टिळकांच्या 'आठवणी' आणि आठवणीकार बापट

डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या ढिसाळ आणि निर्नायकी व्यवस्थापनाबाबत मी काही महिन्यांपूर्वी ’उपक्रम’मध्ये लिहिलेल्या ह्या धाग्यावर बरीच चर्चा झाली होती. नुकताच त्या ढिसाळपणाचा मला नवा अनुभव मिळाला पण त्यात नवीन काहीच नाही. मात्र प्रस्तुत लिखाणाचा विषय मला त्यातून मिळाला हे महत्त्वाचे.

असाच मी एकदा ह्या लायब्ररीच्या संस्थळावर काही अन्य गोष्ट शोधत असतांना
Lokmanya Tilak Yanchiya Aathavne Va Aakhyayika (1915)., 99999990236044. Ane, Madhava Shrihari. 1915. sanskrit. Lokmanya Tilak. 736 pgs.(शब्दशः!) अशा नावाचे एक पुस्तक मला दिसले आणि मला मोठेच आश्चर्य वाटले. टिळक तर १९२० मध्ये वारले तेव्हा १९१५ मध्ये त्यांच्या आठवणींचे पुस्तक कसे निघाले हे एक आश्चर्य आणि माधव श्रीहरी अणे ह्यांनी असे काही पुस्तक संपादन केले आहे असे ह्यापूर्वी कधी जाणवले नव्हते हे दुसरे आश्चर्य. ह्या आश्चर्याचे निराकरण मला सहजच झाले कारण मला माहीत होते की लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंडातील पुस्तक सदाशिव विनायक बापट, ज्यांना आठवणीकार बापट अशी उपाधि त्यामुळे प्राप्त झाली, ह्यांनी संपादित केलेले होते आणि ते काम १९२५ नंतरचे आहे. हे पुस्तक मी उतरवून घेतले आणि जसा माझा तर्क होता त्याप्रमाणेच स.वि.बापटसंपादित लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका खंड २ हे ते पुस्तक निघाले. ह्या पुस्तकाचा आणि तदनुषंगाने सदाशिव विनायक बापट ह्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून द्यावा असे मला वाटले आणि म्हणून हा लेखनप्रसंग. खंड ३ माझ्याकडे आहे आणि खंड २ आता डिजिटल स्वरूपात मिळाला ह्यामुळे मला फार समाधान वाटले.

सदाशिव विनायक अथवा अण्णा बापट ह्यांचे वयाच्या सुमारे ९०व्या वर्षी १९८०च्या सुमारास पुण्यात निधन झाले. त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे काहीतरी दूरचे नाते होते - नक्की काय नाते होते हे मी तेव्हा कधी विचारले नाही आणि ते सांगू शकणारा कोणीहि आता उरलेला नाही हे मला ठाऊक आहे. नाते जरी दूरचे असले तरी आमचे संबंध खूपच निकटचे होते आणि त्यामुळे मला आठवते तेव्हापासून मी अण्णांना ओळखत आलो आहे. आमच्या सातार्‍याजवळच्या बोरखळ गावी त्यांची काही पिढीजात शेती होती - जी नंतर कूळकायद्यात गेली - त्यामुळे सातार्‍यात त्यांचे येणेजाणे असे आणि ते नेहमी आमच्या घरीच उतरत असत. आयुष्याच्या शेवटल्या काही वर्षात प्रकृतिअस्वास्थ्याने खंड पडेपर्यंत सुमारे ६० वर्षे प्रतिवर्षी दासनवमीला सज्जनगडावर उपस्थित राहण्याचा त्यांचा प्रघात होता. आमच्या घरीच ते त्यासाठी उतरत असत आणि आम्ही मुले दरवर्षी अण्णांच्याबरोबर दासनवमीला सज्जनगडावर जात असू.

आता संपूर्ण पडद्यामागे गेलेल्या जुन्या पुणेकरांच्या एका पिढीचे प्रातिनिधिक स्वरूप अशी त्यांची ओळख करून देता येईल. ही पिढी बहुतांशी ब्राह्मण, त्यातहि शक्यतो चित्पावन, वर्तणुकीत कर्मठ, टिळकांची आत्यंतिक भक्त अशी टिळकाइट, पुराणमतवादी आणि ज्याना ’उजवे’ असे आपण आज म्हणतो अशा प्रकारची होती. ह्यांची दैवते म्हणजे शिवाजी, रामदास आणि टिळक. तुकाराम-ज्ञानेश्वरासारख्या मऊ प्रकृतीच्या संतांपेक्षा रामदास त्यांना अधिक जवळचे. अगदी तरुण वयातच अण्णा टिळकांच्या प्रभावळीत आले. स्वदेशी कापडाची चळवळ, दारूगुत्त्यांवर पिकेटिंग अशा टिळकपुरस्कृत कार्यक्रमात भाग घेऊन लाठीमार आणि तुरुंगवास त्यांनी भोगला होता. टिळकांच्या अंगरक्षकासारखे ते टिळकांच्या आगेमागेच असत. टिळकांचे निधन मुंबईत सरदारगृहात झाले तेव्हा त्या खोलीत उपस्थित असलेल्यांपैकी ते एक होते. टिळकांच्या नंतर त्यांचे राजकीय वारसदार नरसिंह चिंतामण केळकर ह्यांचेहि अण्णा निस्सीम भक्त झाले. केसरी-मराठा संस्था, टिळक स्मारक मंदिर अशा टिळकपंथाच्या परिवारातच त्यांचे संपूर्ण आयुष्य गेले. देशकार्यासाठी त्यांनी तरुणवयातच आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि तदनुसार शेवटपर्यंत ते एकटेच, सांभाळायला लहानपणापासून जवळ ठेवलेल्या पुतण्यासह आणि त्याच्या कुटुंबासह, असे राहिले. बरीच वर्षे चिमण्या गणपतीजवळील साठे वाडयात त्यांची बिर्‍हाडाची भाडयाचीच पण प्रशस्त जागा होती. ह्या त्यांच्या घरातच मी कधीकधी जात असे आणि तेथे बाळशास्त्री हरदास, जयंतराव टिळक, न.चिं.केळकरांच्या कन्या कमलाबाई देशपांडे अशा व्यक्तींना मी पाहिल्याचे मला आठवते. मृत्यूपूर्वी काही वर्षेच त्या वाडयाचे अपार्टमेन्ट बिल्डिंगमध्ये रूपान्तर झाल्याने ते अपार्टमेंटमध्ये राहायला गेले पण त्यांचे सर्व आयुष्य सदाशिव पेठेतच गेले.

टिळक स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीची सेवा म्हणून आपल्या शक्त्यनुसार आपण काही करावे अशा विचाराने अण्णांनी टिळकांच्या आठवणींचा संग्रह काढायचे ठरविले. भारतभर आणि बाहेरहि शेकडो व्यक्तींचा टिळकांबरोबर काहीना काही संबंध आलेला होता अशांशी पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटींमधून अण्णांनी एकूण ७०० व्यक्तींकडून सुमारे १५०० पानांचा मजकूर चिकाटीने मिळविला आणि तो ’लोकमान्य टिळक ह्यांच्या आठवणी आणि आख्यायिका’ ह्या शीर्षकाने ३ खंडात १९२८ सालापर्यंत छापून आणला. ह्यासाठी त्यांना किती पायपीट करावी लागली, किती हजार पत्रे लिहावी लागली आणि क्वचित् प्रसंगी किती उपेक्षा वा अवहेलना सोसावी लागली हे त्यांनी आपल्या प्रस्तावनांमधून लिहिले आहे आणि तिसर्‍या खंडात त्याची आकडेवारीहि दिली आहे ती अशी:

खंड-ग्रंथाची पृष्ठसंख्या-किती लोकांस लिहिले-पत्रसंख्या-आठवणी पाठविणारांची संख्या
१-५५०-३००-११००-१६०
२-७२५-६५०-२७७२-२७०
३-६००-६१७-२१२०-२७१
एकूण-१८७५-१५६७-५९९२-७०१

अशा आठवणी गोळा करून प्रसिद्ध करण्यामागे १९२३ साली बाहेर आलेले रोझेलाइन मॅसननिर्मित ’I Can Remember Robert Loise Stevenson' हे पुस्तक आणि नेपोलियनच्या आठवणींची अनेक पुस्तके असावीत असे दिसते. ह्या क्षेत्रातील सर्वात गाजलेले पुस्तक बॉसवेलकृत ’Life of Samuel Johnson' हे पुस्तक त्यांच्यापुढे होते किंवा नाही हे मात्र प्रस्तावनांमधून कळत नाही. अशा प्रकारच्या लिखाणाला आजकाल ’मौखिक इतिहास’ किंवा 'Oral History' असे विद्वन्मान्य नाव मिळालेले आहे आणि एखाद्या काळाचा अथवा व्यक्तीचा इतिहास वा चरित्र लिहितांना माहितीच्या दुव्यांचा ठेवा म्हणुन त्याचे महत्त्वहि ओळखले जाते. नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनी ’आठवणीं’च्या पुढेमागेच आपले टिळकचरित्र तीन खंडात प्रसिद्ध केले , त्याच्या प्रस्तावनेमध्ये ’आठवणीं’चा चरित्र लिहितांना आपल्याला उपयोग झाला असे त्यांनी नमूद केले आहे आणि ’आठवणीं’मधील साहित्य वापरून अन्य कोणी दुसर्‍या एखाद्या प्रकारचे चरित्र लिहावे अशी इच्छाहि प्रगट केली आहे.

आपल्या ’आठवणीं’मध्ये मालवीय, सुभाषचंद्र, विश्वेश्वरैय्या, नरिमन अशा अमराठी नेत्यांपासून महाराष्ट्रातील तत्कालीन आळतेकर, खेर, सयाजीराव, पाटसकर, पोतदार अशा प्रसिद्ध व्यक्ति आणि मध्यप्रांतापासून कर्नाटकापर्यंत गावोगावचे वकील, प्राध्यापक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शंकराचार्य आणि साखरेबुवांसारखे जुन्या पठडीतील विद्वान ह्यांचा समावेश तर केला आहेच पण टिळकांशी संपर्कात आलेल्या सामान्य स्थितीतील व्यक्तींनाहि स्थान दिले आहे. १०० वर्षांपूर्वीच्या काळातील शेकडो नावे, घटना आणि स्थानांना त्यामुळे कोठेतरी नोंद मिळाली आहे. टिळक मंडालेमध्ये असतांना त्यांचा स्वैपाक करण्यासाठी वासुदेव रामराव कुलकर्णी नावाच्या कैद्याला येरवडयाहून तिकडे पाठविले होते. टिळकांना मंडाले कारागृहात युरोपीय कैद्यांच्या आवारात एक खोली दिली होती तेथेच हे कुलकर्णी खालच्या मजल्यावर तीन वर्षे टिळकांची सेवा करत राहिले होते. (नंतर टिळकांच्याच शिफारसीने शिक्षेत बरीच सूट मिळून कुळकर्णी परत आपल्या कलेढोण, ता.खानापूर, जिल्हा सातारा ह्या गावी परतले.) टिळकांचे राजकारण आणि अनेक विषयांचा अभ्यास कुलकर्णींच्या समजण्याच्या पलीकडचा होता पण टिळकांची प्रामाणिक सेवा करतांना टिळकांच्या वैयक्तिक राहणीचे आणि मृदु स्वभावाचे अनेक दाखले त्यांना मिळाले आणि ते त्यांनी आपल्या आठवणींमध्ये लिहिले आहेत. कुलकर्णींच्याच आठवणींमधून मंडालेमध्ये टिळकांचे वजन घटून ११२ पौंडांवर आले होते, त्यांची लघवीतील साखर् एकदा शेकडा ६ पर्यंत वर गेली होती असे तपशील मिळतात. दुसर्‍या टोकाला ज्याच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा लढविण्यासाठी टिळक हजारो पाऊंड खर्चून इंग्लंडला गेले ( आणि अयशस्वी होऊन परतले) त्या चिरोलच्या शब्दातहि टिळक दर्शविले आहेत. टिळकांच्या स्वभावाचे अनेक परस्परविरोधी पैलू वेगवेगळ्या व्यक्तींच्या आठवणीतून आपल्याला दिसतात. काशीचे विद्वान् दक्षिणामूर्तिस्वामी ह्यांच्या बरोबरचा वेदांच्या अपौरुषेयत्वाचा वाद आणि विनायक नारायण जोशी (आळंदीचे साखरेबुवा) ह्यांच्याबरोबरचा इंग्रजी शिक्षणाच्या आवश्यकतेचा वाद हेहि आढळतात आणि संमतिवयाला विरोध करणारे टिळकहि दिसतात. वैजनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांच्या आठवणीतून टिळकांचा भांडकुदळपणा आणि रानडयांसारख्या विद्वानावर संयम सोडून टीका करण्याचा दोषहि दिसतो.

शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी ऐन ऐरणीवर असलेल्या आणि आता जवळजवळ विस्मृतीत गेलेल्या होमरूल चळवळ, जहाल-नेमस्त राजकारण, ताईमहाराज प्रकरण, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिलेपहिले दिवस, पंचहौद मिशन आणि ग्रामण्य प्रकरण अशा गोष्टींबाबत अनेक तपशील ह्या आठवणींमधून विखुरलेले आहेत.

अण्णा बापट ह्या व्यक्तीविषयी थोडे लिहिल्याशिवाय हे लिखाण पूर्ण होणार नाही. ते अखेरपर्यंत अविवाहित होते हे वर उल्लेखिलेलेच आहे. त्यांची थोरली विधवा बहीण त्यांच्याबरोबरच रहात असे. त्याने वार्धक्यामुळे काम नेटेना म्हणून दुसर्‍या एका वृद्ध बाईना घरी कामासाठी ठेऊन घेतले. काही दिवसांनी त्याहि वृद्ध झाल्या म्हणून आणखी एक वृद्ध बाई घरात राहू लागल्या. ह्या सर्व बायकांना काम काय तर अण्णांच्या जेवण्याखाण्याकडे लक्ष ठेवायचे आणि ते रोज संध्या, पूजा आणि वैश्वदेव करीत त्याची तयारी करायची. अण्णा जेवायला सोवळे नेसून बसत. अण्णांना जेवतांना प्रत्येक गोष्ट अतिगरम लागत असे. आमटी कायम गरम राहिली पाहिजे म्हणून त्यांच्याकडे एक चाकावरची शेगडी होती आणि ती दोरीने ओढून जेवायला बसलेल्या प्रत्येकापुढे न्यायची आणि त्यातून एका वेळेस एक पळी अशी आमटी काढून घ्यायची अशी त्यांची पद्धति होती. जेवल्यानंतर शेंगदाणे खाणे ही त्यांची एक अशीच सर्वांना माहीत असलेली सवय होती. अण्णांच्या घरातल्या स्त्रीराज्यावरून त्यांच्या मागे लोक गमतीने काही काही बोलत असत पण ती केवळ थट्टाच होती हेहि सर्वांना ठाऊक होते. अण्णा एरवी जुन्या विचाराचे असले तरी आमच्याकडे सातार्‍यास आले की त्यांना त्यांच्या आवडीचे पालेकरांच्या बेकरीमधील टोस्टहि लागत असत. समोरची व्यक्ति कोणीहि असली तरी त्याच्याशी अहोजाहोने बोलायची त्यांची सवय होती. त्यांच्याहून अर्ध्या वयाच्या विवाहित स्त्रीला ते ’वहिनीसाहेब’ असेच म्हणत असत. त्यांचे पुष्कळसे लिखाण जांभळ्या शाईमध्ये आणि मोडीमध्ये असे पण बाळबोधहि ते मोडीसारखे एक सरळ रेघ ह्या बाजूपासून त्या बाजूपर्यंत ओढून करत असत.

’आठवणीं’च्या दुसर्‍या खंडात नरसिंह चिंतामण केळकर आणि माधव श्रीहरि अणे ह्यांच्या मोडीमध्ये सह्या आणि तिसर्‍यामध्ये टिळकांच्या मोडी, बाळबोध आणि इंग्रजी हस्ताक्षरांचे नमुने आणि टिळकांचे एक जवळचे सहकारी अमरावतीचे गणेश श्रीकृष्ण खापर्डे ह्यांची मोडी सही उपलब्ध आहे. हे नमुने खाली जोडत आहे.

केळकर ह्यांची सही
अणे ह्यांची सही
टिळकांचे हस्ताक्षर
खापर्डे ह्यांची सही

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

टिळकांनी आपल्या भविष्याला मान्यता द्यावी असे काही ज्योतिषांना वाटे. त्यावेळी महाडकर नावाचे ज्योतिषी चेहरा पाहून तंतोतंत कुंडली मांडत व अदभूत भाकिते सांगत अशी त्यांची ख्याती होती. टिळकांना अमूकवेळा शिक्षा झाल्या हे महाडकरांनी अचूक सांगितले होते असे काही वर्तमानपत्रात आले होते. त्याच्या खरेपणा विषयी खुद्द टिळकांनाचा विचारले असता ते म्हणाले, '' वर्तमानपत्रातील बातमी खोटी आहे. महाडकर ज्योतिषांना या वर्षी काय घडणार ते सांगा असे विचारीत असे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवास न आल्याने मी त्यांना विचारणे सोडून दिले.`` टिळकांचे विश्वनाथ नावाचे चिरंजीव त्या वर्षी प्लेगने वारले. ते कुठल्याही ज्योतिषाला सांगता आले नाही. (संदर्भ :- लो.टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड दुसरा, संग्राहक - सदाशिव विनायक बापट, सन १९२५)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

श्री बापट यांनी केलेले कार्य खरोखरीच खूप मोठे आहे. प्रत्यक्ष टिळकांचा सहवास लाभलेले असे ते व्यक्ती होते.
त्यांच्या ग्रंथा बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

श्री बापट यांनी केलेले कार्य खरोखरीच खूप मोठे आहे याबादल वाद नाही.
परिचय नेमका आणि सुरेख आहे. पुस्तक उतरवून घ्यायला हवे.
अन् डीजिटल लायब्ररीच्या विचित्र 'सर्च' या (गैर)सोयीबद्द्ल न बोलु तेच बरे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुस्तकाच परिचय रोचक वाटला. आणि बापट यांचं कार्य त्याहूनही महत्त्वाचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लो. टिळकांची जन्मशताब्दि १९५७ मध्ये झाली तेव्हा त्यांच्या आयुष्यावर फिल्म्स डिविजनने एक ४० मिनिटांची विश्राम बेडेकरदिग्दर्शित डॉक्युमेंटरी काढली होती. अण्णा बापट तिच्यामध्ये काही सेकंद दिसतात हे मला माहीत होते.

योगायोगाने ती डॉक्युमेंटरी मला यूट्यूबवर http://www.youtube.com/watch?v=MzA3nu_X_Uw येथे सापडली. त्यातील अण्णांचे चित्र वर चिकटवत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्री बापट यांच्या विनंतीला मान देऊन म. गांधी यांनी काही (थोड्याच) आठवणी लिहून पाठवल्या. पण बापट यांनी आणखी काही आठवणी पाठवाव्या म्हणून आग्रह धरला. त्याला गांधीनी खालील उत्तर पाठविले: (हा गोषवारा आहे प्रत्यक्ष शब्द आणि पत्र यांचा संदर्भ आत्ता माझाजवळ नाही). Much wants more and loses all. Sorry, I’m very busy.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम केलं.
महात्मा गांधींविषयी आदर वाढला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठवणीकार बापट ह्यांच्यावरील सदानंद मोरे ह्यांनी लिहिलेला लेख मला रविवार ३ जानेवारीच्या ई-सकाळच्या सप्तरंग विभागात दिसला. त्याची ही लिंक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आताच्या डिजिटल काळात कुणाला पत्र लिहिले तर तो उत्तर देईल का ही एक शंकाच आहे.पत्रव्यवहाराची चांगली गोष्ट म्हणजे हस्ताक्षरातला सज्जड दस्तावेज.संग्रहालयातही मांडता येतो.
बापट यांचेकाम फार भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या मूळ धाग्यामध्ये काशीचे विद्वान दक्षिणामूर्तिस्वामी आणि आळंदीचे साखरेबुवा ह्यांच्याशी झालेल्या टिळकांच्या वादाचा ओझरता उल्लेख आहे. त्यावरच अधिक विस्ताराने सदानंद मोरे ह्यांचे लिखाण आजच्या १० जानेवारीच्या 'ईसकाळ'मध्ये मी ताज्या बातम्यांमध्ये पाहिले. ते सर्व मुळातून वाचण्याजोगे आहे पण त्यातील एक भाग येथे उद्धृत करावासा वाटतो:

"ह्या संदर्भात सदाशिवराव बापट यांच्या आठवणींच्या खंडामधली एक आठवण उद्‌धृत करणं उचित होईल. आठवण आहे वारकरी संप्रदायातले एक वेदान्ती विनायकबुवा साखरे यांची. विनायकमहाराज हे पुण्यात वैदिक पाठशाळा चालवत असत. या पाठशाळेतल्या मुलांना अर्थातच संस्कृत भाषा व तिच्यातली वेदविद्या शिकविली जाई. टिळक ‘केसरी’, ‘मराठा’ वृत्तपत्रं काढत, तेव्हा बुवांना टिळक एकदा म्हणाले: ‘जगात काय चाललं आहे, याचं ज्ञान तुमच्या विद्यार्थ्यांना व्हावं म्हणून मी ‘केसरी’ आणि इतरही वृत्तपत्रं मोफत पाठवायची व्यवस्था करतो.’ त्यावर विनायकबोवांनी टिळकांच्या सरकारविरोधी चळवळीची दिशाच चुकीची असल्याचं सांगून अशा गोष्टींत आपल्याला स्वारस्य नसल्याचं स्पष्ट केलं. लोकांच्या भल्यासाठी जर या चळवळी असतील, तर मुळात या चळवळींमुळं रूष्ट झालेलं सरकार अधिकच दडपशाही करेल व त्यामुळं लोकांच्या दुःखात भर पडेल, असंही त्यांनी निदर्शनास आणलं. त्यावर टिळकांची विषादपूर्ण प्रतिक्रिया अशी, ‘तर मग आता तुम्ही खांद्यावर पताका घेऊन पंढरीस जाणार आणि टाळ कुटत बसणार? हे तुमच्या अध्ययनाचं फळ? ’

हेच साखरेमहाराज काशीक्षेत्री म्हणजेच बनारस इथं गुरूगृही राहिले होते. टिळक एकदा काही कामानिमित्त बनारसला गेले असता त्यांची व विनायकबोवांची भेट झाली. त्या भेटीत टिळकांना साखरे यांचे गुरू दक्षिणामूर्ती स्वामी यांच्याबद्दल अधिक माहिती समजली. त्यामुळं ते प्रभावितही झाले. विनायकबोवा त्यांना आपल्या गुरूंच्या भेटीसाठी घेऊन गेले. टिळकांनी त्यांच्याशी बराच वेळ संस्कृत भाषेतून धर्मचर्चा केली. त्यांच्या ज्ञानानं व वक्तृत्वानं टिळक आणखी प्रभावित झाले. त्यांनी त्या स्वामींना असं सुचवलं: ‘अलीकडची तरुण पिढी इंग्लिश शिक्षणामुळं वेगळा विचार करू लागली आहे; तिच्यापर्यंत स्वामीजींचे हे विचार पोचले तर तिला हिंदू धर्माचे महत्त्व कळेल व ती ख्रिस्ती होणार नाही, तसंच नास्तिकही होणार नाही. स्वामीजींकडं या पिढीला समजावण्याइतके ज्ञान आहे. मात्र हे ज्ञान इंग्लिश भाषेत सांगण्याची गरज आहे. स्वामीजी संन्यासी आहेत. संन्याशाला हिंदू धर्मात विशेष मान व प्रतिष्ठा असते. लोक त्यांचं ऐकतात.’ स्वामींना इंग्लिश शिकवण्याची व्यवस्था करायची जबाबदारी घ्यायची तयारीही टिळकांनी दाखवली.

यावर स्वामीजींची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ते म्हणाले, 'असं ज्ञान तर टिळकांकडंही आहेच. शिवाय त्यांना इंग्लिश भाषाही चांगली अवगत आहे. राहता राहिला मुद्दा संन्याशाला मिळणाऱ्या प्रतिष्ठेचा. टिळकांना संन्यासदीक्षा द्यायचं काम फारच सोपं व अत्यल्प वेळेत होऊ शकतं. म्हणजे स्वामींनी इंग्लिशसारखी परभाषा शिकण्यात काही वर्षं घालवण्यापेक्षा टिळकांनीच ताबडतोब संन्यासी व्हावं व तरुण पिढीशी इंग्लिशमधून संवाद साधून तिला धर्माकडं वळवावं.’ झालं...संवाद खुंटला!"

ह्यामध्ये उल्लेखिलेल्या विनायक नारायण जोशी ऊर्फ साखरेबुवा ह्यांच्या आठवणी तिसर्‍या खंडात पान ९३ वर आहेत. त्यामध्येच टिळक आणि दक्षिणामूर्तिस्वामी ह्यांच्यामधील वेदांच्या अपौरुषत्वावरील चर्चा हीहि आलेली आहे. ही चर्चा वेद अपौरुषेय आहेत हे जो मानत नाही तो वेदांविषयक कसलीहि चर्चा करण्यास ज्ञानाने अपुरा आणि म्हणून अपात्रच आहे अशी स्वामींची भूमिका तर केवळ बुद्धीचा आणि तर्काचा उपयोग करून वेदांची कालनिर्मिति करणे आणि त्यांचा अर्थ लावणे शक्य आहे असे टिऴकांचे प्रतिपादन ह्या दोन टोकांमधील अंतर अखेरपर्यंत नष्ट झाले नाही आणि वाद अनिर्णितच राहिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या डिजिटल संग्रहाबद्दल वरील लेखाच्या सुरुवातीस मी जे वैतागाचे उद्गार काढले होते त्यांचे परिमार्जन पुष्कळशा प्रमाणात आता झाले आहे हे नोंदवण्यास आनंद होतो.

डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचा सर्व संग्रह गेले तीनचार वर्षे https://archive.org/ ह्या संग्रहाचा भाग झालेला असल्याने तेथील पुस्तके मिळणे आणि ती उतरवून घेणे सुकर झालेले आहे ही वाचकांना आणि अभ्यासूंना आनंदाची बाब आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत पुस्तक (खंड दुसरा) इथे आहे:
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.406124/mode/1up

खंड १ आणि ३ ऑनलाईन आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

प्रस्तुत पुस्तक उतरवलय. वाचणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0