कथा दोन सावरकरांची

कथा दोन सावरकरांची

राहुल सरवटे

‘द प्रिंट’ या इंटरनेट-नियतकालिकात २०२२ साली झोया भट्टी लिहितात: “दिल्लीच्या उबदार आणि प्रकाशमान अंतर्भाग असणाऱ्या फुल सर्कल बुक स्टोरच्या खिडक्यांमधून आणि अगदी जुन्या, खान मार्केटसारख्या उच्चभ्रू भागातल्या बाहरीसन्ससारख्या पुस्तकाच्या दुकानांच्या बाहेरच्या दर्शनी भागात एक आता ओळखीचा झालेला, काळी टोपी घातलेला चश्मिष्ट चेहरा तुमच्याकडे पाहात असतो - विनायक दामोदर सावरकर. आज जिवंत असणाऱ्या इतर अनेक नावांहून अधिक भव्य नाव. अनेक पुस्तकांवर आता हा पुनरुज्जीवित झालेला चेहरा झळकत असतो.” भट्टी यांच्या निरीक्षणात निश्चितच तथ्य आहे. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून भारतात हिंदुत्ववादाचा पाया व्यापक होऊ घातल्याच्या काळात ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरांचा वैचारिक पुनर्जन्म झालेला दिसतो. विक्रम संपत यांनी लिहिलेलं सावरकरांचं दोन-खंडी इंग्रजी चरित्र काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. नुकताच त्यांच्या आयुष्यावर हिंदी चित्रपटही आला. अनेक लहान-मोठे लेख, काही विवादास्पद विधानं, इत्यादी प्रकरणं अधूनमधून सुरूच असतात. संपत यांच्या पुस्तकाला आणि रणदीप हुडा यांच्या चित्रपटाला जो प्रतिसाद दिसतोय त्यातून सावरकर हा ज्याला इंग्रजीत ज्याला ‘पॉप्युलर’ किंवा ‘पब्लिक’ डिस्कोर्स म्हणतात, त्यात काही प्रमाणात तरी कुतूहलाचा आणि आस्थेचा विषय झालेला दिसतो.

मात्र इंग्रजी अकादमिक आणि उच्चभ्रू लेफ्ट-लिबरल विचारविश्वात सावरकरांची ओळख प्राधान्यानं किंबहुना निव्वळ ‘हिंदुत्वाचे प्रणेते, कट्टर मुसलमान-द्वेष्टे आणि महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे प्रेरणास्थान’ अशीच असल्यामुळे, सावरकरांविषयी मोठ्या प्रमाणावर अनास्था, तुच्छता किंवा काही प्रमाणात द्वेषही आढळतो. त्यामुळे सावरकर हल्ली समाजमाध्यमे, चित्रपट, यू-ट्यूब अशा पॉप्युलर चर्चाविश्वाचा भाग बनले असले तरीही ते आजवर इंग्रजी अकादमिक अभ्यासाचा विषय बनले नव्हते. त्यातही पूर्वीच्या (म्हणजे बाबरी वादाच्या पूर्वीच्या काळात) इंग्रजी लिखाणात सावरकरांना राष्ट्रवादी म्हणून पाहण्याचा एक प्रयत्न होता ज्यात ‘आधीचे’ (म्हणजे १८५७ ला हिंदू-मुस्लिमांनी एकत्रितपणे लढलेलं स्वातंत्र्यसमर संबोधणारे) इंग्रज-विरोधी आणि राष्ट्रवादी सावरकर आणि ‘नंतरचे’ मुस्लीमविरोधी, हिंदुत्ववादाचा पुरस्कार आणि गांधीवादाचा तीव्र निषेध करणारे सावरकर असा भेद रूढ झालेला होता. नव्वदोत्तर कालखंडात आणि विशेषत: भाजपच्या राजकीय उत्कर्षानंतर दोन निराळ्या सावरकरांविषयीची ही मांडणी मागे पडून त्यांना मोदींचे पूर्वसुरी आणि भावी हिंदुराष्ट्राचे वैचारिक जनक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. मात्र आता सावरकरांचा अभ्यास करण्याची नितांत गरज भासू लागल्याचं दिसतं. हल्लीच सावरकरांविषयी दोन नवी इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. यातलं एक पुस्तक आहे, २०२२ सालचं विनायक चतुर्वेदी लिखित ‘हिंदुत्व ॲण्ड व्हायलन्स: व्ही. डी. सावरकर ॲण्ड द पॉलिटिक्स ऑफ हिस्टरी’ (मणिशंकर अय्यर हे ‘द वायर’मध्ये या पुस्तकाच्या परीक्षणात लिहितात, “असं पुस्तक जे सावरकरांना समजून घेण्याचा प्रयत्न करतं; मात्र त्यांचा धिक्कार करत नाही”. अर्थात अय्यरांसारख्या कट्टर सावरकर विरोधकाच्या ह्या विधानाच्या उलट एखाद्या सावरकर-समर्थकाला चतुर्वेदींचं पुस्तक सावरकर-विरोधीही वाटू शकतं.). आणि दुसरं नुकतंच आलेलं जानकी बखले लिखित ‘सावरकर ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदुत्व’.


Savarkar and the Making of Hindutva Janaki Bakhle

बखलेंच्या मते, बऱ्याच आधुनिक भारतीयांचा असा गैरसमज असतो की सावरकर हे श्रद्धाळू हिंदू तरी असावेत किंवा कट्टर माथेफिरू तरी. त्यामुळे, बखलेंच्या दृष्टीनं सावरकर त्यांच्या सर्व गुंतागुंतींसह समजून घेणं हे आपल्या काळाच्या आकलनासाठी आवश्यक आहे. त्यासाठी मुळात निव्वळ समर्थन वा द्वेष अशा भूमिकांना सोडचिठ्ठी देत सावरकरांना वसाहतिक संदर्भात पाहायला हवं. कवी, इतिहासकार, राष्ट्रवादी, मुस्लीम-विरोधी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, जात-विरोधी अशा त्यांच्या बहुविध भूमिकांमधले परस्पर ताण लक्षात घेऊन त्यांच्या एकंदर जीवनदृष्टीचं आकलन करायला हवं. बखलेंच्या मते, या आकलनातला मोठा अडथळा इंग्रजी अभ्यासजगताचं मराठी विचारविश्वाशी काहीएक नातं नसणं हा आहे. त्यातून मग सावरकर जे निव्वळ निषेधाच्या योग्यतेचे आहेत त्यांच्याबद्दल मराठी जगात काही ममत्व किंवा आस्था कशी असू शकते असा प्रश्न इंग्रजी अभ्यासकाला पडतो. बखलेंच्या मांडणीतून दोन सावरकरांची नवी कल्पना उभी राहते. आधीचे आणि नंतरचे सावरकर हे प्रारूप मागे पडून, मराठीतले सावरकर आणि इंग्रजीतले सावरकर असं नवं सिद्धांतन तयार होतं. या दोन्ही सावरकरांना एकत्र आणि समग्र पाहण्याचा प्रयत्न बखले या नव्या पुस्तकात करताना दिसतात.

मूळ लिखाणाचा आधार

आणि हे करताना बखलेंनी सावरकरांचा मुद्दा शक्यतो त्यांच्याच शब्दांत दिलेला आहे. (खेरीज पुस्तकाला जोडलेल्या दीर्घ अपेंडिक्समध्ये सावरकरांचं लिखाण मुळाबरहुकूम उद्धृत केलेलं आहे.) याची कारणं दोन. पहिलं म्हणजे, सावरकरांच्या लिखाणाचं स्वरूप अनेकदा वितंडवादी (एकोणिसाव्या-विसाव्या शतकातल्या अनेक विचारवंतांच्या लिखाणाचं स्वरूप असं दिसतं. महात्मा फुल्यांच्या लिखाणाच्या संदर्भात या मुद्द्याचा अधिक विस्तार गो. पु. देशपांडेंनी त्यांच्या ‘द वर्ल्ड ऑफ आयडिआज इन मॉडर्न मराठी’ या पुस्तकात केलाय.) असल्यामुळे आणि शैली अनेकदा वक्रोक्तीपूर्ण असल्यामुळे त्यांच्या विधानाचा विपर्यास होत नाहीये याचा वाचकांना पडताळा घेता यावा आणि दुसरं म्हणजे, यामुळे सावरकरांबद्दलचं लिखाण खऱ्या तटस्थ भूमिकेतून वाचकांसमोर मांडता येईल.

सावरकरांना एका व्यापक जागतिक परिप्रेक्ष्यात पाहणं बखलेंना आवश्यक वाटतं. त्यांच्या दृष्टीनं इथे दोन जोड-प्रश्न महत्त्वाचे आहेत. पहिला प्रश्न असा की, सावरकरांशी जोडल्या गेलेल्या बहुतेक गोष्टींची सुरुवात मूळ त्यांनी केलेली नाही. मग ते अस्पृश्यता-निवारणाचं कार्य असेल, किंवा हिंदुत्वविषयक भूमिकेची मांडणी असेल अथवा मुस्लीम राजकारणावरची टीका असेल. मात्र असं असूनही या सगळ्या भूमिकांचे ते प्रमुख प्रतिनिधी कसे बनले? आणि थोडंसं अधिक व्यापक वैश्विक इतिहासाच्या संदर्भात पाहायचं तर फोल्कीशसारखी जर्मन संकल्पना किंवा इटलीतला रोमानिता पंथ, किंवा हंगेरीतल्या उजव्या विचारांची मांडणी असो, अशा अनेक संकल्पना गुप्त संघटना बांधणीच्या रचना राबवीत होत्या. दुसरीकडे भारतात गांधी एक अहिंसक चळवळ चालवत होते. या सगळ्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात १९२१ साली रत्नागिरीत स्थानबद्ध असणारे सावरकर हिंदू सार्वभौमतेच्या निर्मितीच्या प्रक्रिया कार्यान्वित करतात. मराठी भाषेत संकल्पनात्मक जडणघडण झालेल्या या प्रक्रिया कोणत्या होत्या? त्या प्रक्रियांच्या इतिहासाची साधनं कुठली? आणि या प्रक्रियांवर गांधी आणि आंबेडकरांसारख्या विचारवंतांचा काय परिणाम झाला? असे प्रश्न बखलेंच्या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत.

वैश्विक इस्लामच्या भूमिकेला छेद?

सुमारे साडेचारशे पानं आणि सहा दीर्घ प्रकरणांतून बखले या १९२१ ते १९३७ दरम्यानच्या सावरकरी विश्वाचा वेध घेतात. पहिल्या प्रकरणात सावरकरांच्या अंदमानातून झालेल्या सुटकेची कहाणी येते. सावरकर आणि त्यांच्या बंधूंवर फार पूर्वीपासून ब्रिटिश गुप्तहेरांची पाळत होती आणि त्यांची ब्रिटिश दफ्तरांतली नोंद ‘रेवोल्यूशनरी टेररिस्ट’ अशीच होती. विनायक सावरकर हे ब्रिटिशांच्यानुसार कायमच ‘घातक, राजद्रोही, हिंसेला उत्तेजन देणारे’ होते आणि तरीही १९२१च्या सुमाराला त्यांची अंदमानातून सुटका का केली गेली? निव्वळ सुटकाच नव्हे तर त्यांनी आपल्या स्थानबद्धतेदरम्यान काही अटींचं उल्लंघन करूनही त्यांना पुन्हा अटक करण्यात आली नाही. असं का घडलं असावं? बखलेंचं प्रतिपादन असं की, ब्रिटिशांना सावरकरांच्या मुस्लीमविषयक भूमिकेची संपूर्ण कल्पना होती आणि खिलाफत चळवळीमुळे बळ मिळत असलेल्या वैश्विक इस्लामच्या भूमिकेला छेद देता यावा यासाठी सावरकरांना मुक्त केलं गेलं. इस्लामिक एकीकरणाची चळवळ आणि तिला पाठिंबा देणाऱ्या गांधींसारख्या नेत्यावर सतत हल्ला करणारा सावरकरांसारखा मोहरा ब्रिटिशांना आवश्यक वाटत होता. दुसऱ्या प्रकरणात बखले सावरकरांच्या मुस्लीमविषयक भूमिकेची समीक्षा करतात. त्यांच्या मते, सावरकरांच्या दृष्टीनं मुसलमानांचे आंतरराष्ट्रीय हितसंबंध आणि भारतीय राष्ट्रवाद यांच्यात एक मूलभूत तिढा असल्याने मुसलमान खऱ्या अर्थानं भारताशी एकनिष्ठ राहू शकत नाहीत. पण बखलेंच्या मते, केवळ खिलाफत चळवळ, मलबारातील मोपल्यांचे बंड अशा तात्कालिक घटनांमुळे नव्हे तर स्वभावत:च मुसलमान हिंसक आणि हिंदुद्वेष्टे असल्याचं सावरकर मानत होते. सावरकरांचा मुस्लीमविरोध हा केवळ एक राजकीय डावपेच किंवा गांधीविरोधी राजकारणाचा तात्कालिक भाग म्हणून नव्हता तर तो त्यांच्या मूलभूत वैचारिक भूमिकेचा भाग होता, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक होता. आपल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ बखले सतत सावरकरांचं मूळ लिखाण उद्धृत करतात आणि वाचकांनाही आवाहन करतात की त्यांनी सावरकरांचं मूळ लिखाण पडताळून पाहावं.

विज्ञाननिष्ठ, कवी सावरकर

पुस्तकाचं तिसरं प्रकरण सावरकरांच्या जातविषयक लिखाणाचा आढावा घेतं. बखलेंच्या मते, सावरकर जातीच्या प्रश्नावर नि:संदिग्धपणे पुरोगामी भूमिका घेऊन सनातन्यांची काटेकोर झडती घेतात. मात्र या भूमिकेचा आधार हिंदू सार्वभौमत्व निर्माण करणं असल्यामुळे त्यांची ही भूमिका मर्यादित झाली. पुस्तकाचं चौथं प्रकरण कवी सावरकरांचा शोध घेतं, विशेषत: पोवाडा या काव्यप्रकाराचा सावरकरांनी केलेला वापर बखलेंना वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. पोवाडा निव्वळ शाब्दिक नसून त्याच्या सादरीकरणातून भावनिक वातावरणाची निर्मिती होते आणि त्यामुळे सावरकर पोवाड्याद्वारे स्थानिक मिथकांना राष्ट्रीय बनवू पाहतात असं बखलेंचं निरीक्षण आहे. पाचव्या प्रकरणात सावरकरांच्या ऐतिहासिक लिखाणाला त्या, सावरकरांचे समकालीन आणि निस्पृह इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांच्या भूमिकेतून छेद देऊ पाहतात. सावरकर आणि शेजवलकर हे दोघेही राष्ट्रवादी भूमिका घेत असले तरीही शेजवलकर इतिहास आणि सामूहिक स्मृती यांच्या मधल्या फरकाची यथास्थित जाण ठेवतात; याउलट सावरकर इतिहास मिथकाच्या रूपातच पाहतात. पुस्तकाचं सहावं आणि शेवटचं प्रकरण अतिशय रोचक आहे. इथे बखले सावरकर हे स्वत:च एक मिथक कसे बनले हे सावरकरांच्या विविध मराठी चरित्रांचा आढावा घेऊन दाखवून देतात.

बखलेंच्या एकूण मांडणीत सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातली आणि विचारांतली जटिलता पुरेश्या विस्तारानं आलेली आहे. बखले सावरकरांना त्यांच्या काळाचं आणि मराठी राजकीय-वैचारिक संस्कृतीचं अपत्य म्हणून पाहतात. मराठी सावरकर आणि इंग्रजी सावरकरांना एकत्र पाहण्याचा हा प्रयोग उत्तम साधलेला आहे आणि आज इंग्रजीत तो नितांत आवश्यक आहे.

जानकी बखले या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (बर्कले) येथे इतिहासाच्या प्राध्यापिका आहेत. याआधी त्यांचं ‘टू मेन ॲण्ड म्युझिक’ हे पंडित भातखंडे आणि पंडित पलुस्कर यांनी निर्मिलेल्या भारतीय संगीताच्या अभ्यासपद्धती आणि त्यांचा भारतीय राष्ट्रवादी भूमिकांशी असणारा संबंध यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणारं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या जवळपास गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ सावरकरांवरच्या पुस्तकासाठीचं संशोधन आणि लेखन करण्यात गुंतलेल्या होत्या. त्याचं फळ या पुस्तकाच्या रूपात आता आपल्यासमोर आहे.

rahul.sarwate@gmail.com
---
(पूर्वप्रकाशन : लोकसत्ता २५ मे २०२४)

‘सावरकर ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदुत्व’
लेखिका : जानकी बखले
प्रकाशक : प्रिन्सटन युनिव्हर्सिटी प्रेस, २०२४. भारतीय आवृत्ती, पेंग्विन
पृष्ठे: ४३२ ; किंमत: रु.८९९

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख कालच वाचला. विक्रम संपत यांच्या पुस्तकाचे तुम्ही परीक्षण लिहिले असल्यास वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सावरकर वगैरे सोडल्यास देशभक्ती आणि हिदुत्ववाद यांचे कॉम्बो असलेला दुसरा कोणताही विचारवंत उजव्यांकडे नाही. आधीच्या क्रांतिकारक गोष्टींमुळे त्यांच्या देशभक्तीवर कोणाची शंका उपस्थित होत नाही (अर्थात काहींनी ती ही केली, महाराष्ट्रात काँग्रेस वगैरेच्या लोकांनीसुद्धा कधी अशी शंका उपस्थित केली नव्हती) त्यामुळे त्यांच्या पुढच्या थेरीला एक मोरल बेस तयार होतो. तसे उजव्यांच्या एकाही विचारवंताच्या बाबतीत होऊ शकत नाही कारण वेळोवेळी हिंदुत्ववाद्यांनी मागास ते अतिमागास अशा विचारांचीच कास धरलेली आहे. उदा. बंच ऑफ थॉट्स सारख्या पुस्तकांच्या वादविवादात लोक चिंधड्या उडवतातच. त्यात सावरकर विज्ञाननिष्ठ वगैरे असल्याने त्यांच्या थिअरी आजच्या वैज्ञानिक युगाच्या काळात सुद्धा रिलेव्हंट राहतात. कारण इंटरनेट-हिंदू आणि त्यांचे इंटरनेटनेतृत्व हे विज्ञानाला, औद्योगिकतेला पकडून पैसे कमावत आहेत, परदेशांत जात आहेत त्यामुळे साहजिक त्यांना सावरकर आणखी जवळचे आणि त्यांच्या मनातील वैचारिक विसंगती दूर करणारे विचारवंत म्हणून प्रचंडच भावतात. तरीही आजही सखोल विज्ञानाचा आधार घेऊन नव्या स्वरूपातले वंशवाद कसे मांडले जातात याचे एक उदाहरण.

सावरकर आणि आंबेडकर या दोघांना नेहमी परस्परपूरक किंबहुना आंबेडकरांना सावरकरांच्या संकल्पनात्मक कार्याचे प्रॅक्टिकल एक्सटेंशन म्हणून प्रोजेक्ट करण्याचा, दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न होत आहे.

उदा. सावरकर यांची हिंदुत्वाची संकल्पना ही प्रचंड व्यापक आणि भारताच्या हिताचीच असून आंबेडकरांना अभिप्रेत खरा भारत त्याच दडलेला आहे आणि आंबेडकरांचे भारताविषयी आणि त्याच्या सार्वभौमत्वाविषयीचे चिंतन हा सावरकरांच्या वेन डायग्राममधे पूर्ण सामावू शकते असे. एकंदरीत दलितांचे प्रचंड वावडे असले तरी आंबेडकरांचे उन्नयन केल्याशिवाय गत्यंतर नाही हे उजव्या विचारवंतांच्या ध्यानात आलेले दिसते. त्यामुळे सध्याचे जे उजवे बिनीचे विचारवंत शिलेदार आहेत ते आवर्जून आंबेडकरांवर लेक्चर देतात, त्या दोघांचा तौलनिक अभ्यास करायचा सतत प्रयत्न करत असतात. याचे एक अलीकडचे उदाहरण.

याचे कारण मला एकच दिसते. जातव्यवस्था जशी एकंदरीत सगळ्या मार्गातील धोंड आहे तशी हिंदुराष्ट्राच्या मार्गातील तर सगळ्यात मोठी धोंड आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना या ना त्या प्रकारे जातींना परास्त करायचेच असते. त्यासाठी आंबेडकरांचे उन्नयन करणे त्यांना क्रमप्राप्त आहे. गंमत म्हणजे हिंदुत्ववाद्यांना सगळा कंट्रोल आणि वैचारिक नेतृत्व मात्र ब्राह्मणी हवे असते, आणि उर्वरित समाजाने आपआसातले भेद विसरून त्यांना फॉलो करावे हे अपेक्षित असते. परंतु अलीकडे दलित जातींनासुध्दा जात म्हणून प्रचंड आत्मभान आलेले आहे आणि ते एकंदरीत ते या हिदू राष्ट्रवादाला बळी पडत नाही आहेत. म्हणून हिंदुत्ववाद्यांनी मग ओबीसीना भुलवण्याचे अनेक प्रयत्न केले. तरी आता ओबीसी लोकच अधिकाधिक जातीय झेंड्यांखाली एकत्र येत आहेत आणि पुन्हा हिंदूराष्ट्राचे स्वप्न दूर लोटत आहेत. अशा रीतीने हिंदुराष्ट्र-जातीव्यवस्था पॅरॅडॉक्स तयार झाला आहे. हिंदुत्ववाद्यांना जातव्यस्था हिंदुराष्ट्र व्हावे म्हणून हिंदुत्ववाद्यांचे वर्चस्व अबाधित राहील अशी कोलमडून हवी आहे आणि जातींना अधिकाधिक ठळकपण आणि विकेंद्रीकरण हवे आहे त्यातून त्यांची हिन्दू अस्मिता मागे पडते आणि हिंदुराष्ट्र साकार होत नाही.

बाकी सावरकर सध्या हॉट विषय आहे त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक आणि ज्यांना वितंडवादात खूप रस आहे असे लोक त्यांचे गिऱ्हाइक असल्याने अशी पुस्तके येत राहतात.

सावरकरांना मराठी समाजानेच दुर्लक्षित केले होते. सध्या अमित शहा मुळे सावरकरांना राष्ट्रीय पातळीवर बरे दिवस आले आहेत. त्यामुळे वितंडवादासाठी दोघांनाही एकमेकांच्या पुस्तकांची गरज आहे आणि हेही पुस्तक खपेल यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

उत्तम पुस्तकपरिचय. बखल्यांचं पुस्तक अगदी उद्याच जरी नाही तरी पुढेमागे जरूर वाचेन.

> स्वभावत:च मुसलमान हिंसक आणि हिंदुद्वेष्टे असल्याचं सावरकर मानत होते.

मान्य. अंदमानात काढलेली दहाएक वर्षं याला कारणीभूत झाली असण्याची शक्यता खूपच वाटते. (अर्थात हे एकच कारण होतं असं मी म्हणत नाही.) खून करून, दरोडे घालून आलेले पठाण तिथे मोठ्या संख्येने होते. शिवाय ‘माझी जन्मठेप’ मध्ये आलेल्या अस्पष्ट उल्लेखावरून जबरी गुद्संभोगासारखे प्रकार ते नव्या कैद्यांवर करत असावेत असा अंदाज बांधता येतो. मुसलमानांचं हे रॅन्डम सॅम्पल आहे असा गैरसमज कळत न-कळत करून घेतला तर त्यांच्याविषयी (फार) वाईट मत होणं साहजिक आहे.

> सावरकरांच्या लिखाणाचं स्वरूप अनेकदा वितंडवादी … असं दिसतं

पूर्ण मान्य. खरं तर त्यांच्या लिखाणासाठी चपखल मराठी विशेषण सुचत नाही. इंग्रजीत ज्याला ‘पर्पल प्रोज’ म्हणतात त्याचा प्रादुर्भाव फार आहे, आणि त्यामुळे ते सलग फार वेळ वाचवत नाही. बखल्यांनी ते सगळं वाचलं असेल तर त्यांच्या सहनशीलतेची दाद द्यायला हवी. पण याच त्यांच्या गुणामुळे सावरकरांच्या विधानांचा विपर्यास करणं अवघड आहे, कारण ते स्वत: विपर्यास करूनच लिहीत असत.

----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सावरकर यांचे समग्र साहित्य वाचून चिंतन मनन करणे गरजेचे आहे. त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांना मिळालेला व्यवस्थेचा व्यापक पाठिंबा हा भाग फार महत्त्वाचा. सावरकरांची साहित्यिक कालरेषा बघितली तर १९०० ते १९१०, १९११ ते १९२१, १९२२ ते १९४२, १९४३ ते १९६३ या कालावधीत लिहिलेले जे आहे त्याची व्याप्ती बघणं गरजेचं आहे. त्यांचा व्यासंग किती मोठा होता हे पण लक्षात येईल. त्यांना सार्वजनिक जीवनात व्यापकपणे पाठींबा खूप कमी मिळाला. नियतीने तशी संधी दिली असती तर खूप मोठा फरक पडला असता. बहुतेक लोकांपर्यंत सावरकर हे मुस्लिम द्वेष करणारे होते हेच पोचवलं गेलं आहे. अंदमानात जाण्याआधीचे सावरकर आणि नंतरचे सावरकर जर नीट अभ्यासले तर समजून जाईल की इस्लाम धर्माचा अभ्यास केल्यानंतर सावरकरांचा मुस्लिम समाजाबद्दल द्वेष नक्की कशामुळे होता. सावरकरांविषयी लिहिताना नेहमी त्यांच्या कोणत्याही एका भूमिकेचा रोष मनात धरून त्यांच्यावर टिका टिप्पणी किंवा द्वेषमूलक लेखन केले आहे. त्यामुळे कित्येक लोकांना सावरकर विचार विस्कटलेला, विसंगतीचा किंवा मुस्लिमद्वेष्टी वाटतो. समग्र सावरकर वाचन केल्यानंतर समजतं की सावरकरांचा मांडलेला एकत्रित विचार विस्कटलेला नसून एकात एक गुंतलेल्या मुद्यांवर आधारित आहे. उदाहरणार्थ १८५७ चा स्वातंत्र्य लढ्यातील उल्लेख करताना सावरकर हिंदू मुस्लिम एक होऊन लढले होते याचा पुरस्कार करतात. हे पुस्तक लिहिले गेले १९१० च्या आधी. हा कालखंड हिंदू मुस्लिम एकत्र लढण्याचा होता. सय्यद अहमद खान यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. त्यानंतर थिओडोर बेक हे ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ होते त्यांची भूमिका पण महत्वाची होती. कालांतराने मुस्लिम लीगने तो उचलून धरला. हा मुद्दा महत्वाचा धागा झाला नंतरच्या राजकारणात तो मुख्यत्वेकरून कालावधी १९१० नंतरचा. त्यानंतर १९३६ पर्यंत हिंदू मुस्लिम हे प्रकरण मुख्य राजकीय भांडवल म्हणून हाताळले गेले. याच काळात सावरकर अंदमानातील कारागृहात होते नंतर रत्नागिरी मध्ये राजकीय बंदीवासात. अंदमानात सावरकरांनी एकूण इस्लाम धर्माचा अभ्यास केला, तिथल्या मुस्लीम समाजातील लोकांचे निरिक्षण केले, पठाणांचे व्यवहार बघितले याचा त्यांच्यावर नक्कीच परिणाम झाला असणार. कारण त्यानंतरच्या काळात सावरकर हे बहुतेकांना मुस्लिम द्वेष्टे वाटतात. मात्र सावरकरांची पुण्यभू, मातृभू आणि पितृभू ही हिंदुत्वाची मांडणी त्याकाळी दूर्लक्षली गेली. १९३६ ते १९४२ ह्या काळात सावरकर हिंदू संघटक म्हणून हिंदू महासभेत महत्वाची भूमिका निभावू लागले. तोपर्यंत मुस्लिम लीगला मुस्लिम समाजाचा भक्कम पाठिंबा मिळाला होता. उलटपक्षी हिंदू समाजातील खूप छोटा वर्ग हिंदू महासभेच्या पाठीशी होता. त्यातही तत्कालीन सनातनी आघाडीवर होते. १९४२ नंतरच्या काळात हिंदू मुस्लिम संघर्ष मुख्य प्रवाहात आला. कारण राजकीय नेत्यांच्या इच्छा आकांक्षा. डायरेक्ट ऍक्शन डे हा दिवस भारतीय समाजाची वीण टराटरा फाडणारा होता. या सगळ्या कालावधीत सावरकरांचे लेखन मनोविश्लेषणात्मक दृष्टीने बघण्याची अत्यंत गरज आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळात, गांधीहत्या नंतरचा काळात सावरकर जाणीवपूर्वक अडगळीत फेकले गेले. सावरकरांच्या मागे कोणतीही व्यवस्था आजच्या भाषेत इको सिस्टिम उभी नव्हती. गांधी नेहरू वगैरे नेत्यांना कॉंग्रेसचे कोंदण लाभले होते. आंबेडकरांनी संघर्ष करून स्वतः एक चळवळ उभी केली होती. त्यामुळे कॉंग्रेस, हिंदू महासभा आणि दलित चळवळ ह्या प्रमुख सामाजिक प्रवाहांना लोकांमध्ये व्यापक स्वरूप कॉंग्रेसलाच मिळाले. दलितांची बाजू मांडण्यासाठी आंबेडकर एकाकीपणे लढत होते. त्यांचे ब्रिटिश सरकारसोबत जे पत्रव्यवहार झाले किंवा सामाजिक प्रश्नांवर ज्या वाटाघाटी झाल्या त्यातून आंबेडकरांचा तात्विक संघर्ष कॉंग्रेसच्या विरोधात फार वेगळ्या पातळीवरचा होता. तसा संघर्ष हिंदू महासभा कधीही करू शकली नाही. कारण त्यावेळी वर्णवर्चस्ववादी सनातन्यांची मांदियाळीत महासभा बरबटलेली होती. सावरकरांचे विचार त्याकाळी कित्येक सनातन्यांच्या पचनी पडत नव्हते. सावरकरांना तीन पातळ्यांवर संघर्ष करावा लागत होता. सावरकर, आंबेडकर, गांधी, नेहरू वगैरे मंडळी गेल्यावर त्यांचे साहित्य, विचार आणि लेखन याचा प्रचार प्रसार करण्यासाठीचे वातावरण सरकारकृपेवर अवलंबून होते. त्यात सावरकरांचना डावलले गेले यात शंकाच नाही. सरकारने अधिकृतपणे नेहरूंचे समग्र साहित्य, पत्रव्यवहार, भाषणं आणि विचार उपलब्ध केले आहेत सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू सिरिज १, सिरिज २ मध्ये. गांधींच्या कंप्लीट वर्क्स ऑफ महात्मा गांधी यांच्या १०० खंडाच्या ग्रथांना सरकारी आशीर्वाद मिळाला. सरकार दरबारी आंबेडकर साहित्य देशात वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध झाले. त्यामुळे अभ्यासकांना, संशोधकांना गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांच्या साहित्यावर संशोधन, अभ्यास करण्यासाठी जो वाव मिळाला तसा प्रतिसाद सावरकर यांचे विचार, लोकांपर्यंत नेण्यासाठी यंत्रणा कमी पडली. त्यामुळे सावरकर यांच्या वर जेवढं लिहिले जाईल, चर्चा होतील किंवा संशोधन होईल ते लोकांपर्यंत मर्यादित स्वरूपात जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

उत्तम परिचय.मात्र लेख सुरू होताच आणि जरा रोचक होतोय असं वाटतं असतानाच संपला. अलिकडे 'लंडन रिव्ह्यू ऑफ बुक्स' हे नियतकालिक वाचू लागलो आहे त्यात अनेकदा दोन-तीन पुस्तकांचं एकत्र परीक्षण/संश्लेषण करून त्यावर त्या विषयातील जाणकार व्यक्तीने लिहिलेले पाच-दहा हजार शब्दांचे लेख असतात. तसं काही ह्या विषयावर, पुस्तकांवर तुझ्याकडून मराठीत/इंग्रजीत दीर्घ लेखन वाचायला आवडेल!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0