कोपनहेगन-पॅरीस भटकंती-६

सकाळी नऊ वाजता उठलो चित्रगुप्त काकांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट चालत गेलो, मला T3 ट्रॅम पकडायची होती. तिथून तिकीट काढून ट्रॅम धरली आणि शेवटच्या स्टेशनला पोहोचलो तिथून दुसरी पकडायची होती. एक कृष्णवर्णीय फ्रेंच कर्मचार्याला मला या स्टेशनला जायचंय असा एका इंग्लिश येणाऱ्या मुलीच्या मदतीने सांगितलं. त्याने मला यापुढे ट्रॅम जाणार नाही कारण काम चालूय, त्यासाठी ट्रॅम ने वेगळी बस सुविधा दिलीय ती सुविधा वापर आणि त्या समोरच्या स्टेशनला जाऊन उभा रहा. तिथून ट्रॅम ची बस पकड. मी स्थानकावर जाऊन उभा राहिलो बराच वेळ गेला तरी ट्रॅमची कुठलीही बस आली नाही. माझं इंटरनेट बंदं होतं त्यामुळे पुढे कसं जायचं काही कळत नव्हतं, कंपनीतल्या लोकांनी काहीतरी लोचा केल्याने माझं इंटरनेट बंद पडलं होतं, त्यांनी इंटरनॅशनल रोमींग पॅक मारण्याऐवजी माझ्या अकाउंटला सरळ 5000 चा बॅलन्स टाकला होता आणि तो केव्हाच संपला होता. हे मला भारतात आल्यावर कळालं. मी स्टेशनवर कुणाला इंग्लिश येते का असं बऱ्याच लोकांना विचारलं पण तिथे इंग्लिश येणार कोणीही नव्हतं, थोड्या वेळाने तिथे 264 नंबरची बस आली मला वाटलं की ट्रेन सर्विसचीच बस आहे मी तिच्यात चढलो, ड्रायव्हरला समजावेपर्यंत बस निघाली त्याने हाताने नाही म्हणून सांगितलं पुढच्या स्टेशनला उतरून परत पायी मागच्या स्टेशनला आलो, मागच्या स्टेशनवर उभे लोक मला हसू नये म्हणून त्यांच्या मागे जाऊन उभा राहिलो. बहुतेक एका मुलीने मला पकडले होते तिच्या लक्षात आले होते की हा आत्ताच बस मध्ये बसून गेला आणि पुन्हा मागे आलाय ती माझ्याकडे पाहून हसली. मी तिच्या जवळ गेलो तिला मी हाताने फ्रेंच येत नाही असं सांगितलं. ती बोलली “आय नो इंग्लिश” मला बरं वाटलं मी तिला माझा प्रॉब्लेम सांगितला. तिने सांगितलं की तुला ज्या स्टेशनला जायचंय तिथे डायरेक्ट जायला कुठलीही बस मिळणार नाही एक बस बदलून मग तू त्या स्टेशनवर पोहोचशील. ती बोलली माझ्यासोबत चल. मी मग तिच्या मागे बस मध्ये चढलो अडीच युरोचं तिकीट काढलं. आम्ही कुठल्यातरी बस स्थानकावर ऊतरलो. तिथून आम्हाला पंधरा मिनिटे चालत जाऊन पुढचं बस स्थानक गाठायचं होतं. पाऊस सुरू होता, तिने तिच्या हातातली छत्री मला पकडायला दिली आम्ही दोघं एका छत्रीत निघालो रस्त्यात आम्ही गप्पा मारत होतो. तिचं नाव मेरी होतं. तीन ते दहा वर्षांची मुलं सांभाळते असं ती बोलली, काही भारतीय नावाची मुलही आहेत असं तिने सांगितलं रीया, चंदन वगैरे. “मी रोज इथे आले की पाऊस असतोच मला आवडत नाही” बोलली मी तिला बोललो “मला आवडतो.” आमच्या इथे तर नेहमीच उष्ण वातावरण असतं. नंतर बऱ्याच गप्पा मारत आम्ही स्टेशन पर्यंत आलो. आम्ही दोघेही नंबरची बस पकडून निघालो माझा स्टॉप शेवटचा होता तिचा तिसरा होता ती मला बाय बाय “पॅट्रीक” म्हणाली आणि गेली. मला तिचा इन्स्टा अकाउंट वर जॉईन करून घेतलं होतं पण मध्येच एक आजी आली आणि तीला उतरवत ती गेली. मी वर्साय म्युझियमला दुपारी एक वाजता पोहोचलो.
.
तिकीट काढायला रांगेत गेलो तिथे जाऊन मी “वन पासपोर्ट तीकीट” बोललो तर तीथे असलेली स्त्री तिच्या कलीगला बोलली की हा आला आणि एकदम भसकन पासपोर्ट तिकीट बोलला. मला वाटतंय मी हाय हॅलो असं काही न बोलता डायरेक्ट तिकीट बद्दल बोलल्यामुळे ती अशी दचकली असावी. तिकीट मी म्युझियमला पोहोचलो. तिथे प्रत्येक मूर्ती समोर नंबर होता लोक पाच युरोचा फोन घेऊन कानाला लावून ऐकत होते मी घ्यायचा विसरलो होतो. पण बराच पुढे आल्याने परत गेलो नाही.
व्हर्साय, १३ व्या लुईच्या काळात साधारण १६२४ साली हा राजवाडा बांधण्यास सुरुवात झाली. चौदावा लुई १६८२ मध्ये इथे रहायला आला. तेव्हा फ्रान्सची राजधानी पॅरिसहून व्हर्सायला हलवली गेली होती. लांबच लांब पसरलेल्या किल्लेवजा राजवाड्याचा रंग दगडांमुळे फिकट पिवळा व गुलाबी आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात (१७८९-९९) प्रक्षुब्ध जमावाने राजवाड्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तेव्हापासून शहराच्या अधोगतीस सुरुवात झाली. लोकसंख्याही एकदम निम्म्याने कमी झाली. राजाचे निवासस्थानही तेथून हलविण्यात आले. इ. स. १८१५ मध्ये ब्ल्यूखर याच्या नेतृत्वाखाली प्रशियनांनी हे शहर लुटले. लूई फिलिप याने १८३७ मध्ये राजवाड्याच्या काही भागांचे संग्रहालयात रूपांतर केले. एकोणिसाव्या शतकात हळूहळू राजवाड्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. राजवाड्यातील हजारो रंगीत चित्रे, पुतळे, लाकडी शिल्पे, नक्षीदार पडदे व इतर कलाकाम यांमुळे हा राजवाडा म्हणजे जगातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक संग्रहालय बनले आहे. युरोपातील अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना व्हर्सायशी निगडित आहेत. ब्रिटन व संयुक्त संस्थाने यादरम्यानचा अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध सामाप्तीबाबतचा करार व्हर्साय येथे २० जानेवारी १७८३ रोजी झाला. फ्रँको-प्रशियन युद्धकाळात (१८७०-७१) व्हर्साय हे जर्मन सैन्याचे मुख्य ठाणे होते. तसेच १८७१ मध्ये जर्मन सम्राटाचा येथे राज्याभिषेक करण्यात आला. जर्मनीबरोबरचा आठ वर्षांचा काळ शांततेत गेल्यानंतर फ्रेंच संसद या राजवाड्यात आणण्यात आली. १८७५ मध्ये फ्रान्सच्या तिसऱ्या प्रजासत्ताकाचे संविधान येथेच स्वीकारण्यात आले. तिसऱ्या व चौथ्या प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची निवडही येथेच करण्यात आली. पहिल्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांच्या युद्धमंडळाचे व्हर्साय हे मुख्य केंद्र होते. दोस्त राष्ट्रे व जर्मनी यांच्या दरम्यान २८ जून १९१९ रोजी झालेल्या प्रसिद्ध ⇨व्हार्सायच्या तहावर या राजवाड्यातील आरसे महालात सह्या झाल्या. दुसऱ्या महायुद्धकाळात सप्टेंबर १९४४ ते मे १९४५ यांदरम्यान दोस्त फौजांचे येथे प्रमुख ठाणे होते. सध्या या राजवाड्याचा उपयोग महत्त्वाचे अतिथी व अधिकाऱ्यांसाठी स्वागतकक्ष व निवासस्थान म्हणून केला जातो. येथे राष्ट्रीय संग्रहालय आहे. (साभार- मराठी विश्वकोश)
मी गॅलरी ऑफ बेटल पहायला लागलो, खूप भव्य नी सुंदर चित्र पाहून मनच भरलं, इतके मोठे मोठे आणि युद्धाच्या डिटेल्स देणारे चित्र मी पहिल्यांदाच पाहत होतों ती गॅलरी तासभर पाहीली. खरोखर आवडली.
.
.
.
.
मी पुढे गेलो नंतर बरीच सुंदर चित्र आणि जुने टेबल भांडे वगैरे होते. नंतर मी मूर्त्यांच्या दालनात गेलो. तिथे बऱ्याच मुर्त्या पाहिल्या पण त्याच त्याच प्रकारच्या मूर्ती पाहून मला बोअर व्हायला लागलं होतं. त्या मुर्त्यांपेक्षा आजूबाजूला फिरणाऱ्या निळ्या हीरव्या डोळ्यांच्या जिवंतं मुर्त्या सुंदर दिसत होत्या. मी ह्या निर्जीव मुर्त्या सोडून त्या जिवंत मुर्त्या पाहू लागलो काही ठिकाणी मला ग्रीन सिग्नलही मिळाला, त्यांच्याजवळ जाऊन थोड्या गप्पा मारल्या पण बराच वेळ गप्पापलिकडे काही झालं नाही. असं चार-पाच ठिकाणी झाल्यावर मग मला बायकोने घरून निघताना “एका पोराचे बाप आहात हे विसरू नका” हा दिलेल्या सल्ला आठवला, मी पुन्हा सोळाव्या लूईवर फोकस केले. बिचारा सोळावा लुई. वेळीच सैन्य पाठवलं असतं तर राज्य नी जीव दोन्ही वाचल असतं. फिरून झाल्यावर मी बाहेर आलो मागच्या गार्डन मध्ये गेलो. तिथल्या एका सेक्युरिटी गार्डला मी आणखी काही पाहन्या सारखं आहे का पुढे विचारलं. त्याने मला सांगितले की कॅनल पार करून राणीचा महाल पहायला जा. हातातल्या कागदी मॅपवरील लाल लाईन फॉलो कर त्यानुसार मी निघालो. आखीव रेखीव कॅनल च्या बाजूने चालत मी “हॅम्लेट ऑफ क्विन.” ला निघालो.कॅनल मध्ये बोटिंगची व्यवस्था होती.
.
.
रस्त्यात एक पाव सँडविच घेतला त्यात भरपूर चिकन भरलेलं होतं. हॅम्लेट ओफ क्वीन बरंच लांब होतं. इथे बरीच चित्रे होती ती पाहून परत त्या लांबसडक रस्त्यावरून रिटर्न आलो.
.
.
म्युझीयम बंदं झालं होतं अंधार पडत आला होता, लाईट लागले होते, मी बाहेर आलो आणि रस्ता पार करून मॅकडोनाल्ड्स मध्ये गेलो तिथे वायफाय कनेक्ट करून मॅसेजेसना उत्तर दिले. नंतर समोरच्या केएफसी मध्ये जाऊन दहा युरो ची चिकन नी पेप्सी घेतली. आणि निघालो नंतर मी मला अमुक अमुक स्टेशनला जायचंय कुठून बस मिळेल असं एका मुलीला विचारलं ती मला एका स्टेशनला घेऊन गेली पण ते स्टेशन चुकीचं निघालं. मला चार चार वेळा सॉरी म्हणत होती पण मी तिला इट्स ओके बोलून निघालो. मग एका मुलाने मला बस पकडून जाण्यापेक्षा रेल्वे स्टेशनला चालत जा सांगितले. रेल्वे स्टेशन जवळच आहे सुचवले, त्यानुसार मी पंधरा मिनिटे चालत रेल्वे स्टेशनला आलो तिथे एका मुलीकडून मी रेल्वे रूट लिहून घेतला आणि चार युरोचे तिकीट काढून रेल्वेमध्ये गेलो. बी टू प्लॅटफॉर्म वरून माझ्या स्टेशनसाठी रेल्वे पकडली. रेल्वे खूप छान नी चकाचक होती, दोन मजली होती. तिथून मी माझ्या स्टेशनला वीस मिनिटांत पोहोचलो. रेल्वे स्टेशनलाच माॅल होता. तिथे लघवीसाठी एक युरो द्यावा लागला. बेसीक सुविधाी फूकट नाहीत? पण मला आवडले पैसे देऊन चांगली सुविधा मिळत असेल तर काय प्रॉब्लम? बाहेर येऊन मी ९६ नंबरच्या बस स्टॅन्ड ला आलो. तिथे दोन फ्रेंच म्हातारे बसले होते. त्यांना मी हातवारे करून ९२ नंबरची बस कुठून मिळेल असं विचारलं. त्यांना काही समजलं नाही त्यांनी मला हाताने हा 96 नंबरच्या बसचा स्टॉप आहे असं सांगितलं. बाबांनो ते मला दिसतंच आहे की! पण हे त्यांना कोणत्या भाषेत सांगनार? मी तिथून निघालो पुढे एक बस उभी होती त्या बस ड्रायव्हरला मी हाताने नऊ आणि दोन दाखवले तर तो मला बोलला की फर्स्ट से “हाय”. पहिले हाय म्हणत जा जर समोरच्याला इंग्लिश येत असेल तर तुला इंग्रजीतून उत्तर देईल नाहीतर तो सांगेल की त्याला इंग्लिश येत नाही.” त्याने मला 92 नंबरची बस कुठे मिळेल तो स्टॉप दाखवला तिथून माझं होस्टेल एक किमी होतं मी चालतच निघालो रस्त्यात एक शॉपिंग सेंटर लागलं तिथून बिस्किट वगैरे घेतले परत चालत एका दुकानासमोर गेलो नी दुकानातल्या मुलाला दोन युरोची सेंट्स मध्ये चिल्लर करून दे मला भारतात लहान मुलांना वाटायची आहे असं सांगितलं. त्यांन कागदात गुंडाळलेले बंडल आणायला एका मुलाला सांगितलं आणि मला इंग्लंड आवडतो का? विचारलं मी इंग्लंड बद्दल बरच काही काही बोललो, खूप वाईट वाईट बोललो. इंग्रजांनी भारत लुटला नी स्वतःचा देश भरला, खूप लोकाना फाशी दिली, भारताला गरीब केले, अतिशय हरामखोर होते इंग्रज. दिसतील तिथे गोळ्या घालाव्यात त्यांना वगैरे वगैरे मी काय काय बोलून गेलो मलाच आठवत नाही. त्याचे तोंड उतरले, तो बोलला की “मला वाटलं तुला इंग्लंड आवडत असेल, मी इंग्लंडचा आहे.” मी जीभ चावली, त्याला वाईट वाटलं होतं पण मी त्याला सॉरी सॉरी चार चार वेळा बोललो आणि पटकन चिल्लर घेऊन निघालो. माझ्या एंजोय होस्टेलवर पोहोचलो. बाजूच्या बेडवर दोन विएतनामी आलेले होते. ओळख पाळख करुन झोपलो. दुसऱ्या दिवशी लुव्र म्युझियम, मोनालिसा पहायची होती ओर्से म्युझियम करायचे होते. तिथे किस्सा झाला. ओर्से मध्ये बॉम्ब असल्याच बातमी पसरली होती….

field_vote: 
0
No votes yet