एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ६

अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप

सुधीर भिडे

Problems left behind by history cannot be endlessly brushed under the carpet. – R. Jagannathan, Editorial Director of Swarajya

राजकीय स्थिती आणि धर्म यांचा समाजावर मोठा परिणाम होत असतो. आधीच्या प्रकरणात आपण धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म याचा विचार केला. या भागात अठराव्या शतकात धर्माचे स्वरूप काय होते ते पाहणार आहोत. जेव्हा आपण समाजातील बदलांचा विचार करू त्यावेळी धर्माचा संदर्भ येईल. कारण १८१८ ते १९२० या कालखंडात धर्माची समाजावर मोठी पकड होती.

पुरोहितांचा धर्म

धर्म म्हणजे काय? धर्माचे काम काय? अशा प्रश्नांबाबत विचार करण्याची ही जागा नाही. धर्म हा शब्द आणि इंग्रजी शब्द religion हे समानार्थी शब्द नाहीत. धर्म हा संस्कृत शब्द खूप व्यापक अर्थाने वापरला जातो. धर्म शब्दाचे अर्थ कर्तव्य, न्याय, कायदा, योग्य वागणूक असे होऊ शकतात.

इंग्रजी शब्द religion जो व्यक्त करतो तो धर्माचा अर्थ या लिखाणात अभिप्रेत आहे. असा धर्म कर्मकांडे आणि रूढी (rituals and traditions) यांनी आचरणात येतो. कर्मकांडे आणि रूढी समाजाकडून करून घेण्याचे काम पुरोहित (priests) करतात. सर्वच धर्मांत पुरोहितांची ही मक्तेदारी राहिली आहे. अशा प्रकारच्या कर्मकांडाचे स्तोम माजवीत जाणे हे काम पुरोहित वर्ग सर्व धर्मात आणि सर्व संस्कृतींत करत आला आहे. जेव्हा पुरोहितांची समाजावर घट्ट पकड होते तेव्हा समाजाची प्रगती थांबते.

जेव्हा पुरोहितांची पकड ढिली झाली तेव्हा युरोपमध्ये सामाजिक सुधारणा चालू झाल्या.

के. आर. मलकानी यांनी सिंधचा इतिहास लिहिला आहे. त्या पुस्तकात (सिंधची दर्दभरी कहाणी, अनुवाद – अशोक पाध्ये, चिनार पब्लिशर्स) त्यांनी सिंधचा अठराव्या शतकातील मुस्लिम अभ्यासक हुसमुद्दीन याचे उद्धृत दिले आहे (पृष्ठ १९५) – मुसलमानाच्या मागासलेपणाला मुल्ला मंडळी जबाबदार आहेत. बरोबर माहिती नसते आणि ते उगाच धार्मिक समस्या निर्माण करतात. दाढीला कुठला रंग द्यावा, नमाज पढताना हात सुटे ठेवावेत की घडी घालावी यावर हे अविरत वाद करत बसतील. ही मुल्ला मंडळी बिनडोक आहेत. मुल्लांचे फतवे काढणे यावर कायद्याने बंदी आणली पाहिजे.

दोनशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये भूकंप, रोग हे देवाच्या रागाने होतात आणि पूजेने शमतात ही ख्रिस्ती धर्माची शिकवण होती. युरोपमध्ये भूकंप झाला तर तो प्रोटेस्टंट लोकांच्या पापाने झाला असे सांगून प्रोटेस्टंट लोकांचा छळ झाला.
– सावरकर, अंध:श्रद्धानिर्मूलक कथा.

वर उद्धृत केलेल्या वाक्यांवरून असे लक्षात येईल की सर्वच धर्मांत अंध:श्रद्धा आणि कर्मकांड यांचे स्तोम पुरोहित माजवत असत.

अठराव्या शतकात आणि एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात दोन धर्म आचरले जायचे. हिंदूंची टक्केवारी ९२ होती, उरलेले मुसलमान होते. ख्रिस्ती धर्माचे लोक अतिशय कमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून दीडशे वर्षे महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य होते. त्यामुळे देशाच्या इतर भागांच्या तुलनेत महाराष्ट्रात मुसलमानांचे प्रमाण कमी होते. आजही तशीच स्थिती आहे. आपण आपले विवेचन हिंदू धर्मापुरते मर्यादित ठेऊ.

वेदाधिकार केवळ ब्राह्मणांचा कसा राहिला?

(पेशवेकालीन महाराष्ट्र, वा. कृ. भावे, १९३५, पुन: प्रकाशन वरदा प्रकाशन २०१०)

ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्णांस वेदाधिकार होता. तरी ब्राह्मणांशिवाय इतर दोन वर्णांनी पेशवाईपूर्वी कित्येक शतके हा अधिकार सोडून दिलेला दिसतो. राष्ट्रकूटांच्या आधीपासून ही परंपरा चालू झालेली दिसते. म्हणजे पेशवाईपूर्वी जवळजवळ हजार वर्षे क्षत्रिय आणि वैश्य हे शिक्षण आणि वेदविद्येत मागासलेले राहिले.

तुकाराम महाराज म्हणतात –

घोकाया अक्षर मज नाही अधिकार I सर्वभावे दीन, तुका म्हणे यातीहीन॥

शिक्षणामुळे राज्यकारभारातील कित्येक वरिष्ठ जागा ब्राह्मणांच्या हाती गेल्या. पेशवाईमुळे ब्राह्मणांचे राजकारणातील दुय्यम स्थान जाऊन त्यास अग्रस्थान प्राप्त झाले.

विधी आणि रूढी

धार्मिक विधी, व्रते आणि रूढी यांविषयी सावरकर काय लिहितात? (अंधश्रद्धानिर्मूलक कथा, स्वातंत्र्यवीर सावरकर, पुनःप्रकाशन रिया पब्लिशर्स, २०१२)

धर्मभोळेपणाच्या आहारी गेलेल्या हिंदू समाजामध्ये व्रतविधींचे इतके थोतांड माजले आहे की त्यामुळे समाजात विज्ञानाचा फैलाव होण्यास अडथळा होतो. ज्ञानाची प्रगती खुंटते. युरोपियन राष्ट्रे आज धर्मभोळेपणापासून दूर गेली आहेत आणि विज्ञाननिष्ठ बनली आहेत.पूर्वीच्या धर्मग्रंथांत अनमानधपक्याचे प्रस्थ माजलेले सापडते. ते त्या काळी समजण्यासारखे होते. हजारो वर्षांपूर्वीच्या धार्मिक ग्रंथांत जे अज्ञान वार्णिलेले आहे त्याच्याप्रमाणे पाऊल टाकणे याच भाकड देवसकीत हिंदू फसलेले आहेत. व्रतविधींचे सारे मर्म पोथीच्या शेवटच्या पानात येते – दक्षिणा: पांतू – भटास दान द्यावे.

सावरकर माणुसकी आणि देवसकी असे शब्द वापरतात. हिंदू धर्मातील काही भ्रामक रूढींची सावरकर उदाहरणे देतात. –

 • ग्रहणे, राहू, केतू, शनि, मंगळ यांचे मानवावर काही दुष्परिणाम होतात असे मानणे.
 • जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुतक मानणे.
 • वडाभोवती फेऱ्या मारून नवऱ्याचे रक्षण होते असे समजणे.
 • गायीसारखे पशू काय आणि वड-पिंपळासारखी झाडे काय, ती आपणास उपयुक्त असतात म्हणून त्यांचे संरक्षण करणे हे योग्य पण त्यात धर्म आणणे हे अयोग्य.
 • गायीला पंचपक्वानांचा गोग्रास देणे.

धर्मातील कर्मकांडांत निरनिराळ्या ठिकाणी बदल दिसतो.

हिंदू धर्म पाळणाऱ्या वेगवेगळ्या लोकांत धर्माविषयीच्या आकलनात फार अंतर दिसते. याचे एक कारण असे की हिंदू धर्म हा एका प्रेषिताने एका पुस्तकाद्वारे उद्घोषित केलेला धर्म नाही. वेगवेगळ्या उपासनापद्धती, पुष्कळ देव आणि निरनिराळी कर्मकांडे यामुळे हिंदू धर्मात एकजिनसीपणा नाही. गुजरातमध्ये एक स्वामिनारायण पंथ आहे. या पंथाचे अनुयायी जो धर्म समजतात, पाळतात तो धर्म आणि तामिळनाडूमधील एका खेड्यातील हिंदूंचे धर्माबाबतचे व्यवहार आणि कल्पना या अगदी निराळ्या असू शकतात. एक साधे उदाहरण घेऊ. हिंदू लोक वर्षातून काही दिवशी उपास करतात. उपासाबाबतीत आपण गुजरात आणि महाराष्ट्र यांत फरक बघू. महाराष्ट्रात उपासाच्या पदार्थांत हळद चालत नाही, गुजरातमध्ये चालते. महाराष्ट्रात चतुर्थीचा उपास असतो, गुजरातमध्ये नाही. जी गोष्ट उपासासंबंधी तीच इतर कर्मकांडाविषयी. भारतात ग्रहणकालात अन्न खाऊ नये अशी रूढी आहे (होती). जगात ग्रहणकालात अन्न खातात. या वरून लक्षात येईल की धर्माची कर्मकांडे आणि रूढी यांना काही मूलभूत पाया नाही.

ज्याप्रमाणे या विशाल देशाच्या निरनिराळ्या भागांत धर्माचे आचरण निराळे असू शकते त्याचप्रमाणे हिंदू धर्म काळाबरोबर बदलताना दिसतो. वेदकालीन धर्मात मूर्तिपूजा नव्हती, आज आपण ज्या देवांची पूजा करतो ते देव नव्हते, यज्ञ हा धर्माचा मोठा भाग होता. १८१८मधील पुरोहितांचे कर्मकांडी धर्माचे स्वरूप आपण पाहिले. आज एकविसाव्या शतकात आपण न वैदिक धर्म पाळतो न १८१८मधील कर्मकांडी धर्म पाळतो. पेशवाईच्या शेवटी महाराष्ट्रात हिंदू धर्माचे स्वरूप ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असे होते.

आचार्य वि. प्र. लिमये हे मोठे विचारवंत होते. त्यांनी १९३८ साली एक पुस्तक लिहिले – प्रांतिक स्वराज्य. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात – कायदा या शब्दातील अर्थ आपण प्राचीनकाली धर्म या शब्दानेच व्यक्त करीत होतो. इंग्रजांच्या राजवटीत प्रत्येक गोष्टीचे नियमन कायद्याने होत आहे. त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन व्यवहारात ‘धर्माने’ आपले पाय पसरले आहेत.

ब्राह्मणी कर्मकांडाचे स्वरूप कायद्यासारखे झाले होते. काय केले की ते कृत्य धर्मविरोधी होईल आणि प्रायश्चित्त घ्यावे लागेल हे सांगणे कठीण होते.

हिंदू समाज आणि हिंदू धर्म

१९२८ साली लिहिलेल्या एका लेखात डॉक्टर आंबेडकरांनी एक निराळा विचार मांडला आहे. (बहिष्कृत भारतमधील लेख) हा विचार असा की हिंदू धर्माने हिंदू समाजाचे नुकसान केले आहे. या विचारात हे गृहीत धरले आहे की समाजाची स्थिती निरनिराळ्या पैलूंनी निश्चित होते. धर्म हा समाजाचा एक पैलू असतो. त्याशिवाय अर्थ, उद्योग, संस्कृती, संरक्षण असे निरनिराळे पैलू असतात. आता आपण थोडक्यात आंबेडकरांच्या प्रमेयाचा विचार करू.

जातिभेद, हिंदू धर्मात परधर्माच्या लोकांना येण्यास आडकाठी, समुद्र ओलांडून प्रवास करण्याची बंदी, स्त्रियांना कनिष्ठ लेखणे, अस्पृश्यांना वाईट वागणूक हे सर्व हिंदू धर्माने समाजाला लावलेले रोग आहेत. आजच्या काळात बऱ्याच अंशी हे रोग बरे झाले आहेत.

हिंदू धर्मात पराधर्माच्या लोकांना येण्यास आडकाठी याच्या दुष्परिणामाची काही उदाहरणे आनंद घोरपडे यांनी दिली आहेत. (ब्राह्मणांना अकारण कोण, कशाला झोडपणार? जिजाई प्रकाशन २००६, पृष्ठ ७)

चौदाव्या शतकापासूनच्या मुस्लिम आक्रमणामुळे काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या ७७% झाली होती. एकोणिसाव्या शतकात जेव्हा तिथे डोग्रा या हिंदू राजाची राजवट सुरू झाली तेव्हा राज्यातील प्रजेने राजाला निवेदन केले की आम्ही परत हिंदू होऊ इच्छितो. परंतु काशीच्या धर्मपंडितांनी हे नाकारले.

शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर आणि इतर अशा लोकांची धर्मपरिवर्तने तत्कालीन धर्ममार्तंडांचा विरोध न जुमानता करवून आणली.

पाण्यावरच्या प्रवासाच्या प्रश्नावर आनंद घोरपडे लिहितात –

आसाममधील ब्रह्मपुत्रा हा नद बोटीतून ओलांडण्यासाठी ब्राह्मणांना अस्पृश्यांनी चालविलेल्या बोटीतून जावे लागे. मग विटाळ झाला म्हणून ब्राह्मणांना पलीकडे गेल्यावर आंघोळ करावी लागे. ते टाळण्यासाठी ब्राह्मणांनीच नावाड्यांना सल्ला दिला की त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारावा म्हणजे विटाळ होणार नाही.

‘मराठ्यांच्या आपसांतील लढाया’ हे पुस्तक गोविंद भागवत यांनी १९४० साली लिहिले. (पुन:प्रकाशन २०१८, वरदा प्रकाशन) या पुस्तकात प्रकरण ४ – ‘सनातन धर्माचा दुर्बळपणा’ या विषयावर आहे. या प्रकरणात ते काय लिहितात ते पाहू –

एक कटू सत्य कोणास आवडणार नाही. परंतु ते सांगितलेच पाहिजे. मराठी साम्राज्याच्या नाशाला जी अनेक कारणे झाली त्यांपैकि रुपयात नऊ आणे कारण सनातन धर्माचा दुर्बलपणा हे आहे. आजकाल मूर्तिपूजा आणि पुराणातील लक्षावधी कथा यांचा फाफटपसारा हेच धर्माचे स्वरूप मानण्यात येत आहे. पुरोहित वर्गाने मागासलेल्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपली पोळी पिकविण्याकरता पुराणात घुसडून नवीन कथा निर्माण केल्या. ब्राह्मणवर्गाने आपल्या सामाजिक वर्चस्वाचा दुरुपयोग करून समाजाला चुकीचा मार्ग दाखविला. पुरोहित वर्गाचा हा स्वार्थ लंपटपणा नाहीसा केला पाहिजे. पेशवाईचा उदय होण्यापूर्वी हा स्वार्थ लंपटपणा चालू होताच. याचा बंदोबस्त पुढारी लोकांनी न केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम हिंदुस्थानाला भोगावे लागत आहेत. हा स्वार्थ लंपटपणाचा बाजार शेकडो पटींनी वाढत चालला आहे.

भागवतांनी लिहिलेल्या या प्रकरणात पुराणातील निरनिराळ्या कथा आणि त्यावर आधारित धर्माचे आचरण उदाहरणादाखल दिले आहेत. त्या इतक्या बीभत्स आणि गलिच्छ आहेत की येथे त्या लिहिण्याचे माझे धाडस नाही. शंकराच्या भक्तांनी त्या जरूर वाचाव्यात.

वरील सर्व लिखाण हेच दाखवत आहे की हिंदू धर्माने हिंदू राष्ट्राचे नुकसान केले आहे. भागवत तर स्पष्टपणे मराठी सत्तेच्या नाशाला धर्माला जबाबदार धरत आहेत. आजच्या पिढीसाठी माहिती – त्या काळी सोळा आण्याचा एक रुपया होत असे. भागवतांच्या मताप्रमाणे नाशाची धर्माची जबाबदारी रुपयातील नऊ आणे होती.

अठराव्या शतकातील धर्माचे आचारण

आम्ही धर्माचे पालन करतो असे म्हणणारे ब्राह्मण धर्माचा खरा अर्थ विसरून गेले होते. धर्म म्हणजे कर्मकांड एवढाच धर्माचा अर्थ राहिला होता. धर्माचा माणुसकीशी काही संबंध उरला नव्हता. ब्राह्मण दोन अस्त्रे वापरीत – प्रायश्चित्त आणि जातीबाहेर काढणे. प्रायश्चित्ताचा शेवट अर्थातच ब्राह्मणांना दक्षिणा. कर्मकांडांनंतर ब्राह्मणांना दक्षिणा आणि दान. पेशव्यांनी ब्राह्मणांना उचलून धरल्याने ब्राह्मणांच्या आवाजाला जास्त धार आली होती. काय केल्यानंतर वागणे धर्मशास्त्राच्या बाहेर जाते हे सांगणे कठीण होते. स्त्रिया आणि अस्पृश्य यांची अवस्था तर फारच वाईट होती. स्त्रिया आणि अस्पृश्य यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रिया एकट्या घराबाहेर पडू शकत नसत. अस्पृश्यांची सावली पण पडलेली ब्राह्मणांना चालत नसे. अस्पृश्यांना चांगले कपडे घालण्याचाही अधिकार नव्हता.

रमणा

Poona in Bygone Days, D B Parasnis, ~1900, अनुवाद सुरेश देशपांडे, डायमंड पब्लिकेशन्स, २००७

पर्वतीच्या पायथ्याशी पहिल्या पेशव्यांनी मोठी इमारत बांधली होती. येथे दर श्रावण महिन्यात देशाच्या सर्व भागांतून आलेल्या ब्राह्मणांना दक्षिणा वाटण्यात येई. दक्षिणेबरोबर ब्राह्मणांना भोजनही दिले जाई. यास रमणा म्हणत. ही प्रथा पहिले बाजीराव यांनी १७३७मध्ये चालू केली आणि पेशवाईच्या शेवटापर्यंत चालू राहिली. पहिल्या वर्षी दक्षिणेपोटी ५०,००० रुपये देण्यात आले. त्यानंतर ही रक्कम वाढत गेली. पेशवाईच्या शेवटी दक्षिणा १० लाखापर्यंत वाढली. (आजच्या हिशोबाने २०० कोटी रुपये) त्या वर्षी ५०,००० ब्राह्मणांना दक्षिणा दिली गेली.

पेशवेकालीन धर्म

खालील माहिती पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक वा.कृ. भावे, १९३५, पुनः प्रकाशन वरदा प्रकाशन २०१०, या पुस्तकातून घेतली आहे.

मराठी राज्यात गोहत्येस बंदी होती. मद्यपान प्रतिबंध होता. मोठ्या देवळांच्या बाजूला वेदपाठशाळा बांधण्यात आल्या. अग्निहोत्री ब्राह्मणांना मदत केली जाई. पेशव्यांच्या स्त्रिया काशी यात्रेस जात. ही यात्रा जाऊन येऊन सहा महिने चाले. या यात्रेत शेकडो माणसे जात. संरक्षणासाठी हत्यारबंद सैनिक असत. प्रत्येक लहानमोठ्या प्रसंगाला मुहूर्त पाहिले जात. प्रत्येक पेशव्याचे पदरी ज्योतिषी असे.

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदायास ‘भागवत धर्म’ असेही म्हटले जाते. भगवद्गीता आणि श्रीमत भागवत हे भागवत धर्माचे मूळ ग्रंथ. हे ग्रंथ व्यासांनी लिहिले. या ग्रंथांची ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि एकनाथांनी एकनाथी भागवत ही रूपांतरे केली. याशिवाय नामदेवाची गाथा आणि तुकारामांची गाथा हे ग्रंथ वारकरी संप्रदायाचे आणि भागवत धर्माचे नित्य वाचनाचे ग्रंथ बनले.

ह. भ. प. पांगारकर यांनी तुकारामांचे चरित्र लिहिले आहे. (वरदा प्रकाशन, १९२०.) या पुस्तकात पाचव्या प्रकरणात ते वारकरी संप्रदायाची माहिती देतात. वारकरी संप्रदायातील लोक विठ्ठलाची भक्ती करतात, विठ्ठल हा कृष्णाचा अवतार असे मानतात. भक्त आणि परमेश्वर याच्या अद्वैत संबंधावर यांचा विश्वास असतो. तुळशीपूजा आणि गळ्यात तुळशीचा हार हे अवश्य असते. पंढरपूर, आळंदी आणि देहू ही यांची महातीर्थे आहेत.


आषाढी वारी
आषाढी वारी

संप्रदायाचे साधे नियम आहेत –

 • सत्य बोलावे.
 • परस्त्रीला मातेसमान मानावे.
 • कांदा-लसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा.
 • मद्यपान वर्ज्य करावे.
 • रोज हरिपाठ करावा.
 • ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र जपावा.
 • आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरीची वारी करावी.
 • प्रत्येक एकादशीला उपास करावा.

कीर्तन हे या पंथाचे प्रमुख अंग आहे. थोर संत आणि वारकरी नामदेव हे आद्य कीर्तनकार मानले जातात. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाचा भक्कम पाया मिळवून दिला. ज्ञानदेव-नामदेवांनी बहुजन समाजाच्या आध्यात्मिक आकांक्षा जाग्या केल्या. गोरा कुंभार (१२६७-१३१७), सावता माळी (१२५०-९५), नरहरी सोनार (मृत्यू – १३१३), चोखामेळा (मृत्यू – १३३८), सेना न्हावी (तेरावे शतक) इत्यादी संतांनी चातुर्वर्ण्य, जातपात, सोवळेओवळे, विटाळ ह्यांतून पदरी येणाऱ्या मानहानीबद्दल आपला निषेधही व्यक्त केला. वारकरी संतांनी चातुर्वर्ण्याच्या आणि जातिव्यवस्थेच्या चौकटीविरुद्ध बंड उभारले नाही. तथापि आध्यात्मिक समता निश्चितपणे प्रस्थापित केली. देवाला सर्व भक्त सारखे, हीच शिकवण दिली. तुकाराम महाराजांचे हे अभंग हीच शिकवण देतात –

अन्त्य जाती योनी ठरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार धागा हा चांभार रोहिदास॥
कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास॥
कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनी अभेदू हरीचे पायी॥
चोखामेळा वंका जातीचा महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी॥
नामयाची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरीराव तिये सवे॥
यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री॥
उंच नीच काही नेणे हा भगवंत तिष्ठे भाव भक्ति देखोनिया॥

लोकाभिमुखता हे वारकरी संप्रदायाचे एक फार मोठे वैशिष्ट्य होय. स्त्री-शूद्रांचा त्यांनी कैवार घेतला. एकनाथांच्या चरित्रात अस्पृश्यांविषयी तीन संदर्भ येतात. त्यांच्या वडिलाच्या श्राद्धाच्या वेळी एक महार कुटुंब भीक मागण्यास आले. त्या कुटुंबाला त्यांनी घरात बोलावून इतर ब्राह्मणांच्या बरोबर जेवावयास बसविले. याकरिता त्यांना ब्राह्मणांचा रोष पत्करावा लागला. दुसऱ्या एका प्रसंगात, नदीवर त्यांना महाराचे पोर हिंडताना दिसले. त्यांनी त्या मुलास कडेवर घेऊन त्याच्या आईकडे पोचविले. एका महाराने त्यांना घरी जेवायला बोलाविले. एकनाथ आनंदाने त्याच्या घरी जाऊन जेवले.
– (संत एकनाथ, लेखिका कुमुद गोसावी, कर्नाटक प्रकाशन, २००३)

वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे वर्णन करीत असताना संत बहिणाबाईंनी 'तुका झालासे कळस' असे सार्थ उद्गार काढले आहेत. कारण भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची परिपूर्ती तुकारामांच्या जीवनात आणि साहित्यात झालेली होती.

वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्यापासून चालू झाला. त्या काळात ब्राह्मणाशिवाय इतर समाज शूद्र मानला जायचा. धर्माचे आचरण म्हणजे ब्राह्मणांनी केलेली कर्मकांडे. वारकरी संप्रदायाचे विशेष म्हणजे सामान्य जनांस सहज आचरण करता येतील अशा प्रथा संप्रदायाने घालून दिल्या. धर्माचे ग्रंथ संस्कृत भाषेतून मराठीत आले. पुरोहितांची मक्तेदारी गेली.

वारकरी संप्रदायाचा विचार करताना ज्ञानेश्वर आणि नामदेवांचा काळ हा त्यानंतर झालेल्या संतांपेक्षा निराळा होता हे लक्षात घेतले पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्रात मुसलमान आणि इस्लाम पोचला नव्हता. ज्ञानेश्वरांनंतर लगेचच इस्लामी आक्रमण सुरू झाले. लोक बाटविले जात होते, बायका पळवून नेल्या जात होत्या, मंदिरे तोडली जात होती. याची दखल नंतरच्या संतांनी घेतलेली दिसत नाही. ‘वासुदेव हरी, पांडुरंग हरी’ हे म्हणून इस्लामी आक्रमणाला उत्तर मिळणार नव्हते. ते उत्तर शिवरायांनी दिले.


आषाढी वारी
आषाढी वारी

वारकरी संप्रदाय आणि स्त्रिया

वारकरी संप्रदायात स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. गावातील कीर्तनाला स्त्रिया हजर असतात. स्त्रिया वारीला जातात. ज्या काळात स्त्रियांवर मोठे अनाचार होत होते त्या काळात सर्वच संतांनी स्त्रियांच्या सहभागाला प्राधान्य दिलेले दिसते. ज्ञानेश्वरांबरोबर त्यांची बहीण मुक्ताबाई होती. नामदेवांच्या घरी जनाबाई होती. तुकारामांची शिष्या बहिणाबाई होती. याशिवाय सोयराबाई, कान्होपात्रा यांची नावे आपण जाणतोच. ब्राह्मणी धर्माला संतांनी निरनिराळ्या प्रकारे जे आव्हान दिले त्यातील स्त्रियांचा सहभाग हा मोठा पैलू होता.

जातीभेद, वर्णभेदासह लिंगभेदही नाकारणाऱ्या भक्तीसंप्रदायात मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी सहभाग घेतलेला दिसतो. स्त्रियांच्या कर्तृत्वाला व त्यांच्या अधिकारालाही वारकरी संप्रदायाने खुलेपणाने स्वीकारल्याचे पाहायला मिळते.
– (अमृता मोरे, आपलं महानगर, मे, २०२२)

महाराष्ट्रातील काही विचारवंतांनी असे मत व्यक्त केले आहे की शिवरायांच्या स्वातंत्र्याच्या उदयामागे महाराष्ट्रातील ज्ञानेश्वरांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा उभी होती. न्यायमूर्ती रानडे यांनी प्रथम हा विचार मांडला. डॉक्टर सदानंद मोरे यांनी या विषयावर नुकताच एक लेख लिहिला. (महाराष्ट्र टाइम्स, १९ जून २०२२). परकीय सत्ता असूनही आपले स्वत्व समाज टिकवू शकला याचे श्रेय वारकऱ्यांच्या पदरी टाकावे लागते. वारी हा एक सामाजिक उपक्रम असतो. समाजातील विविध वर्गातील लोक एकत्र येऊन वारीतील कार्यक्रमात भाग घेतात. त्यामुळे समाज एकजिनसी होण्यात मदत होते.

वैदिक धर्म

या भागात आपण अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप पाहिले. या धर्माच्या आचरणाची सुरुवात साधारणपणे दोन हजार वर्षांपासून झाली. आपला धर्म फार पूर्वीच्या काळापासून असाच होता का, याचे उत्तर नाही असे येते. वैदिक धर्म, जो साधारणपणे चार हजार वर्षांपासून अस्तित्वात होता त्याचे स्वरूप अगदी निराळे होते. हिंदू धर्म दीपिका या नावाचे पुस्तक वामन गणेश दुभाषी यांनी १९३३ साली लिहिले. त्याचे पुन:प्रकाशन १९९८ साली वरदा प्रकाशनाने केले. या पुस्तकाचा आवाका मोठा आहे. आपण विचार करत असलेल्या विषयाला सयुक्तिक जे विचार या पुस्तकात आले आहेत ते खाली उद्धृत केले आहेत.

वेदकालीन समाजाची स्थिती हल्लीप्रमाणे नव्हती. त्यावेळी सध्या प्रचलित असलेला जातिभेद नव्हता. वर्ण या शब्दाचा उपयोग आर्य आणि अनार्य यांच्या संदर्भात वापरला जाई. जातीनिर्बंधांचे बीज ऋग्वेदाच्या शेवटच्या काळात, ख्रिस्तपूर्व १०००, पेरले गेले.

वेदकालीन स्त्रियांना समान दर्जा होता. ऋग्वेदातील काही सूत्रे स्त्रियांनी लिहिली आहेत. स्त्रियांस वेदपठनाचा अधिकार नाही असे प्रतिपादन करणाऱ्या ब्राह्मणांनी याचा विचार करावा.
– (पृष्ठ २०)

विधवा विवाह होत असत. पराशर स्मृतीतील हा श्लोक पाहा.

नष्टे मृते प्रव्रजिते क्लिबे च पतिते पतौ। पंचस्वा पात्सु नारीणाम पतिरन्यो विदीयते॥

पती नाहीसा झाला, मरण पावला, संसार त्याग करून गेला, नपुंसक ठरला, धर्मभ्रष्ठ झाला तर स्त्रीने पुनर्विवाह करावा. विधवा स्त्रीने केशवपन करू नये असे स्मृतीवचन आहे
– (पृष्ठ ४१९)

वेदकाली आर्यांना नौकाज्ञान होते. परदेशप्रवासशास्त्र निषिद्ध ही कल्पना त्याकाळी नव्हती.
– (पृष्ठ ६३ ते ७०)

पूर्वी अनेक क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र कर्माने ब्राह्मणत्वास पोचले. विश्वामित्र, वसिष्ठ, नारद हे हीन वर्णाचे असूनही उत्तम पदास पोचले. वसिष्ठांचा जन्म वेश्येपोटी झाला. व्यासांचा जन्म कोळी जातीच्या मुलीपासून लग्नाशिवाय झाला. पराशराचा जन्म चांडाळ स्त्रीच्या उदरी झाला. विवाहापूर्वी जन्मलेला कर्ण हाही आम्हास पूजनीय आहे. विदुराचा जन्म दासीपासून झाला. विदुराचा उल्लेख महात्मा असा केला जातो. श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे चाखली त्यावरून स्पृश्य आणि अस्पृश्य या कल्पना त्या समाजात नव्हत्या हे दिसते.
– (पृष्ठ २९३ / २९९)

ऋग्वेदाच्या सुरुवातीच्या काळात अग्नीचा शोध आणि अग्नी गरजेनुसार तयार करण्याची कला याला फार महत्त्व होते. लाकडाच्या एका ओंडक्यात एक खळगा केला जाई. लाकडाचा एक दांडू, ज्याचे खालचे टोक गोल असे, खळग्यात रवीप्रमाणे फिरविला जाई. बॉल सॉकेट जॉइंटप्रमाणे याचे स्वरूप असे. घर्षणाने ठिणगी पडे.


अग्नी
अग्नी

या कृतीचे श्रेय अंगिरस ऋषीस दिले जाते. ऋग्वेदात अशा आशयाच्या ऋचा आहेत. अग्नीच्या शोधाने आर्यांचे जीवनच बदलून गेले. साहजिकच अग्नि ही महत्त्वाची देवता ठरली आणि अग्निपूजा सुरू झाली. सुरुवातीला ही पूजा सामूहिक असे. हळूहळू त्याने यज्ञाचे स्वरूप घेतले आणि पुरोहित वर्ग तयार झाला.

वैदिक काळात धर्माच्या आचरणात यज्ञाला महत्त्वाचे स्थान होते. जे आपणास प्रिय ते पूज्य देवतांनाही प्रिय या भावनेने यज्ञात पशूंना बळी देऊन आणि मद्य (सोमरस) अर्पण करून संतुष्ट केल्याचे दिसते. प्रसाद म्हणून मांस आणि मद्य भक्षण होत असे.
– (पृष्ठ १९६)


यज्ञ
यज्ञ

मंगला आठलेकर यांनी ‘महापुरुषांच्या नजरेतून स्त्री’ हे पुस्तक लिहिले आहे. (राजहंस प्रकाशन, २०१८). या पुस्तकात वैदिक काळातील स्त्रियांच्या स्थितीचा त्या आढावा घेतात. भारतीय संस्कृती कोशातील माहिती त्यांनी उद्धृत केली आहे. (प्रस्तावना, पृष्ठ ७ ते ११)

वेदकाळात शिक्षण सर्वांना खुले होते. वेदाध्यायन करून विदुषी बनलेल्या काही स्त्रिया वेदकाळात होऊन गेल्या. स्त्रियांचे उपनयन करून त्यांना गुरुगृही पाठविले जात असावे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच बौद्धिक जीवन होते.

ब्रह्मवादिनी आणि सद्योद्वाहा असे विद्यार्थिनींचे प्रकार होते. ब्रह्मवादिनी स्त्रिया ब्रह्मचर्य पाळून पठन आणि लेखन करीत. लोपामुद्रा, विश्ववारा, घोषा या विदुशींनी रचलेल्या ऋचा ऋग्वेदात आढळतात. ब्रह्मयज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्पणात सुलभा, मैत्रेयी, गार्गी या विदुषींची नावे आहेत. विदेह जनकाच्या राज्यसभेत अध्यात्मविषयक चर्चेत गार्गीने भाग घेतल्याचे उल्लेख आहेत. स्त्रिया अध्यापनाचा व्यवसाय करीत, त्यांना आचार्या असे संबोधिले जायचे.

सद्योद्वाहा विद्यार्थिनी सोळाव्या वर्षापर्यंत शिक्षण घेऊन मग विवाह करीत. वैवाहिक जीवनात पत्नीचे स्थान उच्च असे. गृहस्थाला पत्नीशिवाय यज्ञाचा अधिकार नसे. यज्ञात पत्नीने करायच्या कृती असत. काही यज्ञ फक्त स्त्रियांनीच करायचे असत.

वेदकालात स्त्रीला अनुरूप सहचर निवडण्याची अनुमति होती. अथर्व वेदात पतीपत्नीच्या नात्याचे जे वर्णन आहे त्यात स्त्री-पुरुष समानतेचा प्रत्यय येतो. ऋग्वेदात, ‘भिंती छप्पर हे घर नव्हे, गृहिणी हे घर होय’ असा उल्लेख येतो. काही उल्लेख पाहा –

इंद्राला कन्येकडून सोमाचा हवी दिला – ऋ १०.८६.१

पत्नी यज्ञात मंत्र म्हणत असे – शतपथ ब्राह्मण १०.२.३.१

पत्नी पतीच्या आत्म्याचे अर्ध आहे – तैत्तिरीय ब्रा ३.३.३.५

स्त्रीने आपला जोडीदार निवडावा – ऋ १०.२७.१२.

वरील विधानांवरून हे स्पष्ट होते की वेदकालीन स्त्रियांची स्थिती चांगली होती. अध:पतन स्मृतिकाळापासून झाले. वेदकाळात अस्पृश्य ही कल्पनाच नसल्याने तसे उल्लेख आढळत नाहीत.

छंदोग्य उपनिषदात एक गोष्ट येते. एका मुलाची आई लोकांच्या घरी काम करीत असे. तिचे नाव जबाला. तिच्या मुलाला जाबाल म्हणून ओळखत असत. मुलगा मोठा झाल्यावर गुरूंकडे गेला. गुरूंनी त्याला विचारले, ‘बाळा तुझ्या वडिलांचे नाव काय?’ जाबाल घरी आला आणि त्याने आईला त्याच्या वडिलांचे नाव विचारले. आईने सांगितले, ‘बाळा, मला तुझ्या वडिलांचे नाव माहीत नाही.’ तो मुलगा गुरूकडे गेला आणि त्याने सांगितले की आईला माझ्या वडिलांचे नाव माहीत नाही. गुरु म्हणाले, ‘बाळा, तू प्रामाणिक आईचा प्रामाणिक मुलगा आहेस. मी तुला शिकवीन.’ पुढे हा मुलगा आत्मज्ञानी ऋषी झाला आणि सत्यकाम नावाने प्रसिद्ध झाला.
– (विवेक विचार, जून २०२२)

अशा उदात्त समाजापासून आपल्या धर्माचे अध:पतन ब्राह्मणी कर्मकांडी धर्मात झाले.

वैदिक काळापासून येथील लोक नौकानयनात पारंगत होते. आपले व्यापारी रोम, ग्रीस पासून ते पूर्वेकडे कंबोडिया, इंडोनेशिया या देशांशी सागरी मार्गाने व्यापार करत असत. वेदात वरूणाला जलाचा नियंत्रक मानले आहे. सागर प्रवासाविषयी ऋग्वेदात ऋचा आहेत.

नौकानयनातील पीछेहाट इस्लामी आक्रमणापासून चालू झाली. हळूहळू समुद्रावर मुस्लिमांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आणि धर्माचे बुरसटलेले विचार पुढे येऊ लागले. समुद्र पार करणे याचा अर्थ धर्म भ्रष्ट होणे, अशी वचने येऊ लागली. (वरील माहिती भारतीय नौकानयनाचा इतिहास या पुस्तकातून घेतली आहे लेखक डॉक्टर केतकर, मार्वेन टेक्नॉलॉजीज, २०१९)

वैदिक धर्माचे अध:पतन

जैन आणि बौद्ध धर्म ख्रिस्त पूर्व ५०० च्या आसपास अस्तित्वात आले. या धर्माच्या तत्त्वज्ञानाने वैदिक धर्मास आव्हान मिळाले. शिवाय जैन आणि बौद्ध या धर्मांस राजाश्रय मिळाला. याच काळात वैदिक धर्मास उतरती कळा लागली. यज्ञसंस्थेला प्रश्न विचारले जाऊ लागले. यज्ञात प्राण्याची हिंसा यावर टीका होऊ लागली.
– (हिंदू धर्म दीपिका, दुभाषी, पृष्ठ १९५).

स्मृतिकारांनी जातिव्यवस्था चालू केली. पुराण काळानंतर जातिनिर्बंधांचे महत्त्व वाढले. आमच्यामध्ये अनेक खंड पडले. खाणे, पिणे, विवाह इत्यादी अनेक बाबतींत धर्माने आपली सत्ता बसविली आणि समाजाची शकले धर्मावरून झाली. जातिभेदाचे प्राबल्य अनावर झाले आहे. त्याचा उच्छेद करणे हेच सांप्रत काली योग्य दिसत आहे.

निष्कर्ष

या प्रकरणात आपण तत्कालीन धर्माचे स्वरूप समजून घेतले.

धर्माचे आचरण रूढी आणि कर्मकांडे यांनी होत असे. ह्या रूढी आणि कर्मकांडांनी कायद्याचे स्वरूप घेतले होते. ही स्थिती सर्वच धर्मांत राहिली आहे. धर्म समाजावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकतो. त्यामुळे कोणत्याही काळाचा विचार करताना त्यावेळी धर्माचे स्वरूप काय होते याचे आकलन आवश्यक आहे. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात रूढी आणि कर्मकांडी धर्माची समाजावर मोठी पकड होती. पुरोहितांनी समाज ब्राह्मण, शूद्र आणि अस्पृश्य अशा तीन भागांत विभागला होता. पुरोहितांनी लादलेल्या धर्माचे दोन भाग होते. विधी आणि संस्कार यांबरोबर रूढी. यांमध्ये रूढी जाचक राहिल्या. स्त्रियांना शिक्षण न देणे हे धर्मशास्त्रावर आधारित समजले गेले. शूद्रांना वेदपठनाचा अधिकार नाही ही रूढी. बदलत्या कालाबरोबर या रूढी बदलणे आवश्यक आहे हे पुरोहित विसरले. किंवा त्यांना बदल नकोच होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड राहिले. अशा धर्माचे आचरण पाहून विचारवंतांच्या मनात प्रश्न पडू लागला की हिंदू धर्मामुळे हिंदू राष्ट्राचे नुकसान होत आहे का?

दर वर्षी रमण्यामध्ये ब्राह्मणांना जे दान दिले जाई त्याची आजची किंमत २०० कोटी रुपये होईल. अशी कल्पना करा की महाराष्ट्राच्या आजच्या मुख्यमंत्र्याने सरकारी खजिन्यातून आपल्या जातीच्या लोकांस असे दान केले. हे कितपत योग्य होईल?

वारकरी संप्रदायाची तत्त्वे उदात्त होती. संप्रदायाने धर्माचे आचरण सामान्यजनांस भावेल असे बनविले. लोकभाषा मराठीत लिखाण झाले जे सामान्यजनांस समजू लागले. स्त्रियांचा सहभाग हा ब्राह्मणी धर्मापेक्षा मोठा बदल होता.

वैदिक धर्म आणि अठराव्या शतकातील धर्म यांत फार मोठे अंतर पडले होते. या ठिकाणी वैदिक धर्म म्हणजे धर्मसूत्रांच्या आधीचा धर्म असे सांगणे आहे. वैदिक धर्मात जाती, अस्पृश्यता या गोष्टी नव्हत्या. स्त्री-पुरुषांमध्ये भेद नव्हता. वैदिक काळात स्त्रियांचे उपनयन होत असे. वेदातील पुष्कळ ऋचा स्त्रियांनी लिहिल्या आहेत. स्मृतिकालापासून म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपासून वैदिक धर्माचे अधःपतन झाले आणि ब्राह्मणी कर्मकांडी धर्म सुरू झाला. वेदकालापासून येथील लोक समुद्रावरून व्यापार करत असत. धर्मशास्त्रांनी समुद्र प्रवास धर्मबाह्य ठरविला. वैदिक धर्माच्या अध:पतनास काही अंशी बौद्ध आणि जैन धर्माचा उदय कारणीभूत होता.

भाग २ ते ६ मध्ये आपण अठराव्या शतकातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक स्थितीचा विचार केला. भाग सातपासून आपण एकोणिसाव्या शतकाकडे वळणार आहोत.

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

हिंदू धर्म पाळणाऱ्या वेगवेगळ्या लोकांत धर्माविषयीच्या आकलनात फार अंतर दिसते. याचे एक कारण असे की हिंदू धर्म हा एका प्रेषिताने एका पुस्तकाद्वारे उद्घोषित केलेला धर्म नाही. वेगवेगळ्या उपासनापद्धती, पुष्कळ देव आणि निरनिराळी कर्मकांडे यामुळे हिंदू धर्मात एकजिनसीपणा नाही. गुजरातमध्ये एक स्वामिनारायण पंथ आहे. या पंथाचे अनुयायी जो धर्म समजतात, पाळतात तो धर्म आणि तामिळनाडूमधील एका खेड्यातील हिंदूंचे धर्माबाबतचे व्यवहार आणि कल्पना या अगदी निराळ्या असू शकतात. एक साधे उदाहरण घेऊ. हिंदू लोक वर्षातून काही दिवशी उपास करतात. उपासाबाबतीत आपण गुजरात आणि महाराष्ट्र यांत फरक बघू. महाराष्ट्रात उपासाच्या पदार्थांत हळद चालत नाही, गुजरातमध्ये चालते. महाराष्ट्रात चतुर्थीचा उपास असतो, गुजरातमध्ये नाही. जी गोष्ट उपासासंबंधी तीच इतर कर्मकांडाविषयी. भारतात ग्रहणकालात अन्न खाऊ नये अशी रूढी आहे (होती). जगात ग्रहणकालात अन्न खातात. या वरून लक्षात येईल की धर्माची कर्मकांडे आणि रूढी यांना काही मूलभूत पाया नाही.

फार कशाला, केरळातील हिंदूंमध्ये गोमांसभक्षण निषिद्ध मानले जात नाही / अनेक केरळीय हिंदूंना, हिंदुधर्मात गोमांसभक्षण निषिद्ध आहे याची गंधवार्तासुद्धा नसते, असे (माझे) एकेकाळचे निरीक्षण होते. (चूभूद्याघ्या.)

(आता रॅडिकलायझेशन झाले असल्यास कल्पना नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैदिक काळापासून येथील लोक नौकानयनात पारंगत होते. आपले व्यापारी रोम, ग्रीस पासून ते पूर्वेकडे कंबोडिया, इंडोनेशिया या देशांशी सागरी मार्गाने व्यापार करत असत.

यावरून आठवले.

नुकताच माझा मुलगा कॉलेजच्या काही प्रकल्पानिमित्त अल्पावधीकरिता कंबोडियास जाऊन आला. तेथून त्याने (प्रकल्पाच्या कामातून क्वचित चुकून फावला वेळ मिळाला, तेव्हा घेतलेले) काही फोटो पाठविले. त्यात, त्याच्या टीमने भेट दिलेल्या एका हिंदू मंदिराचे काही थोडे फोटो आहेतच. (नाही! हे ते अंग्कोर वटचे सुप्रसिद्ध मंदिर नव्हे. हे लोक कंबोडियाच्या ज्या भागात होते, तेथून ते जवळपाससुद्धा नाही, त्यामुळे, त्यास भेट देणे यांना शक्यप्राय नव्हते. हे दुसरेच मंदिर, लाओसच्या सीमेनजीकचे. तर ते एक असो.) परंतु, ते तितकेसे महत्त्वाचे नाही. त्याने पाठविलेल्या दुसऱ्याच (आणि कोठल्याही मंदिराशी काहीही संबंध नसलेल्या) फोटोने माझे लक्ष वेधून घेतले, आणि मनात घर केले.

कंबोडिया हा आजमितीस जरी हिंदूबहुल देश नसला, तरी (१) हिंदू संस्कृतीचा वारसा सांगतो, आणि (२) त्या वारशाचा अभिमान बाळगतो, हे सर्वज्ञात आहेच. (त्यात काय, आपण भारतीय/भारतवंशीय हिंदूसुद्धा हिंदू सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगतो. त्यात गैर काहीच नाही. ‘गर्व से कहो’, वगैरे.) आता, या अभिमानाची लोकप्रिय अभिव्यक्ती कोठे कशी होऊ शकते, याचे पुढील उदाहरण बोलके आहे. (आणि, एकाच सांस्कृतिक वारशाच्या दोन लोकप्रिय अभिव्यक्ती तोच सामायिक वारसा सांगणाऱ्या दोन भिन्न समाजांत/देशांत कशा १८० अंशांनी फटकून असू शकतात, याचे ते उत्तम उदाहरण आहे.)

तर, अशा या कंबोडिया देशात, भरपूर खप असलेला आणि तेथील तरूणाईत प्रचंड लोकप्रिय असलेला असा एक बियरचा स्थानिक ब्राण्ड आहे. ‘हनुमान’. बाटलीवरील लेबलवर हनुमानाचे एक छानसे चित्रसुद्धा आहे. आणि, चित्राच्या वर आणि खाली ‘हनुमान’ असे अनुक्रमे कंबोडियन तथा रोमन लिप्यांमध्ये मोठ्या सुवर्णाक्षरांत, तथा त्याखाली ‘प्रीमियम लागर’ असे इंग्रजीत थोड्या लहान पांढऱ्या अक्षरांत आणि सर्वात खाली ‘ग्रेटनेस इन एव्हरी मोमेंट’ असे इंग्रजीत अत्यंत लहान पांढऱ्या अक्षरांत लिहिलेले आहे. (हाच तो मनात घर करून बसलेला फोटो! माझा मुलगा राहात होता त्या हॉटेलात, रेफ्रिजरेटेड डिस्प्ले-केसमध्ये ओळीने बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या. मुलाने फोटो आवर्जून, तातडीने पाठविला!)

(अतिअवांतर: ही बियर बनविणाऱ्या कंपनीची सीईओ एक स्थानिक कंबोडियन महिला आहे. आणि, हा एका महिलेने चालविलेला उद्योग आहे, असे आवर्जून तथा अभिमानाने सांगितलेसुद्धा जाते. तर ते एक असो.)

आता, हिंदुसंस्कृतीच्या वारशाचा पराकोटीचा अभिमान बाळगणाऱ्या देशात कोणी त्या संस्कृतीच्या सर्वोच्च प्रिय तथा वंदनीय/पूजनीय चिन्हांपैकी एक जर आपल्या सर्वात लाडक्या बियरच्या बाटलीवर लावून जर त्या बियरच्या बाटलीस विभूषित केले, तर त्यात वस्तुतः वावगे असे काहीच नाही. किंबहुना, हा एकसमयावच्छेदेकरून हनुमानाचा तथा त्या बियरचा परमगौरव तथा परमसन्मान आहे (एकाच दगडात दोन पक्षी, वगैरे.), तथा (हनुमान तथा बियर दोहोंच्याही एकसमयावच्छेदेकरून) परमभक्तीचा परमाविष्कार आहे (‘भावनाओं को समझो’, वगैरे. निदान, मी तरी (एक भारतवंशीय हिंदू असूनही, आणि बियरचा विशेष भोक्ता नसूनही) त्या भावना व्यवस्थित समजू शकतो. असो.) अर्थात, हे आक्षेप घेण्यासारखे नसून, उलट दाद देण्यासारखे आहे.

याउलट, मोदींच्या हिंदुस्थानात जर कोणा भारतीय (हिंदू!) बियरउद्योजकाने हनुमानछाप बियर बाजारात आणण्याचे धाडस केले, तर नेमके काय होईल, याची प्रत्येकाने आपापल्या मगदुराप्रमाणे कल्पना करून पाहावी. (त्यांच्याकरिता तो त्यांच्या (आमच्याच!) संस्कृतीच्या अभिमानाचा सर्वोच्च आविष्कार असेल; आमच्याकरिता तो आमच्या संस्कृतीचा अपमान ठरतो!)

(अतिअवांतर: ‘हिंदुत्वा’ची (राजकीय?) फिलॉसफी भारतीय हिंदूंना भिकारचोट बनवीत आहे काय?)

परंतु, मोदींनाच दोष का द्या? मोदीपूर्व हिंदुस्थानातसुद्धा, एखाद्या भारतीय हिंदू बियरउद्योजकाने जर हनुमानछाप बियर बाजारात आणली असती, तरी आजच्यापेक्षा वेगळे असे फारसे काहीच घडले नसते. अखेरीस, ट्रम्पने जेणेकरुन अमेरिका बिघडविली नाही, तर बिघडलेल्या अमेरिकेने ट्रम्प घडविला, तद्वत, हिंदुत्ववादी समाज ही मोदींची करणी नसून, मोदी हे हिंदुत्ववादी समाजाचे उत्पादन आहे!

(अतिअवांतर: हिंदुधर्म हा एक अतिशय सहिष्णु धर्म आहे, अशी जी एक लोकप्रिय समजूत आहे, आणि, त्या अनुषंगाने, हिंदुसमाजात ज्या ज्या म्हणून असहिष्णु गोष्टी आहेत, त्यांचे खापर हे इस्लामी आक्रमणांवर फोडण्याचा जो एक लोकप्रिय रिवाज आहे, त्यास अनुसरून, बियरच्या बाटलीवरील हनुमान पाहून नी-जर्क पद्धतीने अपमानित होण्याच्या रिवाजाचे (किंवा, बियर हे काहीतरी अश्लाघ्य/निषिद्ध/चारचौघांत ताठ मानेने न करता येण्याजोगे (नेमका मराठी शब्द याक्षणी आठवत नाहीये.) मानण्याच्या प्रघाताचे) खापरसुद्धा परस्पर ‘इस्लामी आक्रमणां’वर फोडून, ‘इदं न मम’ म्हणून मोकळे होता येईल काय?)

—————

असो; फारच अवांतर झाले. लेखमाला उत्तम चाललेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा, अहो एका मुस्लिम(अर्थातच!) खाद्यविक्रेत्याने खाण्याचे पदार्थ रद्दी पेपरमध्ये गुंडाळून दिले, त्यावर कर्मधर्मसंयोगाने देवादिकांचे फोटो होते तेव्हा त्याची फरफटत नेत मारहाण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

वैदिक धर्म आणि अठराव्या शतकातील धर्म यांत फार मोठे अंतर पडले होते. या ठिकाणी वैदिक धर्म म्हणजे धर्मसूत्रांच्या आधीचा धर्म असे सांगणे आहे. वैदिक धर्मात जाती, अस्पृश्यता या गोष्टी नव्हत्या. स्त्री-पुरुषांमध्ये भेद नव्हता. वैदिक काळात स्त्रियांचे उपनयन होत असे. वेदातील पुष्कळ ऋचा स्त्रियांनी लिहिल्या आहेत. स्मृतिकालापासून म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपासून वैदिक धर्माचे अधःपतन झाले आणि ब्राह्मणी कर्मकांडी धर्म सुरू झाला. वेदकालापासून येथील लोक समुद्रावरून व्यापार करत असत. धर्मशास्त्रांनी समुद्र प्रवास धर्मबाह्य ठरविला. वैदिक धर्माच्या अध:पतनास काही अंशी बौद्ध आणि जैन धर्माचा उदय कारणीभूत होता.

१. कम टू थिंक ऑफ इट, वेदकालात गोमांसभक्षण निषिद्ध नव्हते – किंबहुना, यज्ञात बळीबिळी दिलेल्या गोमांसाचे भक्षण हे इन थिंग होते (यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्या पुरोहिताला त्यातील चॉइसेस्ट पीस, वगैरे) – नाही काय? (चूभूद्याघ्या.)

२. वेदकालीन आणि सद्यकालीन / अठराव्या शतकातील, वगैरे हिंदू (केवळ ‘इंडियन सबकाँटिनेंटल इंडिजेनस’ अशा अर्थी; अन्यथा, तत्कालीन आणि सद्यकालीन संस्कृतींत काय, किंवा सद्यकालीन हिंदूंहिंदूंमध्येच काय, जमीनअस्मानाचा फरक आहे, याची कल्पना आहे.) समाजपरिस्थितींची तुलना करताना, ‘वेदकालात कसे, सगळे गुडी-गुडी होते; मग आजच कोठे नेऊन ठेवला आहे आर्य/हिंदुसमाज माझा!’ असा जो एक सूर अनेकदा (बहुधा!) आळविलेला जाणवतो, ते सर्व खरोखरच तितके खरे होते काय? की यातसुद्धा (बोले तो, वेदकालीन गुडी-गुडीपणाच्या दाखल्यांत) अनेक गोष्टी अनेक्डोटल (बोले तो, सांगोवांगीच्या) असाव्यात? वेदकालीन समाजात अनिष्ट प्रथा नव्हत्याच काय? आणि, आजच्या/अठराव्या शतकातल्या ज्या अनिष्ट प्रथा वेदकालीन समाजात नव्हत्या, असे जे रसभरित वर्णन केले जाते, ते तरी समाजाच्या सर्व स्तरांत सार्वत्रिक होते, की काही प्रिविलेज्ड वर्गांपुरते? की हे केवळ तत्कालीन (किंवा कदाचित अद्यकालीनसुद्धा) ‘स्टेट-स्पॉन्सर्ड सत्य’ (यानी कि प्रॉपगांडा) होते?

(या आपल्या माझ्या अडाणी शंका, हं!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेदकाळात शिक्षण सर्वांना खुले होते. वेदाध्यायन करून विदुषी बनलेल्या काही स्त्रिया वेदकाळात होऊन गेल्या. स्त्रियांचे उपनयन करून त्यांना गुरुगृही पाठविले जात असावे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच बौद्धिक जीवन होते.

आजप्रमाणेच, तेव्हाच्या समाजातसुद्धा स्त्रियांचे प्रमाण हे साधारणतः पन्नास टक्क्यांच्या आसपास असावे. (कदाचित थोडे कमीअधिक. सत्तेचाळीस-अट्ठेचाळीस ते बावन्न-त्रेपन्न टक्क्यांच्या दरम्यान. चूभूद्याघ्या.) हे लक्षात घेता, समाजातील पुरुषपंडित तथा स्त्रीपंडित यांचे प्रमाण काय असावे?

- समाजातील पुरुषपंडित तथा स्त्रीपंडित यांचे प्रमाण जवळपास समतुल्य असल्यास, गार्गी आणि मैत्रेयी या दोनच पंडिता फक्त कशा काय (वानगीपुरत्या) लक्षात राहतात? (झालेच तर ती लीलावती! तीसुद्धा बहुधा काल्पनिक/अनेक्डोटल असावी.)

- किंबहुना, समाजात जर बख्खळ स्त्रीपंडिता असतील, तर त्यांची नावे मुद्दाम कशाला कोण लक्षात ठेवेल?

(थोडक्यात, गार्गी, मैत्रेयी या (आम्हां लिबरलांच्या भाषेत) केवळ टोकन होत्या काय?)

(अपूर्ण/क्रमशः.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुंबा यांनी या प्रतिसादात सुचविलेले पुस्तक (महाराष्ट्राचा इतिहास (१७०७ ते १८१८) हे डॉ. वि. गो. खोबरेकर) चाळले. खास करून शेवटचा धडा (३२-राज्ययंत्रणा, आर्थिक व सामाजिक जीवन) यात खूप चांगला आढावा घेतला आहे. हा कालखंड समजण्यास मदत झाली. पण आकडेवारी (शेतसाऱ्याची इ.) दिली आहे ती त्यावेळची असावी असे गृहित धरले तर नेमकी कल्पना आली नाही.

पेशवाईत नानासाहेब पेशव्याने व नंतर माधवराव पेशव्यांनी सुरळीत कारभार करण्याचा प्रयत्न केला. पण भरभराटीसाठी व्यापार करण्याची कल्पना नानासाहेब पेशव्यास शिवली नाही.

मुंबईत इंग्रजांचे कोणते उद्योग चालले होते याची दाद मुंबईजवळ पुण्यास असलल्या पेशव्यांना नव्हती. व्यापारी मुंबईस राहून धनसंपन्न का होतो, याकडे त्यांचे लक्ष गेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0