स्वप्रेमाचा, नार्सिसिझमचा आरोप करता येईल! का नाही?

'हाऊस ऑफ द ड्रॅगन'मधले वेलरॉन राजघराणे

फॅन्टसी हा साहित्यप्रकार मला फार आवडतो; टॉल्किनपासून, उर्सुला लग्विन ते अलीकडच्या काळातल्या नील गायमनपर्यंत वेगवेगळ्या ढंगाची फॅन्टसी पुस्तकं मी आवडीनं वाचते. जॉर्ज आर. आर. मार्टिनही माझ्या आवडत्या फॅन्टसी लेखकांपैकी एक आहे. त्याच्या 'साँग ऑफ आईस अँड फायर' या पुस्तकावर आधारित 'गेम ऑफ थ्रोन्स' ही गेल्या काही दशकांतली सर्वांत लोकप्रिय मालिका आपल्यापैकी अनेकांना परिचित आहेच; अलिकडेच प्रदर्शित झालेली 'हाऊस ऑफ द ड्रॅगन' ही मालिकादेखिल त्याच्याच 'फायर अँड ब्लड' या पुस्तकावर बेतलेली आहे. या मालिकेत 'साँग ऑफ आईस अँड फायर' या पुस्तकाच्या अनेक शतकं आधीच्या काळातल्या सत्ताधारी 'टारगेरियन' राजवंशातील गृहयुद्धाची कथा सांगतली आहे. यातलं महत्त्वाचं 'वेलॉरियन' राजघराणं मूळ पुस्तकात गौरवर्णीय आणि चंदेरी केसांचं दाखवलेलं आहे; त्यांच्या या शारीरिक ओळखीवरून त्यांच्यात ड्रॅगन्सचं शुद्ध रक्त आहे, अशी संकल्पना या पुस्तकात आहे. अतिशय बलाढ्य नौदल असलेलं हे धनिक राजघराणं टार्गेरियन घराण्याच्या मित्रपक्षात आहे आणि दोन्ही कुटुंबांचा वॅलेरियन वारसा, त्यांचे चंदेरी केस आणि ड्रॅगन्सशी त्यांचा असलेला जवळचा संबंध या गोष्टी या दोन राजघराण्यांतला समान दुवा आहेत. टीव्ही मालिकेमध्ये मूळ पुस्तकाच्या एका तपशिलात एक मोठा बदल केला गेला आहे ज्यामुळे त्या मालिकेला एक नवीनच परिमाण मिळालं आहे. टीव्ही मालिकेमध्ये हे वेलॉरियन घराणं कृष्णवर्णीय आणि चंदेरी केसांचं आहे.

काळे लोक चंदेरी केस

'सीस्नेक' या नावाने ओळखलं जाणारं 'कॉर्लीस वेलॅरिओन' हे त्यातलं एक अतिशय मध्यवर्ती पात्र महत्त्वाकांक्षी, कठोर, धोरणी आणि राज्यशासनावर वचक असलेला प्रभावी नेता दाखवलेला आहे. त्याची अतिशय सुंदर, चतुर आणि स्वाभिमानी बायको ऱ्हेनीस आणि त्यांची दोन मुलंदेखील फार मनोरंजक पात्रं आहेत. ड्रॅगनवर स्वार होऊन फिरणाऱ्या या मुलांच्या व्यक्तिमत्वालाही वेगवेगळे कंगोरे आहेत; भावी राजकुमार लेनॉर वेलॉरियन जवळजवळ उघडपणे समलैंगिक आहे. त्याची धाडसी आणि साहसी बहीण लेना, जगातल्या सर्वांत मोठ्या आणि सर्वांत पुरातन ड्रॅगनची 'व्हेगार'ची मालक आहे.

समलैंगिक असलेल्या लेनॉर वेलॉरियनचा विवाह, राजकन्या ऱ्हेनिरा टारगेरीयनशी होतो आणि त्यानंतरचं पुस्तकातलं एक महत्त्वाचं उपकथानक राजकन्येच्या तीन मुलांच्या पितृत्वाच्या मुद्द्याभोवती फिरतं. राजकन्येची तिन्ही मुलं काळ्या केसांची आणि गौरवर्णीय आहेत. ती लेनॉरची औरस संतती सिद्ध होण्यासाठी त्यांचे केस चंदेरी असणं कथानकात महत्त्वाचं आहे आणि ते तसं नसल्यानं ही मुलं अनौरस आहेत याचा सर्वांना अंदाज असतो. मालिकेत लेनॉर कृष्णवर्णीय दाखवल्यामुळे आणि ऱ्हेनेरची तिन्ही मुलं गौरवर्णीय असल्यामुळे हा औरस संततीचा मुद्दा अधिक स्पष्टपणे आला आहे. औरस-अनौरस वाद, वारसाहक्क, शुद्ध वॅलेरियन रक्त वगैरे बाबी कथानकाचं मध्यवर्ती सूत्र आहे, जे हे शक्तिशाली घराणं कृष्णवर्णीय दाखवल्याने अधोरेखित झालं आहे. शुद्ध गौरवर्णीय रक्ताची संकल्पना आणि ते इतर वंशाच्या समुदायांहून श्रेष्ठ असण्याच्या भ्रामक कल्पनांतून मानवी इतिहासात किती भेदभाव, क्रौर्य आणि अन्याय झाला ते आपण जाणतोच पण या मालिकेत शुद्ध रक्ताची कल्पना त्या रूढ कल्पनेला सुरुंग लावते आणि उलटीपालटी करून टाकते.

दुर्दैवानं एकूणच फॅन्टसी या साहित्यप्रकारात वैविध्याचा अभाव आहे आणि जॉर्ज आर. आर. मार्टिनची पुस्तकंही त्याला अपवाद नाहीत; या पुस्तकांमधले जांभळ्या डोळ्यांचे, चंदेरी केसांचे, ड्रॅगन-स्वारीय सम्राटांचे राजवंश उल्लेखनीय आहेत पण या महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये कृष्णवर्णीय पात्रं सहसा दिसत नाहीत; जी आहेत ती गुलामांच्या, किंवा सेवकांच्या भूमिकांमध्ये दिसतात. मुळात हा पूर्ण साहित्यप्रकार अद्भूताच्या संपूर्णपणे काल्पनिक पटलावर आधारित असूनही त्यातला वैविध्याचा अभाव अतिशय निराशाजनक आहे. निखळ रंजन करणाऱ्या आणि काहीशा पलायनवादी असणाऱ्या या साहित्यप्रकारातही वास्तवातल्या पूर्वग्रहांचेच प्रतिध्वनी ऐकण्याऐवजी मला वंश, वर्ण, लिंग यातल्या पूर्वग्रहांना ओलांडून जाणाऱ्या प्रतिमा पाहायला, वाचायला आवडतील. 'हाऊस ऑफ ड्रॅगन्स'मध्ये रंगवलेली ही गुंतागुंतीची, रोमांचक, शक्तिशाली आणि वैशिष्टयपूर्ण कृष्णवर्णीय पात्रं बघून मला फॅन्टसीच्या भविष्याबद्दल आशा वाटते.

---

सर्व प्रतिमा आंतरजालावरून

field_vote: 
0
No votes yet