फिरतानाच्या नोंदी

सकाळची भटकंती हो नाही म्हणता म्हणता जरा उशिराच सुरु झालेली असते एव्हाना साडेआठ वाजत आलेले असतात. पूर्वानुभव लक्षात घेता तसा अपेक्षाभंग गृहीत धरलेला असतो त्यामुळे कसल्याही अपेक्षा न बाळगता नेहमीप्रमाणे तळ्याकाठच्या बांधावर चालायला सुरुवात करतो न करतो तोच अचानक तळ्याच्या मागच्या भागात दिसतात उड्या मारत भन्नाट वेगाने पळणारी काळवीटं. एक दोन नाही तर चांगली पाच-सहा. एखाद्-दोन माद्या आणि मग काही तरुण नर आणि त्यांच्या मागून येणारा जर्द काळ्या रंगाची पाठ, पांढरे शुभ्र पोट असा थाट असणारा अन् वळणं घेत गेलेली शिंग मिरविणारा पूर्ण वाढलेला नर.
तर सुरुवात अशी होते. मग तेवढ्यात पुढे एक ब्लू फेसड् मलकोहा(निळ्या चष्म्याचा मुंगश्या) दिसतो. अगदी झलक दिसते त्याची गर्द झाडांच्या फांद्याआडून पण चालतंय. आता ऊन बरंच पडलेलं असतं. चित्रबलाकांचा (पेन्टेड स्टॉर्क) थवा गरम हवेच्या झोतांवर स्वार होऊन तळ्यावर नजर ठेवीत गोल गोल फिरायला लागतो. इथनं दुर्बिणीतून त्यांचे खालच्या बाजूने काळे पंख आणि लांब माना तेवढ्या दिसतात. मग एक चमच्यांचा (स्पूनबिल्स) थवा हळुवार तरंगत तळं ओलांडून पलीकडे उतरतो. तळ्याच्या अगदी कडेवर स्टींट (पाणलावा) स्टील्ट आणि सॅंडपाइपर (तुतारी) पक्षी तळ्यातल्या आटणाऱ्या पाण्याची पर्वा न करता आधाशासारखे गिळत असतात.
रेड नेपड आणि ग्लॉसी आयबिस (शराटी) चे थवे तळ्यातल्या कोरड्या पडलेल्या जागांवर पसरलेले असतात. पाणी कमी असल्यामुळं बदकं जरा कमीच आलेली असतात पण त्यातल्यात्यात आम्हाला रडी शेलडक (चक्रवाक) अन् टिल्स (चक्रांग) दिसतात. आता या सगळ्यात मी बांधाकाठच्या फुलांवर आलेल्या रेड ड्वार्फ हनी बी (फुलोरी मधमाशी) आणि कारपेंटर बी (ज्या ना आपण भुंगे म्हणतो) पाहायला आणि त्यांचे फोटो काढायला विसरत नाही.
पायाखालची वाट बघत बघत आम्ही चालत असतो. जमीन कोरडीठाक पडलेली, भेगांमधून काही बीटल्स (भुंगेरे) तुरुतुरु पळत असतात, मुंग्यांची नेहमीची घाई चाललेली असते. टीकेल्स ब्लू फ्लायकॅचरचा आवाज या सगळ्यात सोबत करत असतो.
आता जवळजवळ दुपार व्हायला आलेली असते. तळ्याला लागून असलेल्या शेतांमधली सकाळची कामं उरकलेली असतात गुरं राखणारी पोरं गुरांना चरायला घेऊन तळ्याकडे आलेली असतात.
आभाळ भर रेघोट्या मारत फिरणारे भिंगऱ्यांचे अन् पाकोळयांचे थवे (लिटिल स्विफ्ट आणि डस्की क्रॅग मार्टिन) पहात आम्ही घराकडे निघतो. शांतता पसरलेली असतेच मनात पण काही प्रश्न पण असतात नेहमीच. शहरापासून काहीच किलोमीटर अगदी वीसच मिनीटे प्रवास करून मी या ठिकाणी पोहोचू शकते. शहरी (शहरांलगतची) जैवविविधता (Urban biodiversity) असं आपण ज्याला म्हणतो ती अनुभवायला मिळणं तेही इतक्या सहज हे म्हणजे आजकालच्या काळात मी भाग्यच समजते. पण मग प्रश्न असा पडतो की हे तळं, हा बांध, या लगतची ही शेतं, हे सगळे पक्षी, कीटक, झाडं असेच असतील का पुढच्या भेटीवेळी सुद्धा? की यालाही एक्सपायरी डेट असेल?किती दिवस? किती वर्ष?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

स्पूनबिल्स आणि काळविंटही दिसणारं तळं कोणत्या भागात असेल हा विचार करतोय.

यालाही एक्सपायरी डेट असेल होय. शहरांजवळची गायब होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0