कोपनहेगन-पॅरीस भटकंती-२

अर्बन हाऊस
.
कोपहेगन मधले ‘अर्बन हाऊस’ हे एक मस्त डॉर्मिटरी - टाईप हॉटेल होतं. काॅमन किचन, खाली छोटा बार, खेळायला टेबल टेनिस, फूटबाॅल वगैरे होतं. इथे मुख्यतः काॅलेजच्या सुट्टीवर आलेले मुलं मुली होते. इथे नवीन समजलं की टॅप वॉटर, म्हणजे बेसीनला येणारं पाणीच लोक पिण्यासाठी वापरतात. वापरायचं वेगळं आणि प्यायचं वेगळं असा काही प्रकार नव्हता. आम्हाला खोली उशीरा मिळणार होती म्हणून आम्ही तिथेच वाट पाहत बसलो. मी क्रीमरोल काढले, डीश आणायला किचन मध्ये गेलो तिथे कुणीतरी बसलं होतं मला वाटलं केअर टेकर असावा मी त्याला विचारलं डीश साठी, तर तो “नो इंग्लीश, स्पॅनीश” असं म्हणाला. मी गूगल ट्रांसलेट वापरून त्याला विचारलं. तो बोलला “या.”
आम्हाला रूम मिळाली. छोटी होती, ४ बेड होते. आम्ही जेवण करूयात म्हणून खाण्याचे पदार्थ काढले. थेपले, खाकरा, भाकरी ह्यांची रेलचेल होती, भरपूर खाऊन आम्ही बाहेर फिरायला निघालो, थोडं आजूबाजूला फिरलो तिथे प्रचंड शांतता होती, बाईक एकही दिसली नाही, सायकल नी चारचाकी शिवाय काहीही दिसत नव्हतं, आपण रस्ता क्राॅस करायच्या बेतात असलो की गाड्या थांबायच्या, आणि ते लोक गाडीतूनच हाताने आदराने जा असं सांगायचे. हॉर्न वगैरे आजिबात कुणी वाजवत नव्हतं. पॅलेस्टीन समर्थक एक बाई तिच्या दोन पोरांना सायकल गाडीत टाकून जोरजोरात स्पीकरवर घोषणा देत फिरत होती तेवढाच काय तो शांतताभंग होत होता. येणारे जाणारे स्त्री पुरूष एकमेकांना स्माईल करायचे, नंतर नंतर मलाही सवय लागली, आणि दिसेल तो/ती मला, नी मी त्याला/तीला स्माईल देऊ लागलो.
तिवोली गार्डन
.

रेल्वे स्टेशन जवळच तिवोली गार्डन होतं. गार्डनचं तिकीट जवळपास २००० रुपये होतं. आत गेलो नाही कारण संध्याकाळ झाली होती नी वेळ कमी होता. जवळच्याच एका पिझ्झा दुकानात गेलो, तिथे एक पाकिस्तानी पंजाबी मुसलमान नोकरीला होता त्याच्याशी गप्पा मारल्या. तिथे पिझ्झा खाऊन निघालो. फिरताना एका दुकानात कानटोपी पाहीली, तिची किंमत भारतीय रुपयात ५००० होती. मी पुण्यातील रमेश डाईंग मधून ११० रुपयांत टोपी घेतली होती. आमचा बाॅस टोपी आणायचं विसरला होता, किंमत पाहून त्याने टोपी घ्यायचं रद्द करून केजरीवाल सारखा मफलर बांधून फिरू लागला. पुढे एका बुटांच्या दुकानात गेलो, तिथे दोन नेपाळी मुली जाॅबला होत्या त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या की शिकायला आहोत इथे झालं शिक्षण की परत जाणार, नको वाटतं रहायला इथे. परत रूमवर आलो. थोड्या वेळाने रात्री १० वाजता मी आणि विकास फिरायला निघालो, तिथे आजूबाजूला बरेच स्ट्रीप क्लब/बार होते. आम्ही खिडकीतूनच आत काय चाललंय ते बघत चालत होतो बरेच चित्रविचित्र प्रकार होत होते. एका ठिकाणी विकास तपास करून आला १५० ते २०० डॅनीश क्रोन्स प्रवेश शुल्क होतं.
सकाळी नाश्ता करायला आलो, १०० डॅनीश क्रोन्स ( १२०० रूपये) दिले. हाॅट चॉकलेट आयुष्यात पहिल्यांदाच प्यायलो. मी उकडलेली अंडी खाल्ली, इतर पदार्थ काही खाण्यासारखे वाटेनात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पाव ठेवलेले होते. मी चव घेतली. काही खूप आवडले, मी फक्त पाव खाल्ले चविष्ट लागत होते. काही खिशात घेतले, बाहेर फिरायला गेलो की खाऊ ह्या बेताने.
आम्ही कोपनहेगन दर्शन घ्यायचे ठरवले. तिथे हीप हाॅप नावाच्या डबलडेकर बस होत्या. त्या कोपनहेगन दर्शन करवून आणायच्या. १८० डॅनीश क्रोन्स प्रत्येकी देऊन आम्ही त्यात बसलो, २२ स्टाॅप होते, कुठेही उतरायचं, ४५ मिनीटांनी पुढील बस यायची. पहीला स्टाॅप म्यूझियमचा होता, तिथे उतरलो नाही. पुढचा स्टाॅप नदीकिनारी होता, तिथे उतरलो. खूप थंडी वाजत होती, पण वातावरण खूप छान होतं. आम्ही तिथल्या एका काॅफीच्या गाडीवर काॅफी प्यायला गेलो. काॅफीवाला अर्जेंटीनाचा होता, मला बोलला की माझी एक्स भारतात धर्मशाळेत योगा शिकतेय. नदीवर इतक्या थंडीतही काही मुली आंघोळ करत होत्या, आणि पूर्ण उघड्या होऊन कपडे बदलत होत्या, मी काॅफी विक्रेत्याला बोललो की तुझी तर मज्जाय, तो बोलला तुम्ही चुकीच्या वातावरणात आलात ऊन्हाळ्यात जून मध्ये या, हा सर्व परीसर भरलेला असतो, मी त्याला विचारलं की असं पाहत असशील तू तर त्या मुलींच्या लक्षात येईल, तो हातातला काळा गाॅगल दाखवत बोलला “म्हणून तर मी हा काळा गाॅगल घालतो.” मी हसत हसत त्याला हायफाय दिला. अजून एकेक काॅफी होऊन जाऊदे म्हणून विकास नी माझं एकमत झालं पण आमचा कुटिल डाव बाॅसच्या लक्षात आला नी त्याने आमचा बेत हाणून पाडला.
तिथून आम्ही पुढती हीप हॉप धरून एका चर्च ला गेलो, जुने चर्च होते, आत अतिशय सुंदर नी भव्य लाकडी बांधकाम केलेले होते. त्याच्या टाॅवर वरून पूर्ण कोपनहेगन दिसतं असं कळालं, त्यासाठी तिकीट होतं नी मोठी रांग होती.
.
तिथून आम्ही कोपनहेगन च्या प्रसिद्ध Nyhavn भागातील इमारती पाहण्यास गेलो. तिथे खूप रेस्टोरंट होते, मला मासा चाखायचा होता, पण त्या दोघांमुळे खाता आला नाही, तिथे बरेच फोटो काढले, विकासने वाईन घेतली.
.
.
मी हाॅटडाॅग खायला गेलो पण त्याच्यात पोर्क होतं, तिथे एक मोठा जहाजाचा नांगर ठेवलेला होता. एवढा प्रचंड नांगर असू शकतो हे पाहून आश्चर्य वाटलं, तिथून मग पुढची हीप हाॅप पकडून लिटल मर्मेड ला गेलो, छोटसं सुंदर तळ्याकाठचं स्मारक होतं. आवडलं. त्याची प्रतिकृती विकास ने त्याच्या वडीलांना भेट म्हणून १०० डॅनीश क्रोन्स (१२०० ) रुपयात घेतली.
छोटी जलपरी.
.

पुढे आम्ही नॅशनल म्युझीयमला गेलो, तिथे फुकट तेवढं पाहून त्याच्या समोरच्या गार्डनमध्ये गेलो तिथे बरंच भटकलो, ४ वाजले होते तरी अंधार पडत आला होता, पुन्हा हीप हाॅपच्या बस स्टाॅपवर आलो, तिथे एक ऑस्टृयन ऑस्ट्रीयन नी एक जपानी जोडपं होतं त्यांच्याशी गप्पा मारल्या.
हाॅटेलला आल्यावर मॅगी बनवून खाल्ली, मॅगी बनवताना एक आफ्रीकन व्यक्ती मासा बनवत होता त्या माश्याच्या खमंग वासाने किचन भरलं होतं. हे दोघे पळाले, मी त्याला ऊत्तम मासा बनवलास नाईस स्मेल म्हणुन दाद दिली. मॅगी खाऊन आम्ही हाॅटेलच्या हाॅल मध्ये आलो तिथे आमच्या बाॅसचा मित्र भेटायला आला होता, तो बिहारी होता सांगत होता इथे लवकर नागरीकत्व मिळत नाही, मुलं ऐकत नाहीत, खूप प्रश्न विचारतात. तो गेल्यावर मी किचनमध्ये बाटलीत पाणी भरायला गेलो तिथे एका ब्रिटीश मुलीशी अर्धातास गप्पा मारत बसलो. नंतर थोड्या वेळ मी आणी विकास बाहेर रोडवर टाईमपास करत होतो, एव्हाना तो भाग माझा चांगला पाठ झाला होता, येणारे जाणारे मला पत्ता विचारायचे, रेल्वे स्टेशन ?? दिसवे गो स्ट्रेट टेक लेफ्ट, तिवोली गार्डन? असं जा, रॅडिसन ब्लू? असं जा…!
(क्रमशः)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी अनेक वर्षांपूर्वी, लहान होते तेव्हा, इंग्लंडात शिकत असताना कोपनहेगनला चार-पाच दिवस गेले होते. तिथे कॉन्फरन्स होती. नोव्हेंबरच्या आसपास कधी तरी गेले असेन.

माझ्या बरोबरच्या अनेकांनी ह्या मरमेडचा उल्लेख केला होता. आम्ही कॉन्फरन्सवाले बरेच विद्यार्थी एकत्र ती बघायला गेलो होतो. मला तोवर मरमेड म्हणजे काय हे माहीत नव्हतं. माझ्या अपेक्षा फारच वाढल्या होत्या आणि हा पुतळा बघून माझी अत्यंत निराशा झाली. मला अजूनही त्या मेल्या मरमेडीत ठेवलंय काय, हे समजलेलं नाही.

तांब्याचा जुना पुतळा. गंजून हिरवा पडलेला. ती इवलीशी मरमेड. भव्यदिव्य काही नाही. सौंदर्य वगैरे काही नाही. पक्ष्यांची विष्ठा पडलेली सगळीकडे. थंडी असूनही ऑरगॅनिक माल कुजण्याचा वास सगळीकडे येत राहतो. आणि तुम्ही फोटो काढलाय तशीच हवा! स्वच्छ, लख्ख काही नाही. लख्ख काही चमकायचं तर मला एवढंच समजलं की लोकांना कसलं आकर्षण असतं ते मला समजत नाही!

मी गेले तेव्हा नोव्हेंबर महिना होता, त्यामुळे थंडीही छान होती. संध्याकाळी, अंधार पडल्यावर दोन पोस्टडॉक आणि मी फिरायला बाहेर पडलो. त्यांतला एक न्यू झीलंडर, त्याची एक आजी डेनिश. आणि दुसरा आत्यंतिक सभ्य ब्रिटिश. आम्ही तिव्होलीला गेलो. तिथे ख्रिसमस मार्केट भरतं. थंडी असूनही तिथे खूप माणसं होती. भारतातून बाहेर पडल्यावर एवढी माणसं एकदम दिसल्यावर मला फार आनंद व्हायचा. ख्रिसमससाठी सगळा परिसर सजवलेला.

तिथे मी पहिल्यांदा ग्लूवाईन प्यायली. थंडीत, शेकोटीच्या जवळ ती ऊबदार ग्लूवाईन प्यायला फारच मजा आली. आत्यंतिक सभ्य ब्रिटिश, अत्यंत अगोचर मी, आणि आम्हां दोघांत काड्या लावून गंमत बघणारा न्यूझीलंडर, वर ती दारू. तो बिचारा सभ्य ब्रिटिश!

तिथे ह्या दोघांपैकी एकाला समजलं की आमची कॉन्फरन्स सुरू आहे तिथे जवळच एक माहितीपट-महोत्सव सुरू होता. मग एक दिवस कॉन्फरन्स बुडवून आम्ही तिघे माहितीपट बघायला गेलो. आता ते माहितीपट काही आठवत नाहीत. पण तिथून जेवायला आम्ही जवळच एका छोट्याश्या कॅफेमध्ये गेलो. मी शाकाहारी! पण आता मिळेल ते खायचं असं ठरवून मी तिथे गेले. सुरुवातीला विचारलं, काही शाकाहारी जेवण आहे का? तर त्या बाईंनी,'जेरुसलेम आर्टिचोकचं सूप आहे' असं सांगितलं. वर जेरुसलेम आर्टिचोक हा आर्टिचोकचा प्रकार नाही, हेही सांगितलं. तोवर काही वर्षं इंग्लंडात घालवली असली तरी मी तेव्हा लहान होते. मला आर्टिचोक म्हणजे काय हेच माहीत नव्हतं! नशीब 'आर्टिचोक म्हणजे काही चीज असतं का', असं विचारून ह्या दोन्ही मित्रांना लाज नाही आणली!!

मग पांढुरकं, किंचित पिठूळ दिसणारं सूप आलं. ते किंऽऽचित खारट होतं. पण एवढं स्वादिष्ट सूप मी आजवर कधी प्यायलेले नाही. तेव्हा भूक लागलेली म्हणून; का त्या दोन्ही पोस्टडॉकांवर माझा थोडाथोडा क्रश होता म्हणून का खरंच ते सूप खूप छान होतं ... सांगता नाही येणार. मग पाऊस सुरू झाला. आम्ही तिघे रस्त्यातून पळतपळत परत गेलो.

मग अनेक वर्षांनंतर, अमेरिकेत आल्यावर, ऑस्टिनच्या फार्मर्स मार्केटात बारके, पांढुरके बटाटे दिसले. नव्या कुठल्याही गोष्टीपासून चार हात लांब राहायचं, हे माझं तत्त्व मी पाळलंच असतं. पण बरोबर शेजारची डेबी होती. ती राँग नंबरशीसुद्धा १० मिनिटं बोलल्याशिवाय फोन ठेवणार नाही. तिनं चौकशी केली तेव्हा समजलं की हे जेरुसलेम आर्टिचोक! तरुण थी मय, त्या वयातले ते दोन क्रश आठवून मी एक मापभर जेरुसलेम आर्टिचोक विकत घेतले. आता १०-१२ वर्षांनंतर मला त्या मूळ सुपाची चव आठवणं अशक्यच होतं; आता राहिलं होतं ते फक्त इंप्रेशन. मग इंटरनेटवर पाककृती शोधून सूप बनवलं. डेबीलाही थोडंसं दिलं. ते वाईट नाही लागलं; पण तेवढंच. तेव्हा ते सूप आवडलं होतं ते बहुतेक मार्टिन आणि निकमुळे, अशी मी मनाची समजूत करून दिली. डेबीलाही या दोघांची गोष्ट सांगितली. जिथे पाच शब्द पुरतात तिथे एरवी पन्नास शब्द वापरणाऱ्या डेबीनं, या वेळेस समजून-उमजून फक्त मान हलवली.

कुणाचं काय आणि कुणाचं काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहा. खरंच त्या मर्मेडला काय होतं मलाही कळालं नाही. पण जिथे जाल तिथली प्रसिध्द वय्तू पाहूनच यावी असंमी करतो ऊगाच पश्चाताप नको रहायला न गेल्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0