मनोरथाच्या वाटेवरती

भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन

निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन

जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन

राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी

सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने

कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -त्यात विरुन जाईन

मनोरथाच्या वाटेवरती वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे

field_vote: 
0
No votes yet