त्या तरूतळी

अशोकाच्या पारावर
सीतामाय उसासते
सोनमृगाच्या मोहाला
मनोमन धि:कारते

शमीवृक्षाचा विस्तार
शस्त्र पार्थाचे झाकतो
प्रत्यंचेला स्पर्शण्यास
शर अधीरसा होतो

वृद्ध बोधिवृक्षातळी
गौतम नि:संग बसे
बोधरवि उगवता
दिव्यप्रभा फाकतसे

अजानवृक्षाच्या तळी
ज्ञानयोगी अविचल
अभावाच्या कर्दमीही
प्रतिभेचा परिमळ

नांदुरकीची डहाळी
आज कशाने हलते?
अणूहुनी सूक्ष्म कोणी
सारे आकाश व्यापते!

आज्ञा पडत्या फळाची
तरुतळाशी बसून
कुणी ऐके, त्याची प्रज्ञा
देई शास्त्रा संजीवन

field_vote: 
0
No votes yet