ट्रेन स्लो होते तेव्हा...

शिवडी स्टेशन वर गाडीत चढलो आणि बसायला जागा नव्हती म्हणून दरवाजातच उभा होतो. शिवडी कडून मुंबईकडे जायला ट्रेन निघाली पण सकाळी सकाळी कुठल्या तरी सिग्नल मध्ये कसला तरी बिघाड आला असावा आणि गाडी शिवडी आणि कॉटन ग्रीन च्या दरम्यान अगदीच रेंगाळल्या सारखी चालू लागली.

महिनाभरापूर्वी मी पुन्हा एकदा मुंबईत आलो तेव्हापासून ही अशी रेंगाळण्याची माझी पहिलीच वेळ. नाहीतर एवढ्या दिवसात मुंबईच्या वेगाने मला कधी मान वर करून बघायची फुरसत दिली नाही. फार विचार करायची फुरसत दिली नाही

आणि आज गाडी जेव्हा अशी थांबली , मध्येच . माझी नजर सगळीकडे फिरली आणि विचारांना वाऱ्याचा वेग आला.

नेहमी खरंतर गाडी जशी शिवडी स्टेशन ला येते तसं तुमच्या उजव्या बाजूला नुसत्या उंचच उंच इमारती दिसायला लागतात. 50 मजली, 60 मजली, मान वर करून बघितल्या शिवाय त्या नजरेत मावतच नाहीत. स्काय स्क्रॅपर्स म्हणायचं त्यांना. तुम्ही नवीन असाल मुंबईत तर त्यांच्या उंचीने दडपायला होऊ शकतं.

पण तेच गाडीने शिवडी सोडलं की तिच्या डाव्या बाजूला मात्र या अशा बिल्डिंग नाहीत. तिथे पडकी गोदामं आहेत, पोर्ट ट्रस्ट ची थोडीफार ऑफिसं. थोडक्यात नजर वेधून घेणारं असं फारसं नाही.

पण आजचा दिवस वेगळा होता. गाडी रेंगाळत कॉटन ग्रीन स्टेशनात शिरली आणि डाव्या बाजूच्या एका बिल्डिंगने माझं लक्ष वेधून घेतलं.

नुसतीच ताडमाड उंच नव्हती ती. तीन किंवा फारतर चार मजली असावी. बांधकाम बघून आणि तिची स्टाईल बघून जुनी किंवा हेरिटेज प्रकारातली वाटत होती. पण बाहेर लागलेले दोन चार एअर कँडीशनर बघून वाटलं की अजूनही वापरात असेल ही. मग मी नाव पाहिलं , "कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया" "कॉटन एक्सचेंज बिल्डिंग" . म्हणजे कापसाचा शेअर बाजार असं म्हणलं तरी चालतंय. थेट जुन्या काळाची म्हणजे जेव्हा इंग्रजांचा अंमल अखंड हिंदुस्थानावर होता, मुंबईची ओळख "कापड गिरण्यांचं शहर" किंवा "पूर्वेकडचं मँचेस्टर" अशी होती, भारतातून परदेशात जाणारं कापूस हे महत्वाचं नगदी पीक होतं तेव्हाची आठवण करून देणारी.

गाडीने कॉटन ग्रीन सोडलं पण ती बिल्डिंग काही मनातून जाईना. साधारणपणे दोन रस्त्यांच्या सांध्यावर , V आकारात उभी असलेली ती बिल्डिंग. ही बिल्डिंग बांधली गेली असावी साधारणपणे 1920 च्या दरम्यान. त्यामुळे हिची बांधणी तशी एकदम ग्रँड ओल्ड व्हिक्टोरियन नाही. थोडीशी नावीन्याकडे झुकणारी. "Art neauvou" या प्रकाराची. फ्रेंच आर्किटेक्चरचा हाच प्रकार पुढे जाऊन "art deco" झाला आणि मुंबईचं आर्किटेक्चर म्हणून ओळखला जाऊ लागला. Art Deco पद्धतीने बांधलेल्या अनेक बिल्डिंग चर्चगेट, फोर्ट , हाय कोर्ट या भागात दिसतात.

तर पुन्हा येऊया या कॉटन एक्सचेंज च्या इमार्टिकडे. कधी काळी तिला दिलेल्या "पेस्टल ग्रीन" रंगाच्या खुणा तिच्या अंगावर दिसत होत्या. एखाद दुसऱ्या खिडकीची काच तुटलेली पण त्याने तिचं सौंदर्य कमी होत नव्हतं , समांतर बांधणी मुळे आत असणारे लांबच लांब कोरिडॉर्स यांचा अंदाज येत होता. उंचच उंच जाणारे पिलर्स आणि मग त्यांच्या छताशी असणारी कलाकुसर लांबूनही कळत होती.

कापसाच्या व्यापारात मुंबईचं नाव होऊ लागलं साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. १८४४ साली जगातलं कदाचित सगळ्यात पहिलं कॉटन एक्सचेंज (कापसाचा शेअर बाजार म्हणू) सुरू झालं मुंबईत काळबादेवीत. सुरुवातीला सगळं चालायचं ब्रिटिशांच्या अखत्यारीत म्हणजे इस्ट इंडिया कॉटन असोसिएशन मार्फत. हळूहळू कापसाच्या व्यापारातील पैसा भारतातल्या गुजराथी आणि पारशी व्यापाऱ्यांनी हेरला आणि खेतान, खटाव आणि गोकुलदास सारखे व्यापारी इथल्या कापूस व्यापाराचे सम्राट बनले. त्यांनी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था सुरू केली आणि त्या अंतर्गत कापसाच्या व्यापारासाठी ही बिल्डिंग बांधली. कापसाच्या व्यापाराने ब्रिटिशांची गरज भागली पण खरी धन झाली व्यापाऱ्यांची, गिरणी मालकांची. एकेकाळी ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूची गोदामं कामगारांनी गजबजलेली होती, कापसानं आणि धान्यांनं भरलेली होती, या बिल्डिंगचे कोरिडॉर्स कापसाच्या भावाची बोली लावणाऱ्या आवाजानं दणदणत होते. ब्रिटिश व्हाइसरॉय, राणी एलिझाबेथ पासून ते अगदी नेहरू, गांधी इथपर्यंत सगळ्यांनी या बिल्डिंगला भेटी दिल्या होत्या. एकेकाळी मुंबईच्या कापड उद्योगतले मोठमोठे हस्ती मग ते गोकुलदास असोत, रुईया असोत, खटाव असोत, खेतान असोत किंवा पिरामल प्रत्येकाची इथे वर्दळ असायची.

हळूहळू काळ बदलला. मुंबईच्या कापड व्यापराचं, गिरण्यांचं आणि गिरणी कामगारांचं काय झालं हे इतिहासाने नमूद करून ठेवलंय. गिरण्या आणि गिरणी कामगार संपले आणि व्यापार आणि व्यापारी तेवढे उरले.

आज २०२४ . शंभर वर्षं झाली. आजही कॉटन ग्रीन स्टेशनात गाडी शिरताना डाव्या बाजूला कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया चं ऑफिस म्हणून ही बिल्डिंग उभी आहे. पूर्वीसारखी वर्दळ नसेल कदाचित पण चहलपहल अजूनही आहे.

हळू हळू ट्रेन पुढे सरकते आणि मग आपल्याला दिसते उजव्या बाजूला एकेकाळी पिरामल ची कापडाची गिरणी असलेल्या जमिनीवर आता बांधकाम सुरू असलेली "पिरामल आरण्या" नावाची बिल्डिंग. चकचकीत, उंच, स्क्वेअर फुटाला लाखाचा भाव असलेली.

या डाव्या आणि उजव्या बाजूत मुंबईच्या गेल्या शंभर वर्षातली स्थित्यंतरं आहेत. सामाजिक, आर्थिक, सगळीच. थोडं निवांतपणे पहिलं तर ती दिसतात, अनुभवता येतात. पण मुंबई इतकी फास्ट आहे की ती तुम्हाला एका जागी थांबू देत नाही, इतिहासाचा फार विचार करू देत नाही आणि भविष्याची स्वप्नं दाखवताना हातातून घसरत चाललेल्या वर्तमानाची जाणीव करून देत नाही.

मी पोचलोय आता CSMT ला आणि धावतोय बस पकडायला. पुन्हा केव्हातरी माझी गाडी रेंगाळेल आणि पुन्हा मला विचार करायला मिळेल अशी अपेक्षा मुंबईकडून ठेवत. तोपर्यंत, मुंबई झिंदाबाद !!!

- अभिषेक राऊत

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शीर्षकासारखंच संथपणे निवेदन असलेलं मुक्तक आवडलं.

अजून येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0