यमांत

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

यमांत

- झंपुराव तंबुवाले

नेहमीसारखीच एक आळसावलेली दुपार. यमाचं पिवळंधमक उपरणं उन्हात चमकतंय, त्याचा पाश एका आसनावर पडलाय, शेजारी रेडोबा चरताहेत. चित्रगुप्त एक भलं मोठं पिवळसर बाड उघडून जुने हिशोब तपासतोय.

"चित्रगुप्ता, या आंग्लजांची आपल्याकडे येण्याची संख्या इतकी का वाढली?"
"देवा, हिंदुराष्ट्राच्या सध्याच्या सुबत्तेमुळे अनेक देशांचे लोक त्यांचं नशीब आजमावायला येतात. त्यांतले काही कडमडणारच ना?"
"हिंदुराष्ट्र? हा काय नवाच प्रकार?"
"राष्ट्रीयता धर्माला जोडायचं खूळ आहे हे."
"पण सगळेच हिंदू असतात ना? सर्वसमावेशक?"
"हो, आणि म्हणून तर हे आंग्लजपण इथे पोचतात."
"ठीक आहे. उघड याचं खातं."
"यांचा डेटाबेस वेगळाच ठेवला आहे. हं. ऍलेक्झांडर स्मिथी याचं नाव."
"हेवनऐवजी आपल्याकडे का पाठवलं याला?"
"तो डुकराचं मांस खायचा आणि लग्नाआधी त्याला मुलगा झाला."
"याला मुलगा?" यमाने विचारलं.
"देवा, तुम्हीपण कमाल करता. याच्या बायकोला."
"पण लग्न नव्हतं केलं ना याने?"
"तेच ते, त्याच्या सहचरीला."
"पण त्यासाठी आपल्याकडे कशाला यायला हवं याने. आपल्याकडेही गांधर्वविवाह व्हायचे. खाण्याच्यापण आवडीनिवडी वेगवेगळ्या. सर्वांना आपल्या नीती-अनीतीच्या पारड्यात तोलणं बरोबर नाही."
"तुम्ही म्हणाल ते. काय लिहू याच्या खात्यात?"
"अगदी कमी दिवस डुकराचा जन्म, मग मानवाचा जन्म आणि मग मुक्ती."

यमदेवाचं असंच अनेक दिवस सुरू होतं. त्यांच्याकडे येणाऱ्यांचा न्यायनिवाडा आधी ते हिरिरीनं करत. आता मात्र त्यांच्या पारड्यात येणाऱ्या लोकांची पापं जणू त्यांना दिसतच नव्हती. यम जास्त सेक्युलर होत चालले होते. शेवटी चित्रगुप्ताने विचारलंच.
"प्रभू, एक विचारू?"
"अं, हं, एक का, अनेक विचार."
"अभय आहे?"
"तुला कसलं भय? तू तर साक्षात मृत्युदेवतेचा उजवा हात."
"तरी पण?"
"हो, दिलं. विचार निर्भयपणे."
"इतक्यात तुमची चलबिचल वाढली आहे. पाप-पुण्याच्या तुमच्या व्याख्या बदलल्यासारख्या वाटताहेत. याचं कारण काय?"
"हं, तुझ्याही लक्षात आलं तर. लोकांमधली विविधता इतकी वाढली आहे, इतकी अंगं असतात, कंगोरे असतात, की आपली चूक तर होणार नाही ना असं वाटतं."
"चूक? तुमची? कसं शक्य आहे?"
"मांडव्य ऋषींना विसरलास का?"
"मांडव्य? सगळ्या गोष्टी डेटाबेसमध्ये ठेवायला लागल्यापासून माझ्या स्मृतीत काही राहतच नाही."
"मांडव्य ऋषींच्या आश्रमात चोरांनी काही ऐवज लपवला. ऋषीवर ध्यानस्थ होते. चोरांबरोबर ऋषींना पकडल्यावर साहजिकच त्यांनी कानावर हात ठेवला. मात्र राजाने शिक्षा म्हणून त्यांच्या शरीरात खुंटी ठोकली. जेव्हा ऋषिवरांना कळलं की लहानपणी ते केळीच्या तंतूंनी माश्या ओवायचे म्हणून मी हे घडवून आणलं होतं, तेव्हा लहानपणीच्या निरागसतेला पाप ठरवल्यामुळे ते भडकले आणि मला विदुराचा जन्म प्राप्त झाला - राजपुत्र असूनही राणीपुत्र नाही."
"आठवलं, पण तरी संदर्भ लागला नाही."
"योग्य-अयोग्याचे आपले आणि इतरांचे निकष वेगळे असू शकतात. आपण दिलेल्या शिक्षेमुळे किती अनाहूतपणे गोष्टी बदलू शकतात."
"पण आपले हात तर बांधले आहेत ना? तुम्हीच नाही का म्हणत की नियमांप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य आहे. परंपरा पाळायलाच हव्यात म्हणून?"
"हो, पण कालांतराने परंपरा बदलतात, प्रदेशाप्रमाणेपण बदलतात. ते सर्व बदल जर आपल्या नियमांमध्ये सहज सामील करू शकलो तर माझी सर्व काळजी मिटेल."

***

असेच आणखी बरेच दिवस गेले. चित्रगुप्ताला यमाची अस्वस्थता जाणवत होती. यमाचे विचार त्यालाही पटत होते पण तो काहीच करू शकत नव्हता. अशातच एक आयती संधी चालून आली.

"नारायण, नारायण", म्हणत नारद चित्रगुप्तासमोर अवतरले.
"बंधुराज, स्वागत आहे. आज इकडे कसा मोर्चा वळवला?"
"मोर्चा? तुम्हाला पडलेलं कोडं लवकरच सुटणार आहे अशी खुशखबर द्यायला मी आलो आहे."
"कोडं? कोणतं कोडं देवर्षी?"
"नारायणाप्रमाणेच आमच्यापासून काहीच लपून राहू शकत नाही. धर्मराजांची आणि तुमची चलबिचल आम्हाला जाणवली. म्हणूनच आम्ही एका खास व्यक्तीला तुमच्याकडे पाठवतो आहोत."

असे म्हणत नारदाने चित्रगुप्ताला येऊ घातलेल्या व्यक्तीच्या कार्याबद्दल अवगत करून दिलं. नारद गेल्यानंतर चित्रगुप्ताने त्या खगोलशास्त्रज्ञाबद्दलची इतरही माहिती डेटाबेसमध्ये धुंडाळली.

"देवा, आज आपल्याकडे एका खगोलशास्त्रज्ञाला पाठवलं आहे. भास्कर ब्रह्मे...", न्यायनिवाड्याला बसताबसताच चित्रगुप्ताने यमराजाला सांगितलं.
"ताऱ्यांचा अभ्यास करतात ते? इथे कशाला?", यमाने भास्करकडे पाहात विचारलं.
"रात्री-बेरात्री लोकांची झोप तो अनेक वर्षे उडवायचा."
"अं? खगोलशास्त्रज्ञच रात्री जागतात ना?"
"धर्मराज, जग बदललं आहे. यांच्या दुर्बिणी आता स्वयंचलित असतात. माहिती संगणकांवर आपोआप गोळा होते."
"हा न जागता इतरांना कसा उठवायचा?", यमाचे प्रश्न संपत नव्हते.
"याने संगणकाचा एक प्रोग्राम लिहिला होता जेणेकरून तेजस्विता बदलणारे स्रोत नव्या निरीक्षणांमधून शोधले जात. असं काही नवीन सापडलं की ज्या लोकांना अशी माहिती हवी असे त्यांना त्याबद्दल तो प्रोग्राम झोपेतून उठवत असे."
"जरा समजेल अशा भाषेत सांगणार?"
"देवा, रात्री-बेरात्री जागत राहण्याऐवजी केवळ काही महत्त्वाचं सापडलं तरच अनेक खगोलशास्त्रज्ञांना आणि खगोलप्रेमींना उठवलं जाई."
"त्या लोकांना हवंच होतं ना ते? मग त्यांना वेळेवर कळवणं हे तर ते पुण्यकर्मच झालं."
"देवा, पण त्या खगोलप्रेमींच्या बायकांचं/नवऱ्यांचं आणि पोरांचं काय? त्यांची पण झोप मोडायची ना?"
"हं. काय करायचं मग याचं? अंटार्क्टिकात जन्म?"
"नाही देवा. तुम्हाला - आपल्याला - याचा उपयोग होऊ शकेल."
"याचा उपयोग? तो कसा?", यम सरसावून बसला.
"खगोलशास्त्रज्ञांचे डेटाबेस खूप मोठे आहेत, आपल्याही डेटाबेसपेक्षा मोठे. यांचे प्रोग्रामिंग स्किल्सपण त्याला साजेसे. सापडणाऱ्या सगळ्या अवकाशीय स्रोतांमध्ये यांना स्वारस्य नसे. त्यामुळे हे त्या स्रोतांबद्दलची दैनंदिन निरीक्षणं, तसंच खूप आधीपासून साठलेली माहिती एकत्र करून त्यांची जणू पत्रिकाच मांडत - पण हे सगळं संगणकांमार्फत आणि पूर्णपणे स्वयंचलित."
हे ऐकताना यमराजाचे डोळे लुकलुकत होते.
"आणि?"
"त्या कुंडलीनुसार ते ठरवतात की आज महागडी दुर्बीण कोणत्या स्रोतांकडे वळवायची ते. काही कृष्णविवरं, काही श्वेतबटू, काही दीर्घिका वगैरे वगैरे. सगळ्यांसाठीचे निकष भिन्न. कोट्यवधींची उलाढाल पण मर्यादित वेळेमुळे निवडणार वेचक स्रोतच. नीट तोलून-मापून. खगोलशास्त्राची यांच्यामुळे खूप प्रगती झाली."
"वा. याला तर स्वर्गातच पाठवायला हवे. लिही."
"देवा, थांबा. याला इथेच नाही का ठेवता येणार?"
"इथे? याने जरी काही लोकांची झोप उडवली तरी एकूण काम चांगलंच केलं की!", धर्मराज म्हणाले.
"हीच ती वेळ आहे. कोट्यवधींचं भलं करायचं असेल तर याची मदत घेता येईल."
"याची? ती कशी?"
"तुम्हीच नाही का म्हणत की योग्य-अयोग्य काय हे ठरवणं कर्मकठीण आहे म्हणून? 'नेचर'प्रमाणेच 'नर्चर'वरून ते ठरवावं लागतं आणि येवढ्या कालावधीनंतर सगळं लक्षात घेता घेता नाकी नऊ येतात."
"नाही तर काय. मंदिर किंवा मशीद पाडल्यावर तिथे चर्च बनलं आणि तिथे प्रसाद म्हणून चर्च बनल्यानंतर जन्मलेल्या ख्रिस्ती लोकांनी मांस खाल्लं तर ते पाप आहे की नाही?" यमाची बदलणाऱ्या पाप-पुण्यांची यादी तयारच होती.
"हा आपल्याला अशाच प्रश्नांमधून सोडवू शकेल."
"पण कसा?"
"याच्याकडून प्रोग्राम लिहून घ्यायचा - पाप-पुण्याचा, स्वयंचलित. नाहीतरी आपल्याकडे डेटाबेस आहेच. डेटाबेस, आणि नियम येवढी एकच यांची गरज असते."
"पण प्रोग्रामकडून चूक झाली तर?"
"सखोल टेस्टिंग करायचं म्हणजे नाही होणार. तसंही अधूनमधून चमत्कार होत असतातच ना? एखादी चूक म्हणजे चमत्कारच. पण आता ती चूकही आपली नसेल."
"उत्तम, अतिउत्तम.", यम हसत म्हणाला.
"एक मिनिट!", हे सगळं आतापर्यंत शांतपणे ऐकत असलेला भास्कर यमाला मध्येच थांबवत म्हणाला.
"काय?", चित्रगुप्ताने विचारलं.
"चुका दोन प्रकारच्या असतात - खोटे होकार आणि खोटे नकार."
"हा काय प्रकार आहे?"
"एखादी अयोग्य व्यक्ती - म्हणजे तुमच्या व्यवहारी भाषेत दर आठवड्याला मंदिरात जाणारी, पण व्यवहारात लोकांची पिळवणूक करणारी - स्वर्गात पोचली तर तो खोटा होकार, आणि तेच जर मानवतेसाठी झुंजणारी पण देवळात प्रवेशही न करणारी व्यक्ती नरकात गेली तर तो खोटा नकार."
"त्याची चिंता नको. अशा चुका होत नाहीत. पृथ्वीवर समजतात त्याप्रमाणे इथला कारभार नाही. दिखाव्यासाठी एक आणि प्रत्यक्षात वेगळंच वर्तन असलेल्यांना स्वर्गात स्थान नाही. स्वर्गात सर्वांच्या भल्यासाठी झटणाऱ्या आणि 'बोले तैसा सन्मार्गी चाले' अशा चार्वाकपंथीयांचापण भरणा आहे. नियमांच्या सर्व याद्या तुला देण्याचं काम आमचं. तुझ्या संगणकाला ते नियम नीट समजावयाचं काम तुझं."
"होय, मला येवढंच म्हणायचं आहे की टेस्टिंगबरोबर ट्युनिंगपण करावं लागेल."
"तथास्तु.", यम म्हणाला.

"प्रोग्रामचं नाव काय ठेवायचं?", इति भास्कर.
"प्रोग्रामचं नाव?", चित्रगुप्ताने विचारलं.
"हो तर. प्रत्येक प्रोग्रामला एक नाव लागतं."
हे ऐकून यम म्हणाला, "हं, पाप-पुण्याचा हा विचार करणार आणि पुढे होणाऱ्या गोष्टी आपसूक लक्षात घेणार म्हणून याला आपण पापुद्र म्हणूया."
"पापुद्र?"
"हो, पापुद्र - पाप-पुण्य द्रष्टा."
"ठीक आहे," म्हणत भास्करने पापुद्रचे आडाखे बांधायला मनात सुरुवात केली. त्याआधी प्रोग्राम झाल्यावर स्वर्ग प्राप्त होईल याची त्याने हमी मिळवली आणि तोपर्यंत देखील स्वर्गसुख.
"आणि लक्षात ठेव! नियम कळला नाही तर विचारायचं. काही खूप गंजलेले नियम आहेत, गरज पडल्यास त्यांच्यात सुधारणा पण करू. कुठेही चूक होता कामा नये. कालांतराने बदलणाऱ्या पाप-पुण्याच्या कोष्टकांचापण त्यात योग्य वापर व्हायला हवा." यमाने त्याला बजावलं.
"देवा, नियम बदलायचे?" चित्रगुप्ताने विचारलं.
"काळानुरूप सूक्ष्म बदल व्हायलाच हवेत. त्याचबद्दल नाही का हा खटाटोप?"

खगोलशास्त्राने परिपक्व केलेले अल्गोरिदम्स वापरून पुढचे अनेक दिवस भास्करने एखाद्या मूर्तिकाराच्या एकाग्रतेने यमनियम 'पापुद्र'मध्ये रूपांतरित केले. मधून-मधून बॅकअप घेत; इथे हे सबरुटीन बदल, तिथे त्या नियमांची आयात कर, वगैरे अनेक सोपस्कार. अनेक खगोलशास्त्रज्ञांप्रमाणे त्यालाही प्रोग्रामिंगमध्ये स्वारस्य होतं. शिकण्याच्या मिषाने चित्रगुप्ताने बराच काळ त्याच्याबरोबर घालवला. नारद पण दोन-चारदा हजेरी लावून गेला. यमराज मात्र तटस्थपणे दूरच होते. चित्रगुप्ताने कामापासूनच्या सुटकेनंतरची सुट्टी कशी घालवायची याचा विचार सुरू केला. यम त्याहीबद्दल काही बोलायला तयार नव्हता.

नारदाच्या अशाच एका भेटीदरम्यान भास्करने विचारलं, "महर्षी, यमराज असे या सर्व गोष्टींपासून अलिप्त का वाटतात? त्यांच्यामुळे मी हा प्रोग्राम तयार करतो आहे आणि तरीपण ते दूरच राहतात."
"वत्सा, धर्मराजाला अशी भीती आहे की या प्रोग्रामकडून चूक होवो वा न होवो, हा प्रोग्राम लिहून घेणे हीच कदाचित एक चूक असू शकेल आणि त्याची शिक्षा त्यांना दिली जाईल."
"शिक्षा? कोणती शिक्षा?"
"कदाचित मानवजन्म."
"मानवजन्म? ती शिक्षा कशी? कितीतरी मनाजोग्या गोष्टी पृथ्वीवर करता येतात. चित्रगुप्त सुट्टीचे बोलत होता ती पृथ्वीवरच ना?"
"एकदा अलौकिक गोष्टींची सवय झाली की पृथ्वीवर मन लागणं कठीण होतं. जर त्यांना शिक्षा झालीच तर त्यांचं जीवन सुकर नसणार. त्यांना हवं ते करता तर येणार नाहीच, पण कदाचित साध्या गोष्टींमध्ये पण विचित्र अडथळे येतील."
"चांगल्या-वाईटाचा कल्पना सापेक्ष असतात हेच खरं. असो. आपण आपलं आवडतं प्रोग्रामिंग करावं."
"नारायण, नारायण."

बघता बघता 'पापुद्र' तयार झाला. आता मात्र यमाने अनेक वेगवेगळे प्रसंग समोर ठेवून पापुद्रचे कसून टेस्टिंग आणि ट्युनिंग करून घेतलं. पापुद्र कार्यरत करण्याच्या वेळी यम आणि चित्रगुप्त संगणकाजवळ उभे होते, तर भास्कर एखाद्या पाश्चात्त्य संगीतसभेच्या कंडक्टरसारखा काही अंतरावर. यम एंटरचं बटन दाबणार इतक्यातच "नारायण, नारायण" घोष करत नारद अवतीर्ण झाला.

या क्षणाची वाटच पहात असल्याप्रमाणे यम हात पटकन मागे घेत म्हणाला, "या राजर्षी. बरोब्बर वेळेवर आलात. तुम्हीच दाबा ही कळ."
"नाही धर्मराज, तो मान तुमचाच. 'पापुद्र' सुरू झाल्यावर तो कसा काम करतो हे मी पाहणार." एका हाताने चिपळ्या वाजवत आणि दुसरा हात रेड्याच्या पाठीवरून फिरवत नारद म्हणाला.
नारद असं म्हणल्यावर यमाचा नाईलाज झाला. त्याने एंटर दाबताच चार गोष्टी झाल्या. (१) जाणवेल न जाणवेल इतपत घरघर आवाज करत पाप-पुण्याची खाती सांभाळणारा 'पापुद्र' कार्यरत झाला, (२) भास्कर स्वर्गात टेलिपोर्ट झाला, (३) यम आणि चित्रगुप्त गायब झाले, आणि (४) काहीच न झाल्याप्रमाणे नारदाने रेड्यासमोर चारा टाकला आणि "नारायण, नारायण" म्हणत वैकुंठाकडे कूच केलं.

***

काही दशकं लोटली. अमेरिकेचं खच्चीकरण झालं, युरोपीय राष्ट्रं रोडावली, इतर अनेक देशांची भ्रष्टाचाराच्या जोरावर भरभराट झाली. ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका आपापल्या ठिकाणी होते तसे राहिले, इंडियाचे नामकरण भारतवर्षात झाले, चीन फुगून आशिया झाला, तर रशिया एक्स-रशिया झाला. थोडक्यात BRICS चा BABES झाला. या पाचही देशांचं आपसांत भरपूर सख्य होतं.

रिओ दे जनेरोमध्ये एक विचित्र वल्ली होती - जज मेलो. लहानपणापासून कायद्याची आवड असल्यामुळे आणि भरपूर पैसा असल्यामुळे मेलोने आधी वकिली आणि एकही केस न जिंकता जजशिप प्राप्त केली. जज झाल्यावर केस जिंकण्या-हरण्याचा प्रश्न नसतो. पण मेलोने दिलेले जजमेंट कोर्टाबाहेर लागू न होताच वरच्या आदेशांमार्फत बदलले जात. मेलो वरकरणी शांत वाटला तरी त्याच्या मनाला हे आतल्याआत कुरतडत असे. दुसरा एखादा असता तर त्याने आत्महत्याच केली असती. मेलोने मरण्याचे अनेक प्रयत्न केले, पण त्यातही त्याला यश आलं नाही.

***

भ्रष्टाचाराशिवाय आणखी एक गोष्ट मुळीसुद्धा बदलली नाही आणि ती म्हणजे बॉलिवूड आणि बॉलिवूडचे सिनेमे. नेत्यांखालोखाल नट-नट्या आणि निर्माते खोऱ्याने पैसा ओढायचे. पटकथालेखकांचं मात्र नशीब फुटकंच होतं. चिमण असाच एक. त्याचं पूर्ण नाव कोणालाच माहीत नव्हतं. बॉलिवूडसाठी चिमणच पुरे होतं. पंधराव्या वर्षीच चिमणने पटकथा लिहिणं सुरू केलं. त्यांवर आधारित सिनेमे चालत, पण त्यात चिमणच्या कथेत होती तशी काहीच गंंमत नसे. चिमण आता पन्नाशीला आला होता, तरी त्याच्या चित्रपटांची तीच गत होती. कोणी ऐकत नाही म्हणून त्याने स्वत:चा जीव घ्यायचा अनेकदा प्रयत्न केला, पण तिथेही त्याची स्क्रिप्ट चालली नाही. त्याचा लेटेस्ट सिनेमा होता 'भारतवर्ष ब्लूज'.

***

नारदाचा सर्वसंचार सुरूच होता. एक दिवस रेड्याला चारा घालून झाल्यावर त्याने भास्कर कसा आहे ते पहायचं ठरवलं. भास्कर पिनॅकोलाडा पीत आरामात बसला होता. नारदाला पाहताच तो उठला आणि म्हणाला,
"वंदन, चिरंजीव नारद. तुमची कधीपासून वाट पाहतो आहे. 'पापुद्र' ठीक सुरू आहे ना?"
"'पापुद्र' छानच सुरू आहे, पण मी जरी अमर असल्याप्रमाणे वागत असलो तरी मी चिरंजीव नाही. चिरंजीव आठच. अश्वत्थामा, बळी …"
"मला आठ चिरंजीव कोण ते माहीत आहेत, पण आता तुम्हीपण आहात.", नारदाच्या हातात एक पिनॅकोलाडा देत भास्कर म्हणाला.
"कसं काय? भगवंतांकडून अशा लॉटरीची मला अपेक्षा नाही. आणि नकोच ते अमरत्व. तो अश्वत्थामा तेल तेल करत दारोदार …"
"ऋषिवर, तुम्ही विसरता की एकाकडे सगळे लगाम नसतात. कोणीही इंद्र बनू शकतो, आणि कोणीही बळी."
"बळी तो कान पिळी. तरी तो पण अमरत्व नाही प्रदान करू शकत."
"सगळ्यात महत्त्वाचं पद तर यमाचं. प्रत्यक्ष मृत्यूचाच खेळ."
"तेच त्यांना नकोसं झालं होतं."
"त्या यमपदावर आता आरूढ आहे मी लिहिलेला 'पापुद्र." पिनॅकोलाडाचा घोट घेत भास्कर म्हणाला.
"तो छान सुरू आहे हे मी सांगितलंच."
"असा मोठा प्रोग्राम जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा त्यात एक 'इस्टर एग' ठेवायची पद्धत आहे."
"काय एग?"
"हा ख्रिस्ती लोकांकडून आलेला शब्द आहे. एका रविवारी काही अंडी लपवून ठेवतात."
"आणि त्याचा 'पापुद्र'शी संबंध काय?"
"आम्ही प्रोग्रामचा मूळ उद्देश नसलेली एखादी गोष्ट प्रोग्राममध्ये लपवतो. मी 'पापुद्र'मध्ये काहीतरी लपवलंय."
"काऽय?"
"तुम्ही पापपुण्याचे नियम एकत्र करण्यात मदत केलीत. त्यात अमर लोकांची एक लिस्ट होती. मी चुपचाप तुमचंही नाव त्यात टाकलं."
"काऽय? अरेऽ देवाऽ, काय केलंस हे? काढ, लगेच काढ."
"का? तुम्हाला अमरत्व नको? मला वाटलं तुम्ही खूश व्हाल. जाऊदे. प्रोग्राम बदलणं मात्र आता माझ्या हातात नाही." भास्कर म्हणाला.
"यम आणि चित्रगुप्ताची शिक्षा संपल्यावर त्यांच्याकडूनच हे करून घ्यावं लागेल तर." नारदाचा चेहरा विचारी दिसत होता.
"अरे हो, आणखी एक. 'पापुद्र'च्या चुका शिक्षेस पात्र नसल्या तरी मूळ प्रोग्राम लिहून घेणं हेच शास्त्राला धरून नसल्यामुळे त्या दोघांना शिक्षा होणार हे तुमचं म्हणणं मला लागलं. तुम्हीच मला चित्रगुप्ताकडे नेलं होतं. मला त्या दोघांची कीव आली आणि मी त्यांना पण अमर केलं."
"म्हणजे ते परत येणारच नाहीत? का? का केलंस हे? काय करू मी? नारायणा, तूच आहेस!", नारद वर पहात म्हणाला.

***

"नारायण, नारायण", नारद विष्णूसमोर अवतरत म्हणाला.
"या, नारद, या. काय खबर त्रिलोकाची?"
"भगवंता, सगळं सुरळीत सुरू आहे."
"सगळं? आज तुमच्या स्वरात एक मलूलता जाणवते आहे."
"थकलो आहे थोडा. ट्रॅफिक वाढल्यामुळे जरा जास्त वेळ लागतो."
"ट्रॅफिक वाढली आहे? त्या तुमच्या 'पापुद्र'चा तर हा परिणाम नाही ना?"
"नाही, नाही, पापपुण्याचे निर्णय 'पापुद्र' योग्यपणे करतो आहे."
"नारदा, हा सोमरस घ्या. ट्रॅफिकमुळे आलेले ब्लूज दूर होतील." लक्ष्मी म्हणाली आणि नारदाने हातात घेतलेला गडू निसटला.
"ब्लूज, देवी?"
"का, अगदी वर्मावर बोट ठेवलं का?" लक्ष्मीने हसत विचारलं.
"तुमच्यापासून काय लपवायचं. यमाने भास्कराला अनेक ग्रंथ आणून दिले होते. जगभरातले नियम असलेले. मनुस्मृती, हमुराबी वगैरे. त्या किचकट कामात मी त्याला मदत केली. म्हणून त्याने प्रोग्रामद्वारे मला अमर केलं."
"अरे वा! अभिनंदन!"
"देवा कशाला मस्करी करता?"
"मस्करी नाही करत. अमरत्वात काय वाईट आहे?"
"पण यम-चित्रगुप्ताला मिळाला शाप तसा मलाही मिळेल की."
"शाप कसला? त्यांना ती शिक्षा नाही दिलेली कोणी. आपण करतो आहोत ते बरोबर नाही ही त्यांची जी आंतरिक जाणीव होती, त्यामुळे ते सध्या पृथ्वीवर आहेत." विष्णूचा स्वर शांत होता.
"तरी पण नको मला अमरत्व. देवी, तुम्ही तरी मला वाचवा." लक्ष्मीला साकडं घालत नारद म्हणाला.
"यावर एक उपाय आहे." लक्ष्मी आपलं स्मित ढळू न देता म्हणाली.
"काय, माते?", नारदाने लगेच विचारलं.
"त्यांना पश्चात्तााप होईल अशी व्यवस्था कर. पुढचं पाहू आपण."
"लगेच लागतो मी त्यामागे", म्हणत दोघांना प्रणाम करून नारद अंतर्धान पावला.

***

चिमणची मुलं मोठी झाली, त्यांची लग्नं झाली, आणि त्यांच्या मुलांची लग्नाची वयं झाली. पण तब्येतीने चिमणच सगळ्यांत तंदुरुस्त. आता मात्र त्याची तब्येत वारंवार बिघडू लागली. आतातर त्याच्या कथाही निर्माते अव्हेरू लागले. आत्महत्येचे आणखी दोन प्रयत्न झाले. दुसराही अयशस्वी.

***

मेलोचीही तीच गत. त्याचंपण भलंमोठं कुटुंब होतं. शतक ओलांडूनही शांती नाही. आधीची ठणठणीत तब्येत बिघडू लागलेली, पण जीव काही जायला तयार नाही.

***

अशातच चिमणला त्याच्या एका जुन्या कथेचा सिक्वल निवडला गेल्याचं कळलं. निदान दुसऱ्या देशात आपल्या स्क्रिप्ट्सप्रमाणे लोक काम करतील या समजुतीने तो 'भारतवर्ष ब्लूज'चे सिक्वल 'ब्राझिलियन ब्लूज' काढायला रिओला पोचला.

***

जज मेलोला पोस्टाने ब्राझिलियन ब्लूजच्या प्रिमियरचं एक तिकीट आलं. सिनेमाला काय जायचं म्हणून त्याने ते त्याच्या मोलकरणीला देऊन टाकलं.

***

चिमणची इथेही निराशाच झाली. त्याच्या कथेप्रमाणे काहीच झालं नाही. त्यामुळे त्याने थेट 'लांब्डा' क्लबचा रस्ता धरला. गुआर्नाचा तिसरा ऑन द रॉक्स पेग रिचवत असताना कोणीतरी आपली बाही ओढत असल्याचा चिमणला भास झाला.
चिमण वळला. एक लांब केस असलेला निळ्या चेहऱ्याचा माणूस खरंच त्याची बाही ओढत होता.
"तुमच्या तंद्रीत व्यत्यय आणल्याबद्दल क्षमस्व. मी मिरांडा.", स्वत:ची ओळख करून देत तो गृहस्थ म्हणाला.
"काय हवंय? मी चिमण." चिमण जड आवाजात म्हणाला.
"मला माहीत आहे. मी तुमचा फॅन आहे." मिरांडाने स्वत:चा आणि चिमणचा ग्लास भरायची खूण केली.
"माझा फॅन? पण मी लिहिलेलं काहीच माझ्या चित्रपटांमध्ये दिसत नाही." चिमण हताश आवाजात म्हणाला.
"तुमचाच फॅन. तुमच्या कथा नीट केल्यास चित्रपटांमध्ये कश्या दिसतील याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकेन."
"थँक्स, बट नो थँक्स!", म्हणून चिमणने सरळ दोघांच्या ड्रिंक्सचे पैसे भरले आणि बाहेर पडला.

***

"ट्रींग-ट्रींग"
दारावरची घंटी वाजल्यामुळे मेलो बाहेर आला.
"कोण हवंय?" मेलो खेकसला.
"पोलीस. इन्सपेक्टर करव्हालो." आत येणाऱ्याने आपला बिल्ला दाखवला. तोच पुढे म्हणाला,
"बाहेर एकावर हल्ला झाला. आम्हाला कोणीतरी फोन केला. तुम्ही जज असल्यामुळे फर्स्ट रिपोर्टकरता इथे आणलं."
"कुठे आहे तो? बेशुद्ध आहे?"
"नाही. आणतो त्याला," असे म्हणत इन्स्पेक्टर करव्हालो वळले.
मिनिटभरात ते दोघे आत आले. मेलोची आणि चिमणची नजरानजर झाली आणि दोघांच्याही डोक्यात विजांचा कडकडाट झाला. दोघांच्याही डोळ्यांपुढून त्यांचं पूर्वाश्रमीचं आयुष्य तरळून गेलं. ते जगत असलेल्या आयुष्यातला फोलपणा दोघांनाही जास्तच प्रकर्षाने जाणवला. त्यांच्यातलं टेन्शन इन्स्पेक्टर करव्हालोंनापण जाणवलं. मेलोने चिमणला उठवून उभं केलं आणि कडकडून मिठी मारली. आणि अचानक दोघेही गायब झाले. ते कुठे गेले हे पहायला इन्स्पेक्टर वळले तो त्यांना आतापर्यंत तिथे नसलेला आणखी एक माणूस गायब होताना दिसला. त्यांच्या पोलिसी नजरेने त्याचा विचित्र निळा चेहरा मात्र टिपला.

***

"नारायण, नारायण. देवी झालो मी मर्त्य?", नारदाने धापा टाकत विचारलं.
"हो. सगळं आधीही सुरळीत होतं, आताही आहे."
"प्रणाम माते. पण एक विचारू? हा पश्चात्तापाचा प्रकार काय होता, आणि त्याने नेमकं काय झालं?"
"नारदा, तू विसरतोस की स्वामीच सगळ्यात महान प्रोग्रामर आहेत. त्यांच्या वैश्विक प्रोग्राममध्ये अनेक परस्परसंबंधी सबरुटीन्स असतात. चक्रात चक्र, पापुद्र्यांवर पापुद्रे. भास्करने ज्या प्रमाणे 'पापुद्रा'त एक इस्टर एग पेरलं त्याचप्रमाणे संतत पापपुण्याच्या संग्रहाचं निमित्त साधून एक वर्म पेरला."
"वर्म?"
"इंग्रजी वर्म. तो संगणकांचा चोथा बनवणारा प्रोग्राम. वर्म आणि व्हायरस - संगणकांची कृमिकं आणि विषाणू. यम आणि चित्रगुप्ताला पश्चात्ताप होताच तो वर्म सक्रिय झाला."
"'पापुद्र' नष्ट झाला?"
"हो, आणि तुझी चारा टाकायची ड्युटीपण. जा, भेटून ये यम आणि चित्रगुप्ताला."
"हो देवी", म्हणत नारद वळला. थबकून परत वळत त्याने विचारलं, "पण माते भास्करचं काय? तो स्वर्गच्युत होणार?"
पहिल्यांदाच बोलत भगवन् म्हणाले, "वत्सा, त्याच्या मनात पाप-पुण्य, योग्य-अयोग्य असे भेद नाहीत. त्यामुळे त्याला काही होणे नाही. चिंतामास्तु."

***

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तू विसरतोस की स्वामीच सगळ्यात महान प्रोग्रामर आहेत. त्यांच्या वैश्विक प्रोग्राममध्ये अनेक परस्परसंबंधी सबरुटीन्स असतात. चक्रात चक्र, पापुद्र्यांवर पापुद्रे. भास्करने ज्या प्रमाणे 'पापुद्रा'त एक इस्टर एग पेरलं त्याचप्रमाणे संतत पापपुण्याच्या संग्रहाचं निमित्त साधून एक वर्म पेरला.>>>>
हे एकदम सही आहे!
कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजकाल अशा कथा वाचून असे मत झाले आहे की ऐसीवर या टाईपचा वर्म पेरला गेला आहे आणि तो चांगला फोफावतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्म तर आलाय पण पुढे वाढतो का बघू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कथा मजेशीर आहे. त्यातल्या पौराणिक व्यक्तिरेखांचा आणि सेट अपचा सांधा आधुनिक जगातल्या गोष्टींशी जुळवण्याचा प्रकार जमला आहे. संवाद आणि वर्णनं खुसखुशीत आहेत. पापपुण्य, स्वर्गनरक आणि तत्सबंधी गोष्टींचा डेटा मॅनेजमेंट आणि रीट्रिव्हल/मॅनिप्युलेशनशी जोडलेला संबंध आणि त्यात खगोलशास्त्रीय सत्यं, संज्ञा इत्यादि वगैरे गोष्टी मजेच्या आहेत.

पटकथाकार चिमण आणि जज्ज मेलो आणि ब्रिक्स चे बेब्ज होणे वगैरे प्रकार मला नीट अप्रिशीएट झाले नाहीत. पण ठीकए. पानात पडलेले सर्व पदार्थ आवडले नाहीत म्हणून लग्गेच सर्व सैपाकाला नावं ठेवणार नाही. (नावंच ठेवायची असती तर प्रतिसाद दिला नसता. )

असो. मजेशीर आहे हे. लिहिण्याचे सर्व नेमनियम - चुकून यमनियम म्हणणार होतो - अगदी नीट पार पडले नाहीत तरी मजा खूप आली. यांचं इतर लिखाण वाचयला पाहिजे अशी खूणगाठ मनाशी बांधली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

याला यमनियम नसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिखाव्यासाठी एक आणि प्रत्यक्षात वेगळंच वर्तन असलेल्यांना स्वर्गात स्थान नाही. खरंच?

यम आणि चित्रगुप्ताला त्यांची नोकरी परत मिळाली हे चांगलच झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||