करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ

मुलाखतीची पूर्वपीठिका : विषाणू, आजार, साथ, महासाथ, कोरोना, सायटोकाईन स्टॉर्म, प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद असे विविध शब्द गेल्या वर्षभरात आपल्या कानांवर वारंवार आदळले आहेत. सुरुवातीच्या काळात अजिबात व नंतर पुरेसे आकलन नसल्याने या विषयावर मराठीत फक्त वरवरचे, सुलभ आणि जनहितार्थ पण ढोबळ लेखन केले गेले. म्हटले तर यात वावगे काहीच नाही. पण आता सव्वा वर्ष झाल्यानंतर किमान काही गोष्टी तरी नक्की कळलेल्या आहेत आणि काही गृहीतके ढासळली आहेत. इंग्रजीत विशुद्ध शास्त्रीय माहिती उपलब्ध होत आहे, पण मराठीत मात्र या विषयावर शास्त्रीय लिखाण कमी झाले असावे. ही मुलाखत घेण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे विषाणू, प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद वगैरे विषयांवर सखोल शास्त्रीय माहिती घेणे हे होय.

डॉ. विनिता बाळ यांचा अल्प-परिचय : डॉ. बाळ या मूळच्या पुण्याच्या. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून MBBS केले. मुंबई विद्यापीठातून MD केले. त्यांनी पोस्ट डॉक्टोरल रिसर्च हाफकिन इन्स्टिट्युट, लंडन विद्यापीठातून केला. त्यानंतर त्या दिल्लीच्या प्रतिष्ठित National Institute of Immunologyमध्ये २५-३० वर्षे ज्येष्ठ संशोधक म्हणून कार्यरत होत्या. या काळात त्यांचे संशोधन अनेक सुप्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले (उदा. नेचर इम्युनॉलॉजी). निवृत्तीनंतर त्या पुण्यात परत आल्या आहेत आणि आता त्या आयसर संशोधन संस्थेत व्हिजिटिंग फॅकल्टी आहेत. इम्युनॉलॉजी या विषयावर त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान असणारी मराठी व्यक्ती दुर्मीळ, त्यामुळे वरील विषयासाठी ’ऐसी अक्षरे’ने त्यांची मुलाखत घेतली.

अबापट + मिलिंद पदकी : सार्स कोविड २ विषाणूने आपल्या शरीरात नाक / तोंड याद्वारे प्रवेश केल्यानंतर त्याचा प्रवास कसा होतो? त्याला आपली प्रतिकारशक्ती फिजिकली आणि बायोकेमिकली कसा प्रतिसाद देते? आपल्या प्रतिकारशक्तीच्या कुठल्या प्रतिक्रिया बाधित माणसाच्या शरीराला मदत करतात आणि कुठल्या प्रतिक्रिया घातक असतात?

उत्तर : सार्स कोविड २ हा विषाणू शरीरात नाक आणि तोंडाद्वारे प्रवेश करतो हे बरोबर आहे. हवेच्या मार्फतच, माणसं खोकली, शिंकली किंवा थुंकली तर त्यातून पसरतो, हेही महत्वाचं आहे. (फक्त एवढं नाही तर) जोरजोराने श्वासोच्छवास होत असेल, म्हणजे कुणी गाणी गात असेल (आणि तो माणूस बाधित असेल) तर त्यातूनही विषाणूचा प्रसार होतो हेही निदर्शनाला आलं आहे. आणि ते नाक आणि तोंड यांच्याचद्वारे सहज आत जातात यालाही एक कारण आहे. ACE २ नावाचा एक रिसेप्टर असतो (अँजिओटेनसीन कन्व्हर्टिंग एंझाइम २ असा त्याचा फुल फॉर्म आहे) हे ACE २ रिसेप्टर्स शरीरातील अनेक पेशींमध्ये असतात. या रिसेप्टर्सना सार्स कोविड २ विषाणू चिकटू शकतो. या रिसेप्टरला हा विषाणू चिकटला की एका प्रकारे या विषाणूला पेशींच्या आतमध्ये जाण्याचा परवानाच मिळतो असं म्हणायला हरकत नाही.

तर हे असे ACE २ रिसेप्टर्स असलेल्या एपिथेलियल पेशींचं एक प्रकारचं लायनिंग आपल्या श्वसनमार्गभर म्हणजे नाक, घसा आणि फुफ्फुसांमध्ये असतं. आणि त्यामुळे श्वासाद्वारे आत गेल्यावर हे विषाणू या ACE २ रिसेप्टर्सना भराभरा पकडू लागतात आणि पेशींच्या आत प्रवेश घेतात. आपल्या शरीरात विषाणूने घेतलेली ही एंट्री असते. इम्युनॉलॉजीच्या भाषेत याला इन्व्हेजन म्हणतात आणि या आत घुसलेल्या विषाणूंना इन्व्हेडर्स म्हणतात.

यात एक थोडा वेगळा पण महत्त्वाचा मुद्दा असा की पंधराएक वर्षांपूर्वीही सार्स कोविड (किंवा कोव्ह) नावाचा एक विषाणू आणि त्याची साथ आली होती. तेव्हा त्याला नुसतेच सार्स म्हणले जायचे. आता आपण याच विषाणूला सार्स कोव्ह १ म्हणतो कारण आता त्याच्यानंतरचा त्याच कॅटॅगरीतला दुसरा विषाणू आला आहे आणि आपण त्याला आता सार्स कोव्ह २ म्हणतो. या सार्स कोव्ह २ ची ACE २ रिसेप्टरला चिकटण्याची क्षमता (ज्याला आम्ही ACE २ रिसेप्टर अफिनिटी म्हणतो) सार्स कोव्ह १ च्या तुलनेत अतिशय जास्त आहे. यामुळेच कदाचित सार्स कोव्ह १चा प्रसार त्यामानाने मर्यादित झाला आणि या सार्स कोव्ह २चा प्रसार मात्र अतोनात झाला. ही ACE २ रिसेप्टरला चिकटण्याची जास्त क्षमता हे याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. सार्सची (आणि मर्सचीही) महासाथ आली आहे असं त्यावेळी जाहीर झालं होतं. परंतु सार्स-मर्स यांची महासाथ आणि सार्स कोव्ह २ची महासाथ यांची कुठल्याही प्रकारे तुलनाही होऊ शकत नाही इतका त्यांत फरक आहे.

जेव्हा असे पेशींमध्ये विषाणू शिरतात, तेव्हा (प्रतिकार प्रतिसादाची) सुरुवात होते ती जागच्याजागी असलेल्या प्रतिक्रियेने होते. पहिली गोष्ट घडते ती म्हणजे inflammation. म्हणजे दाह किंवा सूज. यातला दाह हा शब्द जास्त अचूक वाटतो. पण अर्थात inflammation झाल्यावर सूज येते हेही खरं आहे. म्हणजे समजा त्वचेवर एखादा ओरखडा आला, तर त्याच्या भोवती सूज आलेली दिसते. ही सूज येते कारण शरीरातले निरनिराळे द्रवपदार्थ आणि पेशी हे तिथे एकत्र जमा होतात आणि त्याच्यामुळे तिथे प्रतिकारशक्तीची ॲक्शन सुरू होते. म्हणजे सुरुवात नेहमी लोकल रिस्पॉन्सनी होते.

हा सुरुवातीचा प्रतिकार प्रतिसाद आहे तो "इनेट इम्युनिटी"शी संबंधित घटकांच्यामुळे झालेला असतो. इनेट इम्युनिटी म्हणजे नैसर्गिक प्रतिकारक्षमता, ज्यात २४ तास उपलब्ध असणाऱ्या पेशी, उपलब्ध प्रथिनं आणि शरीरात घुसलेल्या कुठल्याही जंतूच्या विरोधात कार्य करण्याची त्यांची क्षमता हे असतात. त्यामुळे याला आपण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणतो. आणि ही सुरक्षाफळी सक्षम असते. अर्थात प्रचंड मोठ्या प्रमाणात जिवाणू किंवा विषाणू जर शरीरात आले तर ही सक्षम असलेली सुरक्षाफळी ही अपुरी पडू लागते.

ही सुरक्षाफळी नक्की काय करते? उदाहरणार्थ रक्तात पांढऱ्या पेशी असतात, त्यांच्यात एक न्युट्रोफिल नावाचा पेशीप्रकार असतो, या पेशी रक्तातच नाही तर शरीराच्या इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात हिंडत असतात. याबरोबरच मॅक्रोफाजेस नावाच्या दुसऱ्या पांढऱ्या पेशी असतात. या दोन्ही पांढऱ्या पेशींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमोर कुठलाही कण आला तर त्या त्याला पटकन खाऊन टाकतात. यांना आपण फ़ॅगोसाईट्स म्हणतो (फॅगोस म्हणजे खाणे आणि साईट म्हणजे पेशी) कुठलेही कण (जिवंत / मृत) समोर आले की त्याला गिळंकृत करणं हे या पेशींचं मुख्य कार्य. आता हे गिळंकृत केल्यावर पुढे काय होते ते बघू.

समजा आपल्या शरीरात एक विषाणू शिरला आहे तर त्याच्या भोवती अशा अनेक दाहकारक गोष्टी जमा होतात. त्याचा एक परिणाम असा होतो की जवळपास असलेल्या बऱ्याच पेशी तिथे पोचतात. शरीरभर पसरलेल्या इतर पेशींना कळावं म्हणून विविध स्राव सोडले जातात. त्याबरोबरच सायटोकाइन्स आणि किमोकाईन्स हेही सोडले जातात. सायटोकाइन्स आणि किमोकाइन्स ही लोकली उपलब्ध होतात. आपण किमोटॅक्सिस हा शब्द ऐकलेला असतो. ही रसायनं तयार झालेली असतात, त्या रोखाने शरीरातल्या उरलेल्या रक्तपेशी (विशेषतः न्युट्रोफिल्स आणि मॅक्रोफाजेस) प्रवास सुरू करतात आणि एका जागी जमा होतात. समजा हे त्वचेच्या खाली झालं असेल किंवा नाकाचं जे लायनिंग आहे त्याच्या खाली, किंवा त्या लायनिंगच्या पेशींमध्ये जर झालं असेल तर या सगळ्यातून पुढे अंतिमतः पांढऱ्या पेशी जवळच्या लिम्फ नोडकडे आपला प्रवास सुरू करतात. म्हणजे आधी एका जागी त्यांनी जिवाणू किंवा विषाणू यांना गिळंकृत करून झालं की मग त्या हळू हळू जवळच्या लिम्फ नोडकडे प्रवास करायला लागतात. याला ड्रेनिंग लिम्फ नोडस् असं म्हणतात. आपण सामान्यपणे बघतो की समजा हातावर काही झालं तर काखेतले लिम्फ नोड सुजतात. त्याचं कारण म्हणजे या फॅगोसाईट्स, न्युट्रोफिल्स अशी ॲक्शन घेतल्यानंतर जवळच्या लिम्फ नोडकडे प्रवास करतात म्हणून. आत्तापर्यंत मी वर्णन केला तो भाग इनेट म्हणजे नैसर्गिक प्रतिकारशक्ती, ती त्या त्या जागी उपलब्ध असते.

याशिवाय adaptive इम्युनिटी असते. टी सेल्स आणि बी सेल्स नावाचे पांढऱ्या पेशींचे दोन प्रकार यात काम करतात. या टी आणि बी सेल्सचा प्रतिसाद सुरू होण्यासाठी न्युट्रोफिल्स आणि मॅक्रोफ़ाजेस यांचं लिम्फ नोडमध्ये पोचणं हे फार जरुरीचं असतं. याचं कारण म्हणजे आपली त्वचा किंवा शरीरात इतर कुठे या टी सेल्स आणि बी सेल्स भटकू शकत नाहीत. या पेशी मुख्यतः रक्तात असतात. (क्वचित त्वचेच्या खाली काही असू शकतात.) याबरोबर लिंफॅटिक सिस्टीममध्ये त्या असतात. लिंफॅटिक सिस्टीमचं जाळं शरीरभर पसरलेलं असतं (रक्ताभिसरण संस्थेसारखंच, पण वेगळं) त्यात या पेशी असतात. तिथूनच या पेशी आत आणि बाहेर जात येत असतात. सगळ्या शरीरावर (प्रतिकारशक्ती दृष्टीने) लक्ष ठेवण्याचं काम या पेशी या जाळ्यातून फिरून करत असतात.

आता सार्स कोव्ह -२ विषाणू विरुद्ध स्पेसिफिक प्रतिकारशक्ती : ही निर्माण करायचे काम या पेशी करतात. ती निर्माण होण्याची सुरुवात लिम्फ नोडमध्ये (न्युट्रोफिल्स आणि फ़ॅगोसाईट्स जेव्हा या विषाणूला गिळंकृत करून येतात तेव्हा) होते.

या दोन्हीतला फरक म्हणजे नैसर्गिक (इनेट) इम्युनिटी सर्व घुसखोरांविरुद्ध एकाच प्रकारे काम करते, ती स्पेसिफिक जंतूंसाठी वेगळी नसते. मात्र adaptive प्रतिकारशक्ती, (म्हणजे टी आणि बी सेल्सची) प्रत्येक वेगळ्या विषाणूसाठी वेगळी असते. प्रत्येक विषाणूच्या प्रत्येक प्रथिनासाठी, कार्बोहायड्रेटसाठी वेगवेगळ्या आणि स्पेसिफिक टी आणि बी सेल्स वापरल्या जातात. यामुळे adaptive इम्युनिटीचं काम सुरू व्हायला, इन्व्हेजन झाल्यानंतर किमान आठ ते दहा दिवस जायला लागतात.

एवढ्या आठ-दहा दिवसांमध्ये जर नैसर्गिक प्रतिकारशक्ती नसली तर काय होईल? या काळात आत आलेले जंतू सगळीकडे पसरतात. त्यांना प्रतिकार करण्यासाठी दुसरी कुठली प्रतिकारशक्ती उभारता येणार नाही. त्यामुळे इनेट (नैसर्गिक) प्रतिकार प्रतिसादाचं महत्त्व खूप आहे. म्हणजे जेव्हा लशीतून किंवा इतर मार्गानं बरेच महिने / वर्षं / दीर्घकालीन टिकणारा प्रतिसाद हवा असतो तेव्हा adaptive इम्युनिटी, म्हणजेच टी आणि बी सेल्स महत्वाच्या.

पण मुद्दा असा की हे सगळं घडण्यासाठी - लिम्फ नोडमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्तीचं काम करणाऱ्या पेशी (न्युट्रोफिल्स आणि फॅगोसाईट्स) आणि टी आणि बी सेल्स यांचं एकत्र येणं महत्त्वाचं असतं. आणि ते एकत्र येण्यासाठी लिम्फनोड सारखी जागाच गरजेची असते. adaptive इम्यून रिस्पॉन्स शरीरात कुठेही सुरू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी एक विशिष्ट जागा जरुरीची असते आणि ती म्हणजे लिंफनोड.

adaptive इम्युनिटीमध्ये 'न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी' नावाचा एक शब्द आपण नेहमी ऐकत असतो. ह्या अँटीबॉडी काही खास अँटीजेन्सच्या विरोधात असतात. म्हणजे उदाहरणार्थ सार्स कोव्ह २ विषाणूच्या बाह्य आवरणावर एक विशिष्ट स्पाईक प्रोटीन असतं. आणि या स्पाईक प्रोटीनचा एक छोटा भाग असतो. त्याला रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (RBD) म्हणतात. मानवाला संसर्ग करण्याच्या दृष्टीने स्पाईक प्रोटीन आणि त्याचे RBD हे सगळ्यात महत्त्वाचे भाग.

या विषाणूमध्ये इतरही २५ -३० प्रोटीन्स आहेत. आपलं शरीर या सगळ्या प्रोटीन्सविरुद्ध अँटीबॉडी तयार करते. पण यातील सगळ्यात महत्त्वाचा अँटीबॉडी प्रकार म्हणजे जी अँटीबॉडी या स्पाईक प्रोटीन आणि RBDच्या विरूद्ध तयार होते ती. याचं कारण म्हणजे ती अँटीबॉडी स्पाईक प्रोटीन / RBDला कुलूप किल्ली सारखी (किंवा बॉल अँड सॉकेट) घट्ट बांधून ठेवते. त्यामुळे अशा प्रकारच्या अँटीबॉडीज शरीरात असल्या तर विषाणू ACE २ रिसेप्टरला चिकटू शकत नाही आणि त्यामुळे तो पेशीमध्ये प्रवेशच करू शकत नाही. अशा प्रकारच्या, विषाणूला पूर्ण प्रतिरोध करणाऱ्या अँटीबॉडीजना न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज म्हणतात. विषाणूच्या उर्वरित प्रोटिन्सच्या विरुद्ध तयार झालेल्या अँटीबॉडीजचा तसा कमी उपयोग असतो.

सामान्यतः अँटीबॉडी टेस्टिंग एलायझा पद्धतीने केले जाते. या पद्धतीत स्पेसिफिकली न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज तपासल्या जात नाहीत. एकंदरीत सर्वच अँटीबॉडीज मोजल्या जातात. जेव्हा लोक अशी अँटीबॉडी टेस्ट करतात आणि पॉझिटिव्ह येतात, तेव्हा त्याचा अर्थ एवढाच असतो की त्या व्यक्तीला सार्स कोव्ह २ विषाणूचे इन्फेक्शन होऊन गेले आहे. आपल्या शरीरात सुरक्षा देणारी प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे का (म्हणजेच आपल्या शरीरात न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का) हे बघण्यासाठी वेगळ्या चाचण्या करायला लागतात. त्यांना न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी टेस्ट्स म्हणतात.

न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी हा एक adaptive इम्युनिटीचा मोठा संरक्षण देणारा घटक असतो. बी पेशींच्यामुळे अँटीबॉडी तयार होतात. दुसरा भाग टी सेल्सचा असतो. विषाणूमुळे जेव्हा एखादी पेशी बाधित होते तेव्हा विषाणू मानवी पेशींचाच DNA, RNA वापरून, पेशींचीच प्रोटीन बनविणारी मशिनरी वापरून स्वतःचं पुनरुत्पादन करत असतो. अशा वेळेला त्या पेशीमध्ये खूप विषाणू तयार होऊन त्याची प्रोटीन जमा होत आहेत हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला ती प्रोटीन इतकी पेशीभर पसरलेली असतात की आपल्या शरीराला ती पेशी नष्ट करण्यावाचून गत्यंतर नसतं. म्हणजे ती विषाणूने भरलेली पूर्ण पेशीच जर नष्ट केली तरच विषाणूचा पुढचा शरीरातील प्रसार थांबविणं शक्य होतं. पेशी अशा प्रकारे नष्ट करणं याला Apoptosis या प्रकारचा पेशीमृत्यू म्हटलं जातं.

टी सेल्सचा एक प्रकार ‘किलर टी सेल्स’ नावाचा असतो. (दुसऱ्या प्रकाराला हेल्पर टी सेल म्हणतात) किलर टी सेल्समुळे इन्फेक्ट झालेल्या पेशी मारायला मदत होते. याबरोबरच आपल्या शरीरात अनेक प्रोटीन्सची मिळून कॉम्प्लिमेंट्स नावाची एक सिस्टीम असते, त्या कॉम्प्लिमेंट्सचाही या कामाकरता उपयोग होतो. अँटीबॉडी आणि कॉम्प्लिमेंट असे एकत्र आले की न्युट्रोफिल्स आणि मॅक्रोफाजेस (म्हणजे खाणाऱ्या पांढऱ्या पेशी) यांना कुठले तरी "चांगले स्वादिष्ट खाद्य आले आहे" असा सिग्नल जणू काही मिळतो. एखाद्या पार्टीकलला (म्हणजे इथे विषाणूला) अँटीबॉडी आणि कॉम्प्लिमेंट असे दोघेही चिकटलेले दिसले / जाणवले की या फ़ॅगोसाईट्स (न्युट्रोफिल्स आणि मॅक्रोफाजेस) अतिशय झपाट्याने या कणाला 'गिळून' टाकतात. एकदा या फॅगोसाईट्स पेशींच्या आत हे कण गेले की तिथे विविध प्रकारची एन्झाइम्स असतात (proteolytic, प्रोटीन डिग्रेड करणारी एन्झाइम्स) ती या कणाला, म्हणजेच विषाणूला नष्ट करून टाकतात.

Invasion of SARS-COV2
प्रतिमा स्रोत : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7303639/

सायटोकाइन्सबद्दल माहिती आपण पुढे घेणार आहोत. आपण सुरुवातीला ज्या पेशींचा उल्लेख केला - न्युट्रोफिल्स वगैरे - त्याही सायटोकाइन्स सिक्रीट / निर्माण करतात. एवढंच नाही तर हेल्पर टी पेशीही हे स्राव सोडतात. म्हणून याविषयी जास्त न बोलता मी आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळते : आपल्या प्रतिकारशक्तीच्या कुठल्या प्रतिक्रिया बाधित माणसाच्या शरीराला मदत करतात आणि कुठल्या प्रतिक्रिया घातक होऊ शकतात? इथे मी सायटोकाईन स्टॉर्मबद्दल बोलावं अशी अपेक्षा होती.

हे चित्र पाहा :

Invasion of SARS-COV2
सौम्य आणि तीव्र संसर्गात काय होते?
प्रतिमा स्रोत : J Leukoc Biol. 2020;1–25.

या चित्रात डावीकडे माणसाला झालेलं एक्सपोजर दाखवलं आहे. एका ठिकाणी कमी आणि एका ठिकाणी जास्त विषाणूचं एक्सपोजर झालं तर काय होऊ शकतं ते दाखवलं आहे. प्रत्यक्षात हे इतकं सोपं आणि ढोबळ नसतं, पण समजावून सांगायला याची मदत होते.

इथे मोनोसाईट्स आणि मॅक्रोफाजेस या पेशी दाखवल्या आहेत. त्या एकमेकींच्या चुलतबहिणी म्हणाव्यात अशा असतात. या व्यतिरिक्त न्युट्रोफिल्सचा उल्लेख आधी मी केलेला होताच. या सगळ्या सेल्स या ‘खाद्यवस्तू’ संपवण्याचं काम करत असतात. हे करत असतात त्यांना ॲक्टिव्हेशन नावाच्या एका प्रक्रियेमधून जावं लागतं. त्या पेशी जेव्हा ॲक्टिव्हेट, म्हणजे ‘जाग्या’ किंवा सक्रिय (युद्धासाठी सज्ज!) होतात तेव्हा त्या काही प्रकारची सायटोकाइन्स 'सोडतात'. यात मुख्यत्वे आय एल ६, टीएनएफ अल्फा, आयएलवनबीटा ही सायटोकाइन्स सोडली जातात. कमी व्हायरल कण शरीरात आले तर माणसाला मोठा आजार व्हायची शक्यता कमी असते. जास्त व्हायरल कण आले तर मोठा आजार किंवा जास्त गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त. व्हायरल कण कमी येवोत किंवा जास्त, तरीही ही सायटोकाईन्स सीक्रीट केलीच जातात. यांच्यातली 'दाहकारक' सायटोकाइन्स आहेत ती म्हणजे आय एल ६, आय एल १ बीटा आणि टीएनएफ अल्फा. ही अतिशय महत्त्वाची सायटोकाइन्स आहेत. आणि ज्यांना 'दाहनाशक' सायटोकाइन्स म्हणता येईल, ती म्हणजे आय एल ४ आणि आय एल १०. (आय एल म्हणजे इंटरल्युकिन)

मॅक्रोफाज पेशींतून ही सगळी सायटोकाइन्स स्रवतात. मुद्दा असा लक्षात घ्यायला पाहिजे की यावेळचा सार्स कोव्ह २ विषाणू पूर्ण मानव प्रजातीसाठीच नवा होता. माणसात त्याने आत्तापर्यंत कधी इन्फेक्शन केलंच नव्हतं. त्यामुळे या आकृतीमध्ये सुरुवातीची प्रतिक्रिया आपण बघत आहोत ती, म्हणजे सायटोकाईन स्टॉर्म (कधी कधी / अनेकदा) पहिल्या तीन-चार दिवसांतच सुरू होतं, तोपर्यंत adaptive इम्यून सिस्टीमचा रिस्पॉन्स नसतो, अँटीबॉडीजही तयार नसतात, आणि विषाणू स्पेसिफिक टी सेल्सही तयार नसतात. त्यामुळे बहुतेक सगळ्यात मोठी समस्या निर्माण होते ती इनेट म्हणजे नैसर्गिक प्रतिकारशक्तीच्या वर-खाली होण्यामुळे (म्हणजे गरजेपेक्षा जास्त किंवा गरजेपुरताच प्रतिसाद यामुळे) होते.

पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना मी एक गोष्ट सांगायला विसरले : विषाणू जेव्हा पेशींमध्ये प्रवेश करतो तेव्हा अनेक सिग्नल्स शरीरभर पसरतात.(‘घुसखोर आलाय हो!!!!!’ सांगणारे सिग्नल्स) त्यातल्या एका सिग्नलमुळे एक रसायन तयार होतं - त्याला टाईप वन इंटरफेरॉन म्हणतात. हे रसायन अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीचे विषाणूचे लोड (संख्या) कमी करण्यात टाईप वन इंटरफेरॉनचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होतो. अर्थात टाईप वन इंटरफेरॉनमुळे काही सायटोकाईन स्टॉर्म होत नाही. वास्तवात, टाईप वन इंटरफेरॉन ज्या लोकांमध्ये कमी असतो (जनुकीय कारणांनी किंवा इतर काही कारणांनी) त्यांच्यात विषाणूचं प्राथमिक / सुरुवातीचं लोड अगदी कमी असेल तरीही सायटोकाईन स्टॉर्म होण्याची शक्यता खूप असते / वाढते. कारण विषाणूचं लोड कमी करण्याचा पहिला प्रयत्न असतो तोच फार कमी प्रमाणात होतो. जेव्हा सौम्य आजार / संसर्ग झालेला असतो तेव्हा आयसोलेशन, सपोर्टिव्ह केअर या गोष्टी आपण ऐकत आहोतच. तेव्हा जी प्रतिकारशक्ती कामाला येते त्याच्यात हा inflammatory आणि anti-inflammatory (दाहकारक आणि दाहनाशक) प्रतिसाद यांचं संतुलन चांगलं असतं, ज्यामुळे बाधित व्यक्तीची रिकव्हरी चांगली होते. तीव्र आजारात यांचं संतुलन साफ बिघडलेलं असतं. त्यामुळे सायटोकाईन स्टॉर्म असं ज्याला म्हणतात ते दिसतं. ते काय असतं, तर विषाणू हा धोका आहे असं शरीराला समजतंच.

कधीकधी संशोधक शरीराच्या या धोका ओळखण्याच्या गुणधर्माचा ‘फसवा’ उपयोग करून घेतात. तुरटीचे (alum) कण असतात. तेसुद्धा धोकादायक आहेत असं आपली रोगप्रतिकारशक्ती समजते. आणि त्याविरोधात फळी उभी करते. विषाणू काय, जिवाणू काय, हे कणच असतात. तो धोका ओळखण्याची पहिली पायरी असते ते कण सापडणं. तीव्र आजारात विषाणूचा अनुमापनांक (titer किंवा विषाणूंचं प्रमाण) जास्त असल्यामुळे एका वेळेला अनेक पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश होत असतो. तेव्हा Type I interferon जरी स्रवत असलं तरी ते पुरेसं पडत नाही, याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे ज्या पेशींत विषाणू शिरला आहे, त्या पेशींचा मृत्यू apoptosis प्रकारानं न होता, necrosis पद्धतीनं होतो.

या नेक्रोसिसमध्ये पेशी फुटतात. आतलं सगळं द्रव्य आजूबाजूच्या भागात पसरतं. अपोटोसिस होताना पेशीचं आवरणही तसंच राहतं, पूर्णच्या पूर्ण पेशीचं आकुंचन होतं. त्यात दाहकारक शक्यता कमी असते. या विषाणूच्या संदर्भात जेव्हा दाहकारक गोष्टी घडतात त्यात फक्त सायटोकाईन स्टॉर्म होतं असं नाही, तर पेशींच्या नेक्रोटिक मृत्यूमुळे दाहकारक सायटोकाईन्सना आणखी बढावा मिळतो, तो मोठ्या प्रमाणावर स्रवतो. आता जे सायटोकाईन स्टॉर्म आपण ऐकत आहोत ते फक्त सार्स-कोव्ह-२ म्हणजे या नव्या करोना विषाणूच्या संदर्भात. पण ते फक्त तेवढंच मर्यादित नाही, ते इतरही रोगांच्या संदर्भात सापडतं, उदाहरणार्थ, बरीच लहान मुलं सेप्टिक शॉकमध्ये जातात. ते एका प्रकारचं सायटोकाईन स्टॉर्म आणि त्याचा परिणामच असतो. त्याची कार्यकारणमीमांसा करणं कठीण आहे, पण जिवाणूच्या संसर्गानंतर भलत्या दिशेनं रुग्णांची अधोगती होताना दिसते, ती यामुळेच. या विषाणूचं नाव SARS - Severe Acute Respiratory Syndrome असं ठेवलेलं आहे, त्याचं कारण हे सायटोकाईन स्टॉर्म घडवण्याची त्याची प्रवृत्ती.

सध्याच्या करोना विषाणूच्या आधी आलेला सार्स, आणि मर्स (Middle East Respiratory Syndrome) या दोन्हींतही हे दिसलं. सार्स-कोव्ह-२ आणि कोव्हिडच्या रुग्ण आणि बळींची संख्याच एवढी जास्त आहे त्यामुळे सायटोकाईन स्टॉर्म हा शब्द त्याच विषाणूच्या संदर्भात प्रसिद्ध झालेला आहे.

प्रश्न : दाहकारक प्रतिक्रियेला कसा आवर घातला जातो? त्याचा दीर्घकालीन धोका काय असतो?

उत्तर : दाहकारक प्रक्रियेला आवर कसा घातला जातो, या प्रश्नाचं स्वरूप मी वाढवते. केवळ एकाच स्टीरॉईडचा उल्लेख केला होता, काही प्रमाणात रोगप्रतिकारकशक्तीसंदर्भात जी औषधं आहेत, त्यांबद्दल मी बोलते. व्हेंटिलेटर आणि किती ऑक्सिजन द्यायचा यांबद्दल मी काही बोलू शकत नाही. तो माझा विषय नाही. ज्या काही निरनिराळ्या उपाययोजना आहे त्यांचा आढावा मी घेते.

एकूण असं लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही विषाणूच्या संक्रमण, संसर्गाला सहज विषाणूविरोधी (antiviral) असे उपचार उपलब्ध नाहीत. जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गांसाठी अँटीबायोटिक खाता येतात. ती घ्यावीत का नाही, हा निराळा प्रश्न. पण ती उपलब्ध असतात. तितक्या सहज, आणि प्रमाणात विषाणूविरोधी औषधं उपलब्ध नाहीत. त्याची कारणं बरीच आहेत.

उपलब्ध विषाणूविरोधी औषधांचा उपयोग कुठे होतो? तर विषाणू जेव्हा पेशींमध्ये शिरलेला असतो आणि त्यांचा आकडा (titer) कमी असतो, त्या वेळेस विषाणूविरोधी औषधांचा काही प्रमाणात उपयोग होतो. काही लोकांना विषाणूंमुळे फोड (viral blisters) झाले की अगदी ताबडतोब, लाल वण येताना, पुरळ आलं तर आलं नाही तर नाही अशी परिस्थिती असताना एसायक्लोव्हिर वापरलं तर ते पुरळ बसून जातं. पण तेव्हा विषाणूचं प्रमाण खूप कमी असतं. लक्षणं नसणारा संसर्ग असेल (asymptomatic) तर त्यांच्यावर उपचार कसे करणार? त्यामुळे सध्याच्या विषाणूविरोधी उपचारांवर खूप मर्यादा आहेत.

समजा मी विमानातून आले, आणि माझ्या शेजारच्या व्यक्तीच्या चाचणीत दुसऱ्या दिवशी करोना सापडला तर मग मला २४ तासांपूर्वीच exposure झालंय हे समजू शकतं. हा सुरुवातीचा incubation period असताना, विशेषतः लक्षणं नसतील तर आपण औषधं घेऊ शकतो. पण लक्षणं दिसेस्तोवर विषाणूची संख्या (titer) एवढी जास्त झालेली असते की औषधं देऊन ते कमी करणं कठीण असतं.

आता हा विषाणू तसा वर्षभर जुना झाला, पण वर्षभरापूर्वी जेव्हा तो हातपाय पसरायला लागला होता, तेव्हा नवी औषधं शोधणं शक्यच नव्हतं. तेव्हा इतर कुठल्या रोगासाठी, संसर्गासाठी, कामासाठी जी काही औषधं उपलब्ध होती, वापरात होती, तिचा या लागणीवर उपयोग होईल का असा विचार सुरू झाला. तो शहाणपणाचा विचार होता. त्यातूनच आपण काही धडे शिकलो, काही फायदेशीर गोष्टी मिळाल्या.

पहिली गोष्ट, क्लिनिकल ट्रायल केल्या जातात तेव्हा माझ्यासारखी माणसं म्हणतात, चांगल्या प्रतीच्या, कल नसलेल्या (unbiased) चाचण्या कराव्यात. त्यातून मिळणारी विदा (data) ग्राह्य मानावी. पुढे ती खोटी पडणार नाही, असं नाही. पण हातात काही विदा नसताना उगाच काही सांगू नये. हायड्रोक्सिक्लोरोक्विनचं उदाहरण घ्या. ते असंच विषाणूविरोधात वापरलं (म्हणजे इन व्हिट्रो, किंवा टिशू कल्चरमध्ये केलेल्या, नियंत्रित परिस्थितीतल्या प्रयोगांत) तेव्हा थोडासा विषाणूवाढीवर उपयुक्त परिणाम दिसला. मग धडाधडा लोक ते घ्यायला लागले. मुळात हे औषध मलेरियासाठी वापरतात. मलेरिया विषाणूजन्य आजार नाही. अशी औषधं उसळीसारखी खायची का? वर्षभर चालली आहे ही महासाथ, तर वर्षभर खाणार का? मग क्लिनिकल ट्रायल्सचे निकाल हातात आल्यावर नाईलाजानं का होईना, जगभरात बऱ्याच ठिकाणी हे औषध खाऊ नका असं म्हणत आहेत.

आपल्याकडे राजकारणी, डॉक्टर, पेशंट, सगळ्यांनी ते खायचा चंग बांधला होता. त्याचा फायदा काय, तोटा काय याचा काही नेमच नाही. कारण त्यासाठी मोजणी करायला हवी पण त्याची पद्धतच नाही आपल्याकडे!

काही औषधांची क्लिनिकल ट्रायलसुद्धा होत नाही. वनस्पतीजन्य (herbal) किंवा आयुर्वेदिक औषधं वगैरेंच्या जाहिराती हल्ली येत असतात. आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी. अशा गोष्टींनी कुणाचीही रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. महामारीच्या संकटात या आयुर्वेदिक आणि जडीबूटी विकणाऱ्या‌ लोकांनी स्वतःचा फायदा करून घेतला. विषाणूविरोधी प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. किंवा ठरावीक प्रतिपिंडं (antibodies) असतील तर तो रोग आटोक्यात आणता येऊ शकतो. पण ‘हे खा रे’ आणि ‘ते पी रे’, किंवा जलनेती किंवा काहीही असो; कुठल्याही प्रकारच्या चाचण्या न करता या गोष्टी सुरू आहेत. ही राजकीय टीका समजू नका; कारण या गोष्टींना शास्त्रीय आधार नाही. म्हणून मी हे मुद्दाम सांगत्ये.

या थोतांड आणि अशास्त्रीय गोष्टींची तळी राजकारणी, मंत्री वगैरे लोकांनीही उचलून धरली होती.

आता कुठल्या औषधांच्या चाचण्या झाल्या आहेत, कशाचा उपयोग होतो, हे सांगते. पहिलं Type I interferon. याचा उल्लेख मी मगाशीही केलाच. चीनमध्ये हे इंजेक्शनच्या स्वरूपात वापरलं. ते कर्करोगासाठी वापरलं जातं. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर, प्रत्येक व्यक्तीला देण्याइतकं ते सहज उपलब्ध नाही. शिवाय त्याचे अनपेक्षित आणि नकोसे परिणामही दिसू शकतात. संसर्गाच्या अगदी सुरुवातीला लक्षात आलं तर ते वापरणं शहाणपणाचं होतं. त्याचा अनेकांना फायदाही झालेला आहे. विषाणूचं प्रमाण फार वाढलं, किंवा सायटोकाईन स्टॉर्म सुरू झालं की या इंटरफेरॉनचा काहीही उपयोग नसतो.

दुसरं म्हणजे रेमडेसिव्हिर. हे उपयुक्त आहे पण स्वतंत्ररीत्या त्याचा उपयोग नाही. त्याच्यासोबत आणखी काही उपचार करावे लागतात, विशेषतः रुग्णाची गंभीर परिस्थिती असेल तर. त्याचा थोडाफार फायदा होतो. पुन्हा एकदा, रेमडेसिव्हिर कुणाला संसर्ग झाल्याझाल्या देता आलं तर त्याचा फायदा जास्त होण्याची शक्यता आहे. पण संसर्ग झाल्याझाल्या अशी औषधं देणं व्यवहार्य नाही. संसर्ग कधी झाला, हे नक्की कसं ठरवणार?

तिसरं प्रेडनिसलोन. त्याच्या चाचणीचे निकाल येण्याआधीच हे कॉमन औषध आहे, दाहनाशक म्हणून वापरलं जातं. भारतीय डॉक्टर आधीच नियमितपणे हे औषध वापरत होतेच. अगदी टोकाच्या आजारी लोकांत, जिथे रुग्ण २१ दिवस हॉस्पिटलमध्ये राहत असे, तिथे प्रेडनिसलोनच्या वापरामुळे १४ दिवसांत रुग्णाला हॉस्पिटलांतून घरी सोडता येत होतं.

सायटोकाईन स्टॉर्मसाठी आणखी एक गोष्ट वापरतात - अँटीसायटोकिन अँटीबॉडीज - प्रतिपिंडं. व्यापारीरीत्या उपलब्ध असणारी ही प्रतिपिंडं वापरली तर सायटोकाईन निष्प्रभ (neutralise) होतात. सगळ्या सायटोकाईनच्या विरोधातल्या सगळ्या प्रतिपिंडांचं मिश्रण करून कुणी वापरत नाहीत. प्रतिपिंडं महागही असतात. उपलब्ध नसतात. पुरवठा पुरेसा नसतो.

आणखी एक प्रकार म्हणजे सायटोकाईनचे वेगवेगळ्या पेशींवर रिसेप्टर असतात. त्या रिसेप्टरवर सायटोकाईन बसतं. तर मग एक तर सायटोकाईन ब्लॉक करा, किंवा रिसेप्टर ब्लॉक करा असे दोन पर्याय असतात. त्यांतला एक परिचयाचा आणि व्यापारी प्रमाणात उपलब्ध असलेला म्हणजे ॲनाकिन्रा (Anakinra); ते IL-1 receptor antagonist मानलं जातं. त्यामुळे पेशींचा सायटोकाईन स्टॉर्मपासून बचाव होतो.

आणखी एक - प्लाझ्मा थेरपी. ती वादग्रस्त गोष्ट आहे, आणि जुनी आहे. Immunologist असा शब्दही वापरात नव्हता, तेव्हा लोकांच्या असं लक्षात आलं की रक्ताच्या द्रवभागात असा कुठलासा रासायनिक घटक असतो, तो दिला तर रोग्याला संरक्षण मिळतं. तो घटक म्हणजे प्रतिपिंडं, पण तो शब्दही तेव्हा नव्हता. शास्त्र पुढे गेलं तेव्हा प्रतिपिंडं वगैरे तपशील समजले. आता सार्स-कोव्ह-२च्या विरोधातली प्रतिपिंडं असतील तर त्यामुळे सालमोनेलापासून संरक्षण मिळणार नाही, हेही पुढे समजलं. प्लाझ्मा थेरपीबद्दल म्हणलं तर, कोव्हिड झालेल्या लोकांच्या रक्तात ते बरे झाल्यावर साधारण १ ते २ महिन्यांत ही कोव्हिडची प्रतिपिंडं असतील. आणि मग कोव्हिडच्या रुग्णांना तो प्लाझ्मा दिल्यावर त्यांच्या शरीरातलं विषाणू वाढण्याचं प्रमाण कमी होईल.

तर्क म्हणून हे चुकीचं नाही. ते कधी द्यायचं हा प्रश्न आहे. ती प्रतिपिंडं विषाणूविरोधी असतात. अनेकदा सायटोकाईन स्टॉर्म येतं, तेव्हा विषाणूचं प्रमाण जास्त असेलही, पण विषाणूंचा आकडा कमी झाला तरीसुद्धा शरीराच्या प्रतिकारशक्तीचा प्रतिकूल परिणाम खूप जास्त असतो. मग त्या प्लाझ्माचा काही उपयोग नसतो. हे एक. म्हणजे प्लाझ्मा थेरपी जरी द्यायची झाली तरी ती संसर्ग झाल्याझाल्या लगेच द्यावी लागेल. आता काहीच उपाय चालत नाहीत, अशी हताश परिस्थिती आलेली असते तेव्हा काहीही करा, प्लाझ्मा द्या असं वाटणं साहजिक आहे; पण कशाकशासाठी लोकांनी धावाधावी करायची? विशेषतः व्हेंटिलेटरची गरज असेल तर जरूरच हॉस्पिटलमध्ये जागा मिळण्यासाठी धावाधावी करा. पण प्लाझ्मा गोळा करण्यासाठी जिवाचं रान करण्याला काही अर्थ आहे असं वाटत नाही.

सुरुवातीला मी सांगितलं की सार्स-कोव्ह-२च्या सगळ्या प्रथिनांसाठी आपलं शरीर प्रतिपिंडं तयार करतं. रोग होऊ नये म्हणून कुठलं प्रतिपिंड महत्त्वाचं आहे, तर विषाणूच्या स्पाईक प्रोटीनला निष्प्रभ करणारं. Receptor binding domain च्या विरोधात काम करतात ती. सगळ्या प्रकारच्या प्रतिपिंडांत यांची किती टक्केवारी असते? नगण्य. जर प्लाझ्मा द्यायचा असेल तर ती विशिष्ट प्रतिपिंडं किती प्रमाणात आहेत, याची तपासणी करावी. समजा १०० एकक दिली तर फायदा होतो असा कुठे पुरावा असेल तर ते करणं शहाणपणाचं आहे. सध्या बऱ्या झालेल्या लोकांचा प्लाझ्मा गोळा करताना ही मोजमापं घेतलीच जात नाहीयेत.

का एवढे कष्ट घ्यायचे, आणि त्याचा नक्की कितपत फायदा होतो, हे मोजलं पाहिजे. समजा एखाद्या व्यक्तीकडे ५०० एकक एवढं प्रमाण असेल तर तोच प्लाझ्मा पाच रुग्णांना देता येईल. कुणाकडे फक्त ५ एकक असतील, तर किती प्लाझ्मा काढणार! तर चाचण्या करून, किती एकक वगैरे यांची मोजमापं करेस्तोवर खात्री येत नाही. या सगळ्या चाचण्या अपयशी ठरल्या आहेत. अगदी थोडा, किंचित फरक पडला तर पडला, नाही तर नाही असं ते दिसत आहे. त्याचं कारण ही तांत्रिक मोजमापं कुठेही नीटपणे वापरली गेली नाही. भारतात तर सोडाच, परदेशातही नाही.

पुन्हा अशी काही महासाथ आली तर ही प्लाझ्मा थेरपी पुन्हा डोकं वर काढेल. ती किती उपयोगाची आहे, हे शोधण्यासाठी पद्धतशीर प्रयोग केले पाहिजेत. सध्याच्या चाचण्या निरुपयोगी आहेत.

आणखी एक वादग्रस्त दावा आहे. BCG vaccine. तुम्ही किती याबद्दल ऐकलं आहे माहीत नाही. आपल्यापैकी अनेकांनी ही लस घेतली नसेल. मी जरा वयस्कर गटातली असल्यामुळे मला लहानपणी ही लस दिलेली नव्हती. पुढे मी टीबीवर काम करायला लागले तेव्हा ती लस घेतली. ही लस घेतल्यामुळे आता सार्स कोव्ह २ विरोधात खूपच फायदा होतो, असा एक दावा होता. त्यासाठी trained immunity नावाचा एक शब्द immunologyमध्ये फॅशनेबल झाला आहे. नैसर्गिकरीत्या काम करणाऱ्या न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफाजेसचा उल्लेख मगाशी केला होता. माझा विश्वास असा आहे की त्या पेशी कशाही बरोबर काम करतात - म्हणजे प्रतिपिंडांवर जशी मर्यादा आहे, तशी यांच्यावर नाही. जपानी एन्सिफिलेटिसच्या निराळ्या, सार्स-कोव्ह-२च्या निराळ्या असं त्यांचं नाही. जर बीसीजीची लस दिली, तर न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफाजेस नवं युद्ध खेळायला तयार होतील आणि त्याचा फायदा सार्स-कोव्ह २शी प्रतिकार करण्यासाठी होईल असं त्यामागचं तत्त्व आहे. पण हा विषय अद्याप वादग्रस्त आहे. सिरम संस्थेनं यावर चाचण्या केल्याचं मला माहीत आहे, पण त्यांचे निकाल, विदा अजून प्रकाशित केली आहे का, हेही मला माहीत नाही.

याही बाबतीत एक वादग्रस्त मुद्दा येतो, बीसीजी हे जिवंत जिवाणू असतात. अशी लस आपण घेतो तेव्हा दाहकारक गोष्टी आपण शरीरात घातलेल्या असतात. त्याचा परिणाम सात-आठ आठवडे सुरू राहतो. कधी कधी परिणाम अतिदाहकारक पातळीलाही जाऊ शकतो; या उपचारामुळेही सायटोकाईन स्टॉर्म येऊ शकतं. याबद्दल अगदी जेमतेम परस्परसंबंध असणारा, associative data आहे तो परदेशातला. पण त्यांनी बीसीजी घेतलेली नसते. बीसीजीची लस आधी घेतली असेल तर तिच्या बूस्टर डोसमुळे काय परिणाम होतो, हाही एक मुद्दा. या संदर्भात बरेच प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं नाहीत.

सार्स-कोव्ह-२साठी बीसीजीची लस कशाला मग? ॲस्ट्राझेनेका-सिरमचीच लस घ्यावी की! त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेच. तोच प्रकार चांगला असं मला वाटतं.

आणखी कशाकशाचं रूपांतर सायटोकाईन स्टॉर्ममध्ये होऊ शकतं, तर आयसीयूमध्ये काही गोष्टी घडतात. ते माझ्या आकलनाच्या बाहेर आहे. त्याबद्दल मी बोलणार नाही.

हे सगळेच उपचार काही दिवसांपासून काही आठवड्यांपर्यंत चालतात. आणि असा दीर्घ काळ उपचार चालणार असेल, तर त्याचे काही मोठे साईड इफेक्ट असू शकतात. जसे रेमडेसिव्हिरचे आहेत काही; पण सर सलामत तो पगडी पचास. जगण्यासाठी जे काही करावं लागतं ते करावं.

प्रश्न : दीर्घ कोव्हिडची निरीक्षणं जास्त पाश्चिमात्य देशांतली आहेत. धाप लागणं, नैराश्य (depression), रक्ताच्या गुठळ्यांमुळे हार्ट अटॅक, मूत्रपिंडाला इजा होणं असे प्रकार दिसत आहेत. कोव्हिड होऊन गेलेल्या खेळाडूंना एक वर्षभर खेळात भाग घेता येत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?

Invasion of SARS-COV2
कोव्हिड-१९चे दूरगामी परिणाम
प्रतिमा स्रोत : DOI: 10.21203/rs.3.rs-266574/v1

उत्तर : वरचं चित्र पाहा. या चित्रात तुम्हाला दिसेल की दीर्घ कोव्हिडमध्ये किती प्रकारचे त्रास होतात. ८०%पेक्षा जास्त लोकांना एक किंवा जास्त लक्षणं दिसतात. दीर्घ कोव्हिडबद्दल आपण बोलत आहोत कारण तो खूप अंगाशी आलेला आहे.

तुम्ही चिकनगुनियाबद्दल ऐकलं असेल. त्यातही अनेक लोकांना अचानक सांधेदुखी, वेदना होतात. हे किती तरी महिने चालतं. मुख्य प्रश्नाकडे वळू. Immunological responseमुळे काही घडतं का. या संदर्भात प्रश्नच जास्त आणि उत्तरं जवळजवळ नाहीतच.

गंभीर कोव्हिड झालेल्या लोकांनाच दीर्घ कोव्हिड होतो असंही नाही. त्यामुळे आता मी जे कारण देणार आहे, तेच खरं यामागचं कारण असेल असं नाही. समजा कोव्हिडमध्ये सायटोकाईन स्टॉर्म झालं, दाहकारक आणि दाहनाशक गोष्टींचा समतोल साधला नाही, त्यामुळे खूप inflammation झालं, सायटोकाईन शरीरात फिरत राहिलं तर त्याचेही परिणाम होतात. मगाशी मी नेक्रोसिस असा शब्द वापरला - विषाणूमुळे शरीरातल्या पेशी मेल्या आणि मरताना फुटून मेल्या. तर इन्फ्लमेशनमुळे पेशींचा अशा प्रकारानं नाश होतो, आणि autoimmune reponses येतात. ही गोष्ट इम्युनॉलॉजीमध्ये माहितीची आहे. विषाणूच्या संसर्गाचा एक मोठा एपिसोड झाला, तर जास्त पेशी मरणार. म्हणजे जास्त पेशींमधली प्रथिनं बाहेर येणार. त्यांच्या विरोधात आपल्याच टी आणि बी पेशी काम करतात. Self-reactive T-cell, self-reactive B-cell, म्हणजे आपल्याच शरीराविरोधात काम करणाऱ्या पेशी तयार होतात. या तयार झाल्या, तयार होत राहिल्या की त्याचे परिणाम दिसत राहतात. दीर्घकालीन कोव्हिडमध्ये असं काही होत असण्याची शक्यता आहे. विषाणूंचा डोस जास्त आहे, किंवा मुळात माणसाची तब्येत फार चांगली नाहीये, अशा वेळेस कोव्हिड झाला तर हे होण्याची सांख्यिकी शक्यता वाढते.

सध्या दिसतंय असं की कोव्हिड फार तीव्र स्वरूपाचा नसला, सौम्य असला तरीही दीर्घकालीन कोव्हिड दिसत आहे. मग नक्की काय घडतं, याची पुरेशी माहिती आपल्याला आहे असं मला वाटत नाही.

पेशींचा मृत्यू हा एक प्रकार. नेक्रॉसिस आणि अपोटोसिस यांचाही समतोल ढळतो, आणि मग दीर्घ कोव्हिड होऊ शकतो. जी न्यूरॉलॉजिकल लक्षणं आहेत, डोकेदुखी ते नैराश्य-विस्मरण असे चिकार प्रकार आहेत. त्याचं तार्किक कारण सध्या देता येणार नाही. दीर्घ कोव्हिडची कक्षा किती मोठी आहे, हेही अजून आपल्याला समजत आहे. आशेची बाब अशी की आता भारतातसुद्धा दीर्घ कोव्हिडचा पाठपुरावा करण्यासाठी क्लिनिक सुरू झालेली आहेत. म्हणून भारतात किती लोकांना हा दीर्घ कोव्हिड होतो, याची सांगोवांगी नाही, याचा अंदाज नाही. म्हणजे RT-PCRमध्ये विषाणू दिसत नाहीये, हॉस्पिटलातून सोडलंय, पण दीर्घ कोव्हिड आहे, असे लोक आहेत.

भारतातल्या माणसांना इतर अनेक संसर्ग होत राहतात. त्यामुळे भारतीयांवर दीर्घ कोव्हिडचा परिणाम अधिक जास्त प्रमाणात होतो, का कमी प्रमाणात होतो, माहीत नाही. याचंही दस्तावेजीकरण करण्याची गरज आहे. भारतीय सरकार विदा गोळा करत नाही (हे मी केवळ आजच्या सरकारविषयी म्हणत नाही; पूर्वीपासून हे असंच आहे.), संसर्गशास्त्र या विषयावर विश्वास नसल्यासारखे आपण विदा गोळा करत नाही. तरीही धोरण आखताना (पब्लिक पॉलिसी) अशा विदेचाच वापर करायचा असतो, पण आपल्याकडे मुळात तीच उपलब्ध नसते. दीर्घ कोव्हिडच्या बाबतीतही हेच. भारतात याची फार चर्चा होतच नाही, कारण यात सनसनाटी नाही. सनसनाटी नसेल तर आपण चर्चा करत नाही.

कोव्हिडबद्दल एकंदरच आकलन कमी आणि प्रश्न जास्त आहेत.

प्रश्न : रेमडेसिव्हिरच्या दोन मोठ्या चाचण्या झाल्या आहेत; त्यातली एक डबल ब्लाईंड आहे. त्यात दिसलं की रेमडेसिव्हिरमुळे मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही, पण तीव्र आजारात हॉस्पिटलात राहण्याचा काळ ३ दिवसांनी कमी होतो. विषाणूविरोधक एवढ्या उशिरा देऊनही नक्की काय फरक पडत असावा?

उत्तर : त्यातला मुद्दा हाच आहे की इतक्या उशिरा का? साधारणपणे असं माहीत आहे की संसर्ग झाल्यापासून ४ आठवड्यांमध्ये माणसं RTPCR निगेटिव्ह होतात. याचा अर्थ तोपर्यंत विषाणू कमीजास्त प्रमाणात शरीरात शिल्लक असतोच. असा अभ्यास झाला आहे का, की ज्या वेळी या लोकांना रेमडेसिव्हिर दिलं होतं त्या वेळी ते लोक RTPCR पॉझिटिव्ह होते का आणि त्याची CT value त्यावेळी किती होती? अशा प्रकारचा अभ्यास केला तर रुग्णांचे कोणते सबसेट रेमडेसिव्हिर द्यायला योग्य आहेत हेही कळेल. परंतु इतका सखोल अभ्यास कुणी केला आहे असं मला वाटत नाही. जेव्हा व्हायरल लोड संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात खूप जास्त नसेल तेव्हा हे उपयोगी ठरेल. तसंच मी प्लाझ्मा थेरपीचंही म्हटलं. म्हणजे लोकं डेस्परेटली त्याचा वापर करतात. माझा याला आक्षेप नाही पण याला पुरेसा शास्त्रीय पुरावा नाही याचा मला त्रास होतो.

डॉ. विनय कुलकर्णी : आताच्या गाइडलाईन्स वेगळ्या आहेत. त्यानुसार रेमडेसिव्हिर बरंच लवकर वापरलं जातं. लॅब रिपोर्ट्स वाईट असतानाही.

डॉ. निशिगंधा नाईक : कोणतीही लक्षणं नसताना काही रुग्ण कित्येक आठवडे पॉझिटिव्ह दिसत राहतात. याविषयी काय सांगाल?

उत्तर : काही विषाणू हे कॅरियर स्टेटला पोचू शकतात. उदाहरणार्थ हिपॅटायटिस Bची कॅरियर स्टेट तर प्रसिद्ध आहे. म्हणून रक्तदान करताना याची चाचणी नेहमी केली जाते. अशा कॅरियर स्टेटमधे त्या माणसांना आजार होत नाही, परंतु ते विषाणूचे वाहक असतात. म्हणूनच त्यांना आपण कॅरियर म्हणतो. सार्स कॉव्ह २विषयी आपल्याला अजूनही खूप कमी माहिती आहे. म्हणजे आता अशी माणसं, जी अँटीजेन पॉझिटिव्ह राहत आहेत ती लाँग कोविडचीही रोगी न होता निरोगी राहून कॅरियर स्टेटला जातील की आणखीन काही होईल याचा अंदाज आपल्याला नाही. यासाठी डेटाच गोळा करायला पाहिजे. आणि जेव्हा हे कळेल तेव्हा आपल्याला शहाणपणा येईल.

डॉ विनायक जोशी : रेमडेसिव्हिरविषयी - RTPCR पॉझीटिव्ह आणि CT value कमी असेल तर अशा वेळी, म्हणजे संसर्ग झाल्यावर लवकरात लवकर रेमडेसिव्हिर वापरून रुग्णाला उपयोग होतो असा प्रत्यक्ष उपचार करणाऱ्या डॉक्टर्सचा अनुभव आहे.

डॉ बाळ : तुमचा अनुभव मी मान्यच करीन, कारण मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर नाहीये. पण जर असे सदसद्विवेकबुद्धी वापरणारे डॉक्टर्स असतील, तर ते आणखी मोठ्या प्रमाणावर असण्याचीही गरज आहे. आणि असा शास्त्राधार वापरून जर त्यांनी ट्रीटमेंट दिली असेल तर त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात याचं म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको, पण तरीही आपल्याला वाटतंय.

डॉ जोशी : माझा स्वानुभव सांगतो. मला लाँग कोव्हिडचा त्रास झाला, प्रत्यक्ष सौम्य आजाराची लक्षणंही न दिसता. माझं रोगनिदान इतर सर्व शक्यता एकेक करत नाकारत नाकारत झालं. केवळ अँटिबॉडीज दिसत होत्या म्हणून त्याचं निदान पोस्ट-कोव्हिड सिंड्रोम असं केलं गेलं. म्हणजे माझ्याच पॅथॉलॉजी लॅबमध्ये मी क्वांटिटेटिव्ह ॲसे केला आणि पुण्यातील लॅबला पाठवून तो कन्फर्म केला.

प्रश्न : मगाशी आपण डेटाबद्दल बोललो. डॉ विनय कुलकर्णी हे कोरिलेशन देऊ शकतील का? रेमडेसिव्हिर कुठल्या पेशंट्सना दिलं गेलं होतं आणि तेव्हा ते पेशंट्स RTPCR पॉझिटिव्ह होते आणि CT value किती होती इत्यादी? दीनानाथमध्ये मोठया संख्येने पेशंट्स ॲडमिट होते. तिथला डेटा सर्च करता येऊ शकेल का डॉ. कुलकर्णी?

डॉ विनय कुलकर्णी : डेटा सर्च नक्कीच करता येईल. रेमडेसिव्हिर पूर्वी उशिरा वापरलं जायचं. पण आज अनुभवातून असं झालेलं आहे की कोणताही पेशंट, वृद्ध, कोमॉर्बिडिटीज असलेला, (आणि पीसीआर CT व्हॅल्यूजवर विसंबून न राहता, कारण त्या स्वॉबच्या CT व्हॅल्यूज असतात आणि स्वॉब कसा घेतला त्यावर अवलंबून असतात. हाय व्हायरल लोड असतानादेखील जर वरच्यावर स्वॉब घेतला तर CT value जास्त येऊ शकते. म्हणून आपण HRCT ची CT value घेतली) तर अशा रुग्णांमध्ये काही एक कोरिलेशन दिसतं.

म्हणजे छातीच्या CT स्कॅनमध्ये खूप जास्त inflammation दिसतं आहे (१५हून जास्त), जास्त वय आहे, कोमॉर्बिडिटीज आहेत, CRP लेव्हल्स जास्त आहेत, D Dimer व्हॅल्यूज वाढत आहेत तर मग पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी जर रेमडेसिव्हिर दिलं, ताप तीन दिवस येतो आहे, तर अशातले ७० -८० टक्के लोक अतिशय लवकर रिकव्हर होतात. आणि त्यांना कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. आधी रेमडेसिव्हिर फार उशिरा दिलं जाई. आता रेमडेसिव्हिर देण्याचे निकष जास्त व्यापक आणि तुलनेने अचूक आहेत. अगदी तीन दिवस ताप आहे, पॉझिटिव्ह आहे त्याला डायबेटीस आहे तरी त्याला लगेच रेमडेसिव्हिर सुरु केलं जातं.

डॉ बाळ : तुमच्याकडे असा डेटा असेल तर मेड अर्काइव्हकडे तो देणे जरुरी आहे. त्याचा उपयोग होतो पुढे लोकांना.

डॉ कुलकर्णी : हीच पद्धत अनेक हॉस्पिटल्समध्ये वापरली जाते. आता हे पब्लिश का होत नाही हे मला माहीत नाही. कारण मी काही (कोविड संदर्भात) ट्रीटमेंट देणारा डॉक्टर नाही. पण मी हे त्यांना जरूर विचारेन.

डॉ. बाळ : स्वॉबवर अवलंबून राहता येत नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे लाळेतून सॅम्पल घ्यायचं. याची टेस्ट विकसित करण्यासाठी सरकारनेही काही मदत देऊ केली होती परंतु ते अजून पुरेसं प्रकाशात आलेलं नाही. थुंकी / लाळ यावर आधारित RTPCR टेस्ट अजून उपलब्ध नाही.

भूषण पानसे : जानेवारी महिन्यात तुमची एक मुलाखत ‘हिंदू’मध्ये प्रकाशित झाली होती. त्या मुलाखतीत तुम्ही काही कडक शब्द वापरले होते. कोव्हॅक्सिन अप्रूव्हल संदर्भात. तुमचे शब्द असे आहेत : “The justification provided (by the government) is lame. [...] The sanctity of due process is violated.” आणि त्याबद्दल तुम्ही सरकारची तीव्र निर्भर्त्सना केली होती. आता कोव्हॅक्सिनचा क्लिनिकल ट्रायल मोड काढून टाकलाय. तर आता तीन-साडेतीन महिन्याने तुमचं काही वेगळं मत आहे का आधीचंच मत आहे ?

उत्तर : तेव्हा जे केलं त्याविषयी तेव्हा जे मत होतं, ते आजही आहे आणि मी ते दोन्ही प्रकाराने सांगते. माझा आक्षेप हा प्रोसेस डावलल्याला होता. ज्या वेळी त्याला क्लिनिकल ट्रायल फेज मध्ये अप्रूव्हल दिलं त्यावेळी भारत बायोटेककडे त्यांच्या लसीमुळे विषाणूपासून संरक्षण मिळतं असा पुरावा अजिबात नव्हता. फुल स्टॉप!!!

आणि म्हणून कुठल्या आधारावर लशीला मान्यता द्यायची? तर आमचा पूर्वेतिहास असा आहे म्हणून आम्ही हे करणार आहोत. म्हणजे “आम्ही जुन्या काळात हे इतकं छान सिद्ध केलं आहे ना त्यामुळे आमची ही लसदेखील नीट काम करेल.” त्यात ICMRने त्या लशीची सुरुवात केलेली असल्याने त्याला एक राष्ट्रवादी रंग होता. आणि सरकारनेच जे काही नियम केले आहेत, म्हणजे सरकारने स्वतःच केलेले नियम स्वतःच धाब्यावर बसवून अशा परवानग्या देणं - म्हणजे तुम्ही सगळ्याच प्रोसेसची धूळधाण उडविताय ना? मग उद्या आणखीन कुणीतरी काहीतरी केलं तर काय? म्हणजे कुठली तरी वनौषधी, त्याला इम्युनिटी बूस्टर म्हणून सरकारी संस्थेने मान्यता देणे वगैरे - म्हणजे अहो हे काय चाललंय? म्हणजे आपण शास्त्राधार मानतो की नाही मानत? याविषयी प्रश्न विचारायला पाहिजेत. ही झाली धोरणविषयक, म्हणजे पब्लिक पॉलिसीच्या संदर्भातली कडक टीका. आणि ती टीका मी आजही करेन.

मात्र आजच्या परिस्थितीत फरक एवढाच आहे की जानेवारीपासून मार्चपर्यंत त्यांना क्लिनिकल ट्रायल मोड म्हणून इमर्जन्सी वापराच्या परवानगीचा अधिकचा क्लॉज होता तो आता काढून टाकलाय. तो किती केसेसच्या आधारावर काढून टाकलाय याची तुम्हाला कल्पना आहे का? ३५-४० असा काहीतरी छोटा आकडा आहे.. जगभर इतर ज्या ज्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी मिळाली आहे त्यांनी भराभरा क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेतल्यानंतर कोव्हिड झालेल्या दीडशे-दोनशे व्यक्तींकडून डेटा गोळा केला - त्यांना इन्फेक्शन झालं का? त्यांचा आजार गंभीर झाला का? ते मेले का? इत्यादी आणि त्यात दोन ग्रुप्स पाडले. एकात प्लासिबो दिलेले आणि एकात लस दिलेले. प्लासिबो असलेल्यांमध्ये केसेस खूप जास्त होत्या आणि लसीकरण केलेल्यांमध्ये खूप कमी होत्या. त्यावरनं मग एफिकसीचे ९५ वगैरे असे जादुई आकडे त्यांनी काढले. पण असे आकडे काढताना तुमच्याकडे जर ३५च केसेस असतील तर तुमची योग्य निष्कर्ष काढण्याची संख्याशास्त्रीय शक्यता (statistical probability) किती चुकीची असू शकते? उत्तर आहे खूप चुकीची असते. तर अजूनही हा डेटा इतक्या पुळकवणी प्रकारातला आहे आणि सगळे निष्कर्ष इंटेरिमच असतील कारण क्लिनिकल ट्रायल्सचा एन्ड पॉईंट (सर्व लसींचा - ॲस्ट्राझेनेका, फायझर, भारत बायोटेक, अशा सगळ्या सगळ्या लशींचा) हा सगळ्या व्हॉलेंटियर्सना लस किंवा प्लासिबो दिल्यानंतर एक वर्ष फॉलोअप करायचा असतो. अजून एक वर्ष झालंच नाहीये. त्यामुळे कुठल्याही लसीचा अंतिम रिपोर्ट येणं इतक्यात शक्यच नाही. त्यामुळे तोपर्यंत सर्व इमर्जन्सी वापराच्या परवानगीवर सुरू आहे.

प्रतिकारशक्तीची ‘मेमरी’ लस घेतल्यानंतर एक वर्ष तरी टिकावी अशी अपेक्षा असतेच ना? नाहीतर आपण काय दर दोन महिन्यांनी लस टोचून घ्यायला जाणारोत का? आत्ताच आपल्या आरोग्यव्यवस्थेची जी तारांबळ उडतेय ती दिसते आहे. अशी वेळ आली (दर दोन महिन्यांनी टोचण्याची) तर काय होईल? इथे दोन डोस देता देता आपली आता दमछाक होतीय. याबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की (कोरोना लसीकरणापोटी) सार्वत्रिक बाल लसीकरणावर प्रचंड ताण पडला आहे. तो मागे टाकला जातोय. TBच्या केसेस वाढत आहेत, त्याकडे दुर्लक्ष होतंय. आपल्याकडे या सर्व गोष्टी सुरळीत होतील इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

माझा आक्षेपाचा दुसरा मुद्दा तांत्रिक आहे. जरी छोट्या आकड्यांच्या आधारावर इमर्जन्सी अप्रूव्हल दिलं असलं तरीही कोव्हॅक्सिन काम करेल. हे मला माहीत आहे. कारण या प्रकारची vaccines काम करतात. हे vaccine काम का करणार नाही? जेवढी पूर्वीची inactivated किंवा attenuated vaccines काम करतात तेवढीच हीही काम करतील.

कोव्हॅक्सिन बाबतीत माझा आक्षेप एवढाच आहे : नियम सरकारनी केला आणि सरकारनीच मोडला याला आक्षेप आहे. उद्या मला कुणी विचारलं की तुम्ही हे vaccine घ्याल का? मी इम्युनॉलॉजिस्ट आहे. मी नक्की घेईन ते vaccine. हे vaccine काम करेल का, किंवा त्याचे साईड इफेक्ट्स, याची चिंता मला तेव्हाही नव्हती, आताही नाही. पण डेटा तेव्हाही नव्हता, आणि तो आजही नाही, हा मोठा प्रश्न आहे. पण हळूहळू जसजसा डेटा आता तयार होतोय आणि बाहेर येतोय त्यात कळेलच की कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, स्पुतनिक ५ मध्ये फारच थोडा फरक असेल. त्यामुळे आता मी जोरकस तक्रार करणार नाही.

पण सरकार नियम करतं आणि सरकारच नियम मोडतं हेही मी विसरणार नाही. कारण हाही मुद्दा महत्वाचा आहे.

क्लिनिकल रिसर्च मोड ही संकल्पनाच विनोदी ठरवली गेली आहे इथे. तुम्ही जर कोव्हॅक्सिनचा कन्सेंट फॉर्म बघितलात तर अजून डोक्यावर हात मारून घ्याल. हा कन्सेंट फॉर्म सरकारनी द्यायला हवा होता, कारण क्लिनिकल ट्रायल मोडमध्ये इमर्जन्सी अप्रूव्हल देण्याचा अधिकार फक्त सरकारकडे आहे. असं असताना भारत बायोटेक हा कन्सेंट फॉर्म कसा भरून घेऊ शकतं? हे सगळं चूक आहे. किती लोकांचा हा कन्सेंट फॉर्म घेतला हेही माहीत नाही. असो.

मिलिंद पदकी : महासाथीच्या काळात, जेव्हा लाखो लोक त्याची शिकार होताहेत आणि मरताहेत आणि इतर अनेक वाईट गोष्टी चालू आहेत, उदाहरणार्थ अर्थव्यवस्था धोक्यात आहे, लोकांचे रोजगार बुडत आहेत वगैरे, अशा काळात आपण क्लिनिकल ट्रायलमध्ये असा प्रत्येक छोट्याछोट्या गोष्टीचा आग्रह धरायलाच पाहिजे का? या लसी काम करणार आहेत असं आपल्याला माहीत असेल तर आपण फेज ३ ट्रायलचा इतका आग्रह सद्यस्थितीत धरणे योग्य आहे का?

उत्तर : माझ्या मते कोव्हॅक्सिनच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात ते लॉजिक एका परीने मान्य करण्यासारखं आहे म्हणजे नोव्हाव्हॅक्स आणि कोव्हॅक्सिन बाबतीत हे ठीक आहे. पण तुम्ही mRNA आणि DNA लसीला एक लॉजिक (कारण त्या तंत्रानाचा वापर प्रथमच होतो आहे) आणि या दोन्ही लशींना दुसरं लॉजिक (कारण ते तंत्रज्ञान ज्ञात आहे) असं करणार का? हा प्रॉब्लेम आहे.

डॉ फडके : आपल्याकडे औषधांच्या बाबतीतही खूप विचित्र काही चालू आहे. मला वाटतं की कुठलंही अँटिव्हायरल औषध आजाराच्या पहिल्या टप्प्यात, लवकरात लवकर द्यायला पाहिजे. न देण्याची दोन कारणं असू शकतात, एक म्हणजे किंमत आणि दुसरं म्हणजे साईड इफेक्ट्स. त्यामुळे मला हे कळलं नाही की रेमडेसिव्हिरच्या सर्वात जास्त ट्रायल्स झाल्या त्या इतक्या उशिरा का केल्या गेल्या? आता अनेक डॉक्टर्स सांगतात की आम्हाला वाटतं रेमडेसिव्हिर काम करतं. हे सुरुवातीच्या काळात ठीक होतं पण आता, एक वर्षांनंतरही याबद्दल डेटा का नसावा? आणि ती सॉलिडॅरिटी ट्रायल, तीही इतकी का उशीरा केली गेली? तीच केस हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची.

मिलिंद पदकी : रेमडेसिव्हिरबद्दल अमेरिकेत असा विचित्र प्रकार झाला की हे औषध अमेरिकेत प्रचंड महाग होतं, म्हणजे ५००० डॉलरला ट्रीटमेंट पडत होती आणि सुरुवातीला उपलब्धता अत्यंत कमी होती. मागे वळून बघता त्यात आता एक मूर्ख वाटेल असा प्रकार केला गेला की उपलब्धता तोकडी असल्यामुळे औषधं फक्त सीरियस पेशंट्सच्या करिता राखीव ठेवण्यात आली. थोडक्यात आजार खूप बळावल्यानंतर हे औषध वापरलं गेलं. डॉ फडकेंच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. सुरुवातीच्या काळात ते वापरलं गेलं नाही कारण ते तितके सिरीयस वाटलं नाही आणि नंतर जेव्हा विषाणू मारण्याची वेळ टळून गेली होती आणि सायटोकाईन स्टॉर्म सुरू झालं होतं, त्या काळात रेमडेसिव्हिरचा फारसा उपयोग होणारच नव्हता!!

डॉ बाळ : बरोबर आहे, यात काही मुद्द्यांची भर घालते. क्लिनिकल ट्रायलच्या संदर्भामध्ये, ज्या वेळेला एखादं नवं औषध उपलब्ध होतं, आणि ते जेव्हा प्रायोगिक पातळीवर असतं, जसं रेमडेसिव्हिर हे सार्स कोविड २ च्या संदर्भात होतं (म्हणजे याच्या उपयुक्ततेचा अजून कुठलाही पुरावा नव्हता) अशा वेळी नैतिकतेचा मुद्दा म्हणून, ज्या माणसांना, आता काही दुसरा उपाय नाही अशांवर प्रथम क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या जाव्यात असा संकेत आहे. आता हा नैतिकतेचा मुद्दा आहे आणि याच्याविषयी वादावादी करता येत नाही. पण तुम्हाला हे माहीत असेल की उदाहरणार्थ आजाराच्या अगदी अंतिम टप्प्यावरच्या कॅन्सर रुग्णांच्या बाबतीत, म्हणजे किमोथेरपीचा उपयोग नाही, रेडिओथेरपीचा उपयोग नाही, सर्जरीच्या पलीकडे गेलेला आहे अशी परिस्थिती आली की नवीन नवीन औषधांच्या चाचण्या त्यांच्यावर केल्या जातात. म्हणजे पेशंटला साईड इफेक्टस नाहीत, सोसतं आहे, आणि कदाचित थोडा उपयोग आहे असं जेव्हा कळतं तेव्हा हे औषध इतरांवर वापरायला हरकत नाही असा निष्कर्ष काढला जातो. विषाणूविरोधी औषध सुरुवातीला द्यायला पाहिजे हे तिथे निर्णय घेणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं का? सांगता येत नाही. एकंदरीतच (या महासाथीच्या काळात) अशा चाचण्यांसंबंधी निर्णय घेण्याची जबाबदारी असणाऱ्या लोकांनी खूप काही चांगलं काम केलं आहे असं वाटत नाही.

डॉ फडके : हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या चाचण्यांबद्दल काय मत आहे?

उत्तर : याचा निर्णय कुणी घेतला हे मला माहीत नाही. आणि याबाबदल अंतस्थ बातमी मला काही नाही. ही ट्रायल कुणी डिझाईन केली आणि कुणी सांगितली हे कसं सांगणार? आंतरराष्ट्रीय पातळीवरची सॉलिडॅरिटी प्रकारची ट्रायल होती ना ती. पण त्या ट्रायलची वाट न बघता धडाधड आधी मोठा डोस, मग छोटा डोस, तीन डोस, सात डोस, मग रोज घ्या वगैरे असे वाट्टेल ते खेळ केले गेले.

डॉ विनय कुलकर्णी : याच्यामध्ये एक ऐतिहासिक भाग आहे : सर्वच औषधांच्या बाबतीत सुरुवातीला मोठ्यात मोठा सुरक्षित असलेला डोस देण्याची पद्धत त्यांच्याकडे (पश्चिमेत) आहे. म्हणजे सुरुवातीला मॅक्सिमम टॉलरेबल डोस आपण वापरून बघायचा. परिस्थिती इतकी डेस्परेट होती की वाटेल त्या औषधांची चाचणी करून बघितली गेली. डेस्परेट टाइम्स, डेस्परेट ट्रायल्स आणि डेस्परेट मेझर्स अशी परिस्थिती या सगळ्याबाबतीत होती. हे सगळं थोडं थोडं चाचपणी करून बघून जसजसा विश्वास येईल तसतसं पुढे जात गेलं. उदाहरणार्थ सुरुवातीला रेमडेसिव्हिर दिल्यावर किडनीला प्रॉब्लेम, सिरम क्रिएटीनाईन वाढतं असं लक्षात आलं. पण आता अनेक नेफ्रोलॉजिस्ट म्हणतात, आम्ही किडनीची काळजी घेतो, तुम्ही कोविडचं बघा. यामुळेच उपचार देणाऱ्या डॉक्टर्सनी हे सगळं डॉक्युमेंट करायला पाहिजे हे महत्त्वाचं.

---
(क्रमशः)
(चर्चेत सहभाग : अबापट, मिलिंद पदकी, डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. अनंत फडके, डॉ. विनायक जोशी, डॉ. निशिगंधा नाईक, नेहा चाबुकस्वार, डॉ. शारदा बापट, रोहिणी गानू दाते, योगिनी सरंजामे, सविता गोळे, अरुंधती वाघ सराफ, संदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, भूषण पानसे, अनुपम बर्वे, मंदार कुलकर्णी)

field_vote: 
0
No votes yet

लेख इतका उत्तम आहे की त्याची लिंक मी जास्तीतजास्त लोकांना पाठवत आहे. संपूर्ण लेखातले बारकावे कळायला तो अगदी पूर्ण एकाग्रतेने वाचला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ही पोस्ट सकाळी ५:३० वाजता अगदी फ्रेश डोक्याने वाचली तरीही अजून एकदोनदा वाचल्याशिवाय पूर्ण समजणार नाही.
पण सध्या पॉझिटिव्ह असलेल्या माझ्या ओळखीतल्या अनेकांना पाठवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप सारी किचकट माहिती सोप्या शब्दात मिळाली.अतिशय सावकाश प्रतेक शब्द,वाक्य ह्याचा अर्थ समजून घेत लेख वाचला.खूप महत्वाची शास्त्रीय माहिती मिळाली.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

या प्रतिसादास 'पकाऊ' श्रेणीचे प्रयोजन समजले नाही.

(नॉट दॅट श्रेणीज़ मॅटर. आणि, वाटेल त्या प्रतिसादांना (केवळ स्वत:च्याच करमणुकीकरिता) मनाला येतील त्या श्रेण्या देणे हे जर का पाप असलेच, तर त्या पापात मी स्वत: केवळ सहभागीच नव्हे, तर अग्रणी आहे. परंतु तरीही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या कमेंट च अर्थ च बदलून जातं आहे.चालायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम मुलाखत. रोगप्रतिकार कसा होतो हे सामान्यांना समजेल अशा शब्दांत छान सांगितलं आहे. तांत्रिक माहिती ठासून भरलेली आहे तरीही जडजंबाल नाही.

विद्या बाळ, मुलाखतकर्ते, व इतकी मोठी मुलाखत टाइप करणारे, या सर्वांनाच धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विद्या बाळ, मुलाखतकर्ते, व इतकी मोठी मुलाखत टाइप करणारे, या सर्वांनाच धन्यवाद.

विद्या बाळ???

मग, मध्यंतरी वारल्या, त्या कोण?

(नशीब, आदूबाळ नाही म्हणालात!)

----------

(तुम्हाला, बायेनीचॅन्स, विद्या बालन तर म्हणायचे नव्हते ना?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी4
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकलं खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"वनस्पतीजन्य (herbal) किंवा आयुर्वेदिक औषधं वगैरेंच्या जाहिराती हल्ली येत असतात. आपल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी. अशा गोष्टींनी कुणाचीही रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. महामारीच्या संकटात या आयुर्वेदिक आणि जडीबूटी विकणाऱ्या‌ लोकांनी स्वतःचा फायदा करून घेतला. विषाणूविरोधी प्रतिकारशक्तीसाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. किंवा ठरावीक प्रतिपिंडं (antibodies) असतील तर तो रोग आटोक्यात आणता येऊ शकतो. पण ‘हे खा रे’ आणि ‘ते पी रे’, किंवा जलनेती किंवा काहीही असो; कुठल्याही प्रकारच्या चाचण्या न करता या गोष्टी सुरू आहेत. ही राजकीय टीका समजू नका; कारण या गोष्टींना शास्त्रीय आधार नाही. म्हणून मी हे मुद्दाम सांगत्ये."

या थोतांड आणि अशास्त्रीय गोष्टींची तळी राजकारणी, मंत्री वगैरे लोकांनीही उचलून धरली होती."

विचार केला होता ३० तारखेला निवृत्त झाल्यावर पुन्हा लिहिणे सुरु करावे. पण आज काही विशेष कार्य नव्हते म्हणून विचार केला पुन्हा इथे यावे.

हाच पहिला लेख वाचला. माहिती ज्ञान वाढविणारी आहे. पण आयुर्वेदावर टिप्पणी करण्याचा लेखकाचा अधिकार आहे का? बाकी तुमचे वरील विवेचन हि बिना माहिती घेता केलेले अशास्त्रीय विवेचन आहे. शास्त्रीय आधार होता म्हणून आपले स्वास्थ्य मंत्री आणि परिवहन मंत्री उपस्थित होते. बाकी आजच्या घटकेला देशातील सर्वात आधुनिक रिसर्च लब एका आयुर्वेदिक संस्थे अर्थात पतंजली जवळ आहे. आणि कोरोनील आणि औषधीच्या घटक पदार्थांवर वर झालेले त्यांचे अनुसंधान जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत. बाकी आमचे मंत्री तिथे उपस्थित होते. मी हि गेलो होतो. कॉरोनील वर झालेल्या रिसर्च पुस्तिका हि तिथे उपलब्ध. होती. बाकी आचार्य बाळकृष्णच्या लिंक वर जाऊन तुम्ही स्वत: तपासू शकता. http://www.acharyabalkrishna.com/research/?fbclid=IwAR393Qh_q86EZNI3Xrqp...

देशात अधिकांश रोगी आयुर्वेदिक उपचार आणि कोरोनील घेऊन ठीक झाले आहेत, हे आजचे सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ3

बाकी आजच्या घटकेला देशातील सर्वात आधुनिक रिसर्च लब एका आयुर्वेदिक संस्थे अर्थात पतंजली जवळ आहे.

रिसर्च लॅबवर टिप्पणी करण्याचा नेमका कोणता अधिकार तुमच्याकडे आहे ते कळवावे. नसल्यास तेही कळवावे.

(कशावरही टिप्पणी करायचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण तुमच्याच "अधिकार असेल तर टिप्पणी" नियमाप्रमाणे वरील माहिती कळवावी.)

बाकी

शास्त्रीय आधार होता म्हणून आपले स्वास्थ्य मंत्री आणि परिवहन मंत्री उपस्थित होते.

हे वाचून डोळेही भरून आले आणि बकार हसूही आलं. आयुष्यात या दोन्ही गोष्टी एकत्र व्हायचे प्रसंग फार थोडे.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कशावरही टिप्पणी करण्याचा पारंपरिक हिंदू थेरडेशाहीचा अधिकार तुम्हाला मान्य नाही काय?

#गप्पबसासंस्कृती #यापुढेहेअसेचचालायचे #IndiaToTheDogs (#कुत्र्यांचीमाफीमागून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयुर्वेदावर टिप्पणी करण्याचा लेखकाचा अधिकार आहे का?

डॉ. बाळ यांनी आयुर्वेदावर टिप्पणी केलेली नाही; बिनबुडाच्या दाव्यांवर केली आहे. नफेखोरी करणाऱ्या आणि मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या बोक्यांना त्यांनी झोडपलेलं आहे.

बाकी तुमचे वरील विवेचन हि बिना माहिती घेता केलेले अशास्त्रीय विवेचन आहे. शास्त्रीय आधार होता म्हणून आपले स्वास्थ्य मंत्री आणि परिवहन मंत्री उपस्थित होते.

हे बाबा वाक्यम् प्रमाणम् आहे. या लोकांचा "शास्त्रीय" आधार म्हणजे निवडणूक असतो, ते विज्ञान नाही.

बाकी आजच्या घटकेला देशातील सर्वात आधुनिक रिसर्च लब एका आयुर्वेदिक संस्थे अर्थात पतंजली जवळ आहे.

बरं मग? माझ्याकडे सहा इंच लांब पातं असणारी सुरी आणि चार बर्नर असणारी शेगडी आहे. म्हणून काय मी अन्नपूर्णा देवी आहे का?

आणि कोरोनील आणि औषधीच्या घटक पदार्थांवर वर झालेले त्यांचे अनुसंधान जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत.

त्याचे दुवे द्या, संदर्भ द्या. नुस्ते प्रकाशित झाले आहेत, हे थोतांड ठरतं.

बाकी आमचे मंत्री तिथे उपस्थित होते. मी हि गेलो होतो.

यातून काहीही सिद्ध होत नाही. फार तर तुमच्याकडे फार वेळ आहे, इतपत सिद्ध होईल. त्याचा इथे काहीही संबंध नाही.

कॉरोनील वर झालेल्या रिसर्च पुस्तिका हि तिथे उपलब्ध होती.

आपली लाल करणाऱ्या पुस्तिका छापण्याचे पैसे असणं म्हणजे खरंच लाल असते असं नाही. माझे केसही लाल दिसतात, कारण मी ते रंगवून काढते.

बाकी आचार्य बाळकृष्णच्या लिंक वर जाऊन तुम्ही स्वत: तपासू शकता

हे लेखन खाजगी संस्थळावर प्रकाशित केलेलं आहे. 'ऐसी अक्षरे'सारखंच. याला ऐसीवर प्रकाशित झालेल्या लेखनापेक्षा अधिक भाव का द्यावा? किंबहुना अजिबातच काही भाव का द्यावा?

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.acharyabalkrishna.com/research/?fbclid=IwAR393Qh_q86EZNI3Xrqp...
ही दिलेली लिंक उघडा. तेथे अनेक लिक्स आहेत, पहिल्याच लिंक वर क्लिक करा.आणि पहा (स्वतःच्या जबाबदारीवर) काय होते ते.
का मलाच फक्त हा अनुभव आला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रभुदेसाई सर , काय अनुभव आला तुम्हाला हे कृपया सांगाल काय ? आपल्याला काय म्हणायचे आहे हे नक्की लक्षात आले नाही. पहिला पेपर हा आचार्य बाळकृष्ण् त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर अरुणाचल प्रदेशातील एका विशिष्ट भागात जाऊन त्यांनी बऱ्याच वनस्पती कलेक्ट केल्या व हा विभाग औषधी वनस्पतींनी खूप समृद्ध आहे असा निष्कर्ष काढला आहे. ( यात संशोधन काय होते हे मज पामराच्या लक्षात आले नाही , कृपया मार्गदर्शन करा )
अर्थात लिंक क्लिक केल्यावर इफेक्ट ऑफ डायनॅमिक नीडल पंच्ड नॉन वोव्हन असं काहीतरी दिसत आहे . मला ही भालगड काय ते कळली नाही . कदाचित पटाईत काका सांगू शकतील

बाकी ज्या जर्नल मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर हा ०.२७ होता २०१८ साली. म्हणजे यावर फार भर देऊ नये पण तरीपण ... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोड्या वेळेपुरता माझा ब्राउझर हजॅॅक झाला.
मी पुन्हा साफ सफाई केल्यावर आता आलबेल आहे. मी पण ती लिंक उघडून वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक माहीती आहे. शब्द बंबाळ वाटली नाही. सोप्या शब्दात सांगीतलेली आहे.

सर्व डॉक्टरांचे आणि ऐसीअक्षरे चमूचे अभिनंदन. या कोरोना काळात ऐसीने घेतलेल्या सजगतेच्या पुढाकाराबद्दल, प्रचंड कौतुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास कौतुक करावे म्हणून लॉगिन केलं. फॉरवर्ड मधून आली आणि मुलाखत पूर्ण वाचल्याशिवाय थांबता आलं नाही.
फारच छान मुलाखत आहे. पुढील भाग वाचायला उत्सुक.

सगळं कळलं असं नाही. पण एकूणच एका ठराविक स्टेज नंतर कशाचसाठी जीव टाकून धावपळ करू नका असं घरच्यांना सांगून ठेवावं असं वाटलं. इतकी clarity असली तरी खूप होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुलाखत आवडली. फारच इंटरेस्टिंग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अतिशय उत्तम लेख. ऐसी टीमचे अभिनंदन आणि डॉ बाळ यांना धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतेक व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती वेग वेगळी असते.
एकाचं प्रकारचा व्हायरस कोणाला गंभीर आजारी करतो तर काही ना बिलकुल त्रास होत नाही.
हे रोग प्रतिकार शक्ती चे वेगळे पण कशावर अवलंबून असते.
त्याचा काही अभ्यास झाला आहे का?
त्याचे कारण गुणसूत्र,DNA असतील तर आहार,विहार,व्यायाम ह्या गोष्टी दुय्यम ठरतात.
नक्की ह्याचे उत्तर काय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विषाणू/डीएनएच असेल तर व्यायाम/आहाराला काही किंमत राहात नाही'

हे इतकं सोपं नाही. नेचर की नर्चर हा प्रश्न हे नाहीतर ते असं म्हणून सुटत नाही. शरीर घडवण्यात, आपला स्वभावाचे, गुणांचे काही कल ठरण्यात डीएनएचा हात असला तरी त्या गुणांची वाढ कशी केली जाते याने मोठा फरक पडू शकतो.

तसंच प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वेगळी असते तसंच रोगाची लागण होण्याची शक्यता, ती लागण होण्त्यायाची तीव्रती, लगेच निदान होऊन योग्य ते निदान होऊन योग्य ते औषध मिळण्याची शक्यता, तुम्हाला असलेल्या इतर व्याधी - या सगळ्यांमुळे किती मृत्यू होतील ते ठरतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक एक पॅरॅमिटर कॉन्स्टंट ठेउन, एलिमिनेट करत जावे. मग जे सार उरेल त्यातून एक्झॅक्ट फॅक्टर कळेल. पहील्यांदा पॅरॅमीटरस ब्रेन स्टॉर्म केले पाहीजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुणाचे नाव घेत नाही, पण प्रदिसात वाचताना समर्थांनी ज्यांना पढत मूर्ख म्हणले आहे, त्यांची माहिती निश्चित मिळाली. बिना वाचता आणि माहिती न घेता पटकन प्रदिसात देणे. आता लिंक दिली असूनही वाचण्याचे कष्ट करायचे नाही आणि वर म्हणायचे

"हे लेखन खाजगी संस्थळावर प्रकाशित केलेलं आहे. 'ऐसी अक्षरे'सारखंच. याला ऐसीवर प्रकाशित झालेल्या लेखनापेक्षा अधिक भाव का द्यावा? किंबहुना अजिबातच काही भाव का द्यावा?"

आत्ता लिंक उघडली असती तर कळले असते कुठे अनुसंधान प्रकाशित झाले आहे. आचार्य बाळकृष्ण आणि PRI चे नेचर सहित जागतिक दर्जाच्या मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे. उदा. एक

https://www.nature.com/articles/s41598-019-44485-9.pdf

हि mdpi मध्ये प्रकाशित झालेली लिंक
http://www.acharyabalkrishna.com/wp-content/uploads/2020/11/application_...

आता बाकी लिंक स्वत: उघडून तपासून बघा.

आयुष मंत्रालयाने औषधीचा दर्जा दिला आहे आणि 158 निर्यातीच अनुमती हि नोवेंबर मध्ये मिळाली होती.

पतंजली लब देशातील सर्वात आधुनिक आणि उन्नत लब आहे. जिथे ३०० हून जास्त scintist सहित ५०० कर्मचारी कार्य करतात. स्वत: जाऊन खात्री करू शकतात. प्रधानमंत्री मूर्ख नव्हते कि उद्घाटन करायला गेले.

पतंजलीच्या नफ्याचा ७० टक्के खर्च अनुसंधान वर होतो. अनुसंधान खर्च औषधाच्या कॉस्टिंग मध्ये धरला जात नाही. म्हणून अधिकांश औषधी अत्यंत स्वस्त असतात. अन्यथा कोरोनिल कीट हि ६०० रु च्या आत नव्हे तर दोन ते तीन हजाराला पडली असती. पतंजलीचा नफा कुणाच्या हि खिश्यात जात नाही त्यामुळे नफे खोरीचा प्रश्नच येत नाही.

प्रत्यक्ष प्रमाण हि आहे. पतंजलीच्या शाळा वैदिक गुरुकुलम, पतंजली गुरुकुलम एक हि दिवस बंद झाल्या नाही. cbsc शाळा आचार्य कुलं फक्त उन्हाळी सुट्टीत बंद होती. कुणालाही करोना झाला नाही. हरिद्वार येथे १५००० हून जास्त विभिन्न संस्थेत कार्य करतात. एक हि करोनाने दगावला नाही आहे. बाकी ज्यांना प्राणांची किमत माहित असेल ते निश्चित कोरोनील घेणे सुरु करतील आणि जिवंत राहतील.

शेवटी आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषधी आहेत. फक्त आधुनिक पद्धतीने त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तेच कार्य PRI करत आहे. पतंजलीची अधिकांश औषधी रिसर्च आधारित आहे.. रोज १००० हून जास्त वैद्य रोज ३० ००० हून जास्त रोगी निशुल्क तपासतात. त्यांचा केंद्रीकृत रिकॉर्ड ठेवला जातो. बहुतेक देशात सर्वात जास्त रोगींचा data त्यांच्या जवळ असेल. त्यामुळे त्यांचा data हि स्वत: हरिद्वारला जाऊन तपासून खात्री करू शकतात.

बाकी लेखकाच्या लेखात उल्लेख केलेली औषधी खरोखर करोना वर उपाय आहे कि लिवर किडनी खराब करून प्रतिकार शक्ती कमी करणारी आहे, यावरही चर्चा झाली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ4

पटाईत काका , नमस्कार
बऱ्याच दिवसांनी आलात , स्वागत आहे.
आपले दोन प्रतिसाद वाचले त्याबद्दल काही खुलासे करतो

१. आपण म्हणता

" शास्त्रीय आधार होता म्हणून आपले स्वास्थ्य मंत्री आणि परिवहन मंत्री उपस्थित होते."

तो समारंभ मी टीव्हीवर पाहिला . श्री रामकृष्ण यादव ( उर्फ बाबा रामदेव ) यांचा धादांत खोटे , असत्य बोलण्याचा कार्यक्रम सुरु होता. रामकृष्ण यादव यांनी तिथे असे जाहीर केले की हे औषध म्हणजे कोरोनील WHO सर्टिफाईड आहे. यानंतर काही तासातच WHO ने आम्ही अशा पद्धतीचे कुठले सर्टिफिकेट दिलेले नाही असे जाहीर केले , यानंतर बाळकृष्ण सुवेदी ( उर्फ आचार्य बाळकृष्ण ) यांनी आम्हाला असे म्हणायचे नव्हते , गैरसमज झाला , आम्हाला तसे म्हणायचे होते इत्यादी गमतीशीर खुलासे दिले
यात लाजिरवाणे दोन भाग आहेत. पहिला म्हणजे जाहीर असत्यकथन !! आणि दुसरे म्हणजे माझ्या देशाचा आरोग्यमंत्री जो शिक्षणाने डॉक्टर आहे तो या समारंभास असत्य कथन करणाऱ्या माणसाच्या मांडीला मांडी लावून बसला होता.
बहुतांश वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनेल वर हेही दाखवले . आपण हेही बघितले नाहीत का ?
तुमच्याकडे याच्या लिंक्स नाहीत का ? तसे सांगा , मी लिंक्स देईन.
तात्पर्य : कुणी मंत्री संत्री शेजारी बसला असला तरी असत्यकथनाला शास्त्रीय आधार असतो हे सिद्ध होत नाही.
आता पब्लिक, म्याटर काय होते ते सांगतो.
एका स्टेजवर आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन ( देव आतातरी याना सद्बुद्धी देवो ) याच्या शेजारी बसवून रामदेव " कोरोनील हे औषध कोरोनावर गुणकारी आहे ,हे WHO सर्टिफाइड आहे " असे धादांत खोटे बोलले . मग त्यावर WHO चे खुलासे ( कि आम्ही असलं सर्टिफिकेट दिलेले नाही ) मग बाळकृष्ण यांची सार्वासारवी इत्यादी करमणुकीचे कार्यक्रम झाल.
खरं म्याटर असे होते की WHO ने औषध निर्मिती केंद्रांकरिता GMP मानके पाळत असतील तर तसे सर्टिफिकेट त्यात्या फॅसिलिटी ला सरकारने द्यावे अशी एक स्कीम आणली होती. त्याद्वारे पतंजली च्या उत्पादन केंद्राला GMP सर्टिफिकेट दिले गेले होते. ( GMP हे औषध उद्योगाच्या दृष्टीने एक मध्यम दर्जाचे मानक आहे, फार काही विशेष नाही ) हे आपल्या सरकारने WHO च्या स्कीम खाली उत्पादन केंद्राला दिलेले सर्टिफिकेट रामदेव यांनी " औषधाला WHO ने दिलेले सर्टिफिकेट " म्हणून फडकावले होते.
औषधाचे सर्टिफिकेट वायले आणि फॅसिलिटीचे सर्टिफिकेट वायले हे भाबड्या जनतेला व रामदेव भक्तांना माहित नसल्याने असल्या लबाड्या खपून जातात . दुर्दैव म्हणायचे अजून काय ?
रामदेव यांनी अख्या १०० पेशंटवर केलेल्या तथाकथित चाचणीचे निष्कर्षही त्याच व्यासपीठावरून सांगितले.
औषध किंवा लसीच्या चाचणीत किती लोकांवर चाचण्या केल्या जातात हे आपण बघावे. मग आपण त्यावर बोलू.

२. आपण म्हणता "
बाकी आजच्या घटकेला देशातील सर्वात आधुनिक रिसर्च लब पतंजलीची आहे "

पतंजलीच्या लॅब मध्ये अत्यंत महागडी उपकरणे आहेत हे मान्य आहे. परंतु देशातील सगळ्यात आधुनिक म्हणायला आपण इतर लॅब बघितल्यात का ?
बघा , मग बोलू.

३. आपण दिलेला "
http://www.acharyabalkrishna.com/wp-content/uploads/2020/11/application_...हा पेपर वाचला . यात एका ऍनिमल ट्रायल वर माहिती दिली आहे . यानंतर केल्या जाणाऱ्या माणसांच्या वरच्या चाचण्यांचा एखादा पेपर असे तर तो कृपया द्या .

४. आपण बाळकृष्ण यांच्या संशोधन पेपर्सची एक लिंक दिली आहेत . त्यातील आपल्यामते कोरोनील बद्दल संशोधन असणारे पेपर्स कृपया द्याल का ? त्या लिंक बरेच इतरच विषयांचे पेपर आहेत .पहिला पेपर वाचला त्यातील , पण ते वेगळेच काही निघाले. असो

बाकी आपले गुरुकुल पद्धत , वगैरे इतर माहिती दिलीत त्याबद्दल आभार . परंतु त्याचा आजच्या विषयाशी संबंध नसल्याने त्याबद्दल काही लिहीत नाही .

या विषयावर काही लिंक्स माहिती करिता :
1. https://indianexpress.com/article/india/coronil-ayush-ministry-certifica...
2. https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/ima-patanjali-coron...
3. https://www.businesstoday.in/sectors/pharma/patanjali-baba-ramdev-bal-kr...
4. https://www.india.com/news/india/patanjali-issues-clarification-on-coron...
5. https://www.ndtv.com/india-news/baba-ramdev-promoted-patanjali-clarifies...
6. https://science.thewire.in/health/fact-check-patanjalis-coronil-neither-...

अजून खूप आहेत

  • ‌मार्मिक6
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

GMP = good manufacturing practices हे अत्यंत जुनाट सर्टिफिकेट आहे. त्यांत शेण जरी बनवलं तरी ते कागदावर लिहिल्याप्रमाणेच बनवलं असेल तर GMP मिळायचं! हल्ली सायन्सला (आपल्या देशांत) फार वाईट दिवस आले आहेत.

  • ‌मार्मिक6
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही ज्या वर्तमानपात्रांची क्लीप दिली आहे ते डोळे बंद करून खोटे बोलणारे आहेत. आयुष मंत्रालय आयुर्वेदिक औषधाला मान्यता देते. भारत सरकारची अजेन्सी निर्यातीसाठी औषधांना who प्रमाण पत्र देते whoचा प्रमाणपत्र देण्याशी किंवा औषधांना मान्यता देण्याची काही एक संबंध नसतो. हे सत्य त्या वर्तमान पात्रांना माहित असेल तरीही चुकीची धारणा पसरवली. बाकी मी लिंक आधी दिलेली आहे तुम्ही ती वाचली नाही त्यात माझा दोष नाही. बाकी करोनील हि एकमात्र प्रमाणित औषधी आहे आणि ह्या औषधीने लाखो लोकांचे प्राण वाचले. करोना काळाचे सत्य एकच कि आयुर्वेदाने सर्वात जास्त रुग्णांना वाचविले. दुसरी कडे तथाकथित औषधांनी करोना पेक्षा जास्त लोकांचे प्राण घेतले. १००० हून जास्त डॉक्टर हि दगावले. बाकी आजच्या घटकेला देशातील सर्वात उन्नत प्रयोगशाळा हि पतंजली जवळ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ2

जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य सुरू.

वरच्या प्रतिसादात कोव्हिड औषधोपचाराबद्दल खोटी माहिती आहे. त्यावर ‌विश्वास ठेवू नये.

जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य संपलं.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती जी मी दिलेली माहिती शंभर टक्के सत्य आहे. rti करून तपासू शकतात. बाकी एका प्रामाणिक औषधाला फेक ठरविणार्यांबाबत एकच म्हणेल ते फक्त अज्ञानी आहेत. पण त्यांच्या मूर्खपणा मुळे लाखो रोगींनी खरे औषध घेतले नाही आणि दगावले. बाकी ज्यांना जिवंत राहण्याची इच्छा आहे ते योग आणि आयुर्वेदिक औषधी घेतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ2

मी मोदीविरोधक असलो तरी मोदी सरकारने संपूर्ण कोविड काळात "कोविड केंद्रावरील उपचारात" या भोंदू माणसाची उत्पादने लोकांच्या माथी मारली नाहीत आणि आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमेपदी या उपचारपद्धतींना तेथे थारा दिला नाही याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्या मातृसंस्थेतून याबाबतीत भरपूर दबाव आला असणार आणि तरीही त्या दबावाला थोपवले याचे क्रेडिट मी श्री मोदी यांना देईन.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बाकी पटाईत काका, तुम्ही मला मूर्ख, अज्ञानी आणि काय-काय नावं ठेवायची ती ठेवा. करोनील हे करोनावरचं औषध नाही, फार तर प्लासिबो म्हणता येईल. यापुढे मला वादबिद घालायचा नाही.

ही विधानं मी 'ऐसी अक्षरे' चालवणाऱ्यांपैकी एक म्हणून केलेली नाहीत. ही विधानं मी जबाबदार नागरिक म्हणून करत आहे. मराठी बोलणारे, न बोलणारे, जगातले कुणीच कोव्हिडमुळे मरू नयेत, कुणाचेही रोजगार जाऊ नयेत, असं मला वाटतं. ते तर शक्य नाही; किमान कमीतकमी हानी व्हावी एवढी इच्छा तरी धरू शकते. त्यामुळे खोट्याला खोटं म्हणणं हे माझी जबाबदारी ठरते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्राण्यांच्या/ मानवी पेशी वापरून अथवा प्राण्यांवर केलेल्या औषधाच्या चाचण्या आणि मानवी स्वयंसेवकांवरील चाचण्या (pre -clinical and clinical trials ) यातला फरक आपण समजावून घेतला आहे का? दिलेल्या लिंक्स मध्ये (प्रथमदर्शनी तरी) एकच पेपर clinical trail वर आधारित दिसतो आणि त्याचे रिझल्ट्स सुद्धा फार उल्लेखनीय नाहीत. एखाद्या संशोधन संस्थेचं ठिकाण, आकार, तिथे काम करणाऱ्या लोकांची संख्या, संशोधनावर होणारा खर्च , तिथे येणारे रोगी इ. गोष्टींवर तिथे चालणाऱ्या संशोधनाचा दर्जा कसा ठरू शकतो, याबाबत आपल्याला ठोस माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बऱ्याच गोष्टी नवीन समजल्या. विनिता बाळ यांची मते तर झालीच पण प्रॅक्टिश्नर्सचा सहभाग विशेष उपयुक्त. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले शरीर थोर असते हे समजले. डॉ. विनिता बाळ यांचं अधिकारवाणीने केलेलं विवेचन आवडलं. लेख पुनःपुन्हा वाचावा असा आहे. 'ऐसी...' च्या सर्व टीमला धन्यवाद.

बायदवे, सध्याच्या सरकारला (आणि सरकारमागील विचारसरणीला) विज्ञानाशी काही देणेघेणे आहे असा कसलाही पुरावा नसल्याने डॉ. बाळ यांच्यासारख्यांचा सात्विक संताप म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी ठरणार हे निश्चित.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलाखत वाचतो आहे. तुर्तास पडलेले दोन प्रश्न:

1. "...इत्यादी आणि त्यात दोन ग्रुप्स पाडले. एकात प्लासिबो दिलेले आणि एकात लस दिलेले. प्लासिबो असलेल्यांमध्ये केसेस खूप जास्त होत्या आणि लसीकरण केलेल्यांमध्ये खूप कमी होत्या. त्यावरनं मग एफिकसीचे ९५ वगैरे असे जादुई आकडे त्यांनी काढले."

या कोव्हीड व्हॅक्सिन ट्रायल्समध्ये (एरवीच्या कोव्हीडपुर्व ट्रायल्सच्या तुलनेत) एफिकसी मोजायची वेगळी "जादुई" पद्धत वापरली गेली का? असेल तर का? (कदाचीत उपप्रश्न जरा किचकट होईल).

2."... लस किंवा प्लासिबो दिल्यानंतर एक वर्ष फॉलोअप करायचा असतो. अजून एक वर्ष झालंच नाहीये. "
एक वर्ष फॉलोअप करायचा असतो या मागचे शास्त्रिय कारण काय आहे? एक वर्ष हा कालावधी फक्त व्हॅक्सिन ट्रायल्ससाठीच आहे का (बहुतेक*) औषधांसाठीही कालावधी एक वर्षच असतो?
(*अक्युट आजारवर सतत (लॉंग टर्म) घेतल्या जाणार्‍या औषधांसाठीचा कालवधीही अनेक वर्षांचा असेल अर्थातच.. पण त्यांविषयी इथे प्रश्न नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

झ्या मर्यादित आकलनानुसार

१. वेगळी "जादुई" पद्धत वापरली गेली का?
नाही . ' एफिकसी ' च्या आकड्याला याला नेहमीच मर्यादित महत्व होते , आहे आणि राहील.
परंतु सध्या जगभर एफिकसी विषयी घोर अज्ञानातून वाटेल ते लिहिले छापले जात आहे. त्या अनुषंगाने " जादुई " हा शब्द उपहासाने वापरला गेला आहे .

इफिकसी नक्कीच महत्वाची आहे , पण त मर्यादित अर्थाने.
( आपण या विषयी दोन लेख लिहिले आहेत , त्यात महत्व आणि मर्यादांचा उहापोह केला आहे

https://aisiakshare.com/node/8009 आणि

https://aisiakshare.com/node/8034

२. एक वर्ष फॉलोअप करायचा असतो या मागचे शास्त्रिय कारण काय आहे?

सर्वच लसींच्या बाबतीत हा फॉलोअप असतो . औषधांच्या बाबतीत हे असते किंवा कसे याबाबतीत माहिती नाही.

याच्या मागे मूळ उद्देश लसीला आपली प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते , तो किती काळ टिकतो , कुठल्या प्रकारचा प्रतिसाद वाढत आहे ,, कमी होत आहे कुठल्या प्रकारच्या अँटीबॉडीज किती काळाने व किती प्रमाणात तयार होत आहेत , त्या किती काळ टिकत आहेत इत्यादी अनेक चाचण्या नंतर सुरु राहतात. याबरोबरच सार्वत्रिक लसीकरण झाल्यानंतर लसीच्या ' इफेक्टिव्हनेस '( एफिकसी वायली आणि हे वायले ) चाही डेटा हातात येतो .

इतर अनेक उद्दिष्टांच्या बरोबरच लॉन्ग टर्म इम्युनिटी बद्दल जास्त माहिती मिळते.

तुम्हाला याहून जास्त माहिती हवी असेल तर आपण डॉ ढेरे यांना प्रश्न पाठवून विचारुयात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


परंतु सध्या जगभर एफिकसी विषयी घोर अज्ञानातून वाटेल ते लिहिले छापले जात आहे. त्या अनुषंगाने " जादुई " हा शब्द उपहासाने वापरला गेला आहे .

मूळ प्रश्न (लेखात) हा कोव्हॅक्सिनबद्दल आहे आणी त्यादेखलच्या उत्तरात खालील परिच्छेद आहे.

जगभर इतर ज्या ज्या लसींना इमर्जन्सी वापराची परवानगी मिळाली आहे त्यांनी भराभरा क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेतल्यानंतर कोव्हिड झालेल्या दीडशे-दोनशे व्यक्तींकडून डेटा गोळा केला - त्यांना इन्फेक्शन झालं का? त्यांचा आजार गंभीर झाला का? ते मेले का? इत्यादी आणि त्यात दोन ग्रुप्स पाडले. एकात प्लासिबो दिलेले आणि एकात लस दिलेले. प्लासिबो असलेल्यांमध्ये केसेस खूप जास्त होत्या आणि लसीकरण केलेल्यांमध्ये खूप कमी होत्या. त्यावरनं मग एफिकसीचे ९५ वगैरे असे जादुई आकडे त्यांनी काढले.

यावरून जादुई आकडे काढले हे विधान सरसकट सर्व चाचण्यांबद्दल आहे असे प्रतीत होते आहे. कदाचित ते केवळ कोव्हॅक्सिनसंदर्भात असआवे. पण "घोर अज्ञानातून वाटेल ते लिहले/छापलेल्या" बद्दल नक्कीच नसावे.

सर्वच लसींच्या बाबतीत हा फॉलोअप असतो . औषधांच्या बाबतीत हे असते किंवा कसे याबाबतीत माहिती नाही.

याच्या मागे मूळ उद्देश लसीला आपली प्रतिकारशक्ती कसा प्रतिसाद देते , तो किती काळ टिकतो , कुठल्या प्रकारचा प्रतिसाद वाढत आहे ,, कमी होत आहे कुठल्या प्रकारच्या अँटीबॉडीज किती काळाने व किती प्रमाणात तयार होत आहेत , त्या किती काळ टिकत आहेत इत्यादी अनेक चाचण्या नंतर सुरु राहतात. याबरोबरच सार्वत्रिक लसीकरण झाल्यानंतर लसीच्या ' इफेक्टिव्हनेस '( एफिकसी वायली आणि हे वायले ) चाही डेटा हातात येतो .

इतर अनेक उद्दिष्टांच्या बरोबरच लॉन्ग टर्म इम्युनिटी बद्दल जास्त माहिती मिळते.

तुम्हाला याहून जास्त माहिती हवी असेल तर आपण डॉ ढेरे यांना प्रश्न पाठवून विचारुयात

हे ढोबळपणे ठीकच आहे. पण शास्त्रीय कारण काय हे विचारायचा उद्देश असा की एक वर्षच का? दोन का नाही, किंवा 6 महिने का नाहीत. कोणतेही व्हॅक्सीन असेल तरीही एकच का वगैरे? थोडक्यात "एक वर्ष झालंच नाहीए" या आक्षेपात किती दम आहे हे जाणून घेण्यात रस आहे.

जर सबळ शास्त्रीय कारण नसेल तर एक वर्ष थांबून जे काय लोक मरतील ते मरू द्यावेत का लसीला काय प्रतिसाद येतो, लॉंग टर्म इम्युनिटीबद्दल जास्त माहितीचा अभाव वगैरे रिस्क घ्यावी असा साधारण प्रश्न पुढे उभा राहतो.

तुम्हाला याहून जास्त माहिती हवी असेल तर आपण डॉ ढेरे यांना प्रश्न पाठवून विचारुयात

जरूर. पण, माझा प्रश्न विचारण्याचा मूळ उद्देश वर लेखात आलेल्या आक्षेपांबद्दल होता. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सर्व 'आयुर्वेदाचार्यांस" माझे आवाहन आहे: गुरुवर्य, हजारो भारतीय मरतायत . "वाट" कसली पहाताय ? हा सूर्य आणि हा जयद्रथ!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पण अशी संशोधनं करण्यासाठी किती प्रचंड पैसा लागतो हे तुम्हालाही माहीत असेल. त्यामागची किचकट प्रक्रिया आणि राजकीय हितसंबंध वगैरे गोष्टीसुद्धा. तेव्हा अशा राणा भीमदेवी आव्हानांमध्ये कितपत अर्थ आहे? असा आरडाओरडा एरवी लोक विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीच्या विरोधात करतात - ही कसली लस, यानं तर रोग न होण्याची खात्रीसुद्धा देता येत नाही, वगैरे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

COVID 19 हा विषाणू विचित्र का वागत आहे.
म्हणजे काही लोकांना तो बिलकुल त्रास देत नाही त्याचे शरीरात आगमन झाले तरी त्याची कोणतीच जाणीव त्या व्यक्ती ला होत नाही.
Covid positive असून सुद्धा कोणतीच लक्षण नाहीत,कोणताच त्रास नाही एवढं प्रेमळ तो वागतो जसा जूना मित्र आहे.
पण काही लोकांच्या बाबतीत मात्र जानी दुश्मन असल्या सारखा तुटून पडतो आणि सहा सात दिवसात च त्या व्यक्ती चा जगण्याचं हक्क हिरावून घेतो.
त्यावर जे स्पष्टीकण येत होते ते पण विषाणू खोटं ठरवत आहे.
ज्याची प्रतिकार शक्ती कमी आहे,वय जास्त आहे,किंवा आजारी आहेत अशी लोक corona चे बळी पडत आहेत असे ते स्पष्टीकरण.
पण तरुण , धडधाकट, लोक corona च बळी ठरतं आहेत आणि अशक्त,वय जास्त असलेली लोक corona वर मात करत आहेत किंवा त्या व्यक्ती वर विषाणू काहीच परिणाम करत नाही.
असे का घडतं आहे.ह्या मागे नक्की काय कारण असतील हे प्रश्न पडायला लागले.
आज body बिल्डर असलेला 34 वर्ष वय असलेलं तरुण corona च बळी ठरला ही बातमी ऐकून.
आणि काही लोक बघण्यात पण आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला या विषयातलं फार काही समजत नाही. आणि सध्या या विषयातले तज्ज्ञसुद्धा म्हणत आहेत की सध्या आपल्याला सार्स-कोव्ह-२ या विषाणूबद्दल फार माहिती नाही.

तरी माझे काही तर्क -
१. विषाणूचा किती डोस मिळाला यानुसार रोगाचं प्रमाण ठरत असावं. जेमतेम रोग असलेल्या माणसाशी काही मिनीटं जवळचा संपर्क येणं आणि खूप आजारी असलेली व्यक्ती आपल्या घरातलीच सदस्य असणं, ही दोन टोकाची उदाहरणं पाहा.

२. आपल्याला कोणत्या प्रकारच्या व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे, यामुळे फरक पडत असेल.

३. नेमके आपण त्याच काळात इतर काही कारणांमुळे आजारी असू आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती किंचित क्षीण झालेली असताना संसर्ग झाला.

४. प्रत्येक मनुष्याची प्रतिकारशक्ती निरनिराळी असते. तुम्ही जे उदाहरण दिलेलं आहेत, त्यांची प्रतिकारशक्ती नेमकी या विषाणूचा सामना करण्यासाठी पुरेशी तिखट नसेल, असंही होऊ शकतं. एरवी याचा काही फरकच पडला नसता; पण बरोबर हा विषाणू आल्यामुळे गरज पडली, आणि तिथे शरीर कमी पडलं.

अशा अनेक शक्यता असू शकतात. हीच कारणं असतील असं नाही; माझं म्हणणं साफ चूकही असू शकेल. पण हे सगळं समजायला वेळ लागतो. विज्ञानाच्या प्रगतीचा वेग तसा बराच कमी असतो. विशेषतः अशी महासाथ येते आणि माणसं पटापटा मरतात तेव्हा तो वेग हतबल वाटावं एवढा कमी वाटतो. पण इतर काही इलाजही नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तरुण आणि धडधाकट (बॉडीबिल्डर वगैरे) याचा अर्थ प्रतिकारशक्ती उत्तम असलीच पाहिजे असं नाही. लेखात जे प्रतिकारशक्तीचं वर्णन केलं आहे त्यात स्नायूंचा उल्लेखही नाही. त्या वेगळ्याच यंत्रणा असतात. सर्वसाधारणपणे तरुणांमध्ये या यंत्रणा मजबूत असल्या तरी एकूण एक तरुणांत तसं असेलच असं नाही.

दुसऱ्या भागात नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनचा उल्लेख आहे. तो अवश्य वाचावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0